प्रेम संज्ञेचा अर्थ...

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in काथ्याकूट
27 Apr 2010 - 8:48 am
गाभा: 

प्रेमाची व्याख्या...
प्रेम हा शब्द लिहायला जास्त आयाम जरी लागत नसला तरी पुरेसा व्यायाम मात्र लागतो. अर्धमत्सेँद्रासनात ध्यानस्थ बसल्यासारखा हा शब्द दिसतो. आजच्या युवापिढीला प्रेम करणं सोप्पं वाटतं अन् आसनात बसणं अवघड!
परंतु अवघडलेपणातूनच कशी प्रेमाची मजा चाखता येते हे त्यांना माहीत नसावं. गावाकडचा प्रेमिक 'तिला' सायकलच्या पुढच्या नळीवर बसवून 'डब्बलशिट' नेतो, ती सुद्धा अवघडून बसते अन् तो देखील गावाबाहेरचा अवघड घाट एका दमात पार करतो. एकंदर प्रकरण अवघड असलं तरी बोजड नसतं, कारण त्याची 'ती' म्हणजे गावाकडची कोवळी गवार, शेलाट्या अंगाची, चवळीच्या शेंगेसारखी असल्याने फारशी त्रासदायक नसते, मात्र कशीही उचलून कुठेही मांडावी अशी मनमोहक, मऊ मुलायम वगैरे प्रकारातली असते!
प्रेमाच्या जितक्या व्याख्या तितक्याच अख्यायिका. किँबहुना व्याख्येपेक्षा अख्यायिकांनाच जास्त श्रोते लाभतात हे सर्व बुवांना कळून चुकलेले आहे! म्हणूनच की काय प्रेमाच्या विश्वातही बुवाबाजी बोकाळलीय. शुभेच्छापत्रे-ईसंदेश-महागड्या भेटवस्तू अशांचा पदोपदी बाजार मांडला जातो. तर असो.
प्रेमाच्या अनेक व्याख्यांपैकी 'स्नेह' हा अर्थ खूप महत्त्वाचा. आजकाल प्रेमाची शर्करा वाढलेले 'मेही' जास्त आढळतात, स्नेही कमीच!
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे स्नेहामुळे विचारांचे तर्पण होते, हुळहुळ्या जखमा मऊ होतात, शांतता-स्निग्धता-आपलेपणा निर्माण होतो. परंतु आजच्या वेगवान युगामध्ये प्रेमाच्या उच्चारातही आपलेपणाचा स्नेह नावापुरताच उरला आहे. उरला आहे म्हणजे सरला मात्र नाही. म्हणूनच आजचं प्रेम केवळ कामापुरतं असतं. स्नेहाच्या प्रवाहात वाहून जायचं कुणाच्याही मनात नसतं. तेव्हा कुणीजरी म्हटलं की हा माझा 'प्रेम'ळ सहवास आहे, तुम्ही समजून चालायचं.. तिथे कामाचा रहिवास आहे!

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

27 Apr 2010 - 9:05 am | राजेश घासकडवी

...जास्त आयाम जरी लागत नसला तरी पुरेसा व्यायाम मात्र लागतो.

प्रेमासाठी आम्ही व्यायाम करायला तयार असतो. ती एक आद्यपूजाच आम्ही समजतो.

अर्धमत्सेँद्रासनात ध्यानस्थ

या आसनाविषयी थोडं सांगाल का? आम्ही आधी हे कधी ऐकलं नव्हतं.

प्रेमासाठी स्निग्धता आवश्यक असतेच. कोरडेपणाने प्रेमाच्या आदानप्रदानात बाधा येते.

राजेश

तिमा's picture

27 Apr 2010 - 10:37 am | तिमा

तुमचे शाब्दिक कोट्यांवरचे प्रभुत्व व एका विषयातून दुसरा धागा काढण्याची हातोटी पाहून तुम्ही जेहेत्ते कालाच्या ठायी, एक उत्तम कीर्तनकार होऊ शकता.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

युयुत्सु's picture

27 Apr 2010 - 11:03 am | युयुत्सु

आम्ही ८-९वी मध्ये असताना असे निबंध लिहायचो आणि दहा पैकी आठ मार्क तरी मिळ्वायचो. १० वीत गेल्यावर बोर्डाच्या असंकाही लिहायचं नाही असं आम्हाला बजावण्यात आलं होतं...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

डावखुरा's picture

27 Apr 2010 - 11:00 pm | डावखुरा

आमचे विवेकानंद प्रतिष्ठान [ब.गो.शा.वि.] चे स आचार्यजी[सर...आम्ही आचार्यजी म्हणायचो] कायम म्हणायचे त्या अडीच अक्षरी शब्द कटाक्षाने टाळुन "स्नेह,आपुलकी,जिव्हाळा" या पर्यायी शब्दांचा व्यवहारात वापर करावा...
प्रेम हा शब्द उच्चारल्याने उगाच भावना आणि दृष्टिकोनही बदलतो...
O:) :)

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

शुचि's picture

27 Apr 2010 - 11:10 pm | शुचि

कुणि कोडे माझे उकलिल का ? - भा रा तांबे

हृदयिं तुझ्या सखि, दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे;
नव रत्‍ने तू तुज भूषविले, मन्मम खुलले आतिल का ?
रहस्य शास्त्री कोणी कळविल का ?कुणी कोडे माझे उकलील का ?
हृदयी माझ्या गुलाब फुलला, रंग तुझ्या गालांवर खुलला;
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरि कोमल का ?
माझ्या शिरी ढग नीळा डवरला, तव नयनि पाउस खळखळला;
शरदच्चंद्र या हृदयी उगवला, प्रभा मुखी तव शीतल का ?
मद्याचा मी प्यालो प्याला, प्रिये, तयाचा मद तुज आला;
जखडिले कुणि दोन जीवांला मंत्र बंधनी केवळ? का ?
रहस्य शास्त्री कोणी कळविल का ?कुणी कोडे माझे उकलील का ?

............ या प्रेमाच्या अभिव्यक्तीपढे माझी वाणी कुंठीत होते. प्रेम प्रेम ते हेच!!!

डावखुरा's picture

27 Apr 2010 - 11:42 pm | डावखुरा

मला प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असते....
..........सेम असते...
ही कविता पाहीजे आहे....

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

शुचि's picture

27 Apr 2010 - 11:47 pm | शुचि

इथे सापडेल - http://www.marathizone.com/marathi/details.php?image_id=4982
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव