ब्लॉग्सची उल्लेखनीयता इत्यादी..

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Jan 2017 - 9:34 am
गाभा: 

मिसळपाव, मायबोली अशा संस्थळांवर किंवा ब्लॉग्सवर कोणत्या विषयावर लेखनास सुरवात करावी या वर खुपशी बंधने नसतात.

मराठी विकिपीडिया आणि मराठी विश्वकोश हे ज्ञानकोश आहेत. मराठी विश्वकोशासारख्या ज्ञानकोशात ज्ञानकोशीय नोंद लिहिणारा, समिक्षक आणि त्याचा संपादक कोण असेल यावरच पूर्वपात्रतेची गाळणी असते पण एकदा हे निकष पूर्ण करणार्‍या लेखकाने कोणते स्रोत वापरले यावरची बंधने अल्पशी शिथील होतात.

मराठी विकिपीडिया लेखकांवर पूर्वपात्रतेची अट नसते पण एक ज्ञानकोश आहे त्याची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने सहसा इतर माध्यमातून आधी दखल घेऊन झालेल्या समिक्षीत विषयांची ज्ञानकोश दखल घेणे अभिप्रेत असणे ह्या निकषावर भर असतो.

इंग्रजी विकिपीडिया समुदाय केवळ ब्लॉग्सच नव्हे तर इतर अनेक आंतरजालीय स्रोत आणि अगदी काही प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांनाही स्रोत म्हणून सरसकटपणे नाकारताना दिसतो. स्रोतप्रामाण्यावर भर देताना दिसतो. अमुक एकाच प्रकारच्या स्रोतातून ज्ञान माहिती आल्यास ती प्रमाण अन्यथा अस्विकार्य हे स्रोतप्रामाण्य एका अर्थाने तार्किक उणीवेचे असते; अशा धोरणामुळे अगदी गांभिर्यपुर्वक ससंदर्भ असलेले ज्ञान माहिती केवळ ब्लॉगवर किंवा प्रमाणस्रोतातून आलेले नाही म्हणून नाकारले जाते.

पाश्चात्य परिपेक्षात कोणत्याही छोट्यात छोट्या गोष्टीची दखल आणि नोंद घेणारी खूप सारी माध्यमांची उपलब्धता मागच्या खूप काळापासून चालत आली आहे. त्यामुळे एखाद्या लेख/मजकुर विषयाची दखल/नोंद इतर माध्यमांनी पूर्वी घेतली असणे पडताळण्याजोग्या संदर्भ स्रोतांची मुबलकता आणि तशी संस्कृतीसुद्धा त्यांच्याकडे आहे तर भारतीय जीवनाच्या परिपेक्षात वस्तुनिष्ठ नोंदी/दखल घेण्याच्या प्रथांचा सांस्कृतीक आणि माध्यमस्तरांवर बर्‍याचदा अभाव जाणवतो. त्याशिवाय माहितीस्रोतांची कमतरता भासते. त्यामुळे केवळ एखाद्या अभ्यासकाचे लेखन ब्लॉगवर आहे किंवा मिसळपाव डॉट कॉमवर आहे म्हणून डोळे झाकुन नाकारण्याची ऐश मराठी विकिपीडियास परवडणारी असू शकत नाही.

मिसळपाव अथवा मायबोली इत्यादी चर्चा फोरम्सवर काही प्रमाणात तरी लेखनोत्तर सार्वजनिक चर्चा होण्याची शक्यता असते म्हणून प्रकाशनानंतर काही काळाने ज्ञानकोशीय दखल घेण्याचा विचार करता येऊ शकतो किंबहूना आपण तसे करतो. चर्चा फोरम्स नसलेली मराठी संकेतस्थळे आणि ब्लॉग्सच्या बाबतीत त्यांचे लेखवार चर्चा मुल्यांकन समिक्षण इत्यादी पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे चर्चा फोरम्स नसलेली मराठी संकेतस्थळे आणि ब्लॉग्सच्या बाबतीत उल्लेखनीयतेचे निकष कसे ठरवायचे असा प्रश्न पडतो.

