अनाहुत सल्ले

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in काथ्याकूट
9 Apr 2023 - 4:46 pm
गाभा: 

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीची काही स्वप्नं असतात. काही इच्छा, आकांक्षा असतात. लग्न, करिअर यासंदर्भात प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी काहीतरी विचार करून ठेवलेला असतो. तो/ती व्यक्ती स्वतःच्या भल्यासाठी, उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी काही निर्णय घेते. काहीवेळेस आपण चुकीचे करिअर निवडले हे समजायला खूप वेळ जातो मग अश्यावेळी ती वाट (करिअर) बदलून दुसऱ्या कंफर्टेबल वाटेने चालायला सुरुवात होते. यासाठी काही जवळच्या व्यक्तींसोबत चर्चा, सल्लामसलत सुद्धा होते, गरजेनुसार. हे सर्व वैयक्तिक पातळीवर चालु असतं. यात काही निर्णय चुकीचे सुद्धा असू शकतात पण आपण प्रयत्नपूर्वक ती गोष्ट पूर्णत्वास नेऊ, यश मिळवू असा त्या व्यक्तीला विश्वास असतो..

या सगळ्यात काही जवळचे मित्र, कुटुंबातील व्यक्ती सोडल्या तर इतरांचा तसेच त्या व्यक्तीबद्दल, तिच्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त माहिती नसणाऱ्या नातेवाईकांचा काहीच रोल (भूमिका) नसतो. पण तरीही काही वेळेस नातेवाईक, ओळखीचे लोक त्या व्यक्तीने घेतलेल्या त्या विशिष्ट निर्णयावर आपलं स्वतःचं एक मत देत असतात (त्यांच्याकडे त्याची मागणी केली नसली तरीही ते देतात). काही वेळा अनाहुत सल्ले सुद्धा मिळतात. बहुतेक वेळेस त्यांची ही मतं पूर्वग्रहदूषित असतात. सुरुवातीला ती व्यक्ती अश्या सल्ल्यांना ऐकूण सोडून देते (कारण त्या व्यक्तीचा निर्णय ठाम असतो. विचार करूनच तो घेतला गेलेला असतो). पण पुढे काही काळानंतर ती व्यक्ती स्वतः घेतलेल्या निर्णयाला योग्य तो न्याय देऊ शकली नाही, तिने जे करियर निवडले आहे त्यामधे सुरुवातीच्या काळात अपयश आले तर त्या व्यक्तीला लोकांकडून पुन्हा तेच सल्ले मिळायला सुरुवात होते. जसे की, "बघ मी आधीच सांगितलं होत तुला, तू यात पडू नको, तुझ्याच्याने ते होणार नाही.".. "माझ्या एका मित्राच्या/नातेवाईकांच्या मुलाने/मुलीने असाच तुझ्यासारखा खुळेपणा केला आणि आज तो/ती त्याची शिक्षा भोगत आहे.. अजूनही वेळ गेलेली नाही, तू वेळीच निर्णय बदल." आणि बरच काही ऐकावं लागतं. बरं त्या व्यक्तीने दरम्यानच्या काळात आपली भूमिका, विचार अश्या लोकांना स्पष्ट सांगितलेले असतात.. तरीही हे चालूच असतं. ती व्यक्ती जुमानत नाही, दुर्लक्ष करते तेव्हा ते तिच्या कुटुंबीयांना त्याच गोष्टी पटवून द्यायचा प्रयत्न करतात. मग कुटुंबीय त्यांच्या बोलण्यात येऊन त्या व्यक्तीवर तिचा निर्णय बदलण्यासाठी दबाव टाकत राहतात.

या सगळ्याचा परिणाम म्हणजे ती जी व्यक्ती असते तिला मानसिक त्रास होतो. ती व्यक्ती आधीच काही अपयशांमुळे निराश झालेली असते. त्यातच काही उपद्रवी लोकांचे टोमणे, तिला जीवनात मिळालेल्या अपयशांमुळे अप्रत्यक्षपणे मिळणारी हीन वागणूक.. या सगळ्यामुळे ती व्यक्ती आपल्या कामावर, अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. मनात सारखे नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. ती व्यक्ती मनातून खचून जाते. तिला लोकांना सामोरं जाणं नकोसं वाटायला लागतं.. कधीकधी यातून त्या व्यक्तीला डिप्रेशन सारख्या मानसिक आजाराला सुद्धा सामोरं जावं लागतं...

