लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
22 Aug 2012 - 10:16 am

लोणी भापकर- एक लहानसे खेडेगाव, पुण्यापासून साधारण ६५ किमी दूर, मोरगावच्या पुढे जेमतेम ४ मैलांवर. गाव लहानसेच असले तरी मध्ययुगीन कालातली मंदिरे, प्राचीन अवशेष, वाडे हुडे, गढ्या आणि किल्ला असे ऐतिहासिक दृष्ट्या कमालीचे परिपूर्ण.

कित्येक दिवस लोणी भापकरची मंदिरे आणि तिथल्या वीरगळांना भेट द्यायचा विचार चालूच होता. शेवटी एकदाचा बेत नक्की झाला. पुण्यात अत्रुप्त आत्म्याच्या घरापाशी भेटून त्याच्या गाडीने मी, ५० फक्त आणि आत्मा असे तिघेजण निघालो. वाटेत हडपसरला सूडला घेतले आणि पुढे मार्गक्रमण चालू केले. सासवडपर्यंत धूम धूम कोसळणारा पाऊस जेजुरीपाशी येईतो प्रायः थांबला होता. मोरगाव मागे टाकून थोड्याच वेळात रूक्षश्या भासणार्‍या लोणी भापकर गावात शिरलो. गावात शिरता शिरताच डावीकडे अनेक समाध्या लक्ष्य वेधून घेत होत्या. लगेचच एका मंदिरापाशी पोहोचलो. ते गावातील ग्रामदैवत काळभैरवनाथाचे मंदिर.

मंदिरापाशी गाडी पार्क करून प्रवेशद्वारातून आत शिरलो. मंदिराला तीन प्रवेशद्वारे असून मुख्य द्वार म्हणजे प्रशस्त नगारखाना असून दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शरभाचे शिल्प कोरलेले आहे. पायातळी हत्ती पकडलेले आहेत. मंदिराच्या एका बाजूला देखणी बारव असून तिथल्याच एका कोपर्‍यात कृष्णाची छोटीशी मूर्ती दुर्ल़क्षित अवस्थेत पडलेली आहे. मंदिराच्या पुढयात दोन भव्य दिपमाळा आहेत. मूळचे मंदिर काळवत्री पाषाणात बनवलेले असून शिखर नागरी शैलीचे आहे जे अलीकडच्या काळातील असावे. सबंध मंदिराला ऑईलपेंटने रंगवलेले असल्यामुळे त्याचे मूळचे पाषाणी सौंदर्य जरी उणावले असले तरी ते लपत मात्र नाही. मंदिराचा सभामंडप हेमाडपंथी शैलीच्या अनेक नक्षीदार खांबांवर तोललेला असून त्या खांबांवर वेगवेगळी चित्रे चितारली आहेत. कधी त्यात वादक संगीतात तल्लीन झालेले दिसतात तर कधी रानडुकराच्या शिकारीचा प्रसंग कोरलेला दिसतो. मंदिराच्या स्तंभांवर असलेले नाग आणि नागाच्या वेटोळ्यांपासून बनवलेली नक्षीदार शिल्पे हे मंदिर मूळचे शिवमंदिर असल्याचे सूचित करत जातात, कालांतराने येथे काळभैरवाची स्थापना झालेली असावी. अर्थात काळभैरव हेही शंकराचेच एक रूप. गाभार्‍यात भैरवाच्या दोन तर योगेश्वरीची एक अशा तीन मूर्ती आहेत. भैरवाच्या हातात त्रिशूळ, शंख अशी आयुधे आहेत.

१. काळभैरवनाथ मंदिर

२. नगारखान्यावरील शरभाची शिल्पे

३. स्तंभांवर असलेली नागशिल्पे

४. मंदिराच्या आतील कोरीव स्तंभ

५. स्तंभांवर कोरलेली विविध शिल्पे

६. काळभैरवाची मूर्ती

दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारण्यास निघालो. मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर गंडभेरूंडाचे शिल्प आहे. पशूचे शरीर आणि पक्ष्याचे तोंड असा आकार असलेला हा काल्पनिक पशू. ह्यानेही पायातल्या नख्यांत हत्ती पकडलेले असून शेपटीनेही एक हत्ती पकडलेला दिसतो आहे. त्याच्या शेजारीच सहस्त्रदलकमलाचे नक्षीदार शिल्प कोरलेले आहे. गंडभेरूंड, सहस्त्रदलकमल, आणि सर्पांकित नक्षीदार स्तंभ हे मंदिर यादवकालीन असल्याचे निं:सशय सिद्ध करतात.

७. गंडेभेरूंड

८. मंदिराचा बाह्यभाग जो अर्वाचीन काळातला आहे.

मंदिराच्या उजवीकडेच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडलो. समोरच एक छोटेखानी मंदिर असून आतमध्ये मारूतीची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या चौथर्‍याला लागूनच एक पुरूषभर उंचीचा वीरगळ आहे. वीरगळाच्या सर्वात वरच्या बाजूला वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेला आहे. वीर मृत्युलोकातून कैलासास शंकरापाशी पोचला आहे असे याचे सूचन. त्याच्या खालच्या चौकटीत तोच वीर दोन स्त्रियांसह दाखवलेला असून ते त्याचे कौटुंबिक जीवन किंवा स्वर्गपाप्ती झाल्यावर अप्सरांसहित जीवन सूचित करतात. त्याखालच्या चौकटीत वीर हा शस्त्रधारी सैनिकांशी लढताना दाखवलेला आहे. वीराने थोर युद्ध केल्याचे हे प्रतिक. तर सर्वात खालच्या चौकटीत वीर धारातीर्थी पडलेला दाखवलेला असून त्याच्याबरोबर बैलाचे शिल्प कोरलेले दिसते. याचा अर्थ हा वीर नंदीगणांपैकीच एक झाला असा असावा. सर्वसाधारणपणे सर्वच वीरगळांची रचना काहीशी अशीच.

