सद्दाम आणि हिटलर

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
27 Dec 2007 - 7:35 am
गाभा: 

मी महाविद्यालयात असताना 'मॉडेल युनायटेड नेशन्स असेंब्ली' या पूरक उपक्रमात मी ३ वेळा भाग घेतला आहे. या उपक्रमात दोन विद्यार्थ्यांचा संघ संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील एकेका देशाचे प्रतिनिधीत्व करतो.असे एकूण ३० ते ४० संघ मी भाग घेतलेल्या वेळी होते. त्या सर्व संघांपुढे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पारित झालेला ठराव मांडण्यात येतो आणि त्यावर त्या विद्यार्थ्यांनी आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या देशांची भूमिका मांडणारे भाषण करायचे आणि इतर देशांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारून त्यांची 'बिनपाण्यानी' करायची. आणि हे सर्व नाटक आहे हे लक्षात घेऊन आपली वैयक्तिक मते बाजूला ठेऊन आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या देशाची अधिकृत भूमिका विद्यार्थ्यांनी मांडणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करणार्‍या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकारची अधिकृत भूमिका-- "आम्ही काश्मीरात भारतीय दडपशाहीविरूध्द लढणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांना नैतिक समर्थन देतो आणि काश्मीरातील हिंसाचार हा स्वातंत्र्यलढा असून दहशतवादाला आम्ही अजिबात समर्थन देत नाही" ही मांडणे अपेक्षित असते. कोल्हापूर मधील शिवाजी विद्यापीठात हा उपक्रम होत असे आणि त्यात काही आफ्रिकन देशांचे प्रतिनिधीत्व केनिया, झिंम्बाब्वे या ठिकाणाहून आलेले विद्यार्थी करत असत. इतर सर्व देशांचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी भारतीयच असत.एकूणच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रस असलेल्यांसाठी हा एक खूपच चांगला उपक्रम होता.

मी या उपक्रमात वेगळ्या वेळी युगोस्लाव्हिया, भारत आणि पॅलेस्टाईन या देशांचे प्रतिनिधीत्व केले होते. मार्च २००१ मध्ये म्हणजे मी शेवटच्या वर्षाला असताना माझे मित्र अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करत होते आणि मी पॅलेस्टाईनचे. त्याअर्थी आम्ही त्या उपक्रमातील प्रतिस्पर्धी होतो. तरीही आम्ही आमच्या देशांच्या भूमिकांविषयी एकत्र बसून तयारी केली होती. माझ्या मित्रांनी आम्हाला पॅलेस्टाईन विषयी काही मुद्दे सांगितले तर आम्ही त्यांना अमेरिकेविषयी.

अर्थातच अमेरिकेच्या इराकविषयक धोरणांवर अनेक प्रश्न विचारले जाणे अपेक्षितच होते. आणि मार्च २००१ म्हणजे दुसरे आखाती युध्द व्हायचे होते आणि बुश अध्यक्षपदी नुकतेच आले होते.तेव्हा मी माझ्या मित्रांना अमेरिकेच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी खालील मुद्दे सुचवले होते. त्यात एक प्रमुख मुद्दा म्हणजे हिटलर आणि सद्दाम हुसेन यांच्यातील साम्य दाखविणे.

"हिटलर १९३३ मध्ये जर्मनीत सत्तेवर आला. त्याने १९३६ साली र्‍हाईनलँडचा ताबा मिळवला.त्यावेळी जगातील सर्व देशांची भूमिका काय होती? हिटलरने केले त्यात चूक काय आहे?कारण त्याने व्हर्सायच्या तहाप्रमाणे जर्मनीचा ज प्रदेश फ्रान्सला दिला होता तो परत मिळवला.किंबहुना फ्रान्सनेही त्याविषयी अजिबात तक्रार केली नाही.त्यानंतर १९३८ च्या मार्च महिन्यात हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला.त्यामागचे कारण काय तर ऑस्ट्रीयन जनता जर्मनभाषिक आहे.त्यावर जगाची प्रतिक्रिया काय होती?इंग्लंड्-फ्रान्सने फारशी प्रतिक्रिया व्यक्त केलीच नाही. मग आला १९३८ चा सप्टेंबर महिना. हिटलरने झेकोस्लाव्हाकियातील सुडेटनलँडवर हक्क सांगितला. त्यामागचेही कारण काय तर तेथील जनता जर्मन भाषक आहे.तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन स्वतः हिटलरच्या नाकदुर्‍या काढायला बर्खटेसगार्डन येथे ३ वेळा गेले.त्यानंतरच्या म्युनिक करारात तत्कालीन महासत्तांनी (इंग्लंड आणि फ्रान्स) हिटलरपुढे लोटांगण घातले आणि झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच त्या देशाचा प्रांत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकला.जेव्हा हिटलरने पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितला तेव्हा जगाचे डोळ उघडले.पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.आणि जगाला दुसर्‍या महायुध्दाच्या अग्निदिव्यातून जावे लागले आणि ६-७ कोटी लोकांची आहुती त्यात पडली. जर १९३६ मध्येच हिटलरने र्‍हाईनलँडवर ताबा मिळवल्यानंतर तत्कालीन महासत्तांनी कडक भूमिका घेतली असती तर पुढचे रामायण झाले नसते. पण मुळातच बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे हिटलरचा धीर चेपला आणि तो अधिकाधिक गंभीर कृत्ये करू लागला.

