बोलाचीच बिर्याणी!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
22 Mar 2015 - 12:43 am
गाभा: 

कसाबविरुद्ध खटला लढवणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम ह्यांनी असे विधान केले आहे की कसाबला बिर्याणी खिलवण्यात येते अशी वदंता त्यांनीच पसरवली होती. कसाबबद्दल सहानुभूती वाटू नये म्हणून त्यांनी हे खोटे पसरवले.
इतके क्रूर कृत्य केलेल्या आरोपीबद्दल लोकांना सहानुभूती वाटेल असे निकमांना का वाटावे हे एक कोडेच आहे.
त्याने जे केले त्याला पुरेशी प्रसिद्धी दिली असती तर ते पुरले असते. त्याला खोट्या बिर्याणीची फोडणी द्यायची काय गरज आहे? मला वाटते असा खोटारडेपणा करणे अगदी कसाबबद्दल असले तरी खोडसाळपणाचे आहे. ह्या बिर्याणीमुळे त्या वेळच्या सरकारच्या अब्रूचा फालुदा झाला त्याला जबाबदार कोण? सरकारचा पगार घेणार्‍याने सरकारचीच अशी बदनामी करणे चालते का?
पुन्हा असा अतिरेकी हल्ला झाला आणि पुन्हा असा खटला चालवायचा झाला तर निकमांवर कोण विश्वास ठेवेल बरे?

बिर्यानी ने निकम को निकम्मा कर दिया वरना हम भी वकील थे कमाल के असे म्हणायची वेळ त्यांच्यावर येऊ नये!

प्रतिक्रिया

हे निकम वकीलीपेक्षा चमकोगीरी करण्याबद्दल जास्त प्रसीध्द आहेत.

रेवती's picture

22 Mar 2015 - 4:04 am | रेवती

हम्म......मलाही ते खटकले. कसाब कोणाचाही लाडका नव्हताच पण वकील साहेबांनी हे असे का केले असावे ते समजले नाही किंवा दिलेले कारण पटले नाही. आणखी विचार करायला झाले नाही. आता इथे वाचीन.

मित्रहो's picture

22 Mar 2015 - 10:32 am | मित्रहो

मी ही बातमी इथे वाचली. त्यानुसार अशा बातम्या पसरविण्यात आल्या असाव्यात असे त्यांनी म्हटले म्हणजे बातमी त्यांनी पसरविली नाही असे त्यांना म्हणायचे आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Mar 2015 - 8:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खळबळजनक विधाने करायची सवय उज्वलला पूर्वीपासून आहे.मुंबई १९९३ स्फोटांच्यावेळीही त्याने वादग्रस्त विधाने केली होती.त्यावेळी सरकारला हसणार्या लोकांनी कसाबला खरोखरच बिर्याणी देण्यात येत असेल का ह्याचा विचार केला नाही.

श्रीरंग_जोशी's picture

22 Mar 2015 - 8:40 pm | श्रीरंग_जोशी

२२ नोव्हेंबर २०१२ - अन मिडीयात कसाबच्या बिर्याणीचा फ्लॅश

सध्या ही घटना वेगळ्या प्रकारे प्रस्तुत केली जात आहे. कसाबच्या फाशीनंतर उज्वल निकम यांच्या ज्या मुलाखती वाचल्या होत्या त्यात त्यांनी सांगितलेला घटनाक्रम याप्रमाणे.

कसाबचे न्यायालयात भावूक होणे या मुद्द्यावर वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तुम्हाला न्यायालयाबाहेर प्रश्न विचारले जाऊ शकतात अशी माहिती न्यायालयातून बाहेर पडण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर निकम यांना कुणीतरी दिली.

यातून नको तो संदेश जाईल असे निकम यांना वाटले अन माध्यमांचा रोख बदलण्यासाठी ऐनवेळी सुचलेली ही बिर्याणी मागणीची क्लृप्ती त्यांनी वापरली.

दोन - अडीच वर्षांपूर्वी सगळीकडे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना इतके सहजपणे वेगळ्या प्रकारे कसे काय प्रस्तुत केले जाऊ शकते हे मला न उलगडणारे कोडे आहे.

