'या' की/कि 'ह्या' व इतर : शुध्दलेखनाबद्दल सल्ला/सूचना/सुधारणा हवी आहे

दिपोटी's picture
दिपोटी in काथ्याकूट
1 Sep 2015 - 7:29 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

मी मराठीत थोडेफार लेखन व थोडेफार संपादन-संकलन करीत आहे - दोन्ही हौशी पध्दतीचे. संपूर्ण शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी मराठी वाचनाची प्रचंड व दांडगी आवड असल्यामुळे एकंदरीत शुध्दलेखनाचा तेवढा त्रास नाही आहे. मराठी शुध्दलेखनावर बर्‍यापैकी नियंत्रण आहे, मात्र काही विशिष्ट शब्दांबाबतीत नक्की काय बरोबर याबद्दल (की ह्याबद्दल?) प्रश्न पडतो. उदाहरणार्थ ...

'या' बरोबर की 'ह्या'? (संदर्भ : 'यांना पारितोषिक मिळाले' की 'ह्यांना पारितोषिक मिळाले'? किंवा 'या डोळ्यांची दोन पाखरे' की 'ह्या डोळ्यांची दोन पाखरे' बरोबर?)) थोडक्यात, 'या / यांना / यांच्याकडून' बरोबर की 'ह्या / ह्यांना / ह्यांच्याकडून' बरोबर?

'की' बरोबर की/कि 'कि'? (संदर्भ : 'उजवे की डावे' बरोबर की/कि 'उजवे कि डावे' बरोबर?)

'लिहिणे' बरोबर की 'लिहीणे'? 'लिहिन' बरोबर की 'लिहीन'? 'लिहिताना' की 'लिहिताना'?

'पहाणे / पाणी वहाणे ('flow' या/ह्या अर्थाने / 'carry' या/ह्या अर्थाने नाही) / घरी रहाणे' बरोबर की 'पाहणे / पाणी वाहणे / घरी राहणे'?

शुध्दलेखनाला सरळ फाट्यावर मारण्याचा पर्याय स्वीकारता येत नाही, कारण व्यक्तिशः मला भाषेच्या शुध्दीबद्दल आत्मीयता आहे तेव्हा कोठे (की कुठे) चुकत असल्यास सुधारण्याची इच्छा आहे.

वरील काही उदाहरणात दोन्ही पर्याय बरोबर असल्यास कोणता पर्याय आधुनिक/साठोत्तरी मराठीत वापरला जातो हेही सांगितल्यास बरे.

- दिपोटी

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

1 Sep 2015 - 7:52 am | चित्रगुप्त

माझ्या मते:
लेखी भाषेत 'या' परंतु कुणाच्या तोंडी वाक्य असेल, तर 'ह्या'
हे हवे 'की' ते हवे..
'पहा' बरे.... 'पहा'यला पाहिजे... त्याला तिने पहिल्यांदा 'पाहिले'....
मी उद्या त्याला पत्र 'लिहीन'... 'लिहिताना' पेन जरा तिरपे धरावे....
आजचा दिवस 'रहा' की इथेच....एकटे घरात 'रहाणे' धोक्याचे आहे.... तो 'राहिला' काय, वा गेला काय, मला काही फरक पडत नाही....

श्रीरंग_जोशी's picture

1 Sep 2015 - 7:57 am | श्रीरंग_जोशी

शास्त्रीय मराठी व्याकरण हा दुवा बघावा. बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. परंतु मनोगतचे सदस्यत्व नसल्यास मजकूर कदाचित दिसणार नाही.

माझ्या अल्पमतीनुसार काही उत्तरे (बरोबर असण्याची खात्री नाही).

  • ह्यांना वगैरे हे घरगुती बोलीभाषेत बोलले जाते. प्रमाणभाषेत यांना असाच उल्लेख असतो.
  • कि अन की दोन्ही बरोबर आहेत फक्त कोणते कुठल्या संदर्भात अधिक बरोबर आहे हे मात्र ठाऊक नाही.
  • पाहणे, राहणे या प्रमाणभाषेतील क्रियापदांचा बोलीभाषेतील उच्चार पहाणे, रहाणे असा केला जातो असे माझे निरीक्षण आहे. जसे हिंदीत म्हणतात बहेन अन लिहितात बहन.
  • लिहिणे, लिहिताना हे बरोबर आहे असे मला वाटते. मात्र लिहीन असे बरोबर आहे.

तुमची शुद्धलेखनाची तळमळ आवडली.
चित्रगुप्त ,श्रीरंग_जोशी बरोबर.आणखी काही शब्दांबद्दल लेखन संदिग्धता इतरांनीही इथे लिहा.

