उमेश कुलकर्णी यांची विहीर - काही प्रश्न, काही उत्तरे

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
3 Apr 2010 - 12:20 am
गाभा: 

या धाग्याचे स्वरूप मुख्यतः पाषाणभेद यांच्या पूर्वीच्या एका धाग्यावरच्या काही प्रश्नांना प्रतिसाद असे आहे, पण प्रतिसाद जरा लांबल्यामुळे त्याचा स्वतंत्र धागा केला आहे. कथानक वगैरे इथे पुन्हा दिलेले नाही. बरेचसे प्रश्न पाषाणभेद यांचे आहेत, पण काही इतर प्रतिसादांमधले आहेत. इथे म्हटले आहे, ते ब्रह्मवाक्य नाही; ते आम्हांस चित्रपट पाहताना जाणवलेले (म्हणजे आमचे रसग्रहण) आहे. वाचकांना त्यात एक सुसंगती दिसेल, अशी आशा आहे.

१) मेंढपाळाचं जीव असलेलं व हरवलेलं कोकरू त्याला कोणत्या शक्तीने परत मिळते? तिच शक्ती तो सम्याला कशी काय देतो? (या ठिकाणी मी जेथे चित्रपट पाहीला तेथे तो कापलेला वाटला. आत्ताच्या डिजीटल चित्रपट दाखविण्याच्या तंत्रात चित्रपट कापता येतो का?)

चित्रपट हा अमानवी शक्तीविषयी बोलत नसून मानवी नातेसंबंध, मृत्यू, किंवा अधिक व्यापक अर्थाने जिवलगांचा विरह/दूर जाणं आणि त्यातून निर्माण होणारा शोक आणि अस्तित्ववादी प्रश्न (मी का जगायचं? कुणीही का जगावं?) अशा गोष्टींबद्दल बोलतो. दूर गेलेल्या जीवाबद्दल शोक होतो खरा, पण त्यानं दूर गेलेला जीव परतत नाही. याविषयीचं काही तत्त्वज्ञान धनगर मांडतो. ते समीरला कळतं. हे अलगद होतं; मराठी चित्रपटाच्या नेहमीच्या ठाशीवपणानं नाही. कारण चित्रपटाची शैलीच तशी नाही. त्यामुळे काय होतंय ते कळता-कळताच ते निसटून जातं. त्यामुळे ते कापलेलं वाटण्याचा संभव आहे. पण यात एक गंमत आहे. काहींना ते त्यामुळे काव्यात्म वाटेल, तर काहींना ते अनाकलनीय वाटेल. त्याला इलाज नाही, कारण चित्रपटाची शैलीच तशी अलगद, तलम आहे.

२)सम्याला विहीरीवर नचादादा परत भेटतो, ते दोघे परत फोहोतात. सम्याला तसा भास का होतो?

वर उल्लेख केलेल्या तत्त्वज्ञानाशी याचा संबंध आहे. नचिकेत परत भेटणं ही प्रत्यक्ष घडणारी घटना नाही. तशीच ती परालौकिक वगैरेही नाही. चित्रपटात अनेकदा नचिकेत गूढ वाटेलसं बोलतो. धनगरही वरवर पाहाता सोपं (आणि लौकिक) काहीतरी सांगता सांगता काही तत्त्वज्ञान मांडतो. जे हातून लौकिक अर्थाने निसटलं असं वाटतं (उदा. मेलेला नचिकेत, हरवलेलं कोकरू), ते जर नीट, खर्‍या अर्थानं उमजलं तर ते आपल्यातच राहातं. मग ते प्रत्यक्षात दुरावलं असेल, किंवा नाहीसं झालं असेल, तरी काही बिघडत नाही. जेव्हा हे कळतं, तेव्हा समीरला नचिकेत 'भेटतो'. मग तो समीरमध्येच आयुष्यभर राहाणार असतो. त्यामुळे तो मेल्याचा शोक संपतो. हे थोडंसं जातक कथेतल्यासारखं आहे - एका स्त्रीचं मूल मरतं, ती बुध्दाकडे जाते आणि मुलाला पुन्हा जिवंत कर असा हट्ट धरते, ...

३)नचादादा पुर्ण चित्रपटभर हातात दांडकं घेवून का वावरतो?

