हा छंद इतिहासाचा - श्री. मानसिंग कुमठेकर

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in दिवाळी अंक
1 Nov 2015 - 8:37 pm

.
.
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दैनिक तरुण भारतमध्ये काम करणार्‍या श्री. मानसिंग कुमठेकर यांना इतिहास संशोधनाचा आणि ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाचा छंद आहे. आपली नोकरी आणि इतर कामे सांभाळूनही गेली वीसेक वर्षे त्यांनी अक्षरशः हजारो ऐतिहासिक कागदपत्रे, पोथ्या, प्राचीन पुस्तके, इ. अनेक ऐतिहासिक साधनांचा प्रचंड मोठा संग्रह गोळा केलेला आहे. या अफाट संग्रहात अनेक अप्रकाशित रत्ने आहेत. या संग्रहाबद्दल आणि एक संशोधक म्हणून श्री. कुमठेकर यांच्या आजवरच्या एकूण प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी आपलेच एक मिपाकर बॅटमॅन ह्यांनी त्यांना बोलते केले. मिसळपाव व्यवस्थापनाच्या वतीने बॅटमॅन ह्यांचे ह्या मुलाखतीबद्द्ल खास आभार.


इतिहासात तुम्हांला कधीपासून रस उत्पन्न झाला?

इतिहासाची आवड तशी मला लहानपणापासूनच होती. क्लासला वगैरे जाताना मिरज किल्ल्याचा दरवाजा रोज समोर दिसत असे. काही मित्रांसोबत किल्ल्याच्या खंदकातून फेरफटका मारणे, काही ठिकाणी दिसणार्‍या भुयारसदृश भागापाशी जाण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार तेव्हा केले होते. काही नाणी, पोस्टाची तिकिटे वगैरेंचा संग्रहही तेव्हा करीत असू. पण काही विशिष्ट दृष्टिकोन ठेवून हा संग्रह केला पाहिजे असा विचार काही तेव्हा मनात आला नव्हता. काही वेगळे आणि रोचक दिसले की ते आपल्यापाशी असले पाहिजे, इतकाच साधा उद्देश त्यामागे होता.

पण कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र माझा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला म्हटले तरी चालेल. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अनेक उत्तमोत्तम पुस्तके आहेत, ती मी वाचत असे. अनेकदा कल्पना नसतानाही अचानक मिरजेच्या इतिहासासंबंधी उल्लेख येत - कधी पेशवेकालीन, तर कधी आदिलशाही संदर्भात. त्यामुळे उत्सुकता जागृत होत असे, परंतु तितपतच. तसे न होता व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी मी हळूहळू ते उल्लेख नावनिशीवार टिपून ठेवू लागलो. आणि हळूहळू इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली की मी आश्चर्यचकित झालो. त्या माहितीच्या आधारे कॉलेजमध्ये असतानाच दैनिक तरुण भारतमध्ये 'इये मिरजेचिये नगरी' ही तब्बल ५५ भागांची लेखमाला प्रसिद्ध झाली. यात गेल्या हजारेक वर्षांत मिरज नगरीच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, संगीत, नाट्य, इ. अनेक विविध पैलूंचा परामर्श घेतला गेला. ही लेखमाला तेव्हा खूपच गाजली. तिला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे हुरूप येऊन मी यासंबंधी अजून वाचन करू लागलो.

या क्षेत्रात काही काम करावे असे कधीपासून आणि कशामुळे वाटले?

मघाशी सांगितल्याप्रमाणे मिरजेवरच्या लेखमालेला उत्तम प्रतिसाद मिळालेला पाहून मी यासंबंधी वाचन करू लागलो खरा, परंतु हळूहळू समजून चुकले की अशा अभ्यासाचीही एक मर्यादा असते. कुठल्याही ऐतिहासिक पुस्तकातील मजकुराच्या सत्यासत्यतेचा निर्णय काही अंशी तरी आपल्याला करता आला पाहिजे, नाहीतर निव्वळ 'या ग्रंथात असे असे लिहिले आहे' असे सांगण्याखेरीज काहीच करता येणार नाही. आणि संशोधकाच्या दृष्टीने त्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे इतिहाससंशोधकासाठी काही जुन्या भाषा, लिपी, इ. शिकणे परम आवश्यक असते, जेणेकरून जुनी कागदपत्रे, शिलालेख वगैरे स्वतः वाचून त्यांसंबंधी विवेचन करणे सुकर होते. त्यामुळे खरा इतिहास समजण्यासाठी समकालीन अस्सल कागदपत्रे वाचणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले.

