ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू

मोदक's picture
मोदक in दिवाळी अंक
5 Nov 2015 - 10:56 pm

.
.

*******************************************************************

ही कथा आहे अपहरण झालेल्या एका विमानाची..
दोनशे छप्पन्न प्रवाशांची..
बारा विमान कर्मचार्‍यांची..
दहा दहशतवाद्यांची..
दोनशे ऐंशी इस्रायली जवानांची..
हजारो युगांडन सैनीकांची..
जगातल्या प्रत्येक देशाची, त्यांच्या पंतप्रधानांची, त्यांच्या प्रजेची..

ही कथा आहे एका झंझावाताची..
एजा अत्यंत गुप्त कारवाईची..
शिस्तीची, गोंधळाची, शौर्याची, भेकडपणाची, लाचारीची, मग्रूरीची, यशाची आणि पराभवाची..

एका आठवड्यात घडलेल्या नाट्याची..!!!!

--- अनंत सामंत ('किबुत्झमधला डॅनी इथे आला होता' या पुस्तकातून..)

*******************************************************************

.

"धिस इज युवर न्यू कॅप्टन स्पीकिंग, द प्लेन हॅज बीन हायजॅक्ड..!!!!"

हे वाक्य स्पीकरवर उच्चारले गेले आणि प्रत्येक प्रवासी भीतीने हादरला..

फ्लाईट १३९, तेल-अवीवहून पॅरिसला जाणार्‍या एअर फ्रान्सच्या विमानाने अथेन्स येथे नेहमीचा थांबा घेतला, काही नवीन प्रवासी पॅरिसला जाण्यासाठी विमानात चढले. नेहमीचे सोपस्कार पार पाडून विमानाने उड्डाण केले. उड्डाण करून स्थिरस्थावर होत असतानाच अचानक गडबड उडाली. फर्स्ट क्लासमधले दोन जण - एक पुरुष व एक स्त्री तर इकॉनॉमी क्लासमधले दोन पुरुष जागेवरून उठले व विमानाच्या पुढच्या भागाकडे धावू लागले. त्यातील दोघे जण कॉकपीटकडे गेले, त्यांनी कॅप्टनच्या कानाजवळ बंदूक टेकवली व विमान ताब्यात घेतल्याची घोषणा केली. बाकी दोघे जण प्रवाशांजवळच थांबले. पिन काढलेल्या हँड ग्रेनेड्सची आणि बंदुकांची दहशत विमानामध्ये पसरली.

आपले अपहरण झाले आहे हे लक्षात येत असतानाच प्रवाशांना स्पीकरवरील घोषणा ऐकू आली.

"धिस इज युवर न्यू कॅप्टन स्पीकिंग, द प्लेज हॅज बीन हायजॅक्ड."

विमानामध्ये थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २५६ प्रवासी होते. अपहरणकर्ते कोण आहेत.. त्यांच्या मागण्या काय असतील.. आपल्याला जगाच्या पाठीवर कोणत्या देशात नेले जाईल.. आपले सरकार मदत करेल का.. या व अशा प्रकारच्या उत्तरे माहीत नसलेल्या प्रश्नांच्या काळजीमध्ये प्रवासी बुडून गेले.

दहशतवाद्यांनी सर्वप्रथम विमानाची संपूर्ण संपर्कयंत्रणा बंद करून जगाशी संपर्क तोडला, विमानामध्ये असलेल्या प्रवाशांवर व मुख्यत: कॉकपीटवर नियंत्रण प्रस्थापित केले.

फ्लाईट १३९ची शांतता सर्वप्रथम टिपली ती इस्रायलच्या गुप्तहेर यंत्रणांनी. त्यांनी तत्काळ पंतप्रधान यित्झॅक राबीन यांना सावध केले. "बहुतांश इस्रायली प्रवासी असलेल्या एअर फ्रान्सच्या विमानाचा संपर्क तुटला असून ते कोसळल्याची किंवा त्याचे अपहरण झाल्याची शक्यता आहे."

यित्झॅक राबीन यांना 'मेसेज' मिळाला तो क्षण..

.

राबीन यांनी तत्काळ पावले उचलली. "जर हे अपहरण असेल, तर सर्व प्रकारची माहिती मिळवा" असे स्पष्ट आदेश दळणवळण मंत्री गिड याकोबी यांना दिले. विमानाची सद्य:स्थिती व शक्य असेल ती सर्व माहिती पंतप्रधानांना व सैन्याधिकार्‍यांना कळवत राहण्याची सूचना दिली, सर्व इस्रायली विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट जाहीर केला आणि विमान इस्रायलमध्ये परत आले तर तयारी असावी म्हणून इस्रायली सैन्याच्या स्पेशल युनिटला कोणत्याही क्षणी हल्ला करण्यास तयार राहण्याचे आदेश दिले.

इकडे विमानात शांतता पसरली होती. जीवघेणी शांतता.

'पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ द पॅलेस्टाईन'च्या दोन आणि जर्मन क्रांतिकारकांच्या दोन अशा चार दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले आहे, हे कळल्यावर प्रत्येक प्रवासी मुळापासून हादरला. त्यातही ज्यू प्रवाशांना PFLPचे नाव ऐकून धडकी भरली. PFLPने या आधी पार पाडलेली क्रूर दहशतवादी कृत्ये कोणीही विसरणे शक्य नव्हते. इस्रायलमधील लॉड विमानतळावरचे हत्याकांड आणि म्युनिक ऑलिंपिकमध्ये केलेले ११ खेळाडूंचे शिरकाण यातून अजून इस्रायल सावरत असतानाच हे नवीन संकट कोसळले होते.

सर्व प्रवासी बदललेल्या घटनांशी स्वतःला हळूहळू जुळवून घेत होते. दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले आहे हे एव्हाना प्रवाशांना कळून चुकले होते. काहीतरी चूक असेल, एखाद्याने केलेली जीवघेणी फजिती, एखादे नको असणारे स्वप्न वगैरे सर्व शक्यता निकालात निघाल्या आणि आता आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्यास प्रवासी सज्ज झाले. दहशतवाद्यांनी प्रवाशांची झडती घेणे सुरू केले. कोणाकडे प्रतिकार करण्याजोगे काही असेल आणि त्याचा आपल्याविरूद्ध वापर होऊ शकतो, असे सगळे सामान प्रवाशांकडून काढून घेतले गेले. प्रवाशांकडे असलेले काटे-चमचेही काढून घेण्यात आले.

थोड्या वेळाने दहशतवाद्यांनी एका मोठ्या पिशवीमध्ये सगळ्यांचे पासपोर्ट जमा करण्यास सुरूवात केली. पासपोर्टचा वापर करून प्रवाशांना वेगळे करणे सोपे जाणार होते.

दहशतवाद्यांनी विमान लिबियाकडे वळवले. सर्व काही माहीत असल्याप्रमाणे फ्लाईट १३९चे स्वागत करण्यास बेनगाझी विमानतळ सज्ज होता. त्यांनी विमानाला उतरण्याचा मार्ग दाखवला, दूरवरच्या प्रवासासाठी विमानात पेट्रोल भरले. दहशतवाद्यांनी बेनगाझी कंट्रोल टॉवरमधील अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि पुढील प्रवासासाठी विमान सज्ज झाले.

