गुजरात सहल २०२१_भाग ४- पोरबंदर, माधवपूर,सोमनाथ (प्रभास पाटण)

Primary tabs

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
18 Jan 2022 - 12:59 am

गुजरात सहल २०२१_भाग ३-भूज, द्वारका येथे वाचा

सहलीचा पाचवा दिवस.
आज सोमनाथसाठी प्रवास सुरु करायचा होता. द्वारका ते सोमनाथ प्रवास चार तासांचा (२३०किमी) असला तरी वाटेत काही ठिकाणे बघायची असल्याने हा प्रवास सात-आठ तासांचा होणार होता. सकाळी सात वाजताच चहा पाहिजे म्हणून कॅन्टीनवाल्याला रात्रीच सांगून ठेवले होते. साडेसहालाच सर्व जण तयार होऊन सामानही गाडीत रवाना झाले होते. चहा झाला. हॉटेलचे बिल चुकते करून साडेसातला प्रवास सुरु झाला.
आज पहिला थांबा होता 'पोरबंदर'. रस्ता अतिशय चांगला असून सकाळच्या वेळी रहदारीही जास्त नव्हती. साडे नऊला पोरबंदरला पोहचलो. कधीकाळी ही नगरी श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा याच्या नावाने सुदामापुरी नावाने ओळखण्यात येत होती. सध्याचे पोरबंदर हे महात्मा गांधीजींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.
आजचे पहिले बघायचे ठिकाण होते अर्थातच 'कीर्ती मंदिर'. गांधीजींचे जन्मस्थान असलेले हे स्मारक म्हणजे तीन मजली घर (खरं तर दोनच मजली G +२) व घराला लागून असलेल्या वास्तूत नव्याने विकसित केलेले छोटेसे संग्रहालय. म.गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. गांधीजींच्या वापरात असलेल्या वस्तू, त्याचे काही जुने फोटो असलेली गॅलरी, पुस्तक संग्रहालय इ. गोष्टी येथे पाहावयास मिळतात. स्मारकाचे उदघाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते २७ मे १९५० रोजी करण्यात आले आहे.

गांधीजींचे जन्मस्थान स्वस्तिक चिन्हाने दाखविण्यात आले आहे.

गांधीजींच्या घराच्या मागील दरवाजाने बाहेर पडल्यावर बाजूच्याच गल्लीत कस्तुरबा गांधी यांचे जन्मस्थान असलेले घर आहे. कस्तुरबा यांच्या लग्नाआधीचे हे घरही जतन करण्यात आले आहे.
कस्तुरबा १३ वर्ष्यांच्या असताना त्यांचा विवाह गांधीजींशी झाला होता.

कस्तुरबा यांचे जन्मस्थान स्वस्तिक चिन्हाने दाखविण्यात आले आहे.

कीर्ती मंदिरापासून थोड्या अंतरावर (पायी किंवा रिक्षाने) सुदामा मंदिर आहे.
सांदिपनी आश्रमात शिकत असताना श्रीकृष्ण व गरीब कुटुंबातील सुदामा यांची चांगली मैत्री होती. शिक्षण आटोपल्यावर कृष्ण द्वारकेवर राज्य करण्यास निघून गेला. सुदामा मात्र येथेच गरिबीत आयुष्य काढीत होता. नंतरची कृष्ण-सुदामा भेट सर्वश्रुतच आहे. असं सांगतात सध्याचे मंदिर हे सुदामाची झोपडी ज्या जागेवर होती त्याच जागेवर उभे आहे.

साधारण दोन तासात हि सर्व ठिकाणे बघून गाडीपाशी आलो. चहा घेतला व पुढच्या प्रवासाला निघालो. सोमनाथकडे जातांना पोरबंदरपासून ६० किमीवरील माधवपूर हे पुढचे ठिकाण होते. जसजसे माधवपूर जवळ यायला लागले तसे महामार्गाच्या उजव्या बाजूने समुद्र किनारा दिसू लागला तर डाव्या बाजूने प्रचंड मोठ्या नारळाच्या बागा .
एका ठिकाणी उजवीकडे वळून समुद्र किनाऱ्याजवळ गेलो. एक भले मोठे शिवलिंग नजरेस पडत होते. बाजूने लांबच लांब समुद्र किनारा. लाटा जोरजोरात किनाऱ्यावर आदळत होत्या. आवाजावरून किनाऱ्याच्या बाजूलाच खोल पाणी असावे असा अंदाज येत होता. पोहण्यासाठी हा बीच निश्चितच सुरक्षित नसावा. छान वारा वाहत होता. मध्यान्ह असूनही ऊन जाणवत नव्हते..

