ठंडा करके खाएंगे!

Primary tabs

बहुगुणी's picture
बहुगुणी in दिवाळी अंक
1 Nov 2015 - 7:22 pm

.
.
एकेकाळच्या मुंबईच्या एसीपी नानासाहेबांची तरुण नातसून नेहा. नवव्या महिन्यातले पाय जडावलेली. दिवेलागणीच्या वेळी तिने तिची फोर्ड इको-स्पोर्ट गाडी रस्त्याच्या कडेच्या पार्किंग स्पॉटमध्ये सावकाश थांबवली. आधीच मागे असलेलं सीट आणखी मागे सरकवलं आणि पोटाला सांभाळत ती खाली उतरली. मागचं दार उघडून तिने दोनेक वर्षांच्या मुलीला मागच्या सीटवरून उतरवलं. रिमोटने गाडी लॉक केल्यावर मुलीचा हात धरून ती रस्त्याच्या बाजूच्या दुकानाकडे चालू लागली. डाव्या खांद्यावर जेमतेम लटकणारी उघडी बेबी-बॅग कम मोठी पर्स अशी किंमती थैली. त्यातून डोकावणारी पर्स. दुकानात शिरता शिरता काही ऐकू आलं असं वाटलं, आणि अनाहूतपणे सिक्स्थ सेन्सने तिने पर्स जवळ ओढून घेत लेकीचा हात घट्ट पकडला आणि दुकानात शिरली.

******************

रस्त्याच्या कडेला उभ्या मोटारसायकलवरच्या दीपकला मोटारसायकलला टेकलेल्या मुनीरने विचारलं, "भाई, उडाऊं क्या?"

"चूप बैठ साले! पागल है क्या?"

******************

नेहा दुकानात शिरली तसा दीपक मुनीरला म्हणाला, "फिर कभी, मियां, फिर कभी! ठंडा करके खाएंगे! जरा विचार कर, तिची गाडी पाहिलीस? गाडीवरचा रेड क्रॉस पाहिलास? पोरीचे आणि तिचे कपडे पाहिले? बॅग पाहिली? घर जबरदस्त असणार. आज गाडी उडवशील तर बाकीचा माल कधी मिळायचा? आता गाडी नाही, गाडीवालीच उडवायची!"

********************

दोन दिवसांनी क्लिनिकपाशी गाडी पार्क करून आत जाताना नेहाला तेच दोघे जण त्याच मोटरसायकलवर समोरच्या कोपर्‍यावर दिसले. याआधीही तिने त्यांना एकदा ओझरतं आदल्या दिवशी कुठेतरी पाहिल्याचं तिला आठवलं. त्यांच्याकडे वळून न पाहता ती इमारतीत शिरली. मावशीबाईंना कॉफी आणायला पाठवून ऑफिसच्या खिडकीचा पडदा किंचित किलकिला करीत मोबाईलवर तिने त्यांचा दुरून फोटो घेतला, आणि ती दिवसाच्या कामाला लागली. आठवड्यातले नंतरचे तीन-चार दिवस तिला ते दोघे एक-दोनदा दिसले. त्या शनिवारी जेवणानंतर तिने अमेय आणि ऐंशी पार केलेले आजेसासरे नाना यांच्यासमोर विषय काढला, आणि त्यांना फोटो दाखवला.

"लेट अस स्लीप ओव्हर धिस," नाना म्हणाले, "कोइन्सिडन्स नक्कीच नाही, पण तू या स्थितीत त्याची काळजी आमच्यावर सोड. उद्या बावधनकर येणार आहेतच, मी बोलतो त्यांच्याशी. तू आता फक्त येणार्‍या बाळाचा विचार कर."

********************
नानांचे पूर्वीचे पोलीस खात्यातील कनिष्ठ सहकारी आणि आज ठाण्याचे एसीपी असलेले बावधनकर शक्यतो दर रविवारी सकाळी नानांना भेटायला यायचे, तसे आजही आले. नानांप्रमाणेच अत्यंत सचोटीचा अधिकारी. खाजगी भेटीसाठी नेहमीप्रमाणे स्वत:ची खाजगी गाडी चालवतच आले. इकडचं-तिकडचं थोडंसं बोलून झाल्यावर नानांनी त्यांना थोडक्यात नेहाची शंका ऐकवली आणि तिने फोटोही दाखवला.