विमान लिबियाकडे जाताना विमानात आणखी एक नाट्य घडत होते, अपहरणातील अनिश्चितता सहन न होऊन 'पॅट्रिशिया मार्टेल' या ब्रिटिश प्रवासी महिलेने रक्तदाब आणि गर्भवती असताना होणारा रक्तस्राव अशा गंभीर लक्षणांची बतावणी केली. एकंदर गुंतागुंतीच्या लक्षणांमुळे अपहरणकर्त्यांनी बेनगाझी येथे पॅट्रिशियाची सुटका केली.

विमानाने पुन्हा उड्डाण केले. अपहरणकर्ते सोडले, तर कुणालाही माहीत नव्हते की आपण कोठे चाललो आहोत.

ब्रिटिश नागरिक असली, तरी पॅट्रिशिया मूळची ज्यू होती. एका खास विमानाने लंडनला येईपर्यंत कोणतीही माहिती देण्यास नकार देणार्‍या पॅट्रिशियाने लंडनला उतरल्यानंतर स्कॉटलंड यार्डसमोर दहशतवादी आणि विमानाची परिस्थिती विस्तृतपणे विशद केली. प्रवाशांची एकंदर मन:स्थिती आणि बेनगाझीवरची तयारी याचेही वर्णन केले आणि एक अंदाज वर्तवला की विमान मध्य आफ्रिकेमध्ये कुठेतरी इस्रायलविरोधी राष्ट्राचा आसरा घेईल.

यथावकाश राबीन यांनी इस्रायलच्या पार्लमेंटमध्ये अपहरणाची माहिती दिली. अनेक देशांचे नागरिक विमानामध्ये असले, तरी इस्रायल हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे व इस्रायल आपल्या पद्धतीने दहशतवाद्यांशी सामना करेल असेही सांगितले.
राबीन यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते 'मेनाकिम बेगीन' उभे राहिले व त्यांनी राबीन यांच्या सरकारला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला. "ही वेळ राजकारण करण्याची नाहीये, तर आलेल्या अवघड संकटाला सर्वांनी मिळून तोंड द्यायचे आहे" अशा शब्दात त्यांनी राबीन यांना आश्वस्त केले.

एव्हाना या अपहरणाची बातमी जगभर पसरली होती. डझनभर देशांचे नागरिक या विमानातून प्रवास करत असल्याने त्या त्या देशांचे सरकार पुढची पावले काय उचलायची यावर विचारविनिमय करू लागले. दहशतवाद्यांच्या मागण्यांची वाट पाहू लागले.

आपले अपहरण झाले आहे हे प्रवाशांनी मान्य केले होते व परिस्थितीला सध्या तरी शरण गेले होते. अपहरणकर्त्यांचे आदेश मान्य करत आपापल्या कुटुंबीयांची काळजी करत प्रवासी झोपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अनिश्चितता आणि बंदुका-ग्रेनेडच्या धाकामुळे सहज झोप येणेही शक्य नव्हते. बराच वेळ विमान उडत होते. लिबियाहून टेकऑफ घेतलेले विमान एकदाचे एंटबेला पोहोचले.

एंटबे, युगांडा, पूर्व अफ्रिका. क्रूरकर्मा इदी अमीन येथे सत्तेवर होता.

.

आपल्याच देशाच्या जवळजवळ ३ लाख नागरिकांची निर्घृण हत्या करून इदी अमीनने सत्ता बळकावली होती. इस्रायलचे एकेकाळचे मित्रराष्ट्र असलेले युगांडा आता मात्र इस्रायलचे कट्टर शत्रुराष्ट्र होते. युगांडाच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यापासून ते लष्करी विमानतळ उभारणीपर्यंत अनेक कामे इस्रायलने पार पाडली होती. अनेक परस्पर गरजांच्या पायावर उभ्या राहिलेल्या या मैत्रीचा शेवट झाला १९७२मध्ये, जेव्हा इस्रायलने युगांडाला जेट विमाने देण्यास नकार दिला. मैत्री संपुष्टात आल्यानंतर युगांडामधले इस्रायली तळ हलवण्यात आले.

एंटबेला युगांडाचे सैनिक विमानाची वाटच पाहत होते. विमान उतरल्यानंतर PFLPचे आणखी दहशतवादी विमानातील दहशतवाद्यांना मिळाले. या संपूर्ण विमानप्रवासामध्ये शिणलेल्या दहशतवाद्यांना थोडी उसंत मिळाली. प्रवाशांना फार थोडी उत्तरे मिळाली होती. तसेच नवीन प्रश्नही तयार होत होते. "एंटबे, युगांडा हे जगाच्या नकाशावर नक्की कोठे आहे?"पासून ते "इदी अमीन आपल्याला कधी ठार मारणार?" पर्यंत प्रश्नांचा परीघ तयार झाला होता आणि आता तो वाढतच चालला होता.

एंटबेला विमान उतरले आहे हे कळताक्षणी इस्रायली गुप्तहेर सतर्क झाले. कितीही म्हटले तरी युगांडाशी त्यांचा खास ऋणानुबंध होता. इस्रायल-इदी अमीन मैत्रिपर्वामधे इस्रायली सैन्याने आणि गुप्तहेरांनी युगांडामध्ये बराच काळ घालवला होता. मात्र सद्य:स्थितीचा विचार करायचा, तर इस्रायली सैन्याला आणि गुप्तहेरांना युगांडामधून बाहेर पडून तब्बल तीन वर्षे उलटली होती.

पंतप्रधान राबीन यांनी सर्वप्रथम पांच इस्रायली नेत्यांचा एक टास्क फोर्स स्थापन केला. त्यामध्ये होते स्वत: राबीन, सैन्यदलप्रमुख मोर्देचाय गुर, हवाईदलप्रमुख बेनी पेलेद आणि असेच महत्त्वाच्या पदांवरचे अधिकारी. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय राखून येणार्‍या माहितीचा ओघ सुसूत्रित करण्याची जबाबदारी दिली. लष्कराला एखादी कारवाई शक्य आहे का याची चाचपणी करण्याची सूचना दिली. परराष्ट्रखाते आणि त्यासंबंधी अधिकार्‍यांना अपहरणकर्त्यांशी बोलणी करण्याची तयारी करण्यास सांगितले.

या टास्क फोर्समध्ये असलेला प्रत्येक जण स्वतः एक दंतकथा होता. इस्रायलच्या स्थापनेपासून प्रत्येक युद्धामध्ये पराक्रम गाजवलेले स्वतः पंतप्रधान राबीन असोत वा स्वतः बेनी पेलेद. प्रत्येकाने इस्रायलच्या उभारणीमध्ये अजोड कामगिरी केली होती. अत्यंत मोक्याच्या क्षणी अत्यंत थंड डोक्याने योग्य निर्णय घेणार्‍या बेनी पेलेद यांची टास्क फोर्समध्ये निवड होणे साहजिकच होते आणि त्याला कारणीभूत होती एक अविश्वसनीय घटना...