थोड्याच अंतरावर महामार्गाहून डावीकडे वळल्यावर एक मंदिर आहे.
"रुख्मिणी नो चोरो "/ रुख्मिणी मंदिर, चोरी के फेरे
रुख्मिणीच्या विनंतीवरून कृष्णाने तिचे हरण केले. द्वारकेला पोहोचण्याआधी या ठिकाणी कृष्णाने रुख्मिणीसोबत फेरे घेऊन विवाह केला. मंदिराच्या बाजूने सुंदर नारळाची बाग आहे.

थोडे थांबून सोमनाथला निघालो. दीड तासाचा प्रवास होता पण वाटेत जेवणासाठी थांबल्यामुळे अजून अर्धा-पाऊण तास जास्त गेला. चार वाजता आमचे बुकिंग असलेल्या हॉटेलवर पोहचलो. लगेच आम्ही काही जण हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये शिरलो. गार पाण्यात प्रवासाचा सगळा शीण निघून गेला.

संध्याकाळी येथील स्थानिक ठिकाणे बघण्यास बाहेर पडलो.
सोमनाथ पाटण हे प्रभास पाटण या नावानेही ओळखले जाते. मुख्य मंदिरातील लाईट अँड साउंड शो जो रात्री आठ वाजता असतो तो बघायचा असल्याने आधी इतर ठिकाणे बघण्याचे ठरविले.
प्रथम गेलो त्रिवेणी संगमावर. येथे हिरण्या, कपिला आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे. येथून पुढे त्या अरबी समुद्रात विलीन होतात. संगमावर किनाऱ्याने सुंदर घाट बांधले आहेत. द्वारकेप्रमाणे येथेही समुद्री पक्षांची झुंबड पाहायला मिळते.

येथून पुढे दोन किमीवर आहे "गोलोकधाम तीर्थ". यालाच देहोत्सर्ग तीर्थ असेही म्हटले जाते.
येथे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या अवताराची समाप्ती केली असे म्हणतात. असे सांगतात श्रीकृष्णाला विषारी बाण लागल्यानंतर ते काही अंतर चालत त्रिवेणी संगमावर आले. तेथे त्यांनी स्नान केले व पुढे या ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवला. या पवित्र ठिकाणी श्रीकृष्णाच्या पादुकांचे दर्शन आपणास घेता येते. येथे बलदेव गुंफा, गीता मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर अशी इतरही काही मंदिरे आहेत. (श्रीकृष्णला बाण लागला ते ठिकाण 'भालका तीर्थ" व जेथून बाण सोडला गेला ते ठिकाण 'बाणगंगा" आम्ही उद्या सकाळी बघणार आहोत)

सोमनाथ येथे अजून एक आवडीचे ठिकाण बघायचे होते ते म्हणजे येथील "प्रभास पाटण संग्रहालय". येथे अनेक प्राचीन शिल्प आहेत. पण आज वेळ नव्हता आणि त्यातच आजचा दिवस बुधवार होता ज्या दिवशी संग्रहालय बंद असते. एक चांगले ठिकाण बघायला मुकलो याची थोडी रुखरुख मनात राहिली.
संध्याकाळचे सात वाजून गेले होते. येथील सोमनाथाचे मुख्य मंदिर पाहण्यासाठी निघालो.
मंदिरात मोबाईल वगैरे कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येत नाही तसेच पैशांची वगैरे छोटी पर्स सोडली तर इतर कुठलीही मोठी पिशवी/बॅग सोबत नेता येत नाही.
मंदिर भगवान शिव यांना समर्पित असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य मंदिर मानले जाते. मंदिरात गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप असे भाग असून १५० फूट उंच याचे शिखर आहे ज्यावर २७ फूट लांब ध्वज फडकत आहे.
मंदिराचा इतिहास खूप प्राचीन असून इ.स.१०२६ मध्ये मोहम्मद गजनीने येथे प्रचंड लूट केल्याचे कळते. लुटीबरोबरच मंदिराची नासधूस व प्राणहानीही करण्यात आली होती. यानंतरही मंदिर अनेक वेळा वसवण्यात आले व अनेक वेळा आक्रमणांना बळी पडले.
सध्याचे मंदिर सन १९४७ मध्ये बांधले गेले असून हे सातवे पुनर्निर्माण असल्याचे सांगितले जाते.
मंदिराचा इतिहास सांगणारा "लाईट अँड साऊंड शो " रात्री आठ वाजता आयोजित केला जातो. साधारण पाऊण तासाचा हा सुंदर कार्यक्रम आम्हाला पाहण्यास मिळाला.
आहिल्याबाई होळकर यांनी सन १७८३ मध्ये विखुरलेल्या सोमनाथ मंदिराजवळच एक नवीन मंदिर निर्माण केले. या मंदिराला जुने सोमनाथ मंदिर किंवा आहिल्याबाई मंदिर म्हणून ओळखल्या जाते. वेळेअभावी आम्ही हे मंदिर बघू शकलो नाही.

हा फोटो जालावरून साभार

हॉटेलवर जाण्यास रात्रीचे साडे नऊ झाले. जेवण आटोपून आवारात लावलेल्या झोपाळ्यावर, खुर्च्यांवर थोडावेळ विसावून झोपायला गेलो.

हॉटेल सरोवर पोर्टिको

सकाळी नाश्ता आटोपून नऊ वाजता हॉटेल सोडले. दहा मिनिटात (५ किमी) वेरावळ येथील "भालका तीर्थ" या ठिकाणाला पोहचलो.
पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण येथे पिंपळाच्या झाडाखाली एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून
आराम करीत होते. लांबून एका पारध्याला पायांची हालचाल जाणवली. हरीण असावे वाटल्याने त्याने बाण सोडला तो कृष्णाच्या डाव्या पायाचा अंगठा व शेजारील बोट या जागेत लागला. पारध्याने जवळ जाऊन पहिले असता त्याला आपली चूक कळली. कृष्णाने न रागवता त्याला उदार अंत:करणाने माफ केले.

हा फोटो जालावरून साभार

येथून जवळच "बाणगंगा" हे ठिकाण आहे. असे मानल्या जाते कि येथूनच पारध्याने बाण सोडला होता. समुद्र किनारी हे ठिकाण असून ओहोटीच्या वेळी समुद्रात असलेली दोन ज्योतिर्लिंगे नजरेस पडतात. येथे जास्त काही बघण्यासारखे नाही. तासाभरात दोन्ही ठिकाणे बघून आम्ही आमचे पुढचे ठिकाण सासन गीर साठी रवाना झालो

क्रमश:

प्रतिक्रिया

निनाद's picture

18 Jan 2022 - 9:03 am | निनाद

वाचतो आहे! खूप छान सहल चालली आहे तुमच्या सोबत आमची पण!
सगळे फोटो खुप सुरेख!

अनिंद्य's picture

18 Jan 2022 - 11:10 am | अनिंद्य

छान.

लेखातल्या एका फोटोत दिसत असल्याने एक आगाऊ माहिती - गुजराती भाषेत 'लग्न' हा शब्द एमना लगन 'थया' असा लिहितात. लगन 'थयो' नसते. म्हणजे अनेकवचन वाटते ऐकायला :-)

सासन गीर बद्दल उत्सुकता आहे, ते माझे हुकले आहे अनेकदा ठरवूनही, म्हणून पु भा प्र.

बोका's picture

18 Jan 2022 - 11:28 am | बोका

पोरबंदर मधील दरवाजे, खिडक्या सुंदर !

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Jan 2022 - 11:30 am | चंद्रसूर्यकुमार

मस्त चालली आहे लेखमाला. हा भाग पण आवडला.

चौथा कोनाडा's picture

18 Jan 2022 - 12:31 pm | चौथा कोनाडा

हा सगळा परिसरच सुंदर आणि मनाला शांती देणारा.
कितीही वेळ घालवला तरीही सोडावासाच न वाटणारा !
आणि आताचा शितल ऋतू म्हणजे दुघात साखरच !
आमच्या सारख्या सतत शहरी धावपळीत अशा सहली टवटवीत करून जातात.

💖

नेहमी प्रमाणेच तपशिलासह सुटसुटीत सुंदर वॄतांत आणि आणि अ ति सुंदर प्रचि !

कंजूस's picture

19 Jan 2022 - 6:15 am | कंजूस

कधी वाटतं की महाराष्ट्रात नाशिक ,त्र्यंबकेश्वर, भिमाशंकर या पौराणिक ठिकाणांनी पर्यटनास हातभार लावला. ( आता शिर्डीने सर्वांस मागे टाकले आहे.) गुजरातला कृष्णाने उचललं आहे. गांधींची स्मारके आहेतच. धार्मिक नसलेली ठिकाणंही खूप आहेत. गीर हे भारतातील एकमेव सिंह अभयारण्य. गोंडाल, राजकोट आणि मोरवी संस्थाने. सूरत, नवसारी हा पट्टा औद्योगिक. पालनपूर, सूरत मेहसाणा,अहमदाबाद वस्त्रोद्योग.
एकमेव हिल स्टेशन सापुतारा हे ब्रिटिशांनी न वसवलेए जे गुजराती लोकांनाच फा रसे आवडत नाही.
'गरवी गुजरात' एटले संपन्न गुजरात. आवो, जुओ मारो गुजरात.

हा भागही आवडला.

(कीर्ती मंदिर'. गांधीजींचे जन्मस्थान असलेले हे स्मारक येथे पाटीवर ( 27-5-50) पूर्ण तारीख लिहायला हवी होती.
सोमनाथाची दोन मंदिरे झाली. अहिल्याबाईनी बांधलेले आणि जुन्या फोडलेल्या जागेवरचे एक. हे उगाचच झाले असे वाटले.
पुराणातील महाभारतातील उल्लेखांचे सबळ पुरावे अजूनही सापडत नाहीत हे दुर्दैव.)

गोरगावलेकर's picture

19 Jan 2022 - 9:22 am | गोरगावलेकर

@ निनाद प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@अनिंद्य, थया आणि थयो मधला फरक छान समजावून सांगितला. गीर सुंदरच आहे.
@बोका. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

गोरगावलेकर's picture

19 Jan 2022 - 9:23 am | गोरगावलेकर

@चंद्रसूर्यकुमार. प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@चौथा कोनाडा. हुरूप वाढवणारा प्रतिसाद
@कंजूस. सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद

प्रचेतस's picture

20 Jan 2022 - 12:31 pm | प्रचेतस

हा भागही आवडला. काही हटके ठिकाणं पाहावयास मिळाली. एकंदरीत सर्वच ठिकाणांची उत्तम निगा राखलेली दिसते. इथली बहुतांश मंदिरे नागर, मिश्र नागर शैलीतली दिसताहेत.
प्रभासक्षेत्रीच यादवांच्यात यादवी माजून त्यांचा संहार झाला होता.

कर्नलतपस्वी's picture

20 Jan 2022 - 8:50 pm | कर्नलतपस्वी

वाचतोय, मला स्वताःला फिरायला खुप आवडते. सगळीकडे जाता येत नाही तर मिपाकरानीं केलेल्या भटकंतीचे वर्णन बरेच ठिकाणी जाऊन आल्या सारखे समाधान देते. धन्यवाद

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

21 Jan 2022 - 12:16 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान. हा भागही आवडला.

गोरगावलेकर's picture

21 Jan 2022 - 11:58 pm | गोरगावलेकर

प्रचेतस, कर्नलतपस्वी, ॲबसेंट माइंडेड ... सर्वांनचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद

छान मांडणी, देवदर्शन पण करतोय

खालील माहिती चा नक्कीच उपयोग होईल
मी सप्टेबर २०२१ ला श्री सोमनाथ येथे "सागर दर्शन" ला राहिलो होतो, खूप छान आहे. श्री सोमनाथ ट्रस्ट चालविते. एकदा तरी नक्की राहा.. फक्त AC रूम्स आहेत रुपये २५०० (off season रुपये १९५०)
AC रेस्टॉरंट आवडले, स्वस्त आहे आणि सागर दर्शन ला बुकिंग नसेल तरी जेवण करता येते. - नक्की जेवण करा

श्री सोमनाथ ट्रस्ट चे आणखी दोन पर्याय आहेत
माहेश्वरी अतिथी भवन, लीलावती गेस्ट हाऊस - रुपये ८०० पासून रूम्स. गुजराथी थाळी रुपये ७०
बुकिंग साठी https://booking.somnath.org/GuestHouse/

फक्त चाळीस रुपयात अमर्यादित गुजराथी थाळी...  हो फक्त रुपये ४० मध्ये सोमनाथ ट्रस्ट भोजनालय येथे मिळते  Somnath Trust Bhojanalaya
Google Location  - https://goo.gl/maps/nDzNG88He1yhSiBy5