पन्नाशीत पन्नास किल्ले

Chandrashekhar marathe's picture
Chandrashekhar ... in भटकंती
24 Jun 2018 - 9:19 pm

आयुष्याची पन्नाशी ओलांडली तो पर्यंत मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच जंगलात भ्रमंती केली होती आणि आता खुणावत होती ती आकाशाला आव्हान देणारी सह्याद्रीची शिखरं. स्वराज्याचा जरीपटका ज्यांनी कधी पडू दिला नाही, ज्यांची ओळख पुस्तकांतून फक्त एका ओळीतच होते अशा वीरांची खरी कहाणी जाणून घ्यायची ,त्यांना भेटायची ओढ आता लागली होती. आणि मनात एक योजना आकाराला येत होती. नाव होत “पन्नाशीत पन्नास किल्ले“. एका वर्षात आपण ५० किल्ले सहज करू असे धोपट गणित जमल्याने नवीन हुरूप आला . मग काय , तयारी ला लागलो. ५० किल्ल्यांची तारीखवार यादी करून भिंतीवर टांगली, ट्रेकिंग चे साहित्य जमवू लागलो आणि ठरल्याप्रमाणे सुरवात केली. शनिवारी रात्री प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्या जवळील गाव गाठायचे, पहाटे गावातीलं हॉटेल मध्ये मिसळ-पाव किवा पोहे ढकलून थेट किल्ल्याची वाट धरायची आणि दुपार पर्यंत किल्ला पाहून रविवारी रात्री परत घरी यायचे, असा कार्यक्रम आखू लागलो. काही नियम मी ठरवून घेतले होते ते म्हणजे फक्त डोंगरीकिल्ले करायचे , किल्ल्यावर एकट्याने जायचे नाही आणि नैतिकतेचा कोणताही नियम मोडायचा नाही.
सुधागड किल्ल्या वरील महादरवाजा आणि तटबंदी पाहिल्यावर थक्क झालो आणि तेथील वस्तू बद्दल कुतूहल जागृत झाले. त्या नंतर किल्ले पाहायचा आधी संपूर्ण माहिती पुस्तकातून, GoogleMaps आणि Trekshitiz. com वरून घेऊ लागलो . किल्ल्यावरील ऐतिहासिक वस्तूंची आणि तिथला इतिहासाची माहिती जमवून किल्ला पाहणे म्हणजे ओळखीच्या व्यक्तीला बर्याच वर्षानंतर भेटल्या सारखे वाटू लागले. ग्रामीण भागातही ट्रेकिंग करणाऱ्या मंडळी बाबत आदर आणि कुतूहल असल्याचे आढळले. अनेकांसाठी ते एक रोजगाराचे नवीन साधन झाले आहे. किल्ल्यांची साफसफाई, जुन्या वस्तूंचा जीर्णोद्धार, पायावाटांची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या साफ करणे, नाव फलक लावणे सारख्या अनेक सुधारणा करण्यात सरकारी खाती आणि स्थानिक गड संवर्धन संस्था पुढे आल्यामुळे किल्ला पाहणे अधिक सोपे आणि आनंददायी झाले आहे.
शिवाजी महाराजांनी आपल्या ५० वर्षाच्या आयुष्यात तब्बल ३५० किल्ले जिंकले, बांधले आणि दुरुस्त केले. पट्टा गडावरील झोंबणारा थंड वारा, रतनगडा वरील सोनकीच्या फुलांचे ताटवे, केंजळ गड आणि इंद्राई किल्ल्यावरील कातळ कोरीव पायऱ्या, साल्हेर-मुल्हेर चे दगडात कोरून काढलेल्या पायवाटा , कमळगडा वरील ४० फुटी शाडूची विहीर , हरिहर किल्ल्याच्या उभ्या पायऱ्या, अंकाई-टांकी किल्ल्यावरील कोरीव शिल्प , राजगडावरील अरुंद माचीची रचना , अलंग-कुलंग-मदन च्या चढाईतील थरार हे सर्व किती विलक्षण आहे ह्याचा अनुभव तर प्रत्यक्ष किल्ल्याला भेट दिल्याशिवाय येणे शक्य नाही.
माझे वर्षभरात ५० नाहीतर ६४ किल्ले पाहून झाले पण माझी किल्ले –भ्रमंती अजूनही सुरूच आहे. ट्रेकिंग मुळे माझी लहान-सहान शारीरिक दुखणी कमी होऊन डॉक्टर च्या गाठी-भेटी बंद झाल्या आहेत. रविवारी घरी कोच वर रेलून झोपण्या पेक्षा उंच किल्ल्यावर बसून निसर्गाशी केलेला संवाद अजूनही मला खुणावत असतो आणि नकळतपणे मित्राचे ट्रेकिंग साठी आलेल्या फोनवर मी तारीख पक्की करू लागतो.