यॉम किप्पूर युद्धादरम्यान बेनी पेलेद एका पत्रकार परिषदेमध्ये हवाईदलाची एकंदर कामगिरी सांगत असताना त्यांच्या साहाय्यकाने एक बातमी आणून दिली. बेनी पेलेद यांनी ती बातमी वाचली व जाहीर केले की "आताच हाती आलेल्या बातमीनुसार आपले आणखी एक विमान सीमेपलीकडे विमानविरोधी तोफांना बळी पडले आहे"
नंतर अर्धा-पाऊण तास पत्रकारांच्या चिकित्सक प्रश्नांना शांतपणे उत्तरे देऊन झाल्यानंतर पत्रकार परिषद संपली व बेनी पेलेद यांचा एक पत्रकार मित्र त्यांना भेटायला आला. ख्यालीखुशाली विचारल्यानंतर त्याने पेलेद यांच्याकडे चौकशी केली की त्या बळी पडलेल्या विमानाच्या पायलटचे नाव कळले आहे का? अत्यंत शांतपणे व तोल ढळू न देता पेलेद यांनी सांगितले की "हो. नाव कळले आहे. तो माझा मुलगा होता"

(पेलेद यांच्या मुलाने जळत्या विमानातून सुरक्षितपणे जमिनीवर उडी मारली व दिवसभर शत्रुसैन्याला झुकांडी दिली. त्यानंतर काही तासांनी इस्त्रायली सैन्याच्या एका तुकडीने त्याला सीमेपलीकडून उचलले व इस्त्रायली भूमीवर सुखरूप आणले.)

इस्रायली लष्कराने इदी अमीन, एंटबे आणि अपहरणकर्ते व त्यांची संघटना यांबाबत शक्य तितकी माहिती काढण्यास सुरूवात केली.

इस्रायल-युगांडा मैत्रिपर्व सुरू असताना इस्रायली लष्करानेच एंटबे विमानतळाची अनेकवेळा डागडुजी आणि अनेक ठिकाणी बांधकाम केले होते. 'सोलेल अँड बोनेह' या इस्रायली कंपनीने कित्येक इमारती बांधल्या होत्या. त्या बिल्डिंगचे नकाशे आणि आराखडे कांही तासातच मिळाले.

पॅट्रिशिया मार्केल, बिल्डिंगचे आराखडे, सुटका झालेले प्रवासी या सर्वांकडून माहितीचा ओघ सुरू होता. जगभरात जेथे जेथे माहिती मिळण्याची शक्यता होती, तेथे इस्रायली तुकड्या पोहोचल्या होत्या आणि माहिती मिळवून शक्य त्या मार्गाने इस्रायलमध्ये पोहोचवली जात होती.

एका इस्रायली एजंटने ओळख बदलून आणि विमानामध्ये बिघाड झाल्याची बतावणी करून एंटबेवर अनेक चकरा मारल्या व बहुमूल्य असे फोटो मिळवले.

वाटाघाटी करण्यासाठीही इस्रायलचे परराष्ट्रमंत्री आणि अनेक उच्चाधिकारी यांची एक टीम तयार केली गेली. त्या टीमलाही लष्कराच्या हालचालींचा सुगावा लागू दिला गेला नाही.

वाटाघाटींचा एक भाग म्हणून इदी अमीन यांचा इस्रायली सल्लागार आणि सध्या निवृत्त असलेल्या कर्नल बारलेव्ह यांच्यावर इदी अमीनशी बोलण्याची आणि त्याचे मन वळवून प्रवाशांच्या सुटकेची मागणी करण्याची जबाबदारी सोपवली.

दहशतवाद्यांनी आपल्या मागण्या जाहीर केल्या.

५ मिलियन डॉलर्स आणि त्रेपन्न दहशतवाद्यांची सुटका. यातले ४० दहशतवादी इस्रायलच्या ताब्यात होते.

पंतप्रधान राबीन यांनी लष्करी आणि राजकारणी या दोन्ही मार्गांची तयारी सुरू केली, त्यालाही एक कारण होते. दहशतवाद्यांशी कसा सामना करायचा याबाबतही इस्रायलमध्ये मतभेद होत होते. एक फळी म्हणत होती दहशतवाद्यांशी वाटाघाटी करू या, बोलणी करून यातून मार्ग निघेल. लष्करी फळीचे मात्र याबाबत एकच ठाम मत होते. दहशतवाद्यांना इशारा द्यायचा असेल तर लष्करी कारवाई हा एकमेव मार्ग आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई झालीच पाहिजे यामध्ये सैन्याधिकार्‍यांचे एकमत होते. अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवरून विविध प्रकारचे कारवाईचे मनसुबे आखले जात होते. त्यामध्ये योग्य ते बदल करून असे आराखडे संरक्षणमंत्री आणि पंतप्रधाना यांना दाखवले जात होते. मात्र नेमके तपशील मिळाल्याशिवाय आणि त्यांचा कसून सराव झाल्याशिवाय कोणत्याही कारवाईला परवानगी मिळणार नाही, असे पंतप्रधान राबीन यांनी बजावले.

एंटबेवर असलेल्या प्रवाशांवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. इतक्या लांब कोणतीही लष्करी कारवाई शक्य नाही ही वस्तुस्थिती होती आणि याची सर्व प्रवाशांना स्पष्ट कल्पना होती. आता एखादा चमत्कारच आपल्याला वाचवू शकेल अशी स्वत:ची समजूत घालून घेऊन प्रवाशांनी स्वत:ला नियतीच्या स्वाधीन केले होते.

सर्व प्रवाशांना जुन्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये ठेवले होते. एकत्र. कसेही. पुढे काय होणार हा यक्षप्रश्न घेऊन जीवनमरणाच्या सावलीमध्ये हे प्रवासी दिवसभर पडून राहत होते. रिकामा वेळ, अपहरणकर्त्यांचा धाक आणि ताणतणाव यामुळे अनेक प्रवासी आजारी पडत होते. एंटबे विमानतळावरील डॉक्टर शक्य होईल तितके उपचार करत होते. मात्र त्यालाही मर्यादा होतीच!

दिवसाच्या कोणत्याही वेळी अचानक सैनिकाची धावपळ उडे, शांतता पसरे व बिग डॅडी - काळाकभिन्न महाकाय इदी अमीन प्रवाशांना भेटायला येई.. प्रवाशांच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय मदत करता येईल हे जाणून घेण्यासाठी आणि त्याची माहिती जगभरतात पोहोचवण्यामध्ये इदी अमीन तत्पर पावले उचलत होता. मात्र दहशतवाद्यांच्या व त्याच्या मैत्रिपूर्ण संबंधांवर बोलताना अत्यंत सावधपणे व वेळप्रसंगी विषय बदलून वेळ मारून नेत होता. एंटबेला उतरल्यानंतर दुसर्‍याच दिवशी एक बातमी प्रवाशांमध्ये पसरली. आता कोंडी फुटायला सुरूवात होईल या आशेने अनेक प्रवाशांना हायसे वाटले. अपहरणकर्त्यांनी ४७ प्रवाशांना सोडण्याची तयारी दाखवली. तिसर्‍याच दिवशी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १०० प्रवासी सोडले गेले. आता दहशतवाद्यांच्या आणि युगांडन सैनिकांच्या ताब्यात फक्त इस्रायली नागरिक होते.

