आसावरीची पर्यटन भरारी

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in विशेष
19 Feb 2016 - 6:14 pm

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अनेकांना कामानिमित्त, आवड म्हणून जगभरात फिरण्याची संधी मिळते. पण तरीही खरे भटके हे यापेक्षाही वेगळं असं काहीतरी करतात आणि त्यांचे अनुभव इतरांनाही प्रेरणा देतात. त्यात जर ७ ही खंडं पर्यटनाची आवड म्हणून स्वबळावर, एकटीने आणि तिशीच्या आत फिरणारी एक मुलगी असेल तर? आसावरी ही यातलीच एक. कुणालाही कौतुक वाटेल अशी ही तिची जगभ्रमंतीची कहाणी -

तुझ्याबद्दल थोडक्यात सांग.
मी मूळ पुण्याची. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आले आणि आता इथेच नोकरी करते.

काय निमित्ताने सगळीकडे फिरणं झालं? कामानिमित्त की केवळ भटकंतीच्या हेतूने? आणि हे एकटीने सगळं पर्यटन करण्यापूर्वी कुठे फिरली होतीस, तेव्हापासून असे कही वाटत होते का?
लहानपणापासूनच बऱ्याच गोष्टींमुळे अशा भ्रमंतीची प्रेरणा मिळाली. आमचे शेजारी फ्रेंच मित्रमंडळासोबत आणि अजून काही आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करायाचे. त्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या देशातले लोक येऊन राहत असत. तेव्हापासून या विविध देशांशी, तेथील लोकांशी जवळून संपर्क यायचा. तेव्हा कुतूहल होतं खूप. मी नुकतीच शाळेत इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती आणि मी लहान असल्यामुळे माझ्याशी बोलायला त्या परदेशी नागरिकांना मजा येत असे. आई बाबाही मला नाकाशावर त्यांचे देश दाखवत. हळूहळू वेगवेगळ्या देशांची नाणी जमवणे, पोस्टाची तिकिटे जमवणे याचा छंद जडला. तेव्हा कोणी ओळखीचे किंवा नात्यातले परदेशी गेले तर आवर्जून माझ्यासाठी तिथली नाणी आणत. मग त्यांच्याशी त्या देशाबद्दल गप्पा होत असत आणि फ़ोटो पाहिले जात. पुढे शाळेत भुगोल शिकताना ह्या सगळ्या देशांची वैशिष्ट्ये, भाषा, झेंडे, राजधान्या, जागतिक आश्चर्ये या गोष्टी आपोआपच माहिती करून लक्षात ठेवू लागले. त्यावर असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेऊ लागले. लायब्ररी मध्ये अ‍ॅटलास आणि विश्वकोश यामध्ये जग तसेच जागतिक प्रवास याबद्दल वाचत राहिले. डीडी वरची 'सुरभि' मालिका बघताना नेहमी वाटायचं की आपण पण सिद्धार्थ आणि रेणुकासारखे फिरुयात. भारतात महाराष्ट्र आणि इतर आसपासच्या राज्यांमध्ये सुट्टीत फ़िरणं झालं, पण परदेशात जाणे हे फार खर्चिक असल्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी प्रत्यक्षात लवकर असे प्रवास करू शकेन. पण नव्वदच्या दशकात इंटरनेट उपलब्ध झाले. त्यावेळी मी पत्र मैत्रीच्या एका संस्थळावर सदस्य झाले. माझ्या वयाच्याच परदेशातल्या मुला-मुलींबरोबर इमेल्स मधून शिक्षण पद्धती, संस्कृती, सणवार, एकंदरीत रहाणीमान, आवडी निवडी, महात्वाकांक्षा या आणि अशा इतर विषयांवर गप्पा मारू लागले. या संभाषणांमधून मला बऱ्याच संस्कृतींची कल्पना येऊ लागली या सगळ्यातून जगाचं एक चित्र मनात निर्माण होतं गेलं.

पुढे आई बाबांना कामासाठी अमेरीकेला जाण्याची संधी मिळाली त्यावेळी त्यांनी तिथल्या युनिव्हर्सिटीना भेट दिली आणि तिथल्या उच्चशिक्षणाच्या संधीबद्दल चौकशी केली. ईंजिनिअरींग नंतर अमेरीकेत उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली आणि अमेरिकेत आले. त्याआधी एकदा एका प्रवासी कंपनीतर्फे घराचे सगळे थायलंड आणि सिंगापुर बघायला गेलो होतो गाईडेड टूर असल्यामुळे तो पहिला परदेशात फिरण्याच्या अनुभव मस्त एंजोय केला. पुढे अमेरिकेत युनिव्हर्सिटीमध्ये असताना २ वर्षात जवळ जवळ ४० -५० देशातल्या विद्यार्थ्यांशी बोलणं झालं. तेव्हा त्यांच्यासोबत आपापल्या देशांबद्दल तुलनात्मक चर्चा व्हायच्या. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. एका कार्यक्रमात भारताबद्दल माहिती सादर केली आणि त्यावर लोकांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. अनेक आंतरराष्ट्रीय तसेच भारतातल्याही वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांबरोबर काम केले. सगळे जग एका छताखाली एकवटले असल्याचा अनुभव आला.

पुढे नोकरी लागल्यावर नवीन वर्षाच्या मुहुर्तावर युरोपला जायचं ठरवलं. नुकतीच भारतात जाउन आल्यामुळे घरातूनही इतर देश फिरण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. एकटीने पहिलाच प्रवास असल्यामुळे खूप उत्सुकता होती. व्हिसा, चलन, भाषा याबद्दल भरपूर माहिती गोळा केली. फ्रान्स मध्ये एका पत्र मैत्रिणीकडे राहिले. पॅरीसमध्ये दहा दिवस राहून तिथल्या रोजच्या आयुष्याचा थोडाफार अनुभव घेतला. त्याच वेळी पुढे जर्मनीत अजून एका पेन फ्रेंडकडे नाताळ साजरा केला. ह्या अनुभवानंतर परदेशात फिरण्यासाठी नक्की काय काय लागते याची कल्पना आली आणि एकटी फिरू शकते हा आत्मविश्वासही आला. त्यानंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टुरिजमचे स्वरूप कळू लागले. सुरूवातीला आशिया, अमेरिका आणि युरोप हे खंड केले, ते बरंच सहज झालं. मग अजून अंदाज आला की कशा पद्धतीचा प्रवास मला आवडतो, त्याचा पॅटर्न कसा असावा इत्यादी. मग ३० व्या वर्षाच्या आत ७ ही खंड फिरुयात हे ठरवले आणि त्याच ध्यासाने बाकीच्या खंडातील भटकंतीचे बेत केले.

७ खंडांत फिरण्याची सुरूवात कशी झाली? जेव्हा ६ खंड झाले आणि ७ व्या खंडाची सहल ठरली तेव्हा कसं वाटत होतं? आत्तापर्यंत कोणत्या देशात फिरलीस?
पहिलाच युरोपात फिरण्याचा अनुभव फार छान होता. फ्रान्स आणि जर्मनी मध्ये भाषा येत नसली तरी नकाशे, सार्वजनिक वाहतुक आणि इतर उपलब्ध साधन सामग्रीचा कसा वापर कारायचा याची साधारण कल्पना आली. मग पुढची दोन वर्ष हिवाळ्यात पेन फ्रेंड्सकडे आणि होस्टेल्स मध्ये राहून स्पेन, पोर्तुगाल आणि बेल्जिअम, नेदरलँडस, लक्सेमबर्ग, डेन्मार्क फिरले. जरी प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी असली तरी युरोप ट्रीप एकसारखी वाटु लागली. जुन्या इमारती, ऐतिहासिक जागा, संग्रहालये, खाण्याचे पदार्थ, थंड हावामान ह्यापेक्षा आता काहीतरी वेगळे पाहिजे असे वाटू लागले. चौथ्यावर्षी हिवाळयात भारतात गेले असताना तिथूनच पुढे ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडला गेले. परतताना ऑस्ट्रेलियाहून पॅसिफिक महासागरावरून अमेरिकेत परतल्यामुळे त्यानिमित्ताने पृथ्वीप्रदक्षिणा झाली.

