दोस्ति

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in काथ्याकूट
17 Apr 2015 - 12:09 am
गाभा: 

नितिन, विकास आणि सुधीर लहांपणापासूनचे मित्र. एकाच वयाचे असल्याने एकाच शाळेत जायचे. एकाच सोसायटितले जीवश्च कंठश्च मित्र.

नितिनची आई शिक्षिका आणि वडील प्राइवेट फर्ममधे नोकरीला होते. नितिन शांत स्वभावाचा आणि अभ्यासु होता. एखादा विषय तो उत्तम फोड़ करून सांगायचा. ग्रेजुएशन आणि पोस्ट ग्रेजुएशन नंतर तो एका उत्तम कॉलेज मधे प्रोफेसर म्हणून जॉइन झाला. विषयाची हातोटी चांगली होती म्हणून अल्पावधितच नाव झाल आणि मग तर त्याने आपले प्राइवेट कोचिंग क्लासेस् सुरु केले. सकाळी 6 ते रात्रि 10 तो बिजी असायचा.

विकासचे वडील सरकारी कर्मचारी होते. तो ग्रेजुएशनच्या दुस-या वर्षाला असतानाच ते ह्रदय विकाराच्या झटक्याने गेले आणि विकास त्यांच्या जागेवर नोकरीला लागला. त्याने जेमतेम ग्रेजुएशन पूर्ण केले.

सुधीरची स्वप्न मोठी होती. त्याला कायमच काहीतरी खूप मोठ मिळवाव, नाव कमवाव... अस वाटायच. तसा हुशारही होता तो. मेहेनती देखील होता. ग्रेजुएशन मग MBA केल. काही दिवस मल्टिनॅशनल कंपनी मधे नोकरी केली. आणि त्या अनुभवाच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

नितिनला एक मुलगा आणि एक मुलगी होते. त्याची पत्नी त्याच्या क्लासेस् मधेच शिकवायचि. उच्च मध्यम वर्गातल सुखी चौकोनी कुटुंब होत ते. विकासच आयुष्य तस सरळ साध होत. 9 ते 6 ची नोकरी. तो आणि त्याची पत्नी देखील करायचे. एकुलता एक मुलगा होता. साधासा पण सुखी संसार होता. सुधीरची पत्नी नोकरी करत नसे. दोन मुलगे होते त्यांना सभाळणे आणि घरचे सगळे बघणे यातच अड़कलेली होती ती. सुधीर कामानिमित्त कायम बाहेर गावी आणि परदेशात फिरत असायचा. घराला वेळ देणे त्याला शक्य नव्हते. म्हणूनच तिने स्वतः निर्णय घेऊन घराची पूर्ण जवाबदारी उचलली होती.

अशीच वर्षा मागून वर्षे जात होती. नवीन टेक्नॉलजीमुळे कॉन्टेक्ट तर असायचा पण त्यातला ओलावा कमी झाला होता. दिवस... वर्ष सरकत होते. तिघा मित्रांच्या मैत्रित मात्र अजिबात अंतर नव्हतं. खूप जीव होता त्यांचा एकमेकांवर.

एक दिवस संध्याकाळी 7 च्या सुमारास नितिनचा मोबाईल वाजला. विकासचा नंबर बघुन त्याला खूप आश्चर्य वाटल. नितिनला 12वी च्या वर्गावर जायच होत. पण विकास असा अवेळी फोन करणार नाही याची त्याला खात्री होती. त्याने फोन घेतला.

"काय रे विकास? काय झाल? All good?" नितिनने फोन उचलून विचारल.

"All good यार. सहज केला होता फोन. आज तुझी आणि सुधीरची खूप आठवण आली म्हणून. डिस्टर्ब केल न तुला? आत्ता तुझी लेक्चर्स असतात न? अरे आवाज एकावासा वाटला रे. चल ठेवतो मी फोन." विकास म्हणाला.