"नाना, उद्या-परवा ट्रेल करून परत दिसले, तर या दोघांना उचलू शकू…." बावधनकर म्हणाले.

"नाही, तसं नको. मला नेहाची तशी काही काळजी नाही. तिचे दिवस भरत आले आहेत, त्यामुळे गुरूवारीच ती बाळंतपणासाठी माहेरी नागपूरला जाईल. बुधवारीच जायची होती खरं तर, पण 'जाशील बुधी तर येशील कधी?' म्हणून तिची सासू काही तिला गुरुवारपर्यंत सोडणार नाही!" नात-सुनेकडे खट्याळपणे बघत नाना म्हणाले. "पण मला हे पीसी नाही तर ओसी वाटताहेत, तुमचं काय मत आहे?"

बावधनकरांना अनुभवी नानासाहेबांचा अंदाज पटला, पर्स वगैरेची भुरटी चोरी करणारे पेटी क्रिमिनल्स नसून आठवडाभराहून अधिक काळ थांबण्याची तयारी असलेले, खंडणीच्या उद्देशाने काम करणारे गुन्हेगारी टोळीतील ऑर्गनाईझ्ड क्रिमिनल्स असावेत. "शक्य आहे. तसं असेल तर दोघेही, किमान दोघांपैकी एखादा तरी रेकॉर्डवर असणार. उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवापर्यंत माहिती काढतो. मग उचलू शकेन."

"नको, माहिती काढा, पण उचलू नका. Follow the follower! यात काहीतरी मोठं टारगेट मिळण्याची शक्यता वाटते मला, ऐंशीच्या पुढच्या नानांचे डोळे चकाकले, "No point in biting it hot, ठंडा करके खाएंगे!"

बावधनकरांनी नेहा आणि अमेयकडे पाहिलं, "Are you both OK with this?"

अमेय काही बोलायच्या आत नेहा म्हणाली, "As long as you protect me and Rinky in Nagpur, I am fine."

"ऑफ कोर्स!" बावधनकर म्हणाले, "ते होईलच. निघतो मी आता."

निरोपाचं बोलत-बोलत दाराच्या दिशेने निघालेले बावधनकर वाटेतली खिडकी पार केल्यावर मध्येच थबकले, मागे वळून म्हणाले, "नेहा, लगेच बाहेर येऊ नकोस. नाना, मला वाटतं उद्या-परवापर्यंत थांबायची गरज नाहीये, बहुतेक तीच स्प्लेंडर गाडी समोरच्या कोपर्‍यावर उभी आहे. मी बघतो पुढे काय करायचं ते."

*********************

रविवारी संध्याकाळी पाच वाजता बावधनकरांचा फोन आला, "नेहा, उद्या एस.आय.डी.चे इन्स्पेक्टर नीलकांत घारे तुला तुझ्या क्लिनिकमध्ये भेटतील दहाच्या सुमाराला. सिव्हिलियन ड्रेसमध्येच असतील. Talk to him, he will take it further. And relax, everything will work out just fine. OK?"

"OK, thanks!"

*********************

रात्री नऊच्या सुमारास नानांनी बावधनकरांना फोन केला.

"काय हो, नाना? सगळं ठीक? How's Neha taking it?"

"Oh, she is fine. रिंकीला जेवायला घालतेय डायनिंग रूममध्ये. I am not worried about her, she is tough!"

"I know she is tough, अखेर नातसून कोणाची आहे?"

नाना हसले, म्हणाले, "Your praise is well-taken, पण त्यात माझा सहभाग शून्य आहे. This is her own inner strength, and I am glad she is keeping it all together at this stage of her pregnancy. Anyway, मला काहीतरी वाचलेलं आठवलं म्हणून फोन करतोय, हा दीपक शिर्के गजा उभेच्या टोळीतला ना?"

"तुमचं पेपर वाचन एकदम करंट आहे, नाना, दाद द्यायला हवी! उभेची टोळी गाड्या चोरणारी, हा शिर्केही एकदा खडी फोडून सुटला होता ५ वर्षांपूर्वी…. "

"हो ना? मग हा शिर्के नेहाला टारगेट करतोय की तिच्या गाडीला?"

"कदाचित गाडीही असेल, पण चान्स घेण्यात अर्थ नाही."