अवांतर:मनोगताचे लेख वाचता येतात परंतू त्यांच्या फायरफॅाक्स ब्राउजरच्या संपर्क पद्धतीमुळे मोबाइलवरच्या इतर ब्राउजरातून लिहिता येत नाही ही अडचण संपादक मंडळाला कळवायला हवी. परंतू संपर्क दुवाही सापडत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

1 Sep 2015 - 8:45 am | श्रीरंग_जोशी

मनोगतच्या प्रशासकांचा इमेल पत्ता इथे मिळेल.

सुधांशुनूलकर's picture

1 Sep 2015 - 9:28 am | सुधांशुनूलकर

१. शुध्दलेखन --> हा शब्द चूक. मराठीत 'ध्द' हे जोडाक्षरच नाही. 'द्ध' हेच बरोबर.
२. ह्या किंवा या यापैकी लेखकाला योग्य वाटेल तो शब्द घ्यावा. मात्र जो घ्याल तो शेवटपर्यंत ठेवावा. एकाच लेखात दोन्हींची सरमिसळ निषिद्ध. 'या' जास्त प्रचलित, सोपा आहे.
३. 'की' बरोबर. 'कि' केव्हाही चूकच.
४. लिहिणे, लिहिताना, लिहीन --> बरोबर.
५. पाहणे, राहणे, वाहणे (कोणत्याही अर्थी) बरोबर. पाह, राह, वाह असे मूळ धातू. म्हणून पहाणे, रहाणे (हे आडनाव असल्यास बरोबर) वहाणे चूक. या तीन धातूंचं चलन 'काढणे'च्या चलनाप्रमाणे घ्यावं. अपवाद : या धातूंचं आज्ञार्थी रूप वापरताना 'पहा, रहा, वहा' असे चालतात. (हे पहा, आज तू माझ्या घरीच रहा.)

नेहमी वापरले जाणारे आणखी काही बरोबर शब्द :
१. सररास बरोबर. सर्रास चूक.
२. कातरी, खातरी, भितरा बरोबर. कात्री, खात्री, भित्रा चूक.
३. अणीबाणी बरोबर. आणीबाणी चूक.
४. पारंपरिक बरोबर. परंपारिक चूक.
५. अल्पसंख्याक बरोबर. अल्पसंख्यांक चूक.

तूर्तास इतकं पुरे. आणखी काही शंका असल्यास जरूर विचारा.
शुद्ध लिहिण्याच्या आग्रहाबद्दल तुमचं अभिनंदन.

शुद्धलेखनाची सवय झालेला
सुधांशुनूलकर

सुधांशूनूलकर,

धन्यवाद! बरेचसे प्रश्न सुटले, पण तरीही काही मुद्दे/प्रश्न उरले आहेतच ...

- 'ध्द' जोडाक्षर नाही?! मग 'असंबध्द', 'कटिबध्द', 'बुध्दी', 'शुध्दी' असे आपण लिहितो त्याचे काय?

- 'आणीबाणी' का चूक बरे? मी तर हा शब्द सदैव असाच लिहिलेला पाहिला आहे.

- माझ्या मते, खरं तर, (आपण सुचवलेला / सुचविलेला) 'पारंपरिक' (व खोडलेला) 'परंपारिक' दोन्ही शब्द चूक आहेत व तिसराच शब्द 'पारंपारिक' बरोबर आहे.

- 'अल्पसंख्यांक' का चूक बरे? माझ्या मते, खरं तर, (आपण सुचवलेला / सुचविलेला) 'अल्पसंख्याक' चूक आहे.

- दिपोटी

सुधांशुनूलकर's picture

1 Sep 2015 - 12:36 pm | सुधांशुनूलकर

- 'ध्द' जोडाक्षर नाही?! मग 'असंबध्द', 'कटिबध्द', 'बुध्दी', 'शुध्दी' असे आपण लिहितो त्याचे काय?

तुम्ही असं लिहिता, ते चूक आहे असंच सागायचा प्रयत्न करतोय. मराठीत 'ध्द' असं जोडाक्षर नाही, 'द्ध' असं आहे. ध् + द = ध्द (अर्धा ध + पूर्ण द) असं नसून द् + ध (अर्धा द + पूर्ण ध) = द्ध असं हे जोडाक्षर आहे. म्हणून 'असंबद्ध', 'कटिबद्ध', 'बुद्धी', 'शुद्धी' हेच बरोबर, 'असंबध्द', 'कटिबध्द', 'बुध्दी', 'शुध्दी' हे चूक.

- 'आणीबाणी' का चूक बरे? मी तर हा शब्द सदैव असाच लिहिलेला पाहिला आहे.

