It's Elementary!! (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

स्रुजा's picture
स्रुजा in लेखमाला
26 Apr 2016 - 8:47 am

Header

मी लहान असताना माझ्या जगाचे २ भाग होते. अद्भुतरम्य वाटणारं एक पुस्तकांनी रंगवलेलं जग आणि बुचकळ्यात पाडणारं एक आजुबाजुच्या मोठ्या माणसांचं जग. एका भागातलं जग फारच सुरम्य आणि सुरस होतं. त्यातली पात्रं चमत्कारीक होती, विक्षिप्त होती, ती मला त्यांच्या गोष्टी सांगायची. त्यांच्याबरोबर मी हळदीघाट पाहिला, शाहिस्तेखानाची बोटं तुटताना स्वत:ची बोटं अचंब्याने तोंडात घातली, अफझलखानाच्या शामियान्यात महाराजांना वाघनखं खुपसताना पाहिली. हातात मिळेल त्याची तलवार करुन मावळ्यासारखं घरातल्या न आवडणार्‍या भाज्यांच्या रुपातल्या शत्रु सैन्यावर हल्ले केले, मातोश्रींनी मग परत हल्ला केल्यावर पुढच्या वेळी गनिमी कावा साधायचा असं देखील अनेकदा ठरवलं. त्या वेळचं जग राम कृष्ण , शिवाजीमहाराज आणि त्यांचे मावळे, राणा प्रताप, झाशीची राणी, श्यामची आई या आणि अशा अनेक लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांनी भरुन आणि भारुन गेलं होतं.

कसं कोण जाणे पण या सगळ्यात हळुच एके दिवशी एक नवीन व्यक्ती भेटली. त्या माणसाचं नाव आणि त्याची भाषा दोन्ही परके वाटत होते. या माणसाला सगळ्या चुकीच्या सवयी होत्या. हा दिवसभर कॉफी संपवायचा, सिगार ओढायचा. त्याची घरमालकीण त्याला एकटेपणाबद्दल आणि विक्षिप्तपणाबद्द्ल बोलुन दाखवायची. त्याचा पत्ता पण अगदी छोटुसा : २२१ बेकर स्ट्रीट. एवढ्याश्या पत्त्यावर त्याचे गिर्हाईक आणि त्याचे परिचित त्याला कसे शोधत यायचे कोण जाणे. आपल्याकडे कसा व्यवस्थित पत्ता सांगतात! अमुक मंदिरामागे, तमुक गल्ली वगैरे खाणा खुणा कशा व्यवस्थित, जिथल्या तिथे! शेरलॉक होम्स नावाचा हा तेंव्हा माझ्या मते सर्किट असलेला हा माणुस मला या जगात भेटला आणि माझं हे अद्भुतरम्य जग एकदम वास्तव पातळीवर आलं. या माणसाचे कारनामे हे तेव्हा जास्त खरे वाटायचे. सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर( इथे अद्भुत) असतं हे कळायचं तेंव्हा वय नव्हतं म्हणुन असेल पण या कथांमधुन मी बघता बघता लंडनच्या गल्लीबोळांमधुन फिरायला सुरुवात केली. खिळुन जाणं काय असतं हे शेरलॉक होम्सने शिकवलं. सुरुवातीला विखुरलेल्या कणांमधुन एक निष्कर्ष बरोब्बर आकाराला यायचा आणि दर वेळी हा माणुस अजुन वेड लावायचा. जरा अजुन मोठी झाले तशी या करिष्म्याच्या निर्मात्याबद्दल कुतुहल वाटायला लागलं. अशा केसेस सुचणं, त्या शेवटापासून सुरुवातीपर्यंत गुंफत नेणं आणि मग रहस्याची हुकुमी उकल करणं हे या माणसाचं कौशल्य जगातल्या अनेकांना मोहवुन गेलं. आज ही शेरलॉक होम्स वर दर महिन्याला १० लाख ( १ मिलियन) सर्चेस गुगल नोंदवतं. जगातल्या अनेक भाषांमध्ये आणि लाखो लोकांमध्ये सर आर्थर कॉनन डॉयलच्या या गुप्तहेराला मानाचं स्थान मिळालं. त्याच्या लोकप्रियतेचा नेमका अंदाज मला एक किस्सा वाचल्यावर आला. डॉयल एकदा बॉस्टनला काही कामानिमित्त आले होते. हॉटेलपर्यंत पोहोचवणार्‍या कॅब ड्रायव्हरने त्यांंना विचारलं " तुम्ही शेरलॉक होम्स चे लेखक आहात ना? " लेखक महाशय अर्थातच आश्चर्यचकीत झाले आणि होकार देत विचारलं "कसं ओळखलं?" लक्षात घ्या, विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा तो काळ! सोशल मेडिया दिमतीला नव्हता त्या ड्रायव्हरच्या पण शेरलॉक होम्स होता! तो ड्रायव्हर हसत उद्गारला " तुमच्या कोटावरुन असं वाटतंय की तुमची न्युयॉर्क च्या बातमीदारांनी गचांडी धरली होती, तुमचे केस फिलाडेल्फिआ मध्ये भादरुन दिल्यासारखे वाटतायेत , तुमच्या हॅटची अवस्था बघुन वाटतंय की तुम्ही जीव मुठीत धरुन शिकागो मधुन पळ काढलाय आणि .. आणि.. आणि..तुमच्या ट्रंक वर तुमचं नाव मोठ्या अक्षरात लिहीलंय :) "डॉयलची अर्थातच हसावे की अमेरिकन चिमट्यावर ब्रिटिश हिसका दाखवावा अशी संभ्रमावस्था झाली असणार :)

