राणीच्या देशात - ब्राँटे पार्सोनेज (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

Primary tabs

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in लेखमाला
19 Apr 2016 - 10:13 am

Header

आवडत्या लेखिकेच्या निवासस्थानाला दिलेल्या भेटीबद्दल, त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल मिळालेली माहिती याबाबत पुस्तकदिनानिमित्त आवर्जून लिहावेसे वाटले म्हणून हा लेख.

मला हॅवर्थला जायचे आहे असे मी मागे नवऱ्याला तीन-चार वेळा सांगितले होते पण काही केल्या जाणे होईना. यावर्षी हॅवर्थ बघायचेच आहे असा हट्ट केला तेव्हा त्याने विचारले हॅवर्थला आहे तरी काय? मी म्हटले, मला ब्राँटे पार्सोनेज बघायचे आहे आणि मग नवऱ्याला ही एवढी का हॅवर्थ हॅवर्थ करतेय याची लिंक लागली. शर्लॉट ब्राँटे माझ्या काही आवडत्या लेखकांपैकी एक आणि मला त्यांचे, त्या जिथे साधारण १७० वर्षांपूर्वी राहत होत्या ते घर बघण्याची फार - फार इच्छा होती. सप्टेंबर २०१५ च्या एका वीकांताला हॅवर्थला जायचे आम्ही नक्की केले आणि मी त्या वीकांताची आतूरतेने वाट पाहू लागले.

हॅवर्थ हे वेस्ट यॉर्कशयारमधल्या keighley च्या नैऋत्याला तीन माईल्सच्या अंतरावर वसलेले छोटेसे गाव आहे. या गावाचे वैशिष्टय म्हणजे इथे असलेले ब्राँटे पार्सोनेज आणि त्याभोवती वेढलेले मूरलँड. हे पार्सोनेज, चर्च व कबरस्थानाच्या अगदीच बाजूला आहे. ब्राँटे पार्सोनेज हे लेखिका शर्लॉट ब्राँटे यांचे निवास्थान आहे ज्याला आता ब्राँटे सोसायटीने संग्रहालयात बदलले आहे. ही वास्तू फार जूना इतिहास बाळगून आहे, ब्राँटे बहिणींच्या बालपणीच्या रम्य आठवणी, त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी लिहिलेले जगप्रसिद्ध साहित्य, त्यांचे जीवन-मृत्यु, त्यांचा एकाकीपणा असे सगळेच या वास्तूने पाहिलेले, अनुभवलेले आहे. साधारण दीड तास ड्राईव्ह करुन आम्ही हॅवर्थ गावात प्रवेश केला, पार्सोनेजच्या आवारातचं कार पार्क असल्यामुळे गाडी पार्क करणे सोपे गेले. पार्सोनेजच्या रिस्पेशनवर जाऊन आम्ही तिकिटे काढली तेव्हा रिस्पेशनवरचा माणूस म्हणाला अनेक जुन्या, मौल्यवान वस्तू त्यांनी जतन केल्या असल्यामुळे आत फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. थोडीशी निराशा झाली खरी पण तरी ते पार्सोनेज बघायचे म्हणून उत्साह ही तितकाच जास्त टिकून होता.

.

