बालपणीचा काळ खाण्यापिण्याच्या बाबतीत खरेच सुखात गेला. मिसळ, वडे, भजी यांसारख्या जिभेचे चोचले पुरवणार्या 'जहाल' पदार्थांवर बालवयातच श्रद्धा बसल्याने वरण-भात, कच्च्या भाज्या, सलाड्स वगैरे गोष्टी एकदम 'ह्या' वाटायच्या. त्यातून डाएट बिएटचे फॅड घरात शिरलेले नव्हते. मायाजालाची क्रांतीही दूर होती त्यामुळे कॅलरीज, मेटाबॉलिझम, लीन मीट, लो फॅट असे शब्द घराघरात अजून मुरलेले नव्हते. दुधातून साय काढून टाकणारा 'येडा' वाटावा असे दिवस होते. बासुंदीला लावण्यासाठी पेढ्यांचे पाकीट फोडताना 'कॅलरीच्या' भीतीने गृहिणीचा हात थरथरत नसे. लोणी काढून झाल्यावर रवी आणि भांडे, तुपाच्या भांड्यातील खरड (बेरी), साय फेटल्यावर रिकामे झालेले भांडे अशा गोष्टी हल्लीसारख्या गनिमीकाव्याने परस्पर 'सिंक' मध्ये न ढकलता मुला-माणसांना प्रेमाने ऑफर केल्या जायच्या.
पण आता काय बोलावे! कडधान्ये काय, घट्ट वरण काय, फुलके काय नि काय काय. एखाद्या वीराचे ठेवणीतले शस्त्र लपवून ठेवून त्याला युद्धाला बोलवावे तशा खवैयांना आवडत्या गोष्टी 'विषासमान' आहेत असा प्रपोगंडा करून त्यांची 'रसद' तोडण्यात आहारतज्ज्ञांना काय हशील वाटते कोण जाणे!
आमच्या घरीही रक्तरंजित नसली तरी 'रक्तवर्णी' खाद्यक्रांती घडली तो काळ आठवतो. मला वाटते 'डॉ. मी काय खाऊ?' हे पुस्तक आईच्या हाताला लागले. त्या इवल्याश्या दिसणार्या पुस्तकातील विषाची कल्पना असती तर बाबांनी ते वेळीच निकालात काढले असते पण तसे व्हायचे नव्हते. दुसर्या दिवसापासून घरातील स्वयंपाकाच्या तंत्र आणि मंत्रात लक्षणीय बदल घडून आले. बाबांचे पोट कसे अंमळ वर यायला सुरूवात झाली आहे, परवा चार पिशव्या घेऊन येताना त्यांना हलकी धाप कशी लागली, आणि एकंदरीत त्यांची बैठी दिनचर्या आमूलाग्र बदलण्याची गरज कशी आहे यावर बिनदिक्कत चर्चा सुरू झाली. खरेतर चर्चा नव्हेच कारण दुसर्या पक्षाला बोलायला वावच नव्हता. रात्रीचे जेवण झाल्यावर आपण नक्की काय खाल्ले हा विचार करत अंगणात जड मनाने (आणि हलक्या पोटाने) फिरणार्या बाबांना पाहणे हा एक क्लेशदायक अनुभव होता.
अर्थात आई ही आई असल्याने तिचे मन काही द्रवले ब्रिवले नाही. तिच्या 'सुधारणांचा' इष्ट तो परिणाम होऊन पस्तिशीपासून बाबांनी जी कात टाकली, ती आज साठीच्या उंबरठ्यावरही त्यांची तब्येत खुटखुटीत आहे वगैरे ठीकच आहे पण (खाजगीत) बोलताना आजही शरीराचे भरदार जुने कानेकोपरे आता पुन्हा 'हाताला' लागणार नाहीत याची खंत ते बोलून दाखवतात यावरून घाव किती खोलवरचा आहे याची कल्पना यावी.
आज हा पाल्हाळ लावायचे कारण म्हणजे 'बीट' नावाची भाजी. हे मूळ आहे की खोड याबद्दल माझा अजून गोंधळ आहे. लहानपणी जीवशास्त्रात बटाटा हे खोड आहे असे वाचले तेव्हा चीटींग वाटले होते. मी बटाट्याचे रोप पाहिले होते. जो भाग छान जमिनीत गाडलेला असतो तो खोड कसा असेल? असो.