आता वळू या इराकच्या प्रश्नाकडे. सद्दाम १९७९ मध्ये सत्तेवर आला. १९८० मध्ये त्याने इराणवर आक्रमण केले.१९९० मध्ये सद्दामने कुवेतचा कब्ज घेतल्यानंतर आम्ही कडक भूमिका घेतली.आखाती युध्दाच्या वेळेस सद्दामने पहिले काही केले असेल तर इस्राएलवर क्षेपणास्त्रे डागणे. जेरूसलेमवर कब्जा मिळवणे हे तर सद्दामचे ध्येय होते आणि ते त्याने अनेकदा बोलूनही दाखवले होते.त्यानंतर सद्दामने सौदी अरेबियातील अल खाफजी या शहरावर ताबा मिळवला. सौदी अरेबियाचा इराक्-कुवेत संघर्षाशी काय संबंध होता? काहीच नाही.म्हणजे सद्दाम हा आजूबाजूच्या सर्व देशांसाठी मोठा धोका होता. र्‍हाईनलँडचा कब्जा ही हिटलरसाठी सुरवात होती.तसेच कुवेतवरील आक्रमण ही सद्दामसाठी सुरवात कशावरून नसती?अमेरिकेने त्यावेळी कडक भूमिका घेतल्यामुळे तो धोका टळला. आणि ते आक्रमण करणे ही एक गरज होती.

आता राहता राहिला प्रश्न की ते आक्रमण अमेरिकेनेच का करायचे हा.आर्थिक आणि सामरीक दृष्ट्या जर असे आक्रमण करणे कोणत्या देशाला शक्य असेल तर ते केवळ अमेरिकेला. किंबहुना जगातील महासत्ता या नात्याने तसे करणे हे अमेरिकेचे उत्तरादायित्व आहे. आपण घाना किंवा सोमालिया यासारख्या देशांकडून ती अपेक्षा करू शकत नाही.

किंबहुना केवळ इराकच नव्हे तर जगाच्या कोणत्याही भागात जर नवे हिटलर निर्माण होत असतील तर त्यांचा बंदोबस्त करणे ही महासत्ता या नात्याने अमेरिकेची जबाबदारी आहे.आणि किंबहुना ते अमेरिकेने केलेच पाहिजे.हिटलरकडे दुर्लक्ष केल्यामुळे जगाला दुसरे महायुध्द या भयंकर प्रसंगातून जावे लागले. त्या चुकेची पुनरावृत्ती कदापि होता कामा नये."

अर्थात हे बाजू अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संघाने मांडायची असे ठरले होते. अमेरिकेच्या धोरणातही चुका आहेतच.कारण अमेरिकेच्या दृष्टीने कटकटीच्या असणार्‍या हुकुमशहांचाच अमेरिकेने बंदोबस्त केला. याह्याखान ला पूर्णपणे आणि पनामाच्या नोरीगाला अनेक वर्षे अमेरिकेने मोकळे रान दिले.

तरीही या सर्व पार्श्वभूमीवर २००३ चे आखाती युध्द हे १९९१ चा unfinished agenda पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने केले असे म्हटले तर त्यात चूक काय?

अवांतर-- हे लिहिण्यामागे तात्कालिक कारण नाझी भस्मासूराचा उदयास्त या पुस्तकावरची मिसळपाववरील चर्चा.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

प्रतिक्रिया

बद्दल तुम्ही केलेल्या तयारीचे मुद्दे वाचयला आवडतील. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर एखादा लेख येउद्या क्लिंटन राव.