"अरे लेक्चर्स रोजच असतात. थोड़ा उशिरा गेलो वर्गावर तर मुल खुशच होतील. तू बोल यार. कसा आहेस? खूप बर वाटल तुझा आवाज ऐकून." नितिन म्हणाला.

"मी मस्त मजेत आहे. नितिन एकदा भेटु या ना यार. किती महीने... infact वर्ष होऊन गेल आपण तिघे भेटलो त्याला." विकास.

"हो रे. गेल्या वर्षी मी नवीन जागा घेतली क्लाससाठी त्याच्या पूजेला आला होतास न तू. सुधीर तर बाहेर गावी होता. त्याला जमलच नाही शेवटी." नितिन म्हणाला. "तू सांग. कधी भेटु या? एक काम करतोस का... सुधीरला विचार. त्याच्या सोईनी भेटु."

"ठीके. तुला message करतो मी त्याच्याशी बोलून." अस म्हणून विकासने फोन ठेवला.

बंद झालेल्या फोनकडे नितिन काही सेकंद बघत राहिला. त्याच्या मनात आल... विकास असा अचानक फोन नाही करणार. काहीतरी कारण आहे नक्की. पण काही बोलला नाही तो. पण मग उशीर होतो आहे लक्षात आल आणि तो लेक्चरला निघाला.
दोन दिवसात विकासकडून काहीच मेसेज आला नाही. म्हणून रात्रि शेवटच्या लेक्चरनंतर त्याने विकासाच्या एवजी अगोदर सुधीरला फोन केला. त्याला विकासने असा अवेळी फोन केला होता ते थोड़ unusual होत, सुधीरला सांगाव अस वाटल. आणि त्याला देखील अस काही जाणवल का ते विचाराव अस नितिनच्या मनात होत.

फोनची रिंग बराच वेळ वाजली आणि आता नितिन फोन कट करणार तेव्हा सुधीरने फोन उचलला. "नितिन अरे यार ज़रा गड़बडित आहे. उद्या एक महत्वाची मीटिंग आहे. त्याची तयारी करतो आहे. नंतर बोलतो तुझ्याशी." नितिन काही बोलायच्या आत सुधीर म्हणाला. "ठीके." एवढच म्हणून नितिनने फोन ठेवला. विकासचा मेसेज का आला नसेल ते त्याच्या लक्षात आल. तरीही विकासच अस फोन करण त्याला साध वाटत नव्हतं. रात्रि जेवताना त्याने हा विषय पत्नीकडे काढला. तिने सल्ला दिला की तुला unusual वाटल न मग तू जाऊन ये बघू लगेच उद्या. मी करेन संध्याकाळची लेक्चर्स मॅनेज. नितिनला देखील ते पटल आणि तो दुस-या दिवशीच् संध्याकाळी विकासाच्या घरी अचानक जाऊन थड़कला. त्याने विचार केला होता की अचानक जाऊन आपण विकासाला सरप्राइज देऊ या. पण त्या एवजी नितिन केवळ सरप्राइज नाही तर पुरता कोलंमडून गेला; विकासाच्या घरी पोहोचल्यावर.

विकासच्या आठवीत शिकणा-या मुलाने दार उघडल. घरात पाऊल ठेवताच नितिनला दवाखान्यातील औषधांच्या वासा सारखा वास जाणवला. विकास त्याच्या खोलीत झोपला होता. त्याची पत्नी नितिनला तिथे घेऊन गेली. विकास प्रचंड बारीक झाला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. नितिन पुरता गड़बडला. त्याने स्वातिकडे... नितिनच्या बायको बघितल. ती कसनुस हसली आणि डोळ्याला पदर लावून बाहेर गेली. विकासने डोळे उघडले आणि नितिनला बघुन उठून बसला.

"काय रे हे विकास?" नितिनने त्याच्या शेजारी बसत विचारले.

