दोन वैमानिकांच्या मैत्रीची एक अनोखी कहाणी

Primary tabs

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am


अमेरिकन हवाईदलातून निवृत्त होऊन लेफ्टनंट कर्नल चार्ल्स उर्फ चार्ली ब्राउन परिपूर्ण असे आयुष्य जगत होता. १९७२ साली अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातून निवृत्त झाल्यावर मायामी येथे स्थायिक झाला. १९८६ सालच्या एका कॉम्बॅट पायलट रीयुनियन सोहळ्यात त्याला वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्याला एकाने विचारले की "दुसर्‍या महायुद्धातील तुमचा सहभाग असलेल्या एखाद्या कामगिरीची आठवण सांगता का?" त्यावर त्याने 'ती' घटना सांगितली. ती घटना सांगितल्यावर चार्ल्स ब्राउनला वाटले की त्या घटनेतील एका व्यक्तीचा शोध घ्यायला हवा. म्हणून मग त्याने एक शोधमोहीम सुरू केली. मात्र त्यात समस्या अशी होती की दुसर्‍या महायुद्धातील ती घटना घडून बराच काळ लोटला होता. बरे, शोध तरी कसा घेणार? कारण त्या व्यक्तीचे नावही त्याला ठाऊक नव्हते. त्याला फक्त एवढेच माहीत होते की ती व्यक्ती एक वैमानिक होती. सुमारे चार वर्षे झाली, तरी ही शोधमोहीम कोणत्याच निष्कर्षापर्यंत येत नव्हती. अखेरचा उपाय म्हणून मग त्याने कॉम्बॅट पायलट असोसिएशनच्या नियतकालिकाला एक पत्र पाठवले. त्याव्यतिरिक्त आता करण्यासारखे फारसे काही उरले नव्हते.


लेफ्टनंट कर्नल चार्ल्स ब्राउन यांचे हे छायाचित्र जालावरून साभार.

काही महिन्यांचा काळ लोटला आणि त्याला एक पत्र आले. ते आले होते कॅनडास्थित फ्रान्झ स्टिगलर याचे. त्याने पत्रात लिहिले होते की तुम्ही ज्या व्यक्तीच्या शोधात आहात, ती मीच आहे.

फ्रान्झ स्टिगलर यांचे हे छायाचित्र जालावरून साभार.

फोनवर त्या दोघांचे बोलणे झाले अन चार्ल्सची खातरी पटली की त्याचे शोधकार्य यशस्वी झाले आहे. आता मात्र चार्ल्स भूतकाळातल्या आठवणींमध्ये दंग झाला. १९४१ साली अमेरिकेने दुसर्‍या महायुद्धात उडी घेतली, त्या वेळी सेकंड लेफ्टनंट चार्ल्स ब्राउन अमेरिकन हवाईदलातला एक उमदा तरुण वैमानिक होता. इंग्लंडमधल्या एका तळावर त्याची नेमणूक करण्यात आली होती. तो B-17F या बॉम्बर प्रकारच्या विमानाचा वैमानिक होता. तो ३७९व्या बंबार्डमेंट ग्रूपचा एक सदस्य होता. यात Ye Olde Pub या नावाच्या टीमचे चार्ल्स धरून १० सदस्य होते.

चार्ल्स ब्राऊन आणि त्याचे Ye Olde Pubचे इतर सहकारी. हा फोटो जालावरून साभार.

