स्वयंपाकघरातील भांडी कशी असावीत?

Bhakti's picture
Bhakti in काथ्याकूट
4 Nov 2023 - 10:15 pm
गाभा: 

मसाला लैब पुस्तक वाचतेय स्वयंपाकघरात कोणकोणते भांडे वापरायचे याविषयी लिहिले आहे.
भांडी स्टील वा अल्युमिनियम ऐवजी तांबे, उच्च प्रतीचे अल्युमिनियम वा स्टील असावे.भांडे उच्च प्रतिचेच असावेत.नाहीतर पदार्थातील आम्ल प्रक्रिया घडू शकते.त्यातील पोषक तत्वे नाहीसे होतात.नोन स्टिकच्या धूरामुळे तर एक छोटासा जिवंत पक्षीही मरू शकतो.
त्यात मला आज लिंक आली.त्यामध्ये सर्जिकल स्टील चे स्वयंपाकाचे भांडे वापरावेत का वापरावेत हे सांगितले जात होते.पण त्या भांड्यांची किंमत आहे 50k.तसेच प्रेशर कुकर वापरू नये त्यात पोषकद्रव्ये कमालीचे नष्ट होतात हेही सिद्ध झाले आहे.मातीच्या भांड्यांची गुणवत्ता इतकी चांगली नसते,कारण योग्य चांगली माती वापरली जाणे महत्त्वाचे आहे.
बांबूचे ही काही भांडी असतात असे ऐकीव आहे.
अर्थात खूपच खोल विचार करतेय,पण स्वयंपाक घरात वापरले जाणार्या भांड्यंविषयी तुमची मतं वाचायला आवडतील.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Nov 2023 - 7:31 am | मुक्त विहारि

मातीची भांडी ते स्टील आणि परत स्टील ते मातीची भांडी..

त्यामुळे, सध्या तरी, स्वैपाकघरात स्टीलची भांडी शिजवायला आणि साखर, तांदुळ इत्यादी पदार्थ ठेवायला आणि काचेच्या बरण्या, मीठ व मसाले ठेवायला..

स्ट्रीलच्या भांड्याला कॉपरचा बेस असलेली भांडी मिळतात, याने इंधनाची बचत होते. ज्या प्रमाणे धातु बदलल्याने फरक पडतो त्याच प्रमाणे कोणता अग्नी आहे त्याचा सुद्धा फरक पडत असावा असे वाटते. चुली वरचे जेवण आणि गॅस वरचे जेवण याच्या चवीत फरक असतो असे मला वाटते, पण खरचं असे असावे काय ?

[ स्टील फिल्टर मध्ये कॉपर प्लेट्स ठेवुन अल्कलाईन पाणी पिणारा ] :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Pictures

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2023 - 12:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भक्तीशेठ, चांगला धागा विषय. कोणत्या भांड्यात काय शिजवलं म्हणजे आरोग्याला बरं असतं. आणि काय केले म्हणजे नुकसान होतं याबद्दल कोणताही विदा नाही. आरोग्याला भारी असतं म्हणून विशेष भांडी वापरली, असेही काही दिसत नाही. कालपरत्वे भांडी बदलली इतकाच भांड्या-कुंड्यांचा अर्थ. मातीची भांडी, जर्मलची भांडी, तांब्यांची भांडी ( ताम्हण) आणि स्टीलची भांडी असाच आमचा प्रवास आहे. तीन दगडाची चूल, मातीची चूल, स्टोह, शेगडी, इलेक्ट्रिक उपकरणे असा प्रवास. चुलीवरचा चहा, चुलीवरचं मटण, चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं जे जे काय असतं ते ब-याच चविष्ट लागलं असा व्यक्तीगत अनुभव आहे. एक वेगळा वास पदार्थाला येतो असे मत आहे, भूक लागली की चवीचा विषय क्रमांक दहाव्या क्रमांकावर जातो. आरोग्य वगैरे हे आजच्या पिढीचं खूळ आहे, असे वाटते. आरोग्य काळजीचा विषय असतो पण म्हणून त्यासाठी पदार्थ शिजवणाऱ्या उपकरणाची काळजी वाहणा-या गृहिणी पाहण्यात नाहीत.

एवढं बोलून दोन शब्द संपवतो.

-दिलीप बिरुटे

हा जर्मल म्हणजे कुठला धातू? ऐकण्यात खूपदा आलाय पण नेमकं काय ते कळत नाही

श्री प्रचतेस, उत्सुकता वाढवणारा प्रश्न विचारला. थोडा शोध घेतल्यानंतर हे दिसले.
Germal silver Cu: 60% Zn: 30% Ni: 10% Used for making jewellary, utensils and imitation silver...etc
https://www.nextgurukul.in/wiki/concept/icse/class-8/chemistry/metals-an...

बजेटमध्ये येणारी भांडी वापरतो.
अल्युमिनियम आणि तांबे,पितळ चांगले. त्यांची मोड येते. स्टील सुद्धा चांगले. खूप टिकतात आणि पदार्थ ठेवायला चांगले. शिजवायला अल्युमिनियमचीच बरी.

कर्नलतपस्वी's picture

5 Nov 2023 - 2:51 pm | कर्नलतपस्वी

असल्याने सीईओ कडून जो हुकूम मिळतो त्याप्रमाणेच प्रोक्युरमेन्ट करतो. विषयात फार गती नसल्याने प्रतिसाद वाचून मत बनवेन.

खुप चांगली मतं वाचतेय! धन्यवाद!

-काचेच्या बरण्या, मीठ व मसाले ठेवायला
हो ,प्लास्टिक हद्दपार करावं लवकरात लवकर.

-अग्नी आहे त्याचा सुद्धा फरक पडत असावा असे वाटते
हो,एलपीजी, मायक्रोव्हेव,चूल, तंदूर भट्टी प्रत्येक अग्नीची एक विशेषतः आहे.

-आरोग्य काळजीचा विषय असतो पण म्हणून त्यासाठी पदार्थ शिजवणाऱ्या उपकरणाची काळजी वाहणा-या गृहिणी पाहण्यात नाहीत
नाही,गृहिणी बदलत आहेत,सजग होतं आहेत.

-शिजवायला अल्युमिनियमचीच
तेच नकोय,स्टील वा तांब्याकडे वळा हे सांगायचं आहे

- सीईओ कडून जो हुकूम मिळतो त्याप्रमाणेच प्रोक्युरमेन्ट करतो
हूकूमाची अंमलबजावणी करणे आवश्यक :)

अजूनही माहिती मिळाल्यावर देते.

