शिरवळ्या /शेवया.

इन्ना's picture
इन्ना in पाककृती
23 Oct 2015 - 4:32 pm

मी पाककॄती ह्या सदरात काही लिहीतेय ह्याच मलाच खरतर जाम हसू येतय .
त्यातही हा पदार्थ कोकणातला फार खटाटोपाचा. मुद्दम इथे लिहितेय कारण एक हाती पाऊण तासात बनवून उत्तम ( आजीची आठवण झाली वगैरे कॉम्पीमेंट्स मिळवण्याइतका ) झाला .

दसर्‍याला सहसा बासुंडी करतात आमच्या घरी. ह्यावेळी वेगळ काही कराव म्हणून हा घाट घातला . ( घाट घातला म्हणजे कसं भारदस्त , खूप कठीण पदार्थ जन्माला घातल्याचा फील येतो ;) ) माझ्या स्वैपाकघरातल्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असल्यानी , आयत्यावेळी श्रिखंड आणायच मनात योजून ठेवल होतं . आता नमनाला घडाभर तेल झाल्यावर मुळ विषयाकडे वळू.

आजची रांगोळी दुर्गेची काढून , दसर्‍याची सुरवात केली
durgaa

कोकणातल्या लोकाना हा पदार्थ माहित असेल , बाकिच्यांसाठी थोडाक्यात वर्णन म्हणजे , तांदळाच्या उकडीच्या शेवया अन नारळाचा गुळ घालून रस.

लागणार साहित्य - शिरवळ्यांसाठी/ शेवयांसाठी
१) तांदळाच पिठ, - ५ वाट्या
२) उकडीसाठी पाणी - ५ वाट्या
३) तेल -४ चमचे
४) चवी पुरत मिठ.
५) सगळ्यात महत्वाचा तो शेवगा उर्फ मोठा सोर्‍या.

साहित्य - रसासाठी
१) कोकोनट मिल्क पावडर ( इथे मॅगीची मिळते)/ तयार नारळाच दुध .
२) कनक गुळाची पावडर
३) वेलची / जायफळ वगैरे जो स्वाद आवडत असेल त्याप्रमाणे.

तांदळाच्या पिठाएवढ पाणी काटेकोर मोजून जाड बुडाच्या पातेल्यात तेल अन मिठ घालून उकळायला ठेवायच. त्यात मोजलेले तांदळाच पिठ घालून वरून झाकण ठेवायच. सुगरणींना सुचना दोन वाफा काढायच्या. पण आपण त्या क्याट्याग्रीत नसल्यानी अन वाफा दोनदा कश्या मोजायच्या ते न कळत असल्यानी , दहा मिनिटानी उकड झाल्याच जाहिर करायच. हवतर त्या मधे दोन दा झाक ण उघडून पहायच , वाफ बाहेर येते. दोनदा. :)

ही झालेली उकड साधारण अशी दिसते.

ukad

हे झाल की सोर्‍या उर्फ शेवगा असेंबल करून घ्यायचा. खास बेळगाव हून बाबां नी आणलाय. सुरेख पितळी कास्टींग आहे. नट बोल्ट अन पान्हा सगळ किट अगदी देखणं.

shevagaa 1

असेंबल करून असा दिसतो .

shevagaa 2

हे सगळ करेपर्यंत सोर्‍यात बसतील अश्या आकाराचे उकडीचे लांबट गोळे करून ठेवायचे.
ते साधारण असे दिसतात.
ukaD 3

मग एका पोठ्या पातेल्यात पाणी ककळत ठेउन त्यात हे गोळे सोडायचे. परत सुगरण लोकं हे वाफवून घेतात मोदक पात्रात. पण परत आपण त्या गटात मोडतच नसल्यानी अन वाफ मापक यंत्र नसल्यानी दोन वाफा चार वाफा मोजत बसण्या पेक्षा गटांगळ्या खाणारे गोळे जमतात. हे बुडाला बसलेले गोळे तरंगायला लागले की झाले अस समजायच.

ukaD 4

पहिल्यांदा करताना, उकळून पाणी गढूळ पांढर होउन , बुडाशी दिसणारे गोळे , दिसेनासे होतात.

ukad 5

अरेरे हुकल बहुतेक, आम्रखंडाचे डबे आणायला पाठवाव का ? कशाला नसते उद्योग ओढवून घेते मी ? वगैरे सैर करून आपण येइपर्यंत पहिला गोळा तरंगायला लागतो.

gola

झालेला गोळा असा तुकतुकीत दिसतो.

