घेरलेलं पिठलं

कच्ची कैरी's picture
कच्ची कैरी in पाककृती
23 Oct 2010 - 11:05 pm

साहित्य-
बेसन्-१वाटी(मध्यम आकाराची )
कांदा-१ मोठा
लसुण-७-८ पाकळ्या
हळद्-अर्धा टे.स्पून
लाल तिखट-२ ट्.स्पून
तेल्-गरजेनुसार
जीरे,मोहोरी
क्रुती-
१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जीरे,मोहोरी घालावी.जीरे,मोहोरी तड्तड्ली कि त्यात १ मोठा कांदा बारिक चिरुन घालावा.
२)कांदा गुलाबीसर रंगावर परतुन घ्यावा मग त्यात बारिक चिरलेला लसुण घालावा व परतुन घ्यावे.३)नंतर त्यात हळ्द्,लाल तिखट घालुन परतुन घ्यावे व २ ते अडीच वाटी गरम पाणी घालावे.
४)पाण्याला उकळी फुटली कि त्यात हळूहळू बेसन घालायला सुरवात करावी,बेसन टाकतांना त्याच्या त्या पाण्यात गुठळ्या होनार नाहित याची काळजी घ्यावी यासाठी एका हाताने बेसन घालायचे व दुसय्रा हाताने चमच्याने ढवळत रहायचे म्हणजे गाठी पड्णार नाहि.(थोड्याफार तर पड्तातच पण जास्त पडु देउ नये.)
५)बेसन घातल्यावर जास्त घट्ट झाल्याचे वाट्ले तर त्यात अजुन थोडे गरम पाणी घलुन ढवळावे.
६)१५ते२० मिनीटांनी घेरलेलं पिठलं खाण्यासाठी तयार असेल.
७)वाढतांना पिठल्यावर पळीभर शेंगदाणा तेल घालुन द्यावे मस्तच लागते.
piThal

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

23 Oct 2010 - 11:08 pm | शिल्पा ब

मस्त...मला पिठलं फार आवडतं..
एकदोनदा चांगलं झालं होतं पण आताशा अजिबातच चव येत नाही..काय चुकतंय काही कळत नाही..मी गुठळ्या होऊ नये म्हणून आधीच पीठ पाण्यात भिजवून घेते आणि फोडणीत टाकते..

पैसा's picture

23 Oct 2010 - 11:39 pm | पैसा

तसंच करते. वरनं थोडं खोबरं आणि कोथिंबीर घालते, म्हणजे दिसतं चांगलं आणि जास्त चव येते.

पर्नल नेने मराठे's picture

24 Oct 2010 - 10:41 am | पर्नल नेने मराठे

शिल्पा मी पण आधीच पीठ पाण्यात भिजवून घेते आणि फोडणीत टाकते.

घेरलेलं का म्हणतात ?
बाकी छानच.

कच्ची कैरी's picture

23 Oct 2010 - 11:58 pm | कच्ची कैरी

पाणी उकळुन त्यात बेसन घालतात व गाठी पडु नये म्हणुन सतत चमच्याने ढवळने याला घेरणं अस म्हणतात.

डावखुरा's picture

24 Oct 2010 - 12:09 am | डावखुरा

लय भारी..खान्देशी मेजवानी...

आम्ही ह्याला हाटीव पिठले म्हणतो. कारण गुठळ्या होऊ नयेत म्हणून मोठ्या चमच्याने सतत हाटावे लागते म्हणून हाटीव पिठले. (हाटणे म्हणजे साधारण मॅश या कॄतीसदृश कृती.)
असेच हाटून पालक भाजी ही करतात. ती पालकाची हाटीव भाजी. (पण त्यात एका पालक गड्डीला १-२ चमचेच बेसन असते आणि कृती हाटीव पिठल्यापेक्षा बरिच वेगळी आहे. )

शिल्पा ब's picture

24 Oct 2010 - 12:12 am | शिल्पा ब

अहो मग टाका की पालकाची पाकृ...वेगळं काहीतरी चवीला.

सुनील's picture

24 Oct 2010 - 12:26 am | सुनील

अरे व्वा! आताच कोबी घालून झुणका केलाय आणि आता ही पिठल्याची पाकृ!

निवेदिता-ताई's picture

24 Oct 2010 - 1:42 pm | निवेदिता-ताई

मस्त मस्त प्रकार कळताहेत.........व्वा ...क्या बात है.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

चिंतामणी's picture

26 Oct 2010 - 8:45 am | चिंतामणी

तपशिलात थोडी दुरुस्ती हवी.

१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जीरे,मोहोरी घालावी.जीरे,मोहोरी तड्तड्ली कि त्यात १ मोठा कांदा बारिक चिरुन घालावा.

ऐवजी एक मोठा कांदा बारीक चिरून ठेवावा. लसुण सोलुन बारीक तुकडे करुन घ्यावेत.

एका कढईत तेल गरम करायला ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जीरे,मोहोरी घालावी.जीरे,मोहोरी तड्तड्ली कि त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा.

असे असायला हवे असे वाटते.

कच्ची कैरी's picture

26 Oct 2010 - 2:15 pm | कच्ची कैरी

धन्यवाद चिंतामणी ,पुढल्यावेळी दुरुस्ती नक्की करेल्.तुमच्या सुचनांचे नेहमीच स्वागत असेल.

प्राजक्ता पवार's picture

26 Oct 2010 - 2:24 pm | प्राजक्ता पवार

खमंग पाकृ :)

रेवती's picture

26 Oct 2010 - 9:09 pm | रेवती

मलाही हे पिठलं आवडतं पण त्याला घेरलेलं म्हणतात हे माहित नव्हतं.
त्यात राहिलेल्या (आणि शिजलेल्या) छोट्या गाठी छान लागतात.
म्हणून आम्ही त्याला गाठीचं पिठलं म्हणतो.
मला पाण्यात पीठ आधी कालवून केलेलं पिठलं मात्र तेवढं चांगलं जमत नाही.

मराठमोळा's picture

26 Oct 2010 - 10:14 pm | मराठमोळा

वा!
मस्तच. या पिठल्यावर लसणाचं तिखट (छोट्या लोखंडाच्या वाटीत ठेचलेला लसूण तेलात तिखट टाकुन परतवलेला) टाकुन सोबत ज्वारीची भाकरी किंवा गरम गरम भात फारच अप्रतिम लागतो.

रेवती's picture

26 Oct 2010 - 10:29 pm | रेवती

दिलीत आठवण करून पिठलं भाकरीची!
इनो घेउया गं सखे इनो घेउया.;)

मराठमोळा's picture

27 Oct 2010 - 1:59 am | मराठमोळा

रेवती तै,
ईनो कशाला, असं झणझणीत जेवण करुन मस्त जिरं कोथिंबीर घातलेलं मसाला ताक घेऊयात. :)