सरिता बांदेकर's picture

5 Nov 2023 - 8:08 pm | सरिता बांदेकर

भांडे वापरताना म्हणजे शिजवताना काही गोष्टी पाळाव्या लागतातच.तांबं किंवा पितळ वापरत असाल तर कल्हई करावीच लागते. कल्हई नाही केली तर पदार्थ कळकतो असा काही तरी शब्द आहे तो लक्शात नाहीय माझ्या.
आणि तसे पदार्थ खाल्ले तर उलटी, जुलाब होतात.
पूर्वी मुसलमान लोकांच्या घरांत ( मला कुणाला दुखवायचं नाही) बघितली होती ती जर्मनची भांडी.आमच्या घरी अजूनही एक तवा आहे. ते विमानाच्या पत्र्याचा आहे असं म्हणतात. पण त्याची भांडी कुठे बघितली नाहीत.
मी वर्षानुवर्षे भीडाची भांडी वापरते.
आमटीला फोडणी त्यात देऊन आमटी उकळली कि लगेच दुसऱया भांड्यात काढून घेते.
भाजीसुद्धा तशीच करते. फक्त उसळी आणि दुधीची भाजी काळी पडते.
पालेभाज्यांची चव तर अप्रतिम लागते.
पण आधी त्या भांड्यांचं क्युअरिंग करावं लागतं, साबण लावायचा नाही.आणि तेल लावून ठेवायचं.
खूप दिवस वापर करायचा नसेल तर पाम ॲाईल लावायचं.
यामुळे हिमोग्लोबीन वाढतं म्हणे.मी काही डॅा. नाही पण लहानपणी रक्त कमी झालं,अशक्तपणा आला कि आमचे फॅमिली डॅा. सांगायचे,’एका सफरचंदामध्ये सात ,आठ स्वच्छ खिळे लावून रात्रभर ठेवायचे आणि सकाळी ते सफरचंद खायचं.
भीडाच्या भांड्यात जेवण करताना, गॅस लवकर बंद करावा नाहीतर जेवण करपतं.
बालभारतीमध्ये एक धडा होता, ‘दगडी’ नांवाचा त्यात कालवण चुलीवरून काढल्यावर जसं बराच वेळ उकळत आणि शिजत रहातं, तसंच या भीडाच्या भांड्याचं आहे.
भांडी घेताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

होय बीडाच्या भांड्याविषयी ऐकलं आहे.पाहिली वा वापरली नाहीत.

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2023 - 8:02 am | चौथा कोनाडा

होय, कळकणे असाच शब्द आहे तो.

मला भाषेचे नवल वाटते, असे वेगवेगळे शब्द अर्थाच्या ( इथे अर्थात चवीच्या) जवळ जातात आणि ती ती अनुभूती अनुभव देऊन जातात.

मला वाटते की इट्स मोअर अबाऊट असोशियेशन. शब्द - चव - शब्द - चव असे लहानपणी नकळत.

रशियन माणसाला क ळ क अशा ध्वनीने वेगळीच काही चव जिभेवर येऊ शकत असू शकेल.

सुबोध खरे's picture

10 Nov 2023 - 7:43 pm | सुबोध खरे

पितळ हा मिश्र धातू असून तो तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून बनलेला आहे.

तांब्याची किंवा पितळेची भांडी हि अन्नातील आंबट पदार्थातील आम्लाशी प्रक्रिया करतात. उदा चिंचेत टार्टारिक आम्ल, लिंबात सायट्रिक आणि टोमाटो मध्ये सायट्रिक आणि मॅलिक आम्ल तसेच ताकात / आंबट दह्यात लॅक्टिक आम्ल आणि व्हिनेगार मध्ये असेटिक आम्ल असते. यांची तांब्या बरोबर किंवा जास्त बरोबर प्रक्रिया होऊन कॉपर किंवा झिंक टार्टारेट, सायट्रेट किंवा मॅलेट, लॅक्टेट, ऍसिटेट हि संयुगे तयार होतात.

या क्षारांची अन्नातील प्रथिनांबरोबर प्रक्रिया होऊन प्रथिनांची संयुगे (denatured) तयार होतात आणि त्याने अन्नाला विचित्र असा क्षारयुक्त स्वाद येतो. याला कळकणे म्हणतात. हि प्रक्रिया जास्त झाली तर अन्न विषबाधा होऊ शकते ज्यातून उलट्या जुलाब पोटदुखी किंवा वात धरणे असे होऊ शकते

यासाठी आपल्याकडे तांब्या पितळेच्या भांड्याला कथिलाची कल्हई लावतात. Tin is an inert material which means that it is highly nonreactive. Another good quality of tin which makes it perfect for its role of lining on a copper pan is that it is non-stick. यामुळे तांब्यापितळेची कल्हई केलेली भांडी हि पदार्थ शिजवण्यासाठी अतिशय योग्य आहेत( त्यांची किंमत जास्त आहे सोडले तर)

परंन्तु कथिलाचा विलय बिंदू( वितळण्याचे तापमान)कमी आहे ४५० अंश सेल्सियस.

आपल्याकडे स्त्रिया पितळेचे पातेले प्रथम चालू गॅसवर ठेवतात( नंतर सावकाश त्यात तेल टाकणे करतात) यामुळे पातेल्याचे तापमान फार चटकन वर जाते आणि भांड्याची कल्हई लवकर खराब होते आणि एकदा कल्हई उतरली कि पदार्थ कळकतात आणि मग आपल्याला परत कल्हई करून घ्यावी लागते.

ज्यांच्याकडे जुनी तांबे पितळेची भांडी आहेत त्यांनी तो कल्हई करून जरूर वापरावी. तांबे आणि पितळ हे धातू उत्तम उष्मावाहक असल्याने मोठे पातेले गॅस वर ठेवले तरी उष्णता सर्वत्र सहज पसरते आणि पदार्थ "मध्ये" जळत नाही आणि "कडेला" कच्चा राहत नाही.

सुबोध खरे's picture

10 Nov 2023 - 7:58 pm | सुबोध खरे

कथिल शरीरात फारसे शोषले जात नाही आणि जे शोषले जाते ते २४ ते ४८ तासात शरीरातून बाहेर टाकले जाते यामुळे वर्षानुवर्षे कल्हई केलेली भांडी जगभर वापरली जात असून त्याचे दूरगामी परिणाम दिसत नाही.

अर्थात कथिल हा तसा मृदु धातू असल्यामुळे झारा कालथ्याने ढवळण्यामुळे सुद्धा कल्हई लवकर खराब होते.

बंगाली लोकं काशाची तपेली वापरतात. यालाच कुणी जर्मल म्हणतात म्हणजे एक तरी तसलं भांडं असतं. त्याला कल्हई करावी लागत नाही. खूप तापवताही येतं. पण कासं धातू (कथील अधिक जस्त) फार महाग असतो. [इकडे काशाची वाटी असते त्याने तळपायास तेल चोळलं (आपलं आपण नव्हे) की शरीरातील उष्णता जाते. ] कासं ओळखायची खूण म्हणजे ठोकला की नाद येत नाही,बद्द आवाज येतो. बाकी धातूंना नाद येतो.

पूर्वी काही लोक अल्युमिनियमला जर्मन म्हणत.

विमानाच्या पत्र्याची भांडी - अल्युमिनियम अधिक जस्ताचा मिश्र धातू. त्यांच्या कढईंना तडा जाऊ लागल्याने वापर मागे पडला.

ओडिशात वाढायची पळी नारळाच्या करवंटीची असे. कटकमधला एक वडेवाला एकच करवंटी गेली पन्नास वर्षे वापरतोय ते बघायला पर्यटक येतात.

शिजवायची भांडी पूर्वी मातीची होती. पण पाणी ठेवायला साधू किंवा प्रवासी भोपळ्याचा गडू,कमंडलू वापरत. कलाबाश नावाच्या झाडाला(वेल नसतो. फणसाच्या झाडासारखे झाड असते) असले भोपळे लागतात.

हो नारळाच्या वाटीत इडली करायचे व्हिडिओ पाहिले आहेत .तसेच हळदीच्या पानात पदार्थ होतात.पण चीन ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये लाकडाची कढई,कसल्यातरी पानांचा कोन बनवून तांदळाचा भात बनवला जातो.

