भारतीय पालक आणि मुले -कमवा आणि शिका

जेडी's picture
जेडी in काथ्याकूट
17 Jan 2018 - 7:06 pm
गाभा: 

कमवा आणि शिका हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे ब्रीदवाक्य होते . पण भारतात असे करणारी मुले किती ? किंवा कोणत्या शैक्षणिक संस्था अशी संधी देतात ? मला वाटते असे काम करून जगणारी मुले नगण्यच असावीत. त्यामुळे घरात सुबत्ता असेल तरच मुले चांगले शिक्षण घेतात . पूर्वी मूल्यशिक्षणातून काही कमावून नॅक सारख्या संस्थेला मदत वैगेरे करायचे फॉर्म असायचे पण तेही आईबाप मुलांना एकरकमी पैसे देऊन धडपडण्यासाठी नाकारतातच.

तिकडे अमेरिकेत मुले सोळा सतरा वर्षापासूनच स्वतः कमवायला लागतात. मग ती कोठेही काम करतात अगदी वेटरचे वैगेरेही करतात असे ऐकले आहे . मग भारतीय वंशाच्या तिकडे मुले जन्माला आलेल्या पण आई बापाची जडण घडण इकडेच झालेल्या मुलांना ह्याचा फार त्रास होतो हे अपर्णा वेलणकर ह्यांच्या "फॉर हिअर ऑर टू गो "ह्या पुस्तकात वाचलेले आहेच. ते असोच, पण निदान भारतात जन्मलेल्या आणि इथेच वाढलेल्या मुलांना आपण भारतीय सर्व काही हातात देत असतो. निदान त्यांच्या पीजी चे शिक्षण होईपर्यंत . पण मुले मात्र अगदी वयाच्या पंचविशी पर्यंत शाळेच्या फी पासून ते पॉकेटमनी ह्यासाठी आई बापांवरच अवलंबून असतात . म्हणूनच भारतीय पालक आयुष्याची जवळपास अर्धी अधिक पुंजी मुलांच्या शिक्षणावर खर्च करून म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे बघतात . त्याचेच परिणाम म्हणुन मुलांवर आपला सर्वोतोपरी अधिकार गाजवण्यासाठी सरसावलेले असतात . मग त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक आवडीनिवडी पासून ते त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यावर अधिकार गाजवतात .

असो मुद्द्याकडे वळूया . तर असे सोळा सतरा वर्षांपासून आपआपले काम करून पोट भरायचे किंवा फीसाठी सुट्ट्या मध्ये काम करून हातभार लावणे अशी सवय लावायला काय हरकत आहे ? त्यासाठी किती सुरक्षितता किंवा धोके आहेत ह्यावर चर्चा व्हावी असे वाटतंय . मुलांचे एकवेळ ठीक पण मुलींसाठी किती सुरक्षित आहे ? किंवा असा प्रयोग इथल्या कुणी मिपाकाराने(इथल्या किंवा बाहेरच्या ) केलाय का?

तळटीप:तुमच्या मुलगा किंवा मुलगीने सेक्स वर्कर म्हणून काम केले तर चालेल का हे इथे अपेक्षित नाही .

प्रतिक्रिया

सुखीमाणूस's picture

17 Jan 2018 - 7:51 pm | सुखीमाणूस

बारावी नंतरच्या शिक्षणासाठी पाल्याच्या नावाने कर्ज घ्यावे व ते फेडण्याची जबाबदारी पाल्यावर टाकावी.

प्रतिसादासाठी धन्यवाद.
कर्ज घेऊन शिकणे ठीकच पण कमवून शिकण्यावर चर्चा अपेक्षित आहे

जेडी,

मुंबईत व आसपास कमावण्यासाठी कुठं जावं हा प्रश्न आहे. त्यासाठी रेल्वेने वा बसने जाणे हा वेळ व पैशाचा शुद्ध अपव्यय आहे.

अमेरिकेसारखं शिक्षण फावल्या वेळांत उरकता येत नाही. विशेषत: अभियांत्रिकीचं शिक्षण चांगलंच वेळखाऊ असतं. अशा परिस्थितीत अतिरिक्त नोकरी करण्यासाठी वेळ व उर्जा कुठून आणायची हा प्रश्न आहे. माझ्या विद्यार्थीदशेत ठाण्यात स्थानिक काम किरकोळ असायची. त्यांतून फारसा पैसा सुटंत नसे. पण स्थापत्यकलेची मुलं अनुभव मिळावा म्हणून वास्तुविशारदाकडे सुटीतली कामं करायची. पण कॉलेजे सुरू झाल्यावर कोणीही हे पुढे चालू ठेवंत नसे.

