पाटील गुरुजी

Primary tabs

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2
१९७०च्या जून महिन्यात आम्ही मालाडहून बोरिवलीला शिफ्ट झालो. पाचवीपर्यंतचे शिक्षण मालाड पश्चिमेच्या म्युनिसिपालटीच्या शाळेत झाले होते आणि सहावीसाठी बोरिवलीच्या सोडावाला लेनमधल्या म्युनिसिपालटीच्या शाळेत मोठ्या आणि धाकट्या भावंडांसहित प्रवेश घेतला. प्रथमदर्शनी ह्या शाळेत आवडण्यासारखे काहीच नव्हते. जुनी बैठी शाळा, अॅस्बेस्टॉचे छप्पर, भिंतींना चुन्याची सफेदी, प्रत्येक इयत्तेचा फक्त एकच वर्ग आणि मुख्य म्हणजे खेळायला मैदानही नव्हते. मा‍झ्या सहावीच्या वर्गशिक्षकांचे नाव होते सुरेश पाटील. त्या वेळी शिक्षकांना ‘सर’ वगैरे न म्हणता गुरुजीच म्हटले जाई. जो विद्यादान करतो, तो गुरू आणि म्हणून आदराने ‘गुरुजी.’

मला वाटते आमच्या पाटील गुरुजींचे वय त्या वेळी २५-३०च्या दरम्यान असावे. उंचीने अंदाजे साडेपाच फूट, सडपातळ शरीरयष्टी, वर्ण सावळा, एका बाजूला भांग पाडलेले, काळेभोर आणि नीट विंचरलेले केस, काळ्या रंगाचाच चौकोनी फ्रेमचा चश्मा, नेहमी पूर्ण बाह्यांचा पांढरा शर्ट, बहुतेक वेळा काळी पँट आणि पायात वहाणा असा त्यांचा पेहराव असे. आमच्या पाटील गुरुजींची खासियत म्हणजे त्यांच्या चेहर्‍यावर नेहमीच एक मंद स्मित तरळत असे, अगदी चिडले तरी. शाळेतील सगळे फळे लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. काळ्याभोर फळ्यावर पांढऱ्याशुभ्र खडूने लिहिलेले त्यांचे अक्षर म्हणजे जणू काही मोगऱ्याची फुलेच. एकेक अक्षर अगदी टपोरे, कोठेही खाडाखोड नाही की वेडेवाकडे नाही. दोन शब्दांत तसेच दोन ओळींतील अंतर अगदी एकसमान. मी त्यांना कधीही पट्टी घेऊन ओळी आखताना पाहिले नाही. जे काही लिहायचे असेल, ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी एकटाकी आणि सुंदर. मला एकदा शाळेत फळ्यावर लिहायचा योग आला होता, त्या वेळी फळ्यावर लिहिणे किती कठीण आहे हे समजले. आपली सुरुवात तर डावीकडून बरोबर होते, पण जसजसे वाक्य पुढे सरकते, तसतसे ते तिरपे होत वरवर जाऊ लागते. हे उमजल्यावर तर पाटील गुरुजींच्या अक्षराचा आणि फळे लिहिण्याच्या त्यांच्या कलेविषयीचा आदर द्विगुणित झाला.

पाटील गुरुजी शिस्तीचे फार कडक होते असे नाही, पण मुलांना त्यांचा एक आदरयुक्त दरारा नक्कीच होता. मी त्यांना कधीही कुणाला मारताना किंवा शिक्षा करताना पाहिले नाही, तरी वर्गातील सर्वात व्रात्य मुलगादेखील त्यांना वचकून असायचा. म्युनिसिपालटीची शाळा असल्याने बहुतेक मुले गरीब घरातून आलेली होती आणि त्यामुळे वयाने थोडी मोठीदेखील होती. वर्गातील बहुतेक मुले शिक्षणाबरोबर पोटापाण्यासाठी, घरखर्चाला हातभार लावण्यासाठी काही ना काही उद्योगधंदादेखील करीत. गणपत सईनकर नावाचा मुलगा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बूटपॉलिश करायचा. ह्याचा आवाज अतिशय मधुर होता. वर्गात त्याला गाणे म्हणायला सांगितले की तो ‘हाथी मेरे साथी’मधील ‘नफरत की दुनिया को छोडकर प्यार की दुनिया में’ हे गाणे अतिशय दर्दभऱ्या आवाजात म्हणायचा. रमेश सोंडकर हा फुले विकण्याचा धंदा करायचा. घरचाच व्यवसाय असल्यामुळे तो गजरे, हार, बूके वगैरे छान बनवायचा. सुरेंद्र कोठावळे हा सोन्याचे दागिने बनवणाऱ्या दुकानात काम करायचा. कोणी घरोघरी पेपर्स टाकायचा, तर कोणी फुटपाथवर पेन, पेन्सिल, केसाला लावायची बक्कले, नेलपॉलिश, लिपस्टिक्स वगैरे साहित्य विकायचा. वर्गातल्या काही मुली इतरांकडे घरकाम करायच्या. थोडक्यात - बहुतेक मुले गरीब घरची होती; पण आमच्या पाटील गुरुजींनी अशा प्रत्येक मुलाचे नेहमीच कौतुक केले, त्यांची उदाहरणे देऊन श्रमाचे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले.

