इंस्टंट पिठाची इडली

Primary tabs

सही रे सई's picture
सही रे सई in पाककृती
17 Mar 2017 - 9:59 pm

फार काही विशेष अशी रेसिपी नाही ही. पण खरड फळ्यावर चर्चा चालू होती की इकडच्या थंड (होय होय अमेरिकेत .. झाहीरात झाहीरात) हवामानात इडलीचं पीठ लवकर आंबतच नाही, तर काय करावं. मी पण याच कर्माला कंटाळून ह्या रेसिपी च्या मागे लागले.

मुळात इडली किंवा डोसा करणं म्हणजे किमान २-३ दिवसाचं काम आणि नियोजन. पण त्यामुळे आत्ता लगेच कोणाला इडली खायची इच्छा झाली तर काय ? बाहेरून पार्सल मागवता येतचं, पण घरी केल्या की भरपूर मनसोक्त खाता येतात. तसं बाजारात इंस्टंट इडली मिक्स मिळतं. पण दर वेळी ते विकत आणण्यापेक्षा जर तसंच घरीच करता आल तर मस्तच.. म्हणून जरा शोधाशोध केली (गुगल वर हो.. कुठे दुसरीकडे जाणार म्हणते मी), तर काही काही रेसीपीज मिळाल्या, पण त्या सगळ्यात तांदुळाच पीठ वापरलं होत. पण इडली कशी छान रवाळ असली पाहिजे हे डोक्यात फिट्ट बसल होत आणि तांदुळाच्या पिठीने ती तशी होईल असं वाटेना. खूप पूर्वी आईने एक इंस्टंट पिठांसाठी १ का २ दिवसाचा क्लास केला होता त्याच्या नोट्स वाचलेल्या अंधुक आठवत होत्या. त्यावरून एक प्रयोग करून बघू म्हणून ठरवलं.

नवरा त्या दरम्यान इंडिअन ग्रोसिरी मधे जाणारच असल्या मुळे त्याला उडदाच पीठ तिथे मिळतंय का ते बघायला आणि मिळत असेल तर आणायला सांगितलं. त्याला भयानक इडली आवडते. इतकी कि सकाळ दुपार संध्याकाळ तो इडली खावू शकतो. त्यामुळे तो पण खूप खुश झाला.
तर चला ती रेसिपी बघूच आपण:

साहित्य:

इडली रवा : २ वाट्या
उडीद पीठ : १ वाटी
मेथीची पावडर (असली तर): २ चिमुट
सायट्रिक अॅसीड : १ टी स्पून (तुम्हाला किती आंबट आवडते त्याप्रमाणे थोड कमी जास्त करा)
इनो सॉल्ट : दीड टी स्पून ( हे चांगल नवीन फ्रेश पाहिजे. म्हणजे १-२ महिन्यात आणलेलं असाव.)
मीठ : १ टी स्पून किंवा चवीप्रमाणे (हल्ली सगळीकडे सारखाच खारटपणा असलेलं मीठ नसतं म्हणून अंदाज आपला आपला )
तेल : २-३ टी स्पून
पाणी : अंदाजे

कृती:

सगळ्यात पहिले इडली रवा, उडदाच पीठ, मीठ, सायट्रिक अॅसीड आणि मेथीची पावडर मिक्स करून त्यात हळू हळू पाणी घालत मिक्स करा. पाणी इतकच घाला कि पीठ फार घट्ट किंवा फार पातळ नसेल. पीठ चमच्यातून जस्ट खाली पडेल इतक पातळ असावं. हे साधारण १५-२० मिनिट बाजूला ठेवून द्या. तोपर्यंत इडलीच्या साच्यांना तेलाचा हात लावून घ्या. मधल्या वेळात हव तर नारळाची चटणी वाटून घ्या. एकीकडे गॅस वर इडली पात्र किंवा कुकर मधे पाणी घालून मोठ्या आचेवर ठेवा.

१५-२० मिनिटानंतर इडली रवा फुगल्यामुळे पीठ खूप घट्ट होतं. तसं ते झालं असेल तर अजून थोड पाणी घालून मिक्स करून घ्या. घरात शिळा उरलेला थोडा भात असेल तर साधारण एक मुद भात कुस्करून यात घालू शकता. त्याने ईडली आणखीनच सॉफ्ट व्हायला मदत होईल. सगळ्यात शेवटी त्यात इनो सॉल्ट घालून पटापट मिश्रण हलवा. पीठामधल्या सायट्रिक अॅसीड आणि इनो साल्ट मुळे पीठ मस्त फुगेल आणि त्यात हवेचे बुडबुडे दिसतील.