नाही म्हणायला भांडवलबाजारात काही मुलांच्या गुंतवणुकी होत्या. मला वाटतं आजच्या युगात तेच बरं पडावं. कारण की नोकरी करून कमवा व शिका या योजनेसाठी स्वस्ताई असणं अत्यावश्यक आहे. अन्यथा वेळ, पैसा व श्रम यांचं गणित व्यस्त होऊन बसतं.

आ.न.,
-गा.पै.

आनन्दा's picture

18 Jan 2018 - 7:58 am | आनन्दा

आहा

मला जेडीचा लेख ही पटतोय आणि तुमचे मत ही.. हे खूपच कठीण आहे विशेषतः भारतासारख्या देताहेत जिथे श्रमाचे मोल जवळ जवळ शून्य आहे तिथे कमवा आणि शिका हे केवळ ज्याला खरेच अतीव गरज आहे त्यालाच शक्य आहे..

मी स्वतः कर्ज काढून शिकलो.

बाकी सुट्टीत जॉब करण्याबद्दल मात्र सहमत.. त्यातही इंडस्ट्रीयल ट्रेनिंग आडवे येतेच, पण तरीही..
आम्ही फावल्या वेळात घराच्या आंब्याच्या बागेत काम करायचो, त्यामुळे बाहेर नोकरी करायची गरज पडली नाही, पण माझ्यामते प्रत्येकाने विद्यार्थी दशेत एकदा तरी CRM वाला जॉब केला पाहिजे, मग ते POS असुदे, किंवा मार्केटिंग..

प्रतिसादासाठी धन्यवाद . भलेही शेअर मार्केट मध्ये पण स्वतःसाठी थोडा बहुत पॉकेटमनी गोळा करायला , किंवा एखाद्या दुकानात सेल्समन वैगेरे जॉब करायला हरकत नसायला हवी कारण मिळणाऱ्या पैशापेक्षा तुम्हाला चार लोकात बोलण्याचा अनुभव मिळतो . आत्मविश्वास येतो . स्वतःच्या पैशाने खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत आणि आठवणही खूप मोलाची ठरते . किंवा स्वतः शिक्षण घेत असलेल्या क्षेत्रात काम करायला मिळाले तर अजूनच चांगले . कधी वेळ आली तर भुके मारणार नाही ...हे हे मी नक्कीच करू शकतो, केलय...हे आंतरिक समाधानच खूप महत्वाचे असेल . शिवाय इतके कमी मिळवायला एवढे कष्ट पडतात तर आई वडिलांना आपल्या शिक्षणासाठी काय कष्ट घ्यावे लागले असतील याची जाणीवही होते

गणेश.१०'s picture

18 Jan 2018 - 12:48 am | गणेश.१०

पाल्यांना लवकरात लवकर पालकांची जबाबदारी स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो किंवा पालकांनाही आपल्या पाल्याने मिळालेल्या वेळेचा जास्तीत जास्त वापर करून लवकर आणि चांगले/कमावते होणे अपेक्षित असते. इथे कमावते म्हणजे स्वतःपुरतं नाही तर पूर्ण कुटुंबाकरता.
त्यासाठी खालील प्रमुख कारणे:
-आर्थिक कारण म्हणजे आपल्याकडील गरिबी (भारतात साधारण २०% लोक मध्यम वर्गात मोडतात आणि ५४% लोक आंतरराष्ट्रीय गरिबीच्या रेषेखाली)
-सामाजिक कारण म्हणजे कुटुंब हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे.
____________________

"त्याचेच परिणाम म्हणुन मुलांवर आपला सर्वोतोपरी अधिकार गाजवण्यासाठी सरसावलेले असतात . मग त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक आवडीनिवडी पासून ते त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यावर अधिकार गाजवतात"
----> आपल्याला भारतीय दृष्टिकोन एवढा का परका वाटतो?
----> आपण असं म्हणू शकत नाही का की पालक आपल्या पाल्याचे आयुष्यभर फक्त मार्गदर्शक नसतात तर साथीदारही असतात?
----> माझा नवरा-माझी बायको-आम्ही दोघे हा संकुचित विचार वाटत नाही का? मान्य आहे की दोघेही एकमेकांना आवडणारे हवेत पण त्याचवेळी दोघेही
----> आपापल्या कुटुंबाला गृहीत धरतात का? मला वाटत नाही की कोणतेही सूज्ञ पालक आपल्या पाल्याच्या प्रेमाचा अस्वीकार करतील (काही टोकाची
----> उदाहरणे अपवाद म्हणून सोडली तर)
____________________

शेवटी माणसाने त्याची प्रगती फक्त करिअर, पैसा आणि स्वातंत्र्यामध्ये मोजण्यापेक्षा आनंदामध्ये मोजायला हवी.
आणि तो आनंद कुटुंबातच सामावला आहे.