गुरुजींनी आम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक गोष्टी शिकवल्या. बहुतेक म्युनिसिपालटीच्या शाळेत मे महिन्याच्या सुट्टीत मोफत वाचनालय चालवले जात असे, तसे आमच्या शाळेतदेखील होते. पण शाळा लहान असल्यामुळे पुस्तके कमी असायची. मग पाटील गुरुजी बाभईच्या मोठ्या शाळेतून गोष्टींची पुस्तके वाचायला आणून देत. मुलांना शहाणे करून सोडण्याच्या पाटील गुरुजींच्या दुर्दम्य इच्छेमुळे त्या लहान वयात मी अनेक उत्तमोत्तम पुस्तके वाचली.

आमच्या वेळी पाचवीपासून, हिंदी व इंग्रजी हे दोन नवीन विषय सुरू होत असत. हिंदी एकवेळ सोपे जाई, पण इंग्रजी बहुतेक मुलांना कठीण वाटत असे. ह्या कठीण वाटणाऱ्या विषयाची गोडी लागावी, म्हणून सहावीनंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत गुरुजींनी इंग्रजी शिकवणारे एक शिक्षक शाळेत आणले. मे महिन्याच्या त्या सुट्टीत, इंग्रजीच्या गुरुजींनी आम्हाला स्पेलिंग कसे बनवायचे, मराठी नावे इंग्रजीत कशी लिहायची ह्याचे शिक्षण दिले. त्यांनी मराठीतील स्वर, व्यंजने व संपूर्ण बाराखडी इंग्रजीत कशी लिहायची ते शिकवले, आणि खरे सांगतो, आजतागायत त्या शिकवण्याचा फायदा मी उपभोगतो आहे.

आपल्यापैकी किती जणांनी पॅरेशूट प्रत्यक्ष पाहिले आहे? हाताळले आहे? आमच्या ह्या आवडत्या गुरुजींनी आम्हाला खरेखुरे पॅरेशूट दाखवले, हाताळायला दिले, ते कसे वापरले जाते ते दाखवले. आमच्या वर्गात शालिनी जाधव नावाची एक मुलगी होती. तिचा मोठा भाऊ सैन्यात होता. गुरुजींनी तिच्याशी बोलून, तिच्या भावाला त्याचे पॅरेशूट घेऊन शाळेत मुलांना दाखवण्यासाठी आणण्यास सांगितले. एक दिवशी शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेनंतर तो सैन्यातला भाऊ पॅरेशूट घेऊन शाळेत आला. ते पॅरेशूट एवढे मोठे होते की ते संपूर्ण उघडून दाखवायला शाळेचा वर्ग अपुरा पडला. मग ते पॅरेशूट शाळेतील ध्वजारोहणाच्या खांबाला बांधून उघडून दाखवण्यात आले. ते पॅरेशूट संपूर्णपणे सिल्कसारख्या सुळसुळीत पांढर्‍या कापडाचे होते, त्याला सिल्कसारख्या दिसणार्‍या अगणित मजबूत दोऱ्या होत्या. ते उघडल्यावर छत्रीसारख्या दिसणार्‍या मध्यावर निळ्या रंगाचे एक जाड कापड होते, ज्याला एक लांबलचक दोरी होती. ही दोरी, पॅरेशूट बांधून उडी मारणाऱ्याचा हातात असते. त्या दोरीच्या नियंत्रणाने उडी मारणारा सैनिक पाहिजे त्या ठिकाणी पॅरेशूट उतरवू शकतो, असे ज्ञान आम्हाला त्या सैनिक भावाने दिले. आजही त्या पॅरेशूटचा झुळझुळीत स्पर्श आणि त्याचा अवाढव्य आकार मनात घर करून आहे.

