ब्रह्मगिरी - भांडारदुर्ग मोहीम

Primary tabs

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
1 Jul 2017 - 1:02 am

ब्रह्मगिरी-भांडारदुर्ग मोहीम


१. धुके दाटलेले...

रविवारला जोडून सोमवारची ईदची सुट्टी होती. जून महिन्याचा शेवटचा रविवार, पावसाला सूर गवसू लागलेला. खरं तर शनिवारी रात्रीच ट्रेकसाठी निघायचे होते. पण १८ जूनला कळसूबाईला जाऊन आले होते, बच्चे कंपनी स्पेशल ट्रेक करुन. त्यामुळे आत्ता घरुन रजा नव्हती. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नाशिकला जाऊन अपघात झालेल्या माझ्या भाचीला भेटायचे होते. मग नाशिक आणि ब्रह्मगिरी-भांङारदुर्ग असा कार्यक्रम आखला. सहा गडी तयार झाले. पण ऐन वेळी पावसात वाट निसरडी असेल म्हणून तिघांनी येण्याचे रद्द केले. लेकिन हमारे हौसले बुलंद थे; शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे रविवारी पहाटे मन जरा साशंक झाले. पण डॉक्टरांच्या संदेशानी दिलासा दिला. ठीक सात वाजता ठाण्याहून निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचले होते. त्यामुळे गाडी अगदी हळू चालवणे भाग होते. तरीही मधे-मधे पुलाखाली वगैरे काचेवर धबधबे कोसळत होते. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती, त्यामुळे पावसामुळे अडकून पडायला लागले तरी चिंता नव्हती. वाटेतले हिरवे डोँगर मन तृप्त करत होते. आता धबधबेही कोसळू लागले होते. बाहेर पाऊस रंगात तर गाडीत एकमेकांची थट्टा-मस्करी रंगात आली होती. वातावरणच तसे प्रसन्न आणि आनंदाने चिंब करणारे होते. बाबा दा ढाब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी होती. मग फक्त डिझेल भरुन आणि चाकांतली हवा तपासून लगेच पुढे निघालो. बरोबर आणलेला डबा काढून खमंग तिखट पु-यांचा आस्वाद घेतला आणि थेट नाशिक गाठले. तिथे सगळ्यांच्या भेटी, थोड्या गप्पा झाल्या.                        त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यात अनेक डोंगर, धुके आणि ढग खुळावत होते.

२. ब्रह्मगिरी चढताना सभोवार दिसणारे दृश्य

घाट चढून आल्यावर पावसानीही जरा उसंत घेतली होती. मग कॕमेरा बाहेर निघाला आणि निसर्गरम्य दृश्य त्यात बंदिस्त होऊ लागली. अशा मनस्वीपणामुळे त्र्यंबकेश्वर गाठून ब्रह्मगिरीची चढाई सुरु करायला दुपारचे दोन वाजले.  
ब्रह्माद्री हे ब्रह्मगिरीचे मूळ नाव. परंतु अशी आख्यायिका आहे की भगवान शंकर ब्रह्मदेवांवर प्रसन्न झाले आणि त्यांचे नाव ब्रह्मदेवांच्या नावाला जोडले जाऊन या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी झाले. ब्रह्मगिरीवर गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांचे वास्तव्य होते. गौतम ऋषींनी येथे गंगा अवतीर्ण करण्यासाठी श्रीमहादेवांची तपश्चर्या केली.

३. मूळगंगा मंदिर

म्हणूनच येथे ही नदी 'गौतमी' या नावानी ओळखली जाते. सड्योजटा, वामदेव, अघोरा, ईशान आणि तट पुरुष अशी या पर्वताची पाच शिखरेअसून ती शिवाच्या पाच मुखांची प्रतीके आहेत.

४. ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांवरुन एक वर्तुळाकार दृष्टिक्षेप

अठराशे फूट उंच उठावलेल्या ब्रह्मगिरीची समुद्रसपाटीपासूनची उंची ४२४८ फूट आहे. आजच्या दिवस जेवणाला सुट्टी देऊन चढाईला सुरुवात केली. कराचीचे सेठ लालचंद यांनी १९०८ साली या पर्वतावर ५०० पायऱ्यांचे बांधकाम केले. सरकारने आता दुतर्फा रेलिंगही घातले आहे, त्यामुळे भक्तगणांना त्याचा आधार मिळतो. ऊनही नाही आणि पाऊसही नाही अशी मस्त हवा होती. दूरवर अंजनेरी पर्वत व त्र्यंबकेश्वर व परिसरातील डोंगरमाथे दिसत होते.

५. ब्रह्मगिरीच्या वाटेवरुन अंजनेरी पर्वत

रविवारचा दिवस असल्यामुळे भाविकांची बरीच वर्दळ व देवदर्शनाची लगबग होती. आपल्या पूर्वजांचा इथे मुक्त संचार असल्याने कॕमेरा, पाउच इ. ची काळजी घ्यायला खबरदारी म्हणून ट्रेकिंग स्टिक बरोबर ठेवली होती.

६. भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती

वाटेत गंगाद्वाराकडे जाणारी वाट उजवीकडे ठेवून आम्ही सरळ चालत राहिलो. पहिला चढ संपल्यावर एका टपरीवर आलं घातलेलं मधुर चवीचं लिंबू सरबत पिऊन तरतरी आली. तिथे भांडारदुर्ग कोणत्या बाजूला, जायला किती वेळ लागतो इ. चौकशी करुन सुसाट ब्रह्मगिरीच्या माथ्याकडे झेपावू लागलो. बरीच उत्साही मंडळी वर-वर जाऊन फोटो काढत होती. समोर हर्षगड व भास्करगड स्पष्ट ओळखू येत होते.

७. डावीकडे हर्षगड व उजवीकडे भास्करगड

त्यामागच्या डोंगररांगा मात्र अंधुक होत्या. नाहीतर रतनगड, कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग या ओळखीच्या किल्ल्यांचीही दृष्टिभेट घडली असती.

८. दूरवर दिसणाऱ्या पर्वतरांगा

किल्ला नजरेच्या टप्प्यात आला; पण वाट मात्र बिकट भासत होती. तरीही दोन-तीन टप्पे खाली उतरलो. त्यानंतर मात्र वाट अशक्य दिसत होती. तेवढ्यात डावीकडे नजर गेली तर शिवजटा मंदिराच्या मागच्या बाजूनी एक अरुंद पायवाट दुर्गभांडाराच्या दिशेने चाललेली दिसली. मग तिथून काळजीपूर्वक परत फिरुन वीस मिनिटांत शिवजटा मंदिर गाठले आणि त्या पायवाटेला लागलो. डावीकडे खोल दरी आणि उजवीकडे डोंगर अशी पायवाट पाच मिनिटांत पार झाली. पाऊस पडत नसल्यामुळे निसरडी वाट, चिखल, तुफानी वारा यांचा सामना करण्याच्या साहसाला मुकावे लागले. पायवाट संपली;

९. अंजनीपुत्र श्रीहनुमान

शिवकालीन गडांप्रमाणे वाटेच्या उजवीकडे हनुमानाचे छोटेखानी शिल्प दिसले आणि मग आत्तापर्यंत अदृश्य असलेल्या कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या खोल घेऊन जाऊ लागल्या.

१०. अजोड वास्तुकलेचा नमुना असलेल्या पोटात खोदलेल्या पायऱ्या

क्षणभर सांधण दरीची आठवण झाली. एकेका पायरीची उंची जवळपास दीड फूट अशा ५०-६० पाय-या उतरताना मध्ये एक सौम्य वळण होते. ही वाट एका जेमतेम अडीच-तीन फूट उंची असलेल्या दरवाजापाशी घेऊन आली.