हे सगळं लिहिण्यामागे, सांगण्यामागे काही हेतू आहे. काही प्रश्न आहेत.. त्यांची उत्तरं हवी आहेत..

मला हे मान्य आहे की मी वरती उल्लेख केलेल्या प्रकारातील ८०-९०% लोकांच्या हेतुमध्ये काहीच गडबड नसते. ते त्यांच्या पातळीवर बरोबर असतात. आणि आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच ते हे सांगत असतात, सल्ला देत असतात. हे सगळं पटतंय मला.

पण तुम्ही जो सल्ला देत आहात, मत मांडत आहात ते पूर्वग्रहदूषित नाही का?? तुमच्या ओळखीतील कुणाला त्या क्षेत्रात अपयश आले म्हणून या व्यक्तीला पण येईल हे तुम्ही ठामपणे कसं म्हणू शकता? तो निर्णय घेत असताना त्या व्यक्तीने काहीतरी विचार विनिमय करूनच तो निर्णय घेतला असेल ही गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाही? तुमच्या अनाहुत सल्ल्यामुळे त्या व्यक्तीचं खाच्चिकरण होतय हे कळत नाही का तुम्हाला?

बरं कुणी immature, आडाणी व्यक्तींनी असे सल्ले दिले तर समजू शकतो, त्यांचं बोलणं कुणीच जास्त मनावर घेणार नाही. पण शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर असलेले, अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेले लोक असे सल्ले देतात तेव्हा आश्चर्य वाटते. या शिकल्या सवरलेल्या लोकांना त्या व्यक्तीची बाजू कशी काय समजत नसेल? का मुद्दाम त्या व्यक्तीचे अथवा कुटुंबाचे वाईट व्हावे या हेतूने यातील काही मंडळी हे असे उद्योग करत असतात?

हो.. हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत. हे सर्व होऊन काही वर्ष सरली आहेत. अश्या लोकांचा व त्यांच्या त्या पूर्वग्रहदूषित सल्ल्यांचा, मतांचा विचार करणं मी मागेच सोडून दिलेलं आहे. आणि सद्यस्थितीला सगळं काही ठीक आहे. पण या अश्या व्यक्तींबद्दल मनात नकारात्मकता निर्माण झालेली आहे.. कधीकधी हे वरील प्रश्न मनात येतात.. पण समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत..

प्रतिक्रिया

Amruta patki's picture

10 Apr 2023 - 10:30 am | Amruta patki

खरय....

विवेकपटाईत's picture

10 Apr 2023 - 7:56 pm | विवेकपटाईत

जे सांशक असतात ज्यांच्या स्वतःवर विश्वास नसतो ते सल्ले मागतात. दुसऱ्यांच्या सल्यानुसर वागतात. निर्णय चुकला की दोष दुसऱ्यांना.
ज्यांच्या पाशी विश्वास असतो ते दहा लोकांकडून सल्ला घेऊन ,योग्य निर्णय घेतात. निर्णय चुकला तरी कुणाला दोष देत नाही.
एक अनाहुत सल्ला
चाकरी सोडून बाकी क्षेत्रांत अनुभव घेल्या शिवाय उतरण्यात जोखीम असते. अनेकदा पराजित होऊन ही लोक सफल होतात. खिश्यात पैसे असणे ही गरजेचे नाही. खिश्यात दमडी नसतानाही लोक उद्योग उभे करतात.

सौन्दर्य's picture

10 Apr 2023 - 11:28 pm | सौन्दर्य

सर्व प्रथम जर पूर्ण विचार करून आपण एखाद्या कामात/क्षेत्रात उडी घेतली असेल तर अनाहूत सल्ल्यांकडे सरळ दुर्लक्ष करावे. "Success has many fathers but failure is orphan" असे जे म्हंटले जाते ते अगदी बरोबर आहे. आपल्याला हाती घेतलेल्या कामात जर अपयश आले तर अश्या सल्ल्यांचे पेवच फुटते व "तरी मी सांगत होतो/होते, मला असं होणार हे माहीतच होते" सारखी वाक्ये ऐकावी लागतात.

