युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १

Primary tabs

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
2 May 2017 - 9:50 pm

युरोपातील पर्वतराजींत केलेल्या भटकंतीबद्दल, आवडलेल्या काही जागा आणि ट्रेक्सबद्दल लिहायचं बर्‍याच दिवसांपासून मनात होतं. मला ट्रेकिंगचा विशेष अनुभव नाही, तांत्रिक कौशल्य लागणारे ट्रेक्स करत नाही. पण पायी भटकायची आवड आहे. त्यात युरोप म्हटलं कि आल्प्स, डोलोमाईट्स, पिरेनीज या लोकप्रिय पर्वतरांगा पर्यटकांना खुणावत असतात. पायी भटकण्यासाठी असलेल्या सोयीसुविधा, नकाशे, इतर माहिती यांच्या उपलब्धतेमुळे आपल्या क्षमतांनुसार स्वतंत्र फिरता येऊ शकतं.

.

अगदी अर्ध्याएक तासाच्या बाबागाडी नेता येईल अशा रूट्पासून ते एकदोन आठवडे चालणारे hut to hut hikes असे अनेक पर्याय आपल्याला निवडता येतात. अर्थात सार्वजनिक वाहतूक सगळीकडेच चांगली किंवा सोयीची असेल असं नाही. पण ऑस्ट्रियासारख्या देशात उन्हाळ्यात त्यासाठीही विशेष व्यवस्था केली जाते.

नमनाला एवढं तेल पुरे. जमेल आणि वेळ मिळेल तसं लिहायचं ठरवलंय. वाचकांच्या सूचनांचे स्वागत आहे!

प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes)

ऑस्ट्रिया आणि आल्प्स वगैरे बाजूला ठेवून आपण जाऊ या थोडं आग्नेय दिशेला. क्रोएशिया (Croatia) हा आग्नेय युरोपातील एक देश. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांंमधील क्रोएशियाचं एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणजे प्लीट्विच्का जेझेरा (क्रोएशिअन Plitvička jezera, इंग्रजीत Plitvice Lakes) हे राष्ट्रीय उद्यान. झाग्रेब या क्रोएशियाच्या राजधानीपासून दक्षिणेला सुमारे दिडशे किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे. इथे झाग्रेब तसेच झडर या ठिकाणांहून बसने जाता येते. त्याशिवाय खाजगी टूर कंपन्याही एक दिवसाच्या सहली आयोजित करतात. पण स्वतःचे वाहन असेल तर एकदोन दिवस तिथे राहून निवांतपणे फिरणे जास्त सोयीचे पडते.

.

.

प्लीट्विच्का हे क्रोएशियातील सगळ्यांत प्रसिद्ध पर्यटनस्थळ. त्यात भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येवर बंधन नाही. त्यामुळे विशेषतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत इथे खूप गर्दी होते. त्यामानाने आम्ही एप्रिल महिन्यात भेट दिली तेव्हा तुरळक पर्यटक होते. वसंत ऋतूला नुकतीच सुरुवात होत असल्याने झाडांचा राखाडी रंग गेला नव्हता. त्यामुळे हिरवंगार रान काही बघता आलं नाही. पण गर्दी नसेल तेव्हा जायचं हे आमचं आधीच ठरलं असल्याने ते अपेक्षितच होतं. ऋतूप्रमाणे आणि सूर्यप्रकाशाबरोबर प्लीट्विच्का उद्यानाचं रूप बदलत असतं. तसेच प्रवेशशुल्क आणि भेटीच्या वेळाही बदलतात. हिवाळ्यात उद्यानाचा काही भाग बंद ठेवला जातो. त्यामुळे भेट देण्याआधी सगळी माहिती काढणं उत्तम!

मध्य क्रोएशियातील Karst प्रकारचे डोंगर, त्यातून वाहणार्‍या नद्या, भौगोलिक आणि जैविक क्रियांमुळे तयार झालेले बंधारे व तलाव हे या राष्ट्रीय उद्यानाचं स्वरूप. पण या उद्यानात जावं ते बालकवींच्या 'निर्झरास' या कवितेतील बालझर्‍याचं बोट धरून...

गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवित येई
कड्यावरुनि घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या

घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभवती,
जा हळूहळू वळसे घेत लपतछपत हिरवाळीत

.