याचा संबंध धनगराशी लावता येईल. जड, लौकिक जगात वावरत असताना ज्यांना तात्त्विक, गहन, अस्तित्ववादी प्रश्न पडतात आणि मग ते कदाचित कधीतरी सुटतील, अशी शक्यता निर्माण होते, अशी ही दोन माणसं आहेत. नचिकेत उत्तरं मिळण्याअगोदर मेला, पण धनगर (फणसासारखा?) पिकून जाणता झाला. धनगर जसा आपल्या चंचल मेंढरांना हाकायला काठी हातात घेतो, तशी प्रश्न पडणारी माणसं आपोआप इतरांना रस्ता दाखवू शकतात, मार्गावर आणतात. नचिकेत तसा असतो, म्हणून समीर त्याकडे ओढला जातो. तसाच धनगरही असतो, म्हणून तो त्याच्याकडेही ओढला जातो.

४)पुर्ण चित्रपट समिर नचादादाचा असतांना गावातील घरातील काही दृष्यांमध्ये खुपच बारकाई का दाखविली? (जसे सम्याची आई दळण कांडतांनाचे संवाद) जे न दाखवले असते तरी चित्रपटात काही अडथळा नसता आला. मान्य आहे की बारकाईच्या द्रूष्यांत दिग्दर्शनाचे अंग आहे पण त्याचा कथेशी काही संबंध नसल्यासारखा वाटतो.

कथेतल्या कुटुंबकबिल्याचा कथेच्या गाभ्याशी अगदीच संबंध नाही असे नाही. कुटुंबातले बहुतेक सर्वजण दु:खानं होरपळलेले, जगण्याच्या ओझ्यापायी दमलेले आणि म्हणून स्वच्छ, व्यवहारी शहाणपण आणि ठार वेड याच्या दरम्यान कुठेतरी आहेत. आजी (ज्योती सुभाष) आपल्या कर्मठ नवर्‍याबरोबर सुखी नाही. तरीही त्याचा संसार रेटते आहे आणि अभक्ष्यभक्षणासारखी (नवर्‍याला अमान्य असलेली) स्वतःची हौसही पुरवून घेते आहे. हे एक व्यावहारिक शहाणपण आहे, पण त्यातून तिच्या मुला-मुलींचे प्रश्न सुटावे, इतपत कस त्या शहाणपणाला नाही. एका मुलीचा संसार (दफ्तरदार - नचिकेताची आई) दारुड्या नवर्‍यामुळे उध्वस्त झाला आहे. एका मुलीचं (वीणा जामकर) मर्जीविरुध्द लग्न होत आहे. एक मुलगा (गिरीश कुलकर्णी) कुचकामाचा आहे. संगीत ऐकणे, दारू पिणे याशिवाय तो काही करत नाही. तो प्रेमळ, संवेदनशील आहे. पण त्याला आयुष्यातल्या अस्तित्ववादी प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत, त्यामुळे त्याचं संतुलन ढळलेलं आहे. त्याची बायको (अमृता सुभाष) आपल्या मुलातच मग्न आहे - अगदी एखाद्या आत्ममग्न (autist) मुलासारखी. सुलभा देशपांडे तर लौकिकार्थानं वेडी आहे. नचिकेतही संवेदनशील आहे - त्यामुळे अस्तित्ववादी प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत, तर त्याचाही तोल ढळू शकतो. कदाचित तो ढळलाही आहे - कारण त्याचा मृत्यू अपघाती नसून ती बहुतेक आत्महत्या आहे. त्याच्या मृत्यूच्या अनाकलनीयतेखाली दबलेला समीरही आपलं संतुलन ढळण्याच्या मार्गावर आहे, पण तसं व्हायचं टळतं. कारण हळूहळू त्याला उत्तर गवसतं. अशी ही पात्रांची वीण आहे.

६) विहीर च्या ऑफिशीयल संस्थळावर हे लिहीले आहे:
"Samir’s search leads him towards the experience of oneness where he can unite with Nachiket again!"
समिर एकटा पडूनही तो नचिकेत शी (किंवा त्याच्या भासमान अस्तित्वाशी) कसा एकरूप होतो? तो पुढील आयुष्य सरळ जगतो का?

आधी सांगितलेल्याशीच याचा संबंध आहे. समीरला नचिकेत उमजतो. मग तो मेला आहे, याचा शोक संपतो, कारण आता तो समीरपाशी आहे (लौकिकार्थानं नाही, तर 'कळला' या अर्थानं). धनगराच्या मेंढ्या जशा हरवेनाशा झाल्या (लौकिकार्थानं नव्हे, तर आता मेंढ्या चांगल्या उमजल्या, त्यामुळे हरवत नाहीत; तरीही कधीतरी एखादी मेंढी हरवली, तर तिचं एवढं दु:ख नाही अशा अर्थानं), तसंच समीरला आता काहीतरी शाश्वत गवसलेलं आहे. अशा रीतीनं त्याचा तिढा आणि शोक संपल्यानं तो लौकिक आयुष्याला सामोरा जायला पुन्हा (पण अधिक डोळसपणे, समंजसपणे) सरसावतो. हे सरळ आयुष्य असेलच असं नाही. पण इतरांपेक्षा समृध्द मात्र असेल.

