पायवाटा जाग्या झाल्या ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in मिपा कलादालन
11 May 2015 - 5:02 pm

पुलंच्या कुठल्यातरी प्रवासवर्णनात (बहुतेक 'पूर्वरंग'च असावे) एका ठिकाणच्या निसर्गाचे वर्णन करताना पु.ल. म्हणतात...

"उंच उंच आणि घनदाट वृक्षांच्या रायांतून चिंतन मनन करीत हिंडण्यासाठी पायवाटा काढल्या होत्या. थोडा चढ थोडा उतार, थोडे वळण, थोडे सरळ. या पायवाटा माणसाला अंतर्मुख करतात....
असल्या पायवाटांतून पाखरांची किलबिल ऐकत , उंच वृक्षराजांच्या छत्राखाली चालताना आपल्या जोडीला फक्त सुंदर विचार चालत असतात. उपनिषदांची, आरण्यकांची महान निर्मीती या असल्याच चालण्यातून झाली असावी.
"

हे अचानक आठवण्याचं कारण म्हणजे 'पायवाटा', मायबोलीकर हर्पेनच्या कृपेने भेटलेल्या अनेक देखण्या आणि बोलक्या पायवाटा. म्हणजे बघा २०१३ मध्ये हर्पेनने काही प्रचि टाकले होते माबोवर... तळजाई टेकडीवरच्या जंगलाचे. अर्थात हर्पेनने टाकलेले फोटो ऐन पावसाळ्यातले होते, त्यामुळे हिरवेगार होते. आल्हादक होते. तेव्हाच ठरवले होते की एकदा का होइना तळजाईच्या जंगलाला भेट द्यायची. पण पायी घरापासून अवघ्या ५-१० मिनीटाच्या अंतरावर असलेल्या तळजाईला जायला मला २०१४ उजडावे लागले. मी गेलो ते सुद्धा नेमका उन्हाळ्याच्या दिवसात. त्यामुळे हर्पेनने पाहिलेली तळजाई आपल्याला दिसेल का ? असा प्रश्न , शंका मनात होती. पण प्रत्यक्षात तळजाईच्या जंगलात फिरताना असं जाणवलं की असं काही नसतं हो. निसर्ग "तुमच्या डोळ्यात" असतो. सौंदर्य तुमच्या नजरेत असतं. आणि मग तळजाईच्या प्रेमात पडलो. ऋतुंचे भेद जाणवणं डोळ्यांना कळेनासं झालं ....

मग त्यानंतर प्रत्येक शनीवार-रवीवार सकाळी-सकाळी उठून तळजाईला जाणे आणि दोन तीन तास मनसोक्त भटकणे हे नित्याचेच होवून बसले. त्यामुळेच जेव्हा हा धागा टाकायचा असे ठरवले तेव्हाच हे ही ठरवले की हिरवीगार तळजाई, पावसाच्या दिवसातली तळजाई हर्पेनने दाखवलीय, आपण जरा पावसाळ्याच्या प्रतिक्षेतली तळजाई दाखवुयात. कस्सें..?

हळुहळू नवी पालवी फुटतेय झाडांना. नवे अंकूर फुटताहेत. पण हिरवाईचा प्रसन्न, देखणा आविष्कार अजून लांब आहे. त्यातही तळजाईचे हे जंगल म्हणजे वैविद्ध्याचा आणि वैचित्र्याचा एक देखणा अनुभव आहे असे म्हणले तर ते गैर ठरु नये. इथे एकाच वेळी तप्त ग्रीष्माने त्रस्त शुष्क जंगलही दिसते आणि त्याचवेळी हिरवाईचा साज ल्यालेली, पशुपक्ष्यांनी , त्यांच्या किलबिलाटाने भरलेली मनोरम वनराणीही जागोजागी भेटत राहते.

प्रचि १

सगळीकडे शुष्क, तप्त ग्रीष्माचे साम्राज्य. अधुनमधुन नकळत डोकावणारी किंचीतशी हिरवळ. पण शुष्कतेतही एक निराळेच रौद्र सौंदर्य असते हे मला या जंगलाने शिकवले.

प्रचि २

या शुष्क, कंटकमयी रस्त्यातून पुढे जात नव्या वाटा शोधायचे वेड मला कधी लागले ते कळालेच नाही. मग मी रुळलेले रस्ते सोडून जंगलातल्या अनवट पायवाटा शोधायला सुरूवात केली. गंमत म्हणजे या काटेरी मार्गावरच पुढे हिरवाई स्वागताचे, आमंत्रणाचे ध्वज घेवून सहर्ष उभी राहिलेली आढळली.