या दरम्यान एअर फ्रान्सच्या वैमानिकाने - कॅप्टन मायकेल बाकोसने एक धाडसी निर्णय घेतला. "सुटका न झालेले इस्रायली नागरिक हे एअर फ्रान्सचे प्रवासी असल्याने त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही एंटबेहून परत जाऊ शकत नाही" असे सांगून इतर प्रवाशांसोबत जाण्यास नकार दिला. कॅप्टन बाकोसच्या सर्व सहकार्‍यांनी एकजूट दाखवत या निर्णयाला पाठिंबा दिला.

ज्यू प्रवासी आता जुन्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये एकाच भल्यामोठ्या दालनामध्ये कसेही विखुरले गेले होते. अनेक प्रवाशांना हगवण, डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास होत होता. विचित्र मन:स्थिती, गैरसोय आणि सवय नसलेले अन्न खाऊन बहुतेक जण आजारी पडले होते.

जुनी टर्मिनल बिल्डिंग

.

अचानक बातमी आली - इस्रायलने दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य केल्या! अनेक जण खूश झाले. आता आपण आपल्या कुटुंबीयांना भेटणार, आपण जिवंत राहणार, अपहरणकर्त्यांच्या धाकातून आपली सुटका होणार ही वस्तुस्थिती पचण्यास थोडा वेळ गेला. मात्र प्रवाशांमध्येच एक गट असाही विचार करत होता की "माझ्यामुळे इस्रायलला गुडघे टेकावे लागत आहेत." प्रवाशांमध्येही जणू वैचारिक युद्ध सुरू झाले होते.

त्या दिवशी संध्याकाळी इदी अमीनने प्रवाशांना भेटून बातमी दिली की "इस्रायलने अजून मागण्या मान्य केलेल्या नाहीत व आणखी दोन दिवसांमध्ये मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर अपहरणकर्ते काही प्रवाशांना ठार करतील."

अनेक जण रडू लागले. त्यांनी मनातच बांधलेले इमले धाडकन कोसळले. पुन्हा अनिश्चितता, पुन्हा बंदुकांचे धाक, ताणतणाव आणि मरणाची भीती.

या दरम्यान कधीतरी जेवताना डोरा ब्लॉक या ओलीस आजीबाईंच्या घशात घास अडकला. त्यांना कंपाला येथील इस्पितळात पुढच्या उपचरांसाठी हलवण्यात आले.

दहशतवादी आता विसावले होते. युगांडन सैनिक दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत करत होते.

कर्नल बारलेव्ह इदी अमीनसोबत बोलत होते, सुटकेसाठी आवाहन करत होते मात्र इदी अमीनवर कोणताही फरक पडत नव्हता.

इस्रायलच्या बाजूने वाटाघाटी करणार्‍यांनाही फारसे यश येत नव्हते. ४० दहशतवादी सोडले, तर एक एंटबे संपतासंपता असे अनेक एंटबे उभे राहतील.. त्या वेळी इस्रायल त्या परिस्थितीला कसे तोंड देणार याची कल्पनाही टास्क फोर्स करू शकत नव्हते.

इकडे इस्रायलची लष्करी आघाडीवर जय्यत तयारी सुरू झाली होती.

इस्रायली अधिकारी सर्व शक्यतांचा विचार करून लष्कराकडून सराव करून घेत होते. अनेक लष्करी अधिकार्‍यांकडून आलेले कारवाईचे आराखडे पंतप्रधानांच्या टास्क फोर्सने फेटाळल्यानंतर ब्रिगेडियर डॅन शॉमेरॉनने एक वास्तववादी आराखडा दिला.

इस्रायली हवाईदलाची चार C130 हर्क्युलस विमाने (यांना 'हिप्पो' असेही एक नाव आहे) इस्रायलहून उड्डाण करतील, लष्करी जीप आणि ट्रकचा एक ताफाही या विमानांमध्ये असेल. इस्रायलहून उड्डाण केल्यानंतर जमिनीलगत उड्डाण करून व शत्रुराष्ट्राच्या रडारना चकवा देऊन ही विमाने एंटबेला पोहोचतील. सोबत दोन बोईंग विमाने असतील, ज्यामध्ये एक असेल बेनी पेलेद यांचे कार्यालय. तर दुसर्‍या बोईंगमध्ये हॉस्पिटल तयार केले जाईल व एंटबे विमानतळावर होणार्‍या चकमकीमध्ये जखमींवर या विमानात उपचार होतील. इस्रायल ते युगांडा या गेलेल्या मार्गानेच विमाने परत येतील असेही ठरले. या कारवाईच्या आराखड्यासोबत अनेक नवीन प्रश्न उभे राहिले.

C130 हर्क्युलस - "हिप्पो"

.

तेल अवीव ते एंटबे विमानांचा मार्ग

.

तेल-अवीव ते एंटबे हे जवळजवळ २५०० मैलांचे अंतर आहे. आणि हा संपूर्ण मुलूख शत्रुराष्ट्रांनी व्यापलेला आहे. शत्रुराष्ट्रांच्या रडारना गुंगारा देऊन इतका मोठा प्रवास करणे आवश्यक होते. तेल अवीव-एंटबे-तेल अवीव एकून ५००० मैलांच्या प्रवासामध्ये वाटेत किमान एका ठिकाणी इंधन भरल्याशिवाय कोणतेही विमान इतका प्रवास करू शकत नाही. वाटेत इंधन कोठे घ्यायचे याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली.

एंटबे विमानतळाची सद्य:स्थिती आणि ओलिसांचा नक्की ठावठिकाणा आणखी एकदा पडताळून पाहण्यात आला.
एखाद्या विमानाची एंटबेला पोहोचताना होणारी नादुरुस्ती किंवा एंटबे विमानतळावर होणार्‍या हल्ल्यादरम्यान विमानाला काही झाले, तर राखीव म्हणून एक बोईंग कमांडो कारवाईदरम्यान आकाशात घिरट्या घालत राहील व वेळप्रसंगी एंटबेच्या विमानतळावर उतरेल, या विमानामध्ये हवाईदलप्रमुख बेनी पेलेद आणि त्यांचे निष्णात तंत्रज्ञ असतील, एंटबे विमानतळावर एकाच वेळी होणार्‍या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये संदेशवहन आणि समन्वय राखण्याचे काम बेनी पेलेद या राखीव बोईंगमधून करतील.

जनरल गुर ऑपरेशनचा आढावा घेताना..

.

