केळ्याचे धोणास (सांदण)

धनंजय's picture
धनंजय in पाककृती
27 Jul 2008 - 6:10 pm

गोव्याच्या अमिताबाय सलत्री यांच्या "रुच्चीक" पुस्तकातून स्फूर्ती घेऊन :

(शिवाय त्यात काय फरक करून मिपा ईशान्य यूएस कट्ट्यासाठी ही पाकृ केली, ते सोयिस्कर फरक.)

साहित्य :
अ. सांदणासाठी
सुमारे ८ बुटबुटी हजारी किंवा कसलीही खूप पिकलेली केळी, शक्यतोवर गावठी
(थोडीफार पिकलेली भद्दाडी दक्षिण अमेरिकन केळी ३ घेतली)
३ वाट्या गव्हाचा किंवा तांदळाचा जाड रवा
('इडली रवा' म्हणून मिळतो, तो दीड वाटी)
१ मोठा चमचा घरगुती तूप
(माझ्या घरी साधारणपणे तूप नसते, रिफाइन्ड तेल घेतले.)
२ वाट्या किसलेला गूळ
(केळी थोडीच पिकली होती, गुळाचे प्रमाण चव घेतघेत वाढवले.)
७-८ काजूगरांचे तुकडे, किसमिस, वगैरे
वेलच्यांची पूड
हळदीचे पान - बारीक चिरून
(हे मला अमेरिकेत मिळाले - घरी कुंडीत हळदीचे झाड आहे.)
अर्धी वाटी खोबरे (अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस अर्ध्या वाटीभर नारळाच्या दुधात भिजवून 'बनवलेले' ओले खोबरे.)
दोन चिमूट खायचा सोडा (ही युक्ती कमलाबाई ओगले यांच्याकडून.)

आ. 'चुन्न' = सारणाचे साहित्य आणि कृती
२ वाट्या खोबरे (वरच्यासारखेच बनवले)
१ वाटी किसलेला गूळ
वेलच्यांची पूड
१ मोठा चमचा घरगुती तूप
(सर्व अर्ध्या प्रमाणात घेतले.)
सर्व साहित्य एका भांड्यात गरम करून चांगले आळवा. कृती करण्यापूर्वी चुन्न/सारण तयार हवे.

कृती :
रवा तुपात (रिफाइन्ड तेलात) भाजून घ्या - फार तांबूस नको.
केळी कुस्करून घ्या (मी किसून घेतली.)
त्यात रवा + बाकी सर्व साहित्य-१ घाला.
चमच्याने पडले पाहिजे - घट्ट असेल तर नारळाचे दूध घालून थोडे सैल करा. फार सैल नको.
एका कुकरच्या भांड्याला तुपाचा/तेलाचा हात लावा. (मी हळदीच्या पानाच्या लांबलांब पट्ट्या कापऊन खाली शोभेसाठी मांडल्या.)
अर्धे मिश्रण ओता. त्यावर चुन्न-सारणाचा थर द्या -अगदी कडेपर्यंत जायला नको.
मिश्रणाचा उरलेला भाग घाला.
कुकरमध्ये/मोदक वाफवायच्या भांड्यात वाफवा/शिजवा. साधारणपणे भात शिजायला लागतो तितका वेळ.
घट्ट केकसारखे झालेले धोणास कुकरच्या भांड्यातून अलगद ताटलीत काढा.
वरती-खालती निखारे ठेवून भाजा. (मी ओव्हनमध्ये "ब्रॉइल" केले.)
खरपूस रंग बदलला की झाले.

धोणास गरम खावे, किंवा एक दिवस तसेच 'मुरत' ठेवून दुसर्‍या दिवशी गरम करून खावे.

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

27 Jul 2008 - 6:27 pm | प्रियाली

मस्त पाककृती. करून पाहिलीच पाहिजे. घरातील गोडघाशे तृप्त होतील असे वाटते.

हळदीचे झाड कसे लावलेत? इंडियन स्टोरातून ओले हळकुंड आणलेत का? आणि कुंडीतील हे झाड सतत जगते की थंडी पडू लागले का मरते? या पानाचे पाककृतीसाठी आणखी काही उपयोग करता का? म्हणजे पानगी होऊ शकेल पण मासे बिसे?

धनंजय's picture

28 Jul 2008 - 9:10 am | धनंजय

गेला वर्षभर प्रयत्न करतो आहे - पण आधी प्रत्येक वेळा हळकुंड सुकायचे किंवा कुजायचे. हळकुंडाचा दोष की मातीचा की पाणी घालणार्‍याचा ते ठाऊक नाही.

