थंडीची चाहूल यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातच लागली आहे.थंडीच्या दिवसात बाजारात येणाऱ्या सुरती पापडी, वेगवेगळ्या जातींचा घेवडा,तूर.वाल अशा निरनिराळ्या शेंगभाज्या आणि सुरण, कोनफळ(कंद,ग्राडू)रताळी अशा कंदभाज्या पाहून माझा जीव हरखतो. मग मला यायला लागते उन्धियूची आठवण.कधी करूया बर?हा प्रश्न डोक्यात रुंजी घलायला लागतो.
ते सत्यनारायणाच्या कथेत नाही का म्हणतात की,सत्यनारायण म्हणा कि सत्यदेव म्हणा,काही म्हटले तरी एकच.तसेच, उंधियू म्हणा ,की उन्दिओ म्हणा , की उन्ध्यू म्हणा,नावाबाबत पाठभेद आहेत खरे पण चव मात्र अफलातूनच . पहिन्ल्यांदा हा पदार्थ खाला तो मुंबादेवी परिसरातल्या देवीच्या ‘सुरती’ हॉटेलात.पहिल्याच भेटीत हा टिपिकल गुजराती पारंपारिक पदार्थ आवडलाच. नुसता आवडलाच नाही तर त्याने माझे मन जिंकून घेतले.मग कधीही जव्हेरीबाजार, मुंबादेवी,मंगलदास मार्केट,मिरची मार्केट ,ताम्बाकाटा, अगदी क्रॉफर्ड मार्केट परिसरात कोणत्याही कामासाठी जाणे झाले की, सुरतीमध्येच जेवण व्हायचे.एकदा माहीम बस डेपोत असलेल्या ‘आराम’ हॉटेलमध्ये एक वेगळाच उपासाचा कच्छी पद्धतीचाही उन्धीयू खाल्ला होता.हळू हळू मग हॉटेलात किती जास्त तेल वापरतात तर घरी करून पाहू असा विचार मनात आला.
ओगलेमावशींच्या रुचिरात कृती होती.त्यातले माप, एक किलो सुरती पापडी आणि त्या अनुषंगाने इतर भाज्या, असे साडेतीन चार किलो भाज्याचे होते.इतकी भाजी करून काय करणार म्हणून प्रमाण कमी केले.पाव किलो पापडी घेऊन त्या अनुषंगाने इतर भाज्या घेतल्या तरीही भाजी भरपूर होते.त्याच्या पाककृतीत मीठ,मसाल्याचे प्रमाणही नेमके दिलेले नव्हते.मग एका मैत्रिणीच्या शेजारी रहाणाऱ्या, एका गुजराती पण माहेर सुतला असलेल्या काकूंकडून,प्रमाण समजावून घेतले.त्यांनी हौसेने सगळा इतिहासही सांगितलाच आणि कृतीही समजावून दिली.प्रत्यकाच्या शेतात पिकणाऱ्या,मसाले लावून भाज्या,मडक्यात केळीची पाने खालीवर घालून,मडके उलटे करून खड्ड्यातल्या निखाऱ्यावर भाजून केला जाणारा हा पदार्थ.उन्धीयू म्हणजे उलटं,म्हणून या पदार्ठाच नावच उन्धीयू पडलं कोणत्या भाज्या कमी जास्त केल्या तर चालतील याच्या सुचवण्याही दिल्या.
त्यांच्या प्रमाणाने केलेला उंधियू कधीही बिघडला नाही. ओगलेमावशींची थोडी कृती,आणि फक्त एखादी भाजी कमी जास्त करून आणि कृतीत थोडाफार बदल करून सिद्ध झालेली कृती खवय्या मिपाकरांना नक्कीच आवडेल.चला तर निघूया बाजारात भाज्या आणायला.भाज्या आणून निवडून झाल्या की,लागा काम्माला.
साहित्य:-
१. पाव किलो सुरतीपापडी+ सव्वाशे ग्रामघेवडा,निवडून.
२. प्रत्येकी वाटीभर,वाल,तूर,यांचे दाणे,
३. वाटीभर सुरणाच्या चौकोनी फोडी.
४. दीड वाटी कोनफळाच्या चौकोनी फोडी.(वाटीभर घेतल्या तरी चालतात पण मला कोनफळाची चव आवडते म्हणून मी थोड्या जास्त घेते.)
५. दोन मध्यम आकाराची रताळी.
६. दोन तयार केळी.
७. काळी छोटी वांगी७/८ .(४/५ असली तरी चालतील.)(४/५ छोटे बटाटे ऐच्छिक.मी घालत नाही.)
८. हिरव्या मिरच्या ५/६ किंवा आवडीनुसार जास्त.
९. कोथिंबीर चिरून दोन वाट्या
१०. ओली लसूण पात चिरून वाटीभर लसणाच्या पाकळ्यासह.
११. दोन इंच आले.