फेसबुकवर माझे हे फिरतीचे फोटोज बघून बऱ्याच मित्र मैत्रिणींनी सांगुन ठेवलं होतं की पुढच्यावेळी कुठे जाणार असशील तर आम्हाला कळव. पुढची ट्रीप पेरूची ठरली आणि त्यावेळी अजून एक दोन जणांच वेळापत्रकही जुळून आलं. ही पेरू ट्रीप पार पडली तेव्हा सहज कोणाशी तरी बोलताना लक्षात आलं की आपले पाच खंड तर सहज बघून झाले. मग त्यावेळच्या हिवाळ्यात भारतात जाणे होणार नव्हते त्यामुळे हिवाळ्यात आफ्रिका खंडात थोड्या उबदार ठिकाणी जाऊ असे ठरवले. त्यानिमित्ताने अजून एका खंडाची सफरही होईल हाही एक हेतू होताच. एका आठवड्याच्या सुट्टीत जाण्याच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिका, केनिया हे देश फार मोठे आहेत आणि शिवाय तिथला खर्चही जास्त वाटला. मोरोक्को बद्दल लहान आणि त्यामानाने स्वस्त देश, शिवाय पर्यटनाच्या दृष्टीनेही सध्या विशेष नाव असलेला म्हणून खूप ऐकलं होतं. शिवाय हिवाळ्यात तिथे हवामानही फार थंड नसते. त्यामुळे तिथे जायचे ठरवले आणि जाऊन आले देखील. अशा प्रकारे आफ्रिका खंडाची सहल झाली.

शेवटी फक्त अंटार्क्टिका हा एकाच खंड राहिला होता. कुतूहल म्हणून थोडी माहिती मिळवली तेव्हा असं लक्षात आलं की त्यातल्यात्यात परवडणारी अशी एक टुर उपलब्ध आहे आणि उन्हाळा हा तिथे जाण्याचा उत्तम ऋतू आहे. एकोणतिसाव्या वाढदिवसाचे निमित्त साधून ही सहल बुक केली आणि तिशी गाठण्यापुर्वी सगळ्या खंडांमधे फिरून झाले. मग तिसावा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी अलास्काला जाऊन आर्क्टिक सर्कलला ऑरोरा बोरॉयलिस (Aurora Borealis) बघितल्या. माझा अजूनही विश्वास बसत नाही की खरोखरच माझे जगभर फिरण्याचे स्वप्न साकार होत आहे.

आतापर्यंत पाहिलेले देश -
* उत्तर अमेरिका - युनायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका
* दक्षिण अमेरिका - पेरु, चिली
* आशिया - थायलंड, सिंगापुर, दक्षिण कोरिया, जपान, भारत आणि युनायडेड अरब एमिरेट्स
* ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड
* अंटार्क्टिका - अंटार्क्टिका
* आफ्रिका - मोरोक्को
* युरोप - फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, नेदरलँड्स, लक्सेम्बर्ग, इटली, व्हॅटिकन सिटी, डेन्मार्क, स्वित्झर्लंड

हे ७ ही खंड फिरताना यापैकी प्रत्येक खंडाबद्दल काय वैशिष्ट्य जाणवले?
सगळ्या खंडांमधील फिरतीबाबत बोलायचं झालं तर अनेक फरक आहेत, असणारच. पण मला प्रत्येक ठिकाणी समान सूत्रही तेवढीच आढ्ळली. म्हणजे जे फरक आहेत ते बघता असं जाणवलं की भौगोलिक स्थान आणि हवामान याप्रमाणे प्रत्येक देश, खंड यातले जीवनमान वेगळे आहे. तेही प्रत्येकाने त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला जे काही सर्वोत्तम असेल, तसे ते रुळत गेले आहे. शिवाय प्रत्येक खंडात जसे देशाप्रमाणे बदल होतात, तसेच प्रत्येक शहरातही होतात. उदा. दक्षिण कोरियाची राजधानी सेउल, तिथे खूप टेकड्या आहेत. त्यामुळे लोक नेहमी हायकिंग करतात किंवा पूर्वी करायचे. तो त्यांचा पारंपारिक व्यायाम प्रकार होता. पण आता नवीन पिढ्या यासोबतच जिमला सुद्धा जाताना दिसतात, कारण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ते जास्त सोयीचं आहे. म्हणजेच प्रत्येक देशात, शहरात, तिथल्या लोकांचं जीवनमान हे त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जसं असेल तसं घडत गेलं आहे आणि काळानुरूप त्यात बदल झालेले आहेत. असे बदल आपल्याला भारत, चिली, स्वित्झर्लंड, म्हणजेच थोडक्यात सगळीकडे दिसतील. आधुनिक जीवनमानाशी जुळवून घेताना हे बदल होणं हा हे अपरिहार्य आहे. आज तंत्रज्ञानाने इतकी भरारी मारली आहे. इंटरनेट, स्मार्टफोन्स च्या वापरामुळे जगभरातल्या बातम्या, तिथल्या भाषा, संस्कृती हे सगळं एका क्लिकवर उपलब्ध आहे आणि त्यामुळे पर्यटन सोपं झालं आहे. जगभरातील नवीन पिढी जागतिकीकरणाच्या बाबतीत अधिक जागरूक दिसते आहे. आपल्या पिढीला सहजपणे दुसर्‍या देशात जाणे, तिथे राहणे याची उत्तम संधी मिळाली आहे. एकाच ठिकाणी राहतानासुद्धा निरनिराळ्या संस्कृतीतील लोकांशी आपला संपर्क येतो. त्यामुळे असं वाटतं की पूर्वी विविध संस्कृती स्वतंत्रपणे विकसित झाल्या आणि आता सगळं जग एकत्र येतंय आणि त्यातून नवीन संस्कृती उदयास येते आहे. पण या सगळ्यात समान काय आहे तर मानवी स्वभाव. मला सगळीकडे सतत असं वाटलं की माणसं सगळीकडे सारखीच असतात. इतकं फिरताना कधीही मी कुठेतरी परग्रहावर आहे असं वाटलं नाही. भारत किंवा दक्षिण अमेरिका, यात शिक्षणाचे महत्व, यशापयशाच्या व्याख्या आणि आर्थिक किंवा इतर अडचणी या सारख्याच आहेत. आर्थिक विषमता, मध्यमवर्गीयांच्या अडचणी, त्यांच्या आशा आकांक्षा हे सगळीकडे समानच आहे. हे सगळं बघून अशी आशा करू शकतो की जगभरातले लोक एकमेकांच्या या वेगळेपणाला समजून घेऊन एकत्र येऊन मानवतेच्या विकासासाठी प्रयत्न करतील. आणि त्याच्व एळी आपापला सांस्कृतिक ठेवाही जतन करतील, कारण ती प्रत्येकाची ओळख आहे आणि ती जपायलाच हवी.

हे सगळं पर्यटन करताना घर, नोकरी आणि आर्थिक बाबी हे कसं मॅनेज केलंस?
नोकरीत वर्षभरात एकून १०-१५ दिवस सुट्टी मिळू शकते. त्याशिवाय कंपनीचे शटडाऊन, लाँग विकेंड्स, वर्क फ्रॉम होम असे काही करून अजून सुट्टी मिळवता येते किंवा तशी जोडून प्लॅन करता येते. साधारणपणे १५ ते २० दिवस एक संपूर्ण सहल अशा पद्धतीने मी आजवर फिरले. यात काही वेळा अमेरिकेतून भारतात जाताना किंवा येताना एखादी सहल, नाहीतर मग पुर्ण वेळ फक्त भटकंती असे पर्याय निवडले. माझे कुटुंब भारतात आहे, त्यामुळे २ वर्षातून एकदा तरी मी तिथे जातेच. वर्षात एकदा मोठी आणि एक लहान ट्रिप असे ठरवले. वर्षाच्या सुरूवातीलाच मी माझ्या संबंधित मॅनेजरशी बोलून अंदाज घेते की कसा प्लॅन आहे. आणि त्याप्रमाणे माझ्या वैयक्तीक बाबी बघून सहल ठरवायचे. जेवढी लवकर सुट्टी मंजूर होईल, तेवढं पुढचे सगळे ठरवायला मदत होते. मग यात आधी बुकिंग केल्यामुळे वाचणारा खर्च असेल, व्हिसा आणि माहिती मिळवायला जो काही वेळ लागत असेल, या सगळ्यासाठी हातात वेळ राहतो. ऐन वेळेवर घाई होत नाही. पूर्वनियोजन हवंच हे या सगळ्यातून लक्षात येतं.