या प्रस्तावाला मान्यता देण्याआधी पंतप्रधान राबीन आणि टास्क फोर्सने संपूर्ण ऑपरेशनची रंगीत तालीम करून दाखवण्याची अट घातली. इस्रायली इंजीनियर्सनी इस्रायलमध्येच जुन्या टर्मिनल बिल्डिंगची प्रतिकृती बनवली. इस्रायलच्या निष्णात वैमानिकांनी वाळूमातीच्या धावपट्टीवर कोणतेही लाईट नसताना विमान उतरवणे, कमीत कमी धावपट्टी वापरून उड्डाण करणे अशा अनेक चाचण्या लीलया पार पाडल्या. पंतप्रधान राबीन, जनरल गुर या सध्या राजकारणात असलेल्या, परंतु एकेकाळी आपल्या पराक्रमाने इस्रायलची मान उंचावणार्‍या कडव्या सैनिकांनी शक्य तितक्या ठिकाणी स्वत:चे शंकासमाधान करून घेतले, वेळप्रसंगी एखाद्या भागाचा आणखी सराव करून घेतला. टास्क फोर्ससमोर या कारवाईला हिरवा कंदील द्यायचा की नाही याची बैठक सुरू झाली. कागदावर आणि रंगीत तालमीमध्ये सर्वकाही नीट दिसत असले तरी प्रत्यक्षात तसेच सुरळीतपणे पार पडेल असे नसते. अचानक बदललेले हवामान, एंटबेवरील चकमकीदरम्यान विमानाची सुरक्षितता, रणधुमाळीमध्ये ओलीस कसे वागतील, आदेश ऐकतील का? दहशतवादी काय करतील? दहशतवादी आणि सैनीकांनी ओलिसांवर गोळ्या झाडल्या तर काय करायचे? एखाद्या शत्रुराष्ट्राने इस्रायली विमानांच्या ताफ्यावर हल्ला केला तर काय करायचे? असे अनेक नवीन नवीन प्रश्न तयार होत होते. उत्तरे न मिळणारे प्रश्न सोडवण्यात वेळ न घालवता व अज्ञात ठिकाणी अज्ञात कारणांमुळे तयार होणार्‍या परिस्थितीला शरण न जाता 'ज्यू' धर्माच्या रक्षणासाठी इस्रायलचे कडवे सैनिक तयार झाले होते.

एकंदर आराखडा, मिळालेली माहिती आणि पूर्वतयारी बघून टास्क फोर्सने ऑपरेशनला मान्यता दिली. सोबत योनी नेत्यान्याहूचे कमांडो पथकही नेण्यास परवानगी दिली. दहशतवाद्यांना ठार मारणे आणि एंटबे विमानतळावरील बंदोबस्ताचा सामना करणे हे काम योनीचे पथक करणार होते.

दहशतवाद्यांशी बोलणी करून वाढवलेली अंतिम मुदत सोमवार ५ जुलैला संपत असल्याने रविवारी, ४ जुलैच्या रात्री कमांडो कारवाई करण्याची वेळ निश्चित करण्यात आली.

आता मात्र लष्करी तयारी युद्धपातळीवर सुरू झाली. प्रत्येक जण आपआपल्या क्षमतेनुसार योगदान देत होता. पंतप्रधान राबीन आणि टास्क फोर्स जगभरातून येणार्‍या प्रतिक्रियांचा अंदाज घेत होते.

एका अज्ञात स्थळी एक वेगळाच प्रकार सुरू होता. एका आडदांड कमांडोला काळा रंग फासून इदी अमीनसारखा मेकअप केला जात होता. एंटबेवरील युगांडन सैनिकांना चकवा देण्यासाठी ही चाल खेळली जात होती. इदी अमीन वापरत असलेल्या काळ्या मर्सिडीजसारखी एक मर्सिडीज इस्रायली लष्कराने मिळवली व त्या पांढर्‍या गाडीलाही काळा रंग लावून आणि त्यासोबत काही लष्करी जीपगाड्यांना युगांडाचे झेंडे चिकटवले. अशा तर्‍हेने इदी अमीन आणि त्याचा गाड्यांचा ताफा असा सारंजाम इस्रायलने तयार केला. इस्रायली विमाने एंटबे विमानतळावर उतरल्यानंतर युगांडाच्या सैनिकांना गोंधळात पाडण्यासाठी व बहुमूल्य असे 'एलिमेंट ऑफ सरप्राईज' मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू होता.

इंधनाचा प्रश्न अजूनही सुटला नव्हता. वेगवेगळे अधिकारी आपापल्या स्रोतांकरवी माहिती मिळवत होते. हवेतल्या हवेत विमानांमध्ये इंधन भरणे हा एक पर्याय होता, परंतु शत्रुराष्ट्रांनी वेढलेल्या मार्गावर असा धोका पत्करणे शक्य नव्हते आणि एंटबेला कारवाई सुरू असताना एंटबेच्याच टाक्यांमधून इंधन भरणे शक्य वाटत असले, तरी तेथे तितका वेळ मिळेल का हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. शेवटी नैरोबी या शक्य वाटणार्‍या पर्यायाची खातरजमा करण्यात आली. जर केनियाच्या अधिकार्‍यांनी इंधन देण्यास नकार दिला, तर नैरोबीचाही विमानतळ बळजबरीने ताब्यात घ्यायचा आणि सर्व विमानांना लागणारे इंधन भरून घ्यायचे, असाही एक 'प्लॅन' ठरला.

एंटबेवरील ज्यू प्रवाशांची सुटका हा इस्रायलसाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी कोणत्याही राष्ट्राशी वैर घेण्यास इस्रायल मागे पुढे बघणार नाही, असे स्पष्ट संकेत लष्करी आणि राजकारणी आघाडीवर दिले गेले.

या दरम्यान मोसादच्या काही गुप्तहेरांनी एक अचाट धाडस केले. त्यांनी ओळख बदलून थेट युगांडामध्ये धडक मारली व कोणाच्याही डोळ्यावर न येता एंटबे विमानतळाच्या आसपास आपला तळ तयार केला. एंटबे विमानतळ आणि युगांडाची राजधानी व सर्वात मोठा लष्करी तळ असलेले ठिकाण 'कंपाला' यादरम्यानच्या संदेशवहन तारा शोधून काढल्या व इस्रायली कमांडो आल्यानंतर एंटबे ते कंपाला असा संपर्क होऊ नये, म्हणून त्या तारा कापण्याची तयारी केली.

इस्रायली पार्लमेंटमध्ये या कारवाईबद्दल चर्चा सुरू झाली. कारवाई करावी का करू नये असे अनेक मतप्रवाह होते. प्रत्येक जण आपले मत मांडत होता. तेल अवीव ते एंटबे हे साधारणपणे ७ तासांचे अंतर असल्याने या चर्चासत्रानंतर विमानांनी उड्डाण केले, तर कारवाईची वेळ गाठता येणार नव्हती. यावर उपाय म्हणून विमानांना उड्डाणाचे आदेश देण्यात आले, मात्र कोणत्याही क्षणी परत बोलावले तर कारवाई रद्द करून परत येण्यासही बजावले.

इस्रायली विमानांचा ताफा एंटबेला पोहोचण्याच्या अगदी शेवटच्या काही तासांमध्ये केनिया सरकारने इंधन भरण्यासाठी नैरोबी विमानतळ वापरण्यासाठी हिरवा कंदील दाखवला.

संरक्षणमंत्री शिमॉन पेरेस यांच्या कार्यालयात सर्व मंत्री जमले होते. थोड्या वेळाने पंतप्रधान राबिनही तेथे पोहोचले. सर्वांचे कान बेनी पेलेद यांच्या विमानातून येणार्‍या रेडिओ संदेशाकडे लागले होते.

विमाने एंटबेकडे झेपावली असतानाच आणखी एका वॉर रूममध्ये जनरल मोर्देचाय गुर आपल्या अधिकार्‍यांसमवेत एकंदर ऑपरेशनचा आढावा घेत होते, अचानक एका अधिकार्‍याला दुसर्‍या एकाने विचारले की "तुमचा मुलगा या ऑपरेशनमध्ये भाग घेत आहे, तुम्हाला मुलाचा अभिमान वाटत असेल!" बाकी अधिकार्‍यांच्या नजरेत कौतुक तरळत असतानाच मोर्देचाय गुर्र अचानक उभे राहिले व त्यांनी जळजळीत नजरेने त्या अधिकार्‍याला सवाल केला, "हे कसे शक्य आहे? तुमच्या एका मुलाला यॉम किप्पूरच्या लढाईमध्ये वीरमरण आले आहे, आणि अशा वेळी दुसरा मुलगा 'फ्रंटलाईन' मध्ये असणे सरकारच्या निर्देशाविरुद्ध आहे."

