द याकूबियन बिल्डिंगच्या निमित्ताने...

विसुनाना's picture
विसुनाना in काथ्याकूट
24 Oct 2008 - 3:57 pm
गाभा: 

सदर चर्चा येथे टाकण्यापूर्वी मिपा व्यवस्थापनाची रीतसर परवानगी घेतली आहे..

परवाच एन्डीटीव्ही ल्युमिएर चॅनेलवर "द याकूबियन बिल्डिंग" (Arabic: عمارة يعقوبيان) हा चित्रपट दाखवला.

इजिप्तमधली ढासळती नैतिक परिस्थिती दाखवणारी ही 'अला एल्-अस्वानी' यांची कथा कैरोतील एका बिल्डिंगमध्ये घडते. कथेतील विविध पात्रे समाजातील कृष्णकृत्यांची (राजकीय भ्रष्टाचार, लाचलुचपत, धार्मिक कट्टरता, स्वार्थ, समलैंगिक संबंध इ.इ.) प्रतिनिधीच आहेत.
सदर चित्रपट पाहताना हेच वातावरण, हीच सामाजिक परिस्थिती भारतालाही तंतोतंत लागू पडते असे वाटत होते. काही वाचकांनी हा चित्रपट पाहिला असेल किंवा हार्पर-कॉलिन्सने प्रसिद्ध केलेली याच नावाची मूळ कादंबरीही वाचली असेल. पण ज्यांनी यातले काहीच केलेले नाही त्यांनी हा चित्रपट (पुन्हा प्रदर्शित झाल्यास) जरूर पहावा अथवा कादंबरी वाचावी.

पण चर्चेचा मूळ मुद्दा चित्रपटाचे रसग्रहण हा नाही.
विचार करण्याचे दोन मुद्दे आहेत -

१. सदर कादंबरीच्या लेखकाने 'समलैगिक संबंध' या विषयाबद्दल एक दुटप्पी भूमिका घेतली आहे असे वाटते. एकीकडे एका मुलाखतीत तो म्हणतो की त्याला समलिंगी व्यक्ती एक माणूस म्हणून कशी असते हे दाखवायचे होते. समलैगिक संबंधांवर टीका करायची नव्हती.
पण मग दुसरीकडे राजकीय भ्रष्टाचार, लाचलुचपत, धार्मिक कट्टरता, स्वार्थ या वाईट गोष्टींच्या पंक्तीला त्याने हे संबंध का बसवले?
या चित्रपटातील समलिंगी व्यक्ती (पुरुष पात्र - हतीम रशीद) आपला प्रियकर (हा प्रियकर मात्र एक गरीब सरळ माणूस असतो) हेरते, त्याला खायला-प्यायला ,कपडेलत्ते देते, त्याच्या उदरनिर्वाहाची सोय करते, त्याचे मन वळवते असे दाखवले आहे. म्हणजे एका अर्थाने तोही भ्रष्ट व्यवहार आहे असे सूचित केलेले आहे.

काही प्रगत देशांची उदाहरणे सोडल्यास जागतिक समाज अजूनही समलैगिक संबंधांकडे कृष्णकृत्य म्हणून पाहतो हे नाकारावे अशी परिस्थिती दिसते आहे का? मुळात ते कृष्णकृत्य आहे असे वाटते काय?

२. समलैगिक पात्र हतीम रशीद आपल्या समलैगिकतेचे समर्थन करताना म्हणतो - "पुरुष-पुरुष संबंध जगातील पवित्र संबंध समजले पाहिजेत. कारण त्यातून अनौरस संतती निर्माण होऊ शकत नाही. देवानेच पुरुषाला तसे बनवले आहे. उलट एखाद्या स्त्रीला फसवून तिचा गैरफायदा घेणे आणि अनौरस संतती निर्माण करणे अथवा गर्भपाताला भाग पाडणे हे जास्त घृणास्पद आणि पापी कृत्य आहे."
समलैगिकतेचे असेच समर्थन स्त्री-स्त्री संबंध या बाजूनेही होऊ शकते.

या दृष्टीने समलैगिकता पवित्र आहे असे वाटते का?

भारतीय दंडविधानात समलैगिक संबंधांना कलम ३७७ अन्वये कमीतकमी १० वर्षे कारावासाची कठोर शिक्षा आहे. अनेक धर्मांत समलैगिकतेवर कडक ताशेरे आहेत, नरकयातना आहेत. समलैगिकांकडे घृणास्पद म्हणून पाहिले जाते. पण स्त्रीची फसवणूक करणार्‍याला सैल सोडलेले आहे. अनौरस बाप मात्र उजळ माथ्याने वावरतात. पाय घसरलेल्या स्त्रिया आपली सुटका करून घेतात आणि नंतर उजळ माथ्याने जगतात.