आणि आजवर बहुतांश वाचन हे मिरज व आसपासच्या भागासंबंधीच झाले होते. या भागाचा बहुतांश ज्ञात इतिहास हा संस्कृत, मराठी, हळेकन्नड (प्राचीन कन्नड) व नंतर फारसी व त्यापुढे मराठी आणि सोबत इंग्लिश भाषिक साधनांतून समजत असल्याने खरे तर या सर्व भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यापैकी मोडी लिपीतील साधने अनेक पटींनी जास्त संख्येने उपलब्ध असल्यामुळे प्रथम मोडी शिकायचा निश्चय केला. ढवळे प्रकाशनाची मोडीची पुस्तके विकत घेऊन स्वतःच शिकायला सुरुवात केली. हळूहळू पेशवाईकालीन अस्सल कागद सफाईने वाचता येण्याइतपत प्रगती झाली. आज मिरज व सांगली येथे गेल्या किमान दहा-पंधरा वर्षांंपासून दर वर्षी मोडी लिपीच्या वर्गाचे आयोजनही करणे त्यामुळे शक्य झाले आहे. अलीकडेच सांगलीच्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात देशातील पहिला यूजीसी मान्यताप्राप्त मोडी लिपी अभ्यासक्रम सुरू झालेला आहे, तिथेही मी विद्यार्थिनींना मोडी वाचनाकरिता मार्गदर्शन करीत असतो.

कागदपत्र संग्रहाला कुठे आणि कशी सुरुवात झाली?

या संग्रहाची सुरुवात कशी झाली याची कथा अंमळ रंजक आहे. १९९७ साली मी नाशिकला काही कामानिमित्त गेलो असताना गोदावरी नदीच्या पात्रात एक जुन्या पत्रांचे गाठोडे तरंगताना दिसले. लगेच काठीने ते गाठोडे काठावर ओढून काढून पाहिले, तर त्यात काही मोडी कागदपत्रे होती. ती मी जपून ठेवली. हाच माझ्या संग्रहाचा आरंभ होय. पुढे पाहिले तर त्यांमधील मजकूर काही विशेष महत्त्वाचा नव्हता, पण इतर सर्व पहिल्या गोष्टींप्रमाणेच याचीही आठवण मला अजून येते. अशा प्रकारे श्रीक्षेत्र नाशिक येथे माझ्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या संग्रहाची सुरुवात झाली.

जुनी कागदपत्रे कुठे आणि कुणाकडून मिळाली? याबद्दल लोकांचा साधारण अनुभव कसा आहे?

एकदा कागदपत्रांचे महत्त्व समजल्यावर मी चहूबाजूंना शोध घेण्यास सुरुवात केली. मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रात अनेक संस्थानिक-सरंजामदारांचे वाडे धुंडाळले, देवळे-विहिरी-मशिदी-दर्गे-स्मशानभूमी सगळीकडे हिंडलो. त्यातच अनेक रद्दीवाल्यांशीही ओळख झाली. अनेकदा अशा वाड्याहुड्यांतून जुनी कागदपत्रे अक्षरशः धूळ खात पडलेली असतात. वाळवीने कैक कागद अर्धेनिम्मे खाल्लेले असतात. त्यामुळे कुणा संशोधकाचे लक्ष जाऊन त्यांनी काही करण्याअगोदरच कितीतरी इतिहास असाच नष्ट झालेला आहे. माझ्यावरही काही लोकांनी संशय घेतला, काहींनी हस्तलिखिते अन्य कुणाला दाखवण्याऐवजी सरळ नष्ट होऊ देणेच पसंत केले.

इतिहासाचार्य राजवाड्यांच्या काळापासून ही इतिहासाबद्दलची अनास्था दुर्दैवाने अजूनही अशीच आहे. आपल्या इतिहासाबद्दल जागृती हळूहळू होतेय, पण इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याप्रमाणे 'टू लिटल, टू लेट' अशा प्रकारची आहे.

अनावस्थेतील कागदपत्रे
a

जुनी कागदपत्रे धुंडाळताना

a

एकीकडे असे अनुभव, तर दुसरीकडे लोकांना त्याचे महत्त्व पटवून दिल्यावर त्यांनी तो बहुमूल्य ऐवज माझ्या स्वाधीन केल्याचीही कैक उदाहरणे आहेत. मी इतिहासाचा अभ्यास करतो आहे म्हटल्यावर अनेक ऐतिहासिक घराण्यातील लोकांनी अतिशय खुल्या दिलाने त्यांच्याकडील कागदपत्रे दाखवली, अनेक देऊनही टाकली. त्यांच्या सहकार्याविना हा संग्रह तयारच करता आला नसता. एकदोनदा जुना वाडा पाडून त्या जागी नवीन अपार्टमेंट उभे करताना अडगळ म्हणून जुन्या पोथ्या वगैरे फेकून द्यायला चालले असताना माझ्या ओळखीच्या लोकांनी मला फोन करून बोलावले आणि त्यामुळे माझ्या संग्रहात काही बहुमोल पोथ्या प्रवेश करत्या झाल्या. एका जुन्या प्रसिद्ध घराण्यातले लोक मिरजेजवळील कृष्णा घाटावर पोते भरून पोथ्या घेऊन नदीत फेकायला चालले होते. त्यांना थांबवून मी त्यांच्याशी जरा बोललो, तेव्हा त्यांच्याकडील काही अतिमहत्त्वाच्या पोथ्या मला मिळाल्या, उदा. १८०५ साली पत्र्यावर अक्षरे कोरून ती कागदावर उमटवून छापलेली देशातील प्रथम भगवद्गीता. आज या गीतेची एकमेव हस्तलिखित प्रत अस्तित्वात आहे, ती म्हणजे माझ्या संग्रहात. जर त्या लोकांशी माझी भेट झाली नसती, जर त्यांनी माझे म्हणणे समजून घेतले नसते तर??? विचार करूनच अंगावर शहारा येतो. माझ्या संग्रहातल्या अनेक गोष्टींशी अशा किस्सेकहाण्या निगडित आहेत.

