नमस्कार मंडळी,
शशक आणि श्री गणेश लेखमालेनंतर आलेली विज्ञान लेखमालादेखील मिपाच्या सिद्धहस्त लेखकांनी आणि उत्साही वाचकांनी यशस्वी केली. बघता बघता विज्ञान लेखमालेचा शेवटचा लेखदेखील काल प्रकाशित झाला. आलेले लेख निवडताना आणि प्रकाशित करताना लेखकांच्या आणि विषयाच्या निवडीवर आमचा विश्वास तुमच्या प्रतिसादांनी सार्थ ठरवला.
तसं म्हटलं, तर विज्ञान हा एक किचकट, बोजड आणि अनेकदा सर्वसामान्यांच्या कक्षेपलीकडील विषय. राजकारण आणि खेळ-जगताइतक्या, या दुनियेतील घडामोडी, बातम्या नेहमीच लोकांपर्यंत पोहोचतातच असं नाही. या दुनियेत घडणारा प्रवास, लागणारे शोध यांची आपली एक गती असते. लांबून बघणार्या निरीक्षकाला त्या हत्तीची कधी शेपटी, कधी सोंड तेवढी अधूनमधून दिसणार. पण या लेखमालेच्या निमित्ताने अनेक लेखकांनी वेळ काढून अतिशय अभ्यासपूर्ण लेख सादर केले. त्यांची विषयाची निवड, त्यातला सखोल अभ्यास, जिज्ञासू नजर यांनी तो हत्ती आपल्यासमोर साकार केला. कक्षेपलीकडचं हे विज्ञान आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अत्यावश्यक भाग आहे. येता-जाता वापरात असणारं उद्वाहन (लिफ्ट) असो किंवा गुन्हे अन्वेषण विभागातलं डिजिटल फोरेन्सिक असो किंवा सरहद्दीवर आपल्या संरक्षणासाठी उभे ठाकलेल्या सक्षम सेनेची शक्ती असो.. अनेक रूपांनी, अनेकविध अंगांनी हा विज्ञान बटू आपलं विश्व व्यापून दशांगुळे उरला आहे. या सर्वच विषयांवर आणि कल्पनाही नव्हती अशा प्राण्यांचं वागणूकशास्त्र, स्पायडरगोट, पाण्याचं संवर्धन अशा पैलूंवरदेखील या लेखकांनी प्रकाश टाकला.
बोजड, किचकट ठरू शकणारा एक साहित्यप्रकार अतिशय रंजकरित्या आपल्यासमोर सादर केला गेला. या लेखकांचे आभार न मानता त्यांच्या ॠणातच आम्ही राहू इच्छितो.
आवाहनाचा धागा आल्यापासून मिपाकरांनी नेहमीप्रमाणेच खुल्या मनाने दाद आणि प्रोत्साहन देऊन आमचा आणि सहभागी लेखकांचा उत्साह वाढवला, त्याबद्दल त्यांचेही आभार. मिपा जितकं लेखकांचं, तितकंच दर्दी, जाणकार वाचकांचंदेखील आहे. लेखमालेतील धाग्यांवर येणारे प्रतिसाद, जिज्ञासू प्रश्न याची साक्ष देतात. काही जणांनी या उपक्रमाच्या स्वरूपाबद्दल, त्याच्या विषय-निवडीबद्दल आणि असलेल्या व्यापकतेबद्दल साशंकता व्यक्त केली होती. लेखमालेतील एकाहून एक सरस लेखांनी या सर्व शंकांचं निरसन केलं असेल, असं आम्ही मानतो. त्या शंकांचा विचार करुन, त्यानुसार लेखमालेचं स्वरूप आणखी प्रगल्भ करण्यास आम्हाला मदतच झाली. अजूनही काही शंका असतील तर ती जबाबदारी आमच्या आयोजनाची, लेखकांनी त्यांचं २००% योगदान दिलेलं आहे.
लेखमालेचं अनुरूप जाहिरात बॅनर आणि मुखपृष्ठ हेमांगी के आणि आपल्या 'स्पेस जंक' लेखाचे लेखक Keanu या दोघांनी मिळून बनवून दिलं. त्या मुखपृष्ठाने लेखमालेला शोभा आली. या कल्पक बॅनर आणि मुपृबद्दल त्या दोघांचे आभार मानावे तितके कमीच.
