पाटिशप्ता

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:13 am

पाटिशप्ता

बंगाली मिठाया ह्या बंगाली मुलींप्रमाणेच गोड असतात. की त्या मिठायाच लहानपणापासून खाल्ल्यामुळे बंगाली मुली एवढ्या गोड होत असतील? तात्पर्य काय, तर त्या (म्हणजे मिठाया) न आवडणारा विरळाच.

पाटिशप्ता हा असाच सणासुदीला केला जाणारा एक पारंपारिक पदार्थ. मूळ रेसिपीत गूळ-खोबर्‍याचं सारण करून ते तांदळाच्या पॅनकेकमधे भरून त्याचा रोल करतात. तसं बघायला गेलं तर हे म्हणजे आपल्या मोदकांचंच फ्लॅट व्हर्जन आहे. पण हेच जरा खालील वेगळ्या पद्धतीने केल्यावर डिश एकदम रिच झाली.

घ्या तर मग... दिवाळीला घरच्यांना हा वेगळ्या चवीचा पदार्थ खायला घालून आनंद द्विगुणित करा. ही दिवाळी तुम्हां सगळ्यांना उत्तम आरोग्याची, स्वस्थ मनाची आणि भरभराटीची जावो.

shapta1

साहित्यः

पॅन केक साठी:

१. मैदा - १ बाउल
२. तांदळाचं पीठ - ५ चमचे
३. चवीनुसार मीठ
४. तेल/पाणी आवश्यकतेनुसार

स्टफिंग साठी:

१. कॅन्ड मँगो प्युरे / पल्प - १/२ बाउल
२. डेसिकेटेड कोकोनट - १ मोठा बाउल
३. बदाम, पिस्ता आणि काजू भरडसर चिरलेले - ३ चमचे प्रत्येकी
४. पिस्ता पावडर
५. मिल्क मेड - आंब्याच्या गोडीनुसार कमी/जास्त

shapta2

कृती:

१. पॅनकेकसाठी एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ, मैदा आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करा. गरजेप्रमाणे त्यात पाणी घालून सरसरीत भिजवा (घावनांचं पीठ असतं त्या घनतेत).

shapta3 shapta4

२. मंद आचेवर नॉनस्टिक तवा तापला की १ चमचा तेल घालून सर्व बाजूंनी पसरून घ्या. पिठामधून एक एक डाव मिश्रण घालून बाईट साईज पॅनकेक दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राउन होईस्तोवर भाजून घ्या. जर छोटे छोटे पॅन केक घालायला कंटाळा असेल तर एकच मोठा घाला. असे सर्व पॅन केक बनवून घ्या व पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल शोषलं जाईल.

shapta5 shapta6

३. पॅन केक गार होईस्तोवर दुसर्‍या एका बाउलमध्ये अनुक्रमे कॅन्ड मँगो प्युरे, डेसिकेटेड कोकोनट, बदाम, पिस्ता आणि काजू घालून हलक्या हाताने मिक्स करा. मिश्रण अगदीच घट्ट वाटलं तर गरजेप्रमाणे दूध घालून पातळ करा (अगदी पातळ नाही; साधारण स्प्रेड होईल ह्या घनतेचं).

shapta7 shapta8

४. मिक्स केलेल्या मिश्रणाची चव घेऊनच मिल्क मेड कमी/जास्त प्रमाणात घाला. मिल्कमेड घालूनही गोडी कमी वाटली तर पिठीसाखर घालून मिश्रण सारखं करा. आता पोळपाटावर एक एक पॅनकेक घेऊन तयार मिश्रण त्यावर पसरा.

shapta9 shapta 10

५. वरून चिमूट-चिमूट ड्रायफ्रूट्स पुन्हा भुरभुरवा आणि पॅनकेकचा रोल करून मँगो पाटिशप्ताचा आनंद लुटा!

shapta 11

टिपा:

१. मिश्रणाला अजून रिचनेस देण्यासाठी त्यात केशरमिश्रित दूध घालू शकता.

२. मँगो प्युरे ऐवजी हर्शलेचं चॉकलेट सिरप किंवा कॅडबरीची ड्रिंकींग चॉकलेट पावडर घालून चॉको/चॉकलेट फ्लेवर पाटिशप्ता बनवू शकता.

३. ड्रायफ्रूट्स नको असतील तर बारीक चिरलेला खजूर आणि बदाम हे कॉम्बोदेखील मस्त लागेल. खजुरांऐवजी सुकवलेले प्लम/अननस/अंजीर इत्यादी मिक्स करूनही पाटिशप्ता बनवू शकतो.

