मृगगड ट्रेक

अजया's picture
अजया in भटकंती
26 Jun 2016 - 8:36 pm

रविवारचा सुट्टीचा दिवस.चांगलं घरी व्हाॅट्स अॅप वगैरे खेळत बसावं,पावसाळा म्हणून काहीतरी चटपटीत बनवून खावं,मित्रमंडळी बोलावून गफ्फा हाणाव्या हे सोडून सुखाचा जीव कुठे डोंगरदऱ्यात घाम गाळत घालवावा!
पण नाही.ट्रेकला जाण्याचा किडा एकदा चाववुन घेतला की त्याची नशा सोडवत नाही हे ऐकलं होतं पण स्वतःवरच त्याचा परिणाम होईल माहित असतं तर पहिला माथेरान वन ट्रि हिल ट्रेक केलाच नसता ;) यावर्षीचा महिला दिन माझ्या नुकत्याच चाळीशीतल्या ;)पदार्पणाचं सेलिब्रेशन म्हणून माथेरान वन ट्रि हिल ट्रेक करुन काय केला, परत कधी जाता येईल ट्रेकला वाटच बघायला लागले.मी काही नियमित ट्रेकर ,फिट बिट मुळीच नाही.पण आमच्या कॅप्टन सोनटक्केंच्या ग्रुपने मी धापा टाकत रडारड करत गेले तरी वर पोहोचवले बाबा.आणि ट्रेकची मजा कळली.जाताना कुठे या भानगडीत पडले,उद्या क्लिनिकला उगाच दमायला होणार, कधी संपणार हा उभा चढ,मग गरगरणं अशा सगळ्या अवस्था पार करुन वर ते झाड काय दिसलं एकदम उत्साहच संचारला होता.
नकळत मी पुढच्या ट्रेकला नक्की जायचंच ठरवून टाकलं आणि कॅप्टनच्या ग्रूपवर मृगगड ट्रेकची घोषणा झाली.खोपोली पाली रस्त्यावरच्या गावातला किल्ला म्हणजे आमचाच भाग.मग माझी हक्काची जोडीदारीण जिच्या भरवशावर मागचा ट्रेक केला त्या कविता १९७८ ला साद घातली.ती येते म्हंटल्यावर ट्रेकला जाण्याचं नक्की केलं.
ट्रेक ग्रुपवर जाणाऱ्या लोकांचा आकडा साठपर्यंत पोहोचला.मोठ्ठा ग्रुप म्हणजे मजा येणार याची खात्रीच.आयोजकांचे हाल तेच जाणे अर्थात! मग कॅप्टननं किल्ल्याचे फोटो काल टाकले आणि माझं शौर्य मावळायला सुरूवात झाली :( लै डेंजर असा राॅकपॅच आणि चिंचोळी खिंडीसारखी वाट बघून धडकीच भरली.
काहीही होवो आता जायचंच म्हणून फोटो बघायचे बंद करुन टाकले! आणि नवर्याला अजिबात दाखवले नाहीत.ते बघून तू कशाला तडफडायला जाते सुट्टीच्या दिवशी वगैरे डायलाॅग ऐकून घ्यायची माझी बिलकुल तयारी नव्हती!
सकाळी सव्वा आठला ग्रुपबरोबर कर्जत स्टेशनवर खोपोली गाडीत बसलो.आणि गरम वडापाव खात ट्रेक खादाडीला तर सुरूवात झाली.

मृगगडाला जाण्यासाठी खोपोलीअलिकडच्या लौंजी गावात टमटम बुक केल्या होत्या.खोपोली पाली रस्त्यावर परळी म्हणून गाव लागते.इथून पुढे सहा किमीवर भेलिव गाव आहे.या किल्ल्याला म्हणून भेलिवचा किल्ला पण म्हणतात. तसे हा किल्ला म्हणजे तीन डोंगर शेजारी शेजारी आहेत.त्यातला मधला मृगगड.त्याला वळसा घालुन छान घनदाट जंगलातून वाट जाते.लांबून किल्ला लहान वाटत होता.म्हणून मी स्वतःवरच खुश होऊन चालत होते,काय स्टॅमिना वाढलाय माझा!
.
अाणि चिमणीची दोन डोंगर जोडणारी चिंचोळी वाट पुढे उभी राहिली!
.