"माझ्या देशावर आलेले संकट हा माझ्या मुलाचा दोष होऊ शकत नाही. त्याला हवे तेथे जाण्याचा पूर्ण हक्क आहे" त्या अधिकार्‍याने थंडपणे उत्तर दिले. __/\__

*************

"धिस इस एल-अल फ्लाईट ८९ विथ प्रिझनर्स फ्रॉम तेल अवीव, कॅन वी हॅव परमिशन टू लँड?"

या रेडिओ संदेशाने एंटबे एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरवर एकच खळबळ उडाली, असे कैदी घेऊन येणारे कोणतेही विमान एंटबेला येईल अशी माहिती मिळाली नव्हती. इदी अमीन यांचे कोणतेही आदेश मिळाले नव्हते. एंटबे कंट्रोल टॉवरचा कंपालाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण एंटबेवरचे सर्वच फोन 'अचानक' नादुरुस्त झाले होते.

हतबल एअर ट्रॅफिक कंट्रोलरसमोर एक अजस्र हिप्पो लँड झाले व अगदी अलगदपणे धावपट्टीजवळ 'पार्क' केले गेले, अचानक त्या विमानातून एक लष्करी अधिकारी बाहेर झेपावला. एक मर्सिडीज गाडी आपल्या ताफ्यासह घरंगळली व डौलदारपणे एंटबेच्या रनवेवरून कंट्रोल टॉवरकडे धावू लागली. त्या गाडीमध्ये योनी नेतान्याहू आणि त्याचे कमांडो बसले होते. वाटेत गस्त घालणार्‍या दोन युगांडन सैनिकांनी या ताफ्याला थांबण्याचा इशारा केला. योनीच्या इशार्‍यावर कमांडोंनी त्या दोघांवर सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. एक जण जागीच कोसळला, तर दुसर्‍या कमांडोने प्रतिहल्ला केला. त्याला शांत करण्यासाठी इस्रायली कमांडोनी रायफलची मदत घेतली व त्याला ठार मारले. या धांदलीमध्ये गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण विमानतळ जागा झाला होता व दहशतवादी व युगांडन सैनिक सावध झाले.

विमाने थांबल्यानंतर सर्वप्रथम खाली झेपावलेला ब्रिगेडियर डॅन शॉमरॉन वेगवेगळ्या ठिकाणी चालणार्‍या हालचालींवर नियंत्रण ठेवून होता.

योनी आणि त्याच्या कमांडोंनी आता ओलीस राहत असलेल्या जुन्या टर्मिनल बिल्डिंगकडे कूच केले. काही सेकंदात ते तेथे पोहोचले. तेथे पहार्‍यावर असणारा दहशतवादी गोंधळला होता. नक्की काय घडत होते ते कुणाच्याच लक्षात येत नव्हते. इस्रायली सैनिक इतक्या लांब येतील यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. अचानक बंदुकांची एक फैर झाडली गेली व गस्त घालणारा दहशतवादी कोसळला. त्याच्या मागोमाग पुराचा लोंढा घुसावा तसे योनीचे कमांडो आत शिरले. त्यांचे पुढचे लक्ष्य होते ती स्त्री दहशतवादी. तिने बंदुक उचलून गोळ्या झाडण्याच्या आतच इस्रायली कमांडोंच्या बंदुका कडाडल्या, तीही जागेवर कोसळली. तिच्या हातातली हत्यारे बाजूला करून एक कमांडो बाकीच्या दहशतवाद्यांकडे झेपावला. प्रवासी ओरडत होते, खाली झोपत होते आणि धूर व आवाजामुळे घाबरून रडूही लागले होते. कमांडो हिब्रू, इंग्लिश भाषेमध्ये ओरडून ओलिसांना "खाली झोपा, खाली झोपा" असे बजावत होते.

योनीच्या कमांडोंनी संपूर्ण इमारत चाळून काढण्यास सुरूवात केली. प्रतिकार करणार्‍या दहशतवाद्यांना ठार मारले. तीन दहशतवादी जिवंत अवस्थेत शरण आले. त्यांना कमांडोंनी ताब्यात घेतले.

एव्हाना युगांडन सैनिकांनी नवीन कंट्रोल टॉवरवरून गोळीबार सुरू केला होता. योनी नेत्यान्याहू त्याच्या काही साथीदारांसह या गोळीबाराला तोंड देत असताना एका स्नायपरने योनीला गोळी मारली. योनी कोसळला. मुकी बेत्सर या योनीच्या 'सेकंड-इन-कमांड'ने डॅन शॅमेरॉनला याची माहिती दिली व स्वत: योनीची जागा घेऊन ऑपरेशन पार पाडू लागला.

या रणधुमाळीमध्ये तीन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. इदा बार्चोविच आणि जीन जॅक्वस मायमोनी हे दोघे एंटबेलाच मरण पावले. पास्को कोहनने नैरोबीच्या हॉस्पिटलमध्ये प्राण सोडले.

बाकी प्रवासी कमांडोंच्या इशार्‍यानुसार जुन्या कंट्रोल टॉवरमधून बाहेर पडत होते, जखमी प्रवाशांना इस्रायली सैनिक आधार देऊन व काहींना खांद्यावर टाकून हिप्पोपर्यंत पोहोचवत होते. प्रवासी घाईघाईने हिप्पोमध्ये चढत होते.

पहिले हिप्पो एंटबेवर लँड करेल, योनीचे कमांडो मर्सिडीजमधून युगांडन सैनिकांची पहिली फळी मोडून काढेल, दहशतवाद्यांवर हल्ला करून ओलीस प्रवाशांची सुटका करेल व प्रवाशांना सुखरूपपणे एका हिप्पोमध्ये चढवेल या घटनाक्रमासाठी संरक्षणमंत्री सिमॉन पेरेस यांनी ५५ मिनिटांचा वेळ दिला होता. डॅन शॉमेरॉन, योनी आणि त्याच्या कमांडोंनी हे काम ५३ मिनिटात पार पाडले.

प्रवासी असलेल्या हिप्पोने उड्डाण केले.

डॅन शॉमेरॉनचे बाकी सैनिक आपापल्या ठरवून दिलेल्या कामात व्यग्र होते. इंजीनियर्सच्या एका ताफ्याने एंटबेच्या विमानतळावरची इस्रायलला आवश्यक असणारी रशियन उपकरणे पळवली. परततानाचा पाठलाग टाळण्यासाठी दुसर्‍या एका ताफ्याने विमानतळावर असलेल्या सर्व मिग विमानांना आग लावली. आणखी एका टोळीने मेलेल्या दहशतवाद्यांचे फोटो आणि हाताचे ठसे घेतले. या रणधुमाळीमध्ये कंपालाहून युगांडन सैन्य आले तर त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. म्हणून जीप आणि ट्रकचा ताफा कंपालाच्या दिशेने रवाना झाला. कंपालाहून सैनिकांची एक तुकडी एंटबेवर काय सुरू आहे याची पाहणी करण्यासाठी आली. इस्रायली कमांडोंनी त्याना लीलया ठार मारले.