समलैगिकता ही विषमलैगिकतेपेक्षा नीच आहे असे मानल्यास -
लैगिक संबंधातून संतती निर्माण होत असेल तर त्या अपत्याची जबाबदारी टाळणे किंवा भ्रृणहत्या करणे हे समलैगिकतेपेक्षाही नीच पातळीवरचे आहे असे वाटते का?

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

24 Oct 2008 - 4:22 pm | श्रावण मोडक

चित्रपट पाहिलेला नाही, कादंबरीही वाचलेली नाही. त्यामुळे ती संदर्भचौकट न घेताच मूळ प्रश्नांवरील माझी मते -
काही प्रगत देशांची उदाहरणे सोडल्यास जागतिक समाज अजूनही समलैगिक संबंधांकडे कृष्णकृत्य म्हणून पाहतो हे नाकारावे अशी परिस्थिती दिसते आहे का?
तशी परिस्थिती खचितच दिसत नाही. या संबंधांकडे कृष्णकृत्य म्हणून पाहणाऱ्या समाज-समुदायांची संख्या खचितच मोठी आहे.
मुळात ते कृष्णकृत्य आहे असे वाटते काय?
मुळात असे संबंध हा वैयक्तिक निवडीचा भाग आहे. त्यामुळे त्याचे सार्वजनिकीकरण होऊ नये. अर्थात, वैयक्तिक निवड हाच येथील महत्त्वाचा क्रियावान शब्द आहे. त्यापलीकडे त्या संबंधांचा पुरस्कार, समर्थन करताना सार्वजनिकीकरण होऊन समाजाच्या संचालनात गडबड होत असेल तर मात्र त्यांचा इतर कोणत्याही कृष्णकृत्यासारखाच विचार करावा लागेल. तेथे नैतीक-अनैतीक ही संदर्भचौकटही इतर बाबींप्रमाणेच लावली जावी.
या दृष्टीने समलैगिकता पवित्र आहे असे वाटते का?
कोणत्या अर्थाने? मी वर म्हटल्याप्रमाणे हा वैयक्तिक निवडीचा भाग आहे. त्यामुळे पावित्र्याची कल्पनाही वैयक्तिक स्तरावरूनच यावी. कारण ती व्यक्तिसापेक्षच असते.
समलैगिकता ही विषमलैगिकतेपेक्षा नीच आहे असे मानल्यास -
लैगिक संबंधातून संतती निर्माण होत असेल तर त्या अपत्याची जबाबदारी टाळणे किंवा भ्रृणहत्या करणे हे समलैगिकतेपेक्षाही नीच पातळीवरचे आहे असे वाटते का?
जबाबदारी टाळणे समलैंगिकतेपेक्षा नीचच. भ्रूणहत्या या मुद्यावर मात्र आणखी काही गोष्टी संदर्भचौकट म्हणून येतात. जसे भ्रूण हा खरोखर जीव असतोच का वगैरे. शिवाय त्यात पुन्हा स्त्रीच्या वैयक्तिक निवडीचा एक भाग असतो. अशा स्त्रीसंदर्भात जबाबदारीचे भान नसणारे स्वैर किंवा अत्याचाराच्या स्वरूपाचे लैंगीक संबंध आणि त्यातून भ्रूण हत्या यासारख्या गोष्टी होत असतील तर मते बदलू शकतात.
या गोष्टींचे सार्वजनिकीकरण शक्य नाही. बहुतांशी हे निर्णय व्यक्तीसापेक्षच असतात, असू शकतात, असावेत.
विश्वाच्या उत्त्पत्ती आणि नियमनासंबंधात युनिफाईड फील्ड थेअरी शोधण्याचा प्रयत्न चिरंतन काळापासून सुरू आहे, तसाच हाही एक शोध असतो. पण येथेही त्याची उत्तरे काळाच्या कोणत्याही एका बिंदूवर ठोस स्वरूपात मिळतील असे नाही. कारण काळाच्या त्या-त्या स्थितीवर प्रत्येक माणूस सारख्याच स्थितीवर असतो असे नाही. त्यामुळे मूल्यसंकल्पनांमध्ये बदल असतो, मूल्यांच्या उपयोजनाच्या क्षमतेत बदल असतो आणि त्यानुसार होणाऱ्या निष्कर्षांमध्येही बदल असतोच.
धनंजय यांच्या लेखावर झालेल्या चर्चेसारखी चर्चा येथे व्हावी.