डोंगरउतारावर पायर्‍यांसारखी रचना असलेले सोळा लहानमोठे तलाव आणि त्यांना जोडणारे असंख्य ओहोळ, झरे आणि जलप्रपात. हे जलवैभव आपल्याला स्तिमित करतंच, पण ते पाहण्यासाठी तयार केलेलं लाकडाच्या ओंडक्यांनी बनविलेल्या पाऊलवाटांचं जाळंही चकित करतं. या पाऊलवाटा आपल्याला कधी एखाद्या शांत तळ्याच्या कडेने मोरपंखी पाण्याचं अंतरंग दाखवितात, तर कधी कड्यावरून कोसळणार्‍या पाण्यापाशी नेतात; पण हे सगळं मात्र पाण्यापासून अंतर राखून. क्वचित कुठे एखादी वाट बुटाच्या तळाला लागेल न लागेल एवढ्या पाण्यात बुडालेली असते. वसंत ऋतूत पाणी कधी वाढलंच तर मात्र उद्यानाचा तेवढा भाग बंद ठेवला जातो.

.

.

पार्कचा आवाका लक्षात यावा यासाठी हा नकाशा:

.

नकाशाच्या मध्यभागी आहे Kozjak हा सगळ्यांत मोठा तलाव. हा तलाव आणि त्याच्या डाव्या बाजूच्या तलावांना मिळून Upper Lakes म्हणतात. हे तलाव आकाराने मोठे आहेत. अप्पर लेक्सपाशी पार्कचे दक्षिण प्रवेशद्वार (Entrance 2) आहे. Kozjak च्या उजव्या बाजूला Veliki slap (“Great Waterfall”) हा धबधबा आणि canyon मध्ये Lower lakes आहेत. इथे उत्तर प्रवेशद्वार (Entrance 1) आहे. सार्वजनिक बस तसेच राहण्यासाठी guest houses च्या दॄष्टीने Entrance 2 सोयीचे आहे. तिथून सुमारे दोन किमीवर प्लीट्विच्का जेझेरा याच नावाच्या गावात राहता येते. त्याशिवाय पार्कमध्येही काही हॉटेल्स आहेत. आम्ही प्लीट्विच्का जेझेरा गावात आदल्या रात्री मुक्काम केला होता.

एवढे सगळे तलाव असले तरी या उद्यानात पोहायला वा पाण्यात जायला बंदी आहे.

Upper आणि Lower lakes ला जोडणारा Kozjak तलाव बोटीने पार करता येतो. परंतु ही सोय दिवसातून एकदाच वापरता येते. बोटीवर चढताना तिकिटावर तशी नोंद केली जाते.

.

Kozjak तलाव

खालच्या फोटोत दिसतात तशा मार्गदर्शक खुणा जागोजागी आहेत. St1 आणि St2 हे पार्कमध्ये चालणार्‍या बसचे थांबे आहेत. तर P1, P2, P3 हे बोटीचे धक्के. बोटी तसेच बसेस नोव्हेंबर ते मार्च या काळात बंद असतात; त्यामुळे फिरण्यावर मर्यादा येतात. इतर वेळी दर अर्ध्या तासाने चालतात.

.

फोटोतील A, B, C, K आणि F,H हे पार्कमधील काही routes आहेत. साडेतीन किमी पासून साडेअठरा किमीपर्यंत (चालण्याच्या) अंतराचे Entrance 1 किंवा Entrance 2 पासून सुरू होणारे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यात बस आणि/किंवा बोटीचा प्रवास येतो. A, B हे Entrance 1 पासून सुरू होऊन Lower lakes ची सफर घडवितात. Entrance 2 पासून सुरू होणारे E, F हे Upper Lakes कडे नेतात. C आणि H या मार्गांनी दोन्ही भाग बघता येतात.

आम्ही H हा Entrance 2 पासून सुरू होणारा ९किमीचा, ४ ते ६ तास लागणारा मार्ग निवडला होता.यात बसने अप्पर लेक्सच्या टोकाला जाऊन अप्पर लेक्स बघतबघत Kozjak ला येऊन बोटीने Kozjak पार करून मग मोठा धबधबा आणि लोअर लेक बघतात. हा मार्ग बहुतांशी उतरणीचा आहे. फक्त अगदी शेवटी मोठा चढ आहे.