चौथा कोनाडा's picture

5 Nov 2023 - 9:49 pm | चौथा कोनाडा

खुप वर्षांपूर्वी एक लेख वाचला होता, त्या लेखकाने स्टेनलेस स्टील ही आरोग्ययास घातक आहे अशी शंका व्यक्त केली होती. आणि यावर कुणीच नीट सखोल संशोधन केले नाही म्हणून तक्रारीचा सुरू लावला होता हे आठवले.

स्वयंपाकघरातील भांडी कशी असावीत?

स्वच्छ

पर्णिका's picture

6 Nov 2023 - 4:01 am | पर्णिका

छान माहिती मिळतेय.

तसेच प्रेशर कुकर वापरू नये त्यात पोषकद्रव्ये कमालीचे नष्ट होतात हेही सिद्ध झाले आहे.

याबद्दल सविस्तर सांगणार का ? रिसर्च लिंक्स असतील तर प्लिज इथे टाकता येतील का ? वरण, आमटी, उसळी, भात, खिचडी, सांबार असे अनेक पदार्थ करायला मी बरेचदा प्रेशर कुकरच वापरते.

कुमार१'s picture

6 Nov 2023 - 7:47 am | कुमार१

छान माहिती मिळतेय.

सर टोबी's picture

6 Nov 2023 - 8:29 am | सर टोबी

धागा लेखिकेबद्दल वैरभाव नाही आणि तो तयार व्हावा अशी इच्छा नाही. पण मागील बऱ्याच वर्षांपासून जुनं ते सोनं प्रकारातले तज्ज्ञ मंडळी आणि त्यांचे एकमेवाद्वितीय प्रकारातले उद्योग यांनी मूळ धरायला सुरुवात केली आहे असे दिसते. त्यातीलच हा प्रकार असावा अशी शंका येते. आपले रीतिरिवाज, व्रतवैकल्य यांचे आरोग्य, ऋतुमान, आणि पर्यावरणपूरक असणे अशा लोभस प्रकाराने याची सुरुवात होते. मग देशी वाणाच्या नावाखाली खपली गहू वगैरे याचं मार्केटिंग सुरु होतं. यातही गंमत म्हणजे अजूनही कुठल्यातरी अगम्य भागातले शेतकरी अजूनही हे देशी वाण टिकवून त्याच्या तुटपुंज्या उत्पन्नामध्ये तग धरून असतात. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली तथाकथित फळं व्यवस्थित कीटकनाशक आणि रासायनिक खतं वापरून पिकवलेल्या फळांसारखीच रसरशीत आणि गरगरीत असतात. परकी आक्रमकांनी लाखो धर्मग्रंथ जाळून नष्ट केल्यानंतरही काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने तेलं आणि औषधं तयार करण्याचं ज्ञान शिल्लक असतं. फक्त त्यावर विश्वास ठेवायचा की नाही एवढंच आपण करू शकतो.

गवि's picture

6 Nov 2023 - 9:10 am | गवि

काही अंशी सहमत.

स्केलेबिलीटी आणि कॉस्ट या मुद्द्यांना अनेकदा स्पर्श होतच नाही.

जुने ते सोने यातील गोष्टी खरोखर चांगल्या असतील (उदा. ऑरगॅनिक बटाटे, खादीची सुती वस्त्रे किंवा हातसडीचा तांदूळ किंवा अनेक इतर ) असे तूर्त क्षणभर धरले तरी ते कितपत स्केलवर उपलब्ध होईल आणि काय किंमतीला मिळेल, कितीजण ते घेऊ शकतील हा भाग काहीसा धूसर राहतो. किंबहुना चांगले जुने हे चांगले असूनही ते काळाच्या ओघात मागे पडून, बदलून (घातक विनाशकारी ?!) असे नवे सर्व का रूढ होत जाते ? ते स्वीकारले जाण्यात काहीतरी मेरिट असू शकेल असाही विचार व्हावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2023 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

मलाही असंच वाटायचं सर्व काही मार्केटिंग स्ट्रटेजी आहे.आपल्याला झेपणार का?मुळात एकाच दिवशी मला दोनदा एकच माहिती वेगवेगळ्या पद्धतीने मिळते त्यावेळी विचार व्हावा आणि आपल्यासाठीचा सस्टेनेबल मार्ग मिळत रहावा म्हणून धागा प्रपंच.चांगले निरीक्षण वादी झाल्यास कणाकणाने ' मातीतून ' सोनं मिळालं नाहीतर ती मातीच दिसेल :)

रेड सॉईल स्टोरीज ह्या युट्युब चॅनलवर विविध प्रकारची भांडी दिसतात. माती, तांबे, पितळ.
स्वयंपाकघर खूपच सुंदर दिसते त्यांचे.

Bhakti's picture

6 Nov 2023 - 11:01 am | Bhakti

अगदी

टर्मीनेटर's picture

6 Nov 2023 - 11:29 am | टर्मीनेटर

चांगली चर्चा सुरु आहे.
वाचतोय...

श्वेता व्यास's picture

6 Nov 2023 - 12:25 pm | श्वेता व्यास

काय चांगलं काय चुकीचं माहिती नाही पण आमच्या घरातील पूर्वीपासून चालत आलेले समज -
भांडी तांबे-पितळ असतील तर कल्हई हवीच. तसेच कल्हई नसलेल्या पितळेच्या भांड्यात आणि अल्युमिनियम मध्ये शिजवलेला पदार्थ शिजवून झाला की लगेच स्टील मध्ये काढून घ्यायचा अन्यथा वर सरिताताईंनी म्हटल्याप्रमाणे तो कळकतो.
पोळ्या/धिरडी/थालीपीठ इत्यादी साठी लोखंडी तवा.
भात, बटाटे, रताळी शिजवण्यासाठी पातेलीच चांगली, कुकरमध्ये फक्त डाळच शिजवली जाते.
पालेभाज्यांसाठी लोखंडी कढई, इतर भाज्या आणि रसभाज्यांसाठी अल्युमिनिम ची कढई.
दोन्हीही शिजल्याबरोबर स्टीलमध्ये काढून घेणे.
लहान मुलांना दूध पिण्यासाठी चांदीची वाटी/ग्लास उत्तम.
आणि स्टील सर्वच प्रकारे सुरक्षित.
मीसुद्धा हेच सगळं वापरतेय, मध्ये जरा नॉनस्टिक घेतलं होतं, पण तोटे समजल्यानंतर बंद केलं. आणि सध्या अल्युमिनिम कढया बदलून स्टीलच्या घ्याव्यात असं डोक्यात आहे.

अथांग आकाश's picture

6 Nov 2023 - 1:30 pm | अथांग आकाश

आमच्या घरी सगळी भांडी कुकर व मोठे डबे स्टीलचे, तवे, कढया नॅानस्टीक, छोटे डबे, बाटल्या तपरवेअर किंवा डीमार्ट मधे मिळणार्या प्लॅस्टीकच्या आहेत!

सुबोध खरे's picture

6 Nov 2023 - 8:33 pm | सुबोध खरे

Leaching is the loss or extraction of certain materials from a carrier into a liquid.
स्वयंपाकघरात लीचिंग चा अर्थ असा आहे कि ज्या भांड्यात पदार्थ ठेवलेला आहे त्या भांड्याचे द्रव्य/अंश पदार्थात उतरणे.

या साठी लोणचे लिंबाचा रस सारखे पदार्थ हे काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवत असत.