छपरातुन पाणी खालील भांड्यात पडत आहे, म्हणजे काय?

टपटप पाणी पडत राहाणं मेंदूचा भुगा होत असल्याचं सुचवतं. कैद्यांचा वा आरोपींचा छळ करण्यासाठी अशा गोष्टींचा वापर (पोलीस, सैनिक वगैरे) करतात. समीर राहातो, ती इमारत अर्धीमुर्धी, नीट न बांधलेली, गळकी अशी असणं हे ही सूचक आहे. समीर अजून कच्चाच आहे. अशा वयातला आघात (नचिकेताचा मृत्यू) त्याला उध्वस्त करू शकेल. पण अर्धीमुर्धी इमारत नीट बांधून मजबूत करता येते. ती शक्यता तिच्यात असते. धनगर भेटल्यानं ते होतं. पण त्याचसाठी तिथून दूर जाणं भाग आहे. स्वतःत (आणि आपल्या शोकात) गुंगण्याऐवजी थोडं अलिप्त झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. आतल्याआत राहून सुलभा देशपांडेसारखं वेडं व्हायचा धोका असतो.

समीर ट्रेन मध्ये बसतो पण तो नक्की कोणत्या दिशेने प्रवास का करतो. हे अगदी प्रेक्षकांवर लादलय कि तुम्ही समंजस आहात आता समीर पळून गेलेला आहे असा समजून घ्या

समीरचं भरकटणं दिशाहीनच असू शकतं. कारण तो काय शोधतो आहे, हे त्याचं त्यालाच ठाऊक नाही. ही तर भारतात फार जुनी परंपरा आहे. भीमसेन जोशी घरातून पळाले नसते, तर ते आज एवढे मोठे गायक नसते. गो. नी. दांडेकरांची भ्रमणगाथा ही दिशाहीनच आहे. अगदी पाश्चिमात्य साहित्यातही युलिसीस घरातून निघतो, तेव्हा आपल्यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे, याची त्याला कल्पना नसते. मात्र तो परततो, तो शहाणा होऊन.

बर्याच गोष्टी प्रेक्षकांनी समजून घ्याव्या लागतात आणि प्रेक्षक मग त्याचे नको ते अर्थ लावतात...त्यापेक्षा चित्रपटाची लांबी थोडी वाढली असती तर चालली असती !

आक्षेप अथवा मदतीची हाक म्हणून यात गैर काही नाही. पण प्रेक्षकांनाही थोडं मोठं करण्याचा चित्रपटात प्रयत्न आहे, असं समजा हवं तर. सगळं सारखं सोपं करून छोट्या छोट्या घासांत भरवत राहिलं, तर मग समीर जसा (आईच्या कुशीत राहून) कधी खर्‍या अर्थानं मोठा होणारच नाही, तसे ढोबळ चित्रपट पाहात आपणही खुरटतो. शिवाय, धूसर, अस्पष्ट गोष्टींमध्ये काही गंमत, काही काव्यात्मताही असते. अंमळ दीर्घकाळ मद्यप्राशनाअंतीच मदिरेची गंमत कळते. पहिला घोट कडू लागतो. पण तो टाळला तर मग ... :)

एका वाक्याशिवाय मेंढपाळ समीर ला कोणतेही तत्वाग्यान सांगत नाही...समीर ला ते लगेच कळते(मग तो आधी आणि जवळ पास एक तास का एवढा गोंधळलेला असतो ?) ज्याच्या वर अक्खा चित्रपट बेतलाय ते सगळा एका वाक्यात संपतं(अक्षरशः २ मिनिटे)

कारण त्यामागे समीरचा अख्खा प्रवास आहे. त्याच्या कुटुंबातल्या लोकांचे प्रश्न त्याला हळूहळू दिसत राहतात. लग्न करायला नाखूश असणार्‍या मावशीला नचिकेतानं 'मग नको करूस लग्न' असं सांगणं हे नचिकेताला काही गवसत असल्याचं दाखवतं. हे समीरनं ऐकलेलं आहे, पण त्याला ते उमजलेलं नाही. मला पुण्याला यायचं नाही, असं नचिकेतानं सांगताच समीर वैतागतो, पण गणपतीच्या मिरवणुकीचा गोंगाट वगैरे मधून त्याला हळूहळू हे लक्षात येतं, की नचिकेत असं का म्हणत होता. त्याला जे शोधायचं होतं, ते इतकं तलम आहे, की ते अशा ठिकाणी गवसणारच नाही. हे समीरला जेव्हा उमजतं, तेव्हा उत्तर मिळालं नसूनही त्याला बाहेर पडायची अंत:प्रेरणा मिळते. आता तो नचिकेताच्या जवळ जाऊ शकतो. असं सगळं झाल्यामुळे त्याला धनगरही उमजतो, आणि मग त्यामुळे नचिकेताला जे शोधायचं होतं, ते ही गवसतं आणि म्हणून नचिकेतही गवसतो.