बीट हे आईच्या नवखाद्यक्रांतीचे (नवकविता, नवनाट्य अशा चालीवर) महत्त्वाचे हत्यार होते. काप, कीस, उकडून, घोटून.... कशा ना कशा रूपात नेमेची पानात ही भाजी दिसताच दचकणारे बाबा पाहून संताजी धनाजी आणि त्यांना घाबरणारे घोडे या ऐतिहासिक कथेची आठवण व्हायची. बाबांच्या मनावर बसलेला बीटाचा लाल रंग इतका पक्का होता की एकदा ते उन्हातून आल्यावर समोर आलेला कोकम सरबताचा ग्लास पाहून केवळ रंगसाधर्म्यामुळे,'आँ, आता काय बीटाचे सरबतपण का?' असे म्हणत नव्याने फुटलेला घाम टिपताना पाहिल्याचेही आठवते.
बाबांना आमचा नैतिक पाठिंबा असला तरी काही काही पदार्थ आम्हाला शीक्रेटली आवडायचेच. त्यातला एक म्हणजे 'बीट सूप'. अफलातून दिसायचे आणि चवही मस्त. काही वर्षांपूर्वी विकी रत्नानीने ( माझ्या मुलाच्या भाषेत 'गुलमे गुलु' Gourmet Guru) ह्या सुपाची रेसिपी दाखवली तेव्हा आईच्या (बाबांवर केलेल्या) खाद्यप्रयोगांचे स्मरण झाले. तर बघूया रेसिपी ?
---------------------------------------------------------------------------------
साहित्य
बीट दोन मध्यम कंद -- साल काढून, धुऊन पाण्यात अर्धे कच्चे उकडून घ्यावे
एक मोठे गाजर मध्यम आकाराचे तुकडे करून
थोडे आले, लसूण सहा-सात पाकळ्या
एक मोठा कांदा उभा चिरून
एक हिरवी मिरची बिया काढून
ऑलिव्ह ऑइल दीड टे. स्पून (ऑलिव्ह ऑईल आवडत नसेल तर नेहमीच्या स्वयंपाकाचे तेलही चालेल)
लिंबाची कोवळी पाने - दोन (शिरेवर दुमडून अर्धे भाग करून शीर काढून टाकावी) ऑप्शनल आवडीनुसार
दोन टे.स्पून व्हाईट व्हिनेगर
पांढर्या मिर्यांची पूड -- एक टी स्पून
वेजिटबल स्टॉक -- पाऊण लीटर (ताजा असेल तर उत्तमच अथवा क्युब्ज झिंदाबाद)
नारळाचे दूध -आवडीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती
ऑलिव्ह ऑइलवर आले लसूण परता, जळू न देता कांदा, बीट, गाजर, मिरची घालून अणखी परता. भाज्या मऊ झाल्या की व्हिनेगर, लिंबाची पाने घाला. मिरपूड, मीठ घालून वेजिटेबल स्टॉक घाला. एकदा उकळी आली की आच मंद करून भाज्या पूर्ण शिजेपर्यंत झाकण लावून ठेवा. स्टॉक तयार क्युब्जचा असेल तर थोडा फेस जमा होतो तो काढून टाका.
भाज्या शिजल्यावर गार होऊद्या.मिश्रण गाळून घ्या. यापैकी फक्त भाज्या डावभर स्टॉकबरोबर मिक्सरमधून अत्यंत बारीक वाटून घ्या.
गाळलेला स्टॉक आणि मिक्सरमधून काढलेल्या भाज्या पुन्हा एकत्र करा. अगदीच दाट वाटले तर थोडे पाणी घाला. पुन्हा एक उकळी येऊद्या. गॅस बारीक करून पाहिजे तेवढे नारळाचे दूध घाला. कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.
प्रतिक्रिया
27 Oct 2013 - 6:38 pm | रेवती
हा हा. छान गोष्ट आणि पाकृही! गुलमे गुलु मस्त! अगदी गोड.
27 Oct 2013 - 7:19 pm | त्रिवेणी
नारळाचे दूध घातल्यावर जास्त उकळायचे नाही ना.
बीट+केळे कोशंबीर प्रचंड आवडीची. आता हे पण करून बघणार.
27 Oct 2013 - 8:59 pm | अमेय६३७७
अगदी, किंवा गॅसवरून उतरवूनच नारळाचे दूध मिसळले तरी चालेल म्हणजे सूप फुटणार नाही
27 Oct 2013 - 8:14 pm | निवेदिता-ताई
मस्त
27 Oct 2013 - 8:15 pm | पैसा
सुपाची कथा, पाकृ आणि फोटो सगळेच मस्त!!
27 Oct 2013 - 8:19 pm | मुक्त विहारि
झक्कास...
फोटो कातील आला आहे.
आणि पाक्रुची क्रुती पण जबरदस्तच...
27 Oct 2013 - 8:33 pm | प्रभाकर पेठकर
बीटरूटचे सुप रंगाला अतिशय सुरेख झाले आहे. चवीलाही तितकेच उत्तम आणि आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असणार ह्यात शंका नाही.
