श्री गणेश लेखमाला २०२३ - ॥ श्रीगणेश स्तवन ॥

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in लेखमाला
19 Sep 2023 - 12:22 am

.

॥ श्रीगणेश स्तवन ॥

जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु॥

तिलकविलेपित चंदनगंधित चंद्रविराजित भाळ तुझे
मुदित चतुर्भुज रूप मनोहर तेज मुखावर दिव्य सजे
सुमुख तुझे स्मरता अवघे खल, पापविचार, दशा हरती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥१॥

मुनिजनपूजित वेदपुरस्कृत लौकिक सर्व दिशांत वसे
चरण शुभंकर पंकज कोमल लीन जिथे मम शीश असे
गजवदना तव आशिष मंगल दुःख निवारण ते करती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥२॥

भवभयहारक दुष्टनिवारक अंकुशधारक रुद्रसुता
शुभगुणकानन तू करुणाघन तूच महोदर विश्वपिता
कलियुग हे घनघोर धरेवर घे अवतार गुणाधिपती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥३॥

स्वरसुमने नित अर्पियली तुज नादप्रतिष्ठित छंदपती
अवतरती स्तवनात निरागस भक्तिसुधारसयुक्त श्रुती
निसदिन जे भजती प्रथमेश्वर, ते भवसागर हा तरती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥४॥

( वृत्त - हंसगती )

©® दीपाली ठाकूर

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2023 - 7:06 am | ज्ञानोबाचे पैजार

या नादमय गणेशस्तवनाने गलेमाची दणदणीत सुरूवात झाली,
मस्त.... आवडले...
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2023 - 9:21 am | कर्नलतपस्वी

सुरवात सुंदर केलीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2023 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम रचना आणि गलेमाची उत्तम सुरुवात.

-दिलीप बिरुटे

अहिरावण's picture

19 Sep 2023 - 7:11 pm | अहिरावण

कसं लोकांना जमतं एवढं सुंदर लिहायला !!

प्रचेतस's picture

20 Sep 2023 - 8:14 am | प्रचेतस

सुरेख रचना.

चांदणे संदीप's picture

20 Sep 2023 - 3:24 pm | चांदणे संदीप

सुंदर रचना. नादमय गणेशस्तवन अ ति शय आवडले. एक मोठ्ठी प्रिंट काढून लावून ठेवतो ऑफिसात समोर.

सं - दी - प

स्नेहा.K.'s picture

22 Sep 2023 - 12:10 pm | स्नेहा.K.

छान लिहिले आहे!

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2023 - 5:39 pm | चौथा कोनाडा

सुंदर नादमय रचना.
गणेशस्तवन आवडले !
चाल लावली असेल, पार्श्वसंगीत दिले असेल तर नक्की इथे टाका !