जर लोणचे बिडाच्या ( लोह धातू) भांड्यात ठेवले तर लोणच्यातील आम्ल (उदा लिंबू कैरी) बिडातील लोहाशी प्रक्रिया करून पदार्थ खराब होण्याची शक्यता असते.

काचेच्या भांड्यात आपण पदार्थ शिजवले तर त्यात लीचिंग हि प्रक्रिया अजिबात होत नाही यामुळे काचेच्या भांड्यात पदार्थ शिजवणे हे सर्वोत्तम आहे (याच कारणासाठी सर्व परीक्षा नळ्या किंवा प्रयोगशालेतील उपकरणे काचेची बनवलेली असतात.)

परंतु काच उच्च दर्जाची असली पाहिजे अन्यथा तापवल्यावर तडकते. मुळात काच महाग आणि नाजूक असल्याने रोजच्या भांड्यांसाठी तो पर्याय अव्यवहार्य आहे. चिनीमातीच्या भांड्यात आपण पदार्थ शिजवू शकत नाही.

यानंतरचा उत्तम पर्याय म्हणजे तांबे किंवा पितळेची भांडी. यांची उष्मावाहकता उत्तम असते परंतु यात लीचिंग होऊ शकते. यामुळेच आम्ल पदार्थ ठेवल्यास पदार्थ कळकतो( चव बिघडते) यासाठी तांबे किंवा पितळेची भांडी याना कथिलाची कल्हई केली जाते. "कथिल" (tin) याची अन्न पदार्थाबरोबर प्रक्रिया होत नाही. तांबे किंवा पितळ हे महाग आहे यामुळे सामान्य माणसांना दुसऱ्या महायुद्धाच्या महागाईमुळे परवडेनासे झाले आणि याचा वापर कमी झाला. याशिवाय त्यावर ताबड्तोब गंज चढतो यामुळे रोजच्या रोज चिंच पितांबरी सारख्या पदार्थानी ते घासून लखलखीत ठेवावे लागते.

याला पर्याय म्हणून जर्मन सिल्व्हर आले परंतु ते पण महागच होते. म्हणून याला स्टेनलेस स्टील आणि अल्युमिनियम हे पर्याय आले.
अल्युमिनियम मध्ये लिचिंग होते म्हणूनच कुकर मधील भांडी साफ करण्यासाठी बायका त्यात तळाशी पिळून उरलेले लिंबू वापरतात परंतु दूरगामी परिणाम आता लक्षात यायला लागल्यामुळे ( उदा अल्झायमर हा आजार होण्यासाठी अल्युमिनियम हे कारणीभूत असू शकते) याचा वापर कमी करा असा तज्ज्ञांकडून सल्ला मिळतो.

स्टेनलेस स्टील हा सध्या तरी स्वस्त उपलब्ध असणारा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण हि भांडी वर्षानुवर्षे खराब होत नाहीत उत्तम रित्या स्वच्छ करता येतात आणि लीचिंग होत नाही. लोणच्यापासून लिंबू चिंच सारखे पदार्थ ठेवून त्यावर परिणाम होत नाही. त्यातून क्रोमियम आणि निकेल सुरुवातीला थोड्या प्रमाणात अन्न पदार्थात उतरू शकते. परंतु क्रोमियम शरीरातून ८ तासात बाहेर फेकले जाते त्यामुळे क्रोमियमचा विषारी परिणाम सहजासहजी होत नाही निकेल मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थात असते त्याचा सामान्य स्थितीत मानवी शरीरावर परिणाम होत नाही. हे दोन्ही पदार्थ त्याच्या खाणीत काम करणाऱ्या माणसावर मोठ्या प्रमाणात श्वसन मार्गे गेल्याने परिणाम करू शकतात अन्यथा नाही.

बिडाच्या भांड्यात पदार्थ केल्यास पदार्थ काळे होतात याचे कारण बिडातील लोह पदार्थात उतरू शकतात पण हे लोह शरीराला उपयुक्त असते. बिडाची विविक्षीत ऊर्जा ( स्पेसिफिक हीट) वबरीच जास्त असल्याने त्याची भांडी तापायला खूप वेळ लागतो तसेच ती निवायला सुद्धा खूप वेळ लागतो या साठीच "सिझलर" आपल्याला बिडाच्या तव्यावर आणून देतात तो पदार्थ आपले जेवण संपेपर्यंत गार होत नाही.
बिडाचा तवा पटकन गरम होत नाही तसेच पटकन गार होत नाही यामुळे हॉटेलात डोसा घालण्यासाठी किंवा फुल्के करण्यासाठी याचा सर्रास वापर होतो. परंतु घरगुती वापरात पदार्थ पटकन खाली उतरवता आला नाही तर तो जळण्याची शक्यता तितकीच जास्त असते.

शेवटी चुलीवरची जेवण आपल्याला का आवडते?

चुलीवर उष्णता मंद गतीने पदार्थाला मिळत असते आल्यामुळे पदार्थ अगदी हळूहळू कमी तापमानावर शिजतो यामुळे पदार्थ आतपर्यंत जास्त चांगले शिजतात उदा चुलीवर भाजलेले वांगे. याउलट गॅसची उष्णता खूप जास्त असल्यामुळे त्यावर भाजलेले पदार्थ वरून भाजले जातात आणि आतून शिजतात भाजले जात नाहीत. यासाठी गॅस वर अतिशय मंद गतीने पदार्थ भाजावे आणि त्याला धुराचा स्वाद येण्यासाठी पदार्थ झाल्यावर एका भांड्यात ठेवून एक जळता निखारा चमच्यात घ्या त्यावर एक चमचा तूप ओता आणि हा चमचा भांड्यात ठेवून वर झाकण लावून टाका येणाऱ्या धुराचा खरपूस स्वाद या पदार्थाला येईल. परंतु आजच्या धकाधकीच्या काळात गृहिणींना अतिमंद गॅसवर शिजवणे किती शक्य आहे हा हि एक प्रश्नच आहे.
क्रमशः

स्नेहा.K.'s picture

6 Nov 2023 - 9:45 pm | स्नेहा.K.

फॉरवर्ड किंवा ऐकीव गोष्टींवर आधारित महितीपेक्षा व्यावहारिक आणि वैज्ञानिक प्रतिसाद आवडला!

सरिता बांदेकर's picture

6 Nov 2023 - 10:14 pm | सरिता बांदेकर

तुम्ही छान आणि सविस्तर लिहीलं आहे.
पण

टर्मीनेटर's picture

6 Nov 2023 - 10:37 pm | टर्मीनेटर

उत्कृष्ठ प्रतिसाद!
मागे एका मुस्लिम संशोधकाचा मुस्लिमांच्या जीवनशैलीवर आधारित असलेल्या संशोधनावरचा लेख वाचनात आला होता.
त्यात त्याने म्हंटले होते कि अल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर मुस्लिम कुटुंबांमध्ये अन्न शिजवण्यासाठी भरपूर होतो पण त्या धातूच्या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्नपदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत! त्याच्या मते अल्युमिनियमचे जे अंश अन्नपदार्थात उतरतात ते मानवी कल्पनाशक्तीला मारक असतात त्यामुळे अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बनवलेला चहा आणि शिजवलेले अन्नपदर्थ दोन्ही खाणे टाळावे. ह्यातले खरे-खोटे तो संशोधकच जाणे.

श्वेता व्यास's picture

7 Nov 2023 - 10:21 am | श्वेता व्यास

शास्रोक्त आणि उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद डॉक्टर!