९. हनुमान मंदिराच्या चौथर्‍यापाशी असलेला वीरगळ

काळभैरवनाथाचे मंदिर पाहून त्यापासून जवळच असलेल्या सोमेश्वर मंदिरापाशी आम्ही निघालो. हे मंदिर तसे अगदी साधेच. मंदिराच्या समोरच देखणा नंदीमंडप असून आतमध्ये स्तंभ व गाभार्‍यात मोठ्या आकाराचे देखणे शिवलिंग आहे. इथल्या स्तंभांवर फारसे कोरीव काम आढळत नाही. या मंदिराचे वेगळेपण आहे ते मंदिराच्या आवारात असलेल्या कित्येक वीरगळांत. एकाच ठिकाणी असलेले १३/१४ वीरगळ मी तरी पहिल्यांदाच पाहिले. येथल्या वीरगळांमध्ये लढाईचे विविध प्रसंग कोरलेले आढळतात. वीर कधी एकाचवेळी दोन जणांशी लढतो आहे तर कधी अनेकांशी लढतो आहे, कधी खड.गयुद्ध करतो आहे तर कधी अश्वावर स्वार होऊन युद्ध करत आहे. हे सर्व वीरगळ ४/५ फूट उंचीचे पण आज निम्मेअधिक जमिनीत गाडले गेले आहेत. वीरगळांची इतकी मोठी संख्या लोणी भापकर हे गाव लढावांचे असल्याचे सूचित करते. आणि जे अर्थातच वाजवीही आहे. विजापूरहून पुण्याला येणार्‍या प्रमुख मार्गावरील हा प्रदेश. साहजिकच मूर्तीभंजकांची परचक्रे इथे सतत होतच असावीत. इस्लामी आक्रमकांशी संघर्ष करतांना येथले वीर धारातीर्थी पडत असावेत.

१०. सोमेश्वर मंदिर

११. सोमेश्वर मंदिराच्या आवारातील असंख्य वीरगळ

१२. सोमेश्वर मंदिराच्या आवारातील असंख्य वीरगळ

पेशव्यांचे भापकर हे सरदार. त्यांची प्रचंड भुईकोट किल्लेवजा गढी आज गावात बेवसाऊ अस्वस्थेत आहे. भक्कम बुरुज आणि तटाचे अवशेष झाडाझाडोर्‍यांत लुप्त होऊन गेले आहेत. हे सर्व पाहातच आम्ही थोड्या पुढे असलेल्या इथल्या सर्वाधिक चर्चेतल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोहोचलो.

मल्लिकार्जुन मंदिर हे बहुधा इथले सर्वात प्राचीन मंदिर असावे. संपूर्ण हेमाडपंथी बांधणीचे हे मंदिर, कोरीव प्रवेशद्वारे, सभामंडपात कोरलेले नक्षीदार स्तंभ आणि गर्भगृह आणि मंदिराच्या पुढ्यात पुष्करीणी अशी या मंदिराची रचना. हेही मंदिर यादवकालीनच.
सुदैवाने या मंदिराचा फक्त दर्शनी भागच तैलरंगात रंगवलेला आहे आणि उर्वरीत मंदिर अजूनतरी काळ्या पाषाणातच आहे त्यामुळे हे मंदिर सर्वाधिक देखणे दिसते. मंदिराचे प्रवेशद्वार व्याल, नक्षीदार वेलबुट्टट्या आणि काही मूर्ती कोरलेल्या आहेत, जाळीदार खिडक्या आहेत. प्रवेशद्वार बघून सभामंडपात प्रवेश केला. सभामंडप कोरीव नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे. प्रत्येक स्तंभांवर वरच्या बाजूला भारवाहक यक्षिणी आहेत. या य़क्षिणींना चार हात दाखवलेले असून त्या हातांवर त्यांनी ते स्तंभ तोललेले आहेत प्रत्येक य़क्षिणीमध्ये काही ना काही फरक आहेच. एक यक्षिणी मात्र वेगळ्या प्रकारची दाखवली आहे. तीने तो स्तंभ तीन हातांवर तोललेला असून एक हात मात्र कानावर ठेवलेला आहे, जणू मंदिराच्या सभामंडपात चाललेले गायन, वादन ती तन्मयतेने ऐकत्ये आहे. स्तंभांच्या मधल्या चौकटीत विविध प्रसंग कोरलेले आहेत. कधी वादक वाद्य वाजवतांना दाखवलेले आहेत तर एका खांबांबर सीताहरणाचा प्रसंग कोरलेला आहे. एका स्तंभावर नर्तिका नृत्यमुद्रेत दाखविलेल्या आहेत तर दुसरीकडे कुस्तीचा प्रसंग कोरलेला आहे. कधी नागकन्यांबरोबर नृत्य दाखवलेले आहे तर कधी हंस आणि व्यालमुखे कोरलेली दिसतात. एका स्तंभावरचे कोरीव शिल्प तर मला सर्वात आगळे वाटले. त्या शिल्पात शरभ हत्तीचा पाठलाग करताना दाखवलेला आहे. भुलेश्वर मंदिराच्या पायर्‍यांच्या कडेलाही अगदी असेच एक लहानसे शिल्प आहे.

१३. मल्लिकार्जुन मंदिर

१४. मंदिराचा दर्शनी भाग

१५. सभामंडप

१६. भारवाहक यक्षिणी

१७. कानावर हात असलेली यक्षी

१८. स्तंभांवरील विविध कोरीव कलाकृती

१९. स्तंभांवरील विविध कोरीव कलाकृती

२०. शरभ हत्तीचा पाठलाग करत असतानाचे शिल्प

सभामंडपाचे छत तर अगदी निरखून बघण्यासारखेच. फुलाफुलांचे अतिशय सुंदर कोरीवकाम इथल्या छतावर केले आहे. छताच्या चौकटीच्या भागावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. हे बहुधा कृष्णाच्या जीवनातले प्रसंग असावेत. अंधार आणि उंचीमुळे ते नीटसे पाहता येत नाहीत. पण गोपगोपी आणि गाईगुरांसह असलेला कृष्ण नजरेत भरतोच. युद्धातील काही प्रसंगही येथे कोरलेले आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वारही कोरीव खांब,विविध मूर्ती आणि व्यालमुखांनी नटलेले आहे. गर्भगृह अगदी भुलेश्वर मंदिराचीच आठवण करून देते. आतमध्ये मात्र दोन शिवलिंगे आहेत मल्लिकार्जुन म्हणजे शिव-पार्वती यांचे हे प्रतिक.