हुश्श ! म्हणून एका ताटात काढायचे. इथून पुढचा कार्यक्रम फास्ट होतो. चला , पानं वाढलीत च्या हाका मारून लोक स्थानापन्न होईपर्यंत आपण पहिला गोळा शेवग्यात घालायचा. दुसर्‍या वेळी बनवता तेव्हा हा गटांगळ्या वेळ रस करायला सत्कारणी लावायचा . तयार नारळाच्या रसाच पाकिट मिळतं अथवा पावडर मिळते. पावडरीच्या खोक्यावर पाणी किती त्याच प्रमाण लिहिलेल असतं . अश्या बनवलेल्या रसात आपल्या चवी प्रमाणे गुळ घालायच. मी कनक गुळाची पावडर वापरते . खडे विरघळायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात गुळ विरघळून रस तयार होतो. मी कोणताही वेगळा स्वाद ह्यात घालत नाही पण वेलदोडा/ जायफळ पारंपारिक कृतीप्रमाणे घालता येइल. ( दालचिनी जर्रा कंटेंपररी :) )

ras

तर अश्या रितीने तयारी पुर्ण झाल्यावर , शेवग्यातून प्रॉडक्शन सुरु करायच. मग ऑस्ट्रेलियन शेफ च्या कार्यक्रमात कॉन्टेस्टंटा नी पेश करावेत अश्या थाटात आपण शिरवळ्यांची डिश समोर करायची. समोरचेही स्वतः मोठे ज्युरी असल्याच्या थाटातच बसलेले असतात . पण शिरवळ्या अन रसाचा पहिल्या घासाबरोबर नानी याद आती है. :) ह्या शेवग्यातून शिरवळ्यांचे घाणे काढणे अक्षरशः बच्चोंका खेल आहे. त्याना तो खेळू द्यावा. :)

shevayaa

finished

माझ्या लहानपणी आजी , उन्हाळ्याच्या सुटीत सगळा गोतावळा जमला की हा घाट घालायची. तेव्हा लाकडी शेवगा होता अन त्यातून शिरवळ्या करने हे मजबूत खांदे असलेल्यांच काम असायच. अन नारळाचा रस देखिल नारळ खवून , वाटून , गाळून वगैरे लांबलचक क्लिष्ट अन वेळखाउ कार्यक्रम होता. मागणी अन पुरवठा ह्यात तारांबळ व्हावी इतका गोतावळा असायचा . शेवग्या चे खूर धरायला एक , गोळे घालायला एक अन शिरवळ्या करायला एक, रस करणारी आजी ( बाकीचे सगळे पातळ पुळकावनी करतात अस वाटायच तिला. ) गप्पा, गाणी , चिडवाचिडवी , अन खाउन तुडूंब आहोत तिथेच आडवे व्हावे इतक आग्रहानी खायला घालणारी आज्जी. एक सुरेख अन फुलफिलिंग ( पोट अन मन दोन्ही) कार्यक्रम !
कालच्या शिरवळ्या सोप्प्या होत्या , चव सेम!! फक्त वातावरण निर्मिती करायला गोतावळा नव्हता एवढीच खंत. पोटं भरल पण मनासाठी आठवणीच फक्त.

प्रतिक्रिया

मितान's picture

23 Oct 2015 - 4:41 pm | मितान

व्वा ! अप्रतिम !!!
फोटू न लेखन रसाळ !!!
बाकी 'इडिआप्पम' ची आठवण आली !!

मस्त! लेखन व पदार्थ दोन्ही आवडले.

एस's picture

23 Oct 2015 - 5:16 pm | एस

असेच म्हणतो.

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2015 - 12:04 pm | स्वाती दिनेश

रेवतीसारखेच म्हणते.
स्वाती

मीता's picture

23 Oct 2015 - 4:58 pm | मीता

अप्रतिम

सानिकास्वप्निल's picture

23 Oct 2015 - 5:16 pm | सानिकास्वप्निल

आई आई गं !! रस-शेवया...जीव गेला आता...

भारी लागतात हे , कोकणात नाश्त्याला करतात आमच्याकडे.
फोटो भारी !!!

या शेवया आणि आमरस असे काँबि ही मला खूप आवडते खायला :)

मधुरा देशपांडे's picture

23 Oct 2015 - 5:25 pm | मधुरा देशपांडे

पाकृ आवडलीच, पण वर्णन त्याहुन जास्त आवडलं. :)

नूतन सावंत's picture

23 Oct 2015 - 6:14 pm | नूतन सावंत

पाककृती आवडली.आणि तीतून झळकणाऱ्या आठवणी जास्त आवडल्या.लेखनशैली आवडली हे वेअगळे सांगायला नको.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2015 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

फार पूर्वी, म्हणजे आजीच्या जमान्यात, असे काही खायला मिळायचे. आज त्याची आठवण आली !

माझ्या साठीही शिरवळ्या हा नॉस्टॅल्जेयात पाठवणारा पदार्थ , अनेकांसाठी तो तसा असेल म्हणून लेखनप्रपंच. :)
सगळ्याना पतिसादाबद्दल धन्यवाद.

भारी!! बरेच दिवस नाही केल्यात मी..

