फाटक

Primary tabs

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 8:29 pm

.
a

तीन–साडेतीन झाले असतील नसतील. मनोजने पानपट्टी उघडून थोडाच वेळ झाला होता. लक्झरी बसस्टॅंडवरचं उघडणारं पहिलं दुकान त्याचंच. मनोज आतलं सामान जागेवरच लावत होता, तोच त्याला दुरूनच ऑटोचा ‘टरटर’ आवाज आला. संतोषभाऊचा ऑटो, त्याने बरोबर ओळखलं.

संतोषने मनोजच्या पानपट्टीपाशी ऑटो थांबवला. इंजीन बंद करून एकदाची ती ‘टरटर’ थांबवली. खरं म्हणजे त्याला तो टरटर आवाज अजिबात आवडत नव्हता, खासकरून अशा या पहाटेच्या शांततेत तर मुळीच नाही. पण करता काय, त्याचा नाइलाज होता. तंबाखूने तोबरा भरलेल्या मनोजने त्याला तोंड न उघडताच हातानेच रामराम केला.
तो सावकाश ऑटोतून बाहेर आला. मनोजच्या काउंटरच्या खाली ठेवलेल्या पानं भिजवायच्या वाडग्यातलं थोडं पाणी हातात घेऊन ऑटोच्या काचेवर शिंपडलं. सीटखाली दडवून ठेवलेलं फडकं काढून काच, आरसे स्वच्छ पुसून घेतले. पॅसेंजर सीट एकदा फडक्याने झटकून घेतली. मग पुन्हा मनोजच्या काउंटरवरून आगपेटी उचलली. उदबत्तीच्या पुड्यातली एक ‘मोगरा’ लावून गजानन महाराजांच्या छोट्याशा फोटोभोवती ओवाळली अन हॅंडलमागच्या डॅशबोर्डच्या एका फटीत खोचून दिली. तेवढ्यात मनोजने तोंडाने पिचकारी मारत विचारलं.
“अरे काहून हो संतोषभाऊ, आज तुमचे बाकीचे भाईबंद ऑटोवाले-रिक्षावाले दिसून नाही राह्यले अजून?”
“अबे, काल धुयमाती नवती का? अजून तं गटारीतूनच बाहेर पडले नसतील सायचे!” संतोष हसतच म्हणाला.
"बरोबर भाऊ! एकदम करेक्ट!” मनोज म्हणाला.