एंटबे विमानतळावर विखुरलेल्या सर्व ठिकाणच्या सर्व तुकड्या हिप्पोकडे परतल्या, विमानतळावर काही राहिले आहे का याची आणखी एकदा तपासणी करण्यात आली. ठरलेली सर्व कामे सुरळीतपणे पार पडली होती. एंटबे विमानतळावर ९० मिनिटांपूर्वी पहिले हिप्पो लँड झाल्यानंतर चित्त्याच्या चपळाईने रनवेवर झेपावणारा ऑपरेशन कमांडर डॅन शॉमेरॉन सर्वात शेवटी पाठमोरा विमानात चढला.

आठवडाभर सुरू असलेले ओलीसनाट्य संपुष्टात आले. इस्रायलने एका यशस्वी कमांडो ऑपरेशनची इतिहासात नोंद केली.

*******************************************

विमाने आणि प्रवासी इस्रायलमध्ये पोहोचल्यानंतर..

.

.

एका हिप्पोचा पायलट..

.

या फोटोमध्ये खांद्यावर फीत लावलेल्या गणवेशामध्ये कॅप्टन माईकेल बाकोस दिसत आहे. संपूर्ण ओलीसनाट्यादरम्यान दाखवलेल्या असामान्य धैर्याबद्दल कॅप्टन बाकोसला आणि त्याच्या सहकार्‍यांना फ्रेंच आणि इस्रायली सरकारकडून मानाचे पुरस्कार दिले गेले.

.

हीच ती मर्सिडीज गाडी.

.

याच कंट्रोल टॉवरमध्ये ओलीस एक आठवडा राहिले होते. येथेच योनी नेतान्याहूने आपले प्राण गमावले.

.

आजही एंटबे विमानतळावर असणारी ऑपरेशन जोनाथनची आठवण..!!

.

संपूर्ण कारवाईचा एक आराखडा..

.

*******************************************
यानंतर जगभरात खळबळ उडाली. इस्रायलने केलेल्या या धाडसी कारवाईचे पडसाद 'युनायटेड नेशन्स'मध्येही उमटले.
युगांडा, टांझानिया आणि सोमालियाच्या प्रतिनिधींनी या ऑपरेशनबद्दल इस्रायली प्रतिनिधींवर कडाडून हल्ला चढवला व कारवाईची मागणी केली. मात्र इस्रायली राजदूत केम हेरझॉग यांनी अत्यंत ओजस्वी भाषण करून प्रत्येक मुद्द्याचा योग्य समाचार घेतला. पश्चिम जर्मनी, अमेरिका, इंग्लंड आणि बहुतांश पश्चिम राष्ट्रांनी इस्रायलचे या अचाट धाडसाबद्दल अभिनंदन केले. इस्रायलवर कोणतीही कारवाई न करता युनायटेड नेशन्सची बैठक संपली.

केम हेरझॉग यांच्या भाषणातील एक उतारा -

We come with a Simple message to the council: We are proud of what we have done, because we have demonstrated to the world that in a small country, in Israels's circumstances, with which members of this Council are by now all too familiar, the dignity of man, human life and human freedom constitutes the highest values. We are proud not only because we have saved the lives of over 100 innocent people- men, women and children- but because of the significance of the our act for the cause of Human Freedom.

सुरुवातीला 'ऑपरेशन थंडरबोल्ट' नावाने ओळखल्या जाणार्‍या या कारवाईचे नाव योनी नेतान्याहूच्या स्मरणार्थ 'ऑपरेशन जोनाथन' असे बदलले गेले.
कंपाला येथील इस्पितळात असलेल्या डोरा ब्लॉक यांना इदी अमीनच्या आदेशावरून ठार मारण्यात आले.
*******************************************
सर्व माहिती व प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.
या घटनेवर 90 Minutes at Entebbe आणि Assault at Entebbe ही इंग्लिश, तर 'किबुत्झमधला डॅनी येथे आला होता' हे मराठी पुस्तक मी वाचले आहे. त्यामधील थोडीफार माहिती वरील लेखामध्ये आहे. याशिवाय अन्य कोणतेही पुस्तक माहीत असल्यास कृपया कळवावे.
*******************************************
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

मोदक's picture

18 Nov 2015 - 5:00 pm | मोदक

लिहाण रे... लिखाण. ;)

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 5:02 pm | भाऊंचे भाऊ

चांदणे संदीप's picture

16 Nov 2015 - 1:38 pm | चांदणे संदीप

मस्त लेख!
सुरुवातीपासून शेवटापर्यंत खिळवून ठेवले!

धन्यवाद,
Sandy

थरारक आणि प्रत्ययकारी लिखाण, मोदकराव....

नाखु's picture

18 Nov 2015 - 12:54 pm | नाखु

मस्त आणि थरारक.

भारतातले राजकारणी सुधारतील तो सुदीन....

जेपी's picture

18 Nov 2015 - 3:29 pm | जेपी

लेख आवडला.

स्रुजा's picture

18 Nov 2015 - 7:51 pm | स्रुजा

मोदक, या आणि आधीच्या लेखा साठी तुमचे शतशः आभार ___/\___

थरारक लेख ! कुठेही गती कमी झाली नाही किंवा नाट्यावरची पकड सुटली नाही.

Madhavi1992's picture

18 Nov 2015 - 9:55 pm | Madhavi1992

सुरेख

पियुशा's picture

24 Nov 2015 - 8:25 pm | पियुशा

थरारक !! शेवट वाचून हायसे वाटले , सैनिक कुठल्याही देशाचा असो त्याचे अचाट शौर्य देशासाठी जीवावर उदार होण्याच्या व्रुत्तीला सलाम !

चेतन गावडे's picture

20 Sep 2016 - 6:20 pm | चेतन गावडे

इसर्याल ने इजिप्त च्या अणु प्रकल्पावर विमान हल्ला करून ती उध्वस्त केली होती. त्या बद्दल मिपा वर एकधा लेख असेल
तर कृपया माहिती द्या
धन्यवाद

सुबोध खरे's picture

20 Sep 2016 - 8:24 pm | सुबोध खरे

इजिप्त नव्हे हो इराक ची ओसीरॅक येथील अणुभट्टी

चेतन गावडे's picture

21 Sep 2016 - 2:48 pm | चेतन गावडे

चुकी बद्दल माफी असावी पण जर कोणा कडे याबद्दल किवा मिपा वर मराठी लेख असेल तर कृपया माहिती द्या किंवा
लिंक द्या.

तसेच मिपा वर शेअरच कसा कराव या बद्दल माहिती द्या

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2016 - 10:32 am | श्रीरंग_जोशी

लेखाचा दुवा वापरुन, उदा. http://www.misalpav.com/node/33582

विशाल कुलकर्णी's picture

2 Jan 2017 - 2:03 pm | विशाल कुलकर्णी

हे वाचायचे राहूनच गेले होते रे. जबरदस्त झालाय यार लेख ! जियो ....

युगांडा पूर्व आफ्रिकेत येतो, मी चुकून मध्य आफ्रिका लिहिले होते.

