बोलीभाषेची गोडी

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in काथ्याकूट
20 Dec 2007 - 9:43 am
गाभा: 

लोकहो !!!

मागे श्री. नामदेव ढसाळ यांच्यावरील लेखनाच्या अभिप्रायात "गोलपिठा' हा मैलाचा दगड या शब्दावरून काही चर्चा झाली.

आता मैलाचे अंतर कोणी वापरत नाही आता किलोमीटर आले. त्यामुळे मैलाचा दगड हा शब्द टाकाऊ झाला आहे असा सूर तिथे दिसला.

लोकहो, एक लक्षात घ्या की भाषेला सौंदर्य हे परंपरेनुसार येत असते. सर्वसामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो ती खरी भाषा असते. ती खरी सुंदर असते. कारण ती थेट माणसाच्या हृदयातून आलेली असते. तिला मेकअप केलेला नसतो.

त्यामुळे काही वस्तूंची परिमाणे काळानुसार बदलली तरी भाषेने स्विकारलेले शब्द अत्यंत शुद्ध स्वरूपात राहतात. मैलाचा दगड हे त्याचेच उदाहरण.

असे अनेक शब्द तुम्हाला मराठीत आढळतील ज्यांना स्वत:चा असा ठसा आहे. माजघर हा शब्द पहा. आज आपल्या घरात माजघर राहिलेले नाही. पण किती उदात्त कल्पना माजघरातून व्यक्त होते. ती आजच्या "हॉल"मधून होत नाही.

तर ही जी बोलीभाषा रूढ झालेली आहे, त्यात आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. ती समजून घेऊन आणि तिचा वापर करून पुढील पिढीकडे सुपूर्त व्हावी असे आम्हाला वाटते.

तुमचे मत काय आहे ते नोंदवा. मिसळपाववरील जाणकार व्यक्तिंचा या चर्चेत सहभाग अपेक्षित आहे.

आपला,
(शब्दप्रेमी) धोंडोपंत

वरील मजकूर अत्यंत घाईत टंकित केला आहे, गडबडीमुळे टंकलेखनात चुका असण्याची शक्यता आहे. पुन्हा वाचून त्या दुरूस्त करायला वेळ नाही आहे. पाच मिनीटात मार्केट सुरू होणार आहे. मुद्दा महत्वाचा म्हणून चर्चा चालू करून आम्ही जात आहोत. काही चुका असल्यास समजून घ्या.

धोंडोपंत

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

20 Dec 2007 - 10:59 am | मुक्तसुनीत

फारच उत्तम विषय.

मला चटकन सुचलेला एक विचार म्हणजे भाषा -विशेषतः बोलीभाषा ही एक सतत बदलणारी गोष्ट आहे. दशकामागून दशके उलटतात तसे रोजचे वापरातील शब्द बदलतात. काही शब्द "एक्सिंक्ट" होतात. माजघराचे दर्शन आज जिथे दुर्मिळ , तिथे त्या शब्दामधून प्रतीत होणार्‍या ओलाव्याचा अनुभव घेऊ शकणार्‍या व्यक्ति दिवसागणिक कमी होणार हे खरेच. नवे यायचे आणि त्याने जुन्याची जागा घ्यायची हे इतर गोष्टींप्रमाणे बोलीभाषेच्या बाबतीतही होणार.

विसोबा खेचर's picture

20 Dec 2007 - 11:40 am | विसोबा खेचर

धोंड्या,

उत्तम विषय मांडलास. आम्ही पहिल्यापासूनच बोलीभाषेचे समर्थक आहोत. काही ठिकाणी छापील, पुसतकी भाषा वापरणे भाग असते याची आम्हाला कल्पना आहे, परंतु बोलीभाषेचा गोडवा काही औरच!

पडवी, ओटी, अंगण, माजघर, माडी (घरातली!), वाडी इत्यादी शब्द आपल्या कोकणात नेहमीच्या वापरातले. कोकणी बोलीभाषेत इतरही काही अस्सल शब्द आहेत तेही हळूहळू इथे येऊ द्यात. मीही देण्याचा प्रयत्न करीन.

कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो!

जनावर - म्हणजे साधारणपणे कोणताही प्राणी. (माणूस सोडून! अर्थात, काही माणसं जनावरासारखंही वागताना आपण पाहतो तो भाग निराळा!) परंतु कोकणी बोलीभाषेत सापाकरता, नागाकरता 'जनावर' हाच शब्द सर्रास वापरला जातो. आंगण्यातून (कोकणात बोलीभाषेत 'अंगणातून' असं सहसा म्हणत नाहीत,), आंब्यापोफळीतून साप किंवा नाग सरपटत जाताना कुणी पाहिला की पटकन 'तिथे साप आहे हो!' असं न म्हणता, 'तिथे जनावर आहे हो, सांभाळा!' असं म्हणतात! :)

मुंबईपुण्यात ज्याला शहाळं म्हणतात त्याला आमच्या देवगडात 'असोला' म्हणतात. 'रांडेचा भिक्कंभट ना, शिंचे २१ रुप्ये (रुपये नव्हे!) आणि एक असोला दिला की झक्कत पूजा सांगायला येईल!' असं म्हणतात! :)

असो, कोकणी बोलीभाषेतल्या शिव्यांबद्दल आम्ही काही बोलत नाही कारण आधीच आम्ही शिवराळ म्हणून प्रसिद्ध आहोत. नाहीतर गंमतीत म्हणून आमच्या वेलणकरलाशेठला प्रेमाने रांडेची एखादी शिवी द्यायला जायचो आणि आमच्या मनोगती मैतरांचा पुन्हा एकदा राग ओढवून घ्यायचो! :)

मिपावर इतरही काही प्रांतातली मंडळी आहेत (देश, विदर्भ, मराठवाडा) त्यांनीही या चर्चेत सहभागी होऊन आपापल्या प्रांतातले बोलीभाषेतले खास खास शब्द इथे आम्हा सर्वांना माहीत करून द्यावेत ही विनंती!