हे वाक्य विशेष खटकले. डाएट हे फॅड नाही. ती आजच्या जीवन शैलीतील गरज आहे. आपल्या लहानपणी वाहन (अगदी सायकल सुद्धा), दूरचित्रवाणी, संगणक ह्या गोष्टी घरात शिरल्या नव्हत्या. मांसाहार करणार्यांमध्येही, मांसाहार महाग असल्यामुळे, तो सर्वांना परवडणारा नव्हता. त्यामुळे प्रमाण कमी होते. बाहेरचे खाणे नव्हते. अशा अनेक हानिकारक वस्तू आणि सवयींनी आपल्या जीवनांत प्रवेश केला आहे, त्याच बरोबर लहानपणीची आणि आपली आजची चयापचय प्रक्रिया ह्यात वयोमानानुसार तफावत निर्माण झाली आहे, ज्यामुळे 'डाएट' ही आजकालची गरज बनली आहे. थोडक्यात आपण सर्वजणं 'समृद्धी'चे बळी आहोत.
'पत्नी हीच पतीची प्रथम डाएटिशियन असते' असे कांही डॉक्टर्स सांगत असतात त्यात नक्कीच तथ्य आहे.
त्या इवल्याश्या दिसणार्या पुस्तकातील विषाची कल्पना असती तर ... आरोग्याकडे पाहायचा आपला (म्हणजे फक्त तुमचा नाही, आपल्या सर्वांचा) दृष्टीकोन बदलण्याची नितांत गरज आहे.
27 Oct 2013 - 8:55 pm | अमेय६३७७
तुमचे मुद्दे अगदी बरोबर आहेत. आहार आणि जीवनमान यांचा समतोल साधला जात नसल्याने हल्लीच्या काळात व्यायाम,आहार इत्यादीचा जास्त गांभीर्याने विचार व्ह्यायला हवा हे खरेच आहे. पण हा लेख थोड्या विनोदी अंगाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, त्यात आहार, आहारतज्ञ यांचा कोणताही उपमर्द करण्याचा हेतू नाही एवढेच नमूद करू इच्छितो.
27 Oct 2013 - 9:56 pm | लॉरी टांगटूंगकर
फोटो नंतर पाहतो,
सुरुवात खरच खतरनाक!! अजून मोठा लेख करून वेगळा धागाच काढला असता :) .
28 Oct 2013 - 5:31 am | कंजूस
छान लिहिलंय आणि फोटो सुरेख .डाइअट एक फैड आहे याशी सहमत .मुलांना लहानपणी आया भरपूर पौष्टिक ,हाय प्रोटिन आहार (तयार डबाबंद) देतात .पंचविशीला त्यांनी डाइअट सुरू करायचं पटत नाही .
28 Oct 2013 - 8:45 am | प्रचेतस
जबरी...............!!!!!!!!!!!!!!!!!
28 Oct 2013 - 9:58 am | मदनबाण
कथा आणि सूप दोन्ही आवडले. :)
(स्वीटकॉर्न सूप प्रेमी) ;)
28 Oct 2013 - 10:11 am | अनन्न्या
मी या सूपमध्ये आमचूर घालते, छान चव येते त्याने!
28 Oct 2013 - 11:20 am | दिपक.कुवेत
त्याच्या लाल रंगामुळेतर अजुनच आकर्षक दिसतं. असो सूप आणि त्यामची कथा दोन्हि आवडलं.
28 Oct 2013 - 11:32 am | पियुशा
प्रस्तावना आवड्ली :)
बिटापासून मी ४ हात लांबच असते
आयुष्यात कधीच बीट खावासा वाटला नाही सो पास .....
28 Oct 2013 - 2:28 pm | कुसुमावती
प्रस्तावना आवडली.
बीट अजिबात आवडत नसल्यामुळे बीटाचे पदार्थ फारसे कधिच खाल्ले नाहित.
शेवटचा फोटो मात्र मस्त आलाय.
28 Oct 2013 - 10:27 pm | प्यारे१
मस्त देखणा फोटो!
29 Oct 2013 - 6:04 am | इन्दुसुता
सूप आणि कथा मस्तच. नक्की करून पाहणार ( जर्रा दिवाळी जौ दे बै !!! )
29 Oct 2013 - 10:42 am | वेल्लाभट
`सूप'र सूप आहे ! आधी अनेकदा प्यायलंय फक्त बनवण्याची पद्धत वेगवेगळी होती. माझी आजी नेहमी बनवते हे. मस्त...
30 Oct 2013 - 2:14 am | आदूबाळ
कथा मस्त! आय बीट बीट ऑन जंक्शन, सो थँक्स बट नो थँक्स ;)