a

कुठल्या प्रकारची कागदपत्रे तुमच्या संग्रहात आहेत? त्यांची थोडक्यात वैशिष्ट्ये सांगू शकाल काय?

(हसतात) आजमितीस माझ्या संग्रहात निव्वळ कागदपत्रच म्हणायचे, तर किमान तीसेक हजार तरी असतील. इतक्या प्रकारची, इतक्या वेगवेगळ्या काळातली कागदपत्रे आहेत की त्यांची पूर्णपणे जंत्री करायलाच काही वर्षे जातील. संशोधन वगैरे खूप पुढची गोष्ट झाली. शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यांपैकी सर्व साधने अप्रकाशित आहेत. शिवपूर्वकालीन मोडी लिपीतील सनदा, आदिलशाही फारसी-मोडी द्वैभाषिक फर्माने; पेशव्यांची स्वदस्तुरची पत्रे, मराठेशाहीतील प्रसिद्ध सरदार घराणे पटवर्धन यांच्या वंशातील गोपाळराव पटवर्धन, पांडुरंगराव पटवर्धन, परशुरामभाऊ पटवर्धन, चिंतामणराव पटवर्धन यांच्या हस्ताक्षरांतील पत्रे; राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांची पत्रे, सन १८६५ ते १९१३ या दरम्यानच्या मुंबई इलाख्याच्या सर्व गव्हर्नरांची मूळ पत्रे, प्रसिद्ध वॉटर्लूच्या लढाईत फ्रान्सचा विख्यात सेनानी आणि सम्राट नेपोलियन बोनापार्ट ह्याला हरवणारा ब्रिटिश फील्डमार्शल आर्थर वेलेस्ली ह्याच्या पत्रव्यवहाराचे १९व्या शतकात छापलेले खंड, १८५७च्या उठावासंबंधींची दुर्मीळ कागदपत्रे, १९३० ते १९४६ या काळातील दक्षिण महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढ्यासंबंधीची गुप्त कागदपत्रे, क्रांतिकारकांच्या घरांच्या झडतीत तत्कालीन पोलिसांना मिळालेली कागदपत्रे, साने गुरुजी, क्रांतिसिंह नाना पाटील, अच्युतराव पटवर्धन, बॅ. नाथ पै, भाई माधवराव बागल, बर्डे गुरुजी यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील भाषणांचे गुप्तचर पोलिसांनी केलेले अहवाल, सन १९४२च्या चळवळीतील भूमिगतांच्या हालचालींचे गोपनीय अहवाल, १८५०पूर्वीची दोल्मुद्रिते (मुद्रणकलेच्या प्रारंभकाळातील पुस्तके), जुन्या नाटकांच्या, चित्रपटांच्या जाहिराती, पेशव्यांच्या काळातील हस्तलिखित पोथ्या, रंगीत चित्रे, जुनी छायाचित्रे, अशी एक ना दोन अशी शेकड्यांनी विविध कागदपत्रे, दस्तावेज आहेत.

a

यांच्या आधारे इतिहासात काही नवीन गोष्टींचा शोध लागल्याची काही उदाहरणे सांगू शकाल का?

जसजशी कागदपत्रे गोळा करत गेलो, तसतसे अनेक नवीन तपशील मिळत गेले. कैकदा ते पाहिल्यावर आश्चर्य वाटे, कारण त्यांवर कुठे फारशी चर्चा झालेली दिसत नसे. अशा अनेक गोष्टी सापडल्या, त्यांपैकी तीन विशेष रोचक गोष्टींबद्दल सांगतो.