धोंड्या, तुझ्या त्या चरवीच्या दुधाची आणि म्हातारीची कथा इथे सांग रे! :)

आपला,
(बोलघेवडा) तात्या.

शहाळ्याच्या आतील खोबरे कोवळे असते. असोल्यातील जून. देठ किती वाळला आहे इ. बाबीवरून गावातील मंडळी तो नारळ आहे की शहाळे हे ओळखतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2007 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत,
हा विषय कधीही न संपणारा आहे, आपला चर्चा प्रस्ताव आम्हाला आवडला. खरे तर आमच्या मराठवाड्याला एक बोली नाही, असे आमचे वयक्तिक मत आहे. त्याचे कारण असे असावे, की इथे मात्र वेगवेगळ्या बोली एकत्र झालेल्या दिसतात तरीही बोलतांना एक वेगळा ताल, लय मराठवाड्याच्या भाषेत दिसते.

भाषेच्या प्रमुख बोली पुढील प्रमाणे मानतात. त्या अंगाने चर्चा पुढे जावी, असे वाटते.
१) कोकणी २)व-हाडी ३) डांगी ४) अहिराणी ५) हळबी ( पण त्याचे बोली भाषेतील शब्द कोणते सांगता येणार नाही बॉ आम्हाला )
कोकणी ही मराठीची प्रमुख बोली आहे, ( असे मानत असलो तरी, ती मराठीची बोली नाही. असेही एक मत आमच्या वाचनात आहे. )
असेच आम्ही माननारे आहोत. उत्तर कोकणी आणि दक्षिण कोकणी असे प्रकार आहेत म्हणतात.आता त्या शब्दात होणारे बदल तर कोकणी बोलणा-यांनीच इथे टंकले पाहिजेत. कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करतात, कोणत्या शब्दांचा लोप होतो........वगैरे इत्यादी :)
राहण्याची खोली = कुड
थट्टा = फकाणा
असे किती तरी शब्द आहेत. जे प्रमाणभाषेत दिसत नाही. तिकडेच कुठेतरे कुडाळी भाषाही बोलली जाते म्हणतात.

व-हाडीत बोलतांना
बापाला = बापाले, मले = मला, मानसाले = मानसाला , माणसांना= माणसाईले, काय= काव्हून, काम्हून ( काम्हून मराठवाड्यात बोलतात) रांग = कतार आणि इत्यादी.

अहिराणी भाषेत

सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी.

डांगी बोली
तंबाकू = ताम्बोका, महिना=मिहिना, लसून= लोसुन्ड इत्यादी.

असे बरेच बोली भाषेतील गोडवा असणारे अनेक शब्द अनेकांना माहित असतील. त्या त्या विभागातील माणसांनी आपापल्या बोलीतील इथे शब्द दिले तर या चर्चेत अधिक मजा येईल असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

20 Dec 2007 - 8:53 pm | मुक्तसुनीत

बहिणाबाईंच्या कविता वाचताना अहिराणी (अहिराणीच ना ?) भाषेतले पहिल्यांदा भेटले असे आठवते. फार छान अनुभव होता तो.
मराठवाड्याकडचे अजून शब्द येऊ द्यात !

विसोबा खेचर's picture

20 Dec 2007 - 10:21 pm | विसोबा खेचर

बिरुटेसाहेब,

सुंदर प्रतिसाद. आपल्या व्यासंगाला दाद देतो!

अहिराणी भाषेत
सोड = छोड, सावली + छावली, डोय =डोळी , रडु= लडु, ओरडणे= वलडणे, जळगाव= जयगाव, इत्यादी.

अहिराणी भाषेबद्दल अधिक लिहा. मला ही भाषा फार आवडते. खूप छान नादमाधुर्य आहे या भाषेत!

डांगीसुद्धा कानाला गोड लागली! :)

आपला,
(अहिराणीप्रेमी) तात्या.

मुक्तसुनीत's picture

20 Dec 2007 - 8:49 pm | मुक्तसुनीत

>>>>>कांबेरू, खोचेरा - अलिबाग, किहीम, आदी अष्टागरातल्या भागात साप मारण्यासाठी पुढे अणुकुचिदार धातूचं पातं लावलेली जी लाकडी काठी असते तिला खोचेरा
>>>>>>म्हणतात. तोच खोचेरा रत्नांग्री, देवगडात कांबेरू होतो!

तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ?

विसोबा खेचर's picture

20 Dec 2007 - 10:42 pm | विसोबा खेचर

तात्या , आपल्या शिरूभाऊंची एक कादंबरी आहे "कामेरू" नावाची. या शीर्षकाचा अर्थ म्हणजेच तुमचे कांबेरू काय ?

असेच वाटते! अर्थात, अद्याप ती कादंबरी मी वाचलेली नाही. वाचल्यास पटकन संदर्भ लागेल...

तात्या.

धोंडोपंत's picture

21 Dec 2007 - 11:46 am | धोंडोपंत

चर्चा फार चांगली चालली आहे. प्राध्यापक साहेब, आपण म्हणता त्या प्रमाणे कोकणीचे उत्तर आणि दक्षिण प्रकार आहेत. उत्तरेकडे मराठी शब्द जास्त आहेत तर दक्षिण कोकणीत कानडी शब्दांचा भरणा अधिक आहे.

तीच पुढे उत्तरेकडे आल्यावर मालवणी होते. रत्नागिरी जिल्ह्यात केलंनीत, सांगितलंनीत ह्याप्रकारे क्रियापदे वापरली जातात.

तज्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com