विसुनाना's picture

24 Oct 2008 - 5:09 pm | विसुनाना

मुळात असे संबंध हा वैयक्तिक निवडीचा भाग आहे.

निश्चितच! पण ज्यांनी डोळसपणे निवड केली आहे त्यांना समाजाने डोळसपणे मान्यता द्यायला हवी.

त्या संबंधांचा पुरस्कार, समर्थन

पुरस्कार अथवा समर्थन नव्हे पण फक्त मान्यता द्यायला काय हरकत आहे?

सार्वजनिकीकरण होऊन समाजाच्या संचालनात गडबड होत असेल

समलैगिक संबंधांमुळे समाजाच्या संचालनात गडबड होईल अशी शक्यता किती आहे? समलैगिकतेकडे नैसर्गिक मानसिक कल असणार्‍या व्यक्ती ५% आहेत असे समजले तर (विदा माझ्याकडे नाही) त्यामुळे 'पुनरुत्पादन' या समाजसंस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. असाध्य रोगांबाबत म्हणाल तर ते असुरक्षित विषमलैगिक संबंधांतूनही फोफावू शकतात. याव्यतिरिक्त समाज संचालनात गडबड करणारे काय आहे?

आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल असे झाले तर... या विचाराने मी घाबरत होतो. तो विषय मनातही काढत नव्हतो.
धनंजयांच्या लेखानंतर या विषयावर उघड विचार करायचे बळ आले. हे मुद्दाम नमूद करतो.

श्रावण मोडक's picture

24 Oct 2008 - 5:13 pm | श्रावण मोडक

निश्चितच! पण ज्यांनी डोळसपणे निवड केली आहे त्यांना समाजाने डोळसपणे मान्यता द्यायला हवी.
पूर्ण सहमत. मला हेच म्हणायचे आहे.
पुरस्कार अथवा समर्थन नव्हे पण फक्त मान्यता द्यायला काय हरकत आहे?
वरीलप्रमाणेच.
समलैगिक संबंधांमुळे समाजाच्या संचालनात गडबड होईल अशी शक्यता किती आहे?
काही आहेच, असे माझे म्हणणे नाही. कारण ही बाब पुन्हा समाजाच्या त्या-त्या वेळेच्या संचालनविषयक नियमांनुसार पुढे येणार आहे.
समलैगिकतेकडे नैसर्गिक मानसिक कल असणार्‍या व्यक्ती ५% आहेत असे समजले तर (विदा माझ्याकडे नाही) त्यामुळे 'पुनरुत्पादन' या समाजसंस्थेवर फारसा परिणाम होणार नाही.
हो. खरे आहे ते.
असाध्य रोगांबाबत म्हणाल तर ते असुरक्षित विषमलैगिक संबंधांतूनही फोफावू शकतात. याव्यतिरिक्त समाज संचालनात गडबड करणारे काय आहे?
अगदी. शंभर टक्के मान्य.

श्रावण मोडक's picture

24 Oct 2008 - 4:32 pm | श्रावण मोडक

प्रतिसाद संपादित न करता मुद्दाम स्पष्टीकरण स्वतंत्र देतो आहे (कारण ते नंतर लक्षात आले) -
"वैयक्तिक निवड" हा शब्दप्रयोग व्यक्तिमत्त्वाच्या आविष्काराच्या, व्यक्तिमत्त्वाच्या नैसर्गिक कलाच्या संदर्भातून घ्यावा. निव्वळ निवड असा नव्हे.

धनंजय's picture

29 Oct 2008 - 3:32 am | धनंजय

अरबी पार्श्वभूमीतील या पुस्तकाबद्दल/चित्रपटाबद्दल ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

मी हे पुस्तक वाचले नाही, पण योगायोगाने काल-परवाच नजीब मह़फूज़ यांची "ज़का़क़ अल्मिदक" ही कादंबरी वाचली (इंग्रजी भाषांतर वाचले - मिदक ऍली = मिदक बोळ). प्रकाशनवर्ष - १९४७.

विकीपेडियावरच्या याकूबियन बिल्डिंगचे हे स्फूर्तिस्थान असू शकते, असे वाटते. (पण याकूबियन हल्लीहल्लीची बिल्डिंग आहे, मिदाक बोळ १३०० काळापासूनचा आहे, अर्थातच वक्ती-वल्लींमध्ये, समस्यांमध्ये, फरक असणार.) येथेसुद्धा बोळातल्या सगळ्या पात्रांच्या आयुष्याची झलक दाखवली आहे. दरिद्री किंवा अति-कनिष्ठ-मध्यम-वर्गीय लोकच बहुतेक. गरिबीने पोखरले जातात, तसे किडतातही, त्यांची व्यसनेही असतात.