११. अरुंद पुलावर सोडणारा गुप्त दरवाजा

हा दरवाजा बुजून याची उंची कमी झाली आहे का अशी शंका आली; पण नाही गडाच्या सुरक्षिततेसाठीच ही गुप्त वाट अशी मुद्दाम निर्मिलेली असावी. इथे डोके खाली नमवून भूमातेचा आधार घेतच जावे लागते. यानंतर येतो दोन किल्ल्यांमधला अरुंद पूल. दोन्ही बाजूला हजार फूट खोल दरी, समोरच्या डोंगरात खोदलेल्या गंगाद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्या, सभोवार दिसणारे डोंगर-किल्ले हे सारे दृश्य, नजरेत भरत व मनःपटलावर रेखाटत हा चिंचोळा पूल पार केला. आणि पुनश्च अडीच-तीन फूट उंचीचा मूल होऊन  रांगत जा म्हणणारा दरवाजा आला. तो ओलांडल्यावर भांडारदुर्गाच्या बाजूच्या कातळात खोदलेल्या, दीड फुटी ५०-५५ पायऱ्या मध्ये एक सौम्य वळण घेत चढून दुर्ग भांडारवर घेऊन गेल्या. इथे काळं कुत्रं सुध्दा फिरकत नाही असं म्हणायला जागा नको म्हणून काळू आमच्याबरोबर वर पर्यंत आला होता. मी पाठीवरची सॕक खाली ठेवली आणि फोटो काढायला पाउचमधून मोबाइल काढला आणि सॕक आणि पाउच तिथेच ठेवून परिसराचे व दुर्गाचे फोटो घेऊ लागले. इतक्यात इतर दोघेही वर पोहोचले आणि आता इथे योग्य जागा बघून थोडी पोट पूजा करावी असा विचार करतोय तोच मागे वळून बघत्येय तर वानरांची टोळी रांगेत उभी होती. जवळची काठीही खालीच ठेवली होती. पण तिची गरज पडली नाही; कारणआमच्याबरोबर आलेल्या काळूनी सगळ्या माकडांना भुंकून-भुंकून अंगावर धावून जात हाकलून दिले. 

१२. आमचा सोबती काळू

आता आकाशात ढगांनी गर्दी केली होती. थोड्या वेळापूर्वी स्वच्छ दिसणारे भास्करगड आणि हर्षगड धुक्याची पटले लेवून सजले होते. आकाशात मध्येच कुठे सोनेरी महिरप लेवून सजलेला निळ्या रंगाचा तुकडा दिसत होता तर कुठे ढगांचे रथ चालत होते. त्र्यंबकेश्वरचे डोंगरही मध्येच धुक्यातून मान वर काढत होते. या सा-या पार्श्वभूमीवर हिरवाईने नटलेली पाचूंची शिखरे उठून दिसत होती.

१३. हिरवा निसर्ग हा भवतीने..

हा सारा निसर्ग कॕमेरॕमध्ये किती टिपू आणि काय सोडू अशी तिघांचीही तारांबळ उडाली. मग शांत दगडावर बसून खाऊचे डबे उघङले आणि काळू व त्याच्या मित्रांना नैवेद्य दाखवल्यावर आम्हीही थोडे खाऊन घेतले. आता मात्र परतीचा प्रवास सुरु करणे आवश्यक होते. दोन तासांपूर्वी माणसांनी फुलून गेलेल्या या जागेवर आता फक्त वाट चुकलेली किंवा उशीर झालेली दोन-चार डोकी दिसत होती. आम्हालाही शक्यतो उजेडात खाली उतरुन मुक्कामी पोहोचायचे होते. रात्री ७.३० पर्यत खाली उतरून घोटीच्या रस्त्याला लागलो. रात्री आठला हा रस्ता मध्यरात्र झालेली वाटावी इतका सुनसान होता. घोटी आल्यावर चहा आणि नाश्त्यासाठी   मनाजोगतं हॉटेल शोधण्यात बराच वेळ मोडला. पण नवा दिवस सुरु होण्याच्या आत पावणेबारा वाजता ठाण्याला पोहोचलो. मनात विचार घोळत होते, या दुर्ग भांडाराचे असे अद्भुत बांधकाम कोणी बरे केले असेल? आजही त्र्यंबकेश्वर व ब्रह्मगिरी परिसरात भाविकांची एवढी गर्दी असते पण भांडारदुर्ग हे अप्रतिम वास्तुरचना असलेले स्थळ अज्ञात आणि गूढ कसे? एक अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या या किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घ्यायलाच पाहिजे.