आर्थिक बाजू -
सहलीतला सगळ्यात खर्चिक भाग म्हणजे विमानाची तिकिटं आणि हॉटेल्स बुकिंग. अमेरिकेत राहात असल्याने साधारण ४ महिने आधी विमानाची तिकिटं काढली तर बराच फायदा होतो हे लक्षात घेऊन ते मॅनेज करते. राहण्याची व्यवस्था जिथे मित्र मैत्रिणी किंवा ओळखीचे यांच्याकडे होत असेल तर उत्तम, नाहीतर मी लक्झरी हॉटेल्स हवेत अशा प्रकारातली नाही. hostels.com, bookings.com, hostelworld.com, hotels.com इथे बरेचसे स्वस्तातले पर्याय मिळतात. मी अशी हॉटेल्स बुक करते जिथून जवळच रेल्वे स्थानक किंवा इतर सार्वजनिक वाहतूकीच्या जागा जवळ असतील. पण स्वस्त जागा म्हणून अस्वच्छ किंवा आवश्यक त्या सोयी नसलेल्या जागा, केवळ जाहीरातीसाठी स्वस्त आणि मग मागाहून येणारे एक्स्ट्रा चार्जेस असं काही होऊ नये यासाठी अशा जागांबद्दल जे आंतरजालावर रिव्ह्युज असतात ते काळजीपूर्वक बघणे आवश्यक आहे.

खाण्याच्या बाबतीत सुद्धा पैसे वाचवता येऊ शकतात. तिथले स्थानिक अन्नपदार्थ खाणे हा जरी एक अनुभव असला तरीही प्रत्येक वेळी ते शक्य होइलच नाही. दिवसभर फिरत असताना खायला सोबत नेता येतील असे पदार्थ बरे पडतात. अशा वेळी जवळच्या सुपरमार्केट्स मध्ये जाऊन स्वस्तात खाद्यपदार्थ मिळू शकतात.

याशिवाय आधी माहिती काढून ठेवली तर प्रत्येक देशातले स्वस्तातले सिम कार्ड्स मिळवता येतात आणि पैसे वाचवता येतात. कधीकधी थोड्या वेळासाठी सोबतच्या लोकांचे वायफाय शेअर करता येते. बजेट ट्रॅव्हलचे बरेच पर्याय असतात, फक्त त्यासाठी योग्य माहिती काढायला हवी.

या विविध देशात फिरताना व्हिसा, त्याची माहिती मिळवणे हे कसं जमवलंस?
कुठल्याही देशाला पर्यटक हवेच असतात. त्यामुळे पर्यटक म्हणून जेव्हा आपण कुठल्याही देशात जातो, तिथे फिरून तिथे पैसे खर्च करणार असतो, त्यामुळे ते स्वागतच करतात. इतर व्हिसा पेक्षा तुलनेने पर्यटन व्हिसा सोपा असतो. कारण फिरुन झाले की लोक परत जाणार याची खात्री असते आणि सहसा व्हिसा देताना पण त्या प्रमाणेच दिला जातो. कुठल्याही देशात जाताना त्यांच्या दूतावासाच्या (Embassy) संस्थळावरून माहिती काढणे हे पहिले काम. तिथे पर्यटन व्हिसा बद्दल सगळी माहिती दिलेली असते. यात कुठले कागदपत्र लागतील, किती पैसे भरायचे, मुलाखत आहे की नाही, किती वेळाचा व्हिसा मिळू शकतो ही सगळी माहिती दिलेली असते. त्याप्रमाणे पासपोर्ट (६ महिन्यांपेक्षा अधिक मुदत असलेला), जाण्यायेण्याची विमानाची तिकिटं (व्हिसासाठी कन्फर्म बुकिंगच लागतं असं काही नाही, फक्त एक प्लॅन तयार असायला हवा आणि त्याप्रमाणे तात्पुरती तिकिटं हवीत) ज्यामुळे तुम्ही परत जाल याची खात्री पटते, हॉटेल बुकिंग (जे तुम्ही नंतर रद्द करू शकता), तुम्ही आत्ता राहात असलेल्या देशातील कायदेशीर कागदपत्र (उदा. रेसिडेन्स परमिट, नोकरीची कागदपत्र), हा सगळा प्रवासाचा खर्च कसा करणार यासाठी बँक स्टेटमेंट्स किंवा तत्सम कागदपत्र, इन्शुरन्स, फोटो, अप्लिकेशन फॉर्म, या काही नेहमी लागणार्‍या गोष्टी हे आजवरच्या अनेक व्हिसा प्रोसेस मधून लक्षात आलंय. मग काही वेळा देशाप्रमाणे नियम बदलू शकतात. प्रत्येक देशाच्या व्हिसासाठी लागणारा वेळ वेगळा असतो, कधी ३ वर्किंग डे तर कधी २१ वर्किंग डे, त्यात मध्ये कुठल्या सुट्ट्या असतील तर तेही बदलू शकतं. काही वेळा पासपोर्ट पोस्टाने पाठवला तर चालतो, काही वेळा प्रत्यक्ष मुलाखतीसाठी किंवा निदान व्हिसा स्टॅम्पिंगला जावंच लागतं. मग त्यांचे ऑफिस कुठे आहे त्याप्रमाणे तेही ठरवून, आवश्यक असेल तर रजा घेऊन जावं लागतं. या सगळ्यासाठी नियोजन नीट हवं. वेळेवर करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे किमान १ महिना आधी ही प्रोसेस चालू करावी लागते. म्हणजे हाताशी पुरेसा वेळ असतो. त्यात जर एकाच वेळी २ किंवा अधिक देश असतील, तर प्रत्येक देशाच्या व्हिसासाठीचा वेळ गृहित धरून बरंच आधी सुरूवात करावी लागते. चुकून कधी एखाद्या डॉक्युमेंट मुळे व्हिसा लांबला तरी हाताशी वेळ राहतो.

याशिवाय ट्रांन्झिट व्हिसा हा एक उत्तम पर्याय आहे एखादा देश बघण्यासाठी. तो अर्थातच कमी वेळाचा असतो आणि त्याप्रमाणे विमानाची तिकिटं करावी लागतात. पण त्यानिमित्ताने मधल्या वेळेचा सदुपयोग होतो आणि फिरणंही होतं. शिवाय ट्रान्झिट व्हिसा मिळवणे जास्त सोपे आहे. ऑस्ट्रेलियाला जाताना मी सिंगापुर मध्ये ट्रान्झिट व्हिसा घेतला. तो ९६ तासांचा होता आणि माझ्याकडे ऑस्ट्रेलियाचा व्हिसा आणि जाण्यायेण्याची तिकिटं होती. असंच दुबईला केलं. काही आठवडे आधी फक्त ऑनलाईन अप्लिकेशन द्यायचं होतं आणि मधल्या वेळाचा सदुपयोग करता आला.

सहल ठरवणे, त्याचे नियोजन करणे, तिथे काय बघायचं याचं वेळापत्रक ठरवणे हे कसं करतेस? एखाद्या एजन्सी मार्फत की स्वतंत्र?
एखाद्या देशात फिरायचे बेत फायनल करण्यापूर्वी मी तिथल्या प्रत्येक बाबीचा शोध घेते, यासाठी आंतरजालावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. tripadvisor.com, roughguides.com यासारख्या संस्थळावर बरीच माहिती असते. अनेक लोक त्यांचे ब्लॉग्स लिहितात, त्यातून अंदाज येतो. शिवाय एकट्या मुलीने फिरणे याबद्दलही अनुभव वाचायला मिळतात. त्या ठिकाणचं वातावरण किती सुरक्षित आहे, काय काळजी घ्यायला हवी, फिरण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय कोणता अशा प्रत्येक मुद्द्याचा विचार करते. शक्यतोवर तिथल्या लोकल मित्र मैत्रिणींशी संपर्क साधून बघते, जे त्या देशात, शहरात रुळलेले असतात. किंवा त्या देशात पूर्वी जाऊन आलेले कुणीतरी ओळखीचे असतात, त्यांच्याशी बोलून माहिती मिळवता येते. यासाठी अगदी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचा खूप फायदा होतो. या विविध ठिकाणांहून माहिती काढली की मग कुठली पर्यटनस्थळे बघायला हवीत, साधारण किती खर्च येईल, कुठल्या ऋतूत तिथे फिरणे योग्य आहे अशी माहिती मिळवता येते. शिवाय जवळच्या ग्रंथालयात ट्रॅव्हल डॉक्युमेटरीज असतात, भाषेची जुजबी ओळख करून घेता येईल अशा माहितीपर सीडीज असतात, नकाशे असतात ज्यातून अजून माहिती मिळवता येते.