बॉस्टन च्या त्या कॅब ड्रायव्हरच्या त्या छोट्याश्या गंमतीदार शेरलॉक नाट्या पासून ते स्वित्झर्लंडच्या मेरिंजन गावाच्या एका चौकाला डॉयलचं नाव देण्यापर्यंत या शेरलॉक होम्सची किर्ती पोचली होती. दळणवळणाची आणि संवादाची मर्यादित साधनं उपलब्ध असणार्‍या काळात ही अमर्यादीत किर्ती हाच एक विक्रम आहे. असं असुनही स्वत: डॉयल आपल्या या निर्मितीला "पोट भरण्याचं एक साधन" या पलिकडे फार महत्त्व देत नव्हते. पेशाने डॉक्टर असलेले डॉयल पोटापाण्याच्या कामात तसे अयशस्वी होते. डॉक्टरी चालत नाही म्हणुन एकिकडे त्यांनी फावल्या वेळात( जो त्यांना बराच मिळायचा) लिहायला सुरुवात केली. होम्सची प्रेरणा त्यांनी त्यांच्या एका सर्जन शिक्षकावरुन घेतली होती. उत्तम निरिक्षणशक्ती आणि कुशाग्र बुद्धीमत्ता असलेले हे प्रोफेसर वर-वर निरर्थक वाटणार्‍या तपशीलांमधुन रोगाचं अचुक निदान करायचे. ते पेशंटला, त्याच्या पेहरावाला आणि आजाराच्या लक्षणांना बघुन आपल्या विद्यार्थ्यांना पेशंटच्या व्यवसायाबद्दल क्लुज मिळवायला सांगायचे. शेरलॉक होम्सला अफाट प्रसिद्धी मिळाल्यावर डॉयलने आपल्या या गुरुला त्याचं श्रेय दिलं, त्यावर उत्तर देताना या गुरुंनी लिहीलं होतं " डॉयल, तुलाही माहिती आहे इतर कुणी नाही तर तू स्वतःच शेरलॉक आहेस!" हे थोड्याफार प्रमाणात खरंही होतं. प्रत्यक्ष आयुष्यात डॉयलने अनेक केसेस सोडवायला पोलिसांना मदत केली होती. एका म्हातार्‍या बाईच्या खुनात अडकलेल्या एका सॉलिसिटरला निर्दोष सिद्ध करण्यासाठी डॉयलने स्वतः केसची पाळंमुळं शोधुन काढली होती. त्यांच्या शोधकार्यानंतर आरोपी निर्दोष सुटला देखील.