दुसरे असे की भरपुर हिट्स मिळवणारे ब्लॉग्स वरील काही लेखन विवाद्य असते अशा काही ब्लॉग्स लेखनाची तर्कसुसंगत चिकित्सक समिक्षा आणि चर्चा फोरम्सवर असलेल्या बहुमताच्या विरोधात असल्यामुळे आणि बहुमताच्या व्यक्तिलक्ष्य तर्कदोषामुळे टाळली जाते. होते असे की वृत्तपत्रिय अथवा साप्ताहीक इत्यादी इतर माध्यमांनी दखल घेतल्यास अशा विवाद्य ब्लॉग्सना ज्ञानकोशीय दखल पात्रता अंशिक स्वरुपात तरी प्राप्त होते परंतु त्यातील लेखनाची लेखवार तर्कसुसंगत चिकित्सक समिक्षा झालेली नसल्यामुळे अशा ब्लॉग्सवर काही विश्वासार्ह लेखन असेल तरीही त्याची दखल घेणे अवघड होते.

केवळ ब्लॉग्स आहेत म्हणून सरसकट नाकारले तर उपयूक्त माहितीसुद्धा नाकारली जाते जी की मराठी भाषेत आधीच अल्पस्वरुपात उपलब्ध असते.

या चर्चा धाग्याच्या माध्यमातून कोणत्या ब्लॉग्स लेखांचे मिसळपावसारख्या चर्चा फोरम्सवरुन मुल्यांकन व्हावे असे तुम्हाला वाटते ? ब्लॉग्सचे लेखवार तटस्थ साक्षेपी मुल्यांकन, समिक्षण कसे करावे ? आणि त्यांच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेसाठी कोणत्यास्वरुपाचे निकष लावावेत असे तुम्हाला वाटते ते जाणून घेणे आवडेल.

ज्ञानकोशीय उल्लेखनियतेसंदर्भाने या धागामाले अंतर्गत अजूनही पुढेही चर्चा करावायाच्या आहेत. त्यातील हा पहिला धागा.

ह्या चर्चा धाग्यावरील उपयूक्त चर्चेची मराठी विकिपीडियावर दखल घेता यावी म्हणून प्रतिसाद लेखन प्रताधिकारमुक्त समजले जाईल.

अनुषंगिक नसलेली आवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.

प्रतिक्रिया

लेखन कुठे आहे हा माझ्यामते प्रश्न नाही. ते मूळ लेखन पुरेसं अललित आणि संदर्भसंपृक्त आहे का हा प्रश्न आहे.

उदा० भाऊ तोरसेकर बऱ्याचदा सत्तरीच्या दशकाबद्दल लिहितात. त्या घटनाचं पुष्टीकरण दुसऱ्या स्रोताद्वारे झालं तर ठीकच. अन्यथा त्या घटनेला "मला आठवतंय म्हणून" एवढाच आधार राहील, आणि ते ज्ञानकोशीय मानक नव्हे.

तसंच, उद्या रामदासकाकांचा लेख वापरून विकीने "डालडा"ची एन्ट्री दुरुस्त केली, तर तेही मानकात बसणार नाही.

माहितगार's picture

15 Jan 2017 - 3:23 pm | माहितगार

लेखन कुठे आहे हा माझ्यामते प्रश्न नाही. ते मूळ लेखन पुरेसं अललित आणि संदर्भसंपृक्त आहे का हा प्रश्न आहे.

अगदी सहमत आहे. अर्थात माध्यम साधनांच्या उपलब्धतेच्या असमतोल, तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांची सहज उपलब्धता असलेल्या गटातला व्यक्तिची उल्लेखनियता कशी स्विकारावी अथवा नाकारावी या सबंधाने समस्या उपस्थित होतात.