मी माझा अनुभव सांगतो, मी एक छोटे रेस्टॉरंट सुरु केले होते. ते सुरु करताना भरपूर अभ्यास केला होता, सर्व गणिते मांडली होती तरी काहीतरी चुकले व पूर्ण अपयश आले.

रेस्टॉरंट सुरु करताना मित्र, नातेवाईक, घरची मंडळी, परिचित वगैरे सगळ्यांनीच प्रोत्साहन दिले, उत्साह वाढवला. फक्त माझ्या रेस्टॉरंट प्रॉपर्टीच्या इन्शुरन्स एजंटनेच सावधगिरीचा सल्ला दिला. त्यावेळी त्याचा राग आला होता पण आता मागे वळून बघता तोच एक बरोबर सल्ला होता असे वाटते.

आणि शेवटी असं असतं ना की आपण करू इच्छिलेल्या कार्याच्या विरुद्ध जर सल्ले मिळाले तर ते आपल्याला निगेटिव्हच किंवा 'पूर्वग्रह दूषित' वाटतात. माझ्या मते आपल्या आसपासची, ओळखीची माणसे, नातेवाईक, मित्रपरिवार आपल्या भल्यासाठीच सल्ले देत असतात त्यांना निगेटिव्ह मानू नये.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Apr 2023 - 11:29 am | राजेंद्र मेहेंदळे

एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली आणि त्याची आकडेमोड करुन "कॅलक्युलेटेड रिस्क" घ्यायची तयारी झाली की बाकी सगळे सल्ले फाट्यावर मारावेत. उदा. वरचेच उदाहरण घेतो.

माझी आवड म्हणुन मला एक हॉटेल काढायचे आहे. शाळा,कॉलेज्,क्लासेस जवळ असतील अशी जागा आहे पण थोडी महाग आहे. महीन्याचे भाडे, वीज,पाणी,नोकर चाकर, ईतर हप्ते ही खर्चाची बाजु झाली. येणारे ग्राहक्/पैसे ही जमेची बाजु झाली. असे धरुन चालु की पहिले ६ महीने जेमतेम नफा किवा किंचित तोटाच होईल. पण नंतर नफा वाढेल. आता माझ्याकडे २ लाख रुपये आहेत, आणि मला हा प्रयोग करायला ते वापरले तर चालतील. तेव्हा बिन्धास्त पुढे जा. फारतर २ लाख बुडतील, पण हॉटेल चालले तर मिळणारा कॉन्फिडन्स आणि नफा खूप असेल. अजुन एक--कधी थांबायचे ते नक्की ठरवा. उदा. ईथे माझे २ लाख संपले की मी थांबेन.

नियमाला अपवाद- बायकोचा/नवर्‍याचा सल्ला मानावा. कारण तुमच्या उद्योगाचा थेट त्रास तिला/त्याला होत असतो.

मोदक's picture

11 Apr 2023 - 3:51 pm | मोदक

शब्दाशब्दाशी सहमत.

फाट्यावर मारणे
हा खरंच सोपा आणि सुटसुटीत उपाय आहे. लोकांना / नातेवाईकांना / जगाला काय वाटेल याचा आपण विनाकारण विचार करत बसतो.

तुमचे विश्वासार्ह कुटुंबीय, जवळचे मित्र आणि शुभचिंतक असतील ते नातेवाईक - इतक्या लोकांचे काय ते ऐका. तुम्ही एखाद्या व्यवसायात उडी मारणार असलात तर त्यातले अनुभवी लोकं काय म्हणत आहेत ते ऐका. आऊचा काऊ तो मावसभावाचा चुलतभाऊ असले कोणीही लोकं आपला निर्णय बदलण्या इतके महत्वाचे नसतात.