२१. छतावरील नक्षीदार फुलांचे कोरीव काम

२२. छतावरील चौकटीत कोरलेले शिल्पपट

श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या समोरच भलीमोठी पुष्करिणी खोदलेली आहे. चतुष्कोनी अशा ह्या पुषरिणीत ठिकठिकाणी कोनाडे खोदलेले असून त्यावर लहानसे कळस उभारलेले आहेत. पूर्वी ह्या कोनाड्यांत मूर्ती असाव्यात. पुष्करणीच्या एका बाजूलाच भव्य असा नंदिमंडप आहे आणि त्याच्या चारही बाजूंना विविध शिल्पे कोरलेली आहेत.शिल्पांमध्ये धनुर्धारी राम, लक्ष्मण, गदाधारी भीम, हनुमान आदी विविध शिल्पे कोरलेली आहेत तर दोन बाजूंना मैथुनशिल्पेही आढळतात. नंदीमंडपांचे छतही फुलाफुलांच्या अतिशय देखण्या नक्षीकामाने सजलेले आहे. आज येथे नंदीची मूर्ती नाही व नंदीमंडपाच्या पुढ्यातल्या मंदिरात दत्तमूर्ती स्थापन झालेली आहे. पण पूर्वी हे शंकराचे मंदिर असावे हे निश्चित. तशा अनेक खाणाखुणा येथे दिसतातच.

२३. पुष्करिणी व नंदीमंडप

२४. नंदीमंडप व मूळच्या शिवमंदिराचे दत्तमंदिरात रूपांतरीत झालेले मंदिर

२५. नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस कोरलेली शिल्पे

२६. नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस कोरलेली शिल्पे

२७. नंदीमंडप जवळून

२८. मंडपाचे नक्षीदार छत

आता आम्ही मंदिराच्या आवारात असलेल्या इथले सर्वाधिक चर्चित शिल्प बघायला निघालो. किंबहुना याच कारणासाठी येथे येण्याचा अट्टाहास केला होता. हे शिल्प आहे यज्ञवराहाचे. हे पूर्वी मंदिराच्या जवळच असणार्‍या एका शेतात पडिक अवस्थेत होते, ते हल्लीच मंदिराच्या आवारात नेऊन ठेवलेले दिसते.
यज्ञवराह म्हणजे वराहमूर्ती., विष्णूच्या वराहवताराचे हे प्रतिक. वराहवताराचे कार्य संपुष्टात आल्यानंतर विष्णूने वराह शरीराचा त्याग केला व त्या शरीरापासून यज्ञाची विविध अंगे बनली असे म्हणून हा यज्ञवराह अशी विष्णूपुराणातली आख्यायिका आहे.
हे शिल्प अतिशय देखणे आणि भव्य. वराहाच्या शरीरावर त्याने दगडाचीच झूल पांघरलेली असून त्यावर छोट्या छोट्या चौकोनांत असंख्य विष्णूमूर्ती कोरलेल्या आहेत. त्या झूलीवर त्याने शिवलिंगे धारण केली आहेत. वराहाच्या चारही पायांवरही विष्णूमूर्ती कोरलेल्या असून पायातळी विष्णूची शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधेही कोरलेली आहेत. वराहाची शेपटी गुंडाळालेल्या अवस्थेत असून त्यात त्याने पृथ्वी धरून ठेविली आहे. वराहाच्या शरीराखाली एक नमस्कार करणार्‍या अवस्थेतली एक मानवी धड असलेलीमूर्ती असून तीचे शरीर लांबलचक निमुळते दाखवले आहे. एकंदर ठेवणीवरून ही शेषनागाची मूर्ती दिसते. मूर्तीभंजकांनी याचे मस्तक तोडलेले आहे. खुद्द यज्ञवराहाचे मुखसुद्धा मूर्तीभंजकांच्या तडाख्यातून सुटलेले नाही. तरीही त्याचे देखणेपण मात्र वादातीत आहे.
यज्ञवराहाचे असे शिल्प इतरत्र कुठेही आढळात आलेले नाही.

२९. यज्ञवराह (शंख, चक्र, शेषनागासह)

३०. यज्ञवराहाच्या पायाजवळील कौमोदकी गदा

३१. शेपटीत अडकलवेली पृथ्वी.

३२. शरीरावरील विष्णूमूर्तींची झूल

३३. श्री मल्लिकार्जुन मंदिर

मंदिराच्या ह्या देखणेपणाचा पुरेपुर आस्वाद घेऊन आम्ही तिथून निघालो ते मोरगांवच्या जवळच असलेल्या अजून एका शिल्पसमृद्ध मंदिराकडे, पांडेश्वराकडे. त्याविषयी पुढच्या भागात.

प्रतिक्रिया

मोदक's picture

22 Aug 2012 - 10:34 am | मोदक

पुभाप्र...

सागर's picture

22 Aug 2012 - 10:53 am | सागर

तरी म्हटलं मिपाचा इंडियाना जोन्स कुठे अदृष्य झाला होता ? ;)

वल्ली मित्रा,

फोटो जेवढे सुंदर तेवढेच तुझे बहारदार वर्णन. कोरीव काम खूप प्रभावित करणारे आहे. पुण्यापासून जवळ असूनही अतिशय दुर्लक्षित असे ठिकाण आहे हे. एका जबरदस्त स्पॉटची ओळख तू मिपाकरांना करुन दिली आहेस. मी पुण्यात राहूनही या ठिकाणी कधी गेलो नाही. आता पुढील पुण्याच्या भेटीत तुलाच घेऊन जाईन इथे. माझी खात्री आहे की अशा ठिकाणी पुन्हा जायला तू नक्कीच तयार होशील . छतावरील चौकटीत कोरलेले शिल्पपट आणि शेपटीत अडकलवेली पृथ्वी हे फोटो विशेष आवडले. :)

गोंधळी's picture

22 Aug 2012 - 11:30 am | गोंधळी

जबरदस्त स्पॉटची ओळख.

अगदी सहमत.

अन्या दातार's picture

22 Aug 2012 - 11:08 am | अन्या दातार

मस्त वर्णन व फोटो.