शेरलॉकच्या पात्राच्या अनेक पैलुंमध्ये डॉयल यांचं खरं आयुष्य डोकावत राहतं. छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मेडिकल कॉलेजमध्ये असताना मेरिलबोन क्रिकेट क्लब कडुन डॉयल अनेकदा मॅचेस खेळले. बेकर स्ट्रीट मेरिलबोनमध्ये आहे! खुद्द डॉ.वॉटसनची व्यक्तिरेखादेखील एका परिचितावर किंवा कदाचित स्वतः डॉयलच्या नेव्ही मधल्या अनुभवांवर आधारीत असावी. शेरलॉकच्या कथावस्तु सुद्धा अनेकदा एखाद्या सत्यघटनेवरुन विस्तारीत व्हायच्या. आपल्या कथानायकाप्रमाणे डॉयलना देखील आजुबाजुच्या गवतातुन नेमकी सुई शोधण्याचं अजब कौशल्य अवगत होतं. ते त्यांच्या कथांमधुन डोकावत रहायचं.

कुठल्याही इतिहास घडवणार्‍या घटनेची, व्यक्तीची सुरुवात तशी उपेक्षित असते. आजुबाजुचं जग आपल्या नादात मश्गुल असताना काहीतरी लोकविलक्षण आकाराला येत असतं आणि घडणारा इतिहास सगळ्यांनाच स्तिमित करणारा ठरतो. तो इतिहास घडवणार्‍या व्यक्तीनेही त्या घटनेला फारशी किंमत न देणे हे मात्र दुर्मिळ असावं. शेरलॉक होम्सच्या पहिल्या कादंबरीला अजिबात यश मिळालं नाही. स्वतः डॉयल पण आपल्या या पुस्तकावर खुश नव्हते. पैसे मिळवणे मात्र भाग होते त्यामुळे यांत्रिकपणे कादंबरी प्रकाशकांकडे पाठवत राहणे हे काम ते करत रहायचे. ३२ प्रकाशकांनी नाकारल्यानंतर एका ठिकाणी ती छापुन आली आणि तिला मर्यादीत यश मिळालं. यानंतर पुढे काय असा प्रश्न त्यांना सतावत असताना एका सर्वसाधारण खप असलेल्या स्ट्रँड नावाच्या मासिकाच्या मालकाने ही कादंबरी लेखमालेच्या स्वरुपात छापु देण्याची डॉयलना गळ घातली. आढेवेढे घेत त्यांनी त्याला मान्यता दिली आणि एका पर्वाची नांदी झाली! त्या नंतर शेरलॉक होम्सच्या कथा नियमितपणे छापुन यायला लागल्या. त्याला प्रसिद्धी आणि मान्यता मिळायला लागली. तरीही खुद्द डॉयलना समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मते साहित्यिक मुल्य नसलेल्या या कामामुळे त्यांचा वेळ वाया जात होता. शिवाय सतत नावीन्यपूर्ण रहस्य निर्माण करणे हेदेखील अत्यंत थकवणारे काम होते. आणि स्वतःच्या परिपूर्णतेच्या निकषावर न उतरणारं काम पुढे प्रकाशकांना देणं हे डॉयलना माहिती नव्हतं. त्यामुळे या पात्राला पूर्णविराम देण्याचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत असे. त्यांनी त्यांच्या आईला तसं बोलूनही दाखवलं होतं. आपल्या सुदैवाने त्यांच्या आईला डॉयलच्या लिखाणातील साहित्यिक मुल्यांपेक्षा होम्सच्या कथांमध्ये आणि डॉयलच्या आर्थिक गणितात जास्त रस होता. तिने अर्थातच हा विचार हाणुन पाडला आणि होम्सच्या अजुन काही कथा जन्माला आल्या. इतर कुठल्याही सृजनशील माणसाप्रमाणे डॉयल ही मनस्वी आणि काहीसे विक्षिप्त होते. मात्र त्यांच्या पाकिटाचा त्यांच्या साहित्यिक महत्त्वाकांक्षेशी ३६चा आकडा होता. हुकुमी पैसे मिळवुन देणार्‍या होम्सला रामराम ठोकणं त्यांच्या लेखणीला पटत असलं तरी बुद्धीला अवघड जात होतं. हे द्वंद्व संपावं आणि परस्पर निर्णय लागावा म्हणुन त्यांनी मासिकाला त्याकाळची अवाच्या सवा किंमत म्हणजे ५० पाऊंड वाढवुन मागितली. अर्थातच त्यांना मासिकाकडुन नकार अपेक्षित होता. मासिकाने चक्क मंजुर केलं. डॉयलचा आणि आपल्या लाडक्या पात्राच्या भवितव्याचा निर्णय निदान तात्पुरता तरी झाला होता. डॉयलने काही कथा लिहुन पुन्हा एकदा किंमत वाढवुन मागितली. ती देखील मंजुर झाल्यावर त्यांनी नाईलाजाने ते काम पूर्ण करुन दिलं. आणि मग मात्र एका कथेत होम्सचा अंत घडवुन आणलाच. "फायनल प्रॉब्लेम" मध्ये एकदाचा होम्सला पूर्णविराम देऊन डॉयलने बर्‍याच वर्षांची आपली इच्छा पूर्ण केली. पुन्हा म्हणुन होम्सच्या भानगडीत पडायचं नाही या निर्धाराने त्यांनी मॉरीआर्ती करवी होम्सचं सरळ तेरावं घातलं. यानंतर उसळलेला जनक्षोभ अभूतपूर्व होता. स्ट्रँड मासिकाची फारच दयनीय अवस्था झाली. त्यांचं सदस्यत्व अनेकांनी रद्द करुन टाकलं. लोकांनी विनंत्यांपासून धमक्यांपर्यंत सगळे उपाय करुन पाहिले. डॉयलने अर्थातच या दडपणाला पुढची ५ वर्षं भीक देखील घातली नाही. मात्र पुन्हा एकदा त्यांचं आर्थिक गणित आडवं आलं. त्यांनी लिहीलेल्या इतर साहित्याला प्रशंसा मिळाली, सर हा खिताब मिळाला पण पैसे नाही ! शेवटी त्यांनी हाऊंड ऑफ बास्करव्हिल मधुन होम्सला परत आणलं. अजुनही पूर्णपणे त्यांनी आपल्या या पात्राची ताकद ओळखली नव्हती. हाऊंड ऑफ बास्करव्हिल ही वॉट्सनच्या डायरी मधली जुनी नोंद होती, प्रत्यक्ष होम्स परत आलाच नव्हता. त्यानंतरही २ वर्षं गेली आणि मग मात्र शेरलॉकच्या लोकप्रियतेच्या रेट्यापुढे त्याच्या या जगावेगळ्या जन्मदात्याने मान तुकवली. नाहीतरी होम्सचं प्रेत सापडलं असा उल्लेख नव्हताच. तो लंगडा बहाणा कामाला आला आणि होम्सने वॉटसनला एका निर्जन जागी रुमवर बोलावुन घेतलं. वॉटसनने लगोलग त्याच्या चाहत्यांना ही खबर दिली आणि त्यानंतर मात्र डॉयलनी मागे वळून बघितलं नाही. अजुन ९ कादंबरऱ्या आणि ५६ शेरलॉक कथा त्यांनी लिहील्या.