अर्थात आपल्या आवडी वा सोयीप्रमाणे आपण route मध्ये फेरफार करू शकतो. फक्त बस व बोटीच्या वेळा आणि बोटीने एकच प्रवास करायचा, हे सांभाळलं कि झालं. त्याचप्रमाणे पार्कच्या बहुतेक भागांमधून परत आपल्या Entrance ला यायला तंगडतोड करण्याशिवाय पर्याय नाही. आणि आराम करायला किंवा बसायलाही जागा खूप कमी ठिकाणी आहे. बहुतेक ठिकाणी बूड टेकवायलाही जागा नाही. हा सगळा विचार करून आपला मार्ग ठरवावा हे बरं! या routes विषयी तसेच पार्कची अधिक माहिती इथे मिळू शकेल. हे सगळं वाचताना कठिण वाटलं तर ती माझी लेखनमर्यादा असेल. प्रत्यक्षात तिथे फिरताना बर्‍याच गोष्टी सोप्या होतात आणि खळखळ वाहणार्‍या पाण्यासंगे आपणही एक थेंब होऊन वाहत जातो.

.

.

Entrance 2 ला ४ एप्रिलला सकाळी आम्ही पोहोचलो तेव्हा संततधार पाऊस पडतच होता. खरंतर सकाळी लवकर निघून दिवसभर फिरून संध्याकाळी पाचपर्यंत तिथून निघून झाग्रेबला जायचं होतं. अंधार पडायच्या आत रस्त्याचा घाटाचा भाग पार करायचा होता. पण सकाळी पाऊस जोरदार होता. दुपारनंतर सूर्यदर्शन होण्याची आशा होती. पावसाचा जोर कमी व्हायला अकरा वाजून गेले. Entrance 2 ला प्रत्येकी ११० कुना (सुमारे १५ युरो) देवून एक दिवसाचं तिकीट काढलं. हे तिकिट हिवाळ्यात ५५ कुना आणि जुलैऑगस्टमध्ये १८० कुना आहे. युरोपातील इतर पर्यटनस्थळांच्या तुलनेत तसेच क्रोएशियातील स्वस्ताई बघता प्रवेशशुल्क जास्त वाटलं. तिथे बरेच कर्मचारी होते, पण माहिती देण्याची इच्छा कुणालाच नव्हती! काही विचारल्यावर तिकिटावर नकाशा आहे तसं जा, एवढंच सांगण्यात आलं. गर्दी नसताना ही कथा! असो.

थंडीमुळे गरम चहा किंवा कॉफी प्यायची होती. पण तिथली खाऊची दुकानं बंद दिसत होती. प्रवेशद्वाराहून बसच्या St2 या थांब्यापर्यंत पायवाटेने जायला १५ मिनिटं लागतात. हा उताराचा रस्ता परत येताना चढून यायचा होता. रस्त्यात लावलेली ही मस्त पाटी...

.

वाटेत एक पार्कचं हॉटेल लागलं. तिथे टेकअवे कॉफीच्या नावाचं गरम पाणी घेतलं. St3 ला जाणारी बस निघायला वेळ होता. तोवर ते पाणी पितापिता तिथे लावलेला तपशीलवार नकाशा बघितला. या नकाशात प्रत्येक छोट्या भागाचं अंतरही दिलं होतं. हा नकाशा आधी बघायला मिळाला असता तर बरं झालं असतं. H route मध्ये सुरुवातीला १० नंबरच्या वाटेने शेवटच्या लेक पर्यंत जायचं होतं. उशिर झाल्याने अंतर वाचविण्यासाठी आम्ही या नकाश्याप्रमाणे St3 हून ११ चा थोडा भाग, मग १५, मग १०, त्यानंतर १४, १३ आणि पुन्हा १० ने P2 ला जायचं ठरवलं. अप्पर लेक्स व्यवस्थित पाहून मग वेळ उरेल त्याप्रमाणे लोअर लेक्स बघू असा विचार होता. तिथे असलेल्या रेंजर्सनीही नीट माहिती दिली. पण पुरामुळे १४ क्रमांकाची वाट बंद आहे हे कोणीही सांगितलं नाही. ते आम्हाला तिथे गेल्यावरच कळलं. त्यामुळे मार्ग पुन्हा बदलावा लागला. खरंतर कोणत्या वाटा बंद आहेत हे पर्यटकांना सुरुवातीलाच सांगायला हवं आणि पर्यायी मार्ग सुचवायला हवे. पण अश्या बाबतीत बरीच अनास्था दिसली.