दोन्ही बाजूंनी हाताचा आधार घेत,ग्रुप कॅप्टनच्या मदतीने कशीबशी खिंड लढवली आणि मला जोरात चक्कर आली!इतकी की डोळ्यासमोर टिव्हीचे लाईट गेल्यावर चांदण्या येतात तसे पांढरे धुके! मला वाटलं संपला माझा ट्रेक आता.कॅप्टन आणि कविता धावत माझ्याजवळ आले.मग सरबत पी,गोळी खा,कॅप्टननी तर माझे बुट काढुन पावलावर अॅक्युप्रेशर पाॅइंट्स दाबून दिले.मला प्रचंड लाज वाटत होती. आपल्यामुळे उशीर होतोय. पण कॅप्टन बुवांनी त्यांना स्वतःलाही असा त्रास कुठल्याशा गडावर चढताना अचानक उंचावर गेल्यावर झालेला अशी माझी समजूत काढली.मी सध्या तरी ती खरी मानली आहे!
तर जरा तकवा येताच आम्ही परत चढाईला सुरूवात केली.आता आल्या डोंगरात कोरलेल्या अरुंद पायर्या. त्या पण पावसाने गुळगुळीत झालेल्या.खाली दरी असल्याने वर बघत चढण्यापलिकडे काही आॅप्शन राहातच नाही इथे!
.
मग पोहोचलोच.वर दोन पाण्याची टाकी पाण्याने भरलेली होती. फिल्टर्ड पाण्याची बाटली सोबत घेऊन फिरणार्या माझी बाटली चक्क या पाण्याने भरली आणि प्यायलेच ते पाणी.खरं माझ्यातला डाॅक्टर नाक मुरडून बघत होता त्या पाण्याकडे.पण ग्रुपमधले सगळे बिनधास्त पिताना पाहुन लाज वाटून प्यायले ;)
वर अजून एक चढ पार केला आणि खालुन खुणावणारा जरीपटका समोर आला.आणि अफाट दृश्य.
.
लोणावळ्याची टायगर हिल आणि उंबर खिंड परिसर,सह्याद्रीची प्रचंड मोठी कातळभिंत समोर दिसत राहाते.इतका वेळ न आलेला पाऊस वर गेल्यावर शहाण्यासारखा आला.ते अप्रतिम दृश्य, तो भणाण गार वारा थोडावेळ अनुभवुन आम्ही लगेच निघालो.किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत.हा नुसताच पहारेकरी किल्ला असावा.

.
.

परत येताना त्या कातळात कोरलेल्या डेंजर पायर्या उतरायच्या होत्या! पण ग्रुपमधल्या अनुभवी सदस्यांनी एकेकाला धीर देत देत उतरवलं एकदाचं.नंतर परत खिंड उतरायची होतीच.ती चक्क बसून बसून उतरलो!
.
.
नंतरचा रस्ता त्यापुढे केकवाॅक! करवंदाच्या जाळीतली करवंदं खात खात आरामात खाली पोहोचलो तासाभरात. आणि मग आमचे अवतार बघितले! चिखलाने माखलेले हात पाय कपडे आणि प्रचंड भूक.तिथेच देवळात भात भाजीचं जेवण काय जेवलोय सपाटून!
आत्ताच घरी परत आले आणि नवर्याला सांगायला लागले आजचा वृत्तांत. मग तो मला नेहमीप्रमाणे का जाते तडफडायला म्हणला आणि मी पुढचा ट्रेक कधी आहे सांग गं कविता असं टायपायला सुरूवात केली पण!

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

26 Jun 2016 - 8:44 pm | नूतन सावंत

मी पयली.
मस्त ट्रेक.

विशाखा राऊत's picture

26 Jun 2016 - 8:45 pm | विशाखा राऊत

हिरवळ बघुन खुप मस्त वाटले.. ट्रेकची मज्जा औरच :)

त्रिवेणी's picture

26 Jun 2016 - 9:02 pm | त्रिवेणी

मस्त झालाय ग ट्रेक.मी कधी करणार??
मी पण आता पुणेकर ट्रेकर्सचा शोध घेते.

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 9:05 pm | सतिश गावडे

खोपोली पाली रस्त्याने जाताना डाव्या हाताला जो गड दिसतो तो हाच का?

प्रचेतस's picture

26 Jun 2016 - 9:19 pm | प्रचेतस

कोरीगडला जाताना लायन्स पॉइंटवरून मोराडीचा प्रचंड सुळका आणि त्याच्यापुढे एका सरळ रेषेत तीन लहानसे डोंगर दिसतात त्यांच्यातलाच मधला मृगगड.

