दृकश्राव्य विभाग : डिजिटल दिवाळी पहाट

Primary tabs

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

Header2१. श्री. राजेश परांजपे - शास्त्रीय गायन

राग :- बिलासखानी तोडी
रचना आणि संगीत :- राजेश परांजपे

श्री. राजेश परांजपे हे उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले एक नामवंत गायक. आपले वडील श्री. विनायक परांजपे ह्यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी डॉ. राम देशपांडे ह्यांच्याकडून ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा घराण्यांच्या संगीताचे शिक्षण घेतले. स्वतः इलेक्ट्रिकल इंजीनिअर असूनही त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीतालाच वाहून घेण्याचे ठरवले. ते गंधर्व महाविद्यालयाचे संगीत विशारद आहेत. आपल्या गुरूंसोबत त्यांनी संपूर्ण भारतभर गायनाचे कार्यक्रम केले आहेत. न्यू यॉर्क येथील भारतीय वकिलातीत त्यांच्या गायनाचा कार्यक्रम झालेला आहे.

मिसळपावच्या विनंतीला मान देऊन त्यांनी खास आपल्यासाठी ह्या रचनेची निर्मिती केली आहे. ह्या गाण्याचे बोल आणि संगीत, दोन्ही राजेश ह्यांचेच आहे.

२. श्रीमती. सुपर्णा डांगी - भक्तिगीत

श्रीमती सुपर्णा डांगी ह्यांनी जयपूर घराण्याच्या पं. रत्नाकर पै ह्यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्या स्वतः मुंबई विद्यापीठातून फाईन आर्ट्समध्ये एम.ए. आहेत. तिथे त्यांना पं. अजय पोहनकर आणि पं. विद्याधर व्यास ह्यांच्यासारख्या मान्यवरांकडून शिकण्याचे भाग्य लाभले. त्यांना पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती आणि साजन-मिलाप ही शिष्यवृत्तीसुद्धा मिळालेली आहे. त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीमध्ये झी टीव्ही सारेगामा १९९५ आणि सारेगामाप - वर्ल्ड सिरीज २००४ यांचा उल्लेख करावाच लागेल. अमेरिकेत त्यांनी बे एरियामध्ये अनेक कार्यक्रम केलेले आहेत. शिकागोमध्ये झालेल्या बी.एम.एम.मध्येही त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला होता. 'सूरभक्ती स्कूल ऑफ म्युझिक' या संस्थेत त्यांच्या हाताखाली अनेक उत्तम गायक तयार होत आहेत. त्या स्वतः अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाने नेमलेल्या परीक्षक आहेत. सध्या त्या पं. दिनकर कायकिणी ह्यांच्या कन्या श्रीमती अदिती कायकिणी-उपाध्याय ह्यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत आहेत.

खास आपल्या मिसळपावसाठी त्यांनी जे गाणे पाठवले आहे, त्याची रचना पं. नरेंद्र शर्मा ह्यांची आहे. इथे सादर करण्यासाठी श्री. तुषार भाटिया (अंदाज अपना अपनाचे कंपोजर) ह्यांनी मूळ रचनेत आणखी एका कडव्याची भर घातली आणि हा भक्तिगीतास चालही लावून दिली. गाण्याचे रेकॉर्डिंग प्रदीप मेनन ह्यांचे आहे. गाण्यास इप्शा मेनन (हार्मोनियम) आणि विशान मेनन (तबला) ह्यांची साथसंगत आहे.

इतक्या नितांत सुंदर गाण्यासाठी सुपर्णा डांगी ह्यांचे शतशः आभार. हे गाणे तयार होण्यासाठी ज्या ज्या लोकांचा हातभार लागला आहे, त्यांचेही मिसळपाव परिवारातर्फे आभार.

३. अत्रंगी पाऊस

राग:- यमन

आपले मिपाकर अत्रंगी पाऊस हे १५-१६ वर्षे ठाण्यातच विनायकराव काळे ह्यांच्याकडे संगीत शिकले आहेत. स्वतः आयटीमध्ये २६पेक्षा जास्त वर्षे डेटा वेअरहाउसिंग आणि बिझिनेस इंटेलिजन्समध्ये कार्यरत असूनही २०११मध्ये विद्याधर गोखले प्रतिष्ठानचा नाट्यसंगीत डिप्लोमा ते उत्तम श्रेणीत पास झाले आहेत. आज त्यांनी गायलेली 'श्रीरंगा कमलाकांता..' ही यमन रागातली गवळण होनाजी बाळा ह्या नाटकातील आहे. आधी सुरेश हळदणकरांनी गाजवलेली आणि नंतर रामदास कामतांनी समर्थपणे पेललेली ही गवळण. खुद्द रामदास कामतांनीच ती अत्रंगींना शिकवली आहे! मिपाच्या पहिल्या दिवाळी पहाटेसाठी असे गाणे आपल्याला लाभावे, हा विलक्षण योगच!