कॉलेजात असतानाच एका थोर, पण विस्मृतीत गेलेल्या स्त्रीची समाधी शोधून काढली. मनोरमा मेधावी असे तिचे नाव.. एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसेविका पंडिता रमाबाई यांची ही एकुलती एक मुलगी. रमाबाईंनी वयाच्या तिसर्‍या वर्षी तिला अमेरिकेला पाठविले. तिचे बालपण आईविना अमेरिका, इंग्लंड येथेच व्यतीत झाले. अमेरिकेत असताना भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी यांनी लहानग्या मनूवर उपचार केले होते. पहिल्या भारतीय महिला डॉक्टरने उपचार केलेली पहिली भारतीय रुग्ण म्हणजे ही मनू उर्फ मनोरमा. वयाच्या बाविसाव्या वर्षी मनोरमा भारतात आली. तिने आपल्या आईचा समाजसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला. केडगावच्या शारदा मिशनमध्ये विधवा आणि परित्यक्तांसाठी तिने मोठे काम केले. १९२१मध्ये ती खूप आजारी पडली. तिला मिरजेच्या मिशन इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. पण ’आपला मृतदेह आईला दाखवू नये, तिला खूप दु:ख होईल,’ अशी विनंती तिने मृत्यूपूर्वी केली होती. त्यामुळे तिचे पार्थिव मिरजेतील ख्रिश्चन दफनभूमीत दफन करण्यात आले. त्यावर संगमरवरी दगडांची सुंदर समाधी उभारली.

इतरही अनेक प्रसिद्ध लोकांच्या कबरी बघण्याकरिता लोकांना घेऊन मी स्मशानात खास त्याकरिता अभ्यास-सहलीही काढल्या. तेव्हा सुरुवातीला माझी हेटाळणी करण्यात आली. परंतु त्यामागचा इतिहास कळल्यावर मात्र त्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. जनमत ही फार मोठी शक्ती आहे. लोकांना जर इतिहासाचे महत्त्व पटले, तर आपणहोऊनच त्याचे संवर्धन होते.

मनोरमा मेधावींची समाधी धुंडाळताना
a

अशीच कथा आहे पानिपतच्या युद्धात पराक्रम गाजविणार्‍या, पण आज पूर्ण विस्मृतीत गेलेल्या एका सरदाराची.

मिरजेपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरचे कळंबी हे लहानसे गाव. या गावातले इनामदार घराणे हे इतिहासप्रसिद्. घराण्यातल्या तीन पिढ्यांनी पेशवाईतील विविध लढायांत सहभागी होऊन पराक्रम गाजविला. सातारच्या छत्रपती शाहू महाराजांनी या घराण्याला कळंबी गाव इनाम दिले होते. याच घराण्यातील काळनाक नामक सरदाराने सन १७६१ साली पानिपतास मोठा पराक्रम गाजविला. लढता लढता रणांगणावर देह ठेवला. या पराक्रमाची माहिती बाकीच्यांना राहोच, खुद्द त्यांच्या आजच्या पिढीतील वंशजांना नव्हती. इतिहासाच्या शोधयात्रेत या पराक्रमी व्यक्तीसंबंधी कागदपत्रे मिळाली आणि एका अप्रसिद्ध सरदाराची कहाणी उलगडली. ही कहाणी प्रसिद्ध केली. सांगलीच्या शिवप्रतिष्ठानच्या श्री. संभाजी भिडे गुरुजी ह्यांच्या ती वाचनात आली. भिडे गुरुजींनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह कळंबीला धारातीर्थयात्रेचे आयोजन केले. त्याकरिता पानिपतकार विश्वास पाटलांना निमंत्रित करण्यात आले. इनामदारांच्या देवघरात असणार्‍या चिलखत आणि तत्कालीन अवशेषांचे दर्शन घेऊन पानिपतकारही भारावले. जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांतून एका अप्रसिद्ध योद्ध्याचा पराक्रम साधार समाजासमोर मांडता आला, यातच खूप मोठे समाधान होते.

(पानिपत येथे ४०००च्या तुकडीचे नेतृत्व करणार्‍या शूर वीर सिदनाक यांचे मिरजेजवळ कळंबी येथील राहत्या घरातील वैयक्तिक मंदिर. पानिपत युद्धाचा २५०वा स्मृतिदिन साजरा केला, त्या प्रसंगीचे छायाचित्र सिदनाक यांच्या वंशजांसमवेत.)

a

मिरजेहून जवळच भिलवडी गाव आहे. तिथे मियां शिकंदरलाल अत्तार नामक एक थोर इतिहाससंशोधक होऊन गेले. पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाच्या त्रैमासिकात त्यांचे अनेक विषयांवरील अनेक लेख येऊन गेलेले आहेत. १९४२-४३ साली त्यांचा मृत्यू झाला. इतर स्थानिक इतिहासाबरोबरच मुस्लीम मराठी संतकवींचे खूप साहित्य त्यांनी प्रकाशित केले. पण काही नोंदींपलीकडे त्यांची माहिती लोकांना जवळपास नव्हती. तेव्हा खूप लोकांना विचारल्यानंतर अनेक वर्षांनी पत्ता लागला, तेव्हा त्यांच्या मूळ घरी जाऊन त्यांचा फोटो शोधून काढला.