"अर्थात! पण मी असंही वाचल्याचं आठवतंय की हा शिर्के आणि उभे यांच्यात काही बेबनाव झाला होता?"

"हेही परफेक्ट! शिर्केचं उभेशी काही वाजल्यावर त्याने 'मी याला उभ्याचा आडवा करीन' म्हणून वल्गना केली होती, पण नंतर बहुतेक काही patch-up झालं असावं…."

"असेल, किंवा उभेला अंधारात ठेवून या शिर्केचा स्वत:चा काही diversificationचा plan असेल."

"Good thinking, दोन्ही angles follow करतो आम्ही."

"Thanks. मी झोपण्याआधी माझ्या डोक्यातला किडा बाहेर काढला, इतकंच, good night!"

*********************

सोमवारी दहाच्या सुमाराला स्टेट इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचे घारे नेहाला भेटले. सावळा, तरतरीत तरुण, लक्षात राहील अशी शोधक नजर. "नमस्कार, डॉक्टर! मी नीलकांत घारे."

"Many thanks for coming, Neelkant. Please call me Neha."

"सांगायलाच हवं म्हणून सांगतो, मी तुमचे आजे-सासरे नानासाहेब माने यांचा खूप वर्षांपासून चाहता आहे, सर माझ्या दोन पिढ्या आधीचे, पण त्यांच्या अनेक केसेस आजही पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकवल्या जातात, आणि त्यांचं दहा वर्षांपूर्वी नक्षलाईट अविनाशला एक चांगला सिव्हिलियन म्हणून कन्व्हर्ट करणं तर लेजंडरी आहे. वन फिश अ‍ॅट अ टाईम..या केसमध्ये त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं ही मी अभिमानाची गोष्ट समजतो."

"हो, मलाही नानांचा खूप अभिमान आहे. आणि बावधनकर काकांनी तुमची मदत घेतली आहे यावरूनच तुम्हीदेखील केपेबल असणार याचा अंदाज आहे."

"वेल, मी एकटा नाहीये, बावधनकर सरांनी त्यांचे अतिशय मर्जीतले सब-इन्स्पेक्टर शिंदे माझ्या मदतीला दिले आहेत, यातच बरंच काही आलं. तुम्ही रिपोर्ट केलेल्या दोघांवर शिंदेंचा कालपासून राऊंड द क्लॉक सर्व्हेलन्स आहे. तुम्ही निश्चिंत राहा, इतकंच सांगेन."

कॉफी घेता-घेता नीलकांतने नेहाला अपडेट दिला. बावधनकरांनी नोट केलेल्या स्प्लेंडरच्या नंबरवरून शिंदेंनी अधिक माहिती मिळवली होती.

"दोघांपैकी एक रेकॉर्डवरचा आहे, दीपक शिर्के. दुसरा नव्हता, पण आता असेल, मुनीर शेख. दोघांच्याही पाळतीवर आमचे लोक आहेत, आणखी लिंक्स मिळतीलच, तुम्ही काळजी करू नका, बावधनकर सरांना कन्सल्ट करून लागलंच तर योग्य वेळी दोघांना आत घेऊ. तुम्ही ठरल्याप्रमाणे नागपूरला जा, आणि इथली काळजी माझ्यावर सोडा."

*******************

1
.
.
नीलकांतच्या पल्सरवर तो आणि शिंदे दीपक आणि मुनीरच्या पाळतीवर होते. योग्य अंतर राखून ते दोघे गेला अर्धा तास दीपक जाईल तिथे फिरत होते. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास दीपक आणि मुनीर एका हॉटेलात जेवायला थांबले. बाहेर थांबलेल्या नीलकांतने शिंदेंना विचारलं,

"शिंदे, तुम्ही स्प्लेंडरच्या मड फ्लॅपवर काय आहे ते वाचलंत?"

"हो, राज ग्रीनव्हिलची जाहिरात होती, मीही विचार करतोय, हे नाव कुठं पाहिलंय आधी? मुरबाड भागात पाहिल्याचं आठवतंय… जरा थांबा, एक फोन करून बघतो."