काल रात्रीच मानस मादरेचा नावाच्या युवकाच्या विकिंवरील लेखाकडे लक्ष वेधले गेले. महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रतिनिधी असतात त्यातला एक ! सोबत हिंदीतन चारोळ्या लिहितो आणि त्याच पुन्हा इंग्रजीत अनुवाद करतो. त्याचे विद्यार्थी प्रतिनिधी असणे आणि कवितांची ब्लॉगस फेसबुक इत्यादीत नोंद आहे. सोबतीला महाविद्यालयातील सामान्य काव्यसंमेलनालाही टाईम्स ऑफ इंडीया वृत्तात सहज जागा मिळाली. एखाद्या युवकाने स्वतःला पुढे पुढे करणे काही गुन्हा नाही, माध्यमात जागा सहज मिळाली पण इतर असंख्य विद्यार्थी प्रतिनिधी अथवा असंख्य कविंच्या मांदियाळीत वेगळेपण उठून दिसावे ज्ञानकोशीय दखल घ्यावी असे काही नाही. संदर्भाची उपलब्धता मात्र सहज झालेली. म्हणूनच ब्लॉगसारख्या माध्यमातून प्रकाशात रहाणारा पण काही ज्ञानकोशासाठी विशेषत्व नसलेली आणि ज्ञानकोशासाठी विशेषत्व असलेली या व्यक्तिंमध्ये अथवा मजकुरात फरक कसे करावयाचे , किंवा निकष काय असावेत.

आदूबाळ's picture

15 Jan 2017 - 10:26 pm | आदूबाळ

"जगावेगळं काहीतरी करणं" हा ज्ञानकोशीय उल्लेखाचा निकष असला पाहिजे.

उदा० हजारो मराठी माणसं आजवर नेदरलँड्समध्ये गेली असावीत. पण डच प्रसारमाध्यमांत पानिपतविषयी काय बातमी आली हे शोधायचं फक्त बॅटमॅनच्या डोक्यात आलं. तस्मात ज्ञानकोशीय दखल घ्यायला तो योग्य माणूस आहे.

हजारो मराठी माणसं कथा लिहितात. मीही अधूनमधून लिहितो. यात काय नवल? त्यामुळे माझी दखल घ्यायचं कारण नाही.

पैसा's picture

14 Jan 2017 - 11:08 am | पैसा

या चर्चा धाग्याच्या माध्यमातून कोणत्या ब्लॉग्स लेखांचे मिसळपावसारख्या चर्चा फोरम्सवरुन मुल्यांकन व्हावे असे तुम्हाला वाटते ? ब्लॉग्सचे लेखवार तटस्थ साक्षेपी मुल्यांकन, समिक्षण कसे करावे ? आणि त्यांच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेसाठी कोणत्यास्वरुपाचे निकष लावावेत असे तुम्हाला वाटते ते जाणून घेणे आवडेल.

सगळेच वाचकाच्या आणि चर्चा करणार्‍याच्या मर्जीवर अवलंबून आणि व्यक्तिसापेक्ष आहे.

लेख कुठेही असो,रोजनिशितल्या नोंदी असो त्यांतील विधानांवर आक्षेप घेतले जातीलच असे नसते. असं लेखकाचं मत आहे म्हणून सोडून दिलं जातं. परंतू काहीवेळा विरोधी प्रतिसाद /मतं मांडली गेली तर संदर्भ म्हणून वापरता येईल असा मजकूर बाहेर येईलच. काहीवेळा चमत्कार धरला जातो. ९९ लोकांनी त्यास आक्षेप घेतला नाही म्हणजे १००व्या मनुष्याच्या मतास कोण विचारतो?

समजा मी बोरिवली अभयारण्यात फिरायला गेलो. खूप आतमध्ये एका बिबट्या समोर आला व त्याने मला काहीच केले नाही तर मी ती गोष्ट इतर कोणत्याही माझ्या शक्तीशी जोडू शकतो. योगविद्या ,संतपणा वगैरे. तर हा विकिसाठी संदर्भ ठरावा काय?