अंतरा आनंद's picture

23 Oct 2015 - 6:44 pm | अंतरा आनंद

आहा माझा आवडता पदार्थ. माझी आई अजूनही करते कधीमधी.

चतुरंग's picture

23 Oct 2015 - 7:06 pm | चतुरंग

कधीच चाखलेल्या नाहीत पण वर्णन वाचून अंदाज आला की काय जोबर्‍या प्रकर्ण असणार आहे ते.
(बालागा)रंगा

मस्त लिहिलीये पाकृ. खाऊन पाहाणे आले!

इडली डोसा's picture

23 Oct 2015 - 7:50 pm | इडली डोसा

माझ्या सासरची खास पाकृ आहे ही. कसलीही पुजा किंवा कोणि खास पाहुणे येणार असतील तर ही पाकृ असतेच गावाकडच्या घरी (उडपीला). पण आमच्य शेवग्यातुन शेवया पाडायला फार जोर लागतो. बच्चोंका खेल तर आजीबातच नाही.

इन कम's picture

23 Oct 2015 - 8:05 pm | इन कम

रेसेपी आणि सोऱ्या दोन्ही आवडलं

पैसा's picture

23 Oct 2015 - 10:14 pm | पैसा

पाककृती आणि लिहायची श्टैल!! लाजवाब!

यशोधरा's picture

23 Oct 2015 - 10:48 pm | यशोधरा

मस्त :)

मोगा's picture

24 Oct 2015 - 7:58 am | मोगा

मस्त

साउथ मधे हाच पदार्थ इडीअप्पम या नावाने मिळतो.

वा अगदी जबराट प्रकार दिसतोय हा, या जन्मी करुन बघावा म्हणते , जमलाच तर फोटु ईथेच ड्कवीन अनायसे २ नारळ आहेत घरात त्याच काय करायच ? बर्फी लाडु तेच तेच प्रकरन नको वाटतेय, ह्ये काय तरी ब्येस्ट
असनार चविला :)
एक शन्का ताण्दुळ कुठला घ्यावा की कुठलाही चालेल ?
आमच्याकड्च्या पितलेच्या सोर्‍याने शेवेच्या चकतिने जमेल ना हे ? रेटायला जड नाही जाणार ना
( कुर्ड्या रेटुन दमलेली पिवडी :) )

इशा१२३'s picture

24 Oct 2015 - 3:34 pm | इशा१२३

सुरेख लेखनशैली !
कधी खाल्ला नाही हा पदार्थ.छान वर्णन केल्याने करावासा वाटतोय.

तांदुळ नाही , तांदळाच पिठ घ्यायचय. . चकली च्या सोर्‍या मधून करायला जड होत. शेवग्याला आटे असतात त्यामुळे जोर कमी लावावा लागतो .

मदनबाण's picture

25 Oct 2015 - 12:23 pm | मदनबाण

मस्त !
सोर्‍याने शेवया पाडतानचा फोटो पाहुन अगदी लहानपणाचे दिवस आठवले, दिवाळी येण्याआधी फराळेचे पदार्थ करताना तिखट शेवया करताना, किंवा चकली करताना सोर्‍याचे काम माझ्याकडे असायचे. :) आता सगळा रेडीमेडचा जमाना !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टुटी-फ्रुटी हुं में... ;) :- Karachi Se Lahore Tak

स्नेहल महेश's picture

26 Oct 2015 - 11:38 am | स्नेहल महेश

खरच फोटो पाहुन अगदी लहानपणाचे दिवस आठवले

धन्यवाद आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल. :)

पिलीयन रायडर's picture

26 Oct 2015 - 12:28 pm | पिलीयन रायडर

मी कधीच हा पदार्थ खालेल्ला नाही. इडीअप्पम खाल्लाय.. साधारण तसाच असावा. कधी योग येतोय पाहु,

पण मी सगळ्यात जास्त प्रेमात पडलेय ते तुमच्या सोर्‍याच्या.. काय देखणा राजबिंडा सोर्‍या आहे हो!!

पाकृपेक्षाही सांगायची पद्धत फार आवडली.
लिहीत रहा.

asd

परवा कोकणातल्या आमच्या घरी गेले होते . तिथे हा माझ्या आजेसासुबाईंचा त्यांच्या माहेरून आणलेला शेवगा पाहिला. लगेहाथ शिरवळ्या कार्यक्रामही झाला. पण हे प्रक्रण कष्टाच आहे. मी एकहाती हा कार्यक्रम आटोपला माझ्या घरी , ह्याच अपार कौतुक का झाल ह्याच कारण समजल ;)

रेवती's picture

5 Jan 2016 - 6:23 pm | रेवती

पुन्हा धागा वाचला, फोटू पाहिले. छान वाटलं. हा पदार्थ करून पहावासा वाटतोय आता.