१४. किल्ले भांडारदुर्ग

 

प्रतिक्रिया

वा! भांडारदुर्ग काय रौद्रसुंदर दिसतोय!

दुर्गविहारी's picture

1 Jul 2017 - 7:21 am | दुर्गविहारी

अफलातून रचना आहे हि!!! किती दिवस जाण्याचे प्लान करतोय. बघु केव्हा जमतेय.
बाकी खुप छान लिहीत़ा तुम्ही ़

भ ट क्या खे ड वा ला's picture

1 Jul 2017 - 8:41 am | भ ट क्या खे ड वा ला

उत्तम फोटोज , लेख .
नुकतिच " विश्वस्त " वाचली त्यात दुर्गभांडार चे वर्णन आहे . त्याची आठवण झाली .. नमिताजी ट्रेक व लिखाण असेच सुरु राहू दे .

कंजूस's picture

1 Jul 2017 - 11:22 am | कंजूस

फोटो बघून जावंसं वाटतय.
मारुतीने डोळे फारच वटारले आहेत!
फार आटोपशिर छान लेख लिहिला आहे

प्रचेतस's picture

1 Jul 2017 - 11:28 am | प्रचेतस

नाशिक आजोळच असल्याने ब्रह्मगिरीला खूपदा जाणं झालंय. तिथल्या त्या अभेद्य कातळभिंती फार सुरेख आहेत.
भंडारदुर्ग ही त्र्यंबकगड उर्फ ब्रह्मगिरीचा एक टेहळणीचं ठिकाण आहे. तिथे पूर्वी मेट असावं. अवघड वाटेमुळे शिवाय गडाच्या अगदी कोपर्‍यात असल्याने इतरांना त्याबद्दल फारशी माहिती नाही.

निलदिप's picture

1 Jul 2017 - 12:28 pm | निलदिप

मला फोटो दिसत च नाही कधीच.... काही सेटिग असेल का ?

प्रसाद_१९८२'s picture

1 Jul 2017 - 2:48 pm | प्रसाद_१९८२

अप्रतिम लेख व फोटो.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 4:27 pm | मुक्त विहारि

तुम्ही नेहमी ट्रेक करता का?

तसे असेल तर इथे (मिपावर) बरेच उत्तम ट्रेकर्स आहेत.

(तसे आम्ही पण ट्रेकिंग करतो.दर शनिवारी संध्याकाळी, डोंबिवली(पुर्व) ते डोंबिवली (पश्र्चिम) रेल्वेचा ब्रिज २ वेळा क्रॉस करतो.)

प्रत्येकाने ट्रेकला जाण्यापुर्वि प्रोग्राम मिपावर टाकावा म्हणजे इतरांनाहि जोइन होता येइल. --- प्रेमळ विनंती बर का.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 5:51 pm | मुक्त विहारि

पण....

इथे बहाणेदारांची कमतरता नाही.

त्यामुळे, आले माझिया मना, मी निघालो, हेच उत्तम. (चला आता आमची ट्रेकिंग करायची आणि मग सुक्ष्मात जायची वेळ झाली.आमचे गोंदवलेकर महाराज निघाले पण असतील.)

नमिता श्रीकांत दामले's picture

1 Jul 2017 - 5:55 pm | नमिता श्रीकांत दामले

नक्की
कुठे टाकायचा कार्यक्रम ?

मग काही प्रतिसाद येतील.

१. मी नक्की (म्हणजे १% येणार)

२. अरेच्चा, मी नेमका त्यावेळी येवू शकणार नाही. कारणे असंख्य...(१००% नाही)

३. मी येतोय (परत १% येणार.... मग ऐनवेळी टांग मारणार...)

४. शुभेच्छा. (हे सगळ्यात मस्त.म्हणजे १००% नाही.)