घराच्या गेटमधून आत शिरण्याआधी वरती ब्राँटे पार्सोनेजचा सुंदर, लोखंडी बोर्ड आहे ज्यावर शर्लॉट ब्राँटे यांची लेखन करतानाची प्रतिकृती आहे. हा लोखंडी बोर्ड १९४० साली मिस्टर. मिशेल यांनी तयार केला. गेट मधून आत शिरताच मोठे घर आणि त्यापुढे छोटासा बगीचा आहे. बाहेर फोटोग्राफीला परवानगी असल्यामुळे लगेच घराचे फोटो काढले. घरासमोर बगीचा आहे आणि त्यापुढे सेंट.मायकेल अँड ऑल एंजल्स चर्च आहे. घराभोवती आणि चर्चच्या आवारात स्मशानभूमी आहे. १८२० साली आदरणीय. पॅट्रिक ब्राँटे यांना हॅवर्थमध्ये पदाधिकारी म्हणून नेमले होते. ते आपल्या पत्नी आणि सहा मुलांसोबत या पार्सोनेजमध्ये रहायला आले. पॅट्रिक ब्राँटे यांच्या पत्नीचे, मरियाचे निधन झाले. १८२५ मध्ये ब्राँटे भांवंडापैकी दोन बहिणींचे ही आजारपणामुळे निधन झाले. त्याच साली ब्राँटे भांवंडाच्या आईची बहिण आंट ब्रानव्हेल या मुलांचा सांभाळ करायला आल्या. याच पार्सोनेजमध्ये ब्राँटे भांवंडांनी आपले बालपण घालवले, याच वास्तूत त्यांनी असामान्य कांदबऱ्या लिहिल्या जशा जेन आयर, वुथरींग हाईट्स, दी टेनंट ऑफ वाईल्ड्फेल हॉल. त्यांच्या कामाची चिरकाल लोकप्रियता बघता पर्यटक अगदी पूर्वीपासूनचं हॅवर्थ बघायला येत, अगदी शर्लोटच्या काळापासून. शर्लॉट्च्या निधनानंतर हे वाङमयीन पर्यटनाच्या रुपात विकसित झाले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या काही काळ आधी अगदी जगभरतून लोक येत, १८९५ साली ब्राँटे सोसायटीने काही स्मृतीचिन्हे यॉर्कशायर बँकेच्या वरच्या मजल्यावरची खोली भाड्याने घेऊन तिथे लोकांना बघता याव्या म्हणून ठेवल्या. १९२७ मध्ये चर्च ऑफ इंग्लंडने हे पार्सोनेज कापड कारखानदार सर. जेम्स रॉबर्ट्स यांना विकले. त्यांनी ब्राँटे सोसायटीला या पार्सोनेजचे रुपांतर संग्रहालयात करण्यास सांगितले.

.

ब्राँटे पार्सोनेज

.

आम्ही तिकिटं दाखवून घराच्या आत प्रवेश केला. अकरा खोल्यांची वास्तू आहे ही. पहिला आहे एंट्रन्स हॉल म्हणजेच कॉरीडोअर याच्या दोन्ही बाजूला एक-एक खोली आणि समोर वर जाण्यासाठी पायऱ्या. आम्ही आधी पॅट्रिक ब्राँटे यांच्या स्टडी रूममध्ये प्रवेश केला. पॅट्रिक ब्राँटे हे धर्मोपदेशक होते त्यामुळे चर्चसंबधीत बरेच काम ते याच स्टडी मध्ये बसून करत. त्यांनी हॅवर्थच्या लोकांच्या सुस्थितीसाठी संडे स्कूल आणि सफाई व्यवस्थेसाठी मोहिम सुरु केली होती. पॅट्रिक ब्राँटे यांची दृष्टी वयोमानानुसार धुरकट झाली होती आणि वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती. याच दरम्यान त्यांना शर्लॉट एक उत्तम लेखिका असल्याचे समजले. त्याकाळी शर्लॉट ही जेन आयर हे पुस्तक लिहित होती आणि तिने आपल्या वडिलांना आपण पुस्तक लिहित असल्याचे सांगितले. पॅट्रिक ब्राँटे यांनी आधी शर्लॉटला सांगितले की पुस्तक लिहून तू असा अनावश्यक खर्च करत आहेस असे मला वाटते त्यावर ती म्हणाली तुम्ही एकदा माझे लेखन वाचा आणि अभिप्राय कळवा कदाचित यातून मी चांगले पैसे कमवू शकेन अशी मला अशा आहे. त्या दुपारी त्यांनी ब्राँटे भावंडाना सांगितले की शर्लॉट एक उत्तम लेखिका आहे आणि तिचे लिखाण माझ्या अपेक्षेपेक्षा सरस ठरले, मला खूप आवडले. त्यांना नेहमीच आपल्या मुलांच्या कर्तृत्वाचे कौतुक असे.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार -

पुढची खोली होती डायनिंग रूम. या खोलीत शर्लॉट, एमिली आणि अ‍ॅनी जास्तीत जास्त वेळ घालवत असे. या खोलीत असलेल्या डायनिंग टेबलाच्या अवती-भवती फिरून त्या एक-मेकिंना आपले लिखाण वाचून दाखवत. अ‍ॅनी इथे असलेल्या आरामखुर्चीत बसत. इथेच असलेल्या सोफ्यावर एमिलीने १८४८ साली आपले प्राण सोडले. एमिली आणि अ‍ॅनीच्या मृत्युंतर शर्लॉटला या खोलीत वावरणे फार अवघड गेले, एकाकीपणा आला. या खोलीला पार्लर असे ही म्हटले जायचे. जेव्हा शर्लॉटची आर्थिक स्थिती बरी झाली तेव्हा तिने या खोलीचे सुशोभिकरण केले. तो सोफा, ती खुर्ची, ते टेबल बघून आणि तिथला ब्राँटे बहिणींचा वावर हे सगळे माझ्यासाठी अद्भुत होते.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site www.liveinternet.ru-

पुढची खोली स्वयंपाकघर.

हे स्वयंपाकाघर संपूर्ण वास्तूतील उबदार खोली असे. इथेच ब्राँटे भावंडे शेगडीजवळ बसून घरकाम करणाऱ्या टॅबीच्या डार्क टेल्स ऑफ यॉर्कशायर मुर्स गोष्टी ऐकत असत. १८४२ मध्ये आंट ब्रानव्हेलच्या मृत्युनंतर एमिलीने गृहव्यवस्थेची जबाबदारी घेतली. स्वयंपाकघरात असलेल्या फायरप्लेसला रेंज म्हटले जाई. १८६१ मध्ये पॅट्रिक ब्राँटेच्या मृत्युनंतर हे पार्सोनेज पदाधिकारी जॉन वेड यांच्या मालकीचे झाले. त्यांनी या वास्तूत बरेच बदल केले खासकरुन स्वयंपाकघर. आज या स्वयंपाकघरातील वस्तू, भांडी सगळी ब्राँटे परिवाराची आहेत. या खोलीचे मुळ स्वरूप पुनर्निर्माण करण्याचा ब्राँटे सोसायटीने प्रयत्न केला आहे.

.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site hathawaysofhaworth.wordpress.com

तिथून बाहेर पडून आम्ही मिस्टर. निकोल्सच्या स्टडीत शिरलो.

शर्लॉटची मैत्रीण लेखिका एलिझाबेथ गास्केलच्या म्हण्यानुसार ही खोली पूर्वी पेंढा ठेवायला वापरत असे. निकोल्स हे १८४५ साली हॅवर्थ चर्चमध्ये ब्राँटे यांचे पादरी सहायक म्हणून काम करु लागले. १८५४ साली शर्लॉटने ही खोली आपल्या भावी नवऱ्यासाठी म्हणजेच आर्थूर बेल निकोल्ससाठी स्टडी रूम म्हणून सजवली होती. या खोलीत तिने एक फायरप्लेस बसवले होते. शर्लॉटच्या मृत्युनंतर निकोल्स हे त्याच पार्सोनेजमध्ये पॅट्रिक यांची देखभाल करु लागले. १८६१ मध्ये जेव्हा पॅट्रिक ब्राँटे वारले तेव्हा निकोल्स आपल्या देशी म्हणजे आयरलँडला परतले.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site fatalsecret.ucoz.ru