या शब्दाची व्युत्पत्ती शोधायचा माझा प्रयत्न चालू आहे. (बहुधा 'अणी' - 'काट्याच्या अणीवर वसले तीन गाव'मधली अणी) आणि 'बाण' या दोन शब्दांपासून तयार झाला असावा.) तोपर्यंत लेखनकोशामध्ये दर्शवल्याप्रमाणे अणीबाणी असा लिहितो.

- माझ्या मते, खरं तर, (आपण सुचवलेला / सुचविलेला) 'पारंपरिक' (व खोडलेला) 'परंपारिक' दोन्ही शब्द चूक आहेत व तिसराच शब्द 'पारंपारिक' बरोबर आहे.

परंपरा या शब्दाला इक हा प्रत्यय लागताना पहिलं अक्षर 'प'ची वृद्धी होऊन (वृद्धीच्या भाषाशास्त्रीय नियमानुसार) 'पा' होतो. उदा. दर्शन + इक = दार्शनिक, शरीर + इक = शारीरिक, नगर + इक = नागरिक इ. मात्र तिसरं अक्षर 'प'मध्ये कोणत्याही प्रकारे, कोणत्याही नियमानुसार काना किंवा इतर कोणताही बदल होणार नाही. म्हणून 'पारंपरिक' बरोबर.

तुमच्या मते तिसराच शब्द 'पारंपारिक' बरोबर असेल, तर कृपया याचं भाषाशास्त्रीय स्पष्टीकरण द्या, त्याला आधार दाखवा.

- 'अल्पसंख्यांक' का चूक बरे? माझ्या मते, खरं तर, (आपण सुचवलेला / सुचविलेला) 'अल्पसंख्याक' चूक आहे.

अल्प + संख्या + क असा हा शब्द तयार झाला असून 'क' हा गुणदर्शक, वैशिष्ट्यदर्शक प्रत्यय आहे (हे शेवटचं पद 'अंक' असं नाही). कल्पकता असलेला तो कल्प'क', लेखनगुण असलेला लेख'क'. तसंच 'संख्येने अल्प असलेले अल्पसंख्याक'. (अल्प + संख्या + अंक अशी व्युत्पत्ती असती, तर 'ख्या'वर अनुस्वार आला असता.) म्हणून अल्पसंख्याक हेच बरोबर.
तुमच्या मते अल्पसंख्यांक बरोबर असेल, तर कृपया भाषाशास्त्रीय स्पष्टीकरण व आधार द्या.

मराठी भाषाशास्त्रानुसार बरोबर काय आहे ते मी सांगितलं. शेवटी 'शास्त्रात् रूढिर्बलीयसी'नुसार, शास्त्रापेक्षा रूढी बलवान ठरतात आणि चुकीच्या कल्पना, चुकीचे शब्दप्रयोग, चुकीचं लेखन रूढ होऊन प्रस्थापित होतात. मुद्रितशोधन हा माझा 'व्यवसाय' असल्यामुळे मला मात्र असं करून चालत नाही.

बाबा योगिराज's picture

1 Sep 2015 - 2:25 pm | बाबा योगिराज

अल्प + संख्या + क असा हा शब्द तयार झाला असून 'क' हा गुणदर्शक, वैशिष्ट्यदर्शक प्रत्यय आहे (हे शेवटचं पद 'अंक' असं नाही.)

हे पुरेपुर पटल.

दिपोटी's picture

1 Sep 2015 - 5:45 pm | दिपोटी

सुधांशुनूलकर,

वर लिहिल्याप्रमाणे माझे सर्व शालेय व महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे मराठी भाषेचा व्याकरणासहित अभ्यास जेवढा आवडला असता तेवढा झाला नाही, मात्र वाचनाची खास आवड असल्याने रुढ झालेल्या भाषेतील साहित्य वाचूनच मराठी भाषेचे जे काही थोडेथोडके आहे ते ज्ञान माझ्या जवळ आहे. अर्थातच तुमच्याइतका व्याकरणातील नियमांचा माझा दांडगा अभ्यास नाही, तेव्हा भाषाशास्त्रीय स्पष्टीकरण मला देता येणार नाही, मात्र इतकी वर्षे रुढ झालेले 'शुध्द', 'आणीबाणी', 'पारंपारिक', 'अल्पसंख्यांक' वगैरे शब्द आता एकदम (तुमचा अभ्यास विश्वास टाकण्याइतका दिसत असला तरी) बदलणे तेवढे सहज नाही ... शेवटी रुढी अंगवळणी पडण्याचीही सवय होतेच की नाही? मात्र सर्वच ठिकाणी (साहित्यात, वर्तमानपत्रात, बोलण्यात) असे बदल होणे अपरिहार्य व व्याकरणदृष्ट्या अचूक असेल तर या रुढी मोडून आता या 'नवीन' अचूक शब्दांची सवय करुन घेणे हेही ओघाने आलेच.