या वेळेला "कॅक्टस/सिट्रस-साठी माती" (म्हणजे भरपूर वाळू मिश्रित) अशी दुकानात मिळते, ती आणली, आणि त्यात हळकुंडे पुरली. पाणी माफक घातले, पण त्याचा निचरा पटकन होतो... यावेळी कोंभ फुटून झाड आले. पहिलेच वर्ष आहे, कुंडी घरात खिडकीत आहे. हिवाळ्यात टिकते का बघू...

वापर म्हणायचा तर सांदण/पानगे आहेतच. लहानपणी तांदळाच्या उकडीच्या कुठल्या पदार्थाला हळदीच्या पानाचा सुवास आठवतो - उकडीचे मोदक करताना मोदकपात्रात हळदीची पाने लावली होती का???? नीट आठवत नाही.

सलत्रीबाई म्हणतात, की (तांदळाचा) कुठलाही गोडाचा पदार्थ करताना वेलदोड्याबरोबर/वेलदोड्याऐवजी हळदीचे पान घालावे. त्यामुळे प्रयोग करायला हरकत नाही.

माशांसाठी वापरलेले माहीत नाही - माशाच्या मानाने याचा वास फारच नाजूक-साजूक वाटतो. तसे कर्दळीच्या पानापेक्षा हे हळदीचे पान थोडे लहान असते - त्यामुळे माशाचा तुकडा भाजण्या/वाफवण्यासाठी पुडीही करता येणार नाही...

नंदन's picture

28 Jul 2008 - 12:34 pm | नंदन

>>> लहानपणी तांदळाच्या उकडीच्या कुठल्या पदार्थाला हळदीच्या पानाचा सुवास आठवतो
पातोळ्या का? (यालाच पानगी म्हणत असतील, तर ठाऊक नाही .)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मेघना भुस्कुटे's picture

28 Jul 2008 - 1:02 pm | मेघना भुस्कुटे

पानगी माझ्या माहितीप्रमाणे केळीच्या पानावर लावतात. आणि पातोळे हळदीच्या पानावर. मलापण हवीय आत्ता पानगी आणि फोडणीची मिरची. :(

शितल's picture

27 Jul 2008 - 6:40 pm | शितल

आम्ही तुमच्या हातचे सांदण खाल्यामुळे तर आम्हाला ह्या पदार्थाची चव आधी कळली आणी आता रेसिपी. :)
खुप खुप सह्ही झाला होता.
आता नक्की करून पाहनारच आहे आणी तुम्हाला कळविनच कसा झाला तो.

प्राजु's picture

28 Jul 2008 - 7:47 pm | प्राजु

अतिशय सुंदर झाले होते सांदण... इतके सोपे आणि ते ही तुम्ही केलेत त्यामुळे विशेष. मी ही करून पाहणार आहे. तुम्हाला कळवेन नक्की.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jul 2008 - 7:38 pm | llपुण्याचे पेशवेll

धनंजय सर तुमचे सांदण फार आवडले बरे. आता घरी गेल्यावर आईला करायला सांगेन..
पुण्याचे पेशवे

चकली's picture

27 Jul 2008 - 8:29 pm | चकली

धनंजय,

पाककृती एकदम छान लिहीली आहे. कंसातिल सुचना आवडल्या. पुढच्यावेळी झकास फोटो लावा.

चकली
http://chakali.blogspot.com

यशोधरा's picture

27 Jul 2008 - 8:54 pm | यशोधरा

हे करुन बघणार!! :)

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2008 - 9:54 pm | प्रकाश घाटपांडे

धनंजया,
दोन दिवस अगोदर सांगितल असत तर मला पिकलेली केळी खपवायला बरे झाले असते. गाववाल्यानं बरीच केळी आणली होती ती पिकवली . जास्त पिकायला लागल्यामुळे पटापट इतरांना वाटुन टाकली.
मला जास्त पिकलेली केळी आवडत नाही. शिकरण किती करणार?
माझी बायको (कोब्रा)ती शिकरण म्हणते. आणि मी ते शिकरण म्हणतो.
ही सांदण ची आयडीया भारी होती.
(सांदण हा पहिल्यांदा शब्द ऐकला)
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jul 2008 - 11:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याकडून इतकेच लेखन येणे बाकी होते :)
बाकी केळ्याचे धोणासची कृती भारीच आहे, प्रयोग करायला हरकत नाही.
(सांदन हा शब्द आम्हालाही नवाच )

चित्रा's picture

28 Jul 2008 - 5:54 am | चित्रा

मिपा इस्ट कोस्ट कट्टा चुकल्याचे अजूनच वाईट वाटले!