प्रसाद प्रसाद's picture

22 Aug 2012 - 11:56 am | प्रसाद प्रसाद

अगदी हेच म्हणतो.

विसुनाना's picture

22 Aug 2012 - 12:09 pm | विसुनाना

लेख आवडला. या स्थळाबद्दल अधिक ऐतिहासिक माहिती देता येईल काय?(कदाचित ही मंदिरे राष्ट्रकूटांच्या काळातली असावीत असा अंदाज व्यक्त करतो.)

ही सारी शिल्पांनी नटलेली मंदिरे पाहून या 'लोणी भापकर' स्थळाला मुस्लिम राजवटीपूर्वी विशेष महत्त्व असावे असे दिसते.
यज्ञवराहाचे शिल्प तर अप्रतिम (महाराष्ट्रातील एकमेव?) आहे. इतक्या बारकाईने कोरलेले हे शिल्प नक्कीच एखाद्या मंदिराच्या गर्भगृहात असणार. यज्ञवराहाच्या शिल्पांबद्दल येथे काही माहिती सापडली. यानुसार गुर्जर-प्रतिहारांच्या काळात यज्ञवराहाची मूर्ती विशेष प्रचलित झालेली दिसते.

प्रचेतस's picture

22 Aug 2012 - 1:16 pm | प्रचेतस

दुव्यांबद्दल धन्यवाद विसुनाना.
मंदिरे राष्ट्रकूटकालीन असावीत का नाही ते सांगता येणार नाही. पण एकंदर आतील शिल्पांवरून मल्लिकार्जुन मंदिर मात्र यादवकालाच्याही आधीचे असावे असे वाटते. याचा आणि भुलेश्वर मंदिराचा काल जवळपास सारखाच असावा.
पेशवेकालात भापकर हे सरदार होतेच. इथल्या वीरगळांच्या प्रचंड संख्येवरून इथे बर्‍याच लढाया झालेल्या दिसतात.

यज्ञवराहाचे इथले शिल्प हे महाराष्ट्रातील एकमेवच आहे का याची मात्र कसलीही माहिती मजपाशी नाही.

या लेखामुळे विष्णुच्या 'वराह' अवताराबद्दल कुतुहल चाळवले आणि त्यानिमित्ताने अगदी थोडे वाचन झाले.

वेदात महत्त्व असलेल्या इंद्र आणि वरुण इ. देवता मागे पडून वेदातली एक दुय्यम देवता 'विष्णू'ला महत्त्व प्राप्त झाले तो काळ म्हणजे इ.स. पू. ३००. मध्यप्रदेशातील विदिशा - बेसनगर येथील गरुडध्वज त्याची साक्ष देतो. मात्र 'भगवान' विष्णूचे दशावतार नक्की केव्हा निर्माण झाले (किंवा या अवतार शृंखलेला धार्मिक वाङ्मयात कधी स्थान मिळाले?) ते मात्र कळत नाही. अशातच वेदांतील रुद्र देवतेपासून उत्पन्न झालेले 'शिव' हे दैवतही तितक्याच (किंबहुना अधिक) महत्त्वाला पोचले. (वेद -> श्वेताश्वतार उपनिषद -> शिवपुराण). उपनिषदातील ब्रह्म संकल्पना 'ब्रह्मा' नामक दैवतात रूपांतरित झाली.इ.स्.पू. २०० ते इ.स. ६०० या ८०० वर्षांच्या (शुंग + गुप्त साम्राज्य) काळात ब्रह्मा-सरस्वती, विष्णू-लक्ष्मी आणि शिव-पार्वती अशी दैवत युगुले त्यांच्या कार्यासह (अनुक्रमे उत्पत्ती-स्थिती-लय) पुराणांतरी प्रस्थापित झालेली आहेत. याच काळात कधीतरी विष्णूदेवतेचे कूर्म-मत्स्य-वराह हे अमानवी अवतार, नृसिंह हा अर्धा पशू आणि अर्धा माणूस असा अवतार आणि त्यानंतर रामकृष्णबुद्धादि मानवावतार पृथ्वीचे पालनहार म्हणून प्रसिद्ध झाले. भागवत धर्म/पंथ प्रामुख्याने भारताच्या उत्तरेत मध्य प्रदेशा-ओरिसापर्यंत पसरलेला होता. मध्य प्रदेशातील राजवटींनी त्याला उदार आश्रय दिला होता आणि स्वतः राज्यकर्तेही त्याचे पालन करीत. उदयगिरी(मप्र) येथे गुप्त वंशाची तात्पुरती राजधानी असताना तेथील गुहांमध्ये वराह अवताराचे एक भव्य शिल्प कोरले गेले. या नंतर गुजरात-मप्र भागात सत्तेवर आलेल्या गुर्जर-प्रतिहार राज्यकर्त्यांना विष्णूच्या वराह-अवताराचे विशेष महत्त्व होते असे दिसते.त्यांनी वराह अवताराची नाणी पाडलेली आहेत. तसेच मध्य प्रदेशात अनेक यज्ञ वराह शिल्पे सापडलेली आहेत.
खजुराहो येथेही एक सुस्थितीतील यज्ञवराहाचे शिल्प आहे.
( वराहावताराच्या मूर्तीचेही भूवराह,आदिवराह,नृवराह,यज्ञवराह आणि प्रलयवराह असे प्रकार आहेत.)

डॉ. भांडारकरांच्या मताप्रमाणे याच लढाऊ वंशातून पुढे दक्षिणेकडे कर्नाटक- महाराष्ट्र भागात चालुक्य राजवटीचा उदय झाला. (बदामी). या चालुक्यांच्या राजवटीचे तर 'वराह अवतार' हे राजचिन्ह (एम्ब्लेम) होते. या चालुक्य काळात/नंतरच दक्षिण भारतात अनेक ठिकाणी वराह अवताराची अनेक मंदिरे निर्माण झाली असावीत.