क्लिंटनसाहेब,

तुमच्या या लेखातील आणि माझ्या नाझी भस्मासुराच्या उदयास्त या लेखावरील तुमचे मुद्दे अगदी सडेतोड आहेत.
खरेच अशा रक्तपिपासु भस्मासुरांना वेळीच संपवणे ही सगळ्या मानवजातीची गरज आहे.
यदाकदाचित तिसरे महायुद्ध झालेच तर अणुबॉम्ब आणि रासायनिक अस्त्रे अगदी मुबलक प्रमाणात वापरले जातील.
त्यावेळी पृथ्वीच्या पर्यावरणाचा विचार कोणी करण्याच्या मन:स्थितीत नसेल. आणि ज्यावेळी हे युद्ध संपेल त्याचे परिणाम अखिल मानवजातीला भोगावे लागतील. तटस्थ राहिलो तर वाचू म्हणून कोणता देश त्यावेळी तटस्थ राहिला तरीही त्यांना या युद्धाचे परिणाम भोगावेच लागतील. कारण या युद्धाचे परिणाम पृथ्वीचे हवामान, तापमान, वातावरण या सर्वांवर होणार. आणि होणार्‍या किरणोत्सर्गाचे परिणाम सर्वांवरच होणार..
तेव्हा हे युद्ध न घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

अवलिया's picture

27 Dec 2007 - 5:46 pm | अवलिया

बहुना केवळ इराकच नव्हे तर जगाच्या कोणत्याही भागात जर नवे हिटलर निर्माण होत असतील तर त्यांचा बंदोबस्त करणे ही महासत्ता या नात्याने अमेरिकेची जबाबदारी आहे.आणि किंबहुना ते अमेरिकेने केलेच पाहिजे.हिटलरकडे दुर्लक्ष केल्यामुळे जगाला दुसरे महायुध्द या भयंकर प्रसंगातून जावे लागले. त्या चुकेची पुनरावृत्ती कदापि होता कामा नये.

पण अमेरिकाच जर हिटलरची भुमिका बजावु लागली तर तिला कोण रोखेल?
आज तरी अमेरीकाचा संरक्षणापेक्षा विध्वंसाकडे जास्तच कलत आहे.
परमेश्वर जगाचे रक्षण करो

नाना

"बहुना केवळ इराकच नव्हे तर जगाच्या कोणत्याही भागात जर नवे हिटलर निर्माण होत असतील तर त्यांचा बंदोबस्त करणे ही महासत्ता या नात्याने अमेरिकेची जबाबदारी आहे.आणि किंबहुना ते अमेरिकेने केलेच पाहिजे.हिटलरकडे दुर्लक्ष केल्यामुळे जगाला दुसरे महायुध्द या भयंकर प्रसंगातून जावे लागले. त्या चुकेची पुनरावृत्ती कदापि होता कामा नये."

मुळात ही संकल्पनाच चूकीची आहे. अमेरिकेचे धोरण हे कधी जगाच्या रक्षणकर्त्याची नव्हती. त्यांनी स्वताच्या सोईनुसार व फायद्यानुसार वेळोवेळी बदलल्या आहेत. तसे पाअहिले तर अमेरिकन म्हणजे पक्के व्यवसायीक, म्हणून कुठल्याही प्रसंगात त्यांनी स्वताचा फायदा पहिल्यांदा पाहिला. उदा:- इराक, तालिबान,पेलेस्टाईन आता इराण, सर्बिया,
स्वताच्या फायद्यासाठी पहिल्यांदा तालिबानला पाठीला घातले, त्यांना शक्य ती सगळी मदत केली कारण त्यावेळी त्यांचा फायदा रशियाचा पाडाव करण्यात होता. पण हे तालिबानचे भूत त्यांच्या मानगूटीवर बसल्यावर त्यांनी पूर्ण अफगाण जाळण्यास मागेपूढे पाहिले नाही......

तेव्हां परमेश्वराकडे संरक्षणासाठी साकडे घालण्यापूर्वी आपण भारताच्या रक्षेसाठी काय मदत करू शकतो ते पहावे. परमेश्वर हा नेहमी स्वता प्रयत्न करणार्‍यालाच साथ देतो......
आपण दैनंदिन आयुष्यात जागरूक नागरिकाची भूमिका जर योग्य रित्या निभावली तर कित्येक भविष्यातील संकटे आपण आरामात टाळू शकतो. उदा:- बाँबस्फोट, दंगली, एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची हत्या .......