आता बाहेर पडून वर जाण्यासाठी आम्ही कॉरीडोअरमध्ये आलो, समोरचं पायऱ्या होत्या. क्लासिक जॉर्जियन पद्धतीची कमान आणि समोर वालुकाश्माच्या पायऱ्या. पायऱ्या चढून अर्ध्या रस्त्यात एक मोठाले लाकडी घड्याळ आहे. हे घड्याळ बॅराक्लाह ऑफ हॅवर्थ यांनी बनवले असून रोज रात्री पॅट्रिक ब्राँटे याला चावी देत असे. त्याकाळी इथल्या खिडक्यांना कधी पडदे नव्हते कारण पॅट्रिक ब्राँटे ह्यांना भिती वाटत असे की घरात लहान मुले आहेत आणि सर्वत्र प्रकाशासाठी मेणबत्त्यांचा वापर होतो त्यामुळे कधी धक्का लागून पडदे पेटू शकतात. त्यामुळे खिडक्यांना सुरक्षिततेसाठी रात्री झडप लावून बंद केले जाई.

.

.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site www.pinterest.com
*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site picsify.net

पायऱ्या चढून वर आलो की प्रथम लागते ती सर्व्हंट्स रूम. या खोलीत टॅबी राहत असे. टॅबी ही ब्राँटे परिवारासोबत ३० वर्षाहून अधिक काळ होती. इथे असलेले फडताळ त्याकाळी कपाट म्हणून वापरले जायचे. या शिवाय जी खिडकी दिसते तिथली वाट ब्राँटे काळात बंद केली गेली. मार्था ब्राऊन, जी कबर खोदणाऱ्या इसमाची मुलगी होती, ती टॅबीला घरकामात मदत करत असे व तिच्यासोबत या खोलीत राहत असे. या दोघींचे अंत्यसंस्कार पार्सोनेजच्या आवारात असलेल्या कबरस्थानात केले गेले.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site fatalsecret.ucoz.ru

आता आम्ही शिरलो शर्लॉटच्या खोलीत. ही खोली मुख्य झोपेची खोली होती जी अनेक वर्ष या परिवारातील अनेक सदस्यांनी वापरली होती. त्याकाळी या खोलीच्या भिंती नीळसर-हिरवट रंगाच्या होत्या. या खोलीत आता शर्लॉट्च्या स्मरणवस्तू बघावयास मिळतात. या खोलीत आधी पॅट्रिक ब्राँटे व मरिया ब्राँटे राहत असे, मरियाच्या मृत्यूनंतर या खोलीत आंट ब्रानव्हेल रहायला आल्या. १८४२ मध्ये जेव्हा आंट ब्रानव्हेल वारल्या त्यानंतर ह्या खोलीत शर्लॉट आपल्या बहिणी एमिली व अ‍ॅनीसह राहू लागली. शर्लॉटच्या लग्नानंतर ते दोघे उभयंता या खोलीत राहत असत. ३१ मार्च १८५५ साली शर्लॉटने याच खोलीत आपले प्राण सोडले. या खोलीत शर्लॉटने आपल्या हनीमूनला, आयरलँडला परिधान केलेला गाऊन, बुटांचा जोड, वेडिंग बॉनेट एका काचेच्या कपाटात पर्यटकांना बघण्यासाठी ठेवला आहे तसेच तिच्या अनेक वस्तू, छायाचित्र, पत्रे ठेवलेली आहेत, तिच्या केसांची बट एका लॉकेटात जतन करुन ठेवलेली बघावयास मिळते. शर्लॉटला आधी एक व्यंगचित्रकार व्हायचे होते, तिने अनेक व्यंगचित्रे पत्रात, कागदावर रेखाटली होती.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site www.zimbio.com