फार प्रॅक्टिकल सल्ला वाटेल पण जनरली आपण लोकांना विनाकारण फार मान देतो जो अनेकदा अनावश्यक असतो.

Trump's picture

11 Apr 2023 - 12:52 pm | Trump

बरेचसे जवळचे लोक नकारात्मक सल्ले देत नाहीत, त्यांना वाईटपणा नको असतो, जर कोणी त्यातुनही यशस्वी झालाच तर शेवटी वाईटपणा येतो.
नकारात्मक सल्ले देणारे लोक नेहमीच वाईट असतात असे नाही.

कर्नलतपस्वी's picture

11 Apr 2023 - 4:14 pm | कर्नलतपस्वी

दुसर्‍याला सल्ला देणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे.

सल्ला ऐकणे किवा न ऐकणे हा जुगार आहे.

पंचतंत्र मधील बाप मुलगा आणी गाढव ही गोष्ट वाचल्यावर समजते.

सुजित जाधव's picture

12 Apr 2023 - 10:26 pm | सुजित जाधव

सौंन्दर्य, राजेन्द्र मेहंदळे तुमच्या मताशी पूर्णतः सहमत..
त्या लोकांचे सल्ले दुर्लक्षितच केले होते. पण त्यातील काही जे माझ्या वडिलांच्या दररोजच्या बैठकितले लोक होते त्यांनी माझ्या क्षेत्राबद्दल वडिलांना नकारात्मक केलं व वडिलांनी मी जे करतोय ते करण्यापासून मला परावृत्त केलं, दबाव टाकला.. त्यात वडिलांचा स्वभाव आधीपासूनच हेकेखोर, म्हणजे मी सांगेल तोच कायदा त्यामुळे मी समजावून सांगून काहीच उपयोग झाला नाही... मी जे करतोय त्यामधे घरातील व्यक्तींचा पाठिंबा नसणे, मला आलेलं अपयशय यामुळे मी खचून गेलो..

सौन्दर्य's picture

12 Apr 2023 - 11:27 pm | सौन्दर्य

तुम्ही अगदी सिन्सिअरली तुमचे प्रयत्न चालू ठेवा, यश नक्कीच मिळेल.

निगेटिव्ह बोलणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहून बघा, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. उलट तुम्ही ही challenge स्वीकारा व त्यांना तुमच्या कर्तृत्वाने खोटे पाडा.

माझे तुम्हाला शुभ चिंतन आहे.

सुजित जाधव's picture

13 Apr 2023 - 9:55 am | सुजित जाधव

धन्यवाद..

कर्नलतपस्वी's picture

13 Apr 2023 - 7:23 am | कर्नलतपस्वी

अश्या व्यक्तींबद्दल मनात नकारात्मकता निर्माण झालेली आहे.. कधीकधी हे वरील प्रश्न मनात येतात.. पण समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत..

कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना

सुजीत भौ आपण लिहीलेल्या परिस्थितीतून बहुतेक सर्वच जात असावेत.

यश मिळाल्यावर किंवा कठीण समय संपल्यावर सिंहावलोकन करणे वेगळी गोष्ट पण अपयशाला ,दुःखाला गोंजारत बसल्यामुळे अशी नकारात्मक मनात येते.

सल्ला देणारे कोण या पेक्षा काय सल्ला देतात याचा विचार करणे जास्त योग्य.

शेवटी ज्याचे ओझे त्यालाच घाम या उक्तीनुसार ज्याने त्याने आपले निर्णय घ्यावेत व होणारे परीणाम भोगावे. अगदी आई बाप सुद्धा मुलांना या बाबत जास्त मदत करू शकत नाहीत. कितीतरी उदाहरणे देता येतील.

तेव्हां बाकी सर्व फाट्यावर मारा. चांगले दिवस आलेत त्याचा आनंद घ्या.

राजेंद्र भौ म्हणतात त्याला संपूर्ण सहमत. बायकोचा विचार जरूर लक्षात घ्यावा.