@मुक्तसुनीतः

ओपन-एंडेडनेस : चित्रपट ओपन-एंडेड असावा असे दिसते. ओपन-एंडेड चित्रपटांमधे "..आणि ते सुखाने नांदू लागले" , "खुनाचा/गुन्ह्याचा शोध लागला" , "त्यांचे प्रेम/आयुष्य विफल झाले" छाप ठराविकपणा तर नसतोच.

"कॅथार्सिस" या चिरकालीन सूत्राच्या प्रवातून एक प्रेक्षक म्हणून मी सुटलो आहे असे वाटत नाही.

तसा या चित्रपटाचा शेवट तितका खुलाही नाही. वर सांगितल्याप्रमाणे त्यात कॅथार्सिसही आहे. पण ते सर्व थोडे अलगद, तलम, सूचक आहे. त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रेक्षक म्हणून थोडा समीरसारखाच प्रवास करावा लागतो. मुख्य प्रश्न राहातो, तो म्हणजे किमान आपण, म्हणजे सुविद्य, समंजस, सुजाण प्रेक्षकांनी तरी थोडे कष्ट त्यासाठी घ्यावे का?

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

3 Apr 2010 - 4:01 am | पाषाणभेद

चिंतातुरजंतूंनी हा चित्रपट पाहिला अन सांगितल्याप्रमाणे त्यांची दिर्घ प्रतिक्रिया देवून चित्रपटाचे चांगल्या तर्‍हेने विवेचन केले याबद्दल त्यांचे घन्यवाद.

मी विचारलेल्या सहा पैकी पाच प्रश्नांची उत्तरे देवून त्यांनी माझी उत्सूकता बर्‍यापैकी शमवलेली आहे. आभार.

त्यांचे हे विवेचन म्हणजे केवळ माझ्या प्रश्नांना उत्तरे नाहीत. इतरांनादेखील हा चित्रपट पाहून वेगळे प्रश्न पडू शकतात. त्या प्रश्नांना सोडविण्याच्या दृष्टीकोन कसा असावा याचा आदर्श वास्तापुस्त त्यांनी घातलेला आहे.

हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी दै. सकाळच्या "प्रिमीयर" या चित्रपटविषयक मासिकात उमेश कुलकर्णी यांची मुलाखत आलेली आहे. ती मुलाखत मी हा चित्रपट बघीतल्यानंतर वाचली. त्यात त्यांनी म्हटलेले आहे की अशीच एक न विसरता येणारी घटना त्यांच्या आयुष्यात आली होती अन त्याच विषयाला अनुसरून त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. काय घटना असू शकते याची उस्तूकता अधिकच ताणली गेली.

त्यांनी ज्या तर्‍हेने हा विषय चित्रपटासारख्या अतिशय अवघड माध्यमातून हाताळलेला आहे ते पाहून आदर अन आनंद वाटला. ती घटना वैयक्तिक असल्याने कदाचित समजणारही नाही अन न समजल्यामुळे तिला त्यांनी किती न्याय दिला तेही समजणार नाही. तरीही एक प्रेक्षक अन एक दिग्दर्शक या नात्याला त्यांनी चांगला न्याय दिला आहे. या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे दिग्दर्शक अन प्रेक्षकाची तार जुळावी लागते त्या प्रमाणे हा चित्रपट जर वेगळ्या नजरेने बघितला तर आपली तार जुळते. अर्थात सर्वसामान्य 'सुटी' एंजॉय करायला गेलेल्या प्रेक्षकाच्या हाती निराशा येईल पण जर त्याने सम्यासारखी दृष्टी ठेवली तर हातातून निसटून जाणारे त्याला गवसेल. एका अर्थाने दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे चित्रपटात असणारे मेंढपाळ झालेत अन प्रेक्षक म्हणजे सम्या आहेत हे माझे मत.