आता अजिबात वेळ न घालवता पीठ इडली साच्यांमधे ओता आणि इडली स्टँड इडलीपात्रात ठेवून झाकण घट्ट लावून १०-१२ मिनिट चांगली वाफ काढा.
१०-१२ मिनिटानंतर गॅस बंद करून २ मिनिटानंतर झाकण उघडून गरम असतानाच इडल्या साच्यातून काढून घ्या.

घरी डाळ तांदूळ भिजवून वाटून आणि आंबवून करतो त्या इडल्यांच्या खूप जवळ टेस्ट आणि टेक्शर येतं या इडलीचं. आणि होते पण अर्धा पाऊण तासात. याला लागणार साहित्य घरात भरपूर आणून ठेवलं तरी लवकर खराब होत नाही.
करा मग अश्या झटपट इडल्या आणि सांगा कश्या झाल्या ते.
अरे हो हा इडल्यांचा फोटो.. तो टाकला नसता तर विश्वास नसता बसला ना.

instant idali

घरी आंबवून इडल्या करणार असाल तर काही टीप्सः
एका कांद्याच्या ४ फोडी करून त्या इडलीच्या पिठात घालाव्यात. किंवा एका साउथ इंडिअन शेजारणीच्या सल्ल्यानुसार इडलीच पीठ वाटताना थोडे चुरमुरे भिजवून ते पण वाटावेत.
इडलीच पीठ ओव्हानचा दिवा लावून त्यात ठेवावे. ओव्हन ला दिवा लावायची सोय नसेल तर आधी ओव्हन चांगला प्री हिट करून मग त्या उबदार वातावरणात पीठ ठेवावं.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2017 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा

फंट्याशटिक आयड्याइडली!

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2017 - 11:16 pm | पिलीयन रायडर

फारच उपयोगी रेसेपी! नक्कीच करुन बघेन अशा पद्धतीने. :)

फोटो वरुन तर अगदी नेहमीप्रमाणे जमली आहे असं वाटतंय. अर्ध्या तासात अशी इडली होणार असेल तर क्या बात है!

फार च भारी ! बरं झालंस धागाच काढलास. खफ वर वाहुन जातं.

आमच्याकडे २२ $ ला ७५ , घरी केलेल्या इडल्या मिळतात - त्या आणुन फ्रीझ करणे हा माझा हिवाळ्यातला सोपा मार्ग होता. आता हे बघेन :)

सही रे सई's picture

17 Mar 2017 - 11:59 pm | सही रे सई

या इडल्या मी फ्रीझ करून बघितल्या.त्या चांगल्या राहिल्या. त्यामुळे तुही अशाप्रकारे इडली करून फ्रीझ करू शकशील.
बरं झालंस धागाच काढलास. खफ वर वाहुन जातं.
हो, धागा त्यासाठीच काढला.

पद्मावति's picture

17 Mar 2017 - 11:29 pm | पद्मावति

क्या बात है सई. धन्यवाद. मस्त.

इनस्टंट इडलीच्या रेशिपीसाठी धन्यवाद सई!
बाकी पीठ आंबण्याच्या सर्व टिपांकडे बघून न बघितल्यासारखे केले आहे. त्याने पीठ आंबत असते तर काय हवे होते? या सगळ्या ट्रिका आधी वर्क करत होत्या पण आता नाही.
फोटू छान आलाय. आता भारतीय दुकानात गेले की इनग्रेडियंटस आणीन.

आषाढ_दर्द_गाणे's picture

18 Mar 2017 - 1:54 am | आषाढ_दर्द_गाणे

नक्की करून बघेन. इनो घातलेला ढोकळा खाल्ल्या गेला आहे. मस्त लागतो.

मधल्या वेळात हव तर नारळाची चटणी वाटून घ्या

नाही हवी तर आहेच, पण अशी कशी हवेतल्या हवेत चटणी करणार?
त्यासाठी इडली मागोमाग तुम्ही झटपट चटणीची पण पाकृ द्या पाहू...
किंवा असं करा, ती 'भयानक इडली'* का काय असते त्याची पाकृ आधी टाका :))

*संदर्भ, पहा: परिच्छेद तिसरा, वाक्य दुसरे

त्याला भयानक इडली आवडते

सही रे सई's picture

18 Mar 2017 - 3:31 am | सही रे सई

ही घ्या चटणीची पाकृ :
५-६ तिखट मिरच्या, थोडी कोथिंबीर, १ टी स्पून मीठ (चवीप्रमाणे कमी जास्त) , २ चमचे साखर, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा जिरं हे सगलं मिक्सर च्या चटणीच्या भांड्यात घालून चांगल बारीक करून घ्या. मग यात एक वाटी ओल्या नारळाचा चव आणि थोडं पाणी (४-5 चमचे) घालून परत सगळ एकजीव होईपर्यंत फिरवा.
तुम्हाला आवडत असेल तर वरतून २चमचे कडकडीत तापलेल्या तेलात मोहरी, हिंग, कडीपत्त्याची पाने असं घालून फोडणी घालू शकता.