आजच्या धकाधकीच्या काळात गृहिणींना अतिमंद गॅसवर शिजवणे किती शक्य आहे हा हि एक प्रश्नच आहे.

अगदी बर्याच वेळी मी मंद आचेवर पदार्थ करते, अतिउत्तम होतात.आता परत त्यासाठी टाईम मॅनेजमेंट हा फक्टर येतो ;)
या प्रतिसादात अनेक पैलूंना न्यायाने समाविष्ट केलं . धन्यवाद डॉ खरे!

चांदणे संदीप's picture

7 Nov 2023 - 10:42 am | चांदणे संदीप

पुढील प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!

सं - दी - प

राघव's picture

7 Nov 2023 - 5:06 pm | राघव

उत्तम, सविस्तर आणि माहितीपूर्ण प्रतिसाद! आवडला.

@भक्तीतै, छान धागा! वाचतोय.

सुबोध खरे's picture

7 Nov 2023 - 7:00 pm | सुबोध खरे

नॉनस्टिक भांडी -- यात टेफ्लॉन नावाच्या द्रव्याने भांड्याला आतल्या बाजूने लेप लावलेला असतो. टेफ्लॉन म्हणजे पॉली टेट्रा फ्लुओरो इथिलिन. हा पदार्थ त्यातील सर्वच्या सर्व valency (कोणत्याही अणूची संयोग पावण्याची क्षमता) या फ्ल्युओरीन ने संतृप्त (saturate) झाल्यामुळे याचा कोणत्याही पदार्थाशी संयोग होत नाही. यामुळे हा पदार्थ अतिशय सुळसुळीत असल्याने याला काहीही चिकटू शकत नाही. याचा लेप उच्च तापमानावर भांड्याला आतून लावला जाती यामुळे या भांड्यात शिजवलेले पदार्थ याला अजिबात चिकटत नाहीत.

पूर्वी हा लेप लावण्यासाठी PFOA perfluorooctanoic acid हा पदार्थ वापरला जात असे पण या पदार्थामुळे शरीरावर अपाय होण्याची शक्यता लक्षात आल्यावर याचा वापर बंद करून दुसरी प्रक्रिया वापरली जाते. यामुळे आता २०१५ नंतर तयार केलेली नॉनस्टिक भांडी यातून PFOA आपल्या पोटात जाण्याची शक्यता नाही. नॉन स्टिक भांड्याचा आतला लेप मधीळ टेफ्लॉन सुटे झाले आणि त्याचे बारीक तुकडे आपल्या पोटात गेले तरी ते आपल्याला अपायकारक नाही. कारण टेफ्लॉन शरीरातील कोणत्याही अवयवांवर किंवा द्रव्याबरोबर प्रक्रिया करत नाही.

आपल्या शरीरात हृदयाच्या अँजिओ ग्राफीसाठी वापरण्यात येणारे कॅथेटर आणि स्टेण्ट हे टेफ्लॉन कोटेड असतात कारण त्यावर रक्ताची गुठळी होत नाही. तेंव्हा नॉनस्टिक भांडी वापरल्यामुळे शरीराला अपाय होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. पण हा लेप ३०० अंश सेल्सियसच्या वर गेल्यास भांड्यापासून सुटा होऊ शकतो आणि भांडे खराब होऊ शकते यासाठी नॉनस्टिक भांडी रिकामी गॅस वर ठेवून गॅस चालू ठेवू नये. याशिवाय स्टील चा झारा किंवा कालथा वापरल्यास याला चरे पडून याचे नॉनस्टिक खराब होते आणि पदार्थ याला चिकटू लागतात यासाठी यावर लाकडाचा किंवा नायलॉनचा झारा किंवा कालथा वापरावा लागतो.

ऍनोडईज्ड अल्युमिनियम-- उदा हॉकिन्स फ्युचूरा. यात अल्युमिनियमची भांडी ऍनोड ला लावून सल्फ्यूरीक आम्लात ठेवून त्यातून डी सी करंट सोडल्यामुळे आतल्या बाजूने अल्युमिनियमचे ऑक्सिडेशन होऊन अल्युमिनियम ओक्साईडचा लेप तयार होतो. चांगल्या भांड्यात हा लेप ६० मायक्रॉन इतका जाड असल्यामुळे या भांड्यात आपण स्टील चा झारा किंवा कालथा वापरू शकतो. हा अल्युमिनियम ओक्साईडचा लेप सहजासहजी निघत नाही किंवा पदार्थात उतरत हि नाही. यामुळे हि भांडी रोजच्या वापरासाठी सुरक्षितपणे वापरू शकता.

मातीची भांडी-- ऐतिहासिक कारणे सोडली तर हि भांडी वापरायचे असे कोणतेही कारण आपल्याला सापडत नाही. जे लोक पुराणकाळातील गोष्टींमध्ये रमतात त्यांना मन रिझवण्यासाठी ठीक आहे. परंतु मातीतून अनेक पदार्थ लीच होतात यामध्ये उपयुक्त खनिजे कदाचित मिळतीलही परंतु भांडी करायला वापरलेल्या मातीत सर्रास सगळीकडे वापरले गेलेले शिसे, पारा, कॅडमियम, कोबाल्ट, टिटॅनियम युक्त रंग, कीटकनाशके हि सुद्धा या मातीच्या भांड्यात उतरतात आणि आपण त्यात लिंबू चिंच कोकम सारखे आम्लयुक्त पदार्थ वापरल्यास त्यातून हि द्रव्ये आपल्या पोटात जातात.

यामुळे स्टाईल मारणे सोडले तर मातीची भांडी वापरण्याचे असे कोणतेही कारण दिसत नाही.

अल्युमिनियम तांबे पितळ किंवा चांदी हे उष्णतेचा उत्तम वाहक असल्यामुळे गॅस मोठा केला तरी उष्णता सर्वत्र ताबडतोब पसरते. यामुळे पदार्थ मध्यभागी जळत नाही आणि कडेला कच्चा राहत नाही. त्या मानाने स्टेनलेस स्टील किंवा बिडाचे तवे हे उष्णतेचे मंद वाहक आहेत आणि त्यात पदार्थ मध्यभागी जळू शकतो आणि कडेला कच्चा राहतो. उडप्यांकडे असलेले तवे यात गॅसची ज्योत या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वदूर पसरेल असा बर्नर असतो.( मुद्दाम पहा) हाच प्रयत्न आपण घरी मोठा बिडाचा ताव आणून केला तर डोसा मध्यभागी जळू शकतो आणि कडेला कच्चा राहतो. यासाठी कॉपर बॉटमची स्टेनलेस स्टीलची भांडी हि जास्त प्रमाणात पदार्थ करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

कमी प्रमाणात अन्न शिजवण्यासाठी नुसती स्टेनलेस स्टीलची भांडी पुरेशी आहेत. याला एक साधी युक्ती म्हणजे गॅसच्या ज्योतीच्या दुप्पट किंवा जास्त आकाराचे भांडे घायचे असेल तर कॉपर बॉटमचे घ्या (उदा दूध आटवायचे असेल) आणि ज्योतीच्या दीडपट असेल तर साधे स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरू शकता.
यात सुद्धा सिलिंडरचा गॅस( एल पी जी) असेल तर त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू जास्त असल्याने पदार्थ पटकन जळतो याउलट महानगरच गॅस (पी एन जि) असेल तर त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू कमी असते. LPG boasts a much higher calorific value than PNG and thus burns hotter. While burning a cubic foot of LPG generates around 2,500 BTU of energy, the same amount of natural gas produces only 1000 BTU.