त्यातील एक म्हातारा गंजेकस असतो, आणि शिवाय तो तरुण-युवकांशी संभोग करतो. त्याची कजाग बायको आणि तो - कोण एकमेकांना अधिक त्रास देतात हा निर्णय करणे कठिण. अशा प्रकारे, जवळजवळ सर्व पात्रांचे दुर्गुण आहेत. पूर्णपणे चांगला संततुल्य एक गृहस्थ आहे - पण "सद्वर्तन करा" असे उपदेश देताना, कुराणातीन सुभाषितांचे दाखले देताना माणसाच्या स्खलनशीलतेबद्दल त्याला सहानुभूती नाही, त्याला "मनुष्य" कळलेलाच नाही, असे कधीकधी वाटते. वगैरे, वगैरे. पण खरे म्हणजे, जितके नावडण्यासारखे पात्रवर्णन आहे, तितकेच महफूज यांना त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे या सर्व लोकांचे बरे व्हावे, असे वाचक म्हणून मला मनोमन वाटत होते. मला यात लेखकाचे कसब दिसले.

समलिंगितेबद्दल लिहायचे म्हणजे लेखकाला/चित्रपटकाराला जरा प्रश्नच असतो. याबाबत "The Celluloid Closet" (1995)" हा इंग्रजी माहितीपट मी मागे बघितला होता. यात इंग्रजी चित्रपटांच्या माध्यमात अनेक कालखंड होते. (१) समलिंगितेचा अभावच असतो, (२) तिचे थट्टेखोर चित्रण असते - (तमाशातले नाचे) (३) तिचे मनोविकृत क्रूर लोकांमध्ये चित्रण असते (सायलेन्स ऑफ द लँब्स) (४अ) मुद्दाम पोलिटिकली करेक्ट म्हणून काही सद्गुणी उपपात्रे चित्रपटांत टाकली जातात (४आ) गुणदोष असलेले सामान्य लोक दाखवले जातात.

मला वाटते वेगवेगळ्या देशांत, इतकेच काय एक-एखाद्या लेखकाच्या लेखनकाळात हे टप्पे आपल्याला दिसतात. मेघना पेठे यांच्या वेगवेगळ्या कथांमध्ये टप्पा (२) ते टप्पा (४) पार केलेले बघितलेले आहेत.

आता याकूबियन बिल्डिंगमधील स्खलनशील पात्रे माणुसकीने चितारली आहेत का? या हतीमचा प्रियकर साधाभोळा दाखवला आहे, तो समलिंगितेबाबत "फसवलेला" दाखवला आहे, की फक्त प्रेमाबाबत-पैशांबाबत? कारण त्याच बिल्डिंगमधली बुसैना तशी चांगली असते, पण पैशासाठी तिला वरिष्ठाबरोबर झोपावे लागते, असा काही कथाभाग आहे (इति विकिपेडिया). इथेही लैंगिक संबंध हे कृष्णकृत्य नसून, मानसिक बळजबरी ही लाजिरवाणी आहे... त्यामुळे लेखकाने मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे समलैंगिकतेचा माणुसकीने उल्लेख केला आहे, की तो मुलाखतीत खोटे बोलतो आहे, हे कळण्यासाठी पुस्तक वाचणे आवश्यक आहे.

१. काही प्रगत देशांची उदाहरणे सोडल्यास जागतिक समाज अजूनही समलैगिक संबंधांकडे कृष्णकृत्य म्हणून पाहतो हे नाकारावे अशी परिस्थिती दिसते आहे का? मुळात ते कृष्णकृत्य आहे असे वाटते काय?

प्रगत आणि अति-अप्रगत समाज दोन्हीकडे कृष्णकृत्य म्हणून बघत नाहीत. मुळात ते कृष्णकृत्य आहे असे वाटत नाही.

२. या दृष्टीने समलैगिकता पवित्र आहे असे वाटते का?