आपल्या संग्रहातील काही 'हायलाईट्स' सांगू शकाल का?

हे सांगणे अवघड आहे, पण तरी काही गोष्टी नक्कीच सांगता येतील.

- १८०५ साली ठोकळा मुद्रण तंत्राद्वारे छापली गेलेली, भगवद्गीतेची ही देशातील एकमेव ज्ञात प्रत

a

- मिरजेतील कबाडेशास्त्री यांनी लोकमान्य टिळकांच्या अगोदर लिहिलेला 'गीतारहस्य' नामक ग्रंथ व टिळकांचा त्यासंबंधी पत्रव्यवहार
- मिशन हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर वॉनलेस यांच्यासंबंधीचे अस्सल कागदपत्र
- मिरजेतील नायकिणींनी - अर्थात नाचगाणेवाल्या स्त्रियांनी लोकमान्य टिळकांना केलेली मदत आणि त्यासंबंधीचा पत्रव्यवहार
- देशात पहिली रेल्वे धावली १८५३ साली. त्याअगोदरच्या 'टेस्ट रन'चे वर्णन करणारे १८५१ सालचे पत्र
- मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांचा पत्रव्यवहार
- पोस्टाचे स्टँप वापरण्यास सुरुवात झाली १८५६ साली, असे प्रचलित मत आहे, परंतु त्यासंबंधीचे १८५४ सालचे पत्र

ही यादी आणखी बरीच लांबवता येईल.

इथून पुढील वाटचालीबद्दल आपल्या मनात आराखडा काय आहे?

ही तर फक्त सुरुवात आहे. शास्त्रीय पद्धतीने काम करायचे तर प्रथम सर्व कागदपत्रांचे संकलन करणे आवश्यक आहे. एकदा संकलन पूर्ण झाले (म्हणजे आपल्यापुरते, तसे ते कधीच पुरे होत नसते. ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.) की मग त्यांची व्यवस्थित जंत्री करून त्यांतील योग्य कागदपत्रे प्रकाशित करणे ही पुढची पायरी. तूर्तास संकलन आणि जंत्री ह्याच कामात आहे. प्रचलित संशोधनपद्धतीनुसार विशिष्ट थीम असलेले इतिहासलेखन करण्यापर्यंत काही वर्षांत मजल मारू, असा विश्वास आहे.

आजवर अन्य इतिहाससंशोधकांशी संपर्क झाला असेलच, त्याबद्दल काही सांगू शकाल का?

आजवर अनेक इतिहाससंशोधकांशी संपर्क झालेला आहे. शिवचरित्रकार श्री. गजानन मेहेंदळे, कै. निनाद बेडेकर, इ. प्रख्यात संशोधकांनी माझ्याकडील कागदपत्रे पाहिलेली असून सोबतच अनेक परदेशी इतिहाससंशोधकही माझ्या संग्रहातील कागदपत्रे बघण्यास आवर्जून येऊन गेलेले आहेत. मिचिहिरो ओगावा (जपान), इरिना ग्लुश्कोव्हा (रशिया), ली श्लेसिंगर (अमेरिका), होली शाफर (अमेरिका) ही त्यांपैकी काही प्रमुख नावे.

(प्रख्यात इतिहाससंशोधक कै. निनाद बेडेकरांसोबत)

a

(जपानी संशोधक मिचिहिरो ओगावा संग्रहातील कागदपत्र पाहताना)

a

यांपैकी प्रत्येकाचे अभ्यासविषय वेगवेगळे आहेत. संग्रहात अनेकविध प्रकारची कागदपत्रे असल्याने उभयपक्षी फायदा झाला.

आपले अन्य काही उपक्रम आहेत का? त्यांची माहिती लोकांना कशी मिळू शकेल?

दर वर्षी मिरजेतील प्रसिद्ध इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांच्या जयंतीनिमित्त मोडी दिन साजरा केला जातो. अनेक वेळेस अनेक ठिकाणी दुर्मीळ कागदपत्रांचे प्रदर्शन भरवलेले आहे.

(डॉ. सदानंद मोरे प्रदर्शनात दुर्मीळ कागदपत्रे पाहताना)

a

शिवाय फेसबुकवर 'मिरज इतिहास संशोधन मंडळ' या नावाने एक पेज काढले आहे, त्यावर वेळोवेळी माहिती टाकत असतो. तिथे विविध विषयांवरचे लेख आणि फोटो आहेत, ते खालील लिंकवर क्लिक केल्यास पाहता येतील.

https://www.facebook.com/Miraj-Itihas-Samshodhan-Mandal-%E0%A4%AE%E0%A4%...

