पिट्सबर्ग

Primary tabs

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2

अल्लेघेणी, मोनोन्गहेला आणि ओहिओ अशा तीन नद्यांच्या संगमावर वसलेले अमेरिकेतील एक अतिशय सुंदर शहर म्हणजे पिट्सबर्ग. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या स्टीलशी संबंधित उद्योगधंद्यांमुळे पिट्सबर्गला 'स्टील सिटी' आणि शहरात असणाऱ्या तब्बल ४४६ पुलांमुळे 'सिटी ऑफ ब्रिजेस' अशी बिरुदावलीदेखील दिली गेलेली आहे. आज जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक गणले जाणारे पिट्सबर्ग दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मात्र एक अतिप्रदूषित शहर बनले होते. ह्याचे कारण म्हणजे युद्धकाळात वाढलेली स्टीलची गरज. ही वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी इथले कारखाने दिवसाचे २४ तास काम करत असत आणि त्यामुळे इथली हवा व पाणी प्रचंड प्रमाणावर प्रदूषित झाले. पण दुसऱ्या महायुद्धानंतर शहरातील हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण कमी करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला. आणि ह्याचाच परिणाम म्हणजे गेली काही वर्षे बऱ्याच मासिकांतर्फे केल्या गेलेल्या बऱ्याच सर्व्हेंमध्ये पिट्सबर्गची गणना अमेरिकेतल्या / जगातल्या राहण्यास सर्वोत्तम शहरांमध्ये होऊ लागली.

२०व्या शतकाच्या सुरवातीला पिट्सबर्ग हे न्यू यॉर्क आणि शिकागोच्या खालोखाल रोजगार निर्माण करणारे अमेरिकेतील महत्त्वाचे शहर होते. स्टीलबरोबरच अ‍ॅल्युमिनिअम, लोखंड, काच निर्मिती हे इथले मुख्य उद्योगधंदे होते. पण १९८० साली अमेरिकेने Deindustrialization करण्याचा निर्णय घेतला, ज्यायोगे इथले बरेचसे कारखाने बंद केले गेले वा दुसरीकडे हलवले गेले. त्या कारखान्यांत काम करणारे कामगार एकतर कामधंदा गमावून बसले वा त्यांनी कामाच्या शोधार्थ दुसरीकडे स्थलांतर केले. २०व्या शतकाच्या शेवटी माहिती तंत्रज्ञानाची लाट आली. ह्या शहरानेदेखील ही संधी हेरली आणि उत्पादन क्षेत्राकडून तंत्रज्ञान आधारित उद्योग, शिक्षण, पर्यटन, वैद्यकीय सेवा ह्या व्यवसायांकडे मोर्चा वळवला. आज बऱ्याच टेक्नॉलॉजी कंपन्यांनी आपली मुख्य कार्यालये पिट्सबर्गमध्ये स्थापन केली आहेत.

कॅथेड्रल ऑफ लर्निंग (पिट्सबर्ग विद्यापीठ)

१६३ मीटर उंच असलेली ही ऐतिहासिक बिल्डिंग पिट्सबर्ग विद्यापीठची मुख्य बिल्डिंग असून जगातील चौथी सर्वात उंच शैक्षणिक इमारत आहे. ह्या इमारतीमध्ये विद्यापीठाच्या बहुतेक विभागांची मुख्य कार्यालये आहेत. १९२६मध्ये घेण्यात आलेल्या एका निर्यणानुसार ज्या ज्या देशांचे नागरिक पिट्सबर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर राहत आहेत आणि ज्यांनी शहराच्या विकासावर मोठा प्रभाव टाकलेला आहे, अशा देशांनी त्यांच्या संस्कृतीला अनुसरून एक नॅशनॅलिटी रूम विकसित करायची, असा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे ३० देशांच्या ३० नॅशनॅलिटी रूम्स इथे विकसित करण्यात आल्या आहेत. ह्यात एक आपली भारताचीदेखील असून भारताने नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर ही रूम विकसित केली आहे. नालंदा विद्यापीठाचे वर्णन करणारा ऑडिओदेखील ऐकण्याची सोय केलेली आहे.

भारताने विकसित केलेली नॅशनॅलिटी रूम

कॅथेड्रल ऑफ लर्निंगमधील ही कॉमन रूम

ही कॉमन रूम २०व्या शतकातील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानली जाते.