सातवीत गेल्यावर आम्हाला वर्गशिक्षिका मोडक बाई होत्या. एक दिवस बाई आल्या नव्हत्या. त्यामुळे वर्गात दंगा चालू होता. इतक्यात पाटील गुरुजी वर्गात आले व म्हणाले, “चला, आज आपण एक नवीन खेळ खेळू या. नेहमी शिक्षक मुलांना प्रश्न विचारतात, आज तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तरे देईन.” पहिली काही मिनिटे गुरुजी खरे बोलताहेत की चेष्टा करताहेत तेच समजेना. साक्षात शिक्षकांना प्रश्न विचारायचे? असे त्याआधी कधीच ऐकले नव्हते. पण गुरुजींनी त्याचा पुनरुच्चार केला आणि आम्हाला खातरी करून दिली, की आम्ही कोणतेही प्रश्न गुरुजींना विचारू शकतो आणि ते त्या प्रश्नाचे उत्तर देणार. एवढे सांगूनही प्रश्न विचारायचे धारिष्ट्य कोणालाही होईना. मग गुरुजींनीच काही प्रश्न उपस्थित केले आणि त्याची उत्तरे दिली. आणि मग काय विचारता, बांध फुटल्यासारखी मुले प्रश्न विचारू लागली. आकाश निळे का असते? समुद्राचे पाणी खारट का असते? पाण्याचा रंग कोणता असतो? गाईंचे रंग वेगवेगळे असतात, मग म्हशीचा रंग काळाच का असतो? न्यूटनच्या चक्रात सात रंग एकत्रित पांढरे दिसतात, मग तेच सात रंग एकत्र मिसळले असता ते मिश्रण पांढरे न होता काळे का दिसते? अणुबाँबमध्ये काय भरतात? वगैरे. ज्या प्रश्नांची उत्तरे गुरुजी लगेच देऊ शकले नाहीत, त्याची उत्तरे त्यांनी दोन-तीन दिवसांनी दिली. त्यानंतर हा खेळ आम्ही सतत खेळू लागलो. ज्या ज्या वेळी गुरुजींना वेळ मिळे, त्या त्या वेळी आम्ही आधीच लिहून ठेवलेले प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडत असू. पण एकदाही ते आमच्या आचरट प्रश्नांवर चिडले नाहीत की कंटाळले नाहीत. आजच्या संदर्भात बोलायचे झाल्यास १९७० सालातील ते आमचे ‘गूगल’ महाराज होते. काळाच्या कितीतरी पुढे होते आमचे पाटील गुरुजी.

गुरुजींनी आम्हाला निरीक्षण करायला शिकवले, निरीक्षण करून मनात उद्भवणारे प्रश्न निर्भयपणे विचारायला शिकवले. आजही एखाद्या मीटिंगमध्ये, ट्रेनिंग सेशनमध्ये मनात आलेले प्रश्न बिनधास्तपणे विचारायची हिम्मत त्यांच्या शिकवणीमुळेच मी करू धजतो. कित्येक वेळा असे झाले आहे की विचारलेला प्रश्न एकदम साधा आणि कित्येक वेळा बावळटपणाचा वाटतो. खरे म्हणजे तोच प्रश्न इतरांनाही पडलेला असतो, मात्र लाजेखातर विचारायची हिम्मत करायला कोणी तयार झालेला नसतो. अशा वरकरणी बावळट वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर देणारा मात्र जेव्हा, “चांगला प्रश्न आहे तुमचा” असे म्हणून उत्तर द्यायला सुरुवात करतो, त्या वेळी अंगावर मूठभर मास चढते. निर्भयपणे प्रश्न विचारण्याची हिम्मत ही मला मिळालेली पाटील गुरुजींची एक मोठी देणगी आहे, हे मी कृतज्ञापूर्वक सांगू इच्छितो.