चुलीवरचे जेवण याची फॅशन किंवा फॅड सोडले तर रोजच्या वापरात चूल वापरणे हे अव्यवहार्य चे नव्हे तर त्यावर अन्न शिजवणाऱ्याच्या प्रकृतीस अपायकारक आहे. About 25% of the 4.3 million global premature household air pollution (HAP) deaths occur in India every year, according to World Health Organisation estimates. The main contributor to household pollution is the smoke released by cook stoves

– Nearly 39% of early neonatal stillbirths were attributed to cooking fumes, according to a study by the National Center for Biotechnology Information that examined the relationship between biomass fuel-use and stillbirths in India.
https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-i...

तुषार काळभोर's picture

7 Nov 2023 - 7:41 pm | तुषार काळभोर

यामुळे आता २०१५ नंतर तयार केलेली नॉनस्टिक भांडी यातून PFOA आपल्या पोटात जाण्याची शक्यता नाही. नॉन स्टिक भांड्याचा आतला लेप मधीळ टेफ्लॉन सुटे झाले आणि त्याचे बारीक तुकडे आपल्या पोटात गेले तरी ते आपल्याला अपायकारक नाही. कारण टेफ्लॉन शरीरातील कोणत्याही अवयवांवर किंवा द्रव्याबरोबर प्रक्रिया करत नाही.

हा अल्युमिनियम ओक्साईडचा लेप सहजासहजी निघत नाही किंवा पदार्थात उतरत हि नाही.

मातीतून अनेक पदार्थ लीच होतात यामध्ये उपयुक्त खनिजे कदाचित मिळतीलही परंतु भांडी करायला वापरलेल्या मातीत सर्रास सगळीकडे वापरले गेलेले शिसे, पारा, कॅडमियम, कोबाल्ट, टिटॅनियम युक्त रंग, कीटकनाशके हि सुद्धा या मातीच्या भांड्यात उतरतात आणि आपण त्यात लिंबू चिंच कोकम सारखे आम्लयुक्त पदार्थ वापरल्यास त्यातून हि द्रव्ये आपल्या पोटात जातात.

चुलीवरचे जेवण याची फॅशन किंवा फॅड सोडले तर रोजच्या वापरात चूल वापरणे हे अव्यवहार्य चे नव्हे तर त्यावर अन्न शिजवणाऱ्याच्या प्रकृतीस अपायकारक आहे.

एकतर हे आधुनिक ज्ञान आहे. हे प्राचीन भारतीय संस्कृतीला साजेसे नाही. हे आम्ही फेसबुक किंवा व्हॉट्सॲप वर वाचलेले नाही. त्यामुळे हे सगळं खोटं आहे.
आम्ही फक्त फेसबुकवर वाचलेलं आणि व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड होऊन आलेलं खरं मानतो आणि ते भक्तिभावाने फॉलो करतो. मग आम्ही शाळा कॉलेजात विज्ञान शिकलो तरी कसलीही माहिती आपल्या शिक्षणाशी पडताळून बघत नाही. (कारण त्यासाठी मेंदूला कष्ट द्यावे लागतात!)

जय प्राचीन संस्कृती! जय छद्मविज्ञान!

- तुषार काळभोर (MPSC - Masters in pseudo Science)

तुर्रमखान's picture

10 Nov 2023 - 1:07 am | तुर्रमखान

_/\_

शेफ विष्णू यांनी अनेक भांडी सुचवली आहेत.काल हा व्हिडिओ पाहण्यात आला.
https://youtu.be/w2GQx9mBuqE?si=lFQzjFrk0O0lRE4u

सुबोध खरे's picture

7 Nov 2023 - 1:27 pm | सुबोध खरे

अनेक चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत या व्हिडीओ मध्ये!

अकिलिज's picture

7 Nov 2023 - 5:23 pm | अकिलिज

खरेंचा प्रतिसाद वाचल्यावर वाटले की हे डॉक्टर आहेत की ईंजिनीअर. यावर ते म्हणतील की 'हम सायन्स की तरफ से है'' :)

विषय खरोखरच विचार करायला लावणारा आहे. अमक्या प्रकारच्या भांड्यातून स्वयंपाक केल्यास अमुक प्रकारचा दुरगामी परिणाम होईल असा अभ्यास वगैरे करायला मोठा काळ लागेल. आणि हा अभ्यास कितीही केला तरी त्यावर अचूक निदान होणार नाही. कारण तो ठराविक कक्षेत केलेला असेल.
माझ्या मते, भांडी कुठली ही वापरा पण प्लॅस्टीकची बिल्कुल वापरू नका. मायक्रोवेवला प्लॅस्टीकचे डबे वितळलेले पाहिलेत. अर्थात ते मायक्रोवेव सेफ नव्हतेच. पण का म्हणून जोखीम घ्या. नुसतं धूवून धूवून खरके पडणारं खाण्यात थोडं थोडं जात नसेल कशावरून.

डॉ. सुबोध खरे यांचा अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद (नेहमीप्रमाणेच).

'आरोग्य ज्ञानेश्वरी' अंकाचे संस्थापक, संपादक आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी हे देखील लोखंडी कढईत स्वयंपाक करावा आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात काढून ठेवावा असे सुचवतात.

प्रेशर कुकर मध्ये अन्न शिजवण्याबाबत असणारे गैर समज, "भातासाठी दोन शिट्या, तुरीचं वरण असेल तर तीन शिट्या, काळे वाटणे असल्यास चार शिट्या आणि मटण शिजवायचे असेल तर पाच किंवा सहा शिट्या काढाव्यात".

प्रेशर कुकर मध्ये वाफेच्या प्रेशरच्या सहाय्याने कमी तपमानवर पदार्थ शिजवणे आणि त्या योगे इंधन आणि काही प्रमाणात वेळ वाचवणे हे अभिप्रेत आहे हे अनेक गृहीणींना माहीत नसते.

कुकर मध्ये वाफेचा दाब तयार झाला की म्हणजेच शिट्टीचा सू.. सू.. आवाज येऊ लागला की आच अतिशय मंद करावी मात्र दाब कायम राहील इकडे लक्ष द्यायला हवे. आशा रीतीने भात शिजयला पाच ते साडेपाच मिनिटे पुरतात मात्र पाच मिनिटांनी गॅस विझवल्यावर वाफेचा दाब पूर्ण ओसरेपर्यंत कुकर उघडू नये. या वेळेतही कुकरमधील अन्न शिजत असते. कुकरमध्ये तुरडाळ शिजवण्यापूर्वी ती आधी पंधरा वीस मिनीटे भिजत ठेवल्यास तीही भाताबरोबर तेवढ्याच वेळात व्यवस्थित शिजते.
कुकर मध्ये अन्न बेचव होते हा आणखी एक गैरसमज. कोणताही पदार्थ योग्य तेवढा वेळच शिजवला तर त्याची चव अजिबात बिघडत नाही.

कॉपर बॉटम भांड्यांविषयी : खरं तर स्टेनलेस स्टील हा एक उष्णतेचा शीघ्र वाहक धातू आहे. तांबे, स्टेनलेस स्टील पेक्षाही शीघ्रवाहक आहे. गॅसवर स्वयंपाक करताना कॉपर बॉटम भांड्यांची विशेष गरज नसते. तरीही हौस म्हणून ती वापरायची असल्यास भांड्याखालील आच अधिक मंद ठेवायला हवी याचे भान ठेवायला हवे.