महासंग्राम's picture

27 Jun 2016 - 9:44 am | महासंग्राम

वृत्तांत मस्तच भेट द्यायला हवी. रच्याकने कोरीगडला कट्टा करायचा का एकदा ????

पावसाळ्यात प्रचंड गर्दी असते त्या रस्त्याला. तिथे जायचं तर मुळशीमार्गे उलटं जायला हवं अन्यथा ४/५ तासांच ट्रॅफिक जाम.

प्रचेतस's picture

26 Jun 2016 - 9:17 pm | प्रचेतस

हिरवं हिरवं व्हायला सुरुवात झालीय. मृगगडाचा काळ साधारण दोनहजार वर्षांपूर्वीचा असावा. इथे भरपूर घाटवाटा आहेत. आणि पायथा आणि माथ्याला त्यांचे संरक्षक दुर्ग आहेत.

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 9:34 pm | सतिश गावडे

मृगगडाचा काळ साधारण दोनहजार वर्षांपूर्वीचा असावा.

तुम्हाला मृगगडाच्या इतिहासाबद्दल म्हणायचे आहे का? मृगगडाचा भुगोल सह्याद्रीइतकाच जुना असेल. :)

मृगगडाचाच असं म्हटलंय सर. गड म्हणजे फोर्टीफिकेशन, खोदीव पायऱ्या, पाण्याची टाकी ह्या अर्थी.
बांधकामं आहेत म्हणूनच गडाला अर्थ आहे ना. नपेक्षा साधा डोंगरच असता.

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 9:59 pm | सतिश गावडे

तुम्हाला डोंगरावरील गडनिर्मितीबद्दल म्हणायचे होते.

स्वच्छंदी_मनोज's picture

27 Jun 2016 - 7:53 pm | स्वच्छंदी_मनोज

इथे भरपूर घाटवाटा आहेत.

>> घाटवाटांची लाईनच आहे इथे. इथून समोरील अनघाई डोंगररांगे मध्ये किमान ६-७ घाटवाटा आहेत. सोप्या, अवघड, दमवणार्‍या, ऐतिहासीक सर्व प्रकारच्या :)

यशोधरा's picture

26 Jun 2016 - 9:22 pm | यशोधरा

शैलेंद्र सोनटक्के का?
मस्त फोटो! हिरवं शिवारssss

अजया's picture

26 Jun 2016 - 9:27 pm | अजया

हो यशो.

ओके, कविता मैत्रीण आहे माझी, बेस्ट ग्रुपबरोबर जातेयस तू.

कविता१९७८'s picture

27 Jun 2016 - 1:55 pm | कविता१९७८

मी ती कविता नाही बर का!

काय सांगतेस काय!! खरंच की काय! =))

कविता१९७८'s picture

27 Jun 2016 - 6:35 pm | कविता१९७८

खरच

पण तू नव्हेस हे मला ठाऊक आहेच.

कविता१९७८'s picture

27 Jun 2016 - 7:19 pm | कविता१९७८

:)

Maharani's picture

26 Jun 2016 - 9:26 pm | Maharani

Jabarich ajaya Tai....keep it up

किसन शिंदे's picture

26 Jun 2016 - 9:32 pm | किसन शिंदे

अरे व्वा !! ट्रेकला जाणं सुरू केलंत तर...

आता तिथे जवळच असलेल्या कर्नाळ्याला चला एकदा आमच्यासोबत.

अजया's picture

26 Jun 2016 - 9:51 pm | अजया

नक्की नक्की.

इशा१२३'s picture

26 Jun 2016 - 9:36 pm | इशा१२३

मस्त फोटो (घरबसल्या छानच वाटताहेत पहायला)
कविता आणि तुला _/\_
(का गेलात तडफडायला)

कविता१९७८'s picture

27 Jun 2016 - 1:53 pm | कविता१९७८

ईशे खुप मज्जा आली

जव्हेरगंज's picture

26 Jun 2016 - 9:45 pm | जव्हेरगंज

अरे वा!

आता जायलाच पायजे कुठेतरी!!

व्वा ! वाट अवघड दिसतेय.लायन पॅाइंटला कठड्याला उभे राहिले की कधी समोरच्याच टोकदार शिखरावरून कोणीतरी हातवारे करताना दिसतो तोच का मृगगड?

एस's picture

26 Jun 2016 - 10:54 pm | एस

तो मोराडीचा डोंगर. त्याच्यापलिकडे जे तीन छोटेछोटे डोंगर दिसतात त्यातला मधला मृगगड.