पाटील गुरुजींच्या अंगात निरीक्षण करण्याची वृत्ती अगदी भिनली होती. एकदा वर्गात त्यांनी एका मुलाच्या हातावर, चेहऱ्यावर काही पांढरे डाग पाहिले. त्यांनी एक टाचणी घेऊन, त्या मुलाला दुसरीकडे बघायला लावून त्या डागांवर टोचले व त्याला काही जाणवते का विचारले. त्या मुलाने “नाही’ म्हटल्यावर दुसर्‍या दिवशी शाळेत पालकांना घेऊन यायला सांगितले. दुसर्‍या दिवशी त्या मुलाचे पालक शाळेत आले, मुख्याध्यापकांच्या कार्यालयात त्यांचे काही बोलणे झाले व ते त्या मुलाला घेऊन घरी निघून गेले. त्यानंतर तो मुलगा शाळेत पुन्हा काही आला नाही. गुरुजींना विचारले असता असे कळले की त्या मुलाला कुष्ठरोगाची बाधा झाली होती, त्याच्या अंगावर पडलेले पांढरे डाग हे त्याचेच लक्षण होते. गुरुजींनी ते वेळीच ओळखले, त्या मुलाला उपचार घेण्यासाठी पाठवले. पुढे तो मुलगा अगदी बरा झाला व त्याला जणू काही जीवनदानच लाभले. त्याला जीवनदान लाभले आणि वर्गातील इतर मुले संसर्गापासून बचावली. हे सर्व शक्य झाले ते आमच्या गुरुजींच्या निरीक्षणशक्तीमुळेच आणि विद्यार्थ्यांविषयीच्या त्यांच्या आत्मीयतेमुळे.

वर्गात एकदा गुरुजींनी एका मुलीला अभ्यासातील एक प्रश्न विचारला. उत्तर देताना उभे राहून उत्तर देणे अपेक्षित असते. इथे ती मुलगी मान खाली घालून बसूनच राहिली, जागची हलेना, काहीच बोलेना. गुरुजींनी वयाने मोठ्या अशा एका मुलीला सोडून वर्गातील इतर सर्व मुलांना बाहेर मैदानावर खेळायला जायला सांगितले. काय झाले ते आम्हाला काहीच कळेना. नंतर खूप दिवसांनी आमच्यातीलच एका मोठ्या मुलाने सांगितले की त्या मुलीला वर्गातच मासिक पाळी सुरू झाली होती, जी गुरुजींनी आपल्या अनुभवावरून ताडली. वर्गातील मोठ्या मुलीची मदत देऊन तिला घरी पाठवून दिले. मासिक पाळी वगैरे म्हणजे काय हे समजण्याचे ते आमचे वय नव्हतेच, पण त्या विषयाचे गांभीर्य आणि गुरुजींनी ज्या प्रकारे तो प्रसंग हाताळला त्याचे आज नुसते कौतुकच वाटते असे नसून गुरुजींविषयी आदर द्विगुणित होतो.

एकदा शाळेत, शाळेतीलच मुलांचे एक छोटेसे चित्रकलेचे प्रदर्शन भरवले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पाटील गुरुजींच्या हस्ते होणार होते. प्रदर्शन भरवलेल्या वर्गाच्या दारावर एक लाल रिबिन बांधली होती. ती कापून उद्घाटन होणार होते. उद्घाटनप्रसंगी गुरुजींनी ती रिबिन मधोमध न कापता अगदी एका कडेला कापली. लगेच ती रिबिन सोडून एका लहान मुलीला केसांना बांधायला दिली. ती रिबिन जर मधोमध कापली असती, तर तिचा काहीच उपयोग झाला नसता. पण गुरुजींनी ती एका बाजूने कापून त्याचा उपयोग करून दाखवला. गुरुजींनी उपदेशापेक्षा कृतीवरच नेहेमी भर दिला.

सातवी पास झाल्यावर दुसर्‍या शाळेत जाणे भाग पडले, कारण ह्या शाळेत फक्त सातवीपर्यंतच वर्ग होते. सातवीच्या सेंडऑफच्या वेळी त्यांनी केलेले भाषण आजही स्मृतिपटलावर कायम आहे. गुरुजी म्हणाले होते, “प्रत्येकात बुद्धिमत्ता कमी-जास्त प्रमाणात असू शकते; मात्र कष्ट करायची तयारी, प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल, तर यश तुमचंच आहे.” वर्गातील मुलींना उद्देशून ते म्हणाले होते, “मुलींनो, तुम्ही उद्याच्या गृहिणी आहात. घर इतकं नेटकेपणाने सांभाळा की घरातले दिवे गेले, तरी घरात ठेवलेला सुई-दोरा तुम्हाला अंधारातदेखील अचूकपणे सापडला पाहिजे.” आज इतक्या वर्षांनी हे वाक्य आठवते, म्हणजेच त्या वाक्याने माझ्या मनावर किती खोलवर परिणाम झाला असला पाहिजे हे उमजते.