हिंदी मराठीत बटबटीत रित्या काही सामाजिक जाणीवा दाखवणारे कलात्मक दिशेने जाणारे बरेच चित्रपट येवून गेलेत. नव्हे तशी भारतीय चित्रपटांचा इतिहासच आहे. आपण काहीतरी फ्रेम्स प्रेक्षकाला दाखवायचे अन ते प्रेक्षकांना समजण्यासाठी चमच्याने भरवले (स्पुन फिडींग) त्याप्रमाणे भरवायचे अन प्रेक्षकही 'काय वेगळ्या तर्‍हेने' विषय मांडलाय असे म्हणायचे असे बरेच चित्रपट आहेत.

विहीरीत एक वेगळाच विषय (जो एका शब्दात सांगता न येण्यासारखा आहे) अतिशय तरल, भावनाशिल रित्या हाताळला गेला आहे. त्यात नायक नायिकेचे प्रेम नाही, राजकारण नाही, आई मुलाचे प्रेम नाही रडवणूक नाही, पाचकळ विनोद नाही मुख्य म्हणजे बटबटीत पणा तर नाहिच नाही. तरीही हा चित्रपट सुसह्य होतो.

हे परिक्षण
अन त्यातील हा प्रतिसाद लिहीण्याआधी किंवा हा चित्रपट पाहण्याआधी मी दै. सकाळच्या "प्रिमीयर" मासिकातील उमेश कुलकर्णींची मुलाखत वाचलेली नव्हती. प्रतिसादात लिहील्याप्रमाणे { एखादी कलाकृतीची जेव्हा कलाकार निर्मीती करतो त्या वेळी ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्याचे मन, भावना त्यात उतरतात. ज्यावेळी ती कलाकृती प्रदर्शीत होते त्यावेळी ती त्याची राहत नाही. ती प्रेक्षकांची होते.} कलाकार या नात्याने उमेशकुलकर्णींनी विहीर या कलाकृतीची निर्मीती त्यांच्या अनुभवाला अनुसरून केली. ती निर्माण करतांना त्यांना आनंदही झाला असणार. त्याच बरोबर ते प्रेक्षकाही तसलीच अनुभूती देवू शकतात यात त्यांचे दिग्दर्शकीय सामर्थ आहे.

एका बड्या (?) बॅनरबरोबर काम करतांना त्यांनी त्यांच्या कलाकृतीला धक्का न बसता शेवटपर्यंत काही तडजोड न करता ती आपल्या पर्यंत येवू दिली.

आता आपण जोड्या लावू.

समिर = प्रेक्षक
दिग्दर्शक = मेंढपाळ
नचादादा = मेंढ्या = आपली जीवनात असणार्‍या दु:ख च्या पलिकडे असणारा आनंद (मेंढ्या अनेकच आहेत.)

आता मी तुमच्याच लेखातील वाक्यात माझ्या जोड्या टाकतो अन काय बदल होतो ते पहा:

मेंढपाळाने जीवन जगण्याचे सुत्र समजावून सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांना आपली आनंदाचे कारणे उमगतात धनगराच्या मेंढ्या जशा हरवेनाशा झाल्या (लौकिकार्थानं नव्हे, तर आता मेंढ्या चांगल्या उमजल्या, त्यामुळे हरवत नाहीत; तरीही कधीतरी एखादी मेंढी हरवली, तर तिचं एवढं दु:ख नाही अशा अर्थानं), तसंच प्रेक्षकाला आता काहीतरी शाश्वत गवसलेलं आहे. अशा रीतीनं त्याचा तिढा आणि शोक संपल्यानं तो लौकिक आयुष्याला सामोरा जायला पुन्हा (पण अधिक डोळसपणे, समंजसपणे) सरसावतो. हे सरळ आयुष्य असेलच असं नाही. पण इतरांपेक्षा समृध्द मात्र असेल.

कदाचित माझी अशी जोड्या लावून तुलना करण्याची पद्धत चुकीचीच असेल तरीही मोह न आवरल्याने मी ती केली.

आता थोडे विहीर या नावाबद्दल: विहीर ही जीवन आहे. त्यात पुर्णपणे पोहायचे की सांगड लावून अडखळत निघून जायचे ते आपणच ठरवायचे.

कोणतीही कलाकृती माणूसाला नवा दृष्टीकोन देते, जीवन समृद्ध अन त्या तसे घडण्यासाठी आपण, म्हणजे सुविद्य, समंजस, सुजाण प्रेक्षकांनी तरी थोडे कष्ट त्यासाठी घ्यावेच. नाही का?

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

राजेश घासकडवी's picture

3 Apr 2010 - 6:40 am | राजेश घासकडवी

तुम्ही या चित्रपटाचं खूप छान विश्लेषण केलेलं आहे. मी अजून 'विहीर' पाहिलेला नाही, पण जे वाचलंय त्यावरून नचिकेत हा समीरचा स्वप्नाळू भाग किंवा काहीसं भाबडं लहानपण असावं असं वाटलं. शहरी वातावरणात सरावलेला समीर (पोहोताना त्याला आधाराची गरज लागत नाही) तर अजूनही ते सगळं न झेपलेला नचिकेत.