काऊंटरवर लटकवलेल्या पुड्यांच्या माळेतली एक ‘निसर्ग’ काढत असतानाच मनोज ‘डेक’मधली सी.डी. बदलत असल्याचं संतोषने पाहिलं. मग त्याने आवाजाची गुंडी हळूच उजवीकडे वाढवल्याचंही त्याला दिसलं.
“घुंघट की आडसे दिलबरका....दिलबरका....दिलबरका...दीदार अधुरा रहता है.....” कुमार सानू जिवाच्या आकांताने ओरडत होता.
"अरर्र.. बदल यार ते. आज कुमार शानू आयकाचा मूड नाइ.”
"बरं बॉ!” म्हणत मनोजने ‘नेक्स्ट’चं बटण दाबलं. आतल्या सीडीने गिरकी घेतल्याचा अन् ‘हेड’ने जागा बदलल्याचा 'चीं.....' असा आवाज अंधार कापत गेला. एलईडी डिस्प्ले बदलला. छोट्या छोट्या लाल रेषांचे बनलेले तीन आणि वर सात... सदोतीस नंबरचं गाणं...
“अकेले है तो क्या गम है......”
संतोषचा चेहरा एकदम खुलला. “हां! ये बढिया है! उदित नारायण! सॅड साँग म्हणते तरी दात-ओठ खात म्हणते लेकाचा. तुले सांगू का मनोज, प्रत्येक गानं ऐकायचा, प्रत्येक गोष्ट करायचा एक टाईम र्‍हायते. त्या टाईमालेच ते झाली तं बरं वाटटे. बरं, टाईम काय झाला आता?’’
“चार वाजले भाऊ.”
“चार वाजले? पुनावाल्या लक्झर्‍या आल्या नाइ का अजून?” संतोषने मान वळवून पाहेस्तोवर दुरून बसचा ‘हाय बीम’ हेडलाईट चमकला. “आली गड्या ते पा..” त्याने नकळतच हातातली रिकामी पुडी खाली टाकली.
एकदम ब्रेक मारत व्होल्वो थांबली. संतोष रोजच्या सफाईने दरवाजाजवळ उभा राहून वाकून पाहू लागला. ड्रायव्हर केबिनच्या मंद निळसर प्रकाशातून एकच बाई आपली एक हँडबॅग आणि पर्स सावरत खाली उतरली.
“मॅडम, अ‍ॅटो पायजे का?”
“हं...” हातातली जड बॅग खाली ठेवत तिने एक उसासा सोडत विचारलं, “रामदासपेठ?”
“चाला नं..चाला..!”
भाडं ठरलं. ऑटो धावू लागला. संतोषने थोडं आरशात वाकून पाहिलं. बाईच्या चेहर्‍यावर थकवा होता. डोळे पेंगत होते. मध्येच संतोषने एक वेगवान वळण घेतल्यावर आलेल्या गार वार्‍याच्या थंडाव्याने बाईने अंगावरची शाल अजूनच आवळून घेतली.
“या वर्षी थंडी जरा जास्तच हाय नाई?” काहीतरी बोलायचं म्हणून संतोष बोलला, “पाहा नं, परवाच होयी झाली तरी अजून थंडी कमी व्हाचं नाव घेत नाई.”
“अं?...हं.,” बाई स्वत:शीच बोलल्यासारखी बोलली, परक्या पुरुषाशी बोलण्याच्या संकोचाने. तिचं लक्ष बाहेरच होतं. ‘अंधार्‍या वेळी शहर कसं दिसतं आपण कधी पाहतच नाही, नाही? रोजच्या पाहण्यातले रस्ते हे. रात्री किती वेगळे दिसतात? हा दिवसभराचा बाजार. बसला असेस्तोवर बाजार - उठला की उकिरडा. किती वाजता येतात कमिटीचे स्वीपर आणि केव्हा उचलून नेतात ही घाण? कुणास ठाऊक? आपलं कुठेच लक्ष नसतं. वेळच कुठे मिळतो? असं किती बदललं असेल म्हणा शहर या चार-सहा महिन्यात. रस्त्यावरचे खड्डे मात्र अजून मोठे झालेले वाटतात.’ असा विचार तिच्या मनात येतो न येतो, तोच ऑटो एका खड्ड्यातून जोरदार उसळला.
“हेट्ट भो- ” संतोषने एकदम जीभ चावत शिवी तोंडात परत ढकलली. “खड्डे तं येवढे मोठे झाले म्यॅडम. जीव घेतील एखांद्याचा कधीतरी!”
‘याला आता काय सांगणार?’ ती मनाशीच बोलू लागली. ‘एकदाचा जीव गेलेला बरा! आयुष्यभर पंगू बनून मिरवत जगणं किती कठीण असतं विचार म्हणा, मला अन् माझ्या नवर्‍याला. किती वर्षे झाली त्याचा अपघात होऊन? खरंच, किती? आता आठवतही नाही. अजय होता सहा महिन्यांचा अंगावर तेव्हा. असाच खड्डा होता न् आपली सायकलरिक्षा उलटली. ऑटो खूप नव्हत्या तेव्हा आतासारख्या. रिक्षावाल्याची तरी काय चूक होती म्हणा? या ऑटोवाल्यासारखा त्याचा अन् आपला औटघटकेचा संबंध, चढून पुन्हा उतरेपर्यंत. पण तोपर्यंत आपल्या नशिबाचा सारथी तोच. बाकी आपल्यासारख्या जुन्या बायकांचं नशीबच असलं. आधी बाप, मग नवरा अन् मग पोरगा तर कधी भाऊ तर कधी कुणी. गाडी चालवणारं नेहमी कुणी दुसरंच. भाऊ म्हणाला, कायमच्या पंगुत्वाच्या भरोशावर काडीमोड मिळतो, बघू का? नंतर अनेकदा वाटलं, केली असती आपण हिंमत तर......पण वेळ निघून गेली होती. आजच्या सुनांसारखी हिंमत म्हणा, निर्लज्जपणा म्हणा नव्हता आपल्यात कधी.... बाळंतपण निभावण्यापुरतं सहा महिने ठेवून घेतलं मारे गोड गोड बोलून तिने. सासर्‍याचं एकटं कसं होत असेल, काय सोय केली - विचारलंही नाही एकदा. मग मारे म्हणत होती, सासर्‍यांची अडचण होत असेल ना? लवकर जायला हवं - मुंबईच्या विमानात बसवून देताना. पुढचं बघा तुमचं तुम्ही! तरी बरं, निलेश आला अपरात्री पुण्यावरून मुंबईला घ्यायला. मावशीची माया आहे बिचार्‍याला अजून. पण आपला माणूस मात्र परदेशी गेल्यावर आपल्याशीच परदेशासारखा का वागतो?’ एकदम कुत्र्यांच्या भुंकण्याने ती दचकली. रस्त्यातले दोन-चार भटके कुत्रे ऑटोमागे लागले होते. संतोषने त्यांना ‘हाड् हाड्’ करून हुसकावलं.