नॉनस्टीक भांडी वापरतानादेखील उष्णता आणि तेल/तूप अतिशय मोजके वापरायला हवे. नॉनस्टीक भांडी स्वच्छ करताना देखील काळजी घ्यावी लागते. त्याला एक जरी चरा/ओरखडा गेला तरी त्याची उपयुक्तता संपल्यासारखी आहे हे लक्षात ठेवावे.

पदार्थ भांड्याला चिकटण्याचे मुख्य कारण अधिक उष्णता हे असते. भांड्याखालील आच मर्यादित ठेवली की लोखंडी अथवा आल्युमिनीयमच्या तव्यावर देखील ओम्लेट करणे अथवा मासे तळणे शक्य असते.

स्टेनलेस स्टील हा एक उष्णतेचा शीघ्र वाहक धातूआहे.

हे तितकेसे सत्य नाही

On average, the thermal conductivity of copper is 20 times that of stainless steel. In practical terms, this means that copper can transfer heat 20 times faster. So, if you need quick heating, copper will work to your advantage

मूळ लेख, त्यावरील चर्चा, अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद आवडले.

अनेक समज-गैरसमज दूर झाले.

तरीही एक शंका: ऍनोडईज्ड अल्युमिनियम नसलेली अल्यूमिनिअमची भांडी वापरायची की नाही?

आम्ही स्टील, अल्यूमिनिअम, नॉनस्टिक, तांबे, काच सर्वच वापरतो.

---
अवांतरः आमच्याइथली कुकर वापरण्याची पद्धत:

  • स्वयंपाकाच्या सुरुवातीलाच तूरडाळ आणि तांदूळ (वेगवेगळे!) धुऊन, एकास दोन या प्रमाणात पाणी घालून, कुकरात एक तास तयार ठेऊन देणे.
  • मग मोठ्या आचेवर गॅस पेटवणे.
  • सुमारे सात आठ-मिनिटांनी शिट्टी फूसफूस करू लागली कि गॅस अगदी मंद करणे.
  • दहा मिनिटांनी गॅस बंद करणे.
  • अजून दहा मिनिटे कुकर आपोआप थंड होऊ देणे.
  • वाफ पूर्ण शांत झाल्यावर कुकर काढणे.
  • या पूर्ण प्रक्रियेमध्ये एकही शिट्टी होऊ न देणे.

(अर्थातच, या दरम्यान स्वयंपाकाची इतर कामे करणे!)

---

हे सर्व रोजच्या रोज करणे अगदी सोपे आहे. मी अलार्म लावून करतो, आमची बरी-अर्धी अलार्मशिवायच करते!

सुबोध खरे's picture

8 Nov 2023 - 11:48 am | सुबोध खरे

तसेच प्रेशर कुकर वापरू नये त्यात पोषकद्रव्ये कमालीचे नष्ट होतात हेही सिद्ध झाले आहे.

प्रेशर कुकर मुळे पोषक द्रव्ये नष्ट होतात हा एक फार काळापासून चालू असलेला गैरसमज आहे.

नुसत्या पाण्यात उकळलयास किंवा वाफवल्यास २५ ते ६० % पोषक द्रव्ये नष्ट होतात तर कुकर वापरल्यास केवळ ८ टक्के

https://www.hippressurecooking.com/3-pressure-cooker-nutrition-myths-tha...

या शिवाय पदार्थ करपल्यास किंवा जाळल्यास त्यात कर्करोगकारक पदार्थ तयार होतात असा कोणताही प्रकार प्रेशर कुकर मध्ये होत नाही.

डाळी सारख्या शिजण्यास कठीण पदार्थातीळ प्रथिने प्रेशरकूकर मध्ये चांगली शिजल्यामुळे पचण्यास हलकी होतात तसेच इतर अनेक पदार्थ पचण्यास हलके झाल्यामुळे आपल्या शरीराला त्याची उपलब्धता वाढते.

याशिवाय प्रेशर कुकर मध्ये तापमान १२१ अंशापर्यंत जात असल्यामुळे भांडी किंवा कपडे निर्जंतुक करण्यासाठी त्याचा वापर करता येतो.

माझ्या दोन्ही मुलांच्या दुधाच्या बाटल्या मी सर्रास प्रेशरकूकर मध्ये टाकून एक शिट्टी देऊन स्वच्छ आणि निर्जंतुक करून घेत असे.

जेंव्हा जेंव्हा शक्य आहे तेंव्हा प्रेशर कुकर वापर असाच तज्ज्ञांचा सल्ला आहे.

राहिला मुद्दा चवीचा.

गुहेत राहत असताना माणूस शिकार करून जगत होता आणि शिकार न मिळाल्यास मृत प्राणी सुद्धा खात होता.

त्यानंतर अग्नीचा शोध लागल्यावर मानवाला असे लक्षात आले कि भाजलेले मांस हे कच्च्या मांसापेक्षा जास्त सहज पचते आणि त्यातील अपायकारक जंतू बऱ्यापैकी मरत असल्याने ते खाण्यास जास्त योग्य असते तसेच ते जास्त काळ टिकते. त्यामुळे माणसाने भाजलेल्या पदार्थाची चव विकसित करून घेतली आणि आता भाजलेला पदार्थ हा चांगला हे माणसाच्या आदिम स्मरणशक्ती मध्ये घट्ट बसलेले आहे.

यामुळेच आज सुद्धा बार्बेक्यू केलेला पदार्थ मग ते मांस असो कि बटाटा, रताळं, मक्याचे कणीस आपल्याला आपल्या आदिम स्मरणशक्ती आणि विकसित झालेल्या चवीमुले जास्त रुचकर लागते.

मागच्या पिढीतील लोकांना चीज (आणि मशरूम) अजिबात आवडत नाही( आज साठीच्या वर वय असलेले) कारण चीजची चव त्यांनी विकसित केलेली नव्हती.

याउलट आताच्या पिढीचे( २० पेक्षा कमी वय) चीज वाचुन पान हलत नाही कारण प्रत्येक गोष्टी चीज घालून खायची सवय (चीजची चव विकसित झालेली) आहे

प्रेशर कुकर मध्ये पदार्थ शिजतात पण भाजला जात नाही त्यामुळे त्यात शिजवलेला पदार्थ चुलीवरच्या पदार्थासारखा चवीला लागत नाही हि तक्रार सर्वांची आहे.
बाहेर शिजवलेला भात तळाशी लागतो( जास्त भाजला जातो) आणि त्याची भाजकी चव सर्व भाताला लागते यामुळे हा भात सवयीने रुचकर लागतो. असे प्रेशर कुकर मध्ये होत नाही.

पण असा भात तुम्ही नुसते तूप मीठ घालून खाणार असाल तर त्यात चवीचा फरक पडेल माशांच्या आमटी किंवा झणझणीत रश्श्याबरोबर खाणार असाल तर कितीसा फरक पडेल ?

सुबोध खरे's picture

8 Nov 2023 - 11:56 am | सुबोध खरे

ऍनोडईज्ड अल्युमिनियम नसलेली अल्यूमिनिअमची भांडी वापरायची की नाही?

सामान्य अल्यूमिनिअमची भांडी पदार्थ उदा भाजी किंवा आमटी शिजवण्यासाठी शक्यतो वापरु नये. कारण भाजीतील चिंच लिंबू कोकम टोमॅटो सारख्या पदार्थात असलेले आम्ल अल्युमिनियमशी प्रक्रिया करते आणि हे अल्युमिनियम पदार्थात उतरते.