त्याचा हात हातात घेत विकास म्हणाला,"अरे काय सांगू? मला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे. last stage आहे. no hopes."

नितिन अवाक् झाला. "अरे no hopes काय म्हणतोस? तुला काही कळत आहे का? सायन्स इतकं पुढे गेल आहे. माझ्या ओळखित एक डॉक्टर आहेत. एक्सपर्ट आहेत. मी त्यांची उद्याच् अपॉइंटमेंट घेतो. तू चल फ़क्त."

विकास हसला. "नितिन तुला वाटत की मी काही केल नसेल? अरे स्वातीचा सख्खा भाऊच डॉक्टर आहे. I am getting the best treatment. फ़क्त सत्य हे आहे की उशिरा लक्षात आल्यामुळे काही उपयोग नाही. बर ते जाऊ दे. तू सांग ... तू कसा आहेस? अरे मी सुधीरला कॉल केला होता. पण तो थोड़ा बिजी होता; म्हणून मग तुला मेसेज नाही केला मी." विकास म्हणाला.

"मी ठिक. थांब आत्ताच सुधीरला फोन करतो." नितिन त्याचा मोबाईल बाहेर काढत म्हणाला.

विकासने त्याचा हात धरला. म्हणाला,"नितिन प्लीज माझ्या आजारपणा बद्धल कोणालाही सांगू नकोस. मला simpathy नको आहे. दोस्तीच्या ओढीने तो आला तर ठिक. नाहीतर नको. माझा इलाज व्हावा... मदत मिळावी म्हणून नाही मी तुला किंवा त्याला कॉन्टेक्ट केला. तुम्हाला भेटावस वाटल म्हणून कॉन्टेक्ट केला."

नितिनला त्याच म्हणण पटल. आणि मग पुढचे 3 तास ते दोघे जुन्या आठवणी आणि मस्ती केलेले दिवस यावर गप्पा मारुन खूप हसले. साधारण रात्रि 10 च्या सुमाराला नितिन निघाला. विकास खूप वेळ बसल्याने दमला होता. तो आडवा झाला आणि लग्गेच् झोपला.

निघताना नितिनने स्वातीला सांगितल.."काही लागल तर लग्गेच् कळव वहिनी. मी इथेच आहे. खर तर माझा एक खूप चांगला मित्र डॉक्टर आहे. मी त्याला एकदा घेऊन येतोच."

स्वाती शांत होती. ती म्हणाली,"नको नितिन भावजी. विकासाला नाही आवडणार. मुख्य म्हणजे आम्ही सर्व काही करतो आहोत. माझा भाऊच डॉक्टर आहे. त्यामुळे योग्य ट्रीटमेंट चालु आहे. विकास आज खूप दिवसानी असा उठून बसला. गप्पा मारल्या. खूप जीव आहे त्याचा तुमच्यावर आणि सुधीर भावजिंवर. त्यामुळे फ़क्त एकच विनंती आहे; तुम्ही फ़क्त जमेल तस भेटायला या." एवढ़ बोलून तिने नितिनला निरोप दिला.

जड़ मनाने नितिन घरी पोहोचला. घरी त्याने त्याच्या पत्नीला सर्व कल्पना दिली. "जीव तुटतो आहे ग. माझा विकास आयुष्यभर कायम परिस्थितिशी झगड़ला. पण कधीही तक्रार नाही केली. वडील लवकर गेले आणि तो त्यांच्या जागी लागला. कायम हसत मुख. आज मनात येत ग की त्याची काय एम्बिशन होती ते कधी आम्ही त्याला विचारलच नाही. आजही तो शांत आहे. मी उद्याच् सुधीरला फोन करुन सगळ सांगतो. विकास नको म्हणाला आहे; पण त्याची तब्बेत खूपच खालावली आहे. काहीच सांगता येत नाही ग. सुधीर भेटला तर त्याला बर वाटेल."