त्यांचा कुणालातरी फोन झाल्यावर शिंदे म्हणाले, "सर, माझा अंदाज बरोबर निघाला. राज ग्रीनव्हिल नावाची एक नवी हौसिंग डेव्हलपमेंट होऊ घातलीये मुरबाडच्या पूर्वेला. एम.आय.डी.सी.नंतर मुरबाड-कर्जत हायवेवर ४-५ किलोमीटरवर त्या ग्रीन ड्रीम, ग्रीन पॅराडाईज वगैरे सुरू आहेत नं, त्याच्या थोडं आणखी पुढे या स्कीमचे बोर्ड पहिले होते. अजून बांधकाम काही नाही."

नीलकांतने हॉटेलच्या दाराकडे पाहिलं, आत गेलेले दोघेही अजून आतच होते.

"शिंदे, असं करा, तुम्ही चटकन एक अनमार्क्ड गाडी मागवा, आणि या दोघांना फॉलो करत राहा. मी मुरबाडकडे चक्कर मारून येतो."

शिंदेंचा ऑफिसला फोन झाल्यावर दहाच मिनिटांत हाँडा सीडी ११० ड्रीम दुचाकी घेऊन एक साध्या कपड्यांतील हवालदार आले, तिघांचं बोलणं होतंय ना होतंय इतक्यात हॉटेलातून दीपक आणि मुनीर बाहेर पडून त्यांच्या स्प्लेंडरकडे निघालेले नीलकांतला रिअर व्ह्यू मिररमध्ये दिसले. ते निघताच शिंदे ११० ड्रीम घेऊन त्यांच्या मागे निघाले, आणि त्यानंतर दोनच मिनिटांत नीलकांतही निघाला.

*******************

नीलकांतची पल्सर मुरबाड-कर्जत हायवेवर एम.आय.डी.सी. ओलांडल्यानंतर ४-५ किलोमीटरवर उजवीकडे संभाजीनगरकडे जाणारा रस्ता गेल्यावर डावीकडे एका गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर राज ग्रीनव्हिल हौसिंग डेव्हलपमेंटची फ्लेक्स जाहिरात होती. ती फॉलो करत नीलकांत वळला. थोड्याच वेळात एक गाव लागलं. गावातल्या दर ३-४ दुकानांवर वा बैठ्या घरांवर तसेच फ्लेक्स लागले होते. पन्नास-एक तरी फ्लेक्स दिसले असतील नीलकांतला. प्रत्येक फ्लेक्सवर शुभेच्छुक म्हणून एकच नाव होतं - राजेंद्र काबरे. आणि तळाशी तिशीतल्या एका दाढीधारी व्यक्तीचा फोटो. ही व्यक्ती कोण आहे हे एखाद्या दुकानात विचारायचा मोह नीलकांतने टाळला, आणि तो गावाच्या अखेरीस असलेल्या प्रकल्पाच्या साईटकडे गेला.

बांधकाम जवळजवळ शून्यच, पण साईट ऑफिसवर मात्र थोडी वर्दळ होती, सुटीचा दिवस नसतांनाही ४-५ संभाव्य ग्राहक माहिती घेण्यासाठी आलेले दिसले त्याला. आणखी थोडा वेळ गावातून फेरफटका मारून तो परत वळला. वाटेत मुख्य रस्त्याजवळच्या फ्लेक्सपाशी कुणी नाही हे पाहून त्याने मोबाईलमध्ये एक फोटो घेतला. ठाण्याच्या दिशेने परतताना नीलकांतच्या लक्षात आलं की तसेच फ्लेक्स वाटेत आणखी काही ठिकाणी लागलेले होते.

ठाण्यात नीलकांतची पल्सर नौपाडा रोडवरच्या 'अभिजित ग्राफिक आर्ट अँड फ्लेक्स प्रिंटिंग'समोर थांबली. अभिजितने हातातलं काम थांबवून नीलकांतला केबिनमध्ये नेलं. पुण्याला अभिनवमध्ये ग्राफिक आर्ट्समध्ये डिप्लोमा आणि मग जे.जे.मधून प्रथम वर्गात डिग्री केलेला अप्रतिम कलाकार, पण कित्येक वर्षांनी अगतिक होऊन त्याचा बहुतांश वेळ फ्लेक्स प्रिंटिंगमध्ये जायचा. "या साल्या गुंठा मंत्र्यांनी इझी मनी वापरून फ्लेक्स छापण्यात प्रिंटिंग हा व्यवसाय इतका अभिरुचीहीन केलाय की दुर्दैवाने ग्राफिक आर्ट्सपेक्षा जास्त पैसा फ्लेक्स प्रिंटिंगमध्ये आहे.." अभिजित नीलकांतला म्हणायचा.