जेडी's picture

18 Jan 2018 - 9:59 pm | जेडी

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----> आपल्याला भारतीय दृष्टिकोन एवढा का परका वाटतो?
----> आपण असं म्हणू शकत नाही का की पालक आपल्या पाल्याचे आयुष्यभर फक्त मार्गदर्शक नसतात तर साथीदारही असतात?
----> माझा नवरा-माझी बायको-आम्ही दोघे हा संकुचित विचार वाटत नाही का? मान्य आहे की दोघेही एकमेकांना आवडणारे हवेत पण त्याचवेळी दोघेही
----> आपापल्या कुटुंबाला गृहीत धरतात का? मला वाटत नाही की कोणतेही सूज्ञ पालक आपल्या पाल्याच्या प्रेमाचा अस्वीकार करतील (काही टोकाची
----> उदाहरणे अपवाद म्हणून सोडली तर)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील वाक्यांचा आणि मी मांडलेल्या मुद्द्यांचा काय संबध आहे?

तुम्ही विषय चुकीच्या पद्धतीने घेतलाय . दिवसेंदिवस शैक्षणिक शुल्क वाढत चालले आहे . अर्थात दोघांनी जॉब केल्याशिवाय ते भागवणे अशक्य झालय .पालक स्वतःच्या भवितव्याची काहीही काळजी न करता हे सर्व पेलत आहेत . आपली सर्व पुंजी त्यावर खर्च करत आहेत . कष्ट करून शिकणे ह्यात भारतीय दृश्ष्टिकोन नक्कीच कमी पडत आहे असे मला तरी वाटतंय

अर्धवटराव's picture

18 Jan 2018 - 5:46 am | अर्धवटराव

पाल्याने आपले शिक्षण स्वखर्चाने उरकणे सद्यःस्थितीत तरी फार आदर्श घटना आहे. वरील प्रतिसादात सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे सध्या तरी तशा संभावना डेव्हलप झालेल्या नाहित. भारतासारख्या देशात पोट भरण्याची निकड असलेल्यांच्या शर्यतीत विद्याभ्यासाची निकड असलेल्यांना उतवरणं काहिसं अन्यायकारक सुद्धा वाटेल कोणाला. पाल्याने अगदी आपला खर्च उचलला नाहि तरी त्याला/तिला कामाच्या मोबदल्यातल्या पैशाचे महत्व लवकरात लवकर कळणे अत्यंत जरुरी असतं. पाल्याने पालकांचा पैसा गृहीत धरु नये व पैशाचा बाऊ देखील करु नये हे बघायलाच हवं. आपण घेत असलेल्या शिक्षणाचा पैसा कमवायला कसा आणि कधि उपयोग होईल याची वेळीच कल्पना येणं सुद्धा महत्वाचं असतं.

पाल्याने/विद्यार्थ्याने शिक्षणाव्यतिरीक्त इतर काहि काम करुन पैसा कमवण्याऐवजी आहे त्या शिक्षणव्यवस्थेतच मूल्यवर्धन करण्याची पद्धत रुजवणं जास्त गरजेचं आहे असं वाटतं. जसं, उच्चमाध्यमीक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थांनी प्राथमीक शिक्षणाच्या जबाबदारीत आपला हातभार लावावा. त्यातुन सरकारचे, शाळेचे जे पैसे वाचतील ते कुठल्या तरी रुपाने विद्यार्थ्यांना मिळण्याची व्यवस्था निर्माण व्हावी. पालकांनी घरातल्या बजेटींगची जबाबदारी पाल्याला द्यावी व त्याने बचत केलेला पैसा त्यालाच बक्षीस म्हणुन द्यावा. थोडक्यात काय, तर शिक्षणाचा भार पाल्यावर टाकण्याऐवजी अगदी सुरुवातीपासुनच जर पाल्याला अर्थकारणात अ‍ॅक्टीव भाग घेता आला तर श्रम आणि पैशाचं मूल्य त्याला लवकर कळेल व त्याच्यात न्युनगंड निर्माण होणार नाहि.