शिवाय या निमित्ताने लोकांना एक आवाहन आहे. आपल्या संग्रहात जर काही कागदपत्रे असतील आणि त्यांची माहिती करून घ्यावी असे वाटत असेल किंवा काही जुनी कागदपत्रे द्यावयाची इच्छा असेल, तर पेजद्वारे कधीही आमच्याशी संपर्क साधावा. जमेल ती मदत नक्कीच केली जाईल.

माझी मुलाखत घेऊन प्रसिद्ध केल्याबद्दल मिसळपाव.कॉमच्या संपादक मंडळींचे आणि सर्व वाचकांचेही अनेक आभार!

मिपाला मुलाखत दिल्याबद्दल मिसळपाव परिवारातर्फे आपलेही अनेक आभार, धन्यवाद!
.

प्रतिक्रिया

विशाखा पाटील's picture

10 Nov 2015 - 9:19 am | विशाखा पाटील

इतिहासाविषयी आस्था ठेवून इतक्या तळमळीने काम करणाऱ्या मानसिंग कुमठेकर यांना सलाम! त्यांच्या कामाची ओळख करून दिल्याबद्दल आभार!

काय एकेक मनस्वी माणसं असतात आणि काम करत असतात. कुमठेकर यांना दंडवत आणि ओळख करुन देणाऱ्या बॅटमॅनचे आभार.

फारच चांगले काम आहे. कुमठेकर यांचे प्रचंड कौतुक वाटले - ते केवळ संग्रह केला म्हणूनच नव्हे तर भारतात एकुणच सामाजिक शास्त्रांना मिळणारी दुय्यम वागणूक/दर्जा असूनही व एकुणच वातावरण चेतनभ्गतछाप लोकांनी भरलेले असुनसुनही या अनवट कार्याची इच्छा कायम ठेऊ शकण्याचद्दल अधिकच कौतुक वाटले. त्याबद्द्ल हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

अनुप ढेरे's picture

10 Nov 2015 - 12:40 pm | अनुप ढेरे

मस्तं मुलाखत!

सुंदर मुलाखत फार आवडली.
एका इतिहासावर प्रेम करणारया त्यासाठी इतके अफाट परीश्रम करणारा एक पॅशन जोपासणारा माणुस यांची छान ओळख करुन दिली.
एकेका ऐतिहासिक सत्याच्या निष्कर्षा पर्यंत येण्याचा संशोधकाचा प्रवास कीती कष्टमय असतो. याची पुन्हा एकदा तीव्रतेने जाणीव झाली. वि.का.राजवाडेंच मला वाटत एक कोट आहे. की एक अस्सल कागदपत्रांचा तुकडा शंभर बखरींना भारी पडतो अशा काही अर्थाच तेही आठवल.
धन्यवाद या मुलाखतीसाठी

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2015 - 3:29 pm | मधुरा देशपांडे

ऐतिहासिक संग्रह आणि संशोधनाच्या क्षेत्रात झोकुन देऊन काम करणार्‍या व्यक्तीमत्वाला सलाम. मुलाखत आवडली. धन्यवाद.

श्री. मानसिंग कुमठेकर यांच्या कार्याला, त्यांच्या चिकाटीला, जिद्दीला मनापासून दाद. किती मनस्वी, असामान्य ही माणसं. अफाट कार्य आहे.
इतक्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची अतिशय सुंदर ओळख आम्हाला करून दिल्याबदद्ल बॅटमॅन तुमचे मन:पूर्वक आभार.

अल्टिमेट काम केलस रे ब्याट्या. च्यायला ह्या मिरजेत कीती रत्ने दडून आहेत कुणास ठौक. किती मोठमोठ्या लोकांनी कौतुक केलेय त्यांचे. उनका हक बनता है भो.
इतकी जिद्द, इतकी चिकाटी अन साधारण परिस्थितीत असा छंद जोपासायचा म्हणजे हैट्ट आहे. सलाम तुम्हा दोघांना पण.

अन्या दातार's picture

10 Nov 2015 - 4:07 pm | अन्या दातार

एका अवलियाची व अनमोल कार्याची छान ओळख.

प्रचेतस's picture

10 Nov 2015 - 6:10 pm | प्रचेतस

मुलाखत सुरेखच.
मिरजेला आलो की मिरज इतिहास संशोधक मंडळाला भेट नक्कीच देणार.

बोका-ए-आझम's picture

10 Nov 2015 - 7:12 pm | बोका-ए-आझम

घेतलेली अप्रतिम अवली मुलाखत!घायल की गत घायल जाने हे अत्यंत खरं आहे!_/\_

बोकोबा
काय म्हणताय बॅटमन जखमी ?