नीलकांतने त्याला मोबाईलमधला फ़ोटो दाखवला.

"हे तुझं काम नाहीये हे छपाईतल्या चुका पाहून लक्षात आलंच माझ्या, पण कुणाचं आहे, आणि पैसा कुणी पुरवलाय याची माहिती काढशील संध्याकाळपर्यंत?" अभिजित हो म्हणाल्यावर नीलकांत निघाला.

****************

संध्याकाळी अभिजितचा फोन आला, "नीलकांत, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याआधी तुझं थोडं प्रबोधन करतो. हे जे फ्लेक्स लागतात ना, ते क्वचित कधी राजकीय पार्टीला, पण बहुतेक वेळा स्वत:ला promote करण्यासाठी लावले जातात. तू ते वाढदिवसाच्या शुभेच्छांचे वगैरे फ्लेक्स पहिले असतीलच. आमदार ताईचे किंवा दादांचे वाढदिवस आले की वॉर्डा-वॉर्डांमध्ये असे फ्लेक्स लागतात. यांत त्या ताई किंवा दादांचे चेहेरे डावीकडे मोठ्या आकारात, तर 'शुभेच्छुकां'चे चेहेरे उजवीकडे खाली निम्म्या आकारात असतात. हे शुभेच्छुक म्हणजे ज्यांना त्या वॉर्डांमध्ये नगरसेवक म्हणून तिकिट हवं असतं, ती मंडळी. हे शुभेच्छुकच अशा फ्लेक्सचा खर्च उचलतात. अर्थात, तो दाम ते त्या वॉर्डांमधल्या व्यावसायिकांकडून साम-दंड-भेद वापरून वसूल करतात, हे आपल्या लोकशाहीचं दुर्दैव!

असो. तर हा राजेंद्र काबरे म्हणजे त्या गावातला गुंठा मंत्री, पिढीजात मिळालेली २०-१ एकर जमीन एन.ए. करून घेऊन आता तो प्लॉट बिल्डिंग कॉम्प्लेक्स करायला वापरणार आहे, आणि मला प्रिंटरकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने पैसे cash न देता पेमेंट in-kind केलंय, ज्यात प्रिंटरची बर्‍यापैकी चांदी झालीय. Let me explain, फ्लेक्सचं कापड, निरनिराळ्या inks वगैरे आम्हाला लागणारी सामग्री मुख्यत: उत्तर प्रदेशातून किंवा आंध्रातून येते. Obviously, मुळात या गोष्टी हल्ली चीनहून येतात. या काबरेने म्हणे डायरेक्ट इंपोर्ट करून त्या प्रिंटरला वर्षभराचा साठा पुरवलाय. आता बाकीची माहिती तू काढशीलच."

******************

मंगळवारी सकाळी साध्या वेषातले सब-इन्स्पेक्टर शिंदे काबरेच्या गावात होते. थोड्या वेळात एक चक्कर मारून त्यांनी एका फ्लेक्सच्या मागे नाव जवळजवळ लपलेलं कटिंग सलून शोधलं आणि ते आत गेले. आत फक्त एक टिळा लावलेला म्हातारा न्हावी खुर्चीवर बसलेला, बाकी दुकान रिकामं.

"काका, दाढी करायचीय, चालूये ना? गर्दी नाहीये म्हणून विचारलं बरं का!"

"उघडलंय ना? मग करतो की, या बसा." म्हणत म्हातार्‍याने सामान जमा करायला घेतलं.

गप्पा मारताना शिंद्यांनी फ्लेक्सचा विषय काढला. एकदा दुकानाच्या बाहेर चक्कर टाकून म्हातारा म्हणाला, "मी माळकरी हाय, खोटं कशापायी बोलू? जे काही चाललंय ते बरं न्हाई इतकंच कळतं."

