पौष्टिक चटणी

ऋतु हिरवा's picture
ऋतु हिरवा in पाककृती
30 Aug 2017 - 2:40 pm

पडवळाच्या बिया आणि शिराळ्याच्या सालींची चटणी : प्रकार १

पडवळाची भाजी केली तेव्हा पडवळच्या बिया व गर काढून फ्रीज मध्ये ठेवला. दोन दिवसांनी चटणी केली.
शिराळ्याची आमटी करणार होते. त्यासाठी शिराळ्याची साले (दोडका) किसणीवर किसून घेतली व ती साले वेगळी ठेवून दिली.

आधी कढई मध्ये पांढरे बिन पॉलिशचे तीळ पाव वाटी किंवा एक मोठा चमचा भाजून घेतले. ते वेगळे काढून ठेवले.

मग कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद , मिरची (आवडीनुसार) , कढीपत्ता चार-पाच पाने अशी फोडणी केली. त्यात पडवळाच्या बिया आणि शिराळ्याची किसून ठेवलेली साले घातली.दोन वाफा आणल्या. (पडवळाच्या बियांना पाणी सुटते. परतल्यानंतर ते सुखून जाते.) मग त्यात मीठ, एक चमचा साखर, थोडा खवलेला ओला नारळ, कोथिंबीर व पाव लिंबू पिळले. थोडा वेळ परतले. गॅस बंद केला व हे मिश्रण थोडा वेळ गार होऊ दिले.

मिक्सरमध्ये आधी भाजलेले तीळ वाटून घेतले व एका ताटलीत काढून ठेवले. मग कढईतले मिश्रण वाटून घेतले. त्यात वाटलेले तीळ मिसळले व सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरवर वाटून घेतले.

चटणी खूपच चविष्ट झाली. शिवाय भाजीचे कामही झाले. ही ओली चटणी भाकरीबरोबर खायला उत्तम! पोळीबरोबर, आमटी-भाताबरोबर कशीही खावी.

नुसत्या पडवळाच्या बियांची, नुसत्या शिराळ्याच्या सालांची व दुधी भोपळ्याच्या सालांची अशाच प्रकारे चटणी करता येते. खूप चविष्ट होते आणि यामध्ये खूप पौष्टिक घटक असतात, ते वाया जात नाहीत.

पडवळाच्या बिया कोवळ्या असाव्यात. पडवळ कोवळे असले की बियाही कोवळ्या असतात.

शिराळ्याची चटणी : प्रकार २

४ ते ५ शिराळी किसणीवर फक्त साले किसून घ्यावीत. त्याचा कीस उन्हात वाळवावा किंवा ताटात पसरून घरात ठेवला तरी बर्यापैकी वाळतो. ८-१० मिरच्या (आवडीप्रमाणे) तुकडे करून घ्याव्यात. सुखे खोबरे किसून भाजून घ्यावे. पांढरे तीळ भाजून घ्यावेत.

कढई मध्ये हिंग, हळद, कढीपत्ता अशी फोडणी करावी. तेल थोडे जास्त घालावे. त्यावर मिरच्या आधी टाकाव्यात. त्या कुरकुरीत होतील इतपत परतून घ्याव्यात. मग त्यावर शिराळ्याची साले घालून ती ही खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावी. मग त्यावर भाजलेले तीळ आणि भाजलेले सुख्खे खोबरे घालावे. मीठ घालून चांगले परतून घ्यावे.

झाली खमंग, कुरकुरीत चटणी तयार. ही चटणी लहानमुले ही खातील. यातील मिरच्याही तळल्या गेल्यामुळे फारशा तिखट लागत नाहीत. पण काही मिरच्या तिखट जातीच्या असतात. त्या शक्यतो वापरू नयेत. त्यामुळे चटणीही तिखट होईल. त्यापेक्षा कमी तिखट मिरच्या वापरल्यास मिरच्याही खाता येईल. जेवताना उत्तम तोंडीलावणे म्हणून ही चटणी उपयोगी येईल.

आधी चटणी करून खाऊन झाली. ती एवढी चविष्ट झाली की मिपा वर पाककृती द्यावी असे वाटले. त्यामुळे फोटो नाही.

प्रतिक्रिया

चांगल्या वाटत आहेत ह्या दोन्ही चटण्या. जमल्यास पुन्हा करून फोटो काढून डकवा इथे.

ऋतु हिरवा's picture

30 Aug 2017 - 6:50 pm | ऋतु हिरवा

हो नक्की

मदनबाण's picture

30 Aug 2017 - 5:41 pm | मदनबाण

फोटो नसल्याने पास !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पेसालागी ऑर्डर कुट्टे... ;) BRAHMA

ऋतु हिरवा's picture

30 Aug 2017 - 6:51 pm | ऋतु हिरवा

स्वाक्षरी काय प्रकार आहे? मला कळले नाही

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:28 pm | ऋतु हिरवा

फोटो दिले आहेत. कृपया पहावेत व प्रतिसादावे :)

पिंगू's picture

30 Aug 2017 - 6:43 pm | पिंगू

फोटो पाहिजेत.

बाकी चटणीची पाककृती छान आहे.

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:27 pm | ऋतु हिरवा

फोटो दिले आहेत. कृपया पहावेत व प्रतिसादावे :)

स्वाती दिनेश's picture

30 Aug 2017 - 9:33 pm | स्वाती दिनेश

शिराळ्याच्या/दोडक्याच्या सालींची चटणी अतिशय आवडती..
स्वाती

पैसा's picture

30 Aug 2017 - 9:59 pm | पैसा

फटु पायजेत! पाकृ छान!

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:26 pm | ऋतु हिरवा

फोटो दिले आहेत. कृपया पहावेत व प्रतिसादावे :)

अनन्न्या's picture

31 Aug 2017 - 12:13 pm | अनन्न्या

मस्त!

प्राची अश्विनी's picture

1 Sep 2017 - 8:19 am | प्राची अश्विनी

मस्तच, अशीच भोपळ्याच्या सालीची पण करतात.

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 12:00 pm | ऋतु हिरवा

होय बरोबर

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 12:07 pm | ऋतु हिरवा

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:05 pm | ऋतु हिरवा

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:09 pm | ऋतु हिरवा


सर्व मिश्रण तेलावर फोडणी करून परतून घेतले.

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:11 pm | ऋतु हिरवा


चटणी तयार

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:14 pm | ऋतु हिरवा


थोडीशी सजावट


शिराळे किसणीवर उभे धरून साले किसून घ्यावीत

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:20 pm | ऋतु हिरवा


शिराळ्याची साले किसून वाळण्यासाठी ताटात पसरून ठेवली

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:22 pm | ऋतु हिरवा


चटणीची सर्व तयारी

ऋतु हिरवा's picture

8 Sep 2017 - 1:24 pm | ऋतु हिरवा


चटणी तयार

कंजूस's picture

8 Sep 2017 - 2:39 pm | कंजूस

छान!
फोटोही झकास!