२० डिसेंबर १९४३ रोजी या ग्रूपला एक कामगिरीवर पाठवले गेले होते. यात त्यांना जर्मनीतल्या ब्रेमेन येथील एका विमानाच्या उत्पादन स्थळाला उद्ध्वस्त करायचे होते. मात्र ब्रेमेन येथे मोठ्या संख्येने जर्मन लढाऊ वैमानिक तैनात होते. या मोहिमेत त्यांना 'पर्पल हार्ट कॉर्नर' या व्यूहरचनेत उडायचे होते. यात धोका असा होता की या व्यूहरचनेतील कडेच्या विमानांना असलेल्या जोखमीची तीव्रता मधल्या विमानांपेक्षा अधिक होती. कारण त्यांना जर्मन वैमानिकांकडून जास्त धोका होता. जर्मन सैनिकांना थेट आतल्या विमानांवर हल्ला करायच्याऐवजी कडेच्या विमानांवर हल्ला करणे अधिक सोपे जायचे. मोक्याचा क्षणी त्यांच्यापैकी एका वैमानिकाला माघार घ्यावी लागल्याने चार्ल्सला व्यूहरचनेत कडेची जागा घ्यावी लागली. हा हल्ला अमेरिकन वैमानिकांसाठी यशस्वी झाला, तरी परतीचा मार्ग चार्ल्ससाठी एवढा सुकर नव्हता. ज्या वेळी चार्ल्स आपल्या विमानातून बॉम्ब डागणार होता, त्या क्षणी विमानविरोधी तोफांकडून त्याच्या विमानाच्या नाकाचे नुकसान झाले. तसेच त्याचे क्रमांक दोनचे इंजीन कामातून बाद झाले आणि चौथ्या क्रमांकाचे इंजीनही बाद झाले, जे आधीच जरा कमकुवत झाले होते.

यामुळे चार्ल्सच्या विमानाचा वेग चांगलाच मंदावला आणि ते ग्रूपच्या इतर विमानांबरोबर राहू शकले नाही. चार्ल्सचे विमान आकाशात हेलकावे खाऊ लागले होते. आता त्याच्यावर जर्मन लढाऊ विमानांच्या हल्याचा धोका आणखीनच वाढला. अन झालेही अगदी तसेच. अचानक जवळजवळ १५ जर्मन लढाऊ विमानांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चार्ल्सच्या विमानाचे तिसरे इंजीनही बाद झाले. विमानातील प्राणवायूची प्रणाली काम करेनाशी झाली. तसेच आतील विद्युत प्रणालीही बिघडल्या होत्या. त्यामुळे विमानच्या आतून हल्ला करायच्या बहुतेक सर्व प्रणाल्या जाम झाल्या. फक्त समोरील काही बंदुका काम करत होत्या. याखेरीज त्याच्या विमानात बसलेले अनेक सहकारी जखमी झाले होते. Eckenrode हा विमानविरोधी तोफांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. Yelesanko यालाही पायाला दुखापत झाली होती. ब्लॅकफोर्ड्चे पाय गोठले होते, Pechoutच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच चार्ल्सच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. प्रथमोपचारासाठी ठेवलेले मॉर्फिनही गोठले गेले. त्यामुळे जखमींवर त्वरित उपचार करण्यात अनेक अडचणी येत होत्या. विमानातील रेडियोही उद्ध्वस्त झाला होता. विमानाच्या अंतर्गत प्रणाली बहुतकरून निकामी झाल्या होत्या. तसेच विमानाचे बाहेरून खूप नुकसान झाले होते.B-17 जातीचे एक विमान. चार्ल्स बॉऊन उडवत असलेले B-17 बॉम्बर विमानही असेच होते. हा फोटो जालावरून साभार.