हुप्प्या's picture

22 Mar 2015 - 9:56 pm | हुप्प्या

आपली बाजू इतकी भक्कम असताना कसाबच्या राखी कोण बांधणार ह्या फिल्मी, बेगडी रडगाण्यामुळे केसचा निकाल बदलून तो निर्दोष सुटेल अशी भीती निकमांना वाटत असती तर त्यांनी ती केस दुसर्‍या कोणाला द्यायला हवी होती. इतके उघड उघड खून केलेला माणूस, इतके ठोस पुरावे असताना निर्दोष सुटेल असा संशय येत असेल तर निकमांचा न्यायसंस्र्थेवर किती विश्वास आहे असे प्रश्नचिन्ह उभे रहाते.
हा अत्यंत अनाठायी, अनावश्यक खोटारडेपणा आहे. त्याने सरकारची बदनामी झाली आहे. कदाचित कुठल्या डोकेफिरू नेत्याने ह्या खोट्याचा उपयोग दंगल घडवून आणण्याकरता केला असता तर?

श्रीरंग_जोशी's picture

22 Mar 2015 - 10:18 pm | श्रीरंग_जोशी

निकाल बदलून तो निर्दोष सुटेल अशी भिती (किंवा शक्यता) वाटल्याचे उज्वल निकमांने म्हंटल्याचे कुठल्या बातमीत लिहिले आहे? मी अशी बातमी शोधायचा प्रयत्न केला. परंतु अजुन तरी नाही मिळाली.

हुप्प्या's picture

23 Mar 2015 - 3:07 am | हुप्प्या

जर खटला हरायची भीती नव्हती तर बाकी कुठल्याही गोष्टीची उठाठेव करण्याची निकमांना काय गरज होती? कसाबची प्रतिमा विविध मिडिया कशी बनवत आहेत? त्याला सहानुभूती मिळते आहे का ह्या गोष्टींचा जर खटल्याशी संबंध नसला तर ही खोटी आवई उठवलीच का?
वकीलाचे काम साक्षी पुरावे इतके चोख बनवणे की आरोपी सुटला नाही पाहिजे. बाकी सगळे गौण आहे. कसाबच्या बाबतीत पुरावे चोख होतेच. ही काही किचकट, गुंतागुंतीची केस नव्हती त्यामुळे हा खोट्याचा डाव खेळायची गरज नव्हती. एकदा का खोटारडेपणाचा शिक्का बसला की पुन्हा तसे बेमालूम खोटारडेपणा करणे अशक्य असते. जो डाव जिंकत आला होता त्या डावात हा खोटा जोकर वापरून आपले हसे करून घ्यायची काही आवश्यकता नव्हती.

श्रीरंग_जोशी's picture

23 Mar 2015 - 3:34 am | श्रीरंग_जोशी

खटला व कसाबविषयी माध्यमांतील बातम्या या पूर्णपणे स्वतंत्र गोष्टी आहेत.

या खटल्याला माध्यमांकडून जेवढी प्रसिद्धी मिळाली असेल तेवढी आजवर भारतातील कुठल्याही फौजदारी खटल्याला मिळाली नसेल. भारतीय प्रसारमाध्यमांनी रंगवलेले चित्र परदेशी माध्यमांत परावर्तित होणे हे ही अनुषंगाने होत होतेच.

आपली माध्यमे उथळ असल्यानेच निकम यांच्याजवळ वेगळा पर्याय उरला नसावा.

गेल्या काही वर्षांत अमेरिकेतही अनेक अतिरेक्यांविरुद्ध खटले चालवले जात आहे. खटला सोडून बिनकामाच्या गोष्टी त्याविषयींच्या बातम्यांमध्ये वाचल्याचे / पाहिल्याचे अजिबात स्मरत नाही.

बाकी हीच गोष्ट निकम यांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये स्वतःच उघड केली होती तर आपली माध्यमे आताच हा वाद कसा काय उकरून काढत आहेत अन बरेच लोक ही बाब प्रथमच कळल्यासारखे दाखवत आहे हे मला न उलगडणारे कोडे आहे.

हुप्प्या's picture

23 Mar 2015 - 9:22 pm | हुप्प्या

माध्यमे सगळीकडे सारखीच असतात. भारतातील माध्यमे जास्त उथळ आहेत वगैरे समर्थन केविलवाणे आहे. त्याकरता खोटारडेपणा करणे समर्थनीय नाही. आणि सरकारची बदनामी? त्याचे काय? न खिलवलेल्या बिर्याणीकरता त्यांच्यावर टीकेची झोड उठली ह्याची जबाबदारी कुणाची? मी काँग्रेसविरोधी आहे. पण अशा खोट्या दंभापोटी त्यांना धारेवर धरले जाणे मला खटकते.
गुन्हा आज केला का काल केला का काही वर्षापूर्वी केला ह्यावर त्याचे गांभीर्य ठरत नाही. जेव्हा केव्हा तो झोतात येईल तेव्हा त्याचा समाचार घ्यावा असा संकेत आहे.
आणि हे प्रकरण उकरण्याविषयी: हा विषय निकमांनी जयपूर येथे कुठल्याशा कॉन्फरन्सच्या वेळी स्वतःच उपस्थित केला होता. तेव्हा हा माध्यमांचा उपद्व्याप नसून निकमांचा आहे.