दुस-या दिवशी नितिनने सुधीरला फोन केला. पण सुधीरने फोन उचलला नाही. म्हणून मग नितिनने एक मेसेज केला. "Please call as u get free. Ita urgent." मात्र त्या दिवशी सुधीरचा फोन नाही आला. नितिन खूप डिस्टर्ब होता. त्याचा अस्वस्थपणा बघुन त्याची पत्नी म्हणाली की मी काही दिवस संध्याकाळची क्लासेस् बाघिन. तू तुझ्या मित्राला भेटायला जात जा.

मग नितिन एक दिवसा आड़ विकासकडे जाऊन बसु लागला. जुन्या आठवणी... त्यातून निघणा-या संदर्भातुन ज्यांची नावं आठवायची त्यांना दोघे मिळून फोन करायचे. एकच अट होती... विकासाची सद्य परिस्थिती सांगायची नाही. मग नितिन फोन लावून म्हणायचा की सहज आलो होतो विकासकड़े तर तुमची आठवण निघाली आणि फोन केला. आणि मग दोघे बोलायचे त्या व्यक्तिशी. नितिन रोज सुधीरच्या फोनची किंवा निदान मेसेजची वाट बघत होता. पण सुधीरचा काहीच पत्ता नव्हता.

असे 8-10 दिवस गेले. एक दिवस दुपारी स्वातीचा नितिनला फोन आला. "भावजी या..." बस इतकंच.

नितिन धावला.... पण सगळ संपल होत. विकासच्या मुलाला पोटाशी घेऊन नितिन खूप रडला. अगदी लहान मुला सारखा. "मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही.." ही खंत त्याने बोलून दाखवली. स्वाती त्याच्या जवळ आली आणि म्हणाली,"भावजी अस काय करता? तुमच्यामुळे विकासचे शेवटचे दिवस खूप चांगले गेले. तुमच्या येण्याकड़े तो डोळे लावून बसलेला असायचा. आता जर तुम्ही असा त्रास करून घेतलात तर त्याच्या जीवाला तिथे त्रास होईल. सांभाळा स्वतः ला." नितिन शांत झाला.

2-3 दिवस गेले आणि सकाळीच् नितिनला सुधीरचा फोन आला. आवाज गोंधळालेला होता. "नितिन आज न्यूज़ पेपरमधे एक फोटो आणि बातमी दिसते आहे निधनाची. अरे नाव विकास राजे आहे. फोटो देखील त्याच्या सारखा आहे. इतका घाबरलो आहे मी. विकासचा फोन लावतो आहे पण बहुतेक तो ट्रेन मधे असेल. रेंज नसावी. कारण लागत नाहिये...."

नितिनच्या डोळ्यात पाणी आल. म्हणाला,"सुधीर बातमी आपल्या विकासचीच आहे. मीच दिली आहे काल."

सुधीर गडबडला. "अरे काय म्हणतो आहेस तू? मला काहीच कळत नाही."

मग मात्र नितिन शांत झाला आणि म्हणाला,"सुधीर अरे विकासला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. Last stage होती. डॉक्टर्सनी सुद्धा कल्पना दिली होती. मी तुला 2-3 वेळा कॉन्टेक्ट करायचा प्रयत्न केला होता. पण तू फारच बिजी होतास."

सुधीर हतबलपणे म्हणाला,"अरे काहीतरी कल्पना द्यायचीस न. बर आपण स्वाती वाहिनीना भेटायला गेल पाहिजे रे. मी आज थोडा गड़बड़ित आहे. आपण उद्या संध्याकाळी जाऊ या. चालेल का तुला?" नितिन हो म्हणाला आणि फोन ठेवला.