आनन्दा's picture

18 Jan 2018 - 8:00 am | आनन्दा

संपूर्ण सहमत

पिशी अबोली's picture

18 Jan 2018 - 10:58 am | पिशी अबोली

बीए पर्यंत काही केलं नाही, पण एमएला मात्र एका प्रोजेक्टवर काम केलं. आई-बाबांना ते विशेष पटलं नव्हतं, पण मी केलं, आणि त्याचा मोबदला भांडून भांडून मिळवला. पहिल्या हातात आलेल्या बऱ्याच महिन्यांच्या एकत्र रकमेतून माझा लॅपटॉप घेतला, इत्यादी. तरीही ते जे काही पैसे होते, ते सेविंग्जमध्ये जावेत, अशीच आईबाबांची भूमिका होती. ते मिळवायला महिनोन्महिने लागत असल्याने मलाही पर्याय नव्हता. त्यानंतर तुटपुंज्या पगारात पुढचा जॉब केला, आणि पुढची ऍडमिशन मिळाल्यावर फेलोशिपची रक्कम यायला सुरुवात होईपर्यंत त्यातून वाचवलेल्या पैश्यांवर भागवलं.

यात मोठ्ठं काही कर्तृत्व नाही. अगदी एमएचा प्रोजेक्टपण बऱ्यापैकी चालून आला होता माझ्याकडे, आणि त्यांनी मला घरून काम करू दिलं त्यामुळे ते सोयीचं पडलं. पण शिकत असताना काम केल्याचा फायदा असा झाला, की काम करताना डेडलाईन्स आणि चुका होऊ न देणे, याची सवय लागायला लागली. थोडक्यात, विद्यार्थी मनोवृत्तीमधून थोडंफार बाहेर पडता आलं. स्वतःचा निर्णय असल्याने त्यासंदर्भातली सगळी भांडणं स्वतः केली, त्याचीही सवय लागली. वगैरे वगैरे.

आता हॉटेलमध्ये वगैरे काम केलं नाही. घरून मान्य होण्याची शक्यताच नव्हती, पण मीही कितपत केलं असतं माहीत नाही.

पण तरी आजकाल इंटर्नशिप्स इतक्या उपलब्ध असतात, की तेवढंतरी करायला काहीच हरकत नसावी. त्यातून जो आत्मविश्वास येतो तो बाकी कशाने येत नाही हे खरं.

जेडी's picture

18 Jan 2018 - 10:00 pm | जेडी

+१००

रुपी's picture

19 Jan 2018 - 2:45 am | रुपी

छान प्रतिसाद. आवडला.

त्यामुळे फावल्या वेळात हॉटेलात काम करुन सुद्धा पैसे जमवता येतात.
भारतात महीनाभर काम करुन जेवढे पैसे मिळणार नाहीत तेवढे अमेरीकेत एका वीकेंडला मीळतील.
सबब काम करुन शीकणे भारतात तरी प्रक्टीकल वाटत नाही.

असलेल्या वातावरणाच्या अनुषंगाने येणारे निष्कर्ष असे

काम सोडून सल्ला देण्यात सगळे आघाडीवर असतात
पण काम करून शिकावं किंवा कामातून शिक्षण घेत घेत प्रगती करावी अशी शिकवण कुठे नाही

परिस्थिती ने शालेय वयातच बागकाम, परीक्षार्थींना पाणी देणे इत्यादी कामे करत राहीलो.शाळेतील शिक्षकांच्या भक्कम प्रोत्साहन देण्यासाठी मी त्यांचा आजन्म ऋणी आहे

नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

लेखातले विचार पटले. शिवाय तुमच्याच एका प्रतिसादात आणि पिशी अबोलीच्या प्रतिसादात आलंय तसं पैशांव्यतिरिक्त, आत्मविश्वास, अनुभव, जबाबदारी घ्यायला शिकणं हे सर्व जे मिळतं त्यासाठी मलाही वाटतं की मुलांना अगदी शिक्षणासाठी पूर्ण कर्ज घ्यायला लावले नाही तरी ठराविक वयानंतर थोडी तरी बाहेर काम करण्याची सवय लागायला हवी.