श्रीरंग_जोशी's picture

23 Mar 2015 - 9:47 pm | श्रीरंग_जोशी

लोकविस्मृतीमध्ये गेलेली बाब स्वहस्ते पुन्हा प्रसिद्ध करणे ही निकम यांची चूकच. काही गोष्टी गुप्त राहिलेल्याच बर्‍या असतात.

कसाबने बिर्याणीची मागणी केली असे म्हणणे याचा अर्थ सरकारने ती मागणी पूर्ण केली हे गृहीतक न पटण्यासारखे आहे.

श्रीरंग_जोशी's picture

24 Mar 2015 - 9:52 am | श्रीरंग_जोशी

कारागृहात इतर कैद्यांना जे जेवण दिले जात होते तेच कसाबला दिले जात असावे. केवळ त्याने मागणी केली म्हणून त्याला काही विशेष खाऊ घातले गेले असेल असे मला वाटत नाही.

आशु जोग's picture

19 Jun 2015 - 12:20 am | आशु जोग

निकम बोलतात त्याची बातमी होते मग कृतीचे काय होइल

मास्टरमाईन्ड's picture

22 Mar 2015 - 9:48 pm | मास्टरमाईन्ड

कसाबबद्दल (तथाकथित सेक्युलर) लोकांच्या मनात दया / कणव आदी भावनांचा कल्लोळ /डोंब इ. उसळून त्याला सहानुभूती मिळण्याचा दुर्दैवी प्रकार आपल्या महान देशात नक्कीच झाला असता. उलट तो होण्याचे टाळल्याबद्दल मि.पा. वर निकमांचा जाहीर सत्कारच केला पाहिजे.

खंडेराव's picture

25 Mar 2015 - 9:37 am | खंडेराव

कोणाच्याही मनात हा भावनांचा कल्लोळ उसळला नसता. कसाब हा दहशतवादीच होता, कोणीही त्याला सहानुभुती दाखवत नव्हते.

हा बिरियाणीचा पुर्ण किस्साच अप्रस्तुत होता.

( तथाकथित से़क्युलर ) खंडेराव

पॉइंट ब्लँक's picture

22 Mar 2015 - 9:55 pm | पॉइंट ब्लँक

कसाब फाशीवर चढला, प्रकरण बंद. बिर्याणी मागितली काय आणि नाय काय हे चघळून काय फायदा नाही.

हुप्प्या's picture

22 Mar 2015 - 9:58 pm | हुप्प्या

कसाब हे केवळ निमित्त आहे. तो फासावर गेला का हा मुद्दा अत्यंत अप्रस्तुत आहे.
निकम तर जिवंत आहेत ना? उद्या ते सरकारतर्फे अजून एखादी केस लढवू शकतील. आता त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न लोकांना पडणारच. असा वाईट पायंडा पडला की कोण खोटे आणि कोण खरे ते कळणार नाही.

सुबोध खरे's picture

25 Mar 2015 - 10:08 am | सुबोध खरे

+१००
बाकी निकम साहेबाना प्रसिद्धीत राहायचं सवय लागली असावी त्यामुळे काही तरी करून प्रकाशात येण्यासाठी हे लफडं त्यांनी उकरून काढलं असावं अन्यथा या गोष्टीवर वाच्यता करायची काय गरज होती? येन केन प्रकारेण!!

ईंद्रनिल's picture

23 Mar 2015 - 4:08 am | ईंद्रनिल
बोका-ए-आझम's picture

30 Mar 2015 - 5:05 pm | बोका-ए-आझम

अमेरिकेसारख्या देशात, जिथे ज्युरींवर दोषी किंवा निर्दोष असं ठरवण्याची जबाबदारी असते आणि ज्युरी हे सामान्य माणसांतून ठरवण्यात येतात अशा वेळी निकमांनी जे केलं ते एकवेळ क्षम्य होतं. पण आपल्या देशात ज्युरी ट्रायल नसताना आणि जनमत कसाबच्या बाजूने होण्याचा खटल्याच्या निकालावर परिणाम होण्याची सुतराम शक्यता नसताना निकमांसारख्या जबाबदार प्राॅसिक्युटरने असं करण्याची आणि स्वतःच्या विश्वासार्हतेला स्वतःच धक्का लावण्याची काहीही गरज नव्हती.