शिंद्यांना कळलं ते असं : काबरे म्हणे सिव्हिल इंजीनिअरिंगमधला कुठलातरी कोर्स करून नोकरीसाठी कलकत्त्याला ५-६ वर्षं राहिला, आणि मग गावात ६ महिन्यांपूर्वी आला तो एकदम बिल्डर म्हणूनच. दोन महिन्यांपूर्वी त्याने गावातल्या पन्नास-एक दुकानदारांना महिन्याला पाच हजार या हिशोबाने पूर्ण वर्षासाठी साठ हजार रुपये एकरकमी cash देऊ केले. ज्यांनी गाडीवर, रिक्षावर किंवा मोटरसायकलवर जाहिरात लावली, त्यांनाही अशाच हजार-हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या होत्या.

"इचार करा, महिन्याला ५-१० हजार मिळवणार्‍या दुकानदारान्ला यकदम साठ गुलाबी गांधी मिळाले, कोण नेकीनं काम करील? समद्या गावाची नासाडी व्हनार हाय!"

"एवढे पैसे मिळालेत तर दुकानांमध्ये काही श्रीमंती बदल दिसत नाहीत?" शिंद्यांनी विचारलं.

"आनखी महिनाभर खरचायचे न्हाई आन ब्यांकेत टाकायचे न्हाई म्हने, आनि नंतर खरचायचे तर पुन्या-मुंबईत जाऊन. मला तर काही काळंबेरं वाटतंय यामागे. आन मी पडलो माळकरी, तो वंगाळ पैसा असंल तर मी खरचनारच न्हाई, बाजूला ठिऊन दिलाय!"

एव्हाना दाढी संपलेली होती.

शिंद्यांनी म्हातार्‍याला आपलं आय.डी. दाखवलं आणि विश्वासात घेऊन एक नोट पाहायला मागितली. म्हातार्‍याने आतून एक आणून दिल्यावर त्यांनी त्याला पाचशेच्या दोन नोटा दिल्या, दाढीचे पैसे दिले आणि मग त्याला आपल्या भेटीविषयी गुप्तता बाळगण्याची विनंती केली आणि ते गावातून निघाले. हायवेला लागण्याआधी त्यांनी नीलकांतला फोन लावला.

******************

मध्यंतरीच्या वेळात शिर्के आणि मुनीर नेहाच्या क्लिनिकसमोर जाऊन थांबले. ती क्लिनिकमध्ये कामात आहे याची खात्री करून घेतल्यावर शिर्केने मुनीरला समोर कोपर्‍यावर उभं केलं आणि गाडीवर टांग मारून तो दहा मिनिटांवरच्या अर्बन बँकेकडे गेला. नीलकांत दुचाकीवर त्याच्या मागोमाग गेला. गाडी बँकेबाहेर लावून शिर्के आत गेला, तसा नीलकांत समोरच्या फ़ुटपाथपाशी थांबला. शिर्के आत जाता-जाता त्याच्या फ़ोनची रिंग वाजली. शिंदे त्याच्याशी मिनिटभर बोलले. नीलकांतचा चेहर्‍यावरचा उत्साह पाहण्यासारखा होता. दोघांनी दुपारी जेवणाच्या वेळेत भेट ठरवली. पाचच मिनिटांनी शिर्के बाहेर आला, तेव्हा त्याचा चेहेरा संतापाने फ़ुललेला होता, त्याने तरातरा मोटरसायकलकडे जाऊन मागे लावलेलं स्टिकर ओरबाडून काढलं आणि चुरगाळून फ़ेकून दिलं. आतून बँकेचा रखवालदार बाहेर येतो आहे असं दिसताच शिर्के घाईघाईने किक मारून निघाला. नीलकांत क्षणभरच त्याच्या मागे जावं, की बँकेत जाऊन काय घडलं ते विचारावं, अशा द्विधा मन:स्थितीत होता, पण थबकून, गाडी लॉक करून तो बँकेत शिरला. आय.डी. दाखवून त्याने कॅशियरची भेट घेतली. तिथे मिळालेली माहिती ऐकून त्याच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.

****************

जेवणानंतर तासाभरात नीलकांत आणि शिंदे, नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधील निवृत्तीनंतर ठाण्यात स्थायिक झालेल्या विजय हिंगे या प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्टना जाऊन भेटले. त्यांनी ती नोट दाखवून त्यांचं मत घेतलं. दुपारी दोन वाजताची अपॉइंटमेंट घेऊन ते दोघे आणि बावधनकर, नानांना भेटायला त्यांच्या घरी गेले. सगळे बसल्यावर शिंदेंनी गावात कळलेली माहिती दिली आणि नीलकांतने बँकेतील घटना वर्णन केली, आणि अखेरीस खोट्या नोटेची शहानिशा सांगितली.