लोग कुछ भी कहते है
अमरूद मिठा है क्या पुछते है
मगर घर जाकर ....
नमक लगाकर खाते है

&#128512

कर्नलतपस्वी's picture

13 Apr 2023 - 7:30 am | कर्नलतपस्वी

मी एक घर घेतले. भावना अतिशय चांगली होती. घेताना मिश्र सल्ले मिळत गेले. नकारात्मक सल्ले तेव्हां फाट्यावर मारले. दोघांनी मिळून, बायको आणी मी, घर घेण्याच्या निर्णय घेतला.

पुढे हा निर्णय चुकीचा ठरला व आतापर्यंत त्याचा त्रास होत होता. नकारात्मक सल्लेच बरोबर ठरले. आता विकले पण त्याचा त्रास पुढेही होण्याची शक्यता आहे.

याला जीवन ऐसे नाव.

सुबोध खरे's picture

13 Apr 2023 - 10:31 am | सुबोध खरे

माझ्या मित्राची एकुलती एक मुलगी एका टिनपाट मुलाच्या प्रेमात पडली होती. हा मुलगा १२ नापास आणि गेली दोन वर्षे काहीच करत नव्हता. मुलगी आणि तो फिरायला जात तेंव्हा मुलीच्याच स्कुटीवर फिरत खाणे पिणे यात मुलीचेच पैसे खर्च होत होते.

मित्राने मला कळकळीने सांगितले कि मुलगी प्रेमात पडण्यात माझा काही आक्षेप नाही (मित्राचा आंतरजातीय प्रेम विवाह झालेला आहे) आणि मुलगा कोणत्याही जाती धर्माचा चालेल पण मुलगा काही तरी लायकीचा हवा. तू काही तरी समजावुन बघ.

मी त्या मुलीशी सहज बोलून घेतले तिला प्रेमात पडल्याबद्दल अभिनंदन केले. तिच्या कलाने घेऊन तिला विचारले कि लग्नानंतर कुठे राहणार आहात?

तिने असा विचारच केलेला नव्हता. मुलगा पुढे काय करणार आहे विचारले तर मुलाकडे नक्की असा कोणताही बेत नव्हताच. केवळ चांगल्या घरची मुलगी पटली आहे तर मजा करू एवढाच त्याचा विचार दिसत होता. तिला म्हणालो कि तुझा महिन्याचा पॉकेट खर्च १० हजार रुपये आहे. ( ज्यात जेवण खाण, स्कुटीचे पेट्रोल हौस मौज इ होते). हा खर्च आज तुझे वडील करत आहेत. उद्या हा खर्च करण्यासाठी त्या मुलाकडे काय तरतूद आहे. त्यावर ती मुलगी आम्ही दोघे काहीतरी करूच असे म्हणाली. परंतु त्यात भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कुठे तरी झलक तिला दिसत होती.

यानंतर मी तिला म्हणालो तुझे वडील त्या मुलाच्या आई वडिलांशी बोलायला तयार आहेत. आपण काही तरी मार्ग काढू असे सांगितले.

मित्राशी सल्ला मसलत केल्यावर तो मुलाच्या आई वडिलांशी बोलायला तयार झाला. मग हे दोघे उठून पुण्याहून अंबरनाथला मुलाच्या घरी गेले. तेथे त्याचे आईवडील पत्र्याच्या चाळीत राहत होते. मुलगा नक्की काय करतो याची वडिलांना कल्पना नव्हती मुलगा १२ वित दोनदा नापास झाला आहे हेही त्यांना माहिती नव्हती. मुलाने काय थापा थापी केली होती माहिती नाही. त्यामुळे एकंदर तेथे वातावरण तंग झाले. माझा मित्र मुलीला घेऊन परत आला. येताना मुलीशी एक शब्द बोलला नाही.