अमेरिकेत कॉलेज अ‍ॅडमिशनसाठी किंवा बर्‍याचदा नोकरीसाठीही Volunteer experience बराच उपयोगी पडतो. वाचनालये, हॉस्पिटल्स यांठिकाणी किशोरवयीन मुले सर्रास दिसतात. वृद्धांना मदत करणे, हवे ते डिपार्टमेंट कुठे आहे, वाचनालयात पुस्तके शोधण्यास मदत करणे अशी बरीच कामे ती करतात. यांना कामाचा मोबदला पैशांत मिळतो की नाही हे मला माहीत नाही. पण हा अनुभव त्यांच्या प्रोफाइलवर मात्र नक्कीच येतो. अगदी लहान मुलांना पोहायला शिकवायलाही बर्‍याचदा हायस्कूलची मुले असतात आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ती ही कामे करतात.

भारतात माझ्या पाहण्यात फार मुले अशी नाहीत, किंवा बर्‍याचदा मार्कांच्या स्पर्धेत टिकून राहावे यासाठी काहींचा भर अभ्यास एके अभ्यास यावर असतो - कधी कधी पालकांचाही. नात्यातल्या एका कुटुंबात मात्र मी अगदी मेहनती भाऊ-बहीण पाहिलेत. त्यांची आर्थिक परिस्थिती फार काही उत्तम नव्हती, त्यामुळे अगदी ७वी-८वी पासून ते दोघे उन्हाळ्याच्या सुट्टीत बरीच कामे करायचे. रेस्टॉरंट्समधल्या पेपर नॅपकिन्सच्या घड्या घालण्यापासून ते टेलिमार्केटींगपर्यंत बरीच कामे त्यांनी केली. खूप फी देण्यासारखी परिस्थिती नव्हतीच, त्यामुळे मोठ्या डिग्रीचे शिक्षण त्यांना घेता आले नाही, पण सतत काहीतरी करायची धडपड, इच्छा यांतून त्यांनी खूप प्रगती केली आहे. ती मुलगी तर आता बर्‍याच मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे आणि कामासाठी भारतभर आणि भारताबाहेरही फिरते.

मला वाटतं की आपल्याकडच्या शिकणपद्धतीत लोकांबरोबर कसे बोलायचे, समोरच्याशी बोलताना भावनांवर नियंत्रण ठेवायचे याबाबतीत फारच कमी अनुभव मिळतो. तो, आणि तुम्ही वर लिहिलंय तसं पैसे कमवायला करावे लागणारे कष्ट इ. गोष्टी तरी मुलांना समजायला हव्यात.

अभिजीत अवलिया's picture

20 Jan 2018 - 10:23 am | अभिजीत अवलिया

बर्‍याचदा मार्कांच्या स्पर्धेत टिकून राहावे यासाठी काहींचा भर अभ्यास एके अभ्यास यावर असतो

हे निरीक्षण शहरी भागात निश्चित असेल पण ग्रामीण भागाचा विचार करता मुलांना अभ्यासा इतकीच इतर कामे सुद्धा भरपूर असतात. शेतातली नांगरणी पासून लागवड, बी बियाणे पेरणे, तण काढणे, भांगलण करणे, खते देणे, पाणी पाजणे, पिकाची तोड, घरात गुरे असल्यास ती राखणे, त्यांचे दूध काढणे ही कामे मोठ्यांच्या बरोबरीने मुले देखील करत असतात. फक्त ह्या कामाचे पैसे मिळत नाहीत इतकेच. पण अनुभव मिळतोच.

ग्रामीण भागातील मुले त्यामुळे पुस्तकी ज्ञानापेक्षा थोडी जगरहाटीचा जास्त अनुभव असलेली असतात असे वाटते.

भारत आणि अमेरिका फार वेगळ्या प्रकारचे देश आहेत. अत्यंत प्रगत असल्याने अमेरिकेत मानवी वेळाची किंमत प्रचंड आहे त्याच वेळी भारतात मानवी वेळची किंमत जवळ जवळ शून्य आहे. त्यामुळे भारतीय मुलांनी उगाच घोडगिरी ना करता फावला वेळ अभ्यासांत घालवणे जास्त श्रेयकर आहे कारण त्यावरील रिटर्न्स जास्त आहेत.

एक मुद्दा कदाचित निसटतोय.