प्रचि ३

प्रचि ४

या वर्षी बहुदा वसंताची चाहूल थोडी लवकरच लागली. आपल्यालाही आणि त्या जंगलालाही. जिथे इतके दिवस काटे-कुटे, शुष्क गवत, सुकलेले बुंधे पाहायची सवय लागली होती तिथे आता हिरवाईची तोरणे दिसायला लागली. अर्थात अजून पावसाला वेळ आहे. पण त्याच्या भेटीतली आतुरता निसर्गाच्या विविध छटांमध्ये दिसायला लागलेली आहे.

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

पुलदे म्हणतात त्याप्रमाणे पाऊलवाटा खरोखर माणसाला अंतर्मुख करतात हो. मुळात तुम्ही एकदा का पायाखालचा रुळलेला रस्ता सोडून पायवाटेवर उतरलात की आपोआपच एक प्रकारची धडधड, हुरहूर सुरू होते. मग अगदी त्या पायवाटासुद्धा रोजच्या सरावातल्या असोत वा पुर्णपणे नव्याने भेटणार्‍या असोत. कारण पायवाट ही कायमस्वरूपी नसते हो. ती सीतेसारखी स्थीर एकपतीव्रता मुळीच नसते, तर एखाद्या,नुकत्याचा तारुण्याता पदार्पण केलेल्या कायम नाविन्याचे वेड, उत्सुकता असलेल्या अवखळ, मनस्वी चंचलेसारखी असते. तिला रोज भेटणार्‍या अनेक चाहत्यांसवे ते नेतील तिकडे ती जात राहते आणि ती जाईल तिकडे तिचे वेडे दिवाणे येत राहतात, जात राहतात.

प्रचि ११

प्रचि १२

मला कधी-कधी कंटाळा येतो पायवाटा शोधत फिरण्याचा. मग मी काही दिवस नुसताच रुळलेल्या रस्त्याने तळजाईच्या जंगलात फिरायला येणारे लोकांचे थवे बघत, तर कधी एकटाच त्या वाटांवर मनमुराद हिंडत राहतो.

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

इथे तसे फिरायला येणारे बरेच जण असतात, तरीही तुमचा एकांत, तुमची प्रायव्हसी भंग होत नाही.
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

पण हे नेहमी जमेलच असे नाही. कारण जंगल हे निळावंतीसारखे असते. जितके आत-आत, पुढे-पुढे जात राहाल तसतसे ते तुम्हाला अधिकाधीक मोहात पाडायला लागते. स्वतःच्याही नकळत आपण त्या इंद्रजालात फसत, अडकत जातो.

प्रचि २२

प्रचि २३

त्या दिवशी माझ्या बाबतीत असेच झाले. रुळलेल्या वाटांवरून फिरता - फिरता नकळत जंगलात , आत शिरलो आणि त्यांच्या इंद्रजालात अडकलो झालं...

प्रचि २४

चांगला नेहमीचा, पायाखालचा रस्ता सोडून जंगलाच्या अंतर्भागात शिरलो. त्या दिवशी थोडा लवकरच आलो होतो. तीन-चार किलोमीटर चालल्यावर मध्येच अचानक अंतर्भागात शिरलो. भास्कररावांच्या येण्याची वेळ झालेली होती किंवा कदाचित हजेरी लावली होतीसुद्धा त्यांनी. कारण जंगलाच्या त्या दाट, दुर्गम झाडीतही त्यांच्या अस्तित्वाचे दाखले मिळतच होते.

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

थोडीशी भीतीही वाटायला लागली होती. कारण एकतर फिरायला येणार्‍यापैकी त्या भागात कोणी दिसायला तयार नाही. त्यात जंगल अगदी दाट. पुढे जावे तर रस्ता सापडेना, मागे यावे तर पुढं जे काही दिसत होतं ते स्वर्गसुख अर्ध्यातच सोडून यायलाही जीव मानेना. शेवटी जिवाचा हिय्या करून तसाच चालत राहीलो त्या शुष्क, काळवंडलेल्या काटेरी जंगलातूनी पुढे-पुढे सरकत राहीलो. अचानक एके ठिकाणी अंधार संपला आणि जणु काही प्रकाशाकडे जाणारी पायवाट समोर उभी ठाकली.

प्रचि २७

त्या वाटेवरून तसाच पुढे सरकत राहीलो. जंगलातले रुळलेले, रहदारीचे रस्ते मागे सोडलेले असल्याने नक्की कुठे आहोत हे कळत नव्हते. पण समोर उगवतीचा भास्कर दिसत असल्याने आपण पूर्वेकडे म्हणजे 'अरण्येश्वर' आणि सहकार नगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या दिशेने जातोय हे कलून चुकले होते. त्यामुळे जरासा निर्धास्त झालो होतो. तर मध्येच एका ठिकाणी समोरचा रस्ताच बंद झालेला.