चालुक्यांनी प्रथमतः बांधलेल्या (इ.स. ६००?) कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीच्या मूर्तीबरोबरच वराह-अवताराची प्रतिमा पूजली जात असावी. इ.स्.च्या आठव्या शतकात झालेल्या भूकंपात हे मंदिर क्षतिग्रस्त झाले आणि त्याकाळच्या तेथील स्थानिक राज्यकर्त्यांनी (कोल्हापुर पाती शिलाहारांनी) त्याचे पुनर्निर्माण केले. त्यावेळी फक्त महालक्ष्मीचीच प्रतिमा गाभार्‍यात स्थापन झाली. तरीही मूळ लक्ष्मी-वराहाच्या मूर्ती मंदिराच्या आतील भागात एका जिन्याच्या दोन्ही बाजूंना आजही पहायला मिळतात.

योगायोग असा की वल्ली यांच्या या लेखात दिसणारी सारीच मंदिरे बदामी चालुक्य शैलीची आठवण करून देतात. किंबहुना मल्लिकार्जुन मंदिरातले खांब तर कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातील खांबांच्या प्रतिकृतीच वाटतात.
म्हणून लोणी भापकरची ही मंदिरे चालुक्य राजवटीत अथवा थोडी पुढेमागे (इ.स. ७०० ते इ.स. १०००) बांधली गेली असावीत असा कयास बांधता येतो.

या माहितीत कोणी अधिक भर घातल्यास वा मतांचे खंडन-मंडन केल्यास स्वागत आहे.

प्रचेतस's picture

23 Aug 2012 - 12:31 pm | प्रचेतस

माहितीपूर्ण आणि सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद.

चालुक्यांचे राज्य महाराष्ट्रभरही पसरले असल्याने ही मंदिरे त्यांनी बांधलेली असणेही शक्य आहे.
पण हे चालुक्य हे मुख्यतः वैष्णव होते ना? अर्थात काही शिवालयेपण त्यांनी बांधलेली आहेत. पण लोणी भापकरमध्ये फक्त शिवमंदिरेच दिसतात.
आणि शिवमंदिरापुढे यज्ञवराहाचे नेमके स्थान काय असावे किंवा त्याकाळच्या यज्ञयागांमध्ये वराहमूर्ती बनवली जात असे का?

विसुनाना's picture

23 Aug 2012 - 4:30 pm | विसुनाना

चालुक्यांच्या (आणि तद्नंतरच्या इतर मूर्तीपूजक राजवटींच्या) अस्तानंतर ते शहाजी राजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्रातील अनेक देवळे नष्ट झाली. त्यातच ही देवळेही र्‍हास पावली असावीत. अस्तित्वात असलेल्या पण पडझड झालेल्या जुन्या मंदिरांच्या रिकाम्या गाभार्‍यात उत्तरकालीन राजवटींनी/ सरदारांनी नवे देव स्थापन केले असावेत. (जसे शिवलिंगाच्या जागी दत्तगुरू..माझ्यामते काळभैरवाचे देवालय मुळात यज्ञवराहाचे असू शकेल. किंवा कुठेतरी इतरत्र एखादे मंदिर नामशेष झाले असेल आणि त्याच्यातली मूर्ती शेतात फेकली गेली असेल.)
(तसेही शिव आणि विष्णू एकाच देवालय समूहात एकत्र आलेले बर्‍याच ठिकाणी दिसतात. उदा. चालुक्यांचा पराभव करून गादीवर आलेल्या राष्ट्रकूटांनी खोदलेल्या वेरूळच्या कैलास लेण्यात प्रवेशद्वारावरच लक्ष्मीचे भव्य शिल्प आहे आणि आत रामायण कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस शैव देवता तर उजवीकडे वैष्णव देवता आहेत.)

कवितानागेश's picture

22 Aug 2012 - 12:05 pm | कवितानागेश

मस्तच. :)
एकदा जायलाच हवे इथे.

नि३सोलपुरकर's picture

22 Aug 2012 - 12:19 pm | नि३सोलपुरकर

जबरदस्त स्पॉटची ओळख.
वल्ली मित्रा,... हॅट्स आफ आणि सागर यांच्या प्रतीसादाशी १००% सहमत

निनाद's picture

22 Aug 2012 - 12:19 pm | निनाद

चित्रे दिसली नाहीत... :(

निनाद's picture

22 Aug 2012 - 12:19 pm | निनाद

चित्रे दिसली नाहीत... :(

चिंतामणी's picture

22 Aug 2012 - 12:21 pm | चिंतामणी

या रस्त्याने अनेकदा गेलेलो आहे. परन्तु गावात असे काही असेल अशी कल्पनाच नव्हती.

पुढल्यावेळी वेळ काढून नक्की जाण्यात येइल.

पु.भा.प्र.

बॅटमॅन's picture

22 Aug 2012 - 12:38 pm | बॅटमॅन

मस्तच रे वल्ली. च्यायला या फोनच्या *&^%# , नैतर नक्की आलो असतो.

सुहास झेले's picture

22 Aug 2012 - 1:13 pm | सुहास झेले

भटकंती आणि वल्ली एकदम आले की, दुग्धशर्करा योग... नेहमीप्रमाणे अप्रतिम फोटो मेजवानी आणि माहिती :) :)

सुहास..'s picture

22 Aug 2012 - 1:25 pm | सुहास..

क्लास !!

उदय के'सागर's picture

22 Aug 2012 - 2:28 pm | उदय के'सागर

धन्यवाद वल्ली :)

ती शरीरावरील विष्णूमूर्तींची झूल काय सुरेख आहे... काय बारीक, सुरेख,कोरीव आणि एकसारखं काम आहे ते... व्वा .. खुप छान आणि धन्य वाटलं पाहून ...

नेहमी प्रमाणे मस्त..
माझे लहानपण येथे मजेत गेले आहे.

दत्त मंदिर हे मुळ शंकराचे मंदिर होते हे मात्र पटले नाही.... खुप जुन्या साला पासुन येथे दत्त मंदिराबद्द्लच्या अख्यायिका ऐकण्यास मिळतात. अगदी माझ्या आज्जीच्या काळापासुन च्या कथा ऐकायला मिळतात.. आज्जी लहान असतानाच्या गोश्टी पण त्यात आहेत..
दरवर्षी नेहमी प्रमाणे यात्रा भरते तेथे.. मामाचेच गाव असल्याने बर्याच जुन्या कथा माहिती आहेत..
तुम्ही जो भापकराचा वाडा ( ज्याचे बुरुज आता ढासळले आहेत ) म्हणता तेथे काही वर्षांपुर्वी पर्यंत बंदुक धारी शिपाई ( स्व मालकीचे) गस्त घालत. संपुर्ण दरारा होता.