या विषयावर लिहण्यासारखे बरेच आहे.... परंतू ईति कालमर्यादा !!!!

प्रथम मी आपल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आपले अभिनंदन करतो. आपण साम्य चांगले दाखविले आहे. परंतु आपल्या विरोधी पक्षाने काय सांगितले ते देखील लिहिले तर मजा येईल. मी अमेरिकाविरोधी किंवा हिटलर्वादी वा सद्दामवादी नाही. तसेच युद्धवादीहि नाही. शांततावादीच आहे. तरीहि माझे खालील मुद्दे देखील विचारांत घ्यावेत.

१. हिटलरने ज्यूंचा वंशविच्छेद करण्याचा प्रयत्न केला तसा सद्दामने केला कां?
२. हिटलरने ऑस्ट्रिया, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया इ. देश पादाक्रांत केले, फ्रान्स जवळजवळ पूर्ण व्यापला, बेल्जम खाला. रशियावर करार मोडून हल्ला केला तसे सद्दामने केले का? ओपेकच्या पेट्रोल्च्या धोरणाला विरोध केला म्हणून त्याने कुवैतला धडा शिकविला असा सद्दामचा प्रचार होता.
३. सद्दामकडे रासायनिक शस्त्रे आहेत व अणुशस्त्रे तो बनवण्याची शक्यता आहे व त्यामुळे जगाला धोका आहे असा अमेरिकेचा दावा होता. परंतु सं राष्ट्रांच्या पाहणीचे निष्कर्ष या आरोपाविरुद्ध होते. तसेच सद्दमची लष्करी ताकद विचारांत घेतां एकटे इझरायलच त्याला पुरून उरूं शकत होते. म्हणजे त्याचे शेजारी देश स्वतःचे संरक्षण करण्यास समर्थ होते. त्यामूळे अमेरिकेचे आक्रमण समर्थनीय ठरत नाही. मग अमेरिकेने दंड म्हणून युद्धाचा खर्च व्याजासह इराकला द्यावयास नको काय?

४. व्हिएतनाम प्रकरणात अमेरिका रक्तपिपासू भस्मासूर ठरत नाही काय? अमेरिकेने दंड म्हणून युद्धाचा खर्च व्याजासह व्हिएतनामला द्यावयास नको काय?
५. इराण इराक युध्द चालू असतांना याच अमेरिकेने सद्दामला पाठिंबा दिला होता त्याचे काय?

इतरांचे देखील परस्परविरोधी मुद्दे यथावकाश वादासाठी येतीलच.

क्लिंटन's picture

27 Dec 2007 - 9:51 pm | क्लिंटन

>>प्रथम मी आपल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आपले अभिनंदन करतो. आपण साम्य चांगले दाखविले आहे.परंतु आपल्या विरोधी पक्षाने काय >>सांगितले ते देखील लिहिले तर मजा येईल.

धन्यवाद कंदळकर साहेब.हे सर्व मुद्दे जर कोणी प्रश्न विचारला तर तयार असावेत म्हणून केलेले होते.दिरोधी पक्षाने त्यानंतर हा मुद्दा लावून धरला नाही.मी स्वतः पॅलेस्टाईनचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे मी सुध्दा अमेरिकेच्या इस्त्राएलला पाठिशी घालायच्या धोरणावर टिका केली होती.पण इराकविषयक धोरणांविषयी नाही.

>>हिटलरने ऑस्ट्रिया, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया इ. देश पादाक्रांत केले, फ्रान्स जवळजवळ पूर्ण व्यापला, बेल्जम खाला. रशियावर >>करार मोडून हल्ला केला तसे सद्दामने केले का?

पण सद्दामची पावले त्याच दिशेने पडत होती असे त्याची वर्तणूक बघून म्हटले तर काय चुकले?इराकने इराणवर प्रथम हल्ला केला.त्यानंतर कुवेतवर हल्ला केला. तो पचू दिला असता तर कशावरून सद्दामची भूक वाढत गेली नसती?सद्दाम दुसरा हिटलर बनू शकला नाही याचे कारण १९९१ मध्ये सद्दामला शिकवलेल धडा.सद्दामने दुसरा हिटलर बनायचे वाट बघायला हवी होती का?