बॅटमॅन's picture

10 Nov 2015 - 11:40 pm | बॅटमॅन

सर्व वाचकांचे अनेक आभार!!!! ह्या मुलाखतीच्या निमित्ताने कुमठेकर सरांचे काम मिपाकरांपर्यंत पोहोचवता आले ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आहे. ज्यांना मंडळाचे काम बघायचे असेल त्यांनी फेबु लिंक अवश्य पहावी अशी पुनरेकवार आग्रहाची विनंती आहे. :)

संमंचे आणि समस्त मिपाकरांचे पुनश्च आभार!!!!

आणि मिरजेस आल्यावर भेटायचे असेल तर अवश्य संपर्क करावा.

असंका's picture

12 Nov 2015 - 9:35 am | असंका

फारच सुंदर मुलाखत..एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखं वाटत होतं वाचताना...!!

अनेक धन्यवाद !!

आतिवास's picture

12 Nov 2015 - 9:57 am | आतिवास

मुलाखत आहे.
मोडी शिकायची इच्छा पुन्हा एकदा जागी झाली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Nov 2015 - 10:30 am | कैलासवासी सोन्याबापु

बॅटमॅन भाऊ

______/\______

उत्कृष्ट दस्तऐवज संग्रह आणि उत्कृष्ट मुलाखत.

यशोधरा's picture

12 Nov 2015 - 11:17 am | यशोधरा

अतिशय उत्तम मुलाखत!!

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Nov 2015 - 12:28 pm | बिपिन कार्यकर्ते

क्या बात है बॅट्या! अतिशय महत्त्वाचे काम करणार्‍या एका वेड्याची अत्यंत सुंदर ओळख करून दिलीस. वा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2015 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतिहास व संस्कृती जतन करून ठेवण्याचे लोकोपयोगी काम चिकाटीने करणार्‍या इतिहासाच्या अभ्यासकाची सुंदर मुलाखत ! अश्या तज्ञाची ओळख इथे करून दिल्याबद्दल धन्यवाद !

अप्रतिम मुलाखत! अशी ध्येय्यवेडी माणसे पाहून भारावल्यासारखे वाटते!

मालोजीराव's picture

12 Nov 2015 - 9:14 pm | मालोजीराव

मानसिंग कुमठेकर यांना मुजरा...यांना भेटायला पाहिजे एकदा. साला पण इतिहास संशोधकाच आयुष्य फार खडतर रे

राही's picture

12 Nov 2015 - 10:25 pm | राही

थक्क करणारे काम.
आणि त्याची तितकीच सुंदर ओळख.

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 10:32 pm | सानिकास्वप्निल

श्री.कुमठेकरांचे कार्य, त्यांच्या कामाची ओळख या मुलाखतमार्फे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अनेक-अनेक धन्यवाद.
उत्तम झालिये मुलाखत.

इतिहासाला वाहून घेतलेल्या एका अवलीयची भेट घडवून आणल्याबद्दल आपले आभार.
प्रत्येक फोटों मध्ये त्यांची इतिहासा बद्दलची तळमळ आणि एखाद्या गोष्टीला वाहून घेणे म्हमजे काय ते दिसते.
त्यांना नमस्कार सांगा.

विशाल कुलकर्णी's picture

13 Nov 2015 - 8:02 am | विशाल कुलकर्णी

काय अफाट माणूस आहे राव. असा काहीतरी ध्यास , काहीतरी कैफ हवा साला जगण्याला....
धन्यवाद देवा, या अवलियाची ओळख करून दिल्याबद्दल.

नाव आडनाव's picture

13 Nov 2015 - 9:00 am | नाव आडनाव

जे सगळ्यांना माहित आहेत अश्यांचं काम मोठं आहेच, पण कुमठेकर सरां सारख्यांचंही, जे तुलनेने कमी लोकांना माहित आहेत, काम तितकंच महत्वाचं आणि मोठं आहे. त्यांची मुलाखत घेऊन आम्हाला नवी माहिती देण्यासाठी धन्यवाद.

मित्रहो's picture

13 Nov 2015 - 2:57 pm | मित्रहो

ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह करुन त्यावर संशोधन करनाऱ्या मानसिंग कुमठेकर यांना सलाम. असे कार्य करऩे तितके सोपे नसते. त्यांची मुलाखत घेउन सर्व मिपाकरांना त्यांच्या कार्याची माहीती करुन दिल्याबद्दल बॅटमॅन यांचे आभार.

नाखु's picture

14 Nov 2015 - 10:07 am | नाखु

आम्ही किती भाग्यवान की तुझा व्यासंग आणि कुमठेकर सरांची अविरत धडपड धेय्यासक्ती (तुझ्या मुळे )माहीती झाली.

मुलाखतीसाठी शतशः धन्यवाद

एका व्यासंगी व्यक्तिमत्वाची सुरेख ओळख दिल्याबद्दल बॅटमॅनचे आभार ! इतिहासाबद्दल इतकी तळमळ दुर्मिळ आहे.

