मी पाहिलेला गणेशोत्सव

पारा's picture
पारा in काथ्याकूट
21 Oct 2010 - 3:21 pm
गाभा: 

या वर्षी गणेशोत्सव निमित्त, मी आमच्या गोव्याच्या घरी गेलो होतो. आणि अनुभवाने मनाला आलेल्या उन्मनी अवस्थेचं वर्णन कोणीही आपल्या मातृभाषेतूनच सर्वाधिक सक्षमपणे करू शकतो असं माझं मत आहे. ह्या पूर्वी मी तिथे गेलो होतो त्याला आता सहा वर्ष उलटून गेली, त्यामुळे धूसर आठवणींखेरीज माझ्या गाठीला त्यातलं फारसं काही उरलेलं नव्हतं. ह्या आठवड्यात मी एक अत्यंत वेगळा गणेशोत्सव पाहिला.

कोकणात गणपती हा अतिशय मानाचा उत्सव, तसं पाहता, दिवाळी, दसऱ्यापेक्षाही हा सण जास्त उल्ल्हासाने, सुंदरतेने साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी तर कोण गजहब. चतुर्थीला गणेशाची सजवलेल्या मखरात प्रतिष्ठापना केली जाते. आणि नंतर होते ती आरती. गोड चेहरा, त्यावर विलसणार मोहक स्मितहास्य, एका हातात मोदक आणि उजव्या हाताची आशीर्वाद देणारी मुद्रा, कृष्णपिंगाक्ष, धूम्रवर्ण ही नावं ज्याला चपखल बसतात अशी ती साजरी मूर्ती, पितांबरी सिंहासनावर विराजमान होते. पहिल्या दिवशी केवळ दर्शनमात्रे अगदी पूर्ण वर्षाची मनोकामना पूर्ण होते. आधीच्या वर्षी ज्याला साश्रू नयनांनी निरोप दिला त्याचं स्वागत तितक्याच धूमधडाक्यात होतं. एकाच्या घरी आरती आणि प्रसाद झाला की मग बच्चे मंडळी अणि तरुण वर्ग दुसर्या घरात आरती म्हणायला जातो. भल्या पहाटे सुरु झालेलं हे सत्र अगदी दुपारपर्यंत चालतं. मग मोदक, खीर, लाडू, करंज्या ह्याचा फडशा पाडण्याइतकी भूक तर नक्कीच लागलेली असते. पुढच्या दिवसांमध्ये नाना कार्यक्रम घरात आयोजित केलेले असतात. मग ती सहस्त्रावर्तन असोत, किंवा सत्यनारायण. अमुक्ताभरणी वा समाराधना. कुठल्याही दिवशी उसंत म्हणून ती नाहीच, किंबहुना ती लगबगच हवीहवीशी वाटते. मंत्रोच्चाराने भारलेलं मंगलमय वातावरण मग हळू हळू, इतर कार्यक्रमांना वाट करून देतं. मग त्या गाण्याच्या मैफिली असोत, किंवा कीर्तनं वा निरूपण.

ह्या सौंदर्याला साज चढतो तो माणसामाणसातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीच्या नात्यांनी. दूरच्या प्रदेशातून शेकडो लोक न चुकता आपल्या कोकणातल्या गावी हजेरी लावतात. आजी आजोबांपासून ते तान्ह्या बाळापर्यंत सर्व पिढ्या हा उत्सव यथाशक्ती साजरा करतात. कोकणात ज्यांच्या घरी गणपती येत नाही अशी घरंच विरळ. फक्त दर वर्षी आणावा लागतो म्हणून गणपती आणला जात नाही, तर लोक त्याची आसुसतेने वाट पाहतात. माझ्या यंदाच्या उत्सवात, मी जी नाती पाहिली त्याने मी स्तिमित झालो. सलोखा, सामंजस्य आणि काळजी ही केवळ घरच्या व्यक्तीसाठी नसून, शेजारयांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी मी पाहिली. अशी नाती जी शहरात आपल्या व्यक्तीसाठी पण अभावाने दिसतात. अश्या आनंदातील सात दिवसानंतर मात्र विसर्जनाचा दिवस उजाडतो. फटाक्यांच्या आतिषबाजीने सारा आसमंत उजळून निघतो. त्या गणेशाची रमणीय मिरवणूक, शोभेच्या दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघते. विसर्जनाचा दिवस माझ्यासाठी नेहमीच दुःखाची किनार असलेली पर्वणी आहे. सर्व फटाक्यांचा आवाज विरल्यावर, फटाक्यांची शोभा आकाशातून अस्तंगत झाल्यावर उरतो तो विसर्जनाचा क्षण. गणेशाची लोभस, राजस मूर्ती पाण्यामध्ये घेऊन जाताना जरी मुखाने आरतीचा गजर होत असला, तरी तो जाऊ नये अशीच वेडी आशा मनामध्ये बसलेली असते. जेंव्हा अलगद ती मूर्ती डोळ्यादेखत नाहीशी होते, तेंव्हा नकळत काहीतरी प्राणप्रिय हरवून गेल्याची हुरहूर मनाला टोचणी लावून जाते. जितकी वाजत गाजत मिरवणूक येते, तितकीच ती शांतपणे परत फिरते. रिकामा देव्हारा सातही दिवसांचे प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो, 'गणपती गेले गावाला, चैन पडे न आम्हाला' ह्या ओळींत हळूहळू आर्तता डोकावू लागते. पुढल्या वर्षाची वाट बघायची सुरुवात त्याच क्षणापासून होते, ती पुढील वर्षीच्या भाद्रपद शुक्ल चतुर्थी पर्यंत.