१२. अर्धी वाटी पुदिनापाने.
१३. दीड वाटी ओले खोबरे.
१४. दोन मोठी लिंबे.
१५. दोन वाट्या चिरलेली मेथी.
१६. एक वाटी कणिक+अर्धी वाटी बेसन +अर्धी वाटी तांदूळ पीठ.
१७. तीन चहाचे चमचे मिरचीपूड.
१८. दीड चहाचा चमचा हळद पूड.
१९. दीड चहाचा चमचा धणेपूड+दीड चहाचा चमचा जिरेपूड.
२०. एक चहाचा चमचा गरम मसाला.
२१. दोन चहाचे चमचे साखर.
२२. एक चहाचा चमचा ओवा.
२३. अर्धा चहाचा चमचा खायचा सोडा.
२४. फोडणीसाठी हिंगपूड.
२५. मीठ चवीनुसार.
२६. वाटीभर तेल
.
जमलं का सगळं साहित्य.मग आता कृतीला सुरुवात करुया.
कृती:-
१. सुरती पापडी आणि घेवड्याला थोडेसे तेल आणि पाव/पाव चमचा खायचा सोडा मिसळून लावावे.
२. तेल गरम करत ठेवा.
३. मेथी+ कणिक+बेसन+तांदूळ पीठ,एकत्र करून त्यात थोडेसे गरम तेल, एक चहाचा मिरचीपूड,अर्धा चमचा धणेपूड,,अर्धा चमचा जिरेपूड,अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरते मीठ मिसळून त्याचे छोटे गोळे करून तळून घ्यावे.यांना मुठे म्हणतात.
४. सुरण,कोनफळ रताळी याच्या फोडीही अर्धवट तळून घ्याव्यात. (या फोडीतळून घेतल्याने शिजायला लागणारा वेळ कमी होतो.ही पायरी मात्र माझी हं!)
५. वांगी चिरा देऊन कापावीत.
६. खोबरे जाडसर वाटावे.
७. अर्धी वाटी कोथिंबीर +पाव वाटी लसूणपात वगळून उरलेली कोथिंबीर,पुदिना , लसूणपात, लसूण,आले व मिरच्यांसह वाटून घ्यावे.
८. थोडे कोथिम्बिरीचे वाटण भज्यांना व दाण्यांना चोळून घ्यावे.
९. लिंबांचा रस काढावा.
१०. .खोबरे कोथिम्बिरीचे वाटण,लिम्बूरस,मीठ ,साखर ,सर्व मसाला एकरे करून वांग्यात मसाला भरावा.(बटाटे घेतले असतील तर त्यानाही चिरा देऊन मसाला भरावा.)
११. मेथीचे मुठे व सुरण,कोनफळ रताळी याच्या फोडी एव्हाना तळून झाल्या असतील,त्याच तेलात आता फोडणी करयची आहे,पण मोठे पातेले घेऊन त्यात ते तेल घालून त्यात ओवा आणि हिंग घालून फोडणी करावी.
१२. त्यात पापडी आणि घेवडा घालून झाकण ठेवावे.
१३. पाच मिनिटांनी झाकण काढून दाणे घालून ढवळावे.त्यावर उरलेला माला अर्धा पसरावा.त्यावर वांगी रचावीत. (बटाटे घेतले असतील तर तेही आताच घालावे.) पुन्हा उल्रेला मसाला व सुरण,कोनफळ रताळी याच्या फोडींना चोळून त्यवर पसराव्या.पाण्याचे झाकण ठेवून मंद आंचेवर भाजी पूर्ण शिजवून घ्यावी.
१४. आता मेथीचे मुठे आणि वगळलेली कोथिम्बीर,लसूणपात घालून दोन मिनिटांनी आंच बंद करावी.
झाला की,उन्धीयू. चपाती,फुलके,बाजरी भाकरी,पराठे कशाहीबरोबर आस्वाद घेऊ शकता.बरोबर दही,लसूण चटणी हवीच.
आता एक वाटीभर खाऊन बाकीचावाटून टाकते.बसा जेवायला.
प्रतिक्रिया
17 Nov 2016 - 10:40 pm | पद्मावति
आहा!! क्या बात है. मस्तं आहे.
17 Nov 2016 - 11:50 pm | राघवेंद्र
उन्धियू साठी एडिसन मधील सुखाडिया जिंदाबाद !!!
माझ्या माहितीप्रमाणे गुजरात मध्ये उन्धियू -पोंक (हुरडा) असे कॉम्बिनेशन असते. मी गुजरात मध्ये तर नाही गेलो पण इथे फ्रोझन पोंक मिळतो आणि प्रचंड मस्त लागतो.
18 Nov 2016 - 11:06 pm | बोका-ए-आझम
उन्धियूं, पुरी, पोंकची चटणी, नुसता पोंक आणि त्यावर नींबूमारनी असं नाव असलेली ती हिरवट शेव. बाकी ठिकाणी पोंकबरोबर खात नाहीत.