पॉईंट स्टेट पार्क

ऑगस्ट १९७४मध्ये सुरू करण्यात आलेले हे पार्क अल्लेघेणी, मोनोन्गहेला आणि ओहिओ या नद्यांच्या संगमावरच असून जवळपास ३६ एकरात पसरलेले आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा फॉल कलर्सची सुरुवात असते, तेव्हा इथल्या झाडांची रंग बदलणारी पाने पाहणे एक नेत्रसुखद अनुभव असतो. पॉईंट स्टेट पार्कपासून जवळच आहे Duquesne Incline. पिट्सबर्ग शहराचे बरेचसे भाग उंचीवर वसलेले आहेत. असाच एक भाग माउंट वॉशिंग्टन. तिथे मालाची ने-आण करणे सोपे पडावे, ह्यासाठी हा ८०० फूट लांबीचा Duquesne incline १८७७ साली सुरू करण्यात आला. माउंट वॉशिंग्टनमधील रहिवाशांना एवढ्या उंचावरून खाली मुख्य शहरात येणे-जाणे खूप जिकिरीचे पडत असे. त्यामुळे कालांतराने Duquesne inclineमधून प्रवासी वाहतूकदेखील सुरू करण्यात आली.

Duquesne inclineमधील प्रवासी वाहतूक करणारी लाकडी वॅगन

ही वॅगन ८०० फूट अंतर जवळपास अर्ध्या मिनिटात ५ फूट रुंदीच्या रेल्वे ट्रॅकसारख्या रुळांवरून चढून जाते आणि आपण पोहोचतो माउंट वॉशिंग्टनला. इथून दिसणारा पॉईंट स्टेट पार्क आणि पिट्सबर्गचा डाउनटाउन भाग म्हणजे फक्त बघतच राहावे असा नजारा.

फोर्ट पिट पूल - पिट्सबर्गमधील ४४६ पुलांपैकी पॉईंट स्टेट पार्कमधून दिसणारा फोर्ट पिट पूल

हेइन्झ फील्ड स्टेडियम

फुटबॉल हा अमेरिकेतील एक लोकप्रिय खेळ. १९२० साली सुरू करण्यात आलेली नॅशनल फुटबॉल लीग ही अमेरिकेतील एक अत्यंत महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ह्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या ३२ संघांपैकी एक आहे पिट्सबर्गचा 'पिट्सबर्ग स्टिलर्स'. हेइन्झ फील्ड हे पिट्सबर्ग स्टिलर्स ह्या संघाचे होम ग्राउंड आहे.

पिट्सबर्ग कल्चरल डिस्ट्रिक्ट

पिट्सबर्ग डाउनटाउनमध्ये कल्चरल डिस्ट्रिक्ट नावाचा एक भाग आहे. हा शहराचा सांस्कृतिक भाग म्हणता येईल. इथे बेनेडम सेंटर, बायहम थिएटर यासारखी बरीच थिएटर्स, आर्ट गॅलरीज आहेत.

कार्नेजी सायन्स सेन्टर

१९९१ साली सुरू झालेले हे सायन्स सेंटर पिट्सबर्गचे सर्वात जास्त भेट दिले जाणारे म्युझिअम आहे.
ह्या म्युझिअममध्ये असणाऱ्या रोबोवर्ल्ड विभागात ३०पेक्षा जास्त कायमस्वरूपी रोबोटिक डिस्प्ले असून हे जगातील सर्वात मोठे कायस्वरूपी रोबोटिक म्युझिअम आहे.

इथले एक वेगळे ठिकाण म्हणजे National Aviary. ही अमेरिकेतील सगळ्यात मोठी Aviary असून त्यात जवळपास २०० प्रकारचे पक्षी आहेत. पक्ष्यांसाठी त्यांच्या मूळ अधिवासाप्रमाणे वेगवेगळी छोटी जंगले Aviaryच्या आत तयार केलेली आहेत.

शहराचा डाउनटाउन भाग म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांच्या उत्तुंग इमारतींबरोबरच जुन्या, अत्यंत सुंदर अशा पुरातन इमारती आणि आखीव रेखीव रस्ते असणारा भाग आहे.

पिट्सबर्गचा डाउनटाउन भाग

मार्केट स्क्वेअर

प्रेस्बायटेरिन चर्च

आणि ही टुमदार घरे

जुन ते सप्टेंबर थोडाफार असलेला उन्हाळा सोडला, तर एरवी इथे हिवाळाच असतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी म्हणजे कडाक्याच्या थंडीचे आणि बर्फवृष्टीचे महिने. नोव्हेंबरच्या शेवटी झालेल्या बर्फवृष्टीनंतर दिसणारे एक दृश्य

अशा ह्या अमेरिकेतील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असलेल्या शहराला जमल्यास नक्कीच भेट द्या. तुम्ही नक्कीच ह्या शहराच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल.
Footer

कथा

प्रतिक्रिया

जुइ's picture

19 Oct 2017 - 4:50 am | जुइ

पिट्सबर्गचा शहराचा घेतलेला मागोवा आवडला. फोटोही खूप छान आले आहेत. एकदा पिट्सबर्गला जाऊन यावे लागेल.