फार छान ट्रेक अजयाताई. उन्हाळ्यात हा किल्ला वेगळाच दिसतो. पायथ्याच्या जंगलात काही झाडे आहेत, त्यांची पालवी तांबूस-गुलाबी असते. बाकीच्या झाडांची सुकलेली गळालेली पाने आणि हे एक झाड तांबूस. काय भारी दिसते! माझ्याकडे काही छायाचित्रे आहेत. शक्य झाल्यास टाकतो. वरती कातळात उभ्या-आडव्या कोरलेल्या रेषा वेगळ्याच वाटतात. त्या कशाच्या असाव्यात हे मला उमजले नाही.

पुट्रेशु.

अजया मस्त लिहिलं आहेस गं.
मलाही हा अनुभव घ्यायचाय.
कधी योग येणार माहित नाही.

बोका-ए-आझम's picture

26 Jun 2016 - 10:23 pm | बोका-ए-आझम

अप्रतिम फोटो. पण अनुभव वाचताना गंमत येत असतानाच संपला पण :(.

पिशी अबोली's picture

26 Jun 2016 - 10:28 pm | पिशी अबोली

मस्त!
आज मीसुद्धा अशीच रविवारची छान झोप सोडून आर्कियॉलॉजीवाल्या मित्र-मैत्रिणींसोबत तंगडतोड करायला गेले होते..छान पायऱ्या बांधलेल्या घोरावडेश्वर लेण्यांच्या अर्ध्या वाटेवर आल्यावर या सगळ्यांच्या अंगात आलं आणि आम्ही कुठच्यातरी वाकड्या-तिकड्या वाटेने वर चढलो..तिथून लेणी बघून उतरून पुढे अजून बरीच ठिकाणं केली, पण या आर्कियॉलॉजिस्टांच्या सरळ कुठे न जाण्याच्या सवयीमुळे आज पाय चांगलेच बोलत आहेत.. :p

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

26 Jun 2016 - 10:38 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

छान छान,आजच एक मस्त ट्रेक करुन आलोय कोयना सह्याद्री साईडला ,सगळीकडे ढगच ढग व भुर्भुर् पाऊस लै मज्जा

छान धागा
ती खिंड म्हणजे आजुबाजुला खोल आहे का हो ?

दोन्ही बाजुंनी डोंगर येतो त्यामधली चिंचोळी जागा आहे.तसे खोल नाही.पण तिथूनच उतरायला जागा आहे.बाजूनी घसारा आहे.

अभ्या..'s picture

27 Jun 2016 - 9:53 am | अभ्या..

घसारा??
डेप्रिसिशन ला मराठीत घसारा म्हणतात.
बादवे आम्ही पण सोलापूरच्या किल्ल्याचा ट्रेक केला. ;)

प्रचेतस's picture

27 Jun 2016 - 9:59 am | प्रचेतस

घसारा म्हणजे स्क्री.

मानसी१'s picture

26 Jun 2016 - 10:58 pm | मानसी१

फोटो खुपच छान. हीरवळ बघुन मस्त वाटलं.
असेच अजुन बाकी सगळ्यांचे पण पावसाळी ट्रेक चे फोटो आणी लेख येउ दे.

पद्मावति's picture

27 Jun 2016 - 12:45 am | पद्मावति

फारच मस्तं!

धनंजय माने's picture

27 Jun 2016 - 1:34 am | धनंजय माने

असा प्रकार झाला तर!

अजया's picture

27 Jun 2016 - 8:18 am | अजया

हो.प्यारेकाका

स्पार्टाकस's picture

27 Jun 2016 - 2:00 am | स्पार्टाकस

आमच्या फोंड्याची आणि आंबोलीची सर नाय हा SSSS

जोक्स अपार्ट, मृगगड हा तसा अगदी सोप्या श्रेणीतला ट्रेक म्हणून ओळखला जातो. अर्थात ट्रेकींगला सुरवात करण्यासाठी आणि तुलनेने नवख्या ट्रेकर्ससाठी अगदी आदर्श ट्रेक!

पुढचा ट्रेक कुठे करणार आहेस?

धनंजय माने's picture

27 Jun 2016 - 2:13 am | धनंजय माने

How about Everest base camp? ;)

स्पार्टाकस's picture

28 Jun 2016 - 12:17 am | स्पार्टाकस

२ वेळा करुन झाला आहे.