कोर्टासमोरून ऑटो आत वळला. आता रस्ता जरा बरा होता. ‘सरळ जाऊन थोडं डावीकडे वळलं की ‘आपलं’ घर. आपलं घर? खरंच काय दिलं आपल्याला या घराने आपलं म्हणावं असं? हे असलं पंगू आयुष्य? वर्षानुवर्षं पैशाच्या तंगीत काढेलेले दिवस? सुरुवातीच्या काही गुलाबी आठवणी सोडल्या, तर आयुष्यभर अंधारात आढ्याकडे बघत तळमळत काढलेल्या काळ्या रात्री? रस्त्यात भेटले तरी नजर चुकवणारे रक्ताचे नातलग? फॉरेनची हवा आणि सासरच्या मेव्याला चटावलेला एकुलता एक मुलगा? पण अंगातल्या घरंदाजपणापायी आपण हूं का चूं केलं नाही. कोणासमोर तोंड वेंगाडलं नाही... पण तेव्हा हिंमत केली असती तर...’

ती सीटला रेलून बसली. डोळे आपोआपच मिटले. तिचं मन पुन्हा एकदा मागे गेलं. ‘खरंच, तेव्हा हिंमत केली असती तर... काय नाव होतं त्याचं? आता आठवतही नाही. अशी वेळी-अवेळी कधीतरी त्याची आठवण येते... नुसताच चेहरा दिसतो... पुसट... पण चेहरेपट्टी आठवत नाही. टपोरे डोळे, नुकतंच मिसरूड फुटलेला, खांदे भरत आलेले... फुटबॉल खेळताना टरारून फुगलेल्या पोटर्‍या... शेवटच्या बेंचावर बसूनही हुशार होता तो. शाळेत असलो तरी आपले कोवळे दिवस सरले होते. वेळ योग्य होती, पण धीर झाला नाही. तिथेही घरंदाजपणा आड आला..’

घराच्या फाटकापाशी ऑटो थांबला. ती आपल्या तंद्रीतच उतरली. यांत्रिकपणे बॅग काढली. पर्स उघडून ठरलेले पैसे दिले. फाटक उघडून आत गेली. ते बंद करायला खाली वाकली. पण मध्येच थांबली. ऑटो अजून उभाच होता. तिने पुन्हा फाटक उघडलं.
“एक मिनिट...जरा थांबा...तुम्हाला तर मी घराचा पत्ता सांगितला नव्हता. नुसतंच रामदासपेठ म्हणाले. मग तुम्ही बरोबर इथे कसं आणून सोडलं? इथलेच राहणारे आहात का?”