प्रचि २८

प्रचि २९

त्यातुन कसाबसा मार्ग काढून बाहेर पडलो आणि समोर जणुकाही, " तुझ्या जिद्दीला सलाम रे मित्रा" असे म्हणत निसर्गरागाा फुलांच्या पायघड्या घालून स्वागताला सज्ज होता.

प्रचि ३०

हि तर निव्वळ सुरुवात होती. इथून पुढे स्वर्गसुखाचा अनुभव ललाटी लिहीलेला होता बहुतेक सटवाईने :)
अचानकच अंधार सरला आणि मित्र सामोरी आला, आपल्या तेजाची, पावित्र्याची जणू पताका नाचवीत आला.

रान जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

भान हरपल्यासारखी अवस्था झालेली होती. तर तो वेडा "देता किती घेशील दो कराने" म्हणत माझ्या ओंजळीत तेजाचे दान अगदी भरभरून टाकतच होता, टाकतच होता. सगळ्या दिशा उजळल्या होत्या. सगळीकडे प्रकाशच प्रकाश फाकला होता.

प्रचि ३४

प्रचि ३५

आणि ते अदभुत अनुभवत असतानाच अचानक लक्षात आलं की आपण नकळत जंगलातल्या मुख्य रस्त्याला येवून पोहोचलो आहोत आणि मी सुटकेचा श्वास टाकला. :)

प्रचि ३६

तळजाईच्या जंगलातल्या या प्रवासात पायवाटांच्या सोबतीने काही नेहमीचे सोबतीही सातत्याने भेटत राहतात.
उदा.

प्रचि ३७

प्रचि ३८ : म्हातार्‍या

प्रचि ३९

मग मंडळी, कधी द्यायची भेट तळजाईला ? फार नाही पण ज्यांना पहाटे उठणे शक्य आहे त्यांच्यासाठी सकाळी ५ ते १० इतका वेळ असतो आणि मला वाटते तो भरपूर आहे आपल्या छोटेखानी गटगसाठी.

मग...? या पावसाळ्यात जमायचं? एखाद्या पावसाळी सकाळी, तळजाईच्या साक्षीने ......

विशाल कुलकर्णी

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

11 May 2015 - 5:09 pm | स्पंदना

जरा विसावू या वळणावर
या वळणावर

__/\__!!
काय सुरेख फोटोज आहेत.

स्पा's picture

11 May 2015 - 5:10 pm | स्पा

एकदम सुसाट

अत्रुप्त आत्मा's picture

11 May 2015 - 10:18 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

एस's picture

11 May 2015 - 5:15 pm | एस

अतिशय सुंदर!

मुक्त विहारि's picture

11 May 2015 - 5:31 pm | मुक्त विहारि

हे असले फोटू आम्हाला का काढता येत नाहीत?

सुबोध खरे's picture

11 May 2015 - 8:23 pm | सुबोध खरे

असेच म्हणतो

ह्या तळजाईच्या जंगलात कसं जायचं म्हणे? ते पण सांगितलंत तर भटकायला आणखी एक ठिकाण मिळेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 May 2015 - 6:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

कालच जाउन आलोय तळजाईला...पण लवकरच अंधार झाला नी जास्त फिरता आले नाही :(

झकास फोटो आलेत राव

पैसा's picture

11 May 2015 - 7:11 pm | पैसा

लिहिणं आणि प्रकाशचित्रे सगळंच अफाट सुंदर!

खरंच सांग तिथे कसं यायचं ते! अनेक जण तयार होतील!

विशाल कुलकर्णी's picture

11 May 2015 - 7:56 pm | विशाल कुलकर्णी

<<ह्या तळजाईच्या जंगलात कसं जायचं म्हणे? ते पण सांगितलंत तर भटकायला आणखी एक ठिकाण मिळेल.>>> मी तळजाई मंदीरापासुनच जातो. इकडून सहकार नगरवरुन सुद्धा जाता येते. मित्रमंडळ चौकातून आपण गजानन महाराज मठापाशी येतो. (दत्तवाडी पोलीस स्टेशन), तिथून सहकार नगरच्या दिशेने जाताना तळजाई टेकडीवर जाण्यासाठी रस्ता आहे. खालची इमेज मित्रमंडळ चौक ते तळजाईचा रस्ता दाखवते. गुगल मॅप्स अगदी व्यवस्थीत रस्ता सांगते. धन्यवाद बायदवे :)

Taljai

सूड's picture

11 May 2015 - 8:16 pm | सूड

धन्यवाद्स

पैसा's picture

12 May 2015 - 10:44 am | पैसा

एखादा जंगली कट्टा पावसाळ्यात करायला हरकत नाही!

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 May 2015 - 4:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

राजाराम पुलावरुन आनंदनगर कडे जाताना जोशी स्वीटस च्या जवळील सिग्नल वरुन उजवी कडे वळायचे.
कॅनॉल वरचा पुल ओलांडला की साधारण ५०० मिटर वर तळजाईकडे जाणारी पायवाट लागते.