पॉपकॉर्न's picture

19 Oct 2017 - 8:31 am | पॉपकॉर्न

लेख आवडला. पिटसबर्ग मध्ये काही काळ घालवलेला असलयाने जुने दिवस आठवले.
पिटसबर्ग चे बालाजी मंदिर हे अमेरिकेतील आद्य हिंदू मंदिरांपैकी एक आहे. (नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील विसा बालाजी म्हणून प्रसिद्ध होत आहे :) )
पिटसबर्ग चे झू सुद्धा खूप मोठे आणि छानआहे.

सिरुसेरि's picture

21 Oct 2017 - 10:55 am | सिरुसेरि

मस्त फोटो आणी माहिती

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2017 - 11:21 am | श्रीरंग_जोशी

पिट्सबर्ग शहराची थोडक्यात ओळख आवडली. फोटोज उत्तम आहेत.

पिट्सबर्ग शहराला भेट द्यायची इच्छा बर्‍याच वर्षांपासून आहे ती हा लेख वाचून अधिक प्रबळ झाली :-) .

अमितदादा's picture

21 Oct 2017 - 12:57 pm | अमितदादा

उत्तम लेख...छान ओळख पिट्सबर्ग शहराची

स्नेहांकिता's picture

23 Oct 2017 - 12:03 pm | स्नेहांकिता

एका भव्य आणि सुंदर शहराची ओळख आवडली !

पैसा's picture

23 Oct 2017 - 9:44 pm | पैसा

छान ओळख

पद्मावति's picture

23 Oct 2017 - 10:37 pm | पद्मावति

पिट्सबर्ग शहराची ओळख आवडली.

वा! अतिशय सुंदर आणि देखणे शहर आहे. फोटो तुम्ही काढलेत का? खूप छान आहेत. कॅथेड्रल ऑफ लर्निंगमधील कॉमन रूम खूपच आवडली. काय स्थापत्य आहे...! वा!

अभिजीत अवलिया's picture

24 Oct 2017 - 6:04 am | अभिजीत अवलिया

@ एसभाऊ,
होय. फोटो मीच काढलेत.

अन्य सर्व वाचकांचे देखील धन्यवाद.

अनिंद्य's picture

26 Oct 2017 - 3:52 pm | अनिंद्य

@ अभिजीत अवलिया,

अल्लेघेणी, मोनोन्गहेला - नद्यांची अशी नवे वाचून कर्नाटकात फिरल्याचा फील आला हो :-) पिट्सबर्ग अमेरिकेतील इतर संपन्न शहरांप्रमाणेच सुंदर - आखीवरेखीव शहर दिसते आहे.

फोटोही छान, 'सिटी ऑफ ब्रिजेस' ची ओळख पटवणारा तर फार छान.

ते 'नालंदा' नॅशनॅलिटी रूम मात्र फारच कल्पनाशून्य डिझाईन आहे. चालायचंच.

शुभेच्छा,

अनिंद्य

अभिजीत अवलिया's picture

27 Oct 2017 - 10:30 pm | अभिजीत अवलिया

अल्लेघेणी, मोनोन्गहेला - नद्यांची अशी नवे वाचून कर्नाटकात फिरल्याचा फील आला हो

:)

अनिंद्य's picture

26 Oct 2017 - 3:53 pm | अनिंद्य

* नावे

स्रुजा's picture

26 Oct 2017 - 6:13 pm | स्रुजा

फारच छान फोटोज आहेत ! पिट्सबर्ग मला देखील त्या मंदिरामुळेच माहिती आहे. डाऊनटाऊन चा फोटो तर अप्रतिम.

फारएन्ड's picture

27 Oct 2017 - 9:07 pm | फारएन्ड

सुंदर फोटो आणि माहितीसुद्धा आवडली. आता पिट्सबर्गला नक्कीच जावेसे वाटत आहे. ही सर्व ठिकाणे २-३ दिवसांत बघून होतील असे दिसते.

तो उंचावरून काढलेला फोटो सर्वात आवडला. फोटो प्रॉपर कॅमेर्‍याचे आहेत का (की मोबाइल)?

अभिजीत अवलिया's picture

27 Oct 2017 - 10:31 pm | अभिजीत अवलिया

फोटो प्रॉपर कॅमेर्‍याचे आहेत का (की मोबाइल)?

फोटो कॅनन 550d (१८-१३५ mm लेन्स) DSLR कॅमेर्‍याने काढले आहेत. हा १.६ क्रॉप सेन्सर असलेला कॅमेरा आहे. त्यामुळे शक्य असल्यास फुल फ्रेम कॅमेरा आणि त्याबरोबर 10mm लेन्स घेऊन जावे असे सुचवेन.

मारवा's picture

28 Oct 2017 - 7:32 am | मारवा

लेख आवडला.

स्वाती दिनेश's picture

5 Nov 2017 - 2:58 pm | स्वाती दिनेश

फोटो आणि माहिती दोन्ही छान.
स्वाती

विनिता००२'s picture

6 Nov 2017 - 12:00 pm | विनिता००२

सुरेख वर्णन :)