स्मार्ट सिटी आधी कि स्मार्ट सिटीझन?

उमेश धर्मट्टी's picture
उमेश धर्मट्टी in काथ्याकूट
29 Aug 2017 - 4:54 pm
गाभा: 

कोंबडी आधी कि अंड आधी हे न सुटणार कोड सोडवत आपण मोठे झालो....उत्तर मिळणार नाहीच त्यामुळे त्यात वेळ न घालवलेलाच बरा
आता नवीन कोड पडलाय स्मार्ट सिटी आधी कि स्मार्ट सिटीझन?
भारतभर अनेक शहर स्मार्ट सिटी होण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्याच शहरांमध्ये प्रश्न सारखेच आहेत जसे वाहतूक, घन कचरा, २४ तास शुद्ध पाणी पुरवठा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, खड्डेमय रस्ते इत्यादी. यादी कार्याला गेलं तर खूप मोठी होईल...पण ढोबळमानाने हे प्रश्न सार्वत्रिक आहेत आणि सामान्य माणसाला रोज भेडसावणारे आहेत.
स्मार्ट सिटी मध्ये हे सगळे यक्ष प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे जो अतिशय स्तुत्य आहे, आणि महत्वाचे म्हणजे एका प्रामणिक करदात्याचा तो हक्क पण आहे.
म्हणजेच स्मार्ट सिटी हे एक आपल्याला आदर्श इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देईल.
आता खरी गम्मत आहे. स्मार्ट सिटी होईल देखील तयार कारण काम तर सगळीकडे चालूच आहेत पण बदलेल्या सिटी मध्ये राहायला हि मानसिकता लागेल ती आहे का?
मानसिकता म्हणजे काय? उभारलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा योग्य आदर आणि वापर करायची लायकी आहे का? कि आपण पूर्वीसारखेच वागणार आहोत? जर तसे होणार असेल तर स्मार्ट सिटीचा बोजवारा उदयाला फार काळ नाही लागणार.
स्मार्ट सिटी चा मुख्य घटक हे तिथला आणि एकूणच सगळेच नागरिक आहेत. म्हणूच स्मार्ट सिटीझन हा अतिशय आवशयक आणि अविभाज्य घटक निर्माण करणे हि काळाची गरज आहे.

स्मार्ट सिटीझन म्हणजे काय हो?
सगळेच स्मार्ट फोन वापरतात म्हणून काही सगळे स्मार्ट आहेत असं नाही.
दोन शब्दात सांगायचा झालं तर स्मार्ट सिटीझन म्हणजे ज्याचा “सिविक सेन्स (Civic Sense)” जागृत आहे असा माणूस.
सिविक सेन्स म्हणजे काय तर आजू बाजूच्या वातावरणाचे भान ठेवून केलेले वर्तन. उदा. U Turn मारण्याच्या ठिकाणी आपले पार्किंग कुठे करावे ह्याचा तारतम्य असणे. सिविक सेन्स म्हणजे आपल्यापासून दुसऱ्याला त्रास तर होत नाही ह्याच भान असणे. अशे अनेक मुद्दे आहेत आणि ते आपल्याला सगळ्यांना रोज जाणवतात आणि आपण फक्त चरफडतो किवा एवढे निर्ढावलो आहोत कि त्याचा काही वाटेनास झालं आहे....आणि म्हणूनच “चलता है” वृत्ती बळावत जाते.

मग आपण काय करू शकतो?