पुढे शिक्षण पूर्ण झाले, नोकरी लागली, लग्नही झाले. पाटील गुरुजी आमच्या घरापासून तसे जवळच राहायचे. कित्येक वेळा ते रस्त्याने येता-जाताना दिसायचे. ज्या वेळी माझे इतर मित्र त्यांच्या गुरुजनांपासून तोंड लपवायचे, त्याच वेळी मी मात्र पाटील गुरुजी कधीही दिसले की न चुकता त्यांच्यापुढे लवून “गुरुजी, नमस्कार” म्हणायला चुकलो नाही. आणि तसे करताना, इतके चांगले गुरुजी आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्याला लाभले ह्याबद्दल देवाचे आभारच मानीत असे. सहावी-सातवीच्या त्या कोमल आणि संस्कारक्षम वयात मला इतके चांगले शिक्षक लाभले, ह्याला मी माझ्या पूर्वजन्माची पुण्याईच समजतो.

आमचे आवडते पाटील गुरुजी कधीच निवृत्त झाले. आज ती शाळादेखील बंद झाली आहे व आमच्या वर्गांचा उपयोग गोदामे म्हणून होत आहे. पण आजही त्या शाळेवरून जायचा योग आला, तर माझे सहावी-सातवीचे वर्ग बघण्याचा मोह आवरता येत नाही. सहकुटुंब अथवा मित्रपरिवाराबरोबर जाताना, प्रत्येकाला, ‘प्रथमदर्शनी न आवडलेली, पण मा‍झ्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारी’ ती म्युनिसिपालटीची शाळा आवर्जून आणि अभिमानाने दाखवतो.

Footer

कथा

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

19 Oct 2017 - 9:06 am | गुल्लू दादा

गुरुजींना प्रश्न विचारणे हे भन्नाट वाटले. गुरुजी ची कल्पकता आवडली.

सुखीमाणूस's picture

19 Oct 2017 - 10:44 am | सुखीमाणूस

तुम्ही भाग्यवान आहात

प्रदीप's picture

19 Oct 2017 - 10:58 am | प्रदीप

इतका सुरेख, की तुमच्या ह्या पाटील गुरूजींना भेटावेसे वाटू लागले आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व.

सुबोध खरे's picture

19 Oct 2017 - 11:32 am | सुबोध खरे

निरीक्षण करून मनात उद्भवणारे प्रश्न निर्भयपणे विचारायला शिकवले. आजही एखाद्या मीटिंगमध्ये, ट्रेनिंग सेशनमध्ये मनात आलेले प्रश्न बिनधास्तपणे विचारायची हिम्मत त्यांच्या शिकवणीमुळेच मी करू धजतो. कित्येक वेळा असे झाले आहे की विचारलेला प्रश्न एकदम साधा आणि कित्येक वेळा बावळटपणाचा वाटतो. खरे म्हणजे तोच प्रश्न इतरांनाही पडलेला असतो, मात्र लाजेखातर विचारायची हिम्मत करायला कोणी तयार झालेला नसतो.
हि अतिशय महत्त्वाची गोष्ट बऱ्याच वेळेस चांगले शिक्षकहि विसरतात.
आपल्याला "पाटील गुरुजीं"सारखे शिक्षक लाभले हे आपले थोर भाग्य आहे. आजकाल असे शिक्षक विरळाच दिसतात.
मुलांना जीवन शिक्षण देणे हा एक पुस्तकात आढळणारा विषय राहिला आहे. याची आठवण प्रकर्षाने लोकांना फक्त कठीण काळात येते.
भरपूर पैसे मिळवणे म्हणजेच आयुष्यात यशस्वी होणे या व्याख्येमुळे शाळांत अशा गोष्टी शिकवणे मागे पडले आहे. मुलाचा सर्वांगीण विकास म्हणजे कोणता विषय आणि त्याला किती मार्क आहेत आणि त्याचे गाईड कुठे मिळते? असेच प्रश्न पालकांना पडताना आढळतात.
आजकाल विद्यार्थ्यांचा कल ट्युशन (शिकवणी म्हणजे डाऊन मार्केट वाटतं) मध्ये शिकायचं आणि शाळेत( परत तेच काय शिकायचं म्हणून) फक्त टिवल्या बावल्या करण्याकडे दिसतो. कॉलेजची परिस्थिती अजूनच वेगळी आहे.
आमचा एक मित्र पार्ल्याच्या कॉमर्स कॉलेजात शिकवतो त्याच्या वर्गात १०० पैकी फक्त ३ विद्यार्थी हजर होते. याने त्यांना विचारले का हो बुवा तुम्ही तरी का वर्गात हजर आहात? त्या वर ते म्हणाले कि सर आम्ही क्लासला जात नाही.
त्यातून जागतिकीकरणाच्या रेट्यात बरेच शिक्षक इतर वेळेस खाजगी क्लासेस मध्ये शिकवताना आढळतात. शिक्षकाचा त्याग, समर्पण होऊन शिकवणे इ. गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.
कोण बरोबर आणि कोण चूक हा मोठा प्रश्न आहे.