* "भयानक इडली" कधी झाली माझ्या कडून तर नक्की पाकृ देईन इथे ;)

आषाढ_दर्द_गाणे's picture

18 Mar 2017 - 4:52 am | आषाढ_दर्द_गाणे

ह्यात गारठ्लेला (फ्रोझन) नारळ टाकता येईल ना?
तोही दोन कप किंवा कसे?

बाकी भयानक इडली तुम्ही नाही, मीच करायची शक्यता जास्त आहे.
विशेषतः इडलीच्या पिठातले पाण्याचे प्रमाण बिघडल्यास.

ह्यात गारठ्लेला (फ्रोझन) नारळ टाकता येईल ना?

हो चालेल. फक्त आधी मायक्रोवेव्हला ३० से. लावा म्हणजे तो रूम टेंपरेचरला येईल.

तोही दोन कप किंवा कसे?

तो थोडा दाबून बसवलेला असतो त्यामुळे कमी घेतला तरी चालेल.

आणि केलीत इडली की सांगा, कशी झाली होती ते.

सही रे सई's picture

22 Mar 2017 - 7:51 pm | सही रे सई

नीट बघितले तर लक्षात आले की २ कप नाही तर "एक वाटी ओल्या नारळाचा चव" असं लिहिलं आहे.. त्यामुळे २ कप नका घेऊ.

सविता००१'s picture

18 Mar 2017 - 9:44 am | सविता००१

आता अशी इडली नक्की करून पहाणार.
मला पण इडली 'भयानक' आवडते. :)
पिठात कांदा घातला की काय होतं?

पैसा's picture

18 Mar 2017 - 9:58 am | पैसा

असे अजून काही इन्स्टंट वाले शॉर्ट्कट्स असले तर येऊ द्या. माझ्यासारख्या मारून मुटकून सुगरणींना फार्फार उपयोगी पडतील.

सही रे सई's picture

22 Mar 2017 - 7:52 pm | सही रे सई

मारून मुटकून सुगरणीं

छेछे, काहीतरीच हा तुझं पै तै..

नूतन सावंत's picture

18 Mar 2017 - 3:33 pm | नूतन सावंत

इडलीचा शॉर्टकट आवडला,नक्कीच करून पाहीन,

छान रेसिपी आहे. साहित्य मिळवुन ठेवणे आलेच आता!

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2017 - 3:21 pm | स्वाती दिनेश

इडली छानच दिसते आहे. अशी करून बघायला हवी.
स्वाती

निवेदिता-ताई's picture

25 Mar 2017 - 7:46 am | निवेदिता-ताई

मस्तच.

आज, म्हणजे रविवारी सकाळी ब्रेफाला ही इडली केली आणि खूपच आवडली.
प्रमाण पाकृमध्ये दिल्यानुसार घेतले. मेथी पावडर नसल्याने वापरली नव्हती.
सायट्रिक अ‍ॅसिड नसल्याने लिंबू पिळले तरी तसाच परिणाम मिळाला.
रवाळ इडली झाली व लहान वाटी शिळा भात कुस्करून घातल्याने मऊही झाली.
माझ्याकडील वाटीचे माप लहान असल्याने राईस कुकरबरोबर येणारा कप, जो पाऊण कपाचा असतो ते माप घेतले.
म्हणजेच दीड मेजरींग (रेग्युलर) कप इ. रवा, पाऊण मे. कप उडदाचे पीठ, मीठ, अर्धे लहान लिंबू, ईनो यांच्या बरोब्बर २० मोठ्या इडल्या झाल्या.
दुकानात इडली रव्याचे २ प्रकार होते, त्यातील बारीक रवा आणला आहे.
आता कडकडीत हिवाळ्यातही इडल्या करता येतील म्हणून बरे वाटले.
यापुढील प्रयोग म्हणजे हेब्बर्स किचनमध्ये सांगितल्याप्रमाणे इनस्टंत दोसामिक्स करून ठेवणे.
पाकृबद्दल आभार.