दिवसातून एका तरी माणसाला त्याच्या चुकीची जाणीव करून देऊ शकतो का? जसे कि झेब्रा क्रॉसिंग वर उभे राहू नका? किंवा हिरवा सिग्नल लागला असताना पादचारी रस्त्यावर क्रॉस करू नये किंवा अनेक पालक शाळेत मुलांना सोडताना विरुद्ध दिशेने गाडी चालवत जातात....त्यांना हे कळत नाही कि न कळत ते मुलावर चुकीचे संस्कार करत आहेत....अशी अनेक उदाहरणे आहेत.
मला आणि एक नेहेमी वाटत, पुढची पिढी जी खऱ्या अर्थानी स्मार्ट आहे त्यांना ह्या सगळ्यामध्ये सामील केले तरच हे सगळ शक्य आहे.
शाळांमध्ये ह्या विषयी शिकवत असतीलहि पण त्यावर जास्त जोर देणे गरजेचे आहे. त्यांना सिग्नल management, वाहतूक नियंत्रण आणि नियम ह्यांचा शिक्षण, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा वापर इत्यादी गोष्टी समाविष्ट करता येतील. तेच फक्त हे change drive करू शकतात कारण जुने खोड सुधारणे फार अवघड आहे कारण म्हणतात न सुंभ जळाला तरी पीळ जात नाही...महणून ओल्या मातीवर संस्कार केले तर स्मार्ट सिटीझन निर्माण होतील
आपण सगळे ह्या गोष्टीवर नुसते विचार न करता योगदान देऊ शकतो आपापल्या बुद्धी आणि शक्ती प्रमाणे

चला करून बघू या एक प्रयत्न....

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

29 Aug 2017 - 7:46 pm | वेल्लाभट

सहमत आहे कारण तुम्ही सांगितलेल्या जवळपास सगळ्या गोष्टी मी रोज नित्यनेमाने करत असतो

ज्योति अळवणी's picture

30 Aug 2017 - 1:00 am | ज्योति अळवणी

अगदी सहमत.

आपण नकळत अनेकदा एखादा कागदाचा कपटा खिडकी बाहेर फेकतो. अनेकदा कोणाला थुंकताना बघतो पण आपण करत नाही ना इतकाच विचार करून त्यांना थांबवत नाही. असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे एक नागरिक म्हणून आपली मानसिकता बदलणं दरखील तितकंच आवश्यक आहे

II श्रीमंत पेशवे II's picture

31 Aug 2017 - 4:31 pm | II श्रीमंत पेशवे II

अस तर स्मार्ट सीईटी चा बागुलबुवा करून ठेवलाय .......त्या दृष्टीने नक्की काय पावलं उचलली आहेत ते काय कळत नाहीये
आमची डोंबिवली आणि कल्याण हे उपनगरे पण स्मार्ट सिटी प्रोजेक्ट च्या अंतर्गत आली आहेत त्याबद्दल वर्षभरा पूर्वी बोंब मारून झाली

नक्की हे कळत नाहीये कि ज्या शहरांची नावे ( जी काही १०० शहरे ) स्मार्ट सिटी साठी घेतली आहेत ति स्मार्ट अगोदरच आहेत आणि मग त्यांची निवड झालीये
कि आता त्या शहरांना खरच स्मार्ट करणार आहेत ? कि फक्त स्मार्ट सिटी चे झबले चढवणार आहेत ??

काहीतरी हालचाली दिसायला हव्यात त्या दिसतच नाहीयेत. स्मार्ट सिटी ला अपेक्षित असणाऱ्या सोयी सुविधा , रस्ते , सांडपाणी , वीज ,कचरा व्यवस्थापन इत्यादी ....... या बद्दल काही नवीन ऐकायला मिळालेलं नाही.

या शंभर शहरांमध्ये मिशन राबवायच्या आधी एखाद्या मध्यवर्ती शहरात एक नवीन छोटे गाव ( मोडेल टाऊन ) उभे करून लोकांना ते पाहण्याची संधी द्यावी , त्यानंतर स्मार्ट सिटी चा प्रोजेक्ट राबवावा , लोकांना दिसलं तर ते अंगवळणी पडेल.

शहरे लोक बनवतात सरकार नाही. कुठल्यातरी मराठी माणसाने वेडे होऊन भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला आणि बॉलिवूड निर्माण झाले त्यामुळे मुंबई शहराला फायदा झाला. कधी कधी सरकार राजधानी वगैरे बनवून शहराचा विशेष फायदा करून देते पण बहुतेक वेळा काही तरी विशिष्ट ध्यास घेतलेले लोक शहरे घडवतात.