जमिनीवरून हे हेलकावे खात असलेले बॉम्बर विमान जर्मन वैमानिकांना दिसत होते. या वैमानिकांपैकी एक म्हणजे फ्रान्झ स्टिगलर. त्या वेळी तो त्याच्या विमानात इंधन भरत होता. लवकरच त्याने उड्डाण केले आणि चार्ल्सच्या विमानाजवळ पोहोचून त्याच्या समांतर रेषेत स्वतःचे विमान उडवू लागला. आता मात्र चार्ल्स अधिकच चिंताग्रस्त झाला, कारण त्याला एक जर्मन लढाऊ विमान त्याच्या विमानाच्या अगदी जवळ आल्याचे दिसत होते. फ्रान्झला मोडकळीला आलेल्या विमानात जखमी झालेले आणि अडकलेले अमेरिकन हवाईदलातील सैनिक दिसत होते. एकमेकांना मदत करायची त्यांची केविलवाणी धडपड दिसत होती. एका जर्मन विमानाला आपल्या इतके जवळ पाहून मग चार्ल्सने त्याच्या एका सहकार्‍याला त्याच्यावर बंदूक रोखून तयार राहायला सांगितले. मात्र हल्ला करण्यास मनाई केली. आश्चर्याची बाब म्हणजे अशा हालचाली पाहूनही फ्रान्झने त्यांच्यावर हल्ला चढवला नाही. तो काही काळ त्यांच्या बाजूने उडत राहिला. तो अशा प्रकारे त्यांच्या बाजूने उडत राहिला की जेणेकरून जर्मन विमानविरोधी तोफा B-17ला लक्ष्य करू शकणार नाही.

फ्रान्झ खुणावून चार्ल्सला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. मात्र चार्ल्सला काहीच कळत नव्हते. त्याने मग त्यांना उत्तरेकडील समुद्रापर्यंत साथ दिली. फ्रान्झला असेही भय वाटत होते की जर कुणा जर्मन अधिकाऱ्याने त्याला हे करताना पहिले, तर काय होईल? त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध होईल. वेळ हातातून निसटत चालला होता. आता निर्णय घेणे आवश्यक होते. फ्रान्झने चार्ल्स व त्याच्या विमानातल्या सैनिकांना एक सलाम ठोकला आणि आपल्या मार्गाने निघून गेला.या प्रसंगाचे नाट्यमय रूपांतर दर्शवणारा फोटो. हा फोटो जालावरून साभार.

त्यानंतर चार्ल्सने त्याचे B-17 जवळजवळ २५० मैल समुद्रावरून (नॉर्थ सी) उडवत नेले अन आपल्या एका बेसवर यशस्वीरित्या उतरवले. मात्र यादरम्यान Eckenrode याचा मृत्यू झाला आणि बाकी सारे जिवंत राहिले. पुढे चार्ल्सने त्याच्या कमांडिंग ऑफिसरला ही गोष्ट सांगितली. मात्र त्या अधिकाऱ्याने हा किस्सा इतर कोणास सांगायला मनाई केली. कारण त्याला जर्मन सैनिकांच्या चांगुलपणाबद्दल गोष्टी प्रसिद्ध होऊ द्यायच्या नव्हत्या. जर्मनीला या युद्धात नेस्तनाबूत करणे आवश्यक होते. फ्रान्झनेही हा किस्सा कोणाला सांगितला नाही, अन्यथा त्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला असता.फ्रान्झने दाखवलेल्या माणुसकीच्या सन्मानार्थ हे चित्र काढले गेले. त्याचा हा फोटो जालावरून साभार.