संतोष सावकाश गाडीतून उतरला. स्ट्रीट लाईटच्या दुधाळ प्रकाशात त्याचा चेहरा एकदम उजळला. मेंदी लावून लाल झालेले विरळ केस पहाटेच्या वार्‍याने भुरभुरत होते. “म्यॅडम, तुमी मले ओळखलं नसंल, पन मी ओळखलं... काई गोष्टी अशा र्‍हायते की मानूस जिंदगीभर भुलूच सकत नायी. आपन दोघं एकाच शाळेत होतो, न्यू इंग्लिष. एकाच वर्गात. आठवलं का? मी आखरी बेंचावर बसत जाओ...” तो अचानक थांबला, शब्द शोधत असल्यासारखा. मग हळूच म्हणाला. “तुमीबी चोरूचोरू माह्याकडे पाह्यत होते...म्हंजे मले समजे ना ते...मलेबी कदीकदी.....पन जाउ द्या ...”
हातातली बॅग नकळतच जमिनीवर टेकवून ती तशीच स्तब्ध उभी राहिली. पाऊलभर मागे सरकली. तो आपल्याच तंद्रीत बोलत होता, तिच्याकडे न पाहता.

“...तं मंग माहा बाप मेला. शाळा सुटली. काही दिस शेती केली. त्याच्यातई हाती मातीच आली. दुनियाभरचे धंदे करून पायले. मंग वापस अथी आलो तं सगळ्या दोस्तमित्रांची पांगापांग झाल्ती. मंग हा अ‍ॅटो घेतला कर्जावर. असंच एक दिवस एका दोस्तानं तुमचं घर दाखवलं. कहाणी सांगतली. आमी तवा त्या सामोरच्या टपरीवर बसून होतो अन् तुमी तुमच्या सायबाले खुर्चीत बसवून बाहेर फिराले घीऊन जात होत्या. मन कससंच जालं. चाय अर्धी टाकून तसीच गाडी रिवर्स मारली. डबल इकडे याव नाई वाटलं. आजई इकडचं भाडं घेत नाई मी तुमच्याशी नजरानजर व्हील म्हून...” तो क्षणभर थांबला.
“बसमधून उतरले तवाच ओळखलं तुमाले....माह्यी काई तुमाले घीऊन यायची हिंमत होत नवती. पन स्टॅंडवर दुसरा अ‍ॅटोही नवता... अन् अशा टायमाले...दिवस खराब आले आता बाई...”

असे खूप धक्के तिने पचवले होते. हाही एक. कदाचित शेवटचा, नाव शेवटची किनार्‍याला लागते तसा - तिला वाटलं. जरा सावरत तिने विचारलं, “आणि मग पुढे… आता राहणं कुठे आहे… घरचे? बायका-पोरं?”

“लगन नाई केलं...कराव नाई वाटलं...आता तं काय आपन बुढे जालो. प्रत्येक गोष्टीचा एक टाईम र्‍हायते. ते तवाच जाली तं बरं वाटटे. हाव की नाई? बरं निंगतो मी आता...सायबाले नमस्ते सांगजा अन् फाटक लाऊन घेजा बराबर. घुसंल कोनी घरात नाईतर... चोराचिलटाचा टाईम हाये.” ठरवल्यासारखा संतोष चटकन ऑटोत बसला. किक मारून पुन्हा टरटर करत ऑटो निघून गेला, शिंप्याने शिवताना जादा झालेला धागा दाताने तोडावी तसा, सहज.

ती मात्र तेथे तशीच उभी होती. तो दिसेनासा होईस्तोवर. तेवढ्यात बटन दाबल्याचा ‘टक्क’ आवाज आला. तिने घराकडे वळून पाहिलं. ओसरीतला लाईट लागला. व्हीलचेअरचा आवाज हळूहळू दरवाजाकडे सरकत होता.
ती फाटक उघडून आत आली. ते ओढून घेतलं. जड बॅग उचलून घराच्या पायर्‍यांपर्यंत आली. बॅग पायरीवर ठेवली. तितक्यात आतून कडी उघडल्याचा आवाज आला. ती दरवाजा उघडून आत जाणार तोच थांबली. ‘फाटक उघडंच राहिलं की काय?’ वळून पुन्हा फाटकापाशी आली. फाटकावरून वाकून रस्त्यावर इकडे तिकडे पाहिलं. कोणीही नव्हतं. कसलाही आवाज नव्हता. फक्त एक नीरव शांतता आणि जीवघेणा पहाटगारवा.