आपलं बालपण हरवण्याविषयी हा चित्रपट आहे का? किंवा त्याही पलिकडे ग्रामीण जीवनाची मुळं असलेल्या, शहरीकरण होत असलेल्या समाजाच्या संक्रमणाच्या दु:खाची कथा आहे का?

राजेश

पाषाणभेद's picture

3 Apr 2010 - 9:16 am | पाषाणभेद

एखादी कलाकृतीची जेव्हा कलाकार निर्मीती करतो त्या वेळी ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्याचे मन, भावना त्यात उतरतात. ज्यावेळी ती कलाकृती प्रदर्शीत होते त्यावेळी ती त्याची राहत नाही. ती प्रेक्षकांची होते. अन प्रेक्षक एकच नसतो. ते तर हजारो असतात. म्हणजेच हजार मने, भावना त्या कलाकृतीला बघत असतात. असे असतांना सर्वांचा एकजिनसी अभिप्राय त्या कलाकृतिच्या बाबतीत असूच शकत नाही. अन तशी अपेक्षा त्या त्या कलाकृतीचा कलानिर्माता देखील बाळगू शकत नाही.
तुम्हाला पडलेले प्रश्न एखाद्याच्या बाबतीत ते प्रश्न दुसरेच असू शकतील.

मला खात्री आहे की तुम्हालाही हा चित्रपट आवडेल अन विचारात पाडेल. एकदा हा चित्रपट पहाच. (पण थेटरात.)
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

चिंतातुर जंतू's picture

5 Apr 2010 - 1:43 pm | चिंतातुर जंतू

आपलं बालपण हरवण्याविषयी हा चित्रपट आहे का? किंवा त्याही पलिकडे ग्रामीण जीवनाची मुळं असलेल्या, शहरीकरण होत असलेल्या समाजाच्या संक्रमणाच्या दु:खाची कथा आहे का?

बालपण 'हरवणे' यात एक मूल्यात्मक विधान आहे. कारण त्यात काहीतरी हरवत आहे. चित्रपटात नायकाला त्याच्या जिवलग मित्राच्या मृत्यूचा आघात बालपणी सोसावा लागतो, पण त्यातून तो प्रगल्भ होतो. म्हणजे त्याला काहीतरी गवसते.

नागरीकरणाविषयी यात किंचितसे विधान आहे खरे; उदा: नचिकेताचा पुण्यास येण्यास नकार, नायक पुण्याबाहेर पडल्यानंतर त्याच्या समस्येचा गुंता सुटणे, वगैरे. पण तो मुख्य भाग नाही. किंबहुना ग्रामीण जीवनाविषयी काहीसे स्वप्नाळू रंजन तर नक्कीच अभिप्रेत नसावे. गावाकडच्या घरातील सर्व जण उलट आपापल्या प्रारब्धांखाली पिचत आहेत (इथे जी. ए. कुलकर्णींशी नाळ जोडली जाते). त्याउलट शहरात राहणार्‍या समीरची आई तशी दु:खी नाही. शिवाय, शहरात राहणारा समीरच गुंता सोडवू शकतो (गावातला नचिकेत नाही).
त्यामुळे शहरीकरणाच्या संक्रमणासारखा सामाजिक आशय इथे जाणवत नाही. ती मूलतः माणसाची कथा आहे. माणसे इथूनतिथून सारखीच असतात; फक्त काहींना माणूसपणाचा रसरशीत गाभा गवसतो. त्यासाठी संवेदनशील मात्र असावे लागते.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

पाषाणभेद's picture

5 Apr 2010 - 5:57 pm | पाषाणभेद

सहमत.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

मुक्तसुनीत's picture

3 Apr 2010 - 10:39 am | मुक्तसुनीत

चित्रपट पाहून लेखकाने आवर्जून प्रश्नांचा उहापोह केलेला आहे हे स्पृहणीय वाटते.

प्रस्तुत विवेचनातले मुद्दे पटण्यासारखे आहेतच. मूळ चित्रपट जरी पाहिला नाही तरी या आणि आधीच्या धाग्यामधून प्रस्तुत कलाकृतीचा पोत ध्यानात येण्याची प्रक्रिया फारच चांगली घडते आहे असे वाटले.