या आणि पडद्यामागच्या अशाच अनेक हातांनी लेखमाला आकारास आली आणि तुम्ही तिला साजिरं करून घेतलंत.
मिपकरांच्या जिवावर आणखी एक यशस्वी उपक्रम राबवल्याचं समाधान पदरी घेऊन आज लेखमालेचा समारोप करतो. पुन्हा लवकरच येऊ, मराठी दिनाची मेजवानी घेऊन!!
प्रतिक्रिया
4 Feb 2016 - 12:22 am | एस
या लेखमालेची संकल्पना मांडणारे, त्यास पाठिंबा देणारे, लेखमाला यशस्वी व्हावी म्हणून झटणारे आणि सोबतच सर्व लेखक आणि वाचकवर्ग या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
4 Feb 2016 - 12:31 am | यशोधरा
या लेखमालेची संकल्पना मांडणारे, त्यास पाठिंबा देणारे, लेखमाला यशस्वी व्हावी म्हणून झटणारे आणि सोबतच सर्व लेखकवर्गाचे अतिशय उत्तम असा माहितीचा खजिना आमच्यासाठी घेऊन येण्यासाठी मनःपूर्वक आभार!
4 Feb 2016 - 11:52 am | स्वच्छंदी_मनोज
हेच म्हणतो.
4 Feb 2016 - 12:46 am | उगा काहितरीच
अरे ! संपली पण ? रच्याकने जे रिजेक्ट झालेले लेख होते ते लेखकांनी टाकावेत .
4 Feb 2016 - 6:49 am | अजया
कोणाचेच लेख रिजेक्ट झालेले नाहीत :)जे आले ते सर्व प्रकाशित केले गेले आहेत.
4 Feb 2016 - 3:03 am | ओसु
एकूणच सुंदर मालिका. बरेच वेगळ्या विषयांवरचे लेख वाचायला मिळाले.
सर्व लेखकांचे आभार आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक..तसेच ज्यांनी हि संकल्पना राबविली त्याबद्दल धन्यवाद.
एकंदरीतच अशा वेगवेगळ्या विषयांमुळे / लेखांमुळे, मिसळपाव सतत वाचावेसे वाटते.
जियो मिपा !!!
4 Feb 2016 - 8:38 am | नाखु
ज्ञात अज्ञात मदत हातांचे,सहभागींचे आणि रसीक मायबाप वाचकांचे (अगदी कुस्ती-आखाडा लिखाण सप्ताहात) विज्ञान लेख येऊनही (का त्या मुळेही ?) आवर्जून हजेरी लावली गेली. काही प्रतीसाददेखील माहीतीपुर्ण आणि रोचक होते.
एकूणच बहुरंगी संकल्पना शिकत शिकत तरीही दृढपणे राबविणार्या साहित्य संपादकांचे अभिनंदन व पुढील संकल्पास शुभेच्छा.
वाचक नाखु
आसन क्र १०१५
4 Feb 2016 - 8:59 am | एक एकटा एकटाच
संपादक मंडळाचे आणि लेखकांचे मनपुर्वक आभार......
4 Feb 2016 - 9:11 am | नरेंद्र गोळे
मिसळपावची ही अभिनव संकल्पना आवडली.
4 Feb 2016 - 11:38 am | शान्तिप्रिय
अरेरे! इतक्या लवकर संपली?
"स्वप्नातल्या कळ्यांनो उमलु नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा " या कवितेप्रमाणे अपूर्ण राहिल्यासारखी
वाटली ही लेखमाला.
तरिहि मला लेखनास संधी दिल्याबद्दल मिपाचे शतशः आभार.
वाचकांचे आभार . सुंदर लेख सादर केल्याबद्दल लेखकांचे अभिनंदन .
मला खात्री आहे की ही लेखमाला दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात असेल.
सर्व वाचकांना पुढील वर्षांत या लेखमालेत लेख सादर करण्याचे मी आवाहन करतो.