४. संदीप चित्रे - बासरी
संगीत संयोजन - प्रसाद गिजरे

राग :- अहीर भैरव

संदीप चित्रे हे एक अत्यंत उत्साही आद्यमिपाकर! त्यांनी बासरीचे शिक्षण सुरू केले ते पुणे इथे श्री. बाळासाहेब शेवडे ह्यांच्याकडे. त्यानंतर त्यांनी पुण्याचे श्री. अजित सोमण ह्यांच्याकडे शिक्षण घेतले. कॉलेज वगैरे झाल्यानंतर, आय.टी. क्षेत्रातील नोकरीनिमित्त अमेरिकेत आल्यामुळे जवळपास १०-१२ वर्षे बासरी वाजवण्यात खंड पडला होता. पण अंत:स्थ ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना, म्हणून बासरी शिकण्यास पुनश्च हरी ओम् केले. सध्या ते प्रसिद्ध बासरीवादक मिलिंद दाते ह्यांच्याकडून बासरीवादन शिकत आहेत. बासरीव्यतिरिक्त वाचन, लेखन (अटकमटक - www.atakmatak.blogspot.com हा मराठी ब्लॉग), 'उभ्या उभ्या विनोद' ह्या अमेरिकेतील मराठी स्टँड अप कॉमेडी ग्रूपमध्ये सहभाग, तसेच Hidden Gems (www.hidden-gems.org) ह्या non-profit music groupमध्ये त्यांचा सहभाग आहे.

ह्या बासरीवादनाची संगीत रचना करणारे प्रसाद गिजरे हे स्वतःच कोणत्याही शिक्षणाशिवाय अनेक वाद्ये वाजवू शकणारे संगीतकार आहेत. ते संगीतरचनेचेही काम करतात. त्यांनी भारतातील आणि अमेरिकेतील अनेक शॉर्ट फिल्म्सना पार्श्वसंगीत दिले आहे. त्यांनी स्वतः दोन स्वतंत्र गाण्यांचीही निर्मिती केलेली आहे.

५. आशिष तारे - 'लयकारी'
वादक :- तेजस साठे (की-बोर्ड), राहुल झिंगडे (तबला), आशिष तारे (तबला), कुणाल मामिदपल्लीवार (ढोलक) आणि कश्यप परब (ड्रम्स)

'तबला निकेतन' हे सतीश तारे आणि त्यांचा मुलगा आशिष तारे ह्या दोघांनी मिळून चालवलेले एक अभिमानास्पद कार्य! इथे अनेक मुले गेली कित्येक वर्षे तबला शिकण्यास येतात. मिपाकर नाटक्या (माधव कर्‍हाडे) ह्यांच्या रंगमंचतर्फे होणार्‍या कार्यक्रमांमध्येही तबला निकेतनचा सहभाग असतोच.

लयकारी हा अमेरिकेतील बे एरियामधला, तालवाद्यांवर आधारित पहिला बँड आहे. ह्यामध्ये वादन करणारे सर्व कलाकार तबला निकेतनचे विद्यार्थी आहेत. गेली १५ वर्षे तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणार्‍या ह्या विद्यार्थ्यांनी हा एक उत्तम उपक्रम सुरू केला आहे. तालवाद्यांचे सादरीकरण ह्या हेतूसोबतच प्रत्येक वाद्याचे स्वत:चे असे वैशिष्ट्य असूनही एकत्र आल्यावर एकच गाणे किती वेगळ्या प्रकारे ह्यांच्या संगमातून वाजवता येते, हे दाखवणे हाही ह्या बँडचा उद्देश आहे. पारंपरिक दिवाळी पहाटेमध्ये ही जुगलबंदी नक्कीच वेगळी मजा आणणार! ह्या मेजवानीबद्दल 'लयकारी' ग्रूपचे आभार!