नाही. Andre Gide हा फ्रेंच लेखक Corydon या त्याच्या पुस्तकात असाच काही वाद घालतो. की समलैंगिकता ही अधिक शुद्ध आणि नैसर्गिक आहे, पण समाजाला/प्राण्यांना संततीसाठी विषमलिंगी संबंधांना बळेच स्वीकारावे लागते. हे पुस्तक चांगल्या तर्‍हेने लिहिलेले आहे, पण त्यातील अनेक वाद पटण्यासारखे नाहीत. मला वाटते "पवित्र"ची व्याख्या "लोक पूजन करतात ती वस्तू" अशी काही आहे. पण जगातल्या बहुतेक सामान्य वस्तू "पूजना"साठी नसतात. त्या "पवित्र"ही नसतात आणि "अपवित्र"ही नसतात. त्यामुळे मला पुस्तकातील पात्राचा, आणि आंद्रे जीद यांचा हा वाद जितका भंपक वाटतो, तितकाच कोणी "ही गोष्ट अपवित्र आहे" असा वाद घातला, तर भंपक वाटतो.

पण स्त्रीची फसवणूक करणार्‍याला सैल सोडलेले आहे. अनौरस बाप मात्र उजळ माथ्याने वावरतात.

भारतात समलिंगी रात्री संबंध ठेवणारे पुरुष दिवसा उजळ माथ्याने वावरतात! अनेक हिजडे शरीरविक्रय करतात, त्यांच्यासाठी गिर्‍हाइके उजळ माथ्याने वावरणारेच असतात. खेड्यांकडे मी असे बघितले आहे, की समलिंगी पुरुष लग्ने करतात, पण पुरुषांशी तसे-उघडच संबंध ठेवतात. (पुणे जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या खेड्यांतील उदाहरणे माझ्या माहितीतली आहेत.) यांच्याबद्दल लोक घृणेने बोलत नव्हते, पण चेष्टेने बोलत.

दंडसंहितेतले कलम ३७७

हा ऐतिहासिक दृष्ट्या मोठा गमतीदार (पण तथ्याच्या दृष्टीने त्रासदायक!) प्रकार आहे. लॉर्ड मॅकॉलेने हे कलम लिहिले, आणि विधिमंडळाला "याबद्दल चर्चा करू नये" असा निर्देश केला. त्याच्या आधी हिंदुस्तानातील राज्यांत असा कुठला कायदा नव्हता. हे कलम रद्द करावे, असा मुद्दा हल्लीच मागच्या दशकात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हाताळला होता. तेव्हा सॉलिसिटर-जनरल यांनी न्यायालयाला सांगितले, की स्वतंत्र भारतात या कलमाखाली कधी कोणा प्रौढ जोडीला सजा झालीच नाही, तर हे कलम रद्द करून-न-करून काय फरक पडणार आहे. (तेवढ्यासाठी लोकसभेचा वेळ का वाया घालवा, या अर्थी.) हे कलम कोणालाही सजा देण्यासाठी वापरले गेले नसले, तरीही पोलिसांकडून लोकांना अटक करायला, ब्लॅकमेल करायला पुष्कळ वापरले जाते. हे कलम लॉर्ड मॅकॉले यांच्याकडून ख्रिस्ती धर्मविचारांतून लिहिले गेले. त्यांच्या नंतर अभावितपणे काही पोलीस अधिकार्‍यांच्या वेतनवृद्धीसाठी खास बनवले गेले असेच म्हणावे. सॉलिसिटर जनरलसाहेबांचा आचरट वाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला, हे खरोखर आश्चर्यकारक आहे. ख्रिस्ती धर्मशास्त्रातून आलेल्या कलम ३७७ला स्वतंत्र भारताच्या दंडसंहितेत काहीच स्थान असू नये.

(सध्या ३७७ चा एक सदुपयोग आहे, तोसुद्धा कायद्याचा गाढवपणा म्हणून. सध्याचा बलात्काराचा कायदा फक्त पुरुष गुन्हेगाराने स्त्रीवर केलेल्या बलात्काराची व्याख्या करतो. प्रौढ पुरुषाने मुलग्यावर केलेल्या बलात्काराला "बलात्कार" म्हणतच नाहीत. तर अशा गुन्हेगाराला ३७७खाली शिक्षा करता येते. शहाणपण असे की ३७७ रद्द करावे, आणि त्याच वेळेला कोणीही कोणावरही बलात्कार केला, त्याला "बलात्कार"+"दंडपात्र" असा कायदा स्पष्ट करावा.)

असो. विसुनानांचा शेवटचा परिच्छेद विचार करण्यासारखा आहे. कायदा कधीकधी मूर्ख असतो, पण लोकशाहीत असा सुज्ञ विचार करून तो बदलायची संधीसुद्धा आपल्यापाशी असते.