हे सगळं झालं की मग मला नेमकं काय बघायचं आहे, कुठल्या जागा मला बघायच्या आहेत आणि कुठे मी तडजोड करू शकते याचा अंदाज येतो. त्यावरून मग जवळचे विमानतळ, राहण्याची व्यवस्था ही माहिती काढायला सुरूवात करते. यात मग विमानतळापासून हॉटेलवर जायला शटल बस आहेत का, तिथून पुढे फिरायला सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी काय आहेत, माझ्याकडे किती दिवस आहेत हे सगळं सविस्तर बघून मग फायनल प्लॅन करते. रोजच्या दिवसाचं वेळापत्रक जमवून त्यानंतर पुढे व्हिसा, विमानाची तिकिटं, हॉटेल बुकिंग आणि तिथे लोकल ट्रिप्स साठीचे बुकिंग्स करायचा मार्ग मोकळा होतो.

तिथे फिरताना मी शक्यतोवर दिवसभराच्या टुर्स घेते, यात मग कधी तिथल्या लोकल गाईडेड टुर्स असतील किंवा स्वतंत्रपणे फिरणार असेल तरीही. फिरताना मी शक्यतोवर असं बघते की एक मुख्य शहर आणि मग तिथून एका दिवसात फिरून होतील अशा जागा. उदा. म्हणून फ्लोरेन्सला राहून मी एक दिवसात टस्कान भाग आणि पिसाचं टॉवर केलं. सिडनीत राहिले आणि ब्लु माऊंटेन मधला एक दिवसाचा हाईक केला. वेळ असेल तर मला जवळच्या लहान गावात जाऊन राहायलाही आवडतं, पण अशा ठिकाणी सगळं सामान घेऊन फिरणं कंटाळवाणं आणि त्रासदायक होऊ शकतं. जेव्हा मी अशा दिवसभराच्या टुर्स घेते तेव्हा महत्वाचं हे बघते की या टुर प्रोव्हायडर्स बद्दल viator.com, tripadvisor अशा माहितीतल्या संस्थळावर चांगले रिव्ह्युज चांगले आहेत. शिवाय त्यांच्या वेळा, ठिकाण हे सगळं माझ्या वेळांशी जुळलं पाहिजे.

शहरात फिरण्याची मजा वेगळी आहे. 'हॉप ऑन हॉप ऑफ' बसेस आता बर्‍याचशा पर्यटन शहरात आहेत. या बसेसने फिरताना कधीतरी तोचतोचपणा वाटू शकतो किंवा मुख्य जागांशिवाय काही बघता येत नाही, तरीही एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायला हा पर्याय चांगला आहे. बर्‍याच शहरात सायकल टुर्स असतात ज्या तुम्हाला तिथल्या मुख्य जागा दाखवायला मदत करू शकतात. जपान रेल पास किंवा Eurail pass सारखे पर्याय उत्तम आहेत, ज्यात पैसेही वाचतात आणि फ्लेक्सिबिलिटी असते. आधी बुकिंग केलं तर चांगल्या डील मिळतात.

ज्या देशात जायचं असेल तिथले काही जुजबी भाषेचे ज्ञान मिळवता आले तर तिथे फिरताना अजून फायदा होतो. विशेषतः शाकाहारींसाठी कुठल्याही ठिकाणी जाताना अजून जास्त माहिती काढलेली केव्हाही चांगली, त्यातही खाद्यपदार्थांबद्दलचे काही महत्वाचे लोकल शब्द माहित असतील तर अजून चांगलं जेणेकरून काय चालतं आणि काय नाही हे सांगायला मदत होते. उदा. काही ठिकाणी फिश हे शाकाहारी समजलं जातं, मग 'नो मीट' म्हणजे नेमकं काय हे सांगायला तिथले शब्द माहिती असतील तर फायदा होतो.

माझ्या आजवरच्या फिरतीतून मी शिकलेली महत्वाची बाब ही की शक्य तेवढ्या आधीपासून नियोजन करायचं, भरपूर माहिती काढायची, त्याचा सखोल अभ्यास करून मग प्रत्येक गोष्ट ठरवायची. या सगळ्याचा आर्थिक नियोजनातही फायदा होतो, आणि एकूणच तिथे गेल्यावर अरे, हे माहितच नव्हतं असं होण्यापेक्षा आधीपासून ठरवून गेल्याने रुखरुख नसते.

सगळीकडे तू एकटी फिरलीस का? त्यासाठी काय काळजी घेतली?
बहुतेक वेळा एकटीच फिरले. ग्रुपमध्ये फिरण्यासाठी प्रत्येकाचं वेळापत्रक जमून यायला हवं, शिवाय प्रत्येकाची आवडनिवड वेगळी. त्यामुळे अपवाद वगळता एकटीच फिरले. महत्वाची काळजी घ्यायची ते म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं असं ठरल्यावर तिथली माहिती काढताना तिथल्या सुरक्षिततेचा सखोल अभ्यास करायचा. आधी म्हणाले त्याप्रमाणे यासाठी आंतरजालावरील विविध ब्लॉग्स, लोकांचे रिव्ह्युज याचा खूप फायदा होतो. तिथल्या लोकल मित्र मैत्रिणींशी संपर्क झाला तर त्यांच्याकडून माहिती मिळवता येते. हे सगळं बघून मी तिथे एकटीने फिरू शकेल का, जर नसेल तर मग इतर काय पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती काढून पुढच्या गोष्टी ठरवता येतात. उदा. मोरोक्को हा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पण तिथे स्त्रियांनी एकटीने फिरणं तेवढं सुरक्षित नाही. म्हणून मी तिथे ग्रुपने फिरले. तेच पेरू या देशात तशी भीती नाही, मात्र सगळ्या मित्र मैत्रिणींच्या वेळा जुळून आल्या आणि आम्ही सगळे जण एकत्र फिरलो. त्यामुळे आमचा खर्च कमी झाला आणि धमाल आली.

एकटीने फिरताना मी शक्यतोवर बघते की तिथे कुणी ओळखीचे, नातेवाईक आहेत का ज्यांच्याकडे मला राहता येईल. यातून काही वेळा खास पर्यटन स्थळांइतकाच तिथे राहण्याचा पण अनुभव घेता आला, कारण त्यांच्याकडून तिथले अजून अनुभव ऐकायला मिळतात. लक्झेमबुर्ग, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, चिली, इटली असे काही देश की जे सुरक्षित आहेत, योग्य त्या सुविधा आहेत त्या ठिकाणी मी संपूर्णपणे एकटीने फिरले. पण अशा ठिकाणी जातानाही माझा सगळा प्लॅन, प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक हे माझ्या जवळच्या ३-४ लोकांना माहित असतं आणि त्यांच्याशी मी जमेल तशी संपर्कात असते. इमर्जन्सी साठी लागतील असे सगळे नंबर्स सोबत असतात.

सामानाची सुरक्षितता हाही एक मुद्दा आहे. सामान सुरक्षित राहावं म्हणून कुलुप असणे गरजेचे आहे. विशेषतः एकटीने फिरताना जेव्हा सार्वजनिक ठिकाणी, जसं की विमानतळ, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी सामान ठेवावं लागतं तेव्हा. बर्‍याच ठिकाणी विमानत़ळ, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी लॉकरची सुविधा असते जिथे सामान टाकून दिवसभर फिरता येऊ शकतं. यामुळे केवळ सामान ठेवण्यासाठी हॉटेल बुक करावं लागत नाही. पण याबद्दलही आधी माहिती काढलेली बरी. रोम सारखी ठिकाणं, जिथे अशा ठिकाणी सुद्धा सहजपणे काहीही होऊ शकतं, तिथे आपल्याला सतत सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. शिवाय इतर वेळीही फिरताना लक्ष ठेवावं लागतं, आणि आपण नेहमी रोजच्या आयुष्यात घेतो ती काळजी इतरत्रही घ्यावी लागते.