लोकमान्य टिळकांनी ह्याच उत्सवाच्या माध्यमातून काहीतरी प्रशस्त आणि कालोचित करायचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांच्या गणेशभक्तीला साद देऊन त्यांनी एक नवीन इतिहास घडवला. त्यांना अपेक्षित असलेला लोक संग्रह त्यातून साधलाही. परंतु त्यांच्या नंतर आणि किंबहुना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याची अवस्था शीड नसलेल्या भरकटलेल्या होडीसारखी झाली. लोकसंग्रहाचा आणि लोकोद्धाराच जे सुवर्ण स्वप्न त्यांनी पाहिलं त्याला ग्रहण लागलेला आज आपण पाहतो. लोकसंग्रहाचा उद्देश जरी अजूनही सफल होत असला तरीही त्या लोकशक्तीला दिशा देणारं कार्य आज होताना दिसत नाही. आज घरगुती उत्सव जरी पारंपारिकतेने साजरे होत असले, तरी सार्वजनिक उत्सवाला नवनवीन आर्थिक आणि राजकीय परिमाणं लाभली आहेत. आज पुण्यातच प्रत्येक रस्त्यावर एका तरी मंडळाचा गणपती आपण पाहतो. म्हणजेच, लोकासंग्रहाऐवजी विभाजनाचा कार्य दिवसेंदिवस वाढत असलेला आपण पाहतो. प्रत्येक मंडपातल्या ध्वनिक्षेपकाचा कल्लोळ वेगळाच. लो. टिळकांची ही अपेक्षा असेल असा मला तरी वाटत नाही. म्हणजे सभामंडपात एकत्र जमून भजन गात बसावे अश्या मताचा मी नाही, त्या काळी स्वातंत्र्य ही गरज होती, तर आज सुधारणा ही गरज आहे. अशी एकत्रित लोकशक्ती महान कार्ये सिद्धीस नेऊ शकतात ह्यात काहीच शंका नाही. आपण मात्र, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्यांच्या चेंगराचेंगरीच्या बातम्या वाचतो. त्याच चेंगराचेंगरीत मूळ उद्देश पायदळी तुडवला जाताना अनुभवतो. माझी ही मतं कदाचित तुम्हाला पटणार नाहीत, आणि कोणाला जाणीवपूर्वक दुखावण्याचा माझा हेतूही नाही. फक्त, दरवर्षीप्रमाणे मी ह्या वर्षी शहरातला गणेशोत्सव अनुभवला नाही, तर त्या ऐवजी एका वेगळ्या मनोहर परंपरेचा मी साक्षीदार झालो. तिथे असताना हे आणि असे अनेक विचार माझ्या डोक्यात येत राहिले, हा त्यांना कागदावर उतरवण्याचा एक प्रयत्न.

एकाच उत्सवाची दोन रूपं मी पाहिली, अनुभवली. दोन्हीची अनुभूती वेगळी. माझ्या लेखणीच्या माध्यमातून ती शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला. माझा हा प्रयत्न कसा वाटला हे जरूर सांगा. त्याच बरोबर, उत्सवाच्या ह्या दोन्ही पद्धतींवर तुमची मते जाणून घेण्यासही मी उत्सुक आहेच. विस्तारभयाने येथेच थांबतो. सर्व चुका माझ्या आणि प्रेरणा त्या एकदंताची.हा माझा मिपा वर लिहिण्याचा पहिला प्रयत्न, चूकभूल माफ असावी, मात्र ती निदर्शनाला जरूर आणून द्यावी :)

...एकदन्ताय विद्महे, वक्रतुंडाय धीमही
तन्नो दंती प्रचोदायाःत...
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Oct 2010 - 3:26 pm | यशोधरा

मस्तच लिहिलं आहे. कोकणात गणेशोत्सवाला इतर ठि़काणी आढळते, तसे बाजारु स्वरुप अजून आलेले नाही हे तर खरेच, आणि ते तसेच राहो.
माटोळ्यांबद्दल नाही लिहिलय ते? :)

अमोल केळकर's picture

21 Oct 2010 - 5:25 pm | अमोल केळकर

सहमत :). लिखाण मस्तच

अमोल केळकर

पारा's picture

24 Oct 2010 - 9:30 am | पारा
स्वैर परी's picture

21 Oct 2010 - 4:02 pm | स्वैर परी

भारी लिखाण !!! असेच लिहित राहावे!
गोव्याला जाउन येईन म्हणते! ;)

सुंदर लेख. नशीबवान आहात.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Oct 2010 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार

फोटू ??

प्रशु's picture

21 Oct 2010 - 10:00 pm | प्रशु

फोटु पायजेल....

पैसा's picture

21 Oct 2010 - 10:11 pm | पैसा

असंच लिहीत रहा. कोकण, गोव्यात घरोघरचे गणपती अजून तेवढ्याच श्रद्धेने आणले जातात पण सार्वजनिक गणेशोत्सव इकडेही असतात, आणि तिथे ते सगळे वाईट प्रकारही हळूहळू येत आहेत. तो एकदन्तच सगळ्याना सद्बुद्धि देवो.