दुस-या दिवशी संध्याकाळी नितिन आणि सुधीर दोघे विकासकडे गेले. विकासाच्या मुलाने दार उघडले आणि नितिनकड़े बघुन हसला. ते दोघे आत आले. स्वाती तिथेच बसली होती. नितिन आणि सुधीर बसले. काय बोलाव कुणालाच सुचत नव्हतं. शेवटी सुधीर म्हणाला,"वाहिनी मला काहीच कल्पना नव्हती हो. नाहीतर मी नक्की वेळ काढला असता आणि येऊन गेलो असतो. निदान best possible डॉक्टर्स पाठवले असते. खूप वाईट झाल. विकास मी आणि नितिन बेस्ट फ्रेंड्स होतो. वहिनी काही मदत लागली तर नक्की सांगा ह."

स्वाती काही बोलणार एवद्यात् तिचा मुलगा उभा राहिला. "सुधीर काका. माझ्या वडिलांना योग्य ट्रीटमेंट चालु होती. डॉक्टर्सची पण कमी नव्हती. त्यांना फ़क्त मैत्रीचा ओलावा हवा होता. नितिन काका गेले अनेक दिवस एक दिवसा आड़ येऊन बाबां बरोबर बसायचे. गप्पा मारायचे. आजही आम्हाला काहीच मदत नको आहे. मी अजुन लहान आहे मान्य आहे. पण माझा क्लेम माझ्या बाबांच्या जागी रहाणार आहे. माझी आई नोकरी करते. बाबांनी चांगल्या इन्वेस्टमेंट्स केल्या होत्या. So u don't worry about us. काका, तुम्ही आत्ता येऊन जे बोलता आहात त्यापेक्षा तुम्ही जर बाबा असताना आला असतात न तर त्यांना खूप बर वाटल असत. तुम्ही तुमची एखादी खूप महत्वाची मीटिंग miss केली असतीत तर अजुन 15 वर्षानी ते कोणालाही लक्षात राहणार नव्हतं. पण मी आयुष्यभर हे लक्षात ठेविन की माझ्या बाबांनी ज्यांच्यावर मित्र म्हणून मनापासून प्रेम केल ते सुधीर काका एक संध्याकाळही देऊ शकले नाहीत माझ्या बाबांना."

त्याच बोलण ऐकून सुधीरचा चेहेरा उतरला. तो काहीही न बोलता तिथून बाहेर पडला.

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2015 - 12:24 am | श्रीरंग_जोशी

कथा आवडली.

रुपककथा असावी असा अंदाज आहे.

आनन्दिता's picture

17 Apr 2015 - 1:13 am | आनन्दिता

आवडली कथा. नितीन ने तरी सुधीरला सगळ्याची कल्पना द्यायला हवी होती असं वाट्टंय. मैत्रीत कसली आलीय औपचारीकता,?

आवांतर : कथा काथ्याकुटात का टाकलीय पण?

संदीप डांगे's picture

17 Apr 2015 - 6:44 am | संदीप डांगे

आवडली कथा. तुम्ही लिहिता त्या कथावस्तू साध्या आणि छान असतात.

फक्त थोडं दोन-तीन वेळा वाचून नीटनेटकं करता आलं तर बघा. एक बांधेसूदपणा आवश्यक आहे माझ्यामते.

नाखु's picture

17 Apr 2015 - 9:25 am | नाखु

कथासूत्र फार चांगले आहे पण मांडणी थोडी सफाईदार असावी.
एकदा जयंतकाका/आत्मुदांच्या लेखनावर नजर टाका ही विनंती.
पुलेशु

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2015 - 9:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कथा ऐ भारी आहे. थोडसं अजुन सुधारता येईल पण :) लिहित रहा.

चिनार's picture

17 Apr 2015 - 10:08 am | चिनार

कथेचा आशय फार छान आहे !

नेत्रेश's picture

17 Apr 2015 - 11:01 am | नेत्रेश

खुप लवकर गेलेल्या माझ्या बेस्ट फ्रेंडच्या आठवणीने डोळे पाणावले. कळले तेव्हा खुप उशीर झाला होता. शेवटचे भेटताही आले नाही.