एकाच वेळी बरेच देश आणि एकूणच आंतरराष्ट्रीय प्रवास करताना तुझ्या सामानात महत्वाचं असं काय असतं?
Pack per day and travel light हा सामानाचा मुख्य मंत्र. जिथे जायचं आहे तिथले हवामान आणि तुम्हाला कुठे फिरायचं आहे, कशा पद्धतीने फिरायचं आहे याप्रमाणे सगळं बघून ठरवायचं. म्हणजे मी एकदा स्किईंगला गेले पण माझं जॅकेट वॉटरप्रुफ नव्ह्तं. त्यामुळे मी तो अनुभव मनासारखा घेऊ शकले नाही. एकदा सेदोना, अरिझोना इथे हायकिंग करत असताना माझ्याकडे तेवढे चांगले ग्रिप असलेले शुज नव्हते. अशा लहान सहान गोष्टींमुळे हिरमोड होतो. त्यामुळे सगळं लक्षात घेऊन त्याप्रमाणे तयारी करणे आवश्यक आहे. शिवाय सोबत नेहमी एक इंटरनॅशनल चार्जर / युनिव्हर्सल अ‍ॅडॅप्टर हे नेहमीसाठी असायला हवं.

आशिया खंडातले कुठले देश पाहिले? तिथे आणि भारतात काय समानता किंवा फरक आढळले?
आशिया खंडातील जपान, सिंगापुर, थायलंड, दक्षिण कोरिया आणि युनायटेड अरब एमिरेट्स या देशात फिरले. भारताप्रमाणेच या देशांना भरभक्कम सांस्कृतिक वारसा आहे, विशेषतः पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत हे अधिक ठळकपणे जाणवतं. सिंगापुर, अबु धाबी, कोरिया हे नव्याने विकसित झालेले आहेत. त्यामुळे तिथे अत्याधुनिक विकास बघायला मिळतो आणि त्यांच्या पर्यटन स्थळांमधूनही तेच दाखवलं जातं. त्यामानाने जपान किंवा थायलंड यांचा इतिहास वेगळा आहे आणि त्यामुळे तिथे पर्यटनासाठीही तो त्यांचा पाया आहे आणि ते ठळकपणे दिसतं.

भारताशी तुलना केली तर जपान, कोरिया, सिंगापुर आणि काही प्रमाणात थायलंड आणि युनायडेड अरब एमिरेट्स हे फिरण्यासाठी सुरक्षित आहेत, खूप स्वच्छ आहेत. मुख्य म्हणजे या देशांनी पर्यटकांना खास आकर्षित करण्यासाठी खूप सोयी सुविधा पुरवल्या आहेत. शिवाय हे देश आकाराने लहान असल्याने फिरायला जाताना देशांतर्गत अंतर कमी होते आणि एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतचा प्रवास सोपा वाटतो. पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी उत्तम सर्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे बाहेरच्या देशातील पर्यटकांनाही त्यामानाने अडचणी कमी येतात आणि प्रवासाचा आनंद मिळतो. जपान आणि कोरियात मला काही प्रमाणात भाषेचा प्रश्न आला. त्यामानाने भारतात इंग्रजी येत असेल तर मोठ्या शहरात तर अजिबातच अडत नाही.

भारताचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतात प्रचंड वैविध्य आहे, जे इतर ठिकाणी त्या प्रमाणात कमी दिसले. बहुतांशी देशात खूप लहान सहान जागांचे पर्यटन स्थळात रुपांतर केले आहे. त्यामानाने भारतात अशा कित्येक जागा आहेत ज्या मुळातच आवर्जून बघण्यासारख्या आहेत. शिवाय आपण पाश्चिमात्यांपेक्षा वेगळे आहोत आणि आपली एक स्वतंत्र ओळख आहे. इतिहास, भाषा, खाद्यसंस्कृती, कला, सणवार या प्रत्येकात वैविध्य आहे. भारतापेक्षा मला जपान आणि सिंगापुर तुलनेने (भारत आणि अमेरिका) बरेच महाग वाटले. भारतात पर्यटन तुलनेने स्वस्त आहे. शिवाय आवडीप्रमाणे, बजेटप्रमाणे प्रत्येकाला सोयीचे असे पर्याय आहेत. अगदी स्वस्त ते महाग, साहसी प्रवास, धार्मिक स्थळांना भेटी, समुद्रकिनारे, जंगल भ्रमंती असे कितीतरी प्रकार आहेत.

मला प्रवासात असे अनेक जण आजवर भेटले ज्यांना माझ्या भारतीय असण्याचं कुतूहल वाटलं. भारतात भटकंती हे आमचं स्वप्न आहे असं अनेकांनी सांगितलं. भारतात असे पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न व्हायला हवेत, परदेशी पर्यटकांना सुरक्षित वाटायला हवं अशी परिस्थिती हवी. या पर्यटन विकासातून परदेशातून पैसा तर मिळेलच आणि जागतिक स्तरावर विकासाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असेल.

युरोप आणि अमेरिका या 2 मोठ्या खंडात काय फरक जाणवला?
पर्यटनाच्या दृष्टीकोनातून बघायचं झालं तर युरोपातले देश आकाराने लहान आहेत आणि अमेरिकेत एकाच खंडात ४ वेगवेगळे टाईम झोन्स आहेत इतका प्रचंड फरक आणि इतका मोठा खंड आहे. त्यामुळे युरोपात ज्या वेळात ३-४ देश फिरता येतात, तेवढा वेळ तर पूर्व ते पश्चिम किनारा या प्रवासाला लागतो. म्हणूनच या दोन्हीकडे फिरण्याचे, राहण्याचे अनुभव खूप वेगळे आहेत. न्यूयॉर्क ते कॅलिफॉर्निया या प्रवासाला ५ तास लागतात, त्यापेक्षा कमी वेळात लंडन ते पॅरिस हे अंतर ट्रेनने सहज कापता येतं. युरोपातील सर्व देश उत्तम वाहतूक व्यवस्थेने जोडलेले आहेत. EuRail सारख्या अत्याधुनिक फास्ट ट्रेन्स पासून ते शहरात फिरताना ट्राम, बस पर्यंत आणि शिवाय तिथे अनेक स्वस्तातले विमान प्रवासाचे पर्याय उपलब्ध आहेत जसे RyanAir, EasyJet इत्यादी. मी म्युनिक ते व्हेनिस हा विमानप्रवास फक्त २० डॉलरमध्ये केला. त्यामानाने अमेरिकेत ट्रेन्स, बसेस तेवढं सोयीस्कर नाही, त्यापेक्षा विमान प्रवास बरा पडतो किंवा मग स्वतःच्या गाडीने फिरण्यासाठी वेळ असेल तर उत्तम रस्ते आहेत.

युरोपात फिरताना जागोजागी जाणवतं की पादचार्‍यांसाठी किती जास्त सुविधा आहेत, जागेची कमी आहे त्यामुळे भरगच्च वस्ती आहे, तिथे चौकाचौकात विविध शिल्पं आहेत, स्ट्रीट म्युझिशियन्स गात असतात, वाद्य वाजवत असतात, रेस्टॉरंटच्या बाहेर निवांतपणे लोक बसलेले असतात. युरोपात जरी तिथल्या प्रमुख देशांनी अनुभवलेला इतिहास हा वरवर बघता काही ठळक घटनांशी संबंधित असला, तरीही प्रत्येक देशाचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. अगदी जवळजवळ असूनही प्रत्येकाची अशी स्वतंत्र संस्कृती आहे. तिथलं पर्यटन हे मुख्यत्वे विविध संग्रहालये, ऐतिहासिक जागा, स्थापत्यशास्त्र, कलासंग्रहालये यातून संस्कृती समजून घेण्याबद्दल आहे. शिवाय मग आल्प्स आणि इतरही नैसर्गिक सौन्दर्यस्थळे आहेत. काळाबरोबर पुढे जाताना जरी त्यांनी अनेक आधुनिक विकासासाठी नवीन गोष्टी स्विकारल्या असल्या, तरीही त्याच वेळी त्यांनी जुनेपण, त्यांचं वेगळेपण जपलं आहे जे अमेरिकेत फार कमी बघायला मिळतं.

