मुर्गवाला साग

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
24 Feb 2015 - 8:52 pm

खूप दिवसांनी पाकृ घेऊन येते आहे.मुर्गवाला साग अर्थात पालकातली कोंबडी.. ह्याच्या अनेक रेसिप्या आहेत,(जमेल तशा त्यातल्या इतरही देईन..) त्यापैकी ही एक एव्हरग्रीन रेसिपी..

.

साहित्य-
बोनलेस चिकन ५०० ग्राम
पालकाची जुडी १ किवा फ्रोझन पालक २०० ग्राम
२-३ टेबलस्पून तेल
२ सुक्या लाल मिरच्या
१ मोठा किवा २ मध्यम कांदे
१ मोठा टोमॅटो किवा टोमॅटो प्युरी १ वाटी
१ मोठी किवा २-३ लहान लसणीच्या पाकळ्या,२ पेरं आलं
चिकन मसाला २ टे स्पून
गरम मसाला १ टी स्पून
लाल तिखट अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
१ चमचा बटर

कृती-

चिकन धुवून स्वच्छ करुन तुकडे करुन घ्या.
कांदा व टोमॅटो बारीक चौकोनी चिरुन घ्या.
आले व लसूण बारीक चिरुन घ्या.
चिकनच्या तुकड्यांना थोडा चिकन मसाला व मीठ चोळा.

एका पातेल्यात पाणी गरम करुन त्यात पालकाची पाने घाला, उकळू द्या. नंतर पालक चाळणीवर घालून पाणी निथळू द्या.फ्रोझन पालक असेल तर फ्रिझरच्या बाहेर काढून ठेवा.

कढईत २ पळ्या तेल गरम करा,त्यात सुक्या लाल मिरच्या घाला व चांगल्या परता आणि नंतर त्या एका ताटलीत बाजूला काढून ठेवा.
आता त्या तेलात कांदा घालून परता.कांदा शिजत आला की त्यात आलं व लसूण घाला व थोडे परता.चमचाभर चिकन मसाला व चमचाभर गरम मसाला घाला.मिसळणाच्या डब्यातला अर्धा चमचा लाल तिखट घाला.
चिकनचे तुकडे घालून मिक्स करा व झाकण ठेवून ५ मि. शिजवा.
नंतर टोमॅटो घाला व मिक्स करा. झाकण ठेवून चिकन जवळजवळ शिजू द्या.

चाळणीवरील पालकाची पाने एव्हाना निथळली असतील. ती मिक्सरमधून फिरवून घ्या.
फ्रोझन पालक असेल तर तो ही एव्हाना कक्षतपमानाजवळ आला असेल. तो मिक्सरमधून फिरवून घ्या.
ही पालकाची प्युरी शिजत आलेल्या मिश्रणात घाला व मिक्स करुन घ्या.
चवीनुसार मीठ व तळलेल्या लाल मिरच्या घाला व शिजू द्या.गरजेनुसार थोडे पाणी घालून सारखे करा.
अगदी शेवटी थोडे बटर घाला.

मुर्गवाला साग तयार आहे.
भात,नान, रोटी,पराठा.. पैकी ज्याबरोबर हवे तसे सर्व्ह करा.

.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

24 Feb 2015 - 9:49 pm | सुहास झेले

पण इतके Watermark? फोटोची मज्जा गेली हो त्यामुळे. बाकी पाककृती अल्टिमेट :)

एस's picture

25 Feb 2015 - 3:50 pm | एस

स्वाती दिनेशवाला साग आवडला. किती घातले याचेही प्रमाण द्या ना. डिशच्याही बाहेर गेलेत म्हणून आपलं विचारलं ;-)

चिंतामणी's picture

28 Feb 2015 - 8:18 pm | चिंतामणी

हेच म्हणणार होतो. असो.

आत्ता पाउस पडत आहे. गरम गरम भात आणी सोबत मुर्गवाला साग खावे असे वाटत आहे.