४. बारीक चिरलेली फ्रेश फळं (संत्री, मोसंबी यांसारखी रसाळ फळं सोडून) उदा. केळी, सफरचंद, चिक्कू, स्ट्रॉबेरी विथ व्हिप्ड फ्रेश क्रीम हेही कॉम्बो छान लागेल असा अंदाज लावतो... अर्थात कल्पनाशक्तीला मर्यादा नसते!

हॅप्पी दिवाली..!

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Oct 2014 - 8:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा पदार्थच माहीत नव्हता. करायलाही सोपं दिसतंय.

फ्रीजर/फ्रिजमध्ये टिकतो का हा जिन्नस?

दिपक.कुवेत's picture

26 Oct 2014 - 7:03 pm | दिपक.कुवेत

फ्रिजमधे टिकतो हा पण खातेवेळि मावे मधे हलके गरम खात जा. फ्रिज मधे पॅन केक कडक होतात म्हणून. म्हणून करतानाच थोडे कर म्हणजे ताजे ताजे संपतील. सुख्या नारळ्याच्या किसात सुद्धा बाकि जीन्नस घातल्याने एक ठरावीक काळाने नारळास वास येतो.

प्रचेतस's picture

21 Oct 2014 - 2:57 pm | प्रचेतस

अफाट प्रकार केलास रे.

हा पदार्थ याआधी कधीही ऐकला नव्हता. मस्त दिसतोय.

हा पदार्थ याआधी कधीही ऐकला नव्हता. मस्त दिसतोय.

अनोखी मिठाई. सोपी पाकृ आवडली.

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2014 - 12:27 am | मधुरा देशपांडे

वेगळाच प्रकार आहे. सोप्पा वाटतोय. करुन बघणार. :)

बंगाली मिठाईत काय नवीन असतं ?=त्याचं नाव.

सस्नेह's picture

27 Oct 2014 - 12:39 pm | सस्नेह

बंगाली मिठाया ह्या बंगाली मुलींप्रमाणेच गोड असतात

*smile*

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2014 - 4:57 pm | अत्रुप्त आत्मा

हाय...हाय...नको रे नको... :)

.
.
.
.
.
हा माणूस मंजे नुस्ता छळ आहे..छळ! :-/

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2014 - 6:58 pm | प्रभाकर पेठकर

पहिल्या दोन ओळींमधून मोठ्या कष्टाने स्वतःला सावरून बाहेर पडल्यावर पाककृती वाचली.
गोडाची असल्याकारणाने 'छान आहे' एव्हढंच म्हणतो.

पाटीशप्ता ह्या शब्दाची फोड, व्यत्पत्ती काय आहे? म्हणजे एव्हढ्या साध्या आणि गोड (दिपकच्या भाषेत बंगाली मुलींप्रमाणे) पदार्थाला हे असे उच्चारायला, लक्षात ठेवायला कठिण नांव का ठेवले असावे??

दिपक.कुवेत's picture

26 Oct 2014 - 7:06 pm | दिपक.कुवेत

मलाहि माहित नाहि. खरं तर हा पदार्थ बघीतल्यावर ईतकी भुरळ पडली कि ति कधी एकदा करुन खातोय असं झालेलं.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2014 - 8:39 pm | मुक्त विहारि

आपल्या पार्टी नंतर खायला उत्तम..

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2014 - 12:45 am | डॉ सुहास म्हात्रे

भारी दिसतोय हा पदार्थ ! पण खायला कुठे मिळेल बरे ?

दिपक.कुवेत's picture

26 Oct 2014 - 7:07 pm | दिपक.कुवेत

कुठे काय विचारता?? या कि बिनधास्त ईकडे. खाउया मस्त वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पाटिशप्ता.

सेरेपी's picture

23 Oct 2014 - 3:00 am | सेरेपी

माझा आवडता पदार्थ आहे. कधी बनवला नाही पण. आंबा घालायची आयडिया आवडली. फोटो छान आलेत.

स्पंदना's picture

27 Oct 2014 - 6:21 am | स्पंदना

मस्त!!

इशा१२३'s picture

16 Nov 2014 - 2:55 pm | इशा१२३

या नावाचा पदार्थ आहे हेच माहित न्हवते.
नविन पदार्थ आवडला.

सुहास झेले's picture

16 Nov 2014 - 3:41 pm | सुहास झेले

प्रचंड भारी.... हे पुढच्या विकांताला नक्की करणार :)