चुकलामाकला's picture

17 Apr 2015 - 11:06 am | चुकलामाकला

फार सुंदर ,सोपी सहज बाळबोध कथा!

सस्नेह's picture

18 Apr 2015 - 11:08 am | सस्नेह

सोपी सहज बाळबोध कथा .

पगला गजोधर's picture

17 Apr 2015 - 12:21 pm | पगला गजोधर

सिरियस नोट: लेखिकेने, अतिशय साधी सरळ छानशी कथा लिहिली आहे, लेखन आवडले.

अवांतर (ह. घ्या.) : दिल चाहता है (पार्ट २) चे कथाबीज होऊ शकते का हि कथा ?

सविता००१'s picture

17 Apr 2015 - 4:05 pm | सविता००१

आहे कथा

अावडली कथा.खूप दिवसात खबरबात न घेतलेल्या मित्र मैत्रिणींच्या आठवणी टोचत आहेत आता :(

प्रीत-मोहर's picture

17 Apr 2015 - 4:55 pm | प्रीत-मोहर

अरे देवा!!!

आवडली कथा, पण आठवीतला मुलगा असं बोलू शकतो हे जरा अतिरंजित वाटतंय.

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2015 - 6:11 pm | श्रीरंग_जोशी

ज्या मुलाने स्वतःच्या वडीलांच्या शेवटचा प्रवास एवढा जवळून पाहिला आहे तो हे नक्कीच बोलू शकतो.

परिस्थिती एखाद्याला वेळेअगोदर मोठे करते. अशी उदाहरणे प्रत्यक्षात पाहिली आहेत.

नाखु's picture

18 Apr 2015 - 8:48 am | नाखु

खरं आहे
अनुभवी नाखु

पिवळा डांबिस's picture

18 Apr 2015 - 11:53 am | पिवळा डांबिस

कथा साधी सोपी आहे.

पण आठवीतला मुलगा असं बोलू शकतो हे जरा अतिरंजित वाटतंय.

मला ते अतिरंजित वाटत नाही. आठवीतली मुलं काय वाटेल ते बोलू शकतात. पण तो लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे.
आता त्याचे वडिल गेल्यामुळे त्याला सहानुभूती मिळणं सहाजिकच आहे. पण तो जे काही बोलला त्यात शाळकरीपणाचा आणि असमंजसत्वाचा भागच खूप आहे.
लहानपणीची खूप मैत्री असेलही पण लहानपणचा मित्र फक्त भेटायला बोलावतो (तेही खरं कारण न देता कारण तिथे त्याचा ईगो आड येतो) म्हणुन लगेच हातातले सगळे व्यवहार टाकून धावत गेला नाही म्हणून सुधीरसारख्या व्यग्र माणसाला मी दोष देऊ शकत नाही. त्याला जायचंच नव्हतं असं कथेत कुठेही दर्शवलेलं नाही, फक्त तो लगेच गेला नाही इतकंच!
रामदासांची किर्ती ऐकल्यापासून त्यांची प्रत्यक्ष भेट घेईपर्यंत साक्षात शिवाजी महाराजांना कितीतरी वर्षे लागली होती. तात्पर्य, सांगावा आला म्हणुन लगेच धावले असं बिझी माणसाला सारखंच जमतं असं नाही....
मला तरी यात सुधीरचा काही फार मोठा अपराध/ दोष आहे असं वाटत नाही...

पियुशा's picture

17 Apr 2015 - 5:51 pm | पियुशा

आवडली!

ज्योति अळवणी's picture

17 Apr 2015 - 6:04 pm | ज्योति अळवणी

आपणा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

छोटा चेतन-२०१५'s picture

17 Apr 2015 - 11:33 pm | छोटा चेतन-२०१५

फार छान, आवडली कथा

खटपट्या's picture

18 Apr 2015 - 4:44 am | खटपट्या

खूप छान कथा !!