जगात कुठंही, कधीही!

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
8 Oct 2023 - 3:10 pm
गाभा: 

C-17

भारतीय हवाईदलाचा 8 ऑक्टोबरला स्थापना दिवस आहे. स्थापना झाल्यापासून म्हणजे 1932 पासून आजपर्यंतच्या कालखंडात भारतीय हवाईदलानं अनेक किर्तीमान नोंदवले आहेत, अनेक युद्धांमध्ये भारतीय हवाईदलानं शौर्य गाजवलं आहे आणि त्यामध्ये निर्णायक भूमिकाही बजावली आहे. जगभरात कुठंही आलेल्या नैसर्गिक आणि मानवी संकटांवेळी कमीतकमी वेळेत मदत आणि बचावकार्य तसंच मानवीय मदतीतही हवाईदल सतत अग्रेसर राहिलेलं आहे. गेल्या 91 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाची वाटचाल सहाय्यक दलाकडून व्यूहात्मक हवाईदलापर्यंत (Strategic Air Force) झालेली आहे. भारतीय हवाईदलाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने यंदा जारी करण्यात आलेल्या हवाईदलाच्या विशेष माहितीपटाला शीर्षकही Air Power Beyond Boundaries असं देण्यात आलं आहे.

भारतीय हवाईदलाची भूमिका आता आपल्या हवाईसीमांच्या संरक्षणापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. विसाव्या शतकाच्या अखेरीस भारतानं बदलत्या जागतिक भू-आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खुल्या आर्थिक धोरणाचा (Liberalisation) स्वीकार केला. त्यानंतर भारताची राष्ट्रहितं (National Interests) जगाच्या विविध भागांमध्ये गुंतू लागली. त्या राष्ट्रहितांच्या संरक्षणासाठी भारतीय हवाईदलाच्याही कार्यकक्षा चहुबाजूंनी रुंदावल्या जाऊ लागल्या. परिणामी भारतीय हवाईदलाच्या व्यूहात्मक हवाईशक्तीमध्येही वाढ होत गेली. शीतयुद्धाच्या अखेरच्या काळातच भारतीय हवाईदल भारताच्या सीमांच्या पलीकडे जाऊ लागलं होतं. त्याचबरोबर बदलत्या सुरक्षाविषयक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमालयातील दुर्गम भागातही सतत रसद आणि अवजड सामानाचा पुरवठा करण्याची आवश्यकता भासू लागली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाईदलात 80 च्या दशकात आयएल-76 एमडी ही मोठी मालवाहू विमानं सामील केली गेली.

पुढच्या काळात हवाईदलाची कार्यकक्षा इराणचं आखात-मध्य आशिया-मलाक्काची सामुद्रधुनी आणि हिंदी महासागराच्याही पलीकडे विस्तारू लागली. परिणामी हवाईदलाला इंधनवाहू विमानांची (Flight Refueling Aircraft) आणि आणखी मोठ्या आकाराच्या मालवाहू विमानांची - व्यूहात्मक मालवाहतूक करणाऱ्या विमानांची गरज भासू लागल्यावर 2013 पासून सी-17 ग्लोबमास्टर-III ही विमानं हवाईदलात सामील होऊ लागली. आयएल-76 आणि सी-17 ही दोन्ही विमानं सध्या भारतीय हवाईदलाची व्यूहात्मक वाहतुकीची गरज पूर्ण करत असली तरीही भारतीय हवाईदलाला आजही अशा आणखी विमानांची गरज भासत आहे. अलीकडेच आलेल्या एका बातमीनुसार भारतीय हवाईदलानं आपल्या ताफ्यात व्यूहात्मक वाहतूक करणाऱ्या आणखी किमान 10 मोठ्या विमानांची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. सी-17 ची वहनक्षमता जवळपास 75 टन आहे. त्याचा पल्लाही मोठा म्हणजे 4480 किमी इतका आहे. मूळच्या करारात आणखी 6 सी-17 विमानं विकत घेण्याची तरतूद होती. पण भारताकडून अतिरिक्त विमानांची मागणी नोंदवण्यात दिरंगाई झाली. त्यामुळं बोईंग कंपनीनं पुरेशा मागणी अभावी या विमानांचं उत्पादन बंद केलेलं आहे. त्यामुळं कंपनीच्या कॅलिफोर्नियामधल्या लाँग बीचमधील कारखान्यात तयार करण्यात आलेलं शेवटचं एकच विमान भारताला विकत घेता आलं आहे. परिणामी भारतीय हवाईदलात एवढ्या मोठ्या क्षमतेची असलेली 11 विमानं कार्यरत आहेत. पुढील एक दशकात भारताला अशा एकूण 25 विमानांची गरज आहे.

दुसरीकडे भारतीय हवाईदलात असलेला आयएल-76 विमानांचा ताफा आता जुना झालेला आहे. त्यातच रशियावरील निर्बंधांमुळं या विमानांच्या सुट्या भागांचा प्रश्न भेडसावत आहे आणि परिणामी त्यांची उपलब्धता कमी झाली आहे. आयएल-76 विमानाची आयएल-76 एमडी 90 ए ही नवी आवृत्ती रशियानं तयार केलेली आहे. त्याची वहनक्षमता भारताकडे सध्या असलेल्या आयएल-76 पेक्षा जास्त आहे आणि त्यावर नवी इंजिनं बसवलेली आहेत. आयएल-76 एमडी 90ए हे 60 टन वजनाचं सामान एकावेळी 4000 किमीपर्यंत वाहून नेऊ शकतं. या विमानामध्ये अन्य काही सुधारणाही करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय हवाईदलाला टँकर विमानांचीही अतिशय गरज भासत आहेच. सी-17 चं उत्पादन थांबलेलं असल्यामुळं भारतीय हवाईदलासमोर सध्या तरी अवजड वाहतुकीसाठी आयएल-76 एमडी 90ए चा एकच पर्याय उपलब्ध आहे. भारतीय हवाईदलाला या विमानांच्या संचालनाचा अनुभव असल्यामुळं त्या विमानांच्या प्रशिक्षण, देखभाल आणि प्रत्यक्ष तैनातीलाही फारशी अडचण येणार नाही असं वाटतं.

https://avateebhavatee.blogspot.com/2023/10/blog-post.html