4 Feb 2016 - 11:38 am | सुधांशुनूलकर
एकूण ही लेखमाला छान झाली. वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिले, काहींनी प्रतिसाद दिले नसतीलही, त्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
अशा लेखमालांसाठी मिपाकरांकडून माझ्या आणखी थोड्या अपेक्षा आहेत -
१. लेखन सहभाग - मिपाकर जगभर पसरले आहेत, विविध कार्यक्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्या मानाने लेखन सहभाग वाढायला हवा.
२. मिपाकरांच्या सूचना - श्री गणेश लेखमाला आणि विज्ञान अशा दोन लेखमाला पार पडल्या, आता मराठी भाषा दिनानिमित्त लेखमाला होणार आहे. असेच आणखी विषय, अभिनव कल्पना साहित्य संपादक मंडळाला सुचवा. जमल्यास, त्यासाठी लेखकही सुचवा.
सर्वांचा सर्व बाबतीत सहभाग वाढला, तर लेखमाला (आणि एकूणच मिपा) नक्कीच अधिक सकस होईल.
मिपाकरांच्याअधिकसहभागाचीअपेक्षाकरणारा
सर्वांचाच
सुधांशुनूलकर
4 Feb 2016 - 12:47 pm | अजया
सहमत आहे.
आपल्याला मिपाकडून काय उपक्रम झालेले आवडतील, आपल्या कल्पना यांचे सासंमं मध्ये नक्की स्वागत असेल.कोणाला स्वेच्छेने पुढाकार घेऊन काही नवी योजना राबवावीशी वाटत असेल तरी साहित्य संपादक आय डीला व्यनि करुन जरुर संपर्क साधावा.येत्या वर्षभरात निरनिराळे उपक्रम, लहान मोठे होणार आहेत.सर्वांच्या उत्साही सहभागाच्या प्रतीक्षेत मिपा आहे.
याचबरोबर काही त्रुटी आढळल्यास त्यादेखील जरुर कळवाव्या.पुढच्या वेळेस त्या सुधारून घेता येतील.
4 Feb 2016 - 11:45 am | मृत्युन्जय
लेखमाला खुपच सकस होती. सर्व लेखकांचे लेख उत्तम होते. सगळ्याच धाग्यांवर प्रतिक्रिया दिल्या गेल्या नाहित. मात्त्र लेख वाखाणण्याजोगे होते.
ही लेखमाला जाहीर झाली तेव्हा त्याच्या यशस्वितेबद्दल मला थोडी शंका होती. असे वाटले की लोकांना विषय झेपतील की नाही. लेख रटाळ तर होणार नाहित ना. पण तसे कही झाले नाही. ही लेखमाला दृष्ट लागण्याजोगी झाली.
सर्व लेखकांचे , संपादकांचे, ही कल्पना मांडाणार्यांचे आणि ती यशस्वी करुन दाखवणार्या सर्वांचे आभार आणी अभिनंदन
4 Feb 2016 - 11:55 am | पिलीयन रायडर
उत्तमच झाली ही लेखमाला!! सर्वांचे अभिनंदन आणि आभार!
यत्र तत्र सर्वत्र हेमांगीचे विशेष अभिनंदन!
4 Feb 2016 - 11:59 am | संदीप डांगे
अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही... असे वाटायला लावणारी लेखमालिका. सर्वांचे शतशः आभार. काही लेख खरंच परत परत वाचावेसे वाटतात. पुढच्या संस्करणाची वाट पाहतो.
4 Feb 2016 - 12:44 pm | विवेक ठाकूर
घासकडवींनी समारोप केला की काय!
5 Feb 2016 - 2:11 pm | ज्ञानोबाचे पैजार
लेखमाला फारच वाचनीय झाली. वेगवेगळे विषय ज्याची कल्पना देखिल कधी केली नव्हती अशा विषयांवरचे लेख आणि ते देखिल मराठीतुन वाचायला मिळाले.
वर बर्याच जणांनी म्हटले आहे तशी थोडक्यात उरकलेली वाटली.
अजून वाचायला आवडले असते.
आता प्रतीक्षा आता मराठी भाषा दिनानिमित्त होणार्या लेखमालेची.
पैजारबुवा,
5 Feb 2016 - 2:41 pm | नीलमोहर
आज सकाळीच विचार करत होते विज्ञान लेखमालेतील नवीन लेख का दिसत नाहीत, हे आत्ता कळलं, असो.