परत आल्यावर मुलगी केवळ अहं दुखावला म्हणून अजूनही त्याच मुलाशी लग्न करायचं म्हणत होती. मी तिला म्हणालो तुम्ही लग्न करायला हरकत नाही पण मुलाच्या शिक्षणाचा खर्च कुणी उचलायचा? आणि तू राहणार कुठे? त्याच पत्र्याच्या चाळीत? किंवा घर भाड्याने घ्यायचं तर पुण्यात निदान १५-१७ हजार रुपये हवेत . ते कुठून आणणार? तू अगदी एक वर्षाने नोकरी करशील पण त्या मुलाचे पदवीपर्यंत शिक्षण होईपर्यंत ३ वर्षे तरी लागतील. शवर सर्व कष्ट तुलाच काढायचे आहेत.
हळू हळू मुलीच्या डोक्यात प्रकाश पडायला लागला कि हे काही खरं नाही. मग हळू हळू तिला सांगितले कि या मुलाने आपल्या आईवडिलांना फसवले आहे उद्या तो तुला फसवणार नाही कशावरून? तू एकुलती एक आहेस हे त्याने हेरले आहे. तुझ्या आई आणि बापाने इतकी वर्षे कष्टाने कमावलेले पैसे त्याने उडवायचे हे तुला पटते का?

आता मुलीला भविष्य स्पष्ट दिसू लागले. आता तिचे आणि मुलाचे खटके उडायला लागले. मग तो मुलगा मुलीला त्रास द्यायला लागला यानंतर मात्र माझ्या मित्राने एक दिवस त्या मुलाला एका हॉटेल मध्ये बोलावले तेथे त्याचा पोलीस सहाय्यक आयुक्त असलेला मित्र पण होता. तेथे त्या मुलाला सभ्य शब्दात सांगितले कि तू माझ्या मुलीचा मित्र आहेस म्हणू इतके दिवस मी तुझ्याशी सभ्य पणे वागत होतो पण तू जर माझ्या मुलीला त्रास द्यायला लागलास तर मी तुला सोडणार नाही आणि त्यात पोलीस सुद्धा पडणार नाहीत हे तुला समोर दिसते आहे. ( हा मित्र कराटे चा ब्लॅक बेल्ट धारक आहे). तेंव्हा यापुढे माझ्या मुलीच्या वाटेल गेलास तर प्रकरण तुझ्य घरापर्यंत येईल. यानंतर या मुलाने मुलीचा नाद सोडला.

पुढे मुलीने पदवी घेतली मग एल एल बी केले आणि एल एल एम च्या आपल्याच वर्गात असेलल्या एका सुखवस्तू आणि प्रतिष्ठित घरच्या मुलाशी प्रेमविवाह जुळवला आणि ६ महिन्यापूर्वी त्यांचे लग्न होऊन ती सुखात नांदते आहे.

तेंव्हा प्रत्येक सल्ला हा चूकच असतो असे म्हणणे बरोबर नाही

विअर्ड विक्स's picture

13 Apr 2023 - 12:05 pm | विअर्ड विक्स

ऐकावे जनाचे करावे मनाचे . सल्ला नकारात्मक व सकारात्मक आहे हे पाहण्यापेक्षा तो कोण देतय हे महत्त्वाचे आहे नि त्या व्यक्तीवर तुमचा कितपत विश्वास आहे , नि त्या व्यक्तीशी तुमचे (प्रेमाचे) नाते आहे का हे महत्वाचे.

उदाहरण द्यायचे झाले तर घर/ गाडी खरेदी - ज्याने स्वतः १-२ घर वा वाहन घेतले आहे तो तुम्हास बरोबर दाल आटे का भाव सांगेल ( नफा -नुकसान ).
नि नातेसंबंधाबाबत काही सल्ला हवा असेल तर बिनदिक्कत आपल्या जवळच्या महिला ( आई ,बहीण, मैत्रीण , दूरची नातेवाईक असून सुद्धा चांगले संबंध असणारे मौसी ,आत्या व बहीण) शी बोलावे

सहसा फसणार नाहीत .

नि महत्त्वाचे म्हणजे सल्ला ऐकल्यावर तो तुमच्या मताशी विसंगत जरी असला तरी किंतु मनात ठेऊ नये . "अनाहूत सल्ले मिळाल्यावर आपली पावले डगमगतात हे खंबीर मनाचे लक्षण नाही" ( अनाहूत सल्ला :) )

एकदा पाण्यात उडी मारल्यावर, गो विथ फ्लो . जर तर ला अर्थ नसतो.