.

ढग, भुरभुरणारा पाऊस आणि क्वचित डोकावणारा सूर्य अश्या वातावरणात केलेली अप्पर लेक्सची भटकंती:

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

काही क्षणांसाठीही ढगांचा पडदा हलला तरी तोवर काळसर दिसणारं पाणी सूर्यप्रकाश पिऊन निळ्याहिरव्या अनंत रंगच्छटा उधळत असे. तो पाण्याचा खेळ पाहायला मिळावा म्हणून ऊनपाऊसाचा खेळ सुरू राहू दे असं वाटून गेलं.

.

.

.

.

.

.

.

.

कुठे शुभ्र जलधारा तर कुठे चमचमणारे नीलमणी! डोळ्यांचं पारणं फिटणं म्हणजे काय ते आम्ही अक्षरशः अनुभवत होतो. अप्पर लेक्सचा निरोप घ्यावासा वाटत नव्हता, पण जाणं भाग होतं. Lower Lakes were calling...

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

2 May 2017 - 11:16 pm | मंदार कात्रे

छान

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2017 - 11:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रचंड सुंदर सफर आहे ही ! एका मळलेली वाट सोडून केलेल्या या अनवट प्रदेशातील सफरीचा पुढचा भाग लवकर टाका.

पूर्व युरोपातील नैसर्गिक सौंदर्य काही काळापूर्वीपासून जवळ जवळ अनाघ्रात होते. तो भाग हळू हळू आंतरराष्ट्रीय पर्यटनाला खुला होतोय. त्यामुळे त्याचे एक वेगळेच आकर्षण आहे.

निसर्गाच्या अप्रतिम रुपड्यातून फिरताना होणार्‍या मनःस्थितीचे, "खळखळ वाहणार्‍या पाण्यासंगे आपणही एक थेंब होऊन वाहत जातो." याहून चपखल व सुंदर वर्णन करणे कठीण आहे ! त्यासाठी खास टाळ्या !

निशाचर's picture

3 May 2017 - 4:27 am | निशाचर

पूर्व युरोपाबद्दल सहमत आहे. निसर्गसौंदर्याबरोबर इथल्या भाषा, संस्कृती, वास्तुकला हे सगळं वेगळं आणि आकर्षक आहे. त्यात आधुनिकतेचा स्पर्श आता कुठे होतोय! क्रोएशियावर तर ग्रीक, इटालियन, ऑस्ट्रो-हंगेरियन, पूर्व युरोपीय असे अनेक प्रभाव आहेत. क्रोएशिया स्वतंत्र होऊन जेमतेम पंचवीस वर्षं होत आहेत. एवढ्या छोट्या कालावधीत प्रचंड वेगाने बदललेल्या जगाशी जुळवून घेत पुढे जायचा प्रयत्न करणं कौतुकास्पद आहे.

ट्रिपअड्वायझरवर वाचून झडरजवळ अंतर्गत भागात आम्ही एक दिवस भटकलो होतो. पर्यटकांच्या वाटेवरून थोडं दूर गेल्यावर अजूनही तिथे युद्धाच्या खुणा दिसतात. पण त्याचबरोबर लोकांची आपुलकी, मदतीची वृत्ती, इंग्रजी बोलणं, कष्टाची तयारी; तरीही स्वतःचा आब राखणं यांनी भारावायला होतं. (म्हणूनच कदाचित एखादा वाईट अनुभव जास्त खुपतो.) भारताविषयीही तिथे खूप कुतूहल आणि आदर आहे.

फारच सुंदर. आपल्याकडे मिळणाऱ्या फोटोप्रिंट वॉलपेपरवर बऱ्याचदा जे छोटे छोटे धबधबे व लाकडी पाऊलवाटा इत्यादींचे चित्र असते ते इथलेच असावे का असं वाटून गेलं. पुभाप्र.