अजया's picture

27 Jun 2016 - 8:17 am | अजया

हौशी लोक जाऊ शकतात असा कुठलाही! माझ्या कपॅसिटीबाहेरचा ट्रेक मी बहुधा करु शकणार नाही.ते दिवसा तारे दिसणे जरा डेंजरच होते:) आपल्याला मजा वाटायला हवी भिती नको!

सुबोध खरे's picture

27 Jun 2016 - 10:18 am | सुबोध खरे

आपल्याला मजा वाटायला हवी भिती नको!
+१००
उगाच थ्रिल म्हणून बोंबलत अवघड चढणी चढायच्या आणि पुढचे ५-७ दिवस शरीरातील प्रत्येक स्नायू मी म्हणून दाखवत असेल तर फायदा नाही.

खटपट्या's picture

27 Jun 2016 - 2:08 am | खटपट्या

जबरा

निशाचर's picture

27 Jun 2016 - 3:23 am | निशाचर

ट्रेकचं वर्णन मस्त!

नवख्यांची पावसाळी भटकंती - २०१६

असा धागा काढून ठेवावा असं सुचवतो.एकदोन फोटो अन दोनतीन गमतींची भर घाला त्यात सर्वांनी.पट्टीचे भटके वेगळे ढिसाळ धागे काढतातच स्तुती करून घ्यायला.इतरांचे काय?कोणीतरी सुरुवात करा लवकर.
( प्रत्येकाला आपला ट्रेक भारीच वाटत असतो पण लेख टाकण्याऐवढा ऐवज नसतो कधीकधी तरी लवकर लिहा.)

स्वच्छंदी_मनोज's picture

27 Jun 2016 - 7:54 pm | स्वच्छंदी_मनोज

हेच्च म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2016 - 7:49 am | अत्रुप्त आत्मा

लै भारी. !

आतिवास's picture

27 Jun 2016 - 8:58 am | आतिवास

फिटनेस वाढवला पाहिजे याची आठवण करून देणारं वर्णन आहे.

भुमी's picture

27 Jun 2016 - 9:57 am | भुमी

फोटोपण मस्त...

जेपी's picture

27 Jun 2016 - 10:10 am | जेपी

मस्त...

नीलमोहर's picture

27 Jun 2016 - 10:17 am | नीलमोहर

अजून अशा बर्‍याचशा ट्रेक्ससाठी शुभेच्छा..!!
असे ट्रेक करायची फार इच्छा असते पण तो व्हर्टिगो बाबा पाठ सोडेल तेव्हा.

त्रिवेणी's picture

27 Jun 2016 - 11:22 am | त्रिवेणी

तुम्हीपण vartigo वाले का???

सस्नेह's picture

27 Jun 2016 - 11:06 am | सस्नेह

पहिल्या ट्रेकसाठी अभिनंदन ! लगे रहो !

कविता१९७८'s picture

27 Jun 2016 - 1:52 pm | कविता१९७८

हा अजयाचा दुसरा ट्रेक होता

गामा पैलवान's picture

27 Jun 2016 - 12:07 pm | गामा पैलवान

अजया,

पावसाळी मोहिमेबद्दल अभिनंदन. पण फोटोतली ती चिंचोळी खिंड पाहून धडकी का भरली हो? एक माणूस आरामात जाईल इतकी रुंद आहे! ;-) असो. खडकातले चेहरे मस्त आहेत.

आ.न.,
-गा.पै.

पहिलटकरणीची भिती ;) दुसरं काय!

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2016 - 12:10 pm | टवाळ कार्टा

बाब्बौ...

जगप्रवासी's picture

27 Jun 2016 - 12:36 pm | जगप्रवासी

मस्त झाला ट्रेक. पुढच्या ट्रेक साठी आतापासूनच शुभेच्छा

पियुशा's picture

27 Jun 2016 - 1:01 pm | पियुशा

जबरदस्त !!! अजया न कवि जियो :)

स्वच्छंदी_मनोज's picture

27 Jun 2016 - 1:11 pm | स्वच्छंदी_मनोज

जबरी.. ट्रेक आणी लगोलग वृत्तांत टाकल्याबद्दल आभिनंदन

मृगगड आहेच जबरी आणि फसवा. ह्या परीसरात असणार्‍या महत्त्वाच्या घाटवाटांमुळे ऐतीहासीक दृष्ट्यापण महत्त्वाचा आहे.

आता ट्रेकिंग सुरु केला आहात तर थांबु नका. पुढच्या ट्रेकला शुभेच्छा.