आधी नाईलाजाने करत असले तरी डॉयलने आपलं काम चोख केलं होतं. शेरलॉकच्या यशाचं रहस्य त्याच्या अत्याधुनिक शोधपद्धतींमध्येही दडलं होतं. अनेक अशा फोरेन्सिक पद्धती डॉयलनी त्यांच्या प्रत्यक्ष वापराआधी पुस्तकात आणल्या. बोटांचे ठसे घेणे, घावावरुन बंदुकीची गोळी किती अंतरावरुन झाडली असेल याचं गणित मांडणे. अशा अनेक त्या काळच्या "कटींग एज " तपासपद्धती होम्स वापरत होता. होम्सच्या वापरानंतर काही वर्षांनी या पद्धती प्रत्यक्षात अंमलात आणल्या जाऊ लागल्या. गुन्हेअन्वेषण शाखेचा आणि शस्त्रात्रांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. पहिल्या महायुद्धात नेव्ही शिप वर त्यांनी डॉक्टर म्हणुन नुसतं कामच केलं नाही तर नेव्ही शिपच्या काही महत्त्वपूर्ण सुरक्षापद्धतींमध्ये त्यांनी बदलही घडवुन आणले. त्याकाळी ईंग्लंडमध्ये गुन्हेगारा़ंचा सुळसुळाट होता. जॅक द रिपर हा कुप्रसिद्ध सीरियल किलर ही त्याच काळातला. संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे लोकांना दुर्लभ होते. नेमका त्या काळात खरे पोलिस जे करु शकत नव्हते ते शेरलॉक लीलया करुन दाखवत होता. शेरलॉकला तत्काल जनाश्रय मिळण्याचे हे ही एक फार मोठे कारण होते. पण ते तेवढेच नाही. दुसर्‍यांच्या भानगडीत नाक खुपसणे आणि कुतुहल असणे ही मानवजातीची अंतःप्रेरणा असावी. प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याशी संबंधित नसलेल्या घटनांमधुन आपल्याला वगळले जाते आणि कुतुहल कधीच शमत नाही. गंमतीचा भाग सोडला तरी कोडं सोडवणं आणि रहस्याच्या मुळापर्यंत जाणे हा आपल्याला मिळालेला उ:शाप असावा. शेरलॉकच्या माध्यमातुन अनेक अजब-गजब कोडी समोर आली, ती बघता बघता सुटली देखील. डॉयलना न जाणवलेली त्यांच्या लेखणीची आणि त्यांना सापडलेल्या तपशीलातल्या राक्षसाची ताकद त्यांच्या वाचकांना बरोब्बर कळाली होती. शेरलॉक बघता बघता या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाला आणि डॉयलची ओळख बनुन गेला.