अमेरिकेलाही इतिहास आहे, परंतु युरोपच्या तुलनेने नवीन आहे आणि इथे अनेक संस्कृती एकत्र आल्यात आणि नांदत आहेत. अमेरिकन पर्यटन व्यवस्थेचा प्रमुख भाग म्हणजे वॉशिंग्टन डीसी मधली सरकारी कार्यालये, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, सारख्या ऐतिहासिक जागा, नायगारा फॉल्स, यलोस्टोन सारखे अनेक अनेक नॅशनल पार्क्स. याशिवाय लोक अमेरिका बघायला येतात ते मुख्यत्वे इथे असलेला सांस्कृतिक मिलाप बघण्यासाठी, अमेरिकन ड्रीम अनुभवण्यासाठी. यासाठी मग मोठमोठी शहरे, गगनचुंबी स्कायलाईन्स, ब्रॉडवेवरचे ऑपरा शोज, फॅशन, जागतिक अर्थव्यवस्थेची पंढरी म्हणजेच वॉल स्ट्रीट, शॉपिंग, लास व्हेगास, डिस्नेलँड मधील मनोरंजन असे अनेक पर्याय आहेत. शिवाय कित्येकांना नासा, अमेरिकन नेव्हीची संग्रहालये अशा ठिकाणी भेट देण्यातही स्वारस्य असते.

त्यामुळे पाश्चिमात्य असं एक सर्वसाधारण लेबल असलं तरीही दोन्ही तेवढेच वेगळे आहेत. असं म्हणू शकतो की समानता म्हणायची झाली तर दोन्हीकडे उत्तमोत्तम शैक्षणिक संस्था आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्यातून आलेला कम्फर्ट, उपलब्ध आधुनिक सोयीसुविधा हा दोन्हीकडील लोकजीवनाचा रोजचा भाग आहे. अर्थातच आधी म्हणाले त्याप्रमाणे मानवी स्वभावाची समान सूत्र इथेही दिसून येतातच.

भारतीय म्हणून काय अनुभव आलेत?
एक भारतीय म्हणून मला नेहमीच इतर भारतीयांकडून चांगले अनुभव आलेत आणि भारतीय संस्कृतीचे ठसे जगात विविध ठिकाणी दिसले, तेही अगदी अनपेक्षितपणे. थायलंडमध्ये आमच्या सहलीचा शेवटचा दिवस होता, आणि दुसर्‍या दिवशी गणेश चतुर्थी होती, त्यामुळे आम्ही आपसात आता घरी जाऊन मोदक घ्यायचे असं बोलत होतो. अगदी त्याच वेळी गाडीने वळण घेतले आणि समोर आलं ते गणेश मंदिर. पोर्तुगाल मध्ये ग्रोसरी शॉपमध्ये होते आणि तिथे खरेदी करताना भाषेची अडचण येत होती, आणि अचानकपणे साडीतली एक बाई आली आणि तिने मला भाषेसाठी मदत केली. आयफेल टॉवरच्या रांगेत असताना मराठी संभाषण ऐकलं, रोममधल्या एका पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये तिथल्या मालकाने माझ्याकडून जेवणाचा एकही पैसा घेतला नाही किंवा अबु धाबीत एका बस चालकाने मला त्याच्या कामातून वेळ काढून मला योग्य त्या जागी पोहोचायला मदत केली, असे कित्येक चांगले अनुभव भारतीय म्हणून गाठीशी आहेत. आपली भारतीय म्हणून सगळीकडे एक विशेष ओळख आहे. विविध देशात भटकंती दरम्यान भारतीयांना येणारे अनुभव, भारताबाहेर वर्षानुवर्षे स्थायिक असणार्‍या लोकांकडून तिथे राहण्याचे अनुभव ऐकणे, वाचणे हे सगळं मला नेहमीच खूप रोचक वाटतं.

तुझ्या आजवरच्या भटकंतीतले विशेष लक्षात राहिलेले अनुभव?
अलास्कातला नॉर्दर्न ऑरोरा लाईट्स बघण्याचा अनुभव हा अत्यंत सुखद आणि अविस्मरणीय आहे. मी अलास्काला माझ्या ३० व्या वाढदिवसाला गेले होते. माझ्या हातात ३ दिवस होते. सर्वसाधारणपणे हे नॉर्दर्न लाईट्स बघण्यासाठी ३ महत्वाच्या बाबी जुळून येणे आवश्यक आहे - सोलर अ‍ॅक्टिव्हिटी प्रेडिक्शन (requires 3, 4 or 5 on the scale of 5), तुम्हाला शहराच्या शक्य तेवढं दूर जावं लागतं म्हणजे शहरातील मानवनिर्मित दिव्यांचा प्रश्न येत नाही आणि आकाश मोकळं हवं. जर ढग आले तर यातलं काहीही जमू शकत नाही. तो हिवाळा होता अलास्कातला, तापमान साधारण -२५ ते -५५ पर्यंत जाऊ शकतं. आम्ही ६ तास निर्मनुष्य रस्त्याने, जिथे दूरवर सगळीकडे फक्त बर्फच बर्फ आहे अशा हायवेवरून ड्राइव्ह करत होतो. काही जंगली श्वापदं आणि सूचिपर्णी वृक्ष वगळता ना इतर गाड्या, ना कुठे कसली चाहूल. ते वेगळंच जग वाटत होतं. ऑरोरा अजून दिसत नव्हता, पण अगदी १२ च्या ठोक्याला माझा वाढदिवस जसा चालू झाला, त्याच वेळी हलता ऑरोरा दिसू लागला. पुढची १५-२० मिनिट आम्ही निशःब्द होऊन तो नेत्रसुखद सोहळा अनुभवत होतो. मी जगातली सर्वात सुखी व्यक्ती आहे असं मला तेव्हा वाटत होतं. त्या ३ दिवसांच्या सहलीत हा सोहळा मला एकदा नव्हे, तर दोनदा अनुभवता आला. तो शब्दात व्यक्त करणे कठिण आहे.

दुसरा एक अनुभव म्हणजे न्युझीलंड मधील क्वीन्सटाऊन मधला. हे शहर न्युझीलंड मधील adventure capital म्हणून ओळखलं जातं. स्कायडायव्हिंग, बंजी जंपिंग, पॅराग्लायडिंग, हॅन्डग्लायडिंग, झिपलायनिंग अशा अनेक थरारक साहसी प्रकारांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. मी हॉटेलवर पोहोचून बाल्कनीचं दार उघडलं आणि सगळ्यात पहिले समोर दिसले ते मुक्तपणे आकाशात फिरत असलेले साधारण ५०-६० पॅराशुट्स जे 'बॉब्स पीक' नावाच्या पर्वतावरून हवेत झेपावत होते. या शहराचे नाव किती सार्थ आहे याचा अनुभव घेता आला. त्यानंतर तिथे मी पॅराग्लायडिंग केलं आणि आकाशातून न्युझीलंडचा दिसलेला अप्रतिम नजारा बघून स्तब्ध झाले. तिथली उंच पर्वतशिखरे, हिरवाई हे सगळं इतक्या उंचीवरून बघणं हा सुंदर अनुभव होता. (यावरून आठवलं, न्युझीलंड हा देश तिथल्या कडक कस्टमच्या नियमांसाठी ओळखला जातो. त्यांनी मला माझे शुज स्वच्छ करायला लावले, कारण इतर कुठल्याही मातीतून आलेली मातीसुद्धा तिथे मिसळू नये आणि त्यांची unique indigenous ecosystem सुरक्षित राहावी म्हणून. मी सोबत नेलेले खाद्यपदार्थसुद्धा फेकून द्यावे लागले.) अजून एक रोचक वाटलेली बाब म्हणजे हे सगळं नाताळच्या दिवसात अनुभवलं. न्युझीलंड दक्षिण गोलार्धात असल्याने तिथला नाताळ हा उन्हाळ्यात येतो. यापूर्वी बर्फातला नाताळ पाहिलेल्या माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता. मी तिथे ज्या ठिकाणी बंजी जंपिंग केलं, ती जगातली पहिली बंजी जंपिंगची जागा आहे. ४३ मीटर उंचीचा पूल होता तो, जिथून खाली पाण्यात फ्री फॉल.... मी बघत होते की अनेक लोक येतात आणि शेवटच्या क्षणी कच खाऊन मागे फिरतात. त्या पुलावरून खालचा सरळसोट फ्री फॉल बघून असं होऊ शकतं. पण मी मनात पक्कं ठरवलं होतं की मी जास्त विचार करणार नाही, फक्त समोरचं नितळ सुंदर निळं पाणी बघायचं आणि उडी मारायची. मी यापूर्वी घेतलेल्या अनेक साहसी अनुभवांपेक्षा किंवा कित्येक रोमांचक रोलर कोस्टर राईड पेक्षा हा अनुभव फार वेगळा होता. Although I was fully aware that I was wearing the harness on my feet, my subconscious was convinced that I was in danger and was desperately commanding me to find something to hold on to. Strange.....And stranger even, I remember thinking of this paradox while I was jumping! But nonetheless, the jump felt extremely liberating.