तुम्च्या मदतीबद्दल भरपूर धन्यवाद!

- दिपोटी

दिपोटी's picture

1 Sep 2015 - 5:47 pm | दिपोटी

अर्थातच 'तुम्च्या' नव्हे तर 'तुमच्या' ...

- दिपोटी

बाबा योगिराज's picture

1 Sep 2015 - 2:21 pm | बाबा योगिराज

कातरी, खातरी, भितरा बरोबर. कात्री, खात्री, भित्रा चूक.
काय बोलता??? मि तर हमेशाच कात्री, खात्री, भित्रा असे लिहित होतो. अता मात्र बदलुन लिहीन.

अजुनही महिती येउ द्या...........

सुधांशुनूलकर's picture

1 Sep 2015 - 2:58 pm | सुधांशुनूलकर

तुम्हीच काय, सर्वच जण 'कात्री, खात्री, भित्रा' असं लिहितात.

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद!

- दिपोटी

नूलकर काकांचे सर्वच प्रतिसाद आवडले.

नाखु's picture

1 Sep 2015 - 5:14 pm | नाखु

सटीप विवेचन खासच.

पुण्यात्पाहूनरहायलाआलेलाआणिसध्यापिंचीवासी नाखु

संदीप चित्रे's picture

1 Sep 2015 - 11:12 pm | संदीप चित्रे

काही चुकीच्या शब्दांची उकल करून शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे ते कसे लिहायचे ते सांगितल्याबद्दल धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2015 - 7:50 am | डॉ सुहास म्हात्रे

@ सुधांशुनूलकर

तुमचे सोदाहरण विश्लेषण करणारे प्रतिसाद आवडले. तुम्ही शुद्धलेखन या विषयावर लेखमाला लिहिल्यास खूपच उपयोगी ठरेल. जरूर विचार करावा.

प्रभाकर पेठकर's picture

3 Sep 2015 - 10:28 am | प्रभाकर पेठकर

'हे' वरून 'ह्यांचे' हा शब्द येतो. (असे ऐकले आहे)
'हे श्री. कुळकर्णी' आणि 'ह्यांचे आडनाव कुळकर्णी.' आपण 'ये श्री. कुळकर्णी म्हणत नाही' त्यामुळे 'यांचे आडनाव कुळकर्णी' चूक आहे. असे माझे मत आहे.

सर्व एकाक्षरी शब्द जसे, की, तू, मी, हे दीर्घच लिहीले जातात. ते शुद्ध असावे.

हल्ली मराठी बातम्यांच्या वाहिनीवर 'आम्ही अमुक अमुक 'भांडाफोड' केला' वगैरे कानावर आले की अंगावर काटाच येतो. दूरचित्रवाणीवर मराठी भाषेचा जो कांही खून केला जातो तो अत्यंत चिंताजनक आहे.
रस्त्याच्या पाट्या सुद्धा कित्येकदा विनोदी असतात. उदा. 'बोगदा पुढे आहे' हे इंग्रजी 'टनेल अहेड' चे शब्दशः भाषांतर आहे.
'बोगदा पुढे आहे' चा अर्थ 'उगाच इथे शोधत बसू नका' असा होतो. त्यापेक्षा 'पुढे बोगदा आहे' हे वाक्य बरोबर वाटतं ते पुढे काय आहे, ह्याची सूचना देणारं वाटतं.
पूर्वी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फलक असायचा 'वाहने सावकाश हाका' जनावरांनी वाहून नेलेल्या गाड्यांना (बैलगाडी, घोडागाडी इ.) हा शब्द योग्य असला तरी कार्स, मोटरसायकल, लॉर्‍या, बसेस ह्यांना तो अयोग्य वाटतो. तो 'वाहने सावकाश चालवा' असा असावा. हल्ली सर्वत्र 'हाका' चे फलक काढून 'चालवा' असे फलक नजरेस पडले आणि सुखद धक्काच बसला.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2015 - 11:24 am | अत्रुप्त आत्मा

या..........कि..........ह्या???
https://lh3.googleusercontent.com/-iIRsz-97LpM/UO_pr2NRpzI/AAAAAAAAB54/h7hMqwjHspE/s640-Ic42/DSCF0245.JPG
आणि मग पाक पाडा...ह्या ह्या ह्या!

खटपट्या's picture

3 Sep 2015 - 2:03 pm | खटपट्या

आमच्या मालवणात बाकी "ह्यां काSSSSSSSSSय?" असेच विचारतात.