पाककृती मस्तच! हळदीचे पान नाही, पण चालवून घ्यावे लागेल..

धनंजय's picture

28 Jul 2008 - 9:17 am | धनंजय

अगदी सोपी पाकृ - करून बघाच.

सलत्रीबाई दटावून सांगतात - केळी बाहेरून अगदी काळी झालीत तरी आतून कुजलेली नसतात. ती वापरा! ती वापरायचे वेगवेगळे प्रकार म्हणजे सांदण, केळ्याच्या वड्या (खूप टिकतात), तुपावर मंद तळून साखर/वेलची पेरून स्वीटडिश, गोड/तिखट केळ्याची भाजी, वगैरे... (ती/ते शिकरण आहेच.) आणि घाटपांडे सरांकडे तर केळी घरची होती, म्हणजे खासच असणार.

लहानपणी केळ्याला एकही काळा डाग पडलेला असला तर मी खाण्यास नकार देत असे. या बाबतीत भलताच तर्कट होतो. होस्टेलने वठणीवर आणले.

नंदन's picture

28 Jul 2008 - 12:40 pm | नंदन

पाककृती. अच्च गोंयकार :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2008 - 12:49 pm | स्वाती दिनेश

मस्त पाकृ! कट्टावाले लोक लकी..:) अरे त्या कट्ट्याला काय काय केलेत तेही लिवाकी,:)
स्वाती

चतुरंग's picture

28 Jul 2008 - 9:48 pm | चतुरंग

संस्कृतपासून खगोलापर्यंत तुमच्या प्रतिभेचा मुक्त संचार असतो हे माहीत झाले होतेच पण सांदणासारखी पाकृ तुम्ही इतकी छान करु शकता हा मला अक्षरशः धक्का होता हे मी प्रांजळपणे कबूल करतो!
कट्ट्याला तुम्ही आणलेले सांदण लाजवाब होते! घरी लगेच पाकृ करुन पहायची फर्माईश आहेच आणि तुम्ही इथे कृती दिलीच आहे त्यामुळे आता लागतोच कामाला.

(स्वगत - रंग्या, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत लवकर टाक नाहीतर तुझं काही खरं नाही! :SS )

चतुरंग

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 11:18 pm | विसोबा खेचर

संस्कृतपासून खगोलापर्यंत तुमच्या प्रतिभेचा मुक्त संचार असतो हे माहीत झाले होतेच पण सांदणासारखी पाकृ तुम्ही इतकी छान करु शकता हा मला अक्षरशः धक्का होता हे मी प्रांजळपणे कबूल करतो!

सहमत आहे.. धन्याशेठ, लेका सांदणं जोरदारच!

स्वगत : मला धन्याशेठच्या १/१०० इतकी जरी प्रतिभा असती तर किती बरं झालं असतं!

तात्या.

यशोधरा's picture

28 Jul 2008 - 11:23 pm | यशोधरा

लहानपणी तांदळाच्या उकडीच्या कुठल्या पदार्थाला हळदीच्या पानाचा सुवास आठवतो - उकडीचे मोदक करताना मोदकपात्रात हळदीची पाने लावली होती का???? नीट आठवत नाही.

पातोळ्याच त्या. :)
मला पातोळ्या हव्यायत आत्ता खायला... आज्जी काय बनवायची!! कसल्या मस्त आठवणी..
गेले ते दिन गेले.... :(

मनिष's picture

28 Jul 2008 - 11:22 pm | मनिष

ह्या धनंजयला येत नाही असे काही आहे कारे जगात??
धन्य आहेस रे बाबा!!!!

चतुरंग's picture

28 Jul 2008 - 11:54 pm | चतुरंग

अजून मी धनंजयने विडंबन केलेले बघितले नाहीये! ;) :S

(स्वगत - रंग्या, एकही सोवळा माणूस तुला बघवेना का रे? खाजच फार! :B )

चतुरंग

सर्किट's picture

29 Jul 2008 - 12:47 am | सर्किट (not verified)

रंगा,

अरे मूळ पाककृतीचे नॉर्थ अमेरिकन वर्शन, ह्याला विडंबन नाही तर काय म्हणशील ?

(ह. घ्या.)

धनंजय,

तुमचा हाही पैलू आमच्या समोर आणल्याबद्दल, धन्यवाद.

- सर्किट