क्विन्सटाऊन न्युझीलंडमधे बंजी जंपिंग

.

अजून एक म्हणजे अंटार्क्टिकाला पेंग्विनसोबत घेतलेला वॉक.

.

आता आठवताना असे अनेक अनुभव डोळ्यांसमोर येत आहेत जे सगळेच विशेष होते. माचु पिचु ला फिरताना अतिशय निगुतीने जतन केलेले इंका संस्कृतीचे अवशेष बघण्याचा विस्मयकारक अनुभव, अंटार्क्टिकाला विमान उतरेपर्यंत वाटलेली धाकधूक (अंटार्क्टिकाला बरेचदा असं होऊ शकतं की खराब हवामानामुळे विमान उतरवणे शक्य होत नाही आणि ऐन वेळेवर विमान न उतरवण्याचा निर्णय घ्यावा लागतो), एक अभियंता म्हणून जपानच्या शिनकान्सेन या बुलेट ट्रेन ने प्रवास करताना वाटलेला अभिमान, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ गेले असताना नॉर्थ कोरियातल्या लोकांच्या जीवनाबद्दल विचार करून हळवं झालेलं मन, अनेक वर्ष पत्रमैत्री असणार्‍या मित्र मैत्रिणींना प्रत्यक्षात भेटण्याचा आनंद आणि त्यांच्यासोबत नाताळ किंवा नववर्ष साजरं करणं यातून मिळालेला आनंद, जर्मनीत जर्मन कुटुंबासोबत तिथल्या प्रसिद्ध ख्रिसमस मार्केट्स्च्या आठवणी, असे कित्येक संस्मरणीय अनुभव आहेत.

ऱोम

.

माचु -पिचु पेरु

.

आर्क्टिक सर्कल अलास्का

.

ऑरोरा बोरायलीस अलास्का

.

एखादा अडचणीत सापडवणारा प्रसंग जो नंतर निभावून नेला?
देवाच्या कृपेने खूप संकटात टाकणारे, काही चोरीला गेलं असे प्रसंग आले नाहीत. पण काही वेळा अर्थातच विचित्र अनुभव आले. रोम मध्ये माझी ट्रेन रात्री १२ ला पोहोचणार होती आणि मला २ मोठ्या बॅग्स घेऊन हॉटेल शोधायचं होतं. ट्रेन स्थानकाच्या बाहेरचा भाग तितकासा चांगला नाही असं प्रत्येक ठिकाणी वाचलं होतं. त्यातून हॉटेल बेड अ‍ॅन्ड ब्रेकफास्ट स्वरुपाचं आणि कौटुंबिक स्वरुपाचं होतं, त्यांनी लिहिलं होतं की रात्री १२ ला स्वागतकक्ष बंद होईल. मी फोन केला चौकशी करायला तेव्हा इटालियन भाषेत बोलून त्यांनी फोन कट केला. त्यामुळे मला चिंता होती की आता रात्रभर इथे स्टेशनवर कसं थांबायचं? मी यापूर्वीही अशी काही वेळा थांबले होते, पण रोमबद्दल तेवढी खात्री नव्हती. माझ्या डोक्यात गुगल मॅप्स वरून पक्क्या केलेल्या अंदाजामुळे मी सहजपणे हॉटेलवर तर पोहोचले आणि खोलीचा ताबाही मिळाला. पण खोलीत शिरले त्याक्षणी दिवे गेले. मला सतत काहीतरी चुकतंय असं वाटत होतं. मी सामान घेऊन परत रिसेप्शनवर आले, तिथल्या व्यक्तीसमोरच माझ्या इमर्जन्सीसाठी असलेल्या एकाला फोन केला आणि माझ्या लोकेशनची माहिती दिली. शिवाय खोली बदलून मागितली. नंतर सगळं सुरळीत झालं. असंच एकदा चिलीच्या विमानतळावर परतताना टॅक्सी चालक काही ना काही कारण देऊन तिथे पोहोचायला उशीर करत होता. इंग्रजी येत नाही असं म्हणत दूरच्या रस्त्याने नेत होता आणि सतत माझी काहीतरी चौकशी करत होता. शेवटी मी माझ्या तिथल्या लोकल इमर्जन्सी कॉन्टॅक्टशी फोनवर बोलले आणि त्याला माझ्या लोकेशनचे अपडेट्स देत होते. त्यालाच मग मी स्पॅनिश बोलायला लावले आणि शेवटी सुखरुप पोहोचले. अशा काही प्रसंगात मला क्विक अ‍ॅक्शन घेणं गरजेचं होतं, पण त्याशिवाय इतर कुठेही वाईट अनुभव आले नाहीत. माझा ठाम विश्वास आहे की जर आपण योग्य लोकांच्या संपर्कात राहिलो, तर त्यांच्या मदतीने कुठल्याही अडचणीतून मार्ग निघू शकतात.

तुझा या भटकंतीबद्दल मित्र मैत्रिणी, ओळखीचे यांना काय वाटतं?
जरी अनवट, साहसी जागा अजून जास्त लोकांच्या भटकंतीत नसल्या, तरीही निदान मुख्य पर्यटन स्थळं बघण्याचा ट्रेन्ड खूप वाढलेला दिसतो. पुर्वी आंतरराष्ट्रीय प्रवास तेवढा सहज सोपा नव्ह्ता, पण आमच्या पिढीमध्ये हे सहज झालं. शिवाय मी आधीही म्हणाले माहिती मिळवणे, प्रत्यक्ष प्रवास करणे, अनुभव मांडणे या सगळ्यात तंत्रज्ञानाचा फार मोठा हातभार आहे. भारतात राहणारे माझे अनेक मित्र मैत्रिणी थायलंड, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया अशा देशात जाऊन आलेत. अमेरिकेत स्थायिक असलेले अनेक जण कॅनडा, मेक्सिको, पेरू, कोस्टा रिका अशा जवळच्या देशांमध्ये जातात. युरोप मध्ये इटली, युके, फ्रान्स हे तर खास पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलेच देश. आमच्या पिढीतले अनेक जण कामानिमित्त विविध देशात जातात आणि मग त्या संधीचा फायदा घेऊन जवळपास फिरतात. काही प्रवासी मित्र जर एखाद्या देशात जाऊन आले असतील, तर त्यांचे अनुभव ते सांगतात आणि मग त्यावर चर्चा होतात. तरीही माझ्या मित्र मैत्रिणींना माझ्या या सततच्या भटकण्याचं कुतूहल वाटतं. सुरक्षिततता, सुट्ट्या, मोटिव्हेशन असे अनेक प्रश्न ते विचारतात. काही लोक आता त्यांचे भटकंतीचे बेत ठरवताना माझ्याकडून माहिती घेतात.

आता तुझे पुढेचे भटकंतीचे बेत काय आहेत? कुठल्या विशेष जागा आहेत जिथे जायची इच्छा आहे?