पुढची खोली होती चिल्ड्र्न्स स्टडी. या खोलीत ब्राँटे भांवंडे बालपणी गोष्टी ऐकत, बालनाट्य बसवत व त्यांनी बनवलेल्या पुस्तकात ते नाटक लिहून ठेवत. ही खोली ब्राँटे बहिणींचा एकमेव भाऊ ब्रानव्हेल काही काळ वापरत असे मग पुढे ही खोली एमिलीची बेडरूम म्हणून वापरली जाई. या खोलीत असलेले पोर्टेबल लिहिण्याचे टेबल हे एमिलीचे आहे ज्यात अनेक वस्तू जतन करुन ठेवल्या आहेत जसे, पेनची नीब, काही लिफाफे, नाणी, वुथरींग हाईट्सच्या परिक्षणाचे कागद, लेबल्स इत्यादी.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार

तिथून आम्ही गेलो मिस्टर. ब्राँटे यांची बेडरूम बघायला. या खोलीत पॅट्रिक ब्राँटे आपल्या पत्नीच्या मृत्यपश्चात पुढिल चाळीस एक वर्ष राहिले. या खोलीतले काही सामान ब्राँटे परिवाराचे आहे तर काही ब्रानव्हेलच्या चित्रात बघून बनवून घेतेलेले आहे. या खोलीचे विश्लेषण करता असे समजले की पूर्वी या खोलीत फिकट हिरव्या रंगाचे वॉलपेपर लावले होते त्याप्रमाणे या खोलीचा लुक री-क्रीयेट करण्यात आलेला आहे. खोलीत एक वॉश-स्टँड आहे, पूर्वी बाहेर स्वच्छतागृह असे आणि खोलीत बाथरूम नसे त्यामुळे थंडीच्या दिवसात बाहेर जाणे होत नसे म्हणून असे खोलीत एक वॉश-स्टँड बसवलेला असे.

या खोलीत काही काळाने ब्रानव्हेल आपल्या वडिलांसोबत राहू लागला होता, दारु आणि नशेच्या व्यसनामुळे त्याची प्रकृती खालावली होती व त्याला अधून-मधून भ्रम होत असे की दुसऱ्या दिवशी तो किंवा त्याचे पिता सकळी मृत्युमुखी पडले असतील. एकदा दारूच्या नशेत त्याने त्याचा पलंगाला आग देखील लावली होती व त्या प्रसंगातून एमिलीने त्याला वाचवले होते. २४ सप्टेंबर १८४८ ला ब्रानव्हेलची प्राणज्योत अवघ्या एकतीसाव्या वर्षी याच खोलीत मालवली. खरंतर त्याला फार मोठे व्ह्यायचे होते पण तो तितका यश मिळवू शकला नाही.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site www.pinterest.com

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site en.wikipedia.org

पुढे आहे ब्रानव्हेल स्टुडिओ. ब्रानव्हेल याने लीड्सचा मोठा कलाकार, व्हिलियम रॉबिनसन यांच्याकडून पोट्रेट पेंटिंगचे प्रशिक्षण घेतले होते. त्याचे मोठा कलाकार व्हायचे स्वप्न होते पण दुर्दैवाने त्याच्या या स्टुडिओत फार कमी लोकं येत आपले पोर्ट्रेट काढून घ्यायला. दारुच्या व्यसनापायी त्याची प्रकृती खालावली व पुढे टीबीच्या रोगाने तो ग्रस्त झाला.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site fatalsecret.ucoz.ru

एंट्रंस स्टेयरकेसपाशी त्याने ब्राँटे भांवडाचे मोठे पोर्ट्रेट काढले होते, ते पूर्ण झाल्यावर त्याने स्वतःची प्रतिमा त्या चित्रातून खोडून काढली होती.