"Great policing! Very nice!", नाना म्हणाले, "निदान तीस लाखांच्या खोट्या नोटा बांगला देश-कलकत्ता-मार्गे आल्यात, आणि त्यात या काबरेचा महत्त्वाचा सहभाग स्पष्ट आहे. एक उघड आहे की गाडीवर जाहिरात केल्याच्या बदल्यात खोटी नोट देऊन काबरेने शिर्केलाही फ़सवलं आहे, ते त्याला कळलं म्हणून तो चिडला. आता तो आणि काबरे पुढे काय करतात ते पाहा."

********************

उरलेला मंगळवार शिंदे काबरेच्या पाळतीवर, तर नीलकांत शिर्केच्या मागावर राहिले. काबरे कोण आहे याचा मागोवा घेतल्यावर शिंद्यांना तो त्याच्या क्यू ४ ऑडी गाडीने आधी साईट ऑफिसकडून ठाण्याकडे गेलेला दिसला. तिथून संध्याकाळी तो पुण्याकडे निघालेला कळल्यावर त्यांनी आणखी एका सहकार्‍याला त्याच्या मागे पाठवलं. नीलकांतने शिर्केला नेहाच्या क्लिनिकला फॉलो केलं. तिथे तो मुनीरशी बोलत असताना नीलकांत मोटरसायकल कोपर्‍यावर थांबवून उभा होता. त्याचं लक्ष शिर्केकडे असताना अनपेक्षितपणे एक पोलीस व्हॅन त्याच्या मागे थांबली आणि आतल्या एका सब-इन्स्पेक्टर आणि हवालदाराने उतरून नीलकांतला सॅल्यूट केला. शिर्के आणि मुनीरने ते पाहिलं, आणि क्षणार्धात् दोघेही त्यांच्या दुचाकीवर स्वार होऊन पसार झाले. आपलं कव्हर उघडकीला आल्याचं नीलकांतच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

पुढचे दोन दिवस कायम पाळतीवर राहूनही शिर्के आणि मुनीर नेहाच्या वाटेला जाताना दिसले नाही. गुरुवारी दुपारी नेहा ठरल्या वेळी नागपूरला निघाली, पण तोवर शिर्के-मुनीर दुकलीने तिचा नाद सोडल्याचं आणि त्यांच्याकडून तिला धोका नसल्याचं स्पष्ट झालं होतं.

******************

शुक्रवारी दुपारी दोन वाजता नीलकांत बावधनकरांच्या केबिनमध्ये होता,

"सर, काबरेला फॉलो केलं होतं. तो खारघरला एका घरी जाऊन ज्या बाईला भेटला, तिचा नवरा फिरदोस दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात फरासखाना हद्दीत एका धाडीत सापडला होता. आता कलकत्ता पोलिसांच्या ताब्यात आहे. रात्री उशिरा फिरदोस आणि एक साथीदार रिक्षावाल्याला सुटे पैसे न देता पाचशेची नोट देऊन वादावादी करताना बीट पोलिसांनी पाहिलं, तर फिरदोस पळू लागला. पकडल्यावर त्याच्याकडे १८ हजारांवर काउंटरफिट नोटा सापडल्या. बांगला देश आणि बंगालमधून होणार्‍या ट्रॅफ़िकचा भाग वाटला, म्हणून NIA ती केस फॉलो करते आहे."

National investigation agencyने इंटरेस्ट घेतलाय म्हणजे प्रकरण साधं नसावं, हे बावधनकरांच्या चटकन लक्षात आलं. त्यांनी NIAच्या बारिया साहेबांना फ़ोन केला. त्यांनी NIAचा तपास पुण्यातल्या अटकेनंतर कलकत्त्याला जाऊन थबकला असल्याचं आणि पुढे लीड्स नसल्याचं सांगितलं. तेव्हा बावधनकरांनी त्यांना ठाण्यात आणि मुरबाडमध्ये मिळालेली माहिती दिली. पुढच्या तासाभरातच NIA, एस.आय.डी. आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत काबरे, शिर्के आणि त्यांचे इतर साथीदार जाळ्यात सापडले. संध्याकाळी खास विमानाने मुंबईत आलेल्या कमिशनर बारियांनी नानांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि ही केस सोडवण्यात महत्त्वाचा वाटा घेतल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

"And I loved what you told Mr. Bawdhankar! No point in biting it hot, ठंडा करके खाना ही सही था!" बारिया म्हणाले.