मघाशी थोडं उघडंच राहिलेलं फाटक तिने पुन्हा एकदा नीट लावून घेतलं, अंगावरची शाल छातीशी कवटाळून घेतली आणि एक एक ठाम पाऊल टाकत परत आपल्या घराकडे वळली.
.
.
1
.
.

अभिषेक अनिल वाघमारे, नागपूर
waghmare.abhishek@yahoo.in
.

दिवाळी अंक २०१५कथा

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Nov 2015 - 8:58 am | कैलासवासी सोन्याबापु

ए ए ,

लैच ख़ास न हो! त्या ख़ास थंडीतनी निमवाड़ी ते रामदासपेठ प्रवास निराच ख़ास रंगोला तुम्हीनं लैच ख़ास

बहुगुणी's picture

10 Nov 2015 - 9:39 am | बहुगुणी

शब्दसंपदा छान वापरलीय, कथा आवडली.

मित्रहो's picture

10 Nov 2015 - 5:13 pm | मित्रहो

रामदासपेठेचा प्रवास असाही असू शकतो.

बोका-ए-आझम's picture

10 Nov 2015 - 6:52 pm | बोका-ए-आझम

एकदम वेगळ्या लेव्हलला नेऊन रहायले तुम्ही तर!

मनिमौ's picture

10 Nov 2015 - 8:44 pm | मनिमौ

ऐन पहाटेचे नागपूर डोळ्यासमोर उभे राहिले.बाकी कथा सुरेख जमली आहे.

पैसा's picture

10 Nov 2015 - 9:51 pm | पैसा

आवडली कथा!

मधुरा देशपांडे's picture

11 Nov 2015 - 3:32 pm | मधुरा देशपांडे

छान कथा. शीर्षकाच्या सुलेखनातील दोन आडव्या रेषा विशेष आवडल्या आणि शेवटचे चित्रही सुंदर.

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2015 - 9:15 pm | प्रभाकर पेठकर

शिंप्याने शिवताना जादा झालेला धागा दाताने तोडावी तसा, सहज.

कथा इथेच संपली होती. पुढचा परिच्छेद अनावश्यक वाटला.

एकूण कथेचा नागपूरी बाज अस्सल आहे. आटोपशीर कथेने शेवट पर्यंत गुंतवून ठेवलं.

अभिनंदन.

कसले भारी लिहिता ओ वाघमारेभौ. जबरद्स्त अन नीट बांधून ठेवणारे. आवडले लेखन अगदी.
.
बाकी चित्र सुरेख आलेय. नागपुरात ऑटो हैद्राबादसारख्या पिवळ्या हायेत व्हय. कधी गेलो नाही नागपुराला म्हणून म्हनलं. ;)

नीलमोहर's picture

16 Nov 2015 - 10:59 am | नीलमोहर

चित्रासाठी थँक्यु !!

आधी रिक्षा लाल रंगाची होती, त्या रिक्षाकडे चोखंदळ मिपाकरांचं लक्ष जाणार याची खात्री होती,
म्हणून मग शेवटच्या क्षणी लालेलाल रंग बदलून कॉमन पिवळा दिला.(काळा द्यायला हवा होता)
नागपूराकडे मीही गेले नाही त्यामुळे ऑटो कलर बद्दल नो आयडिया, :)

अभ्या..'s picture

28 Nov 2015 - 11:00 am | अभ्या..

वेगळा विदर्भ अजून झालेला नाहीये. धन्यवाद.

प्रवाही लेखन.. फार आवडली कथा

हेमंत लाटकर's picture

12 Nov 2015 - 9:35 am | हेमंत लाटकर

मला एक कळले नाही, व्हीलचेअर बेर्स्ड नवर्याला एकट सोडून सुनेचे बाळंतपण करण्याची काय गरज आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Nov 2015 - 10:21 am | कैलासवासी सोन्याबापु

प्रस्तुत लेखन हे नागपुरातल्या रामदासपेठ वर आधारीत नसुन अकोल्यातील लक्ज़री बस स्टैंड ते रामदासपेठ वाया जिल्हा कोर्ट ह्या प्रवासावर आधारीत आहे असे भासते आहे मला बाकी ए ए डिटेल सांगो

अवांतर

ए ए तुम्ही न्यू इंग्लिश ले होते काय मंग शिक्याल८?