डॉयल चा नायक आणि स्वतः डॉयल काही बाबतीत अतिशय विरुद्ध होते. तर्कशुद्ध विचार करणार्‍या होम्सला जन्माला घालुन देखील स्वतः डॉ.डॉयल परिकथांवर विश्वास ठेवणारे होते. आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्माकडे त्यांचा विशेष कल होता . त्यांचं एक पुस्तकांचं दुकान होतं आणि तिथे होम्स सीरिज मधलं एकही पुस्तक विक्रीला नव्हतं. तिथे फक्त ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पुस्तकं होती. शेवट्पर्यंत काहीशी सावत्र वागणूक त्यांनी त्यांच्या या नायकाला दिली. त्याला काही ठोस कारणं देखील होती. फारच कमी लोकांना त्यांच्या इतर ६० (!) कादंबर्‍यांबद्दल माहिती असावं. त्यांच्या "द लॉस्ट वर्ल्ड" वरुन प्रेरणा घेऊन स्पिलबर्गने जुरासिक पार्क बेतला हे किती जणांना माहिती असेल? अर्थात ही देखील एक विज्ञानकथाच होती, त्यांना अभिप्रेत असलेले " गंभीर" लिखाण नव्हे. मात्र, बॉअर वॉर बद्दल लिहीलेल्या रीपोर्ट साठी त्यांना नाईटहुड बहाल करण्यात आलं! आपण ऐतिहासिक लेखक म्हणुन प्रसिद्ध व्हावं ही त्यांची मनिषा काही प्रमाणात का होईना पूर्ण झाली. डॉयल स्वतः ब्रिटिश प्रतिष्ठेच्या खोट्या आणि बेगडी संकल्पनांचे बळी असावेत असा संशय घ्यायला वाव आहे. क्लासेस साठी लिखाण करायचं असून मासेस ने डोक्यावर उचलुन धरलेल्या शेरलॉकमध्ये त्यांना म्हणुनच समाधान मिळत नसावं. सिद्धहस्त लेखणी असून, त्याला प्रसिद्धी मिळत असून देखील, "केवळ करमणुक करणारे साहित्य" आपण लिहीतो असा लोकांचा समज होऊ नये यासाठी त्यांची सतत धडपड चालू असायची. त्यांच्या साहित्यिक प्राधान्याला त्यांनी पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र यश कधी हुलकावणी देईल आणि कोणत्या वळणावर हसतमुखाने गळाभेट घेईल याची खात्री़ कुणी घ्यावी? आपली पत्रकार, इतिहासाचा अभ्यास असलेला लेखक अशी ओळख व्हावी, शेरलॉक होम्सच्या यशाने आपल्या अंगचे इतर गुण झाकोळुन जाऊ नयेत म्हणुन त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. त्यात काही प्रमाणात त्यांना यशही आलं पण शेरलॉक होम्सचा लेखक हीच त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम झोतात राहिली. तसंही त्यांच्या या बुद्धीमान नायकाला हारणं आणि चुकणं दोन्हीही माहिती नव्हतंच! आपल्याच निर्मितीची ताकद आणि किंमत न ओळखता त्यांना हव्या असलेल्या यशाचा शोध ते घेत राहिले. शेरलॉकच्या रुपात ते यश त्यांच्या मागे धावत राहिलं पण ... आपल्या पोटातली कस्तुरी रानावनात शोधत फिरण्याचं प्रारब्ध फक्त मृगाच्याच भाळी असतं असं थोडीच आहे!