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site en.wikipedia.org

या खोलीतून बाहरे एक एक्स्टेंशन केले आहे जो मुख्य पार्सोनेजचा भाग आधी नव्हता. ते एक्स्टेंशन म्हणजे एक्झिबिशन रूम ज्यात ब्राँटे परिवाराबद्दल बरीच माहिती मिळते, काही जुन्या वस्तू, पत्रे, अ‍ॅनीचा रक्ताळलेला रुमाल्,ब्रानव्हेलची तो ट्युटर असतानाची गोष्ट ऑडिओ स्वरुपात पर्यटकांना बघण्यासाठी / ऐकण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तिथून खाली उतरल्यावर स्मरणवस्तू घेण्यासाठी छोटेसे दुकान आहे व पार्सोनेजच्या बाहेर यायला एक्झिट आहे. ब्राँटे पार्सोनेजबद्दल बरीच माहिती मिळाली होती, त्या वास्तूत वावरताना विलक्षण आनंद झाला होता, एक स्वप्न पूर्ण झाले होते, ब्राँटे बहिणींची पुस्तके आजही जगात पुस्तकवेडी लोकं आवर्जून, मनापासून वाचतात. त्यांची तिथली आठवण म्हणून मी एक ब्राँटे सिस्टर्स नावाचे पुस्तक व पुस्तकखूण विकत घेतले व पार्सोनेजच्या बाहेर पडलो.

.

.

मुळ पार्सोनेजचा फोटो

.

*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site www.mick-armitage.staff.shef.ac.uk

आता पार्सोनेजबाहेर होते सेंट.मायकेल अँड ऑल एंजल्स चर्च व कबरस्थान.

सेंट.मायकेल चर्च हे हॅवर्थमधले मध्ययुगीन पारिश चर्च आहे. सध्याच्या चर्चचे बांधकाम १८७९ ते १८८१ दरम्यान करण्यात आले. याच चर्चमध्ये पॅट्रिक ब्राँटे पदाधिकारी होते. चर्चच्या आवारात एक कबरस्थान आहे व शाळेची इमारत म्हणजेच संडे स्कूल आहे जिथे शर्लॉट काही वर्ष शिक्षिका म्हणून काम करत होती.

.

संडे स्कूल

.

संडे स्कूल

.

.

ब्राँटे परिवाराच्या कबरी या चर्चच्या आवारात नसून चर्चच्याच तळघरात आहेत. फक्त अ‍ॅनीची कबर ही स्कारबराहच्या सेंट.मेरी चर्चयार्डात आहे. घराच्या बाहेर असलेल्या बागेतल्या फाटकामधून ब्राँटे परिवाराच्या सदस्यांना त्यांच्या अंतिमयात्रेसाठी चर्चमध्ये नेण्यात आले त्या जागेचा फोटो देतेय.

.

याच कबरस्थानात ब्राऊन परिवार व टॅबीची कबरदेखील आहे. पार्सोनेजच्या बाहेर येताच शांत, शीतल, हिरवळीने वेढलेले, धीर-गंभीर कबरस्थान आपल्याला दिसतं. तिथले काही फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

.

.

चर्चच्या आत ब्राँटे मेमोरीयल चॅपल आहे.

.

स्टेन्ड ग्लासच्या खिडक्या

.

एमिली आणि शर्लॉट यांचे लाकडी पेन्स.
.

या चर्चमध्ये शर्लॉटच्या लग्नाचे प्रमाणपत्र, काही पत्रे तसे त्याकाळी वापरात असलेले फर्नीचरही बघावयास मिळतात.

चर्च मधुन् बाहेर पडलो ते थेट हॅवर्थच्या कॉबल्ड स्ट्रीट्स बघयाला. अगदी चढ-उतारीचा रस्ता, रस्त्याच्या कडेला छोटी-छोटी दुकाने, कॅफे, बुक शॉप्स, विंटेज कलेक्शन अशी दुकाने आहेत. नवऱ्याने माझे पुस्तकवेड बघून मला अजिबात पुस्तकाच्या दुकानात जाऊ दिले नाही ;( लालूच म्हणून तिथल्या प्रसिद्ध हँड-मेड चॉकलेट्सचे दुकान अँड चॉकलेट्स मध्य घेऊन गेला. तिथली व्हरायटी बघून काय घेऊ आणि काय नको असे झाले होते, तिथून स्ट्रॉबेरी - ब्लॅक पेपर, लेमन कर्ड, ऑरेंज अँड चॉकलेट, लाटे अँड मोका, सॉलटेड कॅरेमल अशी चॉकलेट्स घेऊन आम्ही निघालो.