शिवाय मल्लिकार्जुन मंदिर आणि परिसर दत्त मंदिर म्हणुनच नावारुपास आहे, सेपरेट मलिक्कार्जुन मंदिर कोणी तेथे म्हणत नाही.. मुख्य मंदिर हे दत्त मंदिर आहे, समोरील पुष्करणी ही दत्त मंदिराचीच आहे.. परंतु दत्त मंदिर खुप लहान असल्याने बर्याच जनांना तसे वाटत नाही..

दत्त मंदिरा पासुन निघुन कर्‍हा नदिकडे थोडे गेल्यावर 'तामखडा' म्हणुन एक पौरानिक जागा आहे ( कुंड टाईप) मी तुम्हाला सांगायचे विसरलो. तेथे जायला हवे होते आणखिन .. मी खुप लहान असताना जात होतो ( लहान असताना, मामाच्या बैलगाडीतुन मी, मामा मावश्या आणि इतर वस्तीवरील माणसे दर अष्टमीला जायचो तामख्यड्याला, अष्टमी ला भैरवनाथाची यात्रा असते... आता पुन्हा जाईन. )

आणखिन एक वेगळी गोष्ट म्हणजे, लोणी भापकर ची भेळ खुप प्रसिद्ध होती. तेथील तिखट चुरमुर्याची भेळ खुप आवडीची माझ्या.. मामा बरोबर बाजारातुन येताना एक सेपरेट पुढा रस्त्यात मध्येच आम्ही फस्त करत असु..

जवळच एक बारव आहे.. जुन्या पद्धतीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

ग्रामदैवत भैरवनाथाचे मदिर अलिकडेच कलर्ड केले आहे, आधीची शान त्यामुळे झाकली गेली आहे.
हे मंदिर दक्षिणमुखी आहे.. भैरवनाथाची बरीचशी मंदिरे पुर्वाभिमुख असतात.

तुमच्या मंदिराच्या आवडीला सलाम, यज्ञवराह मात्र मी कधी पाहिलेला नव्हता, आता आवर्जुन पाहिन..

बाकी लोणी भापकर हे पेशवे काळापेक्षा ही शहाजीराजे यांच्या काळापासुन महत्वाचे गाव आहे, शहाजीराजेंच्या पहिल्या जहागीरी - सुपे परगण्याजवळील हे अत्यंत महत्वाचे गाव..

डीसेंबर महिन्यात दत्त जयंतीला या आमच्या मामाच्या गावाला.

---------------
आनखिन अशी जुनी मंदिरे जी जास्त परिचयाची नाहित ती पहा

'म्हसवड ' या गावाबद्दल माहित नसेल तर मी सांगने, तेथील सिद्धनाथ - जोगेश्वरी चे मंदिर खुपच जबरदस्त आहे.. सिद्धनाथाच्या मुर्तीवरुन तर नजर हाटत नाही.. गाभार्‍यातील भव्य हत्ती एकमेव. शिवाय आनखिन जुने प्राचीन मंदिर १०-१२ किमी वर डोंगरावर आहे भोजलींग म्हणुन.
आत्ताच सर्व गोष्टी सांगत नाही. कदाचीत ५० फक्त यांना हे मंदिर माहित असेन, सोलापुर वरुन जवळ आहे.

--------------

प्रचेतस's picture

22 Aug 2012 - 2:56 pm | प्रचेतस

दत्त मंदिर हे मुळ शंकराचे मंदिर होते हे मात्र पटले नाही..

मूळात मंदिराच्या समोर जो आहे तो नंदीमंडप. सध्या तेथे जरी नंदी नसला तरी पूर्वी तेथे नंदी असलेल्या खुणा स्पष्टपणे दिसतात.
सध्याच्या दत्तमंदिरात शिवपिंडीची जागा तसेच त्याची शाळुंकाही अगदी स्पष्टपणे नजरेस येतात. शिवाय दत्तसंप्रदाय तस अलीकडच्या काळातला. मूळचे शिवलिंग इस्लामी आक्रमकांच्या काळात भग्न झालेले असावे किंवा दुसरीकडे लपवून ठेवलेले असावे. पेशवेकाळात किंवा त्यानंतरही (मागच्या १००/१५० वर्षांत) त्याचे दत्तमंदिरात रूपांतर झालेले असावे तेव्हा तुमच्या आजीकडे दत्ताच्याच हकीकती असल्यास त्यात नवल ते काय? शिवाय दत्तमूर्ती संगमरवरी आहे तेव्हा ती अलीकडचीच यात काहीच वाद नाही पण मंदिराचे एकूण हेमाडपंथी पद्धतीचे स्तंभ, किर्तीमुखे, समोरचा नंदीमंडप हे मूळचे शिवमंदिरच असल्याचे सिद्ध करतात.

दत्तसंप्रदाय हा अलीकडचा हे मान्य. पण मग कुठल्याही पुस्तकातील दत्तविषयक उल्लेख जुन्यात जुना किती आहे? नृसिंहसरस्वतींच्या आधी दत्त संप्रदाय होता की नव्हता?

प्रचेतस's picture

22 Aug 2012 - 7:41 pm | प्रचेतस

दत्तविषयक सर्वात जुना उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे तरी महाभारतात सापडतो.
महाभारतातल्या परशुराम उपाख्यानात दत्तात्रेयाच्या आशीवार्दाने कार्तवीर्याला सहस्त्र हात प्राप्त झाले असा आणि इतकाच उल्लेख आहे आणि तो प्रक्षिप्त आहे हे उघड आहे. महाभारतावर गुप्त काळापर्यंत शेवटचे संस्करण होत होते म्हणजेच तो उल्लेख साधारण ५ व्या/ ६ व्या शतकातला असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे. पण तेव्हा दत्तसंप्रदाय नसावाच(हा माझा तर्क).