स्मार्ट सिटी हे थोथांड आहे. आधी कचरा व्यवस्थापन किंवा रस्ते बांधणी इत्यादी सध्या गोष्टी सरकारने करून दाकवाव्यात, स्मार्ट वगैरे पाहिजे असेल तर लोक स्वतः बनवून घेतील.

सोमनाथ खांदवे's picture

1 Sep 2017 - 9:59 pm | सोमनाथ खांदवे

बरुबर हाये , आमच्या पुण्यात तर 20 किमी जान्या साठी 2 तास लागत्यात . अरुन्द रस्त्यावर ती गाड्या चीं गर्दी अस्ताना पूर्वी च्या सत्ताधार्याणि पैसे खायला मिळत्याला म्हणून राबावलेली बी आर टी योजना , आणि अत्ताचे सत्ताधारी 3 वर्ष झालेत डोळ्या ला झापड़ लावून बसल्यात . P m p l ला तुकाराम मुंढे सारखे हुशार अधिकारी अस्ताना पुण्याच्या महापुर बाई मीटिंग साठी मानपान खेळत बसल्यात . शहाणे असलेल्या पुनेकरानी पुण्याला सोडून पिम्परि चिंचवाड़ ला राहयला जाव म्हनजे निरोगी जगत्याल .

संजय पाटिल's picture

2 Sep 2017 - 12:24 am | संजय पाटिल

पुण्याच्या महापुर बाई मीटिंग साठी मानपान खेळत बसल्यात
काय भाषा..
क्रु.ह.घे.

सतिश गावडे's picture

2 Sep 2017 - 7:21 am | सतिश गावडे

दिवसातून एका तरी माणसाला त्याच्या चुकीची जाणीव करून देऊ शकतो का? जसे कि झेब्रा क्रॉसिंग वर उभे राहू नका?

हे निदान पुण्यात तरी शक्य नाही.

भंकस बाबा's picture

6 Sep 2017 - 4:47 pm | भंकस बाबा

हे कॉय असतं बॉ? कशासाठी असतं बॉ?
एक मुंबईकर

अत्रुप्त आत्मा's picture

2 Sep 2017 - 8:38 am | अत्रुप्त आत्मा

छान लेख.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 6:16 pm | अमरेंद्र बाहुबली

गाभा:
कोंबडी आधी कि अंड आधी हे न सुटणार कोड सोडवत आपण मोठे झालो....उत्तर मिळणार नाहीच त्यामुळे त्यात वेळ न घालवलेलाच बरा

उत्तर मिळालं म्हणे....अंड्याच कवच तयार होण्यासाठी लागणारं प्रोटीन फक्त कोंबडीच तयार करू शकते. त्यामुळे कोंबडी आधी. ( दुवा बिवा माझ्याकडे नाही. कुठतरी वाचलयं एवढंच)

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Sep 2017 - 5:42 pm | अनिरुद्ध.वैद्य

असच कुठेस वाचलेलं.