अमेरिकेत किंवा अन्य काही देशांत मुलं किरकोळ कामं करुन लवकर पायावर उभी राहतात असं पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. पण त्याचवेळी असाही उल्लेख अनेकदा ऐकलाय की "हायस्कूल वगैरे लेव्हलपर्यंत शिक्षण घेणारी मुलं तिथे भारतापेक्षा जास्त प्रमाणात आहेत, पण त्यापुढे उच्च शिक्षण किंवा प्रोफेशनल पोस्ट ग्रैजुएट, इव्हन बैचलर्स डिग्रीपर्यंतही तुलनेत खूप कमी मुलं शिकतात. याला कारण म्हणजे लवकर स्वतंत्र होण्याच्या नादात
किरकोळ नोकरी आणि त्यामुळे उच्च शिक्षण परवडू न शकणं"

यात तथ्य आहे का?

याच कारणाने तिथे पोचलेली भारतीय मुलं त्यांच्यापेक्षा सरासरी जास्त उच्चशिक्षित असतात का?

चान्गला धागा आणि प्रतिसाद.

भारतासारख्या स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या देशात कमवा आणि शिका हे मध्यम+ वर्गात किफायतशीर ठरणार नाही.
बारावीनंतरचे शिक्षण कर्ज काढून किंवा पालकांकडून कर्ज घेऊन करावे. शिक्षण कर्जचे व्याज किती असते? पालकांनी होताहोईतो ०% व्याजदराने पैसे द्यावेत :)

परवाच एकीशी घमासान चर्चा झालेली. माझं म्हणणं होत कि सध्या जे ४० च्या आसपास आहेत ie १९८०- काळात जन्मलेले, ज्यांची मुलं आता १५- वयाची आहेत ती लोक फक्त शिक्षण देऊन मुलांना मोकळ करणार आहेत, त्यांनी आपली काळजी घ्यावी किंवा आपण त्यांच्या लग्न, मुलं, नोकरी बाबतच्या निर्णयात लुडबुड करणे वगैरे अजिबात नसेल. १९९० नन्तर जन्मलेली विरुद्ध पार्टी बोलत होती कि तुझ्याच काय माझ्या पिढीतही हे अशक्य आहे. हां २००० नन्तर जन्मलेलेमात्र हे त्यांच्या मुलांसोबत करतील.

मिपावर आले कि वाटू लागतं तिचेच बरोबर आहे :-P

कपिलमुनी's picture

19 Jan 2018 - 4:42 pm | कपिलमुनी

भारतात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे त्यमुळे पार्ट टाइम नोकर्‍या मिळणे अवघड आहे. भारतात श्रमाला प्रतिष्ठा नाही त्यामुळे उच्च शिक्षण घेणारे ते काम करत नाहीत.
भारतात पार्ट टाइम काम करून मिळणारे पैसे फी आणि रोजखर्च यांचा मेळ घालणारे नसतात. त्यामूळे हे कल्चर इथे रुजणे अवघड आहे.

कपिलमुनी's picture

19 Jan 2018 - 4:52 pm | कपिलमुनी

पैशाचे महत्व कळावे यासाठी सुट्टीमधे काम ही चांगली आयडीया आहे . अर्थात या संधी शहरात जास्त उपलब्ध आहेत.

१. प्रदर्शनामध्ये मदतनीस किंवा सेल्स साठी उपस्थित रहाणे : फर्निचर, साड्या , ड्रेस्स, बाईक , किंवा कृषी प्रदर्शनासाठी बरीच हिन्दी , ईंग्रजी बोलता येणारी मुले लागतात. असे लेबर पुरवणार्‍या एजन्सी असतात त्यांच्याकडे नोंदणी केली असता असे कॉल मिळतात. यात चांगले पैसे मिळतात.
२. बदली ड्रायव्हर : ड्रायव्हिन्ग एक कला आहे. बरेच वेळा मुख्य ड्रायव्हर सुट्टीवर असेल तर बदली ड्रायव्हर म्हणून काम करता येते.
३. पॅम्प्लेट डिस्त्रीब्युटर : बर्‍याच प्रिंटर , पब्लिशरना पॅम्प्लेट वाटायला मुले हवी असतात .
४. आउटलेट : बर्गर , पिझ्झा किंवा इतर कॅफे मधे सेल्स काऊन्टर किंवा इतर मदतनीस म्हणोन जॉब करता येतो.
५. कला किंवा छंद : मेहंदी काढण्यासारख्या छंदातून पॉकेटमनी मिळवता येतो.

जेडी's picture

19 Jan 2018 - 11:22 pm | जेडी

+१०००