कविता१९७८'s picture

27 Jun 2016 - 7:20 pm | कविता१९७८

फसवा तर नाही वाटला पण जबरी आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

27 Jun 2016 - 7:50 pm | स्वच्छंदी_मनोज

कवीतातै, वाट सहज न सापडण्यासाठी म्हणून फसवा म्हटला मी. हा जरी दिसतो छोटा किल्ला तरी खिंडीकडे जाण्यासाठी घ्यायला लागणारे वळण सहज सापडत नाही.

आता दिशादर्शक बाण वगैरे असतील तर सोपे आहे पण मी दोन वेळा गेलोय इथे आणी दोन्ही वेळेला खिंडीकडे जायचा रस्ता चुकलोय :). रस्ता चुकलोय समजे पर्यंत बरेच पुढे गेलो होतो आणी मग प्रचंड तिरक्या ट्रॅवर्सवरून खिंडीपर्यंत यायला लागले होते.

बरोबर.परत येताना पण बाहेर पडायची वाट डावीकडे आहे.आमच्या सोबत गावातला मुलगा असल्याने चुकलो नाही. कारण सरळ वाट धनगर वाड्याकडे जाते.जंगलात सगळेच मार्ग सारखे दिसतात खरे!
त्या तिरप्या घसरणीवरुन आलात? बापरे!

कविता१९७८'s picture

27 Jun 2016 - 7:56 pm | कविता१९७८

अच्छा, दिशादर्शकबाण नव्हते पण आमच्या ग्रुप लीडरमुळे (सोनटक्के)आणि आम्ही एकुण ७१ जण एकामागोमाग एक असल्याने कदाचितआम्हाला रस्ता शोधणे कठीण गेले नसावे.

मस्तच लिहले आहेस ताई. पण मला फोटो दिसत नाहियेत. :(

सूड's picture

27 Jun 2016 - 6:14 pm | सूड

भारी!!

दिग्विजय भोसले's picture

27 Jun 2016 - 7:20 pm | दिग्विजय भोसले

फोटो वगैरे भारीच,पण धाडसी ब्वा तुम्ही!!!

पैसा's picture

27 Jun 2016 - 11:32 pm | पैसा

जबरदस्त ट्रेक आहे! आता पाऊस सुरू झाल्यावर आणि शेवाळ धरल्यावर ट्रेकर्सनी शक्य तेवढी काळजी घेऊनच साहसे करा. आजच्या पेपरमधे दोन तीन दुर्घट्नांच्या बातम्या आल्या आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2016 - 5:28 am | डॉ सुहास म्हात्रे

भारी ! विषेशतः पावसाने भिजलेल्या पायर्‍या आणि दगड पाहून ट्रेक थरारक झाल्याची खात्री पटली !

(इकडे तिकडे न पाहता) चिखलात बसायला, घसरायला मिळाल्याने लहाणपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असतील ! :)

रुपी's picture

28 Jun 2016 - 5:48 am | रुपी

मस्त! खिंड लढवता-लढवता फोटोही काढले हे कौतुकास्पद आहे!

गामा पैलवान's picture

28 Jun 2016 - 12:36 pm | गामा पैलवान

जाणकारांनो,

खडकातले हे चेहरे निसर्गनिर्मित आहेत की मानवनिर्मित?

https://s31.postimg.org/mq0gz6ybf/22_big.jpg

आ.न.,
-गा.पै.

मस्तच झाला ट्रेक आत्तु :D

स्नेहल महेश's picture

29 Jun 2016 - 10:08 am | स्नेहल महेश

ट्रेकचं वर्णन मस्त!

अभिरुप's picture

7 Jul 2016 - 12:39 pm | अभिरुप

ट्रेकचे अनुभव कथन मस्त केलंय....
अजयाताई आणि कविताताई तसेच सर्व ईच्छुकांना पुढील ट्रेकसाठी मनापासून शुभेच्छा.

विवेकपटाईत's picture

7 Jul 2016 - 12:53 pm | विवेकपटाईत

गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत पाऊस नाही, भयंकर उमस आहे, फोटो पाहून थोडा दिलासा मिळाला.

वेल्लाभट's picture

7 Jul 2016 - 12:54 pm | वेल्लाभट

कडक. जाऊन आलोय इथे.

मुक्त विहारि's picture

7 Jul 2016 - 6:53 pm | मुक्त विहारि

पुढील ट्रेकला शुभेच्छा.

बॅटमॅन's picture

7 Jul 2016 - 11:35 pm | बॅटमॅन

अप्रतिम. त्या निसरड्या शेवाळाची भीती वाटते फक्त....