चष्मेबद्दूर's picture

3 Sep 2017 - 8:27 pm | चष्मेबद्दूर

मी पुणं सोडून आणि बडोदा नामक शहरात राहायला लागून एक वर्ष झालं.
पुण्यातली परीस्थिती बरी आहे असं वाटायला लावणारं हे शहर कम खेडं जास्त आहे. इथले रस्ते मोकळे, डांबरी, पाऊस कमी पडत असल्याने रस्त्यांवर खड्डे नाहीत, सगळे मोठे रस्ते 'मोठे' याच सदरात मोडतील असे, सगळीकडे सिग्नल्स ची छान सोय, सगळ्या मोठ्या चौकांमध्ये मोठी sculptures आणि landscaping केलेलं.
आता बघा, या छान infrastructre मध्ये वहानं चालवायला जी मानसिकता आवश्यक आहे ती कशी असायला पाहिजे ,,, की सगळे चालक नियम पाळतील वगैरे. तर हा *गैरसमज* पूर्णपणे दूर होतो आपला. एकतर सगळे triple seat बसून दुचाक्या चालवतात. प्रत्येक ठिकाणी wrong side नी येतात, कधीही कसेही कुठूनही कितीही वेगाने आपल्याला cross होतात,,,,,आणि इथले वाहतूक police ना काही अधिकार असावेत असं अजिबात वाटत नाही. त्यांनी मारलेल्या शिट्टीचा आवाज ऐकून कुत्रं देखील त्यांच्याकडे बघणार नाही. रस्त्यामध्ये झुंडीने बसलेल्या गायी हा एक विनोदाचा विषय आहे.
सांगण्याचा मुद्दा असा की, स्मार्ट सिटी साठी आधी लोकांना प्रशिक्षित करा, मगच त्यांना सोयी सुविधा पुरवा.

रॉंग साईड ने येणारी गाडी दिसली कि मी सायकल मुद्दाम रस्त्याच्या कडेच्या १.५ फुटात चालवतो. अगदी चालकाच्या नजरेत बघून. त्यांना गाडी थांबवली पाहिजे नाहीतर रस्त्याच्या खाली तरी नेली पाहिजे. थांबवली कि अगदी जवळ पोचून (आणि मागून येणाऱ्या गाडीकडे लक्ष ठेऊन) हलका कट मारून लेन बदलतो. तो सुधरो न सुधरो - त्याला त्रास दिल्याचं समाधान मिळत.
असाच सिग्नल ला सायकल घेऊन झेब्रा क्रॉसिंग आधी थांबायचं. मागून कितीही हॉर्न वाजवले तरी साफ दुर्लक्ष करायचं.
अशा ठिकाणी त्या गाडीत मुलं (म्हणजे लहान मुलं बरका) असतील तर अधिक उत्तम. त्यांना पण आपले पालक चुकत आहेत हे कळलं पाहिजे.
सरकार किती काय करणार? ट्राफिक पोलीस जर याकडे दुर्लक्ष करत असतील - किंबहुना पोलिसच रॉंग साईड ने / सायकल ट्रॅक मधून गाड्या चालवत असतील तर हे असले उद्योग आपल्यालाच करणे भाग आहे.

येणाऱ्या बऱ्याच दुचाक्यांना मी परत पाठवलं आहे. दत्तवाडी पुलावरून म्हात्रे पुलावर जाताना समोरून बरेच दुचाकी वाले येतात. कारण काय असाव तर तिकडून म्हणजे घरकुल lawns कडून म्हात्रे पुलाकडे येण्यासाठी बराच वळसा पडतो. एवढे कष्ट कोण घेईल?
अशा लोकांना मी माझी दुचाकी आडवी घालते. त्यांना जायला जागा मिळू नये इतकी त्यांच्या गाडीच्या समोर माझी गाडी नेते. खोखो खेळते म्हणा. आणि माझ्या हेल्मेट ची काच वर करून त्यांच्या अंगावर ओरडते ...परत वळ मागे, उलट्या दिशेनी नाही यायचं .....वगैरे वगैरे. हा प्रकार मी लागोपाठ दोन तीनदा केला. मला वाटलं कि लोकस आता आपल्याला ओळखायला बिल्खायला लागणार. पण हे असे उपाय किती दिवस आणि किती वेळा करायचे ? सतत जागल्या बनून राहणे म्हणजे डोकेदुखी आहे हो !