शिलाहार आणि यादवकाळात दत्तमंदिर अथवा दत्तसंप्रदायाचे उल्लेख माझ्या माहितीत तरी नाहीत. आंतरजालावरील माहितीनुसार नृसिंहसरस्वतींचा काळ १३७८ ते १४५८ म्हणजे यादवकाळानंतरचा, तेव्हा तत्पूर्वी दत्तसंप्रदाय नसावा किंवा असला तरी त्याचे अस्तित्व नाममात्रच असावे.

तरी दत्तसंप्रदायाबद्दल अधिक माहिती मूकवाचक किंवा मदनबाण देऊ शकतील.

धन्यवाद रे वल्लियाना जोन्स :)

मदनबाण's picture

22 Aug 2012 - 2:51 pm | मदनबाण

उत्तम लेख आणि महत्वपूर्ण माहिती ! :)

पैसा's picture

22 Aug 2012 - 3:49 pm | पैसा

नेहमीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत असे समजावे.

मंदिरे आणि त्यावरील शिल्पे नक्कीच बरीच जुनी आहेत. काही आकृत्या तर अगदी आधुनिक म्हणाव्या अशा फार अलंकृत नसलेल्या अशाही आहेत. चौकोनी जाळी वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुठेही एखादा शिलालेख नाही का? मी गोव्यात पाहिलेल्या काही वीरगळांवर नागरी लिपीत शिलालेख कोरलेले आहेत.

नागांच्या शेपूट तोंडात धरलेल्या आकृत्या आणि यज्ञीय वराह वैशिष्ट्यपूर्ण आहेत. खरं तर असा वराह अजूनपर्यंत कुठे पाहिला नाही, ऐकला नाही. मला वाटतं बहुसंख्य पुणेकरांना पण या ठिकाणाची माहिती नसावी. इतकी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

प्रचेतस's picture

22 Aug 2012 - 7:54 pm | प्रचेतस

इथे इतके अवशेष असूनही एकही शिलालेख नाही त्यामुळे इथल्या अवशेषांच्या कालमापनात बर्‍याच त्रुटी येतात.

एकंदरीत प्रवास आणि पाह्यलेली देवळं हा मस्तच अनुभव होता. वल्ली पुढे लिहीलंच, त्यामुळे मी फार लिहीणं योग्य नाही. 'यज्ञवराह' बघेपर्यंत वराहासारख्या प्राण्याची इतकी सुरेख मुर्ती घडू शकते यावर विश्वास नव्हता. ही शिल्पं पाहून त्याकाळच्या कलाकारांच्या कलेचं कौतुक करावं तेवढं कमीच.

स्पंदना's picture

22 Aug 2012 - 5:00 pm | स्पंदना

सुरेख वल्ली! वराह पाहुन तर मन हळहळल. माझ्या गावाजवळ असच एक शिवालय अस काही तोडफोड करुन टाकलय की पाहताना मनात राग अन दु:ख एकाच वेळी अनावर होतात.
किती सुरेख मुर्ती!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2012 - 6:11 pm | अत्रुप्त आत्मा

या विषयावर मी अधिक काय लिहिणार? वल्लींच्या माहितिमुळे एक अतिशय उत्तम छोटेखानी भटकंति झाली. पहिलि दोन ठिकाणं /देवळं(काळंभैरवनाथ्ग व सोमोश्वर) ठिकठाक होती,पण पुढच्या दोन्ही ठिकाणांनी(मल्लिकार्जुन व पांडवेश्वर) सार्थक झाले वारिचे...! अशी भावना वरंवार मनात आली. त्यातही मला मल्लिकार्जुन मंदिरापेक्षा बाहेरच्या परिसरानी आणी त्यातल्या यज्ञवाराह आणी नंदीमंडप/पुष्करिणि तलावानी जास्त वेड लावलं.
यज्ञवाराह ... त्या पटांगणात मध्यभागी म्हणण्यापेक्षा मुक्त भागी ठेवलाय,याचा प्रचंड आनंद झाला. त्यामुळे हवे तसे(आणी हवे तितके) फोटो तरी काढता आले. त्यात मला शूल,व्याल,कपाल,यज्ञवाराह, असे वल्लींच्या सुरु असलेल्या विवेचनातून एकेक शब्द ऐकू येत होते. आणी त्यामुळे पुराणोक्तातले अनेक श्लोकही अठवत होते. उत्साहाच्या भरात त्यातला एखादा बाहेरही येत होता,पण चाणाक्ष माणणिय पण्णासराव यांच्या जागरुक ट्टिप्पण्यांनी(''बुवा... हळू जरा...देवळातले तुमचे भाईबंद उचलतील'' ;) )माझा व्हॉल्युम ऑफही होत होता.तरिही मी देवळात आत गेल्यावर माझी हौस भागवलीच, कारण दगडी गाभार्‍यात टोन आणी व्हॉल्युमचा जो मजा येतो,तो रेकॉर्डींग श्टुडिओतही येत नै... तिथे एका बाजुला गणेशयाग सुरु होता.आणी यथावकाश त्यातल्या आमच्या व्यवसायबंधुंशी ओळखि काढुन गप्पाष्टकही जमवुन झालें. (त्यावेळी मात्र अगोबा आणी पण्णासराव लांबुन आमच्याकडे पाहुन दु.दु.पणे हसत आणी काहितरी बोलत होते ;) )

दुसरं मला खिशात टाकलेलं ठिकाण म्हणजे,तो नंदीमंडप/पुष्करिणि तलाव....

एकतर जलाशय असं ज्याला म्हणतात,त्यातला प्रत्येक प्रकार जेवढा गूढ/भितिदायक तेवढाच ओढ निर्माण करणाराही. मला तर अशी पायर्‍या/पायर्‍यांची रचना असलेली बांधिव तळी,विहिरी,तलाव....यांचं लहानपणा पासुन प्रचंड आकर्षण आहे.त्यामुळे माझा सर्वाधिक वेळ त्यातल्या तलावात गेला. (त्यात भरपुर पाणी असतं,तर नक्किच त्यात गेला असता ;) ) शिवाय हा नुस्ता तलाव त्याच्या बांधणी पासुन ते शिल्पांपर्यंत नयनमनोहर आणी रम्य आहे. कोपरा कोपरा निरिक्षण करुन पहावा इतका अप्रतिम आहे. मी तर मधे मधे त्या पायर्‍यांवर बसुन सूड आणी पन्नासकडून हौशी फोटुसेशनही करुन घेतले.
वरचा नंदिमंडप तर अश्या आणि इतक्या विशेष निरनिराळ्या चित्रांनी/कोरिव शिल्पांनी नटलेला आहे,की काहि काहि चित्र पाहतांना स्पांडोबाची लै(च) अठवण येत हुती ;) मी (फक्त त्याच्या साठिच... ;) ) त्याचे काहि फोटुपण काढलेत...