मी मागे जे ओपन-एंडेडनेस सारखे प्रश्न मांडले होते त्याच अनुषंगाने इतरही प्रश्न मांडावेसे वाटतात. ते प्रस्तुत कलाकृतीच्या संदर्भात असतीलच असे नाही. परंतु एकंदर आस्वादप्रक्रियेबद्दलचे माझे अज्ञानापोटी आलेले आहेत.

कोहेरन्स किंवा ढोबळ मानाने बोलायचे तर संगतीचा मुद्दा : सामान्यतः कथनात्मक प्रकृती असलेल्या कृतींच्या संदर्भात हा मुद्दा येतो : कथा, कादंबर्‍या , एपिक्स (महाकाव्ये) , नाटके, चित्रपटादि कृती. काव्य किंवा चित्र किंवा संगीत या गोष्टींमधे हा मुद्दा येत नाही.

Coherence , together with Unity of Space and Time , had been at the core of the integrity of any such "narrative-oriented" works. या सूत्रापासून फारकत घेणारे, तंत्र या प्रकाराची मोडतोड आणि पुनर्स्थापना करणारे प्रयोग गेल्या शतकात बरेच झाले - महायुद्धोत्तर कालात या मोडतोडीला वेग आला. असे असले तरी, मुख्यप्रवाहामधे अजूनही या दोन तत्त्वांना महत्त्वाचे स्थान आहे असे मानण्यात येते.

तर माझा प्रश्न असा की , संगती आणि स्थलकालाची एकात्मता यांना नेमके किती महत्त्व द्यायचे ? जिथे घटितांना अपरंपार महत्त्व आहे - उदाहरणार्थ डिटेक्टीव्ह कथाकादंबर्‍या - तिथे तर वर उल्लेखलेल्या मुद्द्यांना सोडून काम होणारच नाही. परंतु मग अशा कथाकादंबर्‍यांचे कलाक्षेत्रातले माहात्म्य नाममात्रच राहाते. याउलट जिथे जिथे म्हणून मनुष्यस्वभाव, माणसांचे , समाजाचे प्रश्न इत्यादिंबद्दल महत्त्वाच्या अशा कथाकादंबर्‍यांचा उल्लेख होतो तिथे , त्यातली गुंतागुंत ही नैतिक स्वरूपाची, एकमेकांना छेद देणार्‍या प्रवृत्तींबद्दलची इ. प्रकारची असते. तर मग कलाकृतींची बांधणी, त्यातले ताणेबाणे , एकंदर वातावरणनिर्मिती , "द डेव्हिल दॅट लाइज इन डिटेल्स" याचे महत्त्व नेमके काय ? एकूण रचनेबद्दलच्या या मूलभूत मुद्द्याना बगल देऊनही काही अर्थपूर्ण अशी कलाकृती बनू शकेल काय ?

पाषाणभेद's picture

3 Apr 2010 - 11:54 am | पाषाणभेद

चित्रपट कलामाध्यम आहे. चित्रपटाला यंत्राधिष्ठित कला आहे असे मानले जाते. चित्रपटाच्या निर्मीतीचा पहिला भाग हा त्या दिग्दर्शकाच्या मनात तयार व्हावा लागतो. (दिग्दर्शक हा ही एक कलाकारच असतो. प्रोड्यूसर नव्हे.) त्याचे मन तयार झाल्यानंतर उरते ती तांत्रिक प्रक्रिया. ह्या तांत्रिक प्रक्रियेतून जात असतांना अनेक चालत्या बोलत्या माणसांपर्यंत जावे लागते. (कलाकार, तंत्रज्ञ, आर्थीक बाबी आदी.) त्या त्या माणसांचे गुणदोष, स्वभाव, बोलणे, चालणे वागणे हे निवडतांना दिग्दर्शकाला त्याच गुणाची माणसे मिळतीलच अशी खात्री नसते. यात कालपव्ययही होवू सकतो. इतर कलांच्या बाबतीत (चित्र, शिल्प, लेखन, काव्य आदी.) या तांत्रिक बाबी कलाकारापुरत्या खुपच मर्यादित राहतात अन त्या केवळ काही हत्यारांनी, साधनांनी साध्य होतात. (रंग, ब्रश, छिन्नी, हातोडी, लेखणी आदी.)

मानवी भाव भावनांना केवळ दिग्दर्शक सागतो तसे वागणे अवघड असते. तांत्रिक साधनांना वळण लावणे सोपे असते.

चित्रपटाची एक भाषा असते. ती तिन पातळ्यांत विभागता येईल. १) काय सांगायचे त्या पासून सुरू होवून २) कसे सांगितले अन ३) कसे समजले या पर्यंत ती भाषा थांबते.

या सगळ्या मुद्यांचा विचार करता विहीर ही एक कलाकृतीच आहे असे लक्षात येते.