७ ही खंड फिरण्याचं माझं स्वप्न जरी पूर्ण झालं असलं, तरीही मला असं वाटतं की मी फक्त धूळ झटकून आले आहे. अजून हजारो जागा मला खुणावत आहेत. शिवाय ज्या देशात मी गेले, तिथल्याही कित्येक जागा बघायच्या राहिल्या आहेत. माझी बकेट लिस्ट सतत भरलेलीच आहे. अजूनही नवीन वर्ष चालू झालं की मी त्याच उत्साहाने पैसे कसे वाचवता येतील आणि त्यातून कुठे आणि कसं भटकायला जाता येईल याचाच विचार करत असते आणि तेवढ्याच उत्साहाने माहिती शोधायला सुरूवात करते. आता मला अशा देशांना भेट द्यायला आवडेल ज्या अजूनही पर्यटनासाठी फारसे प्रसिद्ध नाहीत किंवा अजून पर्यटन विकासाच्या मार्गावर आहेत. उदा. मंगोलिया, सैबेरिया, आइसलँड, बोलिव्हिया, भुतान, इंडोनेशियन बेटे अशी न संपणारी यादी तयारच आहे. शिवाय ग्वाटेमालातील फ्लोरा आणि फॉना, पाटागोनियामधील ग्लेशियर हायकिंग (Patagonia, Argentina), हवाईतले ज्वालामुखीचे पर्वत, दक्षिण आफ्रिकेतली जंगल सफारी, कॅनडातला बांफ नॅशनल पार्क (Banff National park) हे अजून काही आत्ता आठवताहेत ते, यात सतत भर पडेलच. मला फक्तच प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे याव्यतिरीक्त तिथे कुणी मित्र मैत्रिणी, ओळखीचे असतील, माझे पेन फ्रेंड्स असतीलतर त्यांच्यासोबत राहणे, तिथे त्यांच्यासोबत एखादा त्यांचा सण साजरा करणे हेही आवडतं. भटकंतीचाच हाही एक भाग आहे असं मला वाटतं, कारण यात त्या स्थानिक संस्कृतीशी जवळून ओळख होते, तिथलं जीवनमान कसं आहे हे समजतं.

आणि हो, लास्ट बट नॉट द लीस्ट, भारतातील सगळी राज्य पालथी घालायची हे एक फार पूर्वीपासून जपलेलं स्वप्न आहे आणि तेही पुर्ण करायचंय.

वेळात वेळ काढून तुझे अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आसावरी तुझे मनःपूर्वक आभार! तुझ्या अजूनही नवीन फिरतीतले अनुभव भविष्यात अशाच काही निमित्ताने वाचायला आम्हाला नक्की आवडेल. आणि तुला पुढील अशाच नवनवीन देशातल्या प्रवासासाठी अनाहिता परिवारातर्फे खूप शुभेच्छा!! आणि या मुलाखतीत तेवढाच महत्वाचा सहभाग असलेली इडली डोसा हिलाही अनेक धन्यवाद.

***********************************************************************************
इडली डोसा या अनाहिता मैत्रिणीने भटकंती अंकाच्या अगदी सुरूवातीपासून आसावरीबद्दल सांगितले. मग काय प्रश्न असावेत, कसे असावेत याबद्दल चर्चा केलन, नंतर शब्दांकनातही मदत केली. आसावरीने मराठी-इंग्रजीतून तिचे अनुभव मांडले. मुळात आसावरीने लिहिलेलंच फार छान होतं, तिने लिहिलेल्या बाबी या तिच्या मनापासून आलेल्या होत्या हे मला वाचताना सतत जाणवत होतं, तिने फिरताना किती माहिती काढली आहे हेही त्यातून कळत होतं. त्यात तिने तिच्या रोजच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून रात्री उशीरापर्यंत बसून रोज थोडं थोडं हे लिहून पाठवलं हे विशेष वाटलं. आणि तिच्याशी गाठ घालून देणे, शब्दांकनात मदत करणे, फॉलो अप घेणे या इडली डोसाच्या सहभागाशिवाय ही मुलाखत पूर्ण झाली नसती. दोघींचेही अनेकानेक आभार!!

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

मुलाखत, अनुवाद, सादरीकरण सगळं छान जुळुन आलं आहे. तुम्हा दोघींचं खूप कौतुक वाटतये.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 8:45 pm | प्रीत-मोहर

जियो आसावरी!!!!
मधु आणि इडो धन्यु ग

बोका-ए-आझम's picture

9 Mar 2016 - 7:28 am | बोका-ए-आझम

अंटार्क्टिकाला पण जाऊन आलेली आहे आसावरी! सुपर्ब!

मितान's picture

9 Mar 2016 - 8:35 am | मितान

कमाल मुलगी आहे ही !!!
मुलाखत आवडली मधुरा !!

सविता००१'s picture

9 Mar 2016 - 10:37 am | सविता००१

मुलाखत मस्तच
काय झकास आयुष्य जगतेय ही आसावरी...

कालिंदी's picture

9 Mar 2016 - 11:12 am | कालिंदी

खुप छान मुलाखत. अगदी मनापासुन आणि कुठलहि अवडंबर न करता दिलेली. मधुरा देशपांडे आणि इडली डोसा ह्यांना खुप धन्यवाद.

सुपर्ब आहे हि.. हॅट्स ऑफ.. :)
माझे आणि नवर्‍याचे स्वप्न आहे ऑरोरा बघायला जायचे.

अजया's picture

11 Mar 2016 - 4:08 pm | अजया

भन्नाट पोरगी आहे!
माझेही आॅरोरा बघायचे स्वप्न आहे.

टिवटिव's picture

10 Mar 2016 - 9:16 pm | टिवटिव

मुलाखतीबद्द्ल खुप खुप धन्यवाद.

पूर्वाविवेक's picture

11 Mar 2016 - 11:10 am | पूर्वाविवेक

विषय, मुलाखत, अनुवाद, संकलन आणि फोटो उत्तम.

वेल्लाभट's picture

11 Mar 2016 - 3:45 pm | वेल्लाभट

स्वप्न आहे हे !

अशाच एका मुलीचा एक ब्लॉग आहे, शिव्या नाथ नाव तिचं. वेडी माणसं; खरंच.

पद्मावति's picture

11 Mar 2016 - 3:56 pm | पद्मावति

सात खंड फिरण्याचा, अनुभवण्याचा आनंद काही वेगळाच.
मुलाखत आणि अनुभव कथन प्रचंड आवडलं मधुरा.

पैसा's picture

11 Mar 2016 - 10:36 pm | पैसा

भन्नाट अनुभव!

जुइ's picture

1 Apr 2016 - 12:11 am | जुइ

आसावरीची भ्रमंती खूपच भावली. नुसती भटकंती करायची इच्छा असने आणि करुन दाखवने यात खूप फरक आहे. मधुरा आणि इडली डोसा मुलाखत खूप आवडली. travel

श्रीरंग_जोशी's picture

1 Apr 2016 - 1:03 am | श्रीरंग_जोशी

या पर्यटन तपस्येला दंडवत.

एवढ्या कमी वयात एवढं सारं पर्यटन केलेली भारतीय व्यक्ती (अतीश्रीमंत किंवा कामाच्या स्वरुपामुळे फिरू शकणारी सोडून) प्रथमच पाहिली. पर्यटनाची आवड असणार्‍या माझ्यासारख्यांसाठी खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व.

उत्तरांमधली थोडक्यात पण नेमकी माहिती व सहजपणा खूप आवडला.

यापुढील पर्यटन कामगिरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

अवांतर - वर वर्णन केलेल्या बंजी जंपींगसारखाच पण थोडा कमी तीव्रतेचा अनुभव मी कोलोरॅडोतील स्काय कोस्टर राइडदरम्यान घेतलाय.

ही मुलाखत इथे प्रकाशित करण्यासाठी कष्ट घेणार्‍या इडली डोसा व मधुरा यांचेही आभार.

कवितानागेश's picture

2 Apr 2016 - 4:06 pm | कवितानागेश

हा धागा शांतपणे वाचायला राखून ठेवला होता.
किती छान अनुभव .
शब्दांकनही सुरेख.