ए ए वाघमारे's picture

12 Nov 2015 - 11:18 am | ए ए वाघमारे

ए ए डिटेल सांगो

ते आमचे ट्रेड सिक्रेट आहे.;)

न्यू इंग्लिश्ला नाही बॉ, मी ब्राह्मण सभेत होतो.

ए ए वाघमारे's picture

12 Nov 2015 - 11:13 am | ए ए वाघमारे

दिवाळीच्या शुभेच्छांसह सर्वांचे आभार!

यंदा माझ्या इतर दोन कथा 'धनंजय' (छापील अंक कथा-पाळणाघर) व ऐसीअक्षरे.कॉम (कथा- ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर) वाचता येतील.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2015 - 11:53 am | मुक्त विहारि

मस्त...

अज्जुन कथा येवू द्या...

एक एकटा एकटाच's picture

15 Nov 2015 - 12:08 pm | एक एकटा एकटाच

सुरेख कथा आहे

टवाळ कार्टा's picture

15 Nov 2015 - 8:31 pm | टवाळ कार्टा

मस्त

कथा आवडली. फार छान लिहिलेय!

नितिन५८८'s picture

15 Nov 2015 - 10:53 pm | नितिन५८८

मस्त आवडली कथा

बांवरे's picture

16 Nov 2015 - 12:21 am | बांवरे

कथा आवडली न भो !
जाहिरात बघून ऐसिवरची कथा बी वाचन ..

रेवती's picture

16 Nov 2015 - 5:25 am | रेवती

कथा आवडली.

नीलमोहर's picture

16 Nov 2015 - 10:47 am | नीलमोहर

कथा मनापासून आवडली.

दमामि's picture

28 Nov 2015 - 10:44 am | दमामि

आवडली.

सुखी जीव's picture

28 Nov 2015 - 11:00 am | सुखी जीव

सुरेख कथा आहे

असंका's picture

28 Nov 2015 - 11:07 am | असंका

सुंदर!!

धन्यवाद!!

अभिजीत अवलिया's picture

29 Nov 2015 - 1:42 pm | अभिजीत अवलिया

सुंदर ...

रातराणी's picture

29 Nov 2015 - 1:52 pm | रातराणी

कथा आवडली!

पिलीयन रायडर's picture

30 Nov 2015 - 2:43 pm | पिलीयन रायडर

छान लिहीले आहे.

शिंप्याने शिवताना जादा झालेला धागा दाताने तोडावी तसा, सहज.

हे वाक्य विशेष आवडले.

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा.
मस्त!

संदीप डांगे's picture

30 Nov 2015 - 3:24 pm | संदीप डांगे

सहज सुंदर... उत्तम.

हा नक्की नीमवाडी ते रामदासपेठ आहे असं वाटतंय... कारण आकोल्याचे खड्डे. एवढे खड्डे नागपुरात हायेत का...?

जेपी's picture

30 Nov 2015 - 8:41 pm | जेपी

कथा आवडली.

जातवेद's picture

1 Dec 2015 - 11:07 am | जातवेद

कथा आवडली!

ए ए वाघमारे's picture

4 May 2020 - 9:55 am | ए ए वाघमारे

मित्रहो, या कथेचं मी केलेलं अभिवाचन आता माझ्या "कथांजली" या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे. जरूर ऐका आणि आवडल्यास लाईक वा नावडल्यास डिसलाईक करा.

दुवा: https://www.youtube.com/watch?v=1yj0Zwn4G5U

रुपी's picture

4 May 2020 - 10:14 am | रुपी

सुरेख कथा. खूप आवडली.

वामन देशमुख's picture

4 May 2020 - 11:14 am | वामन देशमुख

कथा खरंच जबरदस्त लिहिलीय! आधी वाचली नव्हती, आता वाचली.