घटितांना अपरंपार महत्त्व असणार्‍या डिटेक्टीव्ह कादंबर्‍यात (अन मसालेवाईक चित्रपटात) आलेला Coherence हा तांत्रिक प्रक्रियेचा (रंग, ब्रश, छिन्नी, हातोडी, लेखणी आदींना अनूलक्षून) भाग असावा असे मला वाटते. त्यात मानवी भावना येत नाहित.
चित्रपटात, कलाकृतीत जर मनुष्यस्वभाव, माणसांचे , समाजाचे प्रश्न, गुंतागुंत नसेल तर ती एक तांत्रिक प्रक्रियाच आहे. या उलट विहीर सारख्या चित्रपटात दिसते. यात भावनांची गुंतागूंत (पातळी क्र. १.) तर आहेच पण ती दिग्दर्शकाने सार्थपणे पडद्यावर साकारलेली आहे (पातळी क्र २.) . त्यात आपण समरस होवू शकतो. त्या प्रक्रियेचा एक भाग (पातळी क्रं ३.) होवू शकतो.

कलाकारी जाणून घेणे ही पण प्रेक्षकावर अवलंबून असते.
चित्रपटाचा प्रेक्षक हा ग्राहक असतो. पैसे मोजून तो आलेला असतो.

बाकी कलाकृतीच्या बाबतीत पुन्हा बोलतो. एखादी कलाकृतीची जेव्हा कलाकार निर्मीती करतो त्या वेळी ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्याचे मन, भावना त्यात उतरतात. ज्यावेळी ती कलाकृती प्रदर्शीत होते त्यावेळी ती त्याची राहत नाही. ती प्रेक्षकांची होते. अन प्रेक्षक एकच नसतो. ते तर हजारो असतात. म्हणजेच हजार मने, भावना त्या कलाकृतीला बघत असतात. असे असतांना सर्वांचा एकजिनसी अभिप्राय त्या कलाकृतिच्या बाबतीत असूच शकत नाही. अन तशी अपेक्षा त्या त्या कलाकृतीचा कलानिर्माता देखील बाळगू शकत नाही.

कलेचा आस्वादक असणे अन मनोरंजनाचे गिर्‍हाईक असणे यात कलाकृतीकडे आपण कसे बघतो या दृष्टीने फरक पडतो. म्हणूनच काहींना हा चित्रपट वेगळा वाटतो तर काही जण याचा आस्वाद घेवू शकतात.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

चिंतातुर जंतू's picture

3 Apr 2010 - 3:09 pm | चिंतातुर जंतू

संगती आणि स्थलकालाची एकात्मता यांना नेमके किती महत्त्व द्यायचे?

सर्वप्रथम स्थलकालाची एकात्मता म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत आहे? अ‍ॅरिस्टॉटलच्या काव्यशास्त्रानुसार अभिजात पाश्चिमात्य कथनात्मक प्रकारांत याची फार विशिष्ट व्याख्या आहे, आणि ती सतराव्या शतकातच मोडली गेली. पिएर कोर्नेय (Pierre Corneille) याच्या 'ल सिद' या फ्रेंच नाटकाविषयी तेव्हा वितंडवाद झाले, कारण त्यात ती मोडली होती. नंतर शेक्स्पीअरनेसुध्दा ती मोडली. भारतीय नाट्यशास्त्रात ती नव्हतीच. आपणास माहीत असलेल्या बहुतेक कथनात्मक कलाकृती ही एकात्मता पाळत नाहीत. त्यामुळे आज तिचे महत्व शून्यच आहे.

आता राहिली संगती. हिची व्याख्या जरा लवचिकच आहे. 'विहीर' सारख्या कलाकृतीविषयी सांगायचे झाले, तर लोकांना रूढ अर्थाने त्यात संगती दिसत नाही. मेल्यानंतर नचिकेत परत कसा येतो? फणस कशासाठी? पडणार्‍या पाण्याचा अतिरेकच आहे; धनगराच्या बोलण्यातून मला काही कळत नाही, तर मग समीरला काय बोध झाला? अशा शंका/टिप्पणी हे दर्शवतात. मला मात्र त्यात बर्‍यापैकी संगती दिसली. म्हणून मी ती (मला दिसली तशी) उलगडून सांगितली.

अर्थात, खर्‍या अर्थाने आधुनिकोत्तर साहित्यात व कलाकृतींत कथनाची इतकी काही मोडतोड होऊ शकते, की अशी संगती लावता येईलच, असे नाही. आधुनिकोत्तर कथनातील अशा संगतीच्या अभावापुढे विहीर