असो एक अतिशय मस्त ट्रिप झाली...आता उरलेलं अनुभव कथन पुढच्या उत्कंठावर्धक भागापर्यंत मनात दाबुन ठेवतो...

क्रमशः .....

स्पा's picture

22 Aug 2012 - 7:49 pm | स्पा

वल्ली सुरेख माहिती रे..प्रत्येक शिल्पाचा तू खूप बारकाईने आढावा घेतलास..
पुढचा भाग लवकर टाक
फोटो सर्व फर्मासच

अवांतर : शारूक आत्मा .... कंचे फटू काढलेत म्हणे? :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2012 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा

@कंचे फटू काढलेत म्हणे? Smile>>> बाप...रे.....! काय सज्जन ढंगानी आणी साधेपणानी प्रश्न विचारलास रे अजाण बालका ;)

अता फोटू माग म सांगतो... ;)

मन१'s picture

22 Aug 2012 - 11:46 pm | मन१

वल्लीचे बारकाइनं निरिक्षण करुन टाकलेले धागेही नेहमीचेच झालेत इतकं तो सतत भटकत असतो.

इरसाल's picture

23 Aug 2012 - 9:44 am | इरसाल

नवनवीन माहीती मिळत असते वल्लीच्या प्रत्येक भटकंतीमधुन.
तसेच माहितीचा आवाकाही वाखाणण्याजोगा आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2012 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लींचे लेख माहितीपूर्ण असतातच. केवळ मिपाकरांसाठी नव्हे तर जालावर लेखन टाकल्यामुळे जालावर इतिहास आणि संबंधित माहितीची शोधाशोध करणार्‍या विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना अशा लेखांचा फायदाच होईल. म्हणुन वल्लीचे लेख त्या द्रष्टीने उत्तम माहितीची देवाण-घेवाण करतात त्याचं मला कौतुक वाटतं.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

23 Aug 2012 - 3:15 pm | किसन शिंदे

तुमच्या प्रत्येक वाक्याशी सहमत!!
मला तर कधी कधी वाटतं हा वल्ली पुरातत्व विभागातच काम करत असावा. ;)

लै भारी!
यज्ञवराह पहील्यांदाच पाहीला. ते कशासाठी असतं म्हणे? माहीती द्या.

५० फक्त's picture

23 Aug 2012 - 10:42 am | ५० फक्त

प्रत्यक्ष फिरण्यात सहभाग असल्यानं काय लिहु अजुन,
माझ्याकडचे फोटो आज पिकासावर टाकेन, वल्ली पुढच्या भागात काही घेतील अशी आशा आहे.

बाकी अआ ला धन्यवाद, त्यांनी एक फार उत्तम व्हिडिओ शुटिंङ केलेलं आहे, भारतीय ग्रामिण अर्थव्यवस्थेच्या आणि जैवसाखळीच्या उन्नतीसाठी फार महत्वाचं आहे ते, ते त्यांनी शेअर करावं ही नम्र विनंती.

बुवांची नविन गादी मस्त आहे, पुणेकर असल्यानं त्यांनी गाडीवर एक सुचना टाकली होती, ती इथल्या नवोदितांसाठी फार महत्वाची आहे.

ओ तुम्ही त्यांच्या गादीवर का गेलात.

ते गाडी असावे ......

हीच ती बुवांची मौलिक सुचना - आता गाडीवर लिहिलेली म्हणा नाहीतर गादीवर , माललॉर्ड प्लिज नोट द स्माईली..

अत्रुप्त आत्मा's picture

24 Aug 2012 - 6:35 pm | अत्रुप्त आत्मा

हीच सुचणा आता लाल रेडि-यम नी लिवणार हाये... ;)

अभ्या..'s picture

23 Aug 2012 - 12:26 pm | अभ्या..

छायाचित्रे अप्रतिम.
का कोण जाणे, नं. २ चे शरभाचे शिल्प मला चक्क माया संस्कृतीतील वाटले. असेच बाउंडेड बॉक्स मध्ये simplified graphics असल्यासारखे. त्यामानाने यज्ञ्वराह खुपच realistic वाटतो.

वल्ली तुझी ही भटकंती सुद्धा आवडली बर्का. :)
छान नवीन माहिती मिळते नेहमी.

हेम's picture

23 Aug 2012 - 9:10 pm | हेम

मस्त लेख रे वल्ली!
चाकणच्या किल्ल्यातील रस्त्याने तसंच सरळ पुढे गेल्यावर एक शिवमंदिर आहे. त्या मंदिराच्या आवारात एक यज्ञवराहाची भग्नावस्थेतील मूर्ती मी पाहिली आहे. लोणी भापकरची अधिक सुस्थितीत आहे.

अमोल केळकर's picture

24 Aug 2012 - 12:08 pm | अमोल केळकर

खुप छान चित्रे आणि माहिती :)

अमोल केळकर

शैलेन्द्र's picture

24 Aug 2012 - 12:47 pm | शैलेन्द्र

या माणसाबरोबर, फिरायचा बेत केलाच पाहीजे.. लवकरात लवकर.. :)

५० फक्त's picture

24 Aug 2012 - 5:39 pm | ५० फक्त

अगदी बरोबर, तुमचं झालंय का नाही माहित नाही, पण त्याचं लग्न व्हायच्या आधीच करुन घ्या कार्यक्रम..

दुस-या एका फिरस्ता मिपाकराच्या पायात पडलेल्या बेड्या हल्लीच पाहिल्यात आम्हि...

सुंदर्..पुण्याच्या इतक्या जवळ इतकी सुंदर मंदिरं आहेत यावर विश्वासच बसत नाही.