(अशा बर्‍याच धाग्यात गुंतलेला पण अद्याप ही न सुधारलेला) कट्टाप्पा मुवि

नरेंद्र गोळे's picture

1 Jul 2017 - 7:35 pm | नरेंद्र गोळे

भांडारदुर्ग काय रौद्रसुंदर दिसतोय! अफलातून रचना आहे ही!! >>>>>>>> सत्यवचन!

धन्य भांडारदूर्ग, धन्य तुम्ही आणि धन्य तुमचे पदभ्रमण. सगळेच आवडले. लेखनही.

तिथे जायची इच्छा निर्माण झाली. त्रिंबकेवश्वर गावातून जाऊन परत येण्यास एकूण किती वेळ लागला होता तुम्हाला?

नमिता श्रीकांत दामले's picture

3 Jul 2017 - 12:03 am | नमिता श्रीकांत दामले

ब्रह्मगिरीवरा जायला पाऊण ते एक तास आणि भांडारदुर्गाला जायला पुढे अर्धा तास एवढाच वेळ लागतो. दुर्ग भांडारावर फिरायला एक तास; तेवढाच वेळ परत जाण्याहाठी. पण ब्रह्मगिरीच्या भटकंतीसाठी कितीही वेळ लागू शकतो . त्याशिवाय गंगाद्वार १०८ शिवलिंगे हे सारे बघायला गेले तर एक दिवसही कमी पडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2017 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

भांडारदुर्ग काय रौद्रसुंदर दिसतोय! अफलातून रचना आहे ही!!

फोटो बघितल्यावरच जायची इच्छा व्हावी असे ठिकाण ! तुमच्या वर्णनाने अजून मजा आली !

पद्मावति's picture

2 Jul 2017 - 1:15 am | पद्मावति

खुप मस्तं.

अजया's picture

2 Jul 2017 - 9:37 pm | अजया

निव्वळ अप्रतिम!