हे म्हणजे आपल्या पालक पनीरचे मांसाहारी संस्करण झाले. फ्रोझन पालक कधी वापरला नाहीये, पण आता तू म्हणतियेस तर एकदा आणून बघते.

स्रुजा's picture

25 Feb 2015 - 6:51 am | स्रुजा

रेवाक्का, फ्रोझन पालक आणि मेथी म्हणजे वरदान हो !
रेसिपी झकास स्वातीताई, मी पण घास-फुस वाली आहे बर्‍यापैकी त्यामुळे पनीर घालुन करणार :)

सविता००१'s picture

25 Feb 2015 - 12:40 pm | सविता००१

पनीर घालून करणार

स्पंदना's picture

25 Feb 2015 - 6:48 am | स्पंदना

वा स्वाती ताई अगदी चविष्ट दिसते डीश!!
वरुन मिरच्या तळुन घालायचे नविनच समजले.

सामान्य वाचक's picture

25 Feb 2015 - 12:07 pm | सामान्य वाचक

सामिष खात नसल्यामुळे उपयोगाची नाही , पण एकंदरीत छान दिसते आहे

मनीषा's picture

25 Feb 2015 - 12:10 pm | मनीषा

मलाही पालक पनीर सारखीच पालक चिकन वाटते आहे.
आमच्या इथे राउंड स्पिनॅच, शार्प स्पिनॅच, बेबी स्पिनॅच , आणि इंडीयन स्पिनॅच असे पालकाचे अनंत प्रकार मिळतात. त्यामुळे फ्रोझन वापरावा नाही लागणार.
पण फ्रोझन स्पिनॅच वापरला तर चवीत फरक पडेल ना?

कपिलमुनी's picture

25 Feb 2015 - 12:46 pm | कपिलमुनी

मुर्गवाला साग मस्तच !

अशीच पालकाची पाकृ जागू यांनी टाकली होती
अंडी पालक

फोटू ( जागू यांच्या धाग्याहून साभार)

अंडी पालक

याची आठवण झाली

दिपक.कुवेत's picture

25 Feb 2015 - 8:56 pm | दिपक.कुवेत

नको ईतक्या वॉटरमार्क मुळे रसभंग होत आहे....

त्रिवेणी's picture

25 Feb 2015 - 9:08 pm | त्रिवेणी

मस्त वाटते क्रुती.

सानिकास्वप्निल's picture

26 Feb 2015 - 1:49 am | सानिकास्वप्निल

छान आहे पाकृ ताई :)

स्वाती२'s picture

26 Feb 2015 - 7:40 pm | स्वाती२

छान पाकृ! पालक जरा कमी प्रमाणात घेवून करेन.

स्वाती राजेश's picture

26 Feb 2015 - 8:44 pm | स्वाती राजेश

पाककृती...फोटो पण मस्त.... :)

पैसा's picture

26 Feb 2015 - 9:45 pm | पैसा

सोपी पण आहे!

स्वाती दिनेश's picture

28 Feb 2015 - 4:54 pm | स्वाती दिनेश

हम्म.. वॉटरमार्कच्या जंगलात वाट चुकले आहे.. पुढच्या वेळी हायवेवरुन जाईन.. :)
सर्वांना धन्यवाद,
स्वाती

hitesh's picture

28 Feb 2015 - 11:24 pm | hitesh

रंग आवडला नाही

पेट थेरपी's picture

5 Mar 2015 - 10:06 am | पेट थेरपी

इश्कवाला लव्ह सारखे वाट्ते आहे. खिमा व पालक पण छान लागते. चिकन मला टॉमटो ग्रेव्हीतच फार आव्ड्ते.
फोटो खराब आला आहे. उल्का वगिअरे पडते त्याचा फोटो वाट्तो आहे.

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 11:19 am | खंडेराव

छान. नाव सागवाला मुर्ग हवे होते का :-)