पुढे चार्ल्सने युद्धात अनेक कामगिर्‍या पार पाडल्या. फ्रान्झनेही युद्ध संपेपर्यंत आपली कामगिरी बजावली. १९८६नंतर चार्ल्सने फ्रान्झचा शोध घेतला. फ्रान्झ युद्ध संपल्यानंतर व्हॅकुंवर, कॅनडा येथे स्थायिक झाला. पुढे झालेल्या प्रत्यक्ष भेटीत चार्ल्स म्हणाला की त्याला असे वाटत होते की ४० वर्षांनी त्याला त्याचा हरवलेला भाऊ परत भेटला. फ्रान्झ म्हणाला की तो चार्ल्सला हाताने खुणावून एखाद्या जर्मन बेसवर उतरून शरण यावे अथवा स्वीडनच्या दिशेने उडत जावे असे सांगत होता. मात्र फ्रान्झ काय सांगत आहे ते चार्ल्सला त्या वेळी कळले नव्हते. त्या वेळी फ्रान्झने शत्रुपक्षाच्या सैनिकांना जिवंत जाऊ दिल्याचे कारण सांगितले. तो म्हणाला की त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याने त्याला एकदा सांगितले होते की त्याने जर पॅराशूटमधून उडणार्‍या एखाद्या सैनिकाला मारले, तर तो स्वतः (वरिष्ठ अधिकारी) त्याला (फ्रान्झला) जिवंत सोडणार नाही. फ्रान्झच्या मते त्या वेळी चार्ल्स आणि त्याचे सहकारी त्याला पॅराशूटमधील माणसांसारखे वाटले आणि त्याच्यातील माणुसकीचा विजय झाला. मात्र जसे त्याला जर्मन युद्ध तळ दिसले, तसे त्याने चार्ल्स आणि त्याच्या सहकाऱ्यांना सलाम ठोकला आणि निघून गेला.चार्ल्स आणि फ्रान्झ यांच्या सन्मानार्थ फ्लोरिडा राज्याचे तत्कालीन गव्हर्नर जेब बुश यांनी त्याची २००१ साली भेट घेतली. हा फोटो जालावरून साभार.


चार्ल्स व फ्रान्झ फिशिंगचा आनंद घेताना...


डावीकडून चार्ल्स व त्याची पत्नी जॅकी, फ्रान्झची पत्नी हिया व फ्रान्झ. वरील दोन्ही फोटो जालावरून साभार.चार्ल्स आणि फ्रान्झ हे एका अनोख्या मैत्रीच्या नात्यात गुंफले गेले ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत. योगायोग असा की दोघेही २००८ साली काही महिन्यांच्या अंतराने मृत्यू पावले. फ्रान्झ स्टिगलरने युद्धासारख्या क्रूर वेळीदेखील आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवली. फ्रान्झने चार्ल्सला भेट दिलेल्या एका पुस्तकात लिहिलेला संदेश त्याच्याच शब्दांत...

In 1940, I lost my only brother as a night fighter. On the 20th of December, 4 days before Christmas, I had the chance to save a B-17 from her destruction, a plane so badly damaged it was a wonder that she was still flying.
The pilot, Charlie Brown, is for me, as precious as my brother was.Thanks Charlie.
Your Brother,
Franz

Footer

इतिहास

प्रतिक्रिया

सही रे सई's picture

19 Oct 2017 - 2:55 am | सही रे सई

फारच जगावेगळी कहाणी आहे ही. ती आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल श्रीरंग यांचे विषेश कौतुक.

अभिजीत अवलिया's picture

19 Oct 2017 - 8:38 am | अभिजीत अवलिया

अनोखी कहाणी आहे ही .

लाल टोपी's picture

19 Oct 2017 - 9:26 am | लाल टोपी

ब-याच दिवसांनंतर तुमचे लिखाण वाचायला मिळाले आणि नेहमीप्रमाणे आवडले.

कविता१९७८'s picture

19 Oct 2017 - 10:20 am | कविता१९७८

छान लेखन

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Oct 2017 - 10:45 am | अमरेंद्र बाहुबली

छान लेखन

बाजीप्रभू's picture

19 Oct 2017 - 11:19 am | बाजीप्रभू

खूप छान माहिती... सुंदर लिहिलंय.

पाषाणभेद's picture

19 Oct 2017 - 12:23 pm | पाषाणभेद

युद्धामधील मानवता. छान गोष्ट.

सुनील's picture

19 Oct 2017 - 5:51 pm | सुनील

गोष्ट रोचक.

"माणूस" फ्रान्झची कृती आगळीवेगळी असली तरी "सैनिक" फ्रान्झची कृती मात्र अनाकलनीय वाटली.