लेखमालेतील अभिनव विषयांवरील सर्वच लेख उपयुक्त आणि अत्युत्कृष्ट आहेत.
लेखकांचे आभार ..तसेच ज्यांनी ही संकल्पना राबवण्यात हातभार लावला त्या सर्वांना धन्यवाद.
5 Feb 2016 - 9:39 pm | किलमाऊस्की
लेखमाला छान झाली. उत्तम लेख वाचायला मिळाले. सासं व लेखमालिका यशस्वीरित्या राबवणार्या सर्वांचे अभिनंदन. बर्याच लेखकांनी विज्ञान अतिशय सोप्या व समजेल अशा भाषेत मांडलं. विज्ञानात फारशी रुची नसलेल्या माझ्यासासख्या वाचकांना वाचायला आवडेल अशी मालिका. #मराठीभाषादिनलेखमालिकेच्याप्रतिक्षेत
5 Feb 2016 - 10:24 pm | भाते
मिपा संपादक मंडळ आणि विज्ञान लेखमालेतल्या सर्व लेखकांचे आभार. प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देणे जमले नसले तरी लेखमालेतले सगळे लेख वाचले. बरीच नविन माहिती मिळाली.
माझे शालेय शिक्षण पुर्णपणे मराठी माध्यमातुन झालेले असल्याने आणि पुढे वाणिज्य शाखेकडे वळल्याने माझा आणि गणित / विज्ञानाचा ३६ चा आकडा. त्यातुन आजांवरचे विज्ञान विषयातले बहुतेक सगळे लेख अगम्य इंग्रजीत असल्याने मला त्यातले ओ कि ठो समजत नाही. मिपावर ते सर्व सहज सोप्या मराठीत वाचायला मिळाल्यामुळे माझ्या अल्पश्या ज्ञानात थोडीशी भर पडली.
7 Feb 2016 - 2:04 pm | मुक्त विहारि
काही लेखांना वाचनखूण साठवायची सोय न्हवती.
त्यामुळे सगळ्या लेखांची लिंक देत आहे. (सुदैवाने, ह्या लेखाला "वाखूसा"ची सोय असल्याने.एकाच वाखूसात ९ लेखांची सोय झाली.)
१. विज्ञान लेखमाला : ०१ : डिजिटल फोरेन्सिक
लेखक Jack_Bauer
http://www.misalpav.com/node/34642
२. विज्ञान लेखमाला : २ : स्पेस जंक
लेखक : Keanu
http://www.misalpav.com/node/34652
३. विज्ञान लेखमाला : ०३ : प्राण्यांच्या वागणुकीचं शास्त्र – इथॉलॉजी
लेखक : सुधांशुनूलकर
http://www.misalpav.com/node/34577
४. विज्ञान लेखमाला : ०४ : 'फ्रेंडली नेबरहुड स्पायडरगोट'
लेखक : राजेश घासकडवी
http://www.misalpav.com/node/34588
५. विज्ञान लेखमाला : ०५ : एका ढिश्क्यांवची कहाणी
लेखक : सोन्याबापु
http://www.misalpav.com/node/34511
६. विज्ञान लेखमाला : ०६ : प्रोजेक्ट शेड बॉल्स !!
लेखक : सुहास झेले
http://www.misalpav.com/node/34490
७. विज्ञान लेखमाला : ७ : उद्वाहनपुराण
लेखक : शान्तिप्रिय
http://www.misalpav.com/node/34506
८. विज्ञान लेखमाला : ०८ : पाण्याच्या प्रावस्था (फेजेस)
लेखक : नरेंद्र गोळे
http://www.misalpav.com/node/34122
९. विज्ञान लेखमाला : ०९ : किस्से वैज्ञानिकांचे..
लेखक : सुधांशुनूलकर
http://www.misalpav.com/node/34505
सर्व लेखकांना नम्र विनंती की, त्यांनी आता ह्या एकाच लेखावर न थांबता, आपापल्या विषयांवर एक "लेखमाला" लिहिलीत तर फार उत्तम.
(हावरा वाचक) मुवि
7 Feb 2016 - 2:39 pm | पिलीयन रायडर
Thank you kaka!!