सुरेख लेख.. तुम्ही भाग्यवान आहात की असे शिक्षक तुम्हाला लाभले.

सिरुसेरि's picture

21 Oct 2017 - 10:54 am | सिरुसेरि

आदर्श शिक्षकाची ओळख करुन देणारा वाचनीय लेख

स्नेहांकिता's picture

21 Oct 2017 - 12:43 pm | स्नेहांकिता

अगदी अनोखं व्यक्तिमत्व !
तुमचे भाग्य थोर म्हणून असे हरहुन्नरी शिक्षक लाभले.

संजय पाटिल's picture

21 Oct 2017 - 12:54 pm | संजय पाटिल

अतिशय सुरेख परीचय!! मला आमचे हिरेमठ गुरुजी आठवले...

पद्मावति's picture

21 Oct 2017 - 2:01 pm | पद्मावति

आदर्श शिक्षक! असे शिक्षक मिळणे हे उत्तम भाग्याचे लक्षण आहे.

विशाल वाघोले's picture

21 Oct 2017 - 2:33 pm | विशाल वाघोले

लेख वाचून आमच्या मनेर सरांची आठवण आली.
मनेर सर आमचे १० वी चे क्लास टिचर, ते आम्हाला हिंदी हा विषय शिकत. हिंदीचे व्याकरण त्यांनी इतके छान शिकवले होते. वर्गातील सर्व मुलांना हिंदी व्याकरणाचे पैकी च्या पैकी मार्क मिळत असे.

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2017 - 4:35 pm | प्रभाकर पेठकर

तुमचे पाटील गुरुजी हे पूर्ण 'गुरु' होते हे शब्दाशब्दात जाणवले. मी ही दहिसरला म्युनिसिपल शाळेतच सातवी पर्यंत शिकलो पुढचे शिक्षण दहिसरातच खाजगी शाळेत झाले.
आम्हालाही विरकुड सर, बारदेशकर सर असे पुस्तकाबाहेरचे विज्ञान शिकवणारे गुरू भेटले आणि आमचा त्या विषयातील रस वाढत गेला. प्रत्येकाच्या आयुष्यात असे गुरू येऊन गेलेले आणि आपल्या शिक्षकवृत्तीची छाप सोडून गेलेले असतात. आज काल शाळेतील वातावरण, शिक्षक-विद्यार्थी नाती आणि शिक्षकांची शिकविण्याची कळकळ कितपत असते हे माहीत नाही. पण आमच्या काळात (असं म्हणायच्या वयाला शेवटी पोहोचलो तर...) ह्या सर्वाची घट्ट वीण असायची आणि गुरू हे गुरू असायचे.

खुप छान लिहिले आहे. गुरुंप्रती आदर आणि प्रेम भरभरून व्यक्त होतो आहे. श्रद्धा आहे, नक्कीच यशस्वी व्हाल.

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:46 pm | पैसा

सुरेख!

mayu4u's picture

23 Oct 2017 - 2:59 pm | mayu4u

सोडावाला लेन ला आता मनपाची मोठी शाळा आहे ना?

विनिता००२'s picture

23 Oct 2017 - 3:50 pm | विनिता००२

सुरेख !! गुरुजींना प्रणाम __/\__

मित्रहो's picture

24 Oct 2017 - 10:19 pm | मित्रहो

नशीबवाण आहात तुम्हाला असे शिक्षक भेटले. अशी माणसेच कित्येकांचे आयुष्य घडवित असतात.

नाखु's picture

24 Oct 2017 - 11:26 pm | नाखु

मातीच्या गोळ्याला आकार देणारे कुशल हात!!