शेरलॉक च्या प्रत्येक कथेला वाचकांनी "it's excellent !!" म्हणुन डोक्यावर घेतलं आणि डॉयल मात्र "Elementary!" म्हणत राहिले :)

Footer

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

30 Apr 2016 - 5:25 am | स्रुजा

धन्यवाद नीमो आणि प्रास :)

डॉईलसायबांचे द लॉस्ट वर्ल्ड मी वाचलंय....
तसं ठीकच आहे, पण त्यातली जीवशास्त्रीय व विज्ञानकथा शैली (आजच्या नजरेने बाळबोध) बघता शेरलॉकचा निर्माता हाच का अशी शंका येते.
बरोबरंय, मद्राशी लुंगीवाल्याने भांगडा करावा तसंय ते.
म्हणुनच गाजली नसावी ती...
पण वस्तुतः १८व्या शतकाचा उत्तरार्ध, तेव्हाचे अत्यंत सिमित माहिती स्रोत बघता (गुगळे नव्हते ना तेव्हा) आर्थर सायबांनी नविनच जन्मलेल्या भीमसरट शास्त्राचा पुरेपुर अभ्यास करुन कदाचित जगातील प्रथमच डायनॉसोर कथा लिहिली आहे.

माइकल क्रायटन ने याच नाव व कथाबीजावर आपली दुसरी धारावाहिक लिहिलीय.(कदाचित ते डॉईल ना ट्रिब्युट असावं त्याचं)

नाखु's picture

2 May 2016 - 5:04 pm | नाखु

विलायतेत कल्पनेतील पात्राचे संग्रहालय होते तर देशात खरोखरच्या महाराजांच्या वास्तु आणि युद्धनिपुणतेचा ठेवा अक्षम्य हेळसांडीने मातीमोल होत आहे...

३५० पेक्षा जास्त सज्जड पुरावे असलेल्या महाराष्ट्रातील मराठी नाखु

नूतन सावंत's picture

3 May 2016 - 10:24 am | नूतन सावंत

सृजा,भन्नाट लिहिलंयस.
शेरलॉक होम्सच्या कथा आणि कादंबऱ्या वाचताना रंगून जायला होते तेवढंच लेख वाचताना रंगायला झालं.आधी आल्या त्या दिवशी लेख वाचला आणि आज पुन्हा वाचला तरी त्यातली गोडी कमी झाली नाही हे विष.डॉयलच्या लिखाणाप्रमाणेच.

नूतन सावंत's picture

3 May 2016 - 10:27 am | नूतन सावंत

हे विशेष असे वाच.

अवांत;:- स्वसंपादनाची सोय असती तर बरं झालं असतं.

नवीन प्रतिसादकांचे धन्यवाद. मुवि काकांनी समग्र शेरलॉक ची ही लिंक दिली परवा, सगळ्या शेरलॉकप्रेमींसाठी ती इथे देते आहे:
https://maggiemcneill.files.wordpress.com/2012/04/the-complete-sherlock-...

जुइ's picture

8 May 2016 - 3:07 am | जुइ

लेख आवडला! शेरलॉक छानच आहे पण Hercule Poirot मला मात्र जास्तच आवडतो ;-)

पिशी अबोली's picture

8 May 2016 - 11:25 am | पिशी अबोली

एक्सेलंट, स्रुजे!

हाउंड ऑफ बॅस्करविल्स ची कथा एका टीचरनी पाचवीत सांगितली होती..नंतर मिळवून, शोधून होम्स वाचायला सुरुवात केली.. आता हसू येतं, पण होम्सच्या 4 दीर्घ कादंबऱ्या हे माझं पहिलं इंग्लिश वाचन होतं..कितीही किचकट वाटलं तरी अट्टहासाने पूर्ण केलेलं..