सोमनाथ खांदवे's picture

5 Sep 2017 - 9:26 am | सोमनाथ खांदवे

हे तुम्ही दिवस असताना करु शकता , रात्रि च्या वेळी ह्या मुजोर लोकानां किती ही गांधीगिरी करून सांगितले तरी सुधारणार नाहीत , मला 15 / 20 वर्षा पूर्वी पुणे एयरपोर्ट रोड ने दुचाकी वर संध्याकाळी घरी जाताना एयरपोर्ट वरून येणाऱ्या मुजोर कार वाल्यांचा खुप त्रास व्हायचा , त्या वेळी 15 फूटी असलेल्या रोड वर कमी गर्दी असताना सुद्धा एयरपोर्ट वरुन येणाऱ्या गाड्या F1 च्या ट्रैक सारख्या ओवरटेक करत अंगावर यायच्या , दुचाकी , सायकल ना रोड च्या खालीच उतरावयला लावायाचे . शेवटी वैतागुन अंगावर येणाऱ्या कार च्या दिशेने गोटी सारखे छोटे दगड भीरकवयला सुरवात केली , ' खट ' आवाज आल्या मुळे कारवाले बाजूला घेवून बघायचे कसला आवाज आला , परिणामी त्यांच्या कार चे नुकसान न करता त्यांच्या मुजोर वृत्ति ला लगाम लावण्यात थोडासा यशश्वी झालो . हे करताना माझ्या पाठीमागे कोणी येत नाही हे पाहुन करायचो , कधी कधी गनिमी कावा वापरावा लागतो .

भंकस बाबा's picture

6 Sep 2017 - 4:53 pm | भंकस बाबा

अशा सायकल चे टायर काढून पोरं चक्क चक्का खेळतात. सायकलवाला बाजूला कुठेतरी दवाखान्यात स्वताचे पंक्चर काढत असतो

काय नाय हे स्मार्ट सिटी. बोगस धंदे आहेत. सगळा कचरा रंगवून वरवर सुशोभिकरणाचे धंदे आहेत. आमच्या इथे तर जाहीरातींवरच इतके खर्च केले गेलेत की त्या तुलनेत कामे अगदी नाममात्र झाली आहेत. आजकाल ते कम्प्युटर ग्राफीक्सवर नियोजित बिल्डिंगा, बस स्टेशन, फ्लायओव्हर वगैरे वगैरे कमी खर्चात बनवून घ्यायचे अन ते व्हाटसपवर सोडून पब्लिकला येड्यात काढायचे चालू आहे. लोक त्यालाही कसे भुलतात ते कळत नाही. राजकारणी, माफीया, गुत्तेदार लोक त्यातूनही पैसे काढायचे मार्ग हुडकत आहेत. बाकी इतर आधीपासून चालू असलेल्या विकास कामांची तक्रार नाहीये. रस्ते मोठे आहेत. चांगले आहेत. नवीन होताहेत पण त्याची किंंमत अतिरिक्त इंधनभारातून आम्ही भरतच आहोत. गेल्या चार महिन्यातले पेट्रोलचे नियमित वाढते दर पाहून फेफरे येत आहेत. आज ७९.४५ होते. कुणालाच कसे काही वाटत नाहीये. नोटाबंदी इंजेक्शनने इतका बधीरपणा आला आहे का कळत नाहीये. स्मार्ट सिटी वगैरे प्रकारांचे परफेक्ट डेफिनेशन कुणालाच माहीत नाहीये. काही म्हणतात सर्व व्यवहार कॅशलेस म्हनजे स्मार्ट तर काही म्हनतात सर्व गोष्टी एका कार्डवर म्हणजे स्मार्ट. शाळात आणि होर्डिंगावर शिकवतात जबाबदार नागरिक म्हनजे स्मार्ट. तर कॉर्पोरेशन म्हनते वेळेवर घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणारे नागरिक स्मार्ट. पोलीस म्हनतात ऑनलाईन एफायार करणारे स्मार्ट नागरिक तर राजकारणी म्हणतात नुस्ती व्हाटसपवर पब्लिसिटी पाहून आम्हाला निवडून देणारे स्मार्ट नागरिक.

धर्मराजमुटके's picture

4 Sep 2017 - 5:30 pm | धर्मराजमुटके

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पान / तंबाखु / गुटखा खाऊन पचापच थुंकण्यासाठी काय विशेष सोय केली आहे का आराखड्यात ? :)