६. कार्तिक जयंत देवपुजारी - व्हायोलीन

राग :- भूप आणि यमन

हा एक केवळ २० वर्षांचा चुणचुणीत मुलगा! पुण्यात फर्गसन कॉलेजमध्ये बीएस्सी मायक्रोबायलॉजी करतो. वयाच्या ९व्या वर्षापासून आपले काका श्री. सुमंत देवपुजारी ह्यांच्याकडे त्याने व्हायोलीन शिकण्यास सुरुवात केली. पुढे काकांनी त्याला नागपूर आकाशवाणीमधले ज्येष्ठ कलाकार श्री. शिरीष भालेराव ह्यांच्याकडे व्हायोलीन शिकण्यास पाठवले. तो आजही त्यांच्याकडेच व्हयोलीन शिकत आहे. २०१३मध्ये त्याने पद्मभूषण डॉ. एन. राजम ह्यांच्याकडे एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. आपल्या मिपा दिवाळी अंकासाठी त्याने राग भूप आणि राग यमन वापरून दोन रचना करून दिल्या आहेत. मिपाकर ह्या तरुणाला भरभरून दाद देतीलच!

राग यमन

राग भूप

संपूर्ण दिवाळी पहाट सलग ऐकण्यासाठी :-

Footer

संस्कृती

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

18 Oct 2017 - 3:42 am | स्रुजा

तृप्त झाले कान ! एकसे एक क्लिप्स आहेत. या तयारीत माझा फार भाग नसल्याने मी देखील पहिल्यांदाच ऐकल्या.. दिवाळी सुरु झाल्यासारखी वाटली. सगळ्या कलावंतांचे मनापासून आभार. संदीप चित्रेंचं खास कौतुक वाटलंय !

दिवाळीच्या शुभेच्छा !

यशोधरा's picture

18 Oct 2017 - 9:26 am | यशोधरा

'श्रीरंगा कमलाकांता..' आणि बासरी वादन ऐकले. फार आवडले.

अत्रन्गि पाउस's picture

18 Oct 2017 - 11:16 am | अत्रन्गि पाउस

धन्यवाद

मोदक's picture

18 Oct 2017 - 10:18 am | मोदक

सुंदर..!!!!

पद्मावति's picture

18 Oct 2017 - 1:39 pm | पद्मावति

प्रसन्न, सुरीली दिवाळी पहाट.

पाषाणभेद's picture

19 Oct 2017 - 8:06 am | पाषाणभेद

सुंदर. श्रीरंगा कमला... मस्त जमलेय!

अत्रन्गि पाउस's picture

20 Oct 2017 - 9:40 pm | अत्रन्गि पाउस

__/\__

मस्त झालीये दिवाळी पहाट! आतापर्यंत दोनदा ऐकली.

सिरुसेरि's picture

24 Oct 2017 - 5:51 pm | सिरुसेरि

सर्व सादरीकरणे आवडली . अत्रंगी पाऊस यांनी मोठ्या तयारीने आणी तबियतीने गायलेले 'श्रीरंगा कमलाकांता..' हे नाट्यपद विशेष करुन आवडले . त्यांच्या गायकीत पं. राम मराठे यांचा भास झाला . त्यांचे व सर्व साथीला असलेल्या वादक कलाकारांचे खुप अभिनंदन आणी शुभेच्छा . या गीतातील "दामु गोविंदा जोड रे " या ओळी बद्दल प्रख्यात असलेली कथा ऐकली होती . हे गीत ऐकताना त्याचा प्रत्यय आला .

भाते's picture

25 Oct 2017 - 11:53 am | भाते

९०च्या दशकापर्यंत चित्रपट संगीत आणि त्यानंतर पॉप संगीत ऐकल्यावर हल्ली सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत ऐकायला छान वाटते. दिवाळी पहाट हा दिवाळीचा एक अविभाज्य भाग आहे. आत्तापर्यंत अनेकवेळा आधी ठरवूनसुध्दा प्रत्यक्ष दिवाळी पहाटला जाण्याची कधी संधी मिळाली नाही आहे. मिपामुळे ती इच्छा पुर्ण झाली. संपूर्ण कार्यक्रम दोनवेळा पाहिला. अत्रंगी पाऊस यांची यमन रागातली 'श्रीरंगा कमलाकांता' ही रचना तर खासच. हि दिवाळी पहाट साकारणाऱ्या सगळयांचे मनापासुन अभिनंदन. यापुढे मिपाच्या प्रत्येक दिवाळी अंकात अशीच दिवाळी पहाट कायम अनुभवायला मिळेल याची खात्री आहे.