जुइ's picture

25 Oct 2017 - 12:28 am | जुइ

निर्भयपणे प्रश्न विचारण्याची हिम्मत ही मला मिळालेली पाटील गुरुजींची एक मोठी देणगी आहे, हे मी कृतज्ञापूर्वक सांगू इच्छितो.

प्रचंड सहमत!

गुल्लू दादा - गुरुजींना, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणे ही खरंच नवलाची गोष्ट होती त्यावेळी.
सुखीमाणूस, मोदक, स्नेहांकिता, पद्मावती, मित्रहो - आता मागे वळून बघता मी खरंच भाग्यवान आहे असे मला वाटते. देव करो आणि सर्वांना असेच चांगले शिक्षक लाभोत.
प्रदीप - मला वाटते आमचे पाटील गुरुजी अजूनही बोरीवलीलाच राहत असतील. त्यांचा सध्याचा पत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. मिळाल्यावर कळवीन. आभार.
सुबोध खरे - तुम्ही एक ज्वलंत प्रश्न मांडला आहे. स्पर्धेच्या ह्या युगात महत्त्व फक्त पर्सेंटला उरले आहे, कारण हे पर्सेंटच तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा नक्की करतात, त्यामुळे 'मागणी तसा पुरवठा' हेच तत्व शिक्षण क्षेत्रातही दिसते. मनापासून शिकवणारे शिक्षक आणि तितकेच मन लावून शिकणारे विद्यार्थी हल्ली विरळाच झाले आहेत. हेच जरी वास्तव असले तरी, चांगले शिक्षक लाभणे हे एक भाग्याचीच गोष्ट आहे.
सिरुसेरी, संजय पाटील - तरी मी पाटील गुरुजींच्या अनेक गोष्टी लिहिल्या नाहीत, जसे ते आमचे स्काऊटचे पण शिक्षक होते वगैरे. लेख आवडल्याबद्दल आभार.
विशाल वाघोले - मला खात्री आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आयुष्यावर चांगला परिणाम करणारे शिक्षक येऊन गेले आहेत.
प्रभाकर पेठकर - मला वाटते की आपल्या काळात म्युनिसिपालिटीच्या शाळेत अनेक उत्तमोत्तम शिक्षक होऊन गेले ज्यांनी अगदी मन लावून मुलांना शिकवले. स्पर्धा ही प्रत्येक काळात होती तरी पण पुढे पुढे ती भयंकर होत गेली. मार्क मिळवणे हेच एक उद्दिष्ट्य राहिले, 'शिक्षण' मागे पडत गेले. डोळे उघडे ठेवले तर आयुष्यात शिकण्यासारखा खूप गोष्टी आहेत आणि तितकेच चांगले गुरु देखील. चांगल्या शिक्षकांचे वर्णन करताना, आपल्या सारख्यांचे आशिर्वाद लाभले, हे देखील मी माझे भाग्यच समजतो.
mayu4u - माझ्या माहितीनुसार ती शाळा आता बंद झाली आहे, तेथे म्युनिसिपालिटीची गोडाऊन्स व काही ऑफिसेस उघडली आहेत.
पैसा, विनिता००२, नाखु - लेख आवडल्याबद्दल आभार.
जुई - प्रश्न विचारणारी मंडळी लोकांना आवडत नाहीत, त्यांना अशी मंडळी निगेटिव्ह स्वभावाची वाटतात. परंतु प्रश्न विचारून शंका निरसन झाल्यास अशी मंडळी पूर्ण विश्वासाने आणि उत्साहाने कार्यात सहभागी होतात. मनातले प्रश्न, शंका निर्भयपणे विचारल्याने आपलेच ज्ञान वाढते.

>>>>तरी मी पाटील गुरुजींच्या अनेक गोष्टी लिहिल्या नाहीत, जसे ते आमचे स्काऊटचे पण शिक्षक होते वगैरे.

भाग 2 लिहा मग!!

स्वाती दिनेश's picture

5 Nov 2017 - 3:05 pm | स्वाती दिनेश

पाटील गुरुजी आवडले,

तरी मी पाटील गुरुजींच्या अनेक गोष्टी लिहिल्या नाहीत, जसे ते आमचे स्काऊटचे पण शिक्षक होते वगैरे.
भाग 2 लिहा मग!!
मोदक यांच्याशी सहमत.

स्वाती