मुक्त विहारि's picture

14 Nov 2015 - 7:37 pm | मुक्त विहारि

हे असे काही अनवट वाचायला मिळते, म्हणून तर इथे येतो.

मग भले, आम्हाला कुणी वयात न आलेले मिपाकर, असे म्हणाले तरी हरकत नाही.

बांवरे's picture

16 Nov 2015 - 10:16 am | बांवरे

बॅटमॅन .. धन्यवाद , त्यांची मुलाखत अन्यत्रही वाचली होती. त्यामुळे कल्ल्पना होती. इथे अजून काही नवीन वाचायला मिळाले.

आदूबाळ's picture

16 Nov 2015 - 12:42 pm | आदूबाळ

फार छान मुलाखत आहे. भारीच!

नंदन's picture

16 Nov 2015 - 12:51 pm | नंदन

अतिशय आवडली. यातले काही फोटो आधी पाहिले होते (बहुतेक फेसबुकावर), पण पुन्हा पाहतानाही तितकेच विषण्ण करून गेले.

त्या माहितीच्या आधारे कॉलेजमध्ये असतानाच दैनिक तरुण भारतमध्ये 'इये मिरजेचिये नगरी' ही तब्बल ५५ भागांची लेखमाला प्रसिद्ध झाली. यात गेल्या हजारेक वर्षांत मिरज नगरीच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, संगीत, नाट्य, इ. अनेक विविध पैलूंचा परामर्श घेतला गेला.

हे संकलन कुठे उपलब्ध आहे का?

नया है वह's picture

16 Nov 2015 - 6:58 pm | नया है वह

मुलाखत आवडली

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2015 - 12:21 pm | स्वाती दिनेश

कुमठेकरांच्या कार्याची मुलाखतीतून उत्तम ओळख,
स्वाती

चांदणे संदीप's picture

17 Nov 2015 - 12:34 pm | चांदणे संदीप

आपली नोकरी आणि इतर कामे सांभाळूनही गेली वीसेक वर्षे त्यांनी अक्षरशः हजारो ऐतिहासिक कागदपत्रे, पोथ्या, प्राचीन पुस्तके, इ. अनेक ऐतिहासिक साधनांचा प्रचंड मोठा संग्रह गोळा केलेला आहे.

ह्या अवलियाला माझा दंडवत! ___/\___ आणि श्रीयुत बॅटमॅन यांना सलाम!

Sandy

कालपरवा एका मिपाकर मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने मिरजेला जाणं झालं.

बॅटमॅन बरोबर श्री. मानसिंग कुमठेकर ह्यांना प्रत्यक्ष भेटता आले, त्यांनी अपार कष्ट करुन जमवलेला संग्रह स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आला. निव्वळ अफाट इतकीच प्रतिक्रिया उमटली.

आदिलशाही अस्सल फर्माने, पटवर्धनांच्या संस्थांनांतील कागदपत्रे, अस्सल मोर्तब, शिक्के, कित्येक मोडी कागदपत्रे, भगवदगीतेची भारतातील सर्वात जुनी मुद्रित प्रत अगदी स्वतःच्या हातात घेऊन पाहता आली.

टपाल तिकिट पहिल्यांदा ब्रिटिशांनी सुरु केले तेव्हा ' हे लोक कागदावर तोंडे चिकटवत' (राणीच्या/ राजाच्या चेहर्‍याचे स्टॅम्प), डिक्शनरी पहिल्यांदा भारतात आली तेव्हा 'हे अमरकोशासारखे काहीतरी आहे', १९२० साली टाटांनी विमान कंपनी सुरु केली तेव्हा ते विमानाच्या चाचण्या मिरजजवळ घेण्यात आल्या तेव्हा ' विमान इथे उतरले त्यात एक इंग्रज आणि एक पारशी बसला होता (पारही म्हणजे स्वतः टाटा) अशा बर्‍याच गंमतीदार प्रतिक्रिया वाचावयास मिळाल्या.

जेमतेम तासा दीड तासाच्या भेटीत काय काय पाहणार, जवळपास लाखापेक्षा अधिक दस्तावेज त्यांनी जमा केले आहेत.

पिशी अबोली's picture

7 Dec 2015 - 10:57 am | पिशी अबोली

छान मुलाखत.

मिपाकरांसोबत संग्रह पुनरेकवार पाहताना खूप मजा आली. :)

शशिकांत ओक's picture

31 Mar 2020 - 9:27 am | शशिकांत ओक

यांनी बॅटमॅनना दिलेली मुलाखत वाचली. सविस्तर माहिती, फोटो पाहून आनंद झाला.
सध्याच्या काळात मानसिंग काय करतात हे समजून आवडेल. कोणाकडे त्यांचा संपर्क क्रमांक असेल तर हवा आहे.
विंग कमांडर शशिकांत ओक विमाननगर पुणे 9881901049