1

(चित्रे: आंतरजालावरून साभार)
.

प्रतिक्रिया

आतिवास's picture

10 Nov 2015 - 2:44 pm | आतिवास

नेहमीप्रमाणे रोचक कथा.

पीशिम्पी's picture

10 Nov 2015 - 6:02 pm | पीशिम्पी

ही कथा ही छान पण "वन फिश अ‍ॅट अ टाईम " सुपर्ब.

बोका-ए-आझम's picture

10 Nov 2015 - 6:48 pm | बोका-ए-आझम

पण बहुगुणीजी, नानासाहेब आणि बावधनकरांशी आमची भेट फक्त दिवाळीतच घडवून आणू नका. आम्हाला ते वर्षातून अजून बरेच वेळा भेटले तर आवडेल!

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2015 - 10:37 pm | प्रीत-मोहर

Bokeravanshi sahamat

एस's picture

12 Nov 2015 - 11:42 pm | एस

preemotaainshi sahamat

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2015 - 8:34 pm | मधुरा देशपांडे

मस्त.

मनिमौ's picture

10 Nov 2015 - 8:38 pm | मनिमौ

पोलीस कथांची पंखी
मनिमौ

पैसा's picture

10 Nov 2015 - 9:56 pm | पैसा

जबरदस्त! मस्त प्लॉट विणलाय! अजून खूप कथा येऊ देत अशा.

भारी !
उत्कंठावर्धक !! आवडली!

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 10:22 pm | अभ्या..

एकदम खत्तरनाक जमलीय कथा. परफेक्ट बहुगुणी स्टाईल.
.
.
(अ‍ॅक्चुअली अशा जाली नोटांच्या किश्श्याला अनुभवलेला ग्राफीक आर्टिस्ट अभिजीत)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2015 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुगुणी-स्टाईल रहस्यकथा... आवडली !

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 10:39 pm | टवाळ कार्टा

मस्त

प्रभाकर पेठकर's picture

12 Nov 2015 - 6:08 pm | प्रभाकर पेठकर

कथा आवडली. रहस्य आहेच पण पुन्हा एकदा वाचावी लागणार. डॉ. नेहावर हे दोघे का लक्ष ठेवून होते ते मात्र कळले नाही.

एक एकटा एकटाच's picture

13 Nov 2015 - 5:17 pm | एक एकटा एकटाच

माझ्यामते त्यांना नेहाला किडनेप करायच होत.

मुक्त विहारि's picture

12 Nov 2015 - 6:26 pm | मुक्त विहारि

मस्त...

रेवती's picture

12 Nov 2015 - 11:54 pm | रेवती

कथा चांगली आहे पण मागील वर्षीची जास्त आवडली होती.

एक एकटा एकटाच's picture

13 Nov 2015 - 5:20 pm | एक एकटा एकटाच

मस्त मस्त मस्त

नूतन सावंत's picture

13 Nov 2015 - 6:53 pm | नूतन सावंत

पोलीस कथा नेहमीच आवडतात.हि सुद्धा आवडली.पण ते नेहाच्या पाळतीवर का होते?

नाखु's picture

14 Nov 2015 - 2:38 pm | नाखु

मस्त कथा

स्वाती दिनेश's picture

14 Nov 2015 - 7:50 pm | स्वाती दिनेश

'दक्षता' वाचत असल्याचा फिल आला,
स्वाती

स्नेहांकिता's picture

14 Nov 2015 - 8:00 pm | स्नेहांकिता

खरंच दक्षता आठवला खूप वर्षांनी !

यशोधरा's picture

14 Nov 2015 - 8:09 pm | यशोधरा

मस्त कथा! अजून येउद्यात.

अरुण मनोहर's picture

15 Nov 2015 - 2:10 pm | अरुण मनोहर

प्लॉट आवडला !

दमामि's picture

28 Nov 2015 - 10:55 am | दमामि

मस्त!

अद्द्या's picture

28 Nov 2015 - 4:48 pm | अद्द्या

भारीच

उगा काहितरीच's picture

28 Nov 2015 - 5:25 pm | उगा काहितरीच

कडक !