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

24 Jun 2018 - 9:36 pm | दुर्गविहारी

उत्तम लिहीलयं. या वयात तुम्ही हा उत्साह दाखवत आहात त्याबद्दल अभिनंदन.
..तुमचे काही विशेष अनुभव, फोटो देता येतात का पहा. जंगलभ्रमंती आणि ट्रेकिंग दोन्हीच्या अनुभवाचे धागे मि.पा.वर येउ देत.
आगामी लेखनासाठी शुभेच्छा.

मलाही तुमच्या सारखं किल्ल्यांवर चढाई करायची खूप इच्छा आहे. पण समविचारी मित्र नाहीत व घर सुटत नाही. कृपया सविस्तर लिहा व छायाचित्रे टाका. धन्यवाद.पुलेशु.

यशोधरा's picture

24 Jun 2018 - 10:06 pm | यशोधरा

अरे वा! दुवि सांगतात तसे अनुभव लिहा, वाचायला आवडेल.

प्रचेतस's picture

25 Jun 2018 - 8:51 am | प्रचेतस

छान लिहित आहात.
एकेक किल्ल्यांविषयीचे आपले अनुभव अवश्य येऊ द्यात.

अरे वा! अनेक शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2018 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

भले, भले ! अश्या आगळ्यावेगळ्या विक्रमाचा चंग बांधून पहिल्याच झटक्यात तो विक्रम तोडल्याबद्दल (माझे वर्षभरात ५० नाहीतर ६४ किल्ले पाहून झाले) हार्दीक अभिनंदन !!!

__/\__

तुमच्या प्रत्येक मोहिमेचे सचित्र वर्णन लिहा... मजा येईल वाचायला व पहायला !

चाणक्य's picture

25 Jun 2018 - 4:49 pm | चाणक्य

अजून सविस्तर लिहा. वाचायला आवडतील तुमचे अनुभव. आणि अभिनंदन पहिल्याच झटक्यात पन्नासच्या एेवजी चाैसष्ठ गड केल्याबद्दल.

Chandrashekhar marathe's picture

25 Jun 2018 - 5:08 pm | Chandrashekhar ...

मी आता पर्यंत अनेक किल्ल्यांची माहिती wikipedia वर अपलोड केली आहे त्यातील काही किल्ले
My contributions to the Wikipedia Created new pages Kankrala,Talagad,Ghosale gad,Avchitgad,Colaba Woods,manikgad,Chandan,Vandan,Tandulwadi fort ,Sajjangad,Jangali Jayagad,Mora fort,Nhavigad,mulher,hadsar,Tankai fort,Ankai Fort,Rasalgad, mahipatgad, suamargad,Revdanda fort, Sagargad, GMRT project,JFM committee,Govalkot,Dronagiri Fort,kavnai fort, Birwadi fort,sankshi fort,Nerul Uran Railway Project,Tringalwadi, Mrugagad chandwad fort, Rajdher, tringalwadi, peb,Shirgaon Fort, Purnagad, Ratnadurg, Anjanvel,Akluj Fort, Avandha Fort,Gambhirgad, Trymbakgad, Pisola fort Bharatgad ,Bhagwantgad,Goa fort,Fatte gad

आता जसे जमेल तसे मि .पा . वर नक्की लिहीन

चांगली आवड आणि लेखनामुळे इतरांना उपयुक्त ठरणार आहे.

पिवळा डांबिस's picture

28 Jun 2018 - 2:46 am | पिवळा डांबिस

सर्वप्रथम तुम्ही तुमचा संकल्प तडीस नेल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
पण वर्षात ६४ गड म्हणजे वर्षभर दर वीकांताला गडमोहीम काढीत होता की काय?
आणि त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे असं दोन-तीन महिने केल्यानंतर घरातून फटके नाही पडले? ;)
दर वीकांताला नियमाने फक्त मासळीबाजार करणारा,
पिवळा डांबिस

चामुंडराय's picture

28 Jun 2018 - 4:24 am | चामुंडराय

बाकी तुमची कमाल आहे !!
एका वर्षात एव्हढे किल्ले ??