.

.

.

वाटेत आम्हाला सुप्रसिद्ध, ३०० वर्ष जुना दी ब्लॅक बुल पब दिसला. याच पबमध्ये ब्रानव्हेल ब्राँटे नेहमी येत आणि मद्यपान करत असे. याच पबच्या मागच्या बाजूस कबरस्थान आहे आणि असे म्हटले जाते की मूरलँडची जमीन खचल्यामुळे अनेक पुरलेले शव या पबच्या खाली सरकले गेले आहेत.

.

तसेच अठराव्या शतकातील प्रसिद्ध दी व्हाईट लायन पब ही तिथेच कोपर्‍यावर आहे.

.

तिथून आम्ही मूरलँड बघायला गेलो, जिथे एमिली सगळीकडे बागडत असे, शर्लॉट व तिच्या बहिणी नेहमी मूरलँड्मध्ये फिरायला जात. छान हिरवळीची पायवाट होती, दगडी फाटकातून बाहेर पडताच दिसते सर्वत्र हिरवळ आणि टेकडी. कुठे घोडे गवत चरत आहेत तर कुठे वाऱ्याची मंद झुळक त्या काळाच्या गुजगोष्टी करत आहे . १८५० साली शर्लॉटने एमिलीच्या मृत्यु नंतर लिहिले होते की तिला मूरमध्ये फेरफटका मारावयास आता उदास वाटते. तिथे तिला बहिणींची आठवण येत असे आणि मग मूर अजूनच भकास, रानटी, एकाकी वाटत असे.

.

.

.

आम्ही फार वेळ मूरमध्ये फिरलो नाही करण परत निघायचे होते पण तिथे जवळचं ब्राँटे वॉटरफॉल्स, टॉप विथेन्स, पाँडन कर्क, कोवान ब्रीज आहे. ते पुढच्या वेळेस बघुया असे ठरवून आम्ही निघालो. ब्राँटे काळाबद्दल बऱ्याच लहान-सहान गोष्टी जाणता आल्या, पार्सोनेज, चर्चमध्ये फिरताना तो काळ कसा असू शकेल हे नजरेसमोर येऊन गेले. खरंतर पार्सोनेजमध्ये ब्राँटेंबद्दल अधिक जाणून मी भारावून गेले होते पण तसेच कुठेतरी उदास भावना मनात उमटली. अवघ्या ३०-३५ व्या वर्षी मृत्यू येणे आणि ते ही एकामागून एक एक जाणे हे सगळे जाणून वाईट वाटले. ब्राँटे बहिणींनी अल्प काळात अजरामर साहित्य लिहून त्यांच्या वाचकांना अमुल्य भेट दिली आहे, माझ्यासारख्याच अनेक ब्राँटे पुस्तकवेड्यांना हॅवर्थमध्ये एक आनंददायी दिवस घालवणे म्हणजे सुखद, अविस्मरणीय अनुभव नक्कीच मिळु शकेल.

Footer

प्रतिक्रिया

किती सुखद सुंदर अनुभव आहे हा.एकतर सुरेख प्रेक्षणीय स्थळ त्यात लेखिकेचं घर.अगदी जमलाय लेख.फोटो अप्रतिम नेहमीप्रमाणेच!

कविता१९७८'s picture

28 Apr 2016 - 7:41 am | कविता१९७८

वाह , खुप मस्त लेख, फोटोही छानच

पण Wuthering Heights वाचलंय. अप्रतिम आहे. ब्राँटे भगिनी अल्पायुषी ठरल्या पण त्यातही अभिजात निर्मिती करुन गेल्या. Wuthering Heights ही मला वाटतं anti- hero असलेली पहिली कादंबरी.
लेखातले फोटो भारी. ब्रिटिशांच्या साहित्य, इतिहास आणि जुना वारसा जतन करुन ठेवण्याच्या वृत्तीला सलाम!