शशिधर केळकर यांनी ही चूक नजरेस आणून दिल्याबद्दल अनेक आभार्स. लेखात बदल केला आहे.

रुपी's picture

4 Jan 2017 - 4:47 am | रुपी

जबरदस्त! अगदी थरारक..
तुमचे हे वेगवेगळ्या "ऑपरेशन्स"वरचे लेख फार वाचनीय असतात.

स्वीट टॉकर's picture

4 Jan 2017 - 1:09 pm | स्वीट टॉकर

तुम्ही कुठेही गती कमी होऊ दिली नाहीत.

'Ninety Minutes at Entebbe' पुस्तक वाचलं होतं त्याची आठवण झाली.

दिनेश००७'s picture

5 Jan 2017 - 2:35 pm | दिनेश००७

झक्कास....

खटपट्या's picture

10 Jan 2017 - 4:54 pm | खटपट्या

थरारक.

मोदक's picture

10 Jan 2017 - 5:06 pm | मोदक

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे अनेक आभार.

व्यनीमध्ये / प्रतिसादामध्ये आवर्जून सुधारणा सुचवणार्‍यांचे तर डबल आभार. आपल्या सूचनांमुळेच लेखामध्ये आणि लेखनामध्ये सुधारणा होत राहतील. __/\__

इशा१२३'s picture

10 Jan 2017 - 11:33 pm | इशा१२३

जबरदस्त थरारक!

टर्मीनेटर's picture

12 Jan 2017 - 2:47 pm | टर्मीनेटर

मस्त...झक्कास लेख...

फेदरवेट साहेब's picture

12 Jan 2017 - 3:30 pm | फेदरवेट साहेब

नाईस! वातावरण च्यांगला क्रियेट करते हा तू दिकरा, अजून लिही नी मिलिटरी ऑप्स वर, तुज्या लिवलेला आवडेल आपुनला पर्सनाली.

उपेक्षित's picture

8 Jul 2017 - 5:37 pm | उपेक्षित

एक जबरदस्त लेख,

hats ऑफ to you मोदकराव

जेम्स वांड's picture

8 Jul 2017 - 5:41 pm | जेम्स वांड

तेथे कर माझे जुळती, अश्या जगातल्या काही मोजक्या गोष्टी, व्यक्ती अन घटनांमध्ये अतिशय वरती असलेली ही घटना होय. तुम्ही उत्तम पोचवलेत , खूप आवडले हे लिखाण. प्रकाशचित्रे अजूनच उठावदार करतायत लेखन. खूप लिहा लिहित राहा, तुम्हाला असंख्य शुभेच्छा.

सुप्पर्ब ... त्र्हिल्लींग

जिवंत लिखान ...

योगी९००'s picture

19 Mar 2018 - 9:25 am | योगी९००

नुकताच ह्या विषयावर आलेला " 7 Days in Entebbe" हा चित्रपट पाहीला. प्रचंड निराशा झाली. हा लेख जितका थरारक, गतीमान होता त्याच्या १०% सुद्धा चित्रपटात तसे जाणवले नाही. पैशे फुकट जाणे म्हणजे काय याचा एक अनुभव आला.

चित्रपटात सुरूवातीलाच विमान अपहरण झालेले दाखवले आहे. त्यामुळे चांगला चित्रपट बघायला मिळेल असे वाटले पण ५-१० मिनिटात त्यांनी मातेरे करायला सुरूवात केली. चित्रपटात दोन जर्मन अपहरणकर्त्यांचे जास्त उद्दातीकरण दाखवले आहे. त्यांच्यावरच जास्त करून चित्रपट रेंगाळतो. त्यांचे फ्लाशबॅक वगैरे दाखवलेत पण ते पण इतके तुटक पणे मांडण्यात आलेत की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. ब्रिगेट कुल्हमन या जर्मन स्त्री अपहरणकरत्याचा रोल रोसमुंड पाईक या अभिनेत्रीने केला आहे. (तिने आधी बॉन्डपट डाय अनादर डे मध्ये काम केलेले आठवतेयं). पण इतका कंटाळवाणा रोल तिने केलाय की त्यापेक्षा आपल्या अलिया भट किंवा कतरीनाने नक्कीच चांगले काम केले असते असे वाटून गेले. शेवटी शेवटी तर ती स्वतः इतकी कंटाळलेली वाटली की तीच इस्रायलला "या लवकर आणि मारा आम्हाला" असे सांगेल असे वाटले. तिच्या बरोबर दुसर्‍या जर्मन अपहरणकर्त्याचा रोल पण थोडाफार असाच वाटला. कोठलाही तणाव या अपहरणकर्त्यांवर जाणवला नाही.

इस्रायलचे संरक्षणमंत्री शिमॉन पेरेस आणि पंतप्रधान राबिन यांच्यातील मतभेद थोडे बर्‍यापैकी दाखवलेत पण तेही तुटकपणे मांडले आहेत. नक्की पंतप्रधानांचा कल कशाकडे होता तेच उमगत नाही. संपूर्ण चित्रपटात आणखी एक साईड लाईन स्टोरी म्हणजे एक इस्रायली सैनिक आणि त्याची डान्सर मैत्रीण यांचे उगाच सिन्स टाकले आहेत. म्हणजे तो सैनिक देशासाठी लढतो म्हणून हिच्या डान्स कडे त्याचे दुर्लक्ष होते वगैरे वगैरे.. त्यात एक काहीतरी इस्रायली डान्स प्रकार दाखवला आहे ज्यात या सैनिकाची मैत्रिण असते आणि ती कायम त्या प्रकारात पडत असते. (का कोणास ठावूक). चित्रपटाची सुरूवातच ह्या डान्सने होते.

चित्रपटाचा कळस म्हणजे मेन ऑपरेशन थंडरबोल्ट आणि त्याचे सादरीकरण इतक्या वाईट प्रकारे झालेय की डोके आपटून घ्यावे असे वाटले. त्या सैनिकाच्या मैत्रिणीचा डान्स (ज्यात ती साऱखी पडत असते) आणि मेन ऑपरेशन थंडरबोल्ट यांची सरमिसळ केली आहे. म्हणजे ५-१० सेकंद डान्स आणि ५-१० सेकंद सैनिकी ऑपरेशन असे आलटून पालटून दाखवले आहे. त्यामुळे मूळ सैनिकी ऑपरेशन पहाण्यातली मज्जाच निघून जाते. योनी नेत्यान्याहून ला तर ऑपरेशनच्या सुरूवातीलाच मारलेले दाखवले आहे.

त्यातल्या त्यात एक दोन प्रसंग म्हणजे ज्यात इदी अमीन दाखवला आहे ते बर्यापैकी जमलेत आहेत असे वाटले. पण कंटाळवाणा अभिनय आणि स्लो पेस यामुळे चित्रपट केव्हा संपतोय असे झाले होते. (इथे बंगलोरला थेटरात दोन-तीन परदेशी होते. त्यांच्या भाषेवरून ते युरोपियन असावेत असे वाटत होते. त्यांच्यापैकी एक जण चक्क चित्रपट चालू असताना झोपला होता).

त्या पेक्षा हा लेख अजून दोन-चारदा वाचला असता तर बरे झाले असते. मोदकराव तुम्हीच चित्रपट काढा या विषयावर...!!