वास्तव

गणेश.१०'s picture
गणेश.१० in काथ्याकूट
3 May 2018 - 10:40 pm
गाभा: 

१) एस टी महामंडळाने निवासी सुविधा दिली असतानाही (पुण्यातील राहणीमान परवडणार नाही म्हणून) ६५ किमीवर स्वतःच्या मूळ गावी राहणारा एक वाहक (कंडक्टर). घरातून संध्याकाळी ४:३० ला बाहेर पडला. ट्रॅफिक मुळे कसा बसा रात्री ८:१५ ला ड्युटीवर पोहोचला. घरून आणलेला दोन वेळचा डबा -- रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळची न्याहारी. ३-४ पाण्याच्या बाटल्याही न विसरता भरून घेतलेल्या. रात्री ड्युटीच्या गावी मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी सकाळची फेरी करून घरी पोहोचायला संध्याकाळचे ४:३० वाजणार. घरी गेल्या गेल्या घराच्या पडवीत थाटलेल्या छोट्याशा दुकानात रात्री १० वाजेपर्यंत काम. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून परत धावपळीला सुरुवात.

२) उन्हाच्या झळा सावलीत उभं राहूनही जाणवत होत्या. बार्शीहून करमाळा साधारण ६३ किमी अंतर, पण किमान दोन तासाचा प्रवास. एस टी तुडुंब भरलेली. पाण्याची बाटली चालकाने दरवाजाला बांधलेली, केबिन मध्ये बाटली ठेवण्यायोग्य एकही जागा नाही. इंजिनातून येणाऱ्या झळया कमी व्हाव्या म्हणून अर्धवट शिल्लक असलेल्या इंजिन कव्हरवर कागदी पुठ्याचं ठिगळ लावण्याचा चालकाने केविलवाणा प्रयत्न केलेला. लाही लाही होत असतानाही लाज म्हणून सदरा अंगावर तसाच ठेवलेला.

३) नुकतीच दोन एकर जमीन विकून मिळालेल्या पैशातून शिल्लक जमिनीत विहीर खोदण्यासाठी काम चाललेलं. खोदकाम यंत्राचा ३००० रुपये प्रतितास असा व्यवहार ठरलेला. रणरणत्या उन्हात गेल्या दोन दिवस संपूर्ण कुटुंब अगदी लहान मुलांसकट डोळ्यात तेल घालून पाण्याची वाट पाहत बसलेलं. डोळे आणि विहीर दोन्हीतलं पाणी मात्र आटलेलं.

प्रतिक्रिया

आयुष्य संघर्षाचे आहे हे खरे...!

१) बांधलेलंच जुनं राहातं घर - शिवाय शेत असल्यास त्यावरही लक्ष देता येईल म्हणून तिथूनच तो कर्मचारी येतो. थोडी वर्षं जवळच्या फेय्राही मिळाल्या असतील.
२)एसटीचे डिजाइन बदलायची गरज आहे. दुसय्रा राज्यात पाहा.
३)महामंडळाचा भोंगळ कारभार!

तिथे महामंडळ कुठलं काका?

एसटी संबंधी काही माहितीचे सत्यापन हवंय

१. एसटी मध्ये पेन्शन नसते हे बरोबर आहे का?

२. एसटीचे पगार इतर राज्यसरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार होतात का स्वतंत्र पगार व्यवस्था आहे?

३. मुक्काम असलेल्या गावी रेल्वेच्या लोको पायलट्स करता असतात तश्या (तितक्या उत्तम नाही पण किमान निवांत झोप येईल अशा) रनिंग रूम्स बांधणे शक्य होईल का? (हा काळजी युक्त प्रश्न)

क्र. ३ मध्ये विहिरीचा उल्लेख आहे.

१)
घरभाडे, मुलांना शाळेत जाण्या येण्याची व्यवस्था, आरोग्याचा जास्तीचा खर्च (गावातल्या तुलनेने), अजूनही मोठी यादी तयार करता येईल.
सरकारी नोकरी, नियमित पगार, मध्यमवर्गीय जीवन हे सर्व मागच्या पिढीबरोबर कधीच संपले.

२) आणि ३)
एस टी फक्त उदाहरण. माणसाचं, समाजाचं डिझाइनच भरकटलंय. बेरोजगार तर दूर पण नोकरीतही माणूस म्हणून जगता येतय?