वकील साहेब's picture

3 Jul 2017 - 11:54 am | वकील साहेब

ज्या ठिकाणी मूळ गंगा मंदिर आहे तेथून वरती ब्रम्हगिरी पर्वताचे सर्वात उंच ठिकाण म्हणजे पाच शिखरे आहेत याला पंच लिंग असे म्हणतात. या सर्वोच्च ठिकाणा वर जाण्याची वाट भलतीच अवघड आणि बिकट आहे पण रोमांचक पण तितकीच आहे. तेथून दिसणारे निसर्ग सौंदर्य म्हणजे अफलातून अफलातून आणि अफलातून असे आहे. थंडगार वाऱ्याचे झोत अंगावर घेत दूर दूर पर्यंत दिसणारे निसर्ग सौंदर्य कवेत भरून घेण्याचा आनंद काही औरच आहे. तेथून पूर्वेकडे पाहिल्यास ३० कि मी दूर असलेल्या गंगापूर धरणाचे पाणी दिसते. दक्षिणेकडे अवाढव्य पसरलेले वैतारणा धरण, उत्तरे कडे सप्तशृंगी चा डोंगर आणि अन्य पर्वत रांगा. आणि पश्चिमे कडे वृक्ष राजी ने नटलेला जव्हार चा घाट. निसर्गाचे हे सर्व विराट रूप बघून आपल्याला आपले अस्तित्व किती नगण्य आहे याची जाणीव होते.
या पंच लिंग म्हणजे पाच शिखरा पैकी एका शिखरा च्या पोटात एक पाण्याचा गडू दडलेला आहे. म्हणजे नैसर्गिक पाण्याचा साठा. त्याचे मुख केवळ एका कपा च्या तोंडा इतकेच आहे पण आत थंडगार पाण्याचा भला मोठा साठा आहे. त्यात नळी टाकून पाणी ओढता येते. इतक्या उंचावर जाऊन घमेजलेले झाल्यावर असे थंडगार पाणी मिळणे म्हणजे काय सुख असते ते तेथे गेल्यावरच समजते. पण एवढ्या मोठ्या शिखरात एका कपा च्या आकाराचे ते छिद्र शोधणे म्हणजे सोबत माहितगार असल्या शिवाय नाहीच.
तसही ब्रम्हगिरीच्या मध्यावर १९९६-१९९७ साली मध गोळा करणाऱ्या स्थानिक आदिवासी लोकांना एक पाण्याचे गुप्त कुंड सापडले आहे त्याचेहि पाणी थंडगार आणि पिण्यायोग्य आहे. कुंड एका भूयारी मार्गातून खूप आत गेल्यावर दिसते. आत मध्ये torch किंवा मशाली चाही उजेड फारसा पडत नाही इतका मिट्ट काळोख असतो. पण ते कुंड बघण्याचा अनुभव अत्यंत रोमांच कारी असाच आहे.
गौतमी मंदिराच्या मागील बाजूस हत्ती दरवाजा आहे. हेच या दुर्गाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हत्ती सुद्धा सहज जावू शकेल इतके मोठे असल्याने याला हत्ती दरवाजा असे म्हणत असावेत. या ठिकाणी दगडी बांधकाम, बुलंद दरवाजाचे अवशेष, मंदिरे, देवी देवतांच्या मुर्ती, हे सर्व या दुर्गाचा वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही येथे अस्तित्वात आहेत. ( पंच लिंगावर आणि हत्ती दरवाजा येथे देखील भग्न तोफा आणि निकामी तोफगोळे आढळून यायचे म्हणे ) येथे उतरण्या साठी एक लोखंडी शिडी पण बसवलेली आहे. आपण दुर्ग चढताना ज्या बाजूने चढतो ती खर तर दुर्गाची मागील बाजू आहे आणि हत्ती दरवाजा हि मुख्य म्हणजेच पुढील बाजू आहे. हि ठिकाण बघितल्यावर हा दुर्ग चांगला समजून घेता येतो. पण पंचलिंग किवा हत्ती दरवाजा येथे जास्त पर्यटक जात नाहीत. बरेचशे गौतमी मंदिरा पासूनच दर्शन घेऊन परत फिरतात. हा भाग जर बघायचा असेल तर कोणी तरी माहितगार व्यक्ती सोबत असायलाच हवा.
९६-९७ ला म्हणजे अगदीच अलीकडच्या काळात या दुर्गावर सापडलेले पाण्याचे कुंड बघून प्रश्न पडतो कि अजून अशी किती गुपितं हा दुर्ग आपल्या पोटात दडवून बसलेला आहे कुणास ठावूक.

दुर्गविहारी's picture

4 Jul 2017 - 10:07 am | दुर्गविहारी

हि माहिती मला नवीन च आहे. पुढच्या वेळी जाईन तेव्हा हि ठिकाणी शोधायचा प्रयत्न करेन.
बाकी तुमच्याकडे काही फोटो असतील आणि पुरेशी माहिती असेल तर एक नवीन धागा काढा.

इरसाल कार्टं's picture

4 Jul 2017 - 4:38 pm | इरसाल कार्टं

मागच्या वर्षी गेलो होतो आम्ही ते याच मार्गे बहुदा. आधी एक टेकडी चढून मग या वाटेवर जाता येते. पण आता हा दरवाजा कोसळलाय. शिडीवरून चढताना थरकाप उडाला होता मात्र आमचा.
खालील फोटो त्याच मार्गाचे आहेत का तेवढे सांगा.
stair
या शिडीच्या वरच्या टोकाजवळ एवढी निमुळती कपार आहे कि शिडी चढून गेल्यावर आणि उतरताना पाय कुठे ठेवावा आणि पकडावं कुठे काही कळत नाही. पावसाळ्यात तर सगळेच निसरडे झालेले दगड अजून कठीण वाटतात.

a
पहिल्या टेकडीवर हा पाडा लागतो. थोडा सपाट भाग आणि मग खाडी चढाई.

b
याच्या पल्याड मंदिरं आहेत.

c
या पुढे आलेल्या टोकाच्या डाव्या बाजूने नळीतून जावे लागते. मागच्या वार्शीदरद कोसळल्यामुळे रस्ता नाहीसा झाला होता. वेळेवर एक गुराख्याला पैसे देऊन अन विनवण्या करून शिडीपर्यंत आलो होतो.

waterfalls
हे ब्राम्हगिरीवरचे उलटे धबधबे.

way
हा वाडा-खोडाळा-ब्रह्मगिरी मार्गावरच्या घाटातला फोटो.