अगदी असंच मलाही वाटलं होतं. सुरूवातीला वाटलं, अरे ही सीनरी पाहिल्येय आपण कुठेतरी. मग लक्षात आलं की वॉलपेपर्स, कॅलेंडर्सवर अशी चित्रे असतात.

संजय क्षीरसागर's picture

3 May 2017 - 12:48 am | संजय क्षीरसागर

धन्यवाद !

अहाहा.. काय सुंदर फोटो आहेत!

आत्ता फक्त फोटोच पाहिलेत, वेळ मिळाला की वाचेन.

किती सुरेख दिसतेय हे सर्व! क्रोएशियाला पर्यटनासाठी म्हणून जायचे असे ठरवले होते का? काय तयारी केलीत? व्हिसा वगैरे सगळी माहितीही टाकाल शेवटी, प्लीज.

हो, पर्यटनासाठीच गेलो होतो. क्रोएशियाला गेलं की प्लीट्विच्काला जायचं हे आधीच ठरलं होतं. प्लीट्विच्कासारखा करका (Krka) हा नॅशनल पार्क आहे. तिथेही जाणार होतो. पण शेवटच्या क्षणी रद्द करावं लागलं.

क्रोएशियाबद्दल आणखी लिहिण्याचा सध्यातरी मानस नाही. त्यामुळे इथेच थोडक्यात माहिती देत आहे. आणखी नेमकी माहिती हवी असल्यास अवश्य विचारा.

क्रोएशिया युरोपिअन युनिअनमध्ये आहे, पण शेंगेन एरियात नाही. परंतु multiple entry शेंगेन विजा वा रेसिडेंस परमिट असल्यास पर्यटनासाठी तिथे जाता येते. अर्थात १८० दिवसांच्या कालावधीत एकूण ९० दिवसांपेक्षा जास्त राहता येत नाही. आम्ही शेंगेनमध्ये राहत असल्याने विजाचा प्रश्न नव्हता. त्याशिवाय EU आणि इतर काही देशांच्या नागरिकांना विजा लागत नाही. पण त्यात भारत देश येत नाही. शेंगेन विजा नसलेल्या भारतीय नागरिकांना विजासाठी काय करावं लागेल, हे मी सांगू शकत नाही. क्रोएशिया आणि जवळपासचे इतर देश, जसे स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, इटली (फेरी आहेत); अशीही सहल होऊ शकेल. पण त्यासाठी क्रोएशिया आणि शेंगेन असे दोन्ही विजा घ्यावे लागतील किंवा कसे, याबद्दल कल्पना नाही. विजाबद्दलच्या माहितीत चूकभूल द्यावी घ्यावी.

आम्ही शेंगेन मधून गेलो तरीही क्रोएशिया शेंगेनमध्ये नसल्याने जाताना आणि येताना इमिग्रेशन चेक झाला. क्रोएशियात किती दिवस, काय करणार असे जुजबी प्रश्न विचारले गेले.

झाग्रेबसाठी विमानाची स्वस्त तिकिटे मिळाल्याने महिनाभर आधी सहलीचं ठरलं. एप्रिल महिन्यात कमी पर्यटक जातात त्यामुळे राहायला जागा शोधणं सोपं होतं. तिथे हॉटेल्स खूप कमी आहेत. अगदी झाग्रेबलाही राहायला गेस्ट हाउसेस किंवा अपार्टमेंटस् आहेत. त्यामुळे बर्‍याचदा सकाळच्या न्याहारीचीही सोय आपल्याला करावी लागू शकते. अपार्टमेंटमध्ये स्वयंपाकाची सोय असते, विशेषतः शाकाहार्‍यांना उपयोग होऊ शकतो. जागा शोधायला आम्ही बुकिंग.कॉम आणि ट्रिपअडवायझर वापरलं. झाग्रेब आणि झडरला मध्यवर्ती ठिकाणी राहिल्यास पायी फिरता येतं.