अहा ! काय सुंदर लिहिलं आहेस !

मधुरा देशपांडे's picture

28 Apr 2016 - 1:47 pm | मधुरा देशपांडे

लेखातून तुझं वाचनप्रेम, आवडत्या लेखिकेबद्दलचं प्रेम पुरेपुर उतरलंय. फोटो, माहिती सर्वच छान. आणि अशा वास्तू जतन करून ठेवणार्‍यांबद्दल नेहमीच कौतुक वाटतं, ते इथे पुन्हा जाणवलं.

पद्मावति's picture

28 Apr 2016 - 1:51 pm | पद्मावति

लेख खूप आवडला.

इशा१२३'s picture

28 Apr 2016 - 2:41 pm | इशा१२३

अप्रतिम फोटो आणि लेख!!

इशा१२३'s picture

28 Apr 2016 - 2:41 pm | इशा१२३

अप्रतिम फोटो आणि लेख!!

सस्नेह's picture

28 Apr 2016 - 2:53 pm | सस्नेह

फोटोतील घर दीडशेपेक्षा जास्त वर्षे जुने आहे हे सांगून पटत नाही !

पूर्वाविवेक's picture

28 Apr 2016 - 3:11 pm | पूर्वाविवेक

लेख व फोटो अप्रतिम नेहमीप्रमाणेच!
'ब्राँटे सिस्टर्स' पुस्तकाकडे बघताना लिटल वुइमेन अर्थात चौघीजणी ची आठवण झाली.
याचा मराठीत अनुवाद उपलब्ध आहे का?

स्रुजा's picture

28 Apr 2016 - 4:42 pm | स्रुजा

अगदी ! चौघीजणी च आठवत होतं.

सानि का, फोटो लेख दोन्ही सुरेख. तिचं घर बघाय ला जायची तळमळ विशेष भावली.

उल्का's picture

28 Apr 2016 - 3:31 pm | उल्का

खूपच छान लिहिलं आहे. लाकडी पेन्स कित्ती सुन्दर आहेत!

चिंतामणी's picture

28 Apr 2016 - 4:46 pm | चिंतामणी

सुरेख लिखाण आणि सुंदर मांडणी.

खुप सुंदर लिहले आहेस सानि. ह्या लेखिकेचे साहित्य कधी वाचले नाही. शोधुन नक्की वाचते आता.

म्हणजे नक्की कोणाचे?

पैसा's picture

30 Apr 2016 - 5:42 pm | पैसा

सुरेख लिहिलंय

जुइ's picture

8 May 2016 - 3:43 am | जुइ

खूपच सुंदर आणि प्रशस्त घर आहे आवडले.संग्रालय अतिशय छान आहे पहायला.

पिशी अबोली's picture

8 May 2016 - 9:39 pm | पिशी अबोली

सुन्दर लिहिलंय..वुदरिंग हाइट्स वाचलं तेव्हा पचलं नव्हतं..आता हा लेख वाचल्यामुळे परत कधीतरी यांचं लेखन वाचायचा प्रयत्न करेन..

वीणा३'s picture

9 May 2016 - 4:21 am | वीणा३

सुंदर लेख आणि छान फोटो (अवांतर : तुम्ही फोटोग्राफी चा कोर्स केलाय का हो?, पाककृती चे फोटो पण असेच भन्नाट असतात )

किलमाऊस्की's picture

9 May 2016 - 6:39 am | किलमाऊस्की

या ताई हरहुन्नरी आहेत. फोटोच काय अजून बर्‍याच कला त्यांच्यात दडलेल्या आहेत.

बाकी लेख आवडला हे सांगायचं राहिलेलं!