सुमीत's picture

3 Jul 2017 - 7:28 pm | सुमीत

२ आणि १४ फोटो, उत्तम.

वकील साहेब's picture

5 Jul 2017 - 12:41 pm | वकील साहेब

फारच छान. सर्व फोटो फार सुंदर आलेले आहेत. हत्ती दरवाजा येथे जाण्याचा हा देखील एक मार्ग आहे. दक्षिण बाजूने तळाशी कोजुली नावाचे गाव आहे तेथे तुम्ही गाडी पार्क केली असेल तेथून पायवाटे सारखा रस्ता आहे तेथे चढणीवर अगोदर एक छोटीशी वस्ती लागते. झोल्याची मेट असे त्याचे नाव आहे.(तुम्ही ज्याला पाडा म्हंटले आहे तेच ) तेथून शिडीने वरती चढून जाता येते. वर जो शिडीचा फोटो टाकलेला आहे तो हत्ती दरवाजाचा च आहे. येथेच वरती दगडात खोदलेला एक पाण्याचा साठा आहे तेथे माकडे पाणी पिण्या साठी येतात. म्हणून स्थानिक लोक त्याला माकड तळे म्हणतात. या माकड तळ्याची सफाई करताना मागील वर्षी तेथे एक छोटी तोफ सापडली होती. आजही ती तोफ झोल्याची मेट येथे (धूळ खात ) पडून आहे.

इरसाल कार्टं's picture

5 Jul 2017 - 3:40 pm | इरसाल कार्टं

आम्ही हा मार्ग फक्त ट्रेकिंग करता यावं म्हणून एका मुलाच्या सांगण्यावरून हा मार्ग निवडला. याशिवाय आमचे डोंगराला वळसा घालून जाणेही वाचले कारण हे गाव आमच्या वाद-खोडाला-त्याबकेश्वर मार्गावर लागते.
बऱ्याच जणांना हा मार्ग माहित नाही एवढे नक्की, कारण हे फोटो बघितल्यावर याआधी गेलेल्या बऱ्याच जणांनी आम्हाला या मार्गाबद्दल विचारले.

सानझरी's picture

5 Jul 2017 - 12:59 pm | सानझरी

अफाट भ्रमंती!!!

पिशी अबोली's picture

5 Jul 2017 - 1:05 pm | पिशी अबोली

अहाहा, अप्रतिम!

तुम्ही लिहिताही खूप सुन्दर!

वकील साहेब's picture

5 Jul 2017 - 4:09 pm | वकील साहेब

या दुर्गाच्या बांधणीचा आणि स्थापत्यशास्त्राचा आणखी एक नमुना म्हणजे वर नमिताजिंनी ११ नंबर चा जो फोटो टाकला आहे त्या अडीच ते तीन फुट उंचीच्या दरवाजातून आत गेल्यावर पहाडात खोदलेला भला मोठा जिना दिसतो. या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या व डाव्या बाजूला जेमतेम एक माणूस उभा राहील एवढा चबुतरा दिसतो. तेथे किल्ल्यातील सैनिक शस्त्र सज्ज होऊन पहारा देत असत. शत्रू सैन्या ला आत प्रवेश करतांना या अडीच तीन फुट दरवाजा तून प्रवेश करण्या शिवाय पर्याय नसायचा. प्रवेश करतांना साहजिकच प्रथम शिपायाचे शिर आत जाणार आणि नंतर शरीर प्रवेश करणार. आत प्रवेश करणारा जर शत्रू सैन्यातील शिपाई असेल तर त्याला बचावाची कोणतीही संधी न देता त्याचे शिर तत्काळ धडा वेगळे करणे किल्ल्यातील शिपायाला अत्यंत सोपे जाई. आणि गड सुरक्षित राही. हेच कारण असावे ज्या मुळे हा दरवाजा इतका छोटा ठेवण्यात आलेला असावा.