गामा पैलवान's picture

19 Oct 2017 - 6:50 pm | गामा पैलवान

सुनील,

नाझी विचारांशी ओळख असलेल्यांना हे अनाकलनीय आजिबात वाटणार नाही.

आ.न.,
-गा.पै.

अमित खोजे's picture

19 Oct 2017 - 7:50 pm | अमित खोजे

हे कुठे वाचायला मिळेल का? लेख सुंदर झालाय! अभिनंदन श्रीरंग.

सुरेख लिहिलंय रे श्रीरंगा

निशाचर's picture

19 Oct 2017 - 8:58 pm | निशाचर

छान लिहिलंय.

मित्रहो's picture

19 Oct 2017 - 10:49 pm | मित्रहो

दोन वेगळ्या व्यक्तींची ओळख झाली. आणि ती दोघे नंतर एकमेकाला भेटली हे सुद्धा छान.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2017 - 11:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

"खरे जीवन बर्‍याचदा काल्पनिक कथेपेक्षा जास्त चमत्कृतीपूर्ण असते" हे अधोरेखीत करणारा सुंदर लेख !

अतिशय रोचक आणि आगळीवेगळी कहाणी.

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 2:30 am | पद्मावति

उत्तम. आगळी वेगळी युद्धकथा.

प्रमोद देर्देकर's picture

20 Oct 2017 - 7:38 pm | प्रमोद देर्देकर

युध्द कथा रम्य असतात ते पुन्हा या कहाणी वरुण सिद्ध झाले.

पैसा's picture

23 Oct 2017 - 9:43 pm | पैसा

छान लेख

स्वाती दिनेश's picture

24 Oct 2017 - 11:27 am | स्वाती दिनेश

आगळीवेगळी कहाणी आवडली.
युध्दस्य कथा रम्या:!
स्वाती

छान लेखन! खरंच अनोखी कहाणी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Oct 2017 - 7:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

रंगाप्पा लेखं आवडला.

लेख जमलाय हो रंगांण्णा..!!!

Nitin Palkar's picture

26 Oct 2017 - 8:26 pm | Nitin Palkar

छान कथा! सुन्दर लेखन!!

श्रीरंग_जोशी's picture

27 Oct 2017 - 10:15 am | श्रीरंग_जोशी

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे धन्यवाद.

पाच वर्षांपूर्वी जालावर चार्ल्स ब्राऊन व फ्रान्झ स्टिगलर यांच्याबाबत वाचले. तेव्हाच त्यावर लेख लिहायचे मनात आले होते. ते विलंबाने का होईना करू शकलो याचे समाधान आहे. साहित्य संपादकांनी या लेखाची निवड दिवाळी अंकासाठी केली यासाठी त्यांना धन्यवाद.

फ्रांझची ही कृती प्रत्येकाला पटेलच असे आवश्यक नाही.

या घटनेपूर्वी दुसऱ्या महायुद्धातील विविध कामगिऱ्यांमध्ये फ्रान्झने बरेच शौर्य गाजवले होते. चार्ल्सचे बॉम्बर विमान पाडले असते तर त्याला नाइटस क्रॉस मिळाला असता. परंतु आक्रमणच काय तर स्वतःचा बचावही करण्याच्या परिस्थितीत नसणाऱ्या शत्रूच्या तुकडीवर हल्ला करणे त्याला योग्य वाटले नाही. कदाचित चार्ल्सबरोबर रेडिओद्वारे संपर्क झाला असता तर त्याला शरण येण्याचा इशारा फ्रांझने दिला असता. परंतु तो पर्याय उपलब्ध नव्हता असे दिसते.

अवांतर - सध्या याच घटनेवरचे अ हायर कॉल हे पुस्तक वाचत आहे. सुरुवातीलाच कळलेली बाब म्हणजे फ्रान्झ नाझी पक्षाचा सदस्य नव्हता.

शत्रूसैन्यातली माणसे असूनही त्यांना दिलेली वागणूक पाहून बरे वाटले.