अल्युमिनियममुळे अल्झायमरचा आजार होतो कि नाही याबद्दल अजून तज्ज्ञ लोकांत एकवाक्यता नाही त्यामुळे ALARA ( AS LOW AS REASONABLY ACHIEVABLE) तत्व वापरावे. अशासाठी शक्यतो हि भांडी टाळा.

पण तेलात अल्युमिनियम विरघळत नाही किंवा त्याबरोबर प्रक्रिया करत नाही त्यामुळे अल्युमिनियमची कढई पदार्थ तळण्यासाठी वापरली तर त्यातून कोणताही अपाय होणार नाही.

>>>स्वयंपाकघरातील भांडी कशी असावीत?

आपल्या कष्टाच्या पैशाने विकत आणलेली

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2023 - 8:58 pm | कर्नलतपस्वी

तांबे,पितळ, जर्मन,कल्हई ते नाॅनस्टीक ,उकडीचे मोदक पात्र ते प्रेशर कुकर ,टोप,तवा,कढई असा स्वयंपाक घराचा प्रवास बघितलेला पण वस्तुतः स्वयंपाकाचा स सुद्धा माहित नसलेला मी..
या लेखामुळे बरीच नवीन माहीती मिळाली. या बद्दल भक्ती तै आणी सुबोध खरे यांचे मनापासून आभार. बाकी प्रतीसादकांनी यात मोलाची भर टाकून लेख अधिक रोचक वाचनीय बनवला आहे.
वरकरणी साधारण विषय इतका सखोल असेल असे वाटले नव्हते.

धर्मराजमुटके's picture

10 Nov 2023 - 9:14 pm | धर्मराजमुटके

डॉ. सुबोध खरे यांनी ते भांड्यांचे डॉक्टर असावेत इतपर्यंत संशय येण्याजोगे विस्तृत प्रतिसाद दिलेत :)

Bhakti's picture

10 Nov 2023 - 10:07 pm | Bhakti

+१११

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2023 - 9:44 pm | कर्नलतपस्वी

वापरावा किंवा नाही. जर वापरावा तर त्या साठी केली भांडी घ्यावीत?

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2023 - 9:45 pm | कर्नलतपस्वी

वापरावा किंवा नाही. जर वापरावा तर त्या साठी केली भांडी घ्यावीत?

सुबोध खरे's picture

11 Nov 2023 - 12:19 pm | सुबोध खरे

मायक्रोवेव्ह ओव्हन बद्दल जितके गैरसमज आहेत किंवा पसरवले गेले आहेत तितके दुसऱ्या उपकरणाबद्दल क्वचितच असतील.

मायक्रोवेव्ह मधील अन्न खाल्ल्या मुळे कर्करोग होतो पासून त्यातील पोषक द्रव्ये नष्ट होतात, पर्यंत सर्व तर्हेचे गैरसमज आहेत / पसरवले जातात. मायक्रोवेव्ह मधील पाणी टाकल्यामुळे कुंडीतील झाडे मरतात. इ इ.

त्यातून आपल्या "संस्कृती"चे गोडवे गाणारे जुन्या काळी कुठे मायक्रोवेव्ह होता किंवा हे आधुनिक फॅड आहे, चुलीवरची जेवणच कसे उत्तम या तर्हेचे विवाद मोठ्या हिरीरीने कोणताही पुरावा न देता मांडतात. यातील बहुतांश पुराणमतवादी स्त्रियांना सोय होईल असा कोणत्याही उपकरणाचा विरोध करताना आढळतात. मिक्सर पेक्षा पाटा वरवंटाच कसा चांगला किंवा गॅस ऐवजी चुलीवरच पदार्थातील पोषक द्रव्ये कशी टिकून राहतात इ इ.

मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये विजेचे रूपांतर मॅग्नाट्रॉन नावाच्या उपकरणाने मायक्रोवेव्ह या विद्युतचुंबकीय लहरीत होते. २४५० मेगा हर्ट्झ हि पाण्याच्या रेणूंची नैसर्गिक/ मूलभूत वारंवारता ( FUNDAMENTAL FREQUENCY) आहे.

मॅग्नाट्रॉन या २४५० मेगा हर्ट्झ वारंवारतेच्या मायक्रोवेव्ह निर्माण करतो यामुळे मॅग्नाट्रॉन आणि पाण्याचे रेणू यात अनुनाद( RESONANCE) निर्माण होतो. यामुळे मॅग्नाट्रॉनमधील जास्तीत जास्त ऊर्जा हि पाण्याच्या रेणूत प्रसारित होते. अन्नातील पाण्याचे रेणू या ऊर्जेमुळे कम्प पावतात आणि त्याचे तापमान वाढते. आपण खात असेलल्या अन्नपदार्थात सर्वात मोठा घटक पाणी (पाण्याच्या रेणूची उपलब्धता) असल्याने हे पदार्थ आतून गरम होतात.

मायक्रोवेव्ह मधील भांड्यात पाण्याचे रेणू नगण्य असल्याने हि भांडी अजिबात गरम होत नाहीत. यामुळे केवळ अन्न गरम करण्यात ऊर्जा वापरली जाते यामुळे ऊर्जेची सर्वात जास्त बचत मायक्रोवेव्ह उपकरणात होते. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ आतून गरम होतो आणि शिजतो पण भाजला जात नाही त्यामुळे भाजक्या पदार्थांची चव यात येत नाही. परंतु आपल्याला भाजलेली चव नको असेल तर मायक्रोवेव्ह हे अन्न शिजवण्यासाठी सर्वात उत्तम उपकरण आहे.

मायक्रोवेव्ह साठी सुरक्षित असे प्रमाणपत्र असलेले कोणतेही भांडे आपल्याला त्यात वापरता येते. काही तर्हेची मायक्रोवेव्ह साठी सुरक्षित लिहिलेली प्लास्टिक मात्र वितळलेली मी पहिली आहेत.यात टप्परवेअरचे भांडे सुद्धा वितळते. यास्तव मी घरी केवळ चिनीमाती किंवा काचेची भांडी किंवा कोरेल CORELLE ( हे काचेचे तीन थर एकत्र करून बनवलेले असते) ची भांडी मायक्रोवेव्हमध्ये वापरतो.

प्राथमिक सुरक्षितता म्हणून मी प्लास्टिकची भांडी कमीत कमी वापरतो. कोरडे पदार्थ ठेवायचे असतील किंवा हवाबंद म्हणून ठेवायचे असतील तर ठीक आहे. क्रमश:

कर्नलतपस्वी's picture

11 Nov 2023 - 1:09 pm | कर्नलतपस्वी

डाॅ सुबोध खरे आपले मनापासून आभार.

मी ओ आय सी, इ सी एच एस असताना एका मेडिकल अधिकारी सांगत होते की प्लॅस्टिक भांडे मायक्रोवेव्ह मधे वापरल्यास कर्करोग होतो.

आपल्या सविस्तर आणी तर्कसंगत प्रतिसादाने शंकानिरसन झाले.

सिलिकॉन उचटणे,रवी,स्पेच्युला,mat इत्यादी आता त्याच्या नोन स्टिक आणि पारंपरिक स्टील उचटण्यांचा चर्र वगैरे आवाज ,वा भांड्यांना चरे पडत नसल्याने लोकप्रिय होत आहे.४५० डीग्री से.पर्यंत ते वापरता येतात, त्यापुढे नाही.