21 Nov 2016 - 1:37 am | रेवती
जालावर त्यांची दोन हाटेले दिसतायत. कुठल्या सुखाडियामध्ये उंधियु मिळेल?
18 Nov 2016 - 2:03 am | रेवती
ग्रेट दिसतायत फोटू. मलाही हा प्रकार खायला आवडतो पण तयारी फार असते बुवा!
18 Nov 2016 - 3:19 am | विशाखा राऊत
आवडता प्रकार (फक्त मी इथल्या गुजराथी स्वीट शॉप मधुन आणते ;) )
18 Nov 2016 - 7:22 am | मोक्षदा
फारच मस्त. भारी साहित्य व भारी कृती म्हणुन मी पण भाराऊन गेले
18 Nov 2016 - 7:44 am | मंजूताई
पाकृ! मीही अशीच करते.
टीप:
तेल घालताना हात आखडता घेऊ नये.
18 Nov 2016 - 10:24 am | नीळा
मी त्यात अगदी छोटे कांदे चीरा देऊन मसाला भरून घालतो
मस्त लागतात
18 Nov 2016 - 10:59 am | पियुशा
भारी दिसतय !
18 Nov 2016 - 1:48 pm | Ram ram
शिस्तीचे काम दिसतय हे प्रकरण
18 Nov 2016 - 3:14 pm | त्रिवेणी
चला खतरुडात सागर स्विट ला भेट द्यावी लागणार आता.
18 Nov 2016 - 6:04 pm | अनन्न्या
मी अजून केला नाहीय, माझ्याकडे एवढ्या प्रमाणासाठी तयारी करायला नको वाटतेय.
18 Nov 2016 - 6:39 pm | स्वाती दिनेश
आवडीचा पण भारतात गेल्याशिवाय तेही उंधियु सिझनला गेल्याशिवाय न मिळणारा पदार्थ..
स्वाती
18 Nov 2016 - 6:43 pm | अजया
बाबौ.एवढा खटाटोप करण्यापेक्षा तुझ्याकडे येऊन खाल्लेले बरे!
#आळशीबाया ;)
22 Nov 2016 - 6:32 pm | नूतन सावंत
सीझन संपेपर्यंत ये,त्यात आळस करू नकोस.
18 Nov 2016 - 11:08 pm | बोका-ए-आझम
नोव्हेंबर संपल्यावर खरे, authentic, fresh उंधियूं मिळायला लागतील. वाखुसाआ.
19 Nov 2016 - 10:41 am | सुधांशुनूलकर
थंडीच्या दिवसात आमच्या घरी 'मस्ट' असा हा मस्त प्रकार.
आमच्या घरी उंधियु फार मस्त होतं, याचं खास गुपित खास मिपाकरांसाठी उघड करतोय : खूपच पूर्वतयारी करावी लागते - पापडी निवडणे, भाज्या चिरणे इ. ती नवर्याने केली, तर उंधियुला विशेष चव येते!!! तस्मात समस्त नवर्यांनो, बाह्या सावरून कामाला लागणे.
22 Nov 2016 - 6:34 pm | नूतन सावंत
माझा नवरा फक्त भाजिची पिशवी उचलून आणायचं काम करतो.
19 Nov 2016 - 10:57 am | सविता००१
पाकृ. मी पण अशीच करते. पण कोनफळ माहेतच नाही मला. आणि तयार केळी नाही, कच्ची घालते
22 Nov 2016 - 6:36 pm | नूतन सावंत
कच्ची बाही आणि फार पिकलेली नाही ,योयर म्हणजे दुसऱ्या दिवशी पिकतील अशी.त्याची चव सुरेख लागते.
20 Nov 2016 - 9:21 am | रुपी
वा.. मस्तच!
उंधियू आवडतो, पण चांगला जमलेला असला तरच, काही ठिकाणी अजिबात जमलेला नसतो. घरी मात्र एवढ्या तयारीमुळे नको वाटतो करायला..
20 Nov 2016 - 12:52 pm | सारिका होगाडे
पाककृती फारच छान सांगितली आहे. नक्की करून बघेन. मला उंधियु फार आवडतो. धन्यवाद.
20 Nov 2016 - 12:53 pm | मदनबाण
आहाहा... :)
आजची स्वाक्षरी :- नशे सी चढ़ गयी ओय कुड़ी नशे सी चढ़ गई... पतंग सी लड़ गई ओये कुड़ी पतंग सी लड़ गई... ;) :- Befikre
20 Nov 2016 - 9:04 pm | आसना
केळीचे तुकडे कधी घालायचे ?
22 Nov 2016 - 6:39 pm | नूतन सावंत
केळीचे तुकडे मेथीच्या मुठयांसोबत घालायचे,आधी केळीचे तुकडे,त्यावर मुठे आणि त्यावर लसूणपात, कोथिंबीर.