आणखी एक म्हणजे माझ्याकडील रवा १५ ते २० मिनिटे भिजवण्यापेक्षा अर्धातास भिजवल्यावर इडल्या बर्‍या झाल्या. पहिल्या घाण्याच्या इडल्यांमध्ये व दुसर्‍या घाण्याच्या इडल्यांमध्ये फरक आहे. दुसर्‍या बॅचमधील इडल्या जास्त मऊ आहेत.

सही रे सई's picture

26 Mar 2017 - 11:01 pm | सही रे सई

मस्तच गं रेवाक्का.. आणि धन्यवाद इथे तुझा अनुभव सांगितल्याबद्दल..

सही's picture

29 Mar 2017 - 3:19 pm | सही

ईडली लवकर करुन पाहिजे असेल तर अगदी थंड वातावरणातही शक्य आहे ईडलीचे पिठ एकदा बनवल्यानंतर त्यातील दोन तिन चमचे आंबलेले पिठ उन्हात वाळवावे त्याची कडक वडी होईल ती वडी फ्रिजमध्ये ठेवुन द्यावी थंडीच्या दिवसात तांदुळ व ऊडीद दाळ भिजवुन बारीक केल्यावर त्यात फ्रिजमधिल वडी थोडीशी घेवुन व बारीक करुन कोमट पाण्यात विरघळवुन मिश्रणात टाकावे व ते मिश्रण घरातील उबदार ठिकाणी ठेवावे पिठ लवकर तयार होते ऊष्ण वातावरणातही हे विरजण वापरल्यास चार ते पाच तासात ईडली करणे शक्य होईल

कडक झालेली वडी फ्रिजमध्ये ठेवावी लागेल का? उन्हाळ्यात तसे करून पाहते.

भारी!! आमचा आलाच कधी 'तिकडे' जायचा योग तर उपयोगी पडेल.

सप्तरंगी's picture

30 Mar 2017 - 7:03 pm | सप्तरंगी

मस्त आता उडीद पीठ शोधणार :)

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 9:11 pm | पिलीयन रायडर

तर उत्साहात इडली रवा आणला. घरात खुप उडीद दाळ होतीच. म्हणुन पीठ न आणता डाळ २ तास भिजवली आणि ती वाटुन घेतली.
फ्रुट सॉल्ट नव्हते, सायट्रिक अ‍ॅसिडही नव्हते. गुगलवर असे लिहीले होते की ह्या दोघांऐवजी सोडा घाला. म्हणुन तो वापरला.
हे सगळं २ तास मिक्स करुन ठेवलं. मग इडली पात्रात ४ च इडल्या लावल्या...

... पाचच मिनिटात दाणदाण वाफ बाहेर येऊ लागली म्हणुन उघडुन पाहिलं तर आतमध्ये पाणी उकळत होतं आणि त्यात इडलीचं पीठ तरंगत होतं!

मूळ पाकृशी इतकी फारकत घेतल्यावर काय चुकलं हे विचारण्यात अर्थ नाही! त्या पीठाचे आप्पे केले.

पण इडलीची तल्लफ तशीच राहिली. म्हणुन मग शिस्तीत डाळ -तांदुळ (आयुष्यात पहिल्यांदाच) भिजवले. १२ तासांनी ते वाटुन घेतले. पुढच्या ६ तासात ते मिश्रण दुप्पट झालं. मैत्रिण म्हणाली अगदी तय्यार आहे. अत्यंत आत्मविश्वासाने १२ इडल्या लावल्या. मग आठवलं मीठ टाकायचं राहुन गेलं, मग ते वरुन भुरभुरलं आणि चमच्यानी एकत्र केलं तिथेच मला कळालं होतं की हे काही होत नाही. अर्थातच झालं नाही! चिकट गोळे झाले!

पुढच्या बॅचला मीठ टाकुन १२ इडल्या लावल्या. पण का कोण जाणे त्याही चिकट झाल्या.

मग सकाळी सरळ उत्तपे टाकले तर ते झाले. तरी खाताना एक चिकटपणा होताच. म्हणलं डाळ जास्त झाली असेल का...

अचानक आठवलं.... मी पीठासाठी जास्मिन राईस वापरलाय!

परंपरेला धरुन पहिल्यांदा चुकलेलं आहे सगळं.. आता पुढच्या वेळेस नीट होईलच!

राघवेंद्र's picture

15 Apr 2017 - 2:54 am | राघवेंद्र

सेप्रेट धाग्याचे पोटेन्शियल आहे या प्रतिसादामध्ये ... आय डोन्ट ब्लेम ... भाग २