फोटो सुरेखच आले आहेत. सध्या तिकडे सहज मोर दिसत आहेत. उन्हाळ्यात प्रत्येक वेळी दोन तीन तर नक्कीच दिसतात.

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2015 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट फोटो आणि वर्णन !

प्रचेतस's picture

12 May 2015 - 10:06 am | प्रचेतस

अफाट सुंदर.

प्रमोद देर्देकर's picture

12 May 2015 - 10:13 am | प्रमोद देर्देकर

खुप छान फोटो. कोकणात सड्यावर जाताना अशी छोटी पायवाट आणि असे जंगल लागते.

विशाल कुलकर्णी's picture

12 May 2015 - 10:37 am | विशाल कुलकर्णी

मनःपूर्वक आभार मंडळी _/\_

मदनबाण's picture

12 May 2015 - 11:08 am | मदनबाण

सुरेख... :)
म्हातारीचा फोटो {रुइचा कापुस } फोटो पाहुन बालपण आठवले !
दर उन्हाळ्यात आम्ही { मी आणि माझे मित्र } कैर्‍या तोडणे आणि जंगलात भटकणे हेच उध्योग करायचो... जवळपास रोज जंगलात भटकणे होत असे... अश्याच आणि अनेक पायवाटातुन चालताना करवंदाच्या जाळीतुन करवंदे वेचायचो आणि रुइच्या झाडाची फळे { कच्ची हिरवी आणि खाली पडलेली सुकलेली काळवंडलेली फळे } घेउन त्यातील कापुस उडवत जंगलभर हिंडायचो... जांभळ आणि चिंचा पाडायचो ! साला हल्लीचे टॉवर पाहुन कधी काळी इथेच जंगल होतं असं म्हणायलाही हल्ली जीव होत नाही ! :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

नितिन५८८'s picture

12 May 2015 - 11:24 am | नितिन५८८

जर सायंकाळी ५- ७ च्या आसपास गेलात तर बरेचसे मोर पण दिसतील, पण त्यासाठी जरा आडवाटेने / पायवाटेने जावे लागेल

नाखु's picture

12 May 2015 - 4:07 pm | नाखु

रहायला अगदी जवळ असशील तर हिवाळ्यातले पण फोटो काढ .
आणि तुला मोर दिसले नाहीत का?

कधी काळी पिकॉक बे ला भेट दिलेला
आठवणी नाखु.

विशाल कुलकर्णी's picture

13 May 2015 - 10:22 am | विशाल कुलकर्णी

मोर दिसतात बर्‍याचदा नाखु . पण माझ्या लेखाचा विषय पाऊलवाटा आहे, तो भरकटू नये म्हणून मोरांचा विषय टाळला. खरेतर इथे मोरांबरोबरच अनेक पक्षी उदा. धनेश, हळद्या दिसतात. जंगलात आत शिरले तर खुपवेळा महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला शेकरु हा छोटासा पण गोंडस प्राणीसुद्धा दिसतो. या जंगलात किमान २७० वेगवेगळ्या प्रकारची झाडे जतन केलेली आहेत. त्यावरही खुप काही लिहीता येइल. पण ते नंतर कधीतरी नक्की लिहीन.

सतीश कुडतरकर's picture

12 May 2015 - 4:23 pm | सतीश कुडतरकर

निसर्ग "तुमच्या डोळ्यात" असतो. सौंदर्य तुमच्या नजरेत असतं. >>>>+१००००

गणेशा's picture

12 May 2015 - 5:02 pm | गणेशा

फक्त फोटो पाहिले.. (ट्रेनिंगमध्ये आहे)

तळजाईच आहे ही.. असेच फोटो माझ्याकडे आहेत अगदी सर्व मोसमामधील..
तुमचे फोटो खासस..
जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
तळजाई पायथ्याला रुमवर घालवलेले ते दिवस... जॉब नसल्याने रोज चालत तळजाई आणि आनंद... काय ती मजा.. २००६-२००८ या काळात रोज जायचो ... तेंव्हा सुरवातील खुप कमी गर्दी होती.. दांबरी रोड पण वर पर्यंत नव्हता ...

पायवाटा जागा झाल्या ......

पुन्हा निवांत वाचुन रिप्लाय देइनच

विशाल कुलकर्णी's picture

13 May 2015 - 10:22 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद गणेश !

कपिलमुनी's picture

13 May 2015 - 2:22 pm | कपिलमुनी

आता येत्या पावसाळ्यात पुन्हा जाउन या ;) आणि ते पण फोटो दाखवा

विशाल कुलकर्णी's picture

13 May 2015 - 3:19 pm | विशाल कुलकर्णी

जरुर कपिलमुनी !