कुठे जायचंय आणि तिथे काय बघण्यात रस आहे यावरून किती दिवसांसाठी हे ठरवलं. त्यासाठी ट्रिपअडवाझर या साइटची मदत घेतली. देशांतर्गत प्रवासासाठी बसची चांगली सोय आहे. बसने झाग्रेब, झडर आणि प्लीट्विच्का असं आधी ठरवलं होतं. पण शेवटी दिड दिवस झाग्रेब, एक दिवस झडर, एक दिवस शिबेनिक आणि करका, एक दिवस प्लीट्विच्का असा भरगच्च प्लॅन झाल्याने गाडी भाड्याने घेतली. झाग्रेब पाहून परत विमानतळावर जाऊन गाडी घेऊन बाकीचा प्रवास केला. करकाऐवजी जवळचा एक तलाव पाहिला. प्लीट्विच्का पाहून झाग्रेब विमानतळावर गाडी परत केली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी विमान असल्याने विमानतळाजवळ ती रात्र राहिलो.

क्रोएशिया समुद्रकिनारा आणि बेटांसाठीही प्रसिद्ध आहे. स्प्लिट, डुब्रोव्निक, पुला, रोविंज ही काही प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. त्याशिवाय उत्तरेला किल्ले आहेत. झडरजवळ पाक्लेनिका गॉर्ज (प्रस्तरारोहण) आणि टेलाश्चिका पार्क आहेत. पुन्हा जायला नक्कीच आवडेल.

आम्ही फिरलो त्या भागात रस्ते उत्तम आहेत. सगळीकडे खूप स्वच्छता आहे, त्याबाबतीत काही प्रगत युरोपियन देशही मागे पडतील. EU पेक्षा थोडी स्वस्ताई आहे. शाकाहार्‍यांचीही जेवणाची गैरसोय होऊ नये. भारतीय जेवण मिळण्याची अपेक्षा ठेऊ नये. मत्स्याहार महाग आहे. स्थानिक वाईन्स उत्तम आहेत. Bijela kava हा कॉफीचा प्रकार आपल्या भरपूर दूध घातलेल्या कॉफीच्या जवळ जातो. स्थानिक चीझही आवडलं.

पर्यटकांशी संबंध येणार्‍यांना बर्‍यापैकी इंग्रजी येतं. अर्थात अंतर्भागाबद्दल कल्पना नाही. उत्तरेला जर्मनही चालत असावं. लोक मदत करणारे वाटले. पण नॅशनल पार्कच्या व्यवस्थापनात (प्लीट्विच्का, करका आणि टेलाश्चिका) थोडी अनास्था दिसली. हा लो सीझनमध्ये गेल्याचाही परिणाम असू शकतो.

इति अलम्!

दशानन's picture

3 May 2017 - 11:33 am | दशानन

देखणं!!!

वरुण मोहिते's picture

3 May 2017 - 11:45 am | वरुण मोहिते

लिहिलंय

सूड's picture

3 May 2017 - 11:48 am | सूड

सुंदर !! गारगार वाटलं.

वेल्लाभट's picture

3 May 2017 - 12:17 pm | वेल्लाभट

हे वेड आहे ! ! ! !

बास. माझ्या बकेट लिस्ट मधे हे ठिकाण अधोरेखित करून ठेवलंय. चामायला! इथे जायलाच्च्च पाहिजे. ठरलं.

भाऊ, लाख लाख धन्यवाद हे इथे लिहिल्याबद्दल. आणि लेखनमर्यादा कसली हो घेऊन बसलात? सॉलिड लिहिलंयत. पटापटा पुढचे भाग टाका राव.

निशाचर's picture

4 May 2017 - 6:35 pm | निशाचर

हे वेड नक्कीच आहे. फक्त मी भाऊराव नाही :-)

पद्मावति's picture

3 May 2017 - 2:49 pm | पद्मावति

तुमच्याकडून प्रवासवर्णन म्हणजे एक पर्वणी असते. सुरेख लिहिता आणि फारश्या न ऐकलेल्या ठीकाणंविषयीची माहीती मिळते. फोटो तर मस्तच असतात.
ही सफर पण खूप आवडतेय.

निशाचर's picture

4 May 2017 - 6:53 pm | निशाचर

बाकी ते पर्वणी वगैरे आलंय लक्षात! ग्रीसचं घोडं अथेन्सला अडलंय. मी अप्रसिद्ध जागांविषयीच लिहिलेलं बरं असं दिसतंय. कृ. ह. घ्या!

निशाचर's picture

4 May 2017 - 6:52 pm | निशाचर

ही जागाच एवढी देखणी आहे!

सिरुसेरि's picture

4 May 2017 - 7:17 pm | सिरुसेरि

मस्त लेखन आणी फोटो .