>>हिटलरने ज्यूंचा वंशविच्छेद करण्याचा प्रयत्न केला तसा सद्दामने केला कां>>

माझे काही अमेरिकन मित्र अमेरिकन लष्कराच्या non-combat अभियांत्रिकी पथकांबरोबर इराकमध्ये ६ महिने जाऊन आलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकन जनतेचा इराक युध्दाला असलेला विरोध १००% समर्थनीय नाही.आपण इराकमध्ये वेळोवेळी होत असलेल्या अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्याविषयी ऐकतो.हे हल्ले करणारे आणि आपल्याच लोकांना ठार मारणारे सद्दामचे समर्थक आहेत आणि हे हल्ले हातातील सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेले सद्दाम समर्थक सुन्नी पंथीय करत आहेत.सर्वसामान्य इराकी जनतेचा त्यात हात नाही हे लक्षात घ्यायला हवे. तसेच स्वतः सद्दाम, त्याचे पुत्र आणि त्यांचे इतर जवळचे लोक यांनी इराकच्या अनेक भागांमध्ये दहशतीचे राज्य स्थापन केले होते आणि त्यापासून आमची सुटका केलीत म्हणून इराकी जनतेत कृतज्ञता पण आहे, असे मला माझ्या अमेरिकन मित्रांनी सांगितले आहे .
तेव्हा सद्दामचे दहशतीचे राज्य इराकमध्ये सर्वत्र होते हे तर उघडच आहे.

>>ओपेकच्या पेट्रोल्च्या धोरणाला विरोध केला म्हणून त्याने कुवैतला धडा शिकविला असा सद्दामचा प्रचार होता.
तसा एकेकाळी कुवेत हा इराकचाच प्रांत होता. पण इराक स्वतंत्र झाल्यानंतर कुवेत हा इराकचाच भाग बनावा यासाठी कुवेतमध्ये मागणी होत नव्हती हे लक्षात घ्यायला हवे.ओपेकच्या धोरणांना विरोध केला म्हणून इराकच्या व्यापारी संबंधांना धोका उत्पन्न होत असेल तर त्या देशावर आक्रमण करून ताब्यात घेणे हा मार्ग होता का?

>>सद्दामकडे रासायनिक शस्त्रे आहेत व अणुशस्त्रे तो बनवण्याची शक्यता आहे व त्यामुळे जगाला धोका आहे असा अमेरिकेचा दावा होता. >>परंतु सं राष्ट्रांच्या पाहणीचे निष्कर्ष या आरोपाविरुद्ध होते.

मान्य.सद्दामकडे रासायनिक शस्त्रे नव्हती हे सिध्द झाले आहे.पण त्याला मोकळे सोडले असते तर तो जागतिक शांततेसाठी मोठी धोका ठरला असता हे उघड आहे.आणि इराकी जनतेला सद्दामच्या दहशतीच्या वरवंट्यात भरडले जावे लागले असते हे पण उघड आहे. तसेच त्याचे सत्तेत राहणे धोकादायक होते. तेव्हा त्याच्याकडे रासायनिक शस्त्रे आहेत हे खोटे कारण देऊन का होईना त्याला सत्तेवरून हाकलले ते चांगलेच झाले.कदाचित १९९१मध्येच सद्दामला सत्तेवरून घालवले असते तर आजच्याइतका गोंधळ इराकमध्ये नसता.१९९१ मध्ये सद्दामनंतर शियाबहुल इराकमध्ये शिया राजवटच आली असती. पण तेव्हा सौदी अरेबियामधील सुन्नी राजवटीला शेजारी इराक आणि इराण हे दोन शियांचे प्राबल्य असलेले देश नको होते म्हणून सौदी अरेबियाने अमेरिकेला सद्दामला सत्तेवरून घालवण्यापासून परावृत्त केले असाही एक मतप्रवाह आहे.

>>एकटे इझरायलच त्याला पुरून उरूं शकत होते.
मान्य.पण इस्त्राएलने १९८३ मध्ये इराकच्या आण्विक संयंत्रांवर हल्ला केला त्यानंतर इस्त्राएल काही करत नव्हते ना.म्हणजे सद्दामचा काटा परस्पर अमेरिकेने काढला तर आपल्याला कटकट नको या व्यावहारिक उद्देशाने म्हणा किंवा इस्राएल स्वतः पॅलेस्टिनी प्रश्नात गुंतले असल्यामुळे म्हणा सद्दामविरूध्द कोणी काही करत नव्हते ना.पण सद्दामची दहशत इराकमध्ये चालूच होती.मग ते कोणीतरी करायला हवेच होते ना?

>>व्हिएतनाम प्रकरणात अमेरिका रक्तपिपासू भस्मासूर ठरत नाही काय? अमेरिकेने दंड म्हणून युद्धाचा खर्च व्याजासह व्हिएतनामला >>द्यावयास नको काय?

नक्कीच्.मी अमेरिकेच्या व्हिएटनाम विषयक धोरणांचे अजिबात समर्थन करत नाही.

>>इराण इराक युध्द चालू असतांना याच अमेरिकेने सद्दामला पाठिंबा दिला होता त्याचे काय?
ही चूक आहेच. पण एक चूक केली म्हणून अमेरिकेने वारंवार चुकांची पुनरावृत्ती करावी हे म्हणणे योग्य ठरेल का?

अमेरिकाच जर हिटलर बनू पाहत असेल तर मात्र या चर्चेत म्हटल्याप्रमाणे जगाचे खरोखरच कठिण आहे.

इराकमध्ये निरपराध लोकांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत याचे दु:ख मिसळपावच्या कोणाही गावकर्‍याइतकेच मलाही आहे. अमेरिकन लष्कराकडून जर इराकमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असेल (आणि ती काही प्रमाणात होतच आहे अशा बातम्या आहेत) तर त्याविरूद कठोर कारवाई करायलाच हवी. तसेच अमेरिकेच्या सर्व धोरणांचे मी डोळे झाकून समर्थन करतो असे कृपया समजू नका. तसे असेल तर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युध्दाच्या वेळी बंगालच्या उपसागरात ७वे आरमार पाठवायच्या अमेरिकेच्या कृतीचे पण मी समर्थन करतो असा होईल आणि एक भारतीय म्हणून मी स्पष्टपणे म्हणतो की अमेरिकेच्या त्या कृतीचे समर्थन करणे म्हणजे देशद्रोह आहे.

तरीही मी अजून एका कारणाने इराक युध्दाचे समर्थन करतो.जगाला आणि विशेषत: भारताला सर्वात मोठे धोके दोन-- एक म्हणजे नक्षलवाद आणि दुसरा इस्लामी दहशतवाद. पहिला प्रश्न अंतर्गत आहे. तर दुसरा प्रश्न ही जागतिक समस्या आहे हे उघड आहे. भारतातील सिमी संघटना, लष्कर ए तोयबा सारखे काश्मीरातील गट ,तालिबानआणि अल कायदा हे सर्व कमी-अधिक प्रमाणात एका माळेचे मणी आहेत्.आणि ९/११, इराक आणि अफगाणिस्तान युध्दामुळे यापूर्वी केवळ भारत आणि इस्त्राएल विरूध्द केंद्रित झालेली त्यांची शक्ती आता अमेरिका-इंग्लंड आणि युरोपातील देश यांच्याविरूध्दही गेली आहे. आणि त्या मोठ्या धोक्याविरूध्द भारत आणि महासत्ता अमेरिका अगदी प्रत्यक्ष सहकारी नाही तरी एकाच बाजूला असणे हे भारताच्या भविष्यासाठी खूपच महत्वाचे आहे. ते कोणत्या ना कोणत्या उद्देशाने का होईना होत आहे आणि त्यात इराक युध्दाचा वाटा नक्कीच आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

विसोबा खेचर's picture

28 Dec 2007 - 12:22 pm | विसोबा खेचर

चर्चा वाचावयास मजा येते आहे!

(वाचक) तात्या.

अरविन्दनरहरजोशी's picture

17 Jan 2008 - 6:01 pm | अरविन्दनरहरजोशी

अरविन्द
सर्व चर्चा बरोबर आहे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

29 May 2015 - 5:50 pm | पुण्याचे वटवाघूळ

हल्ली मी मिसळपाववर वाचनमात्रच आहे. सगळ्या चर्चा आवर्जून वाचतो. मिस्ळ्पाववर सध्या सुरू असलेल्या सद्दाम हुसेनच्या चर्चेशी सुसंगत अशी ही चर्चा वाटली म्हणून जुना धागा वर आणत आहे. मी मिपावरील अगदी पहिल्यापासूनच्या सगळ्या चर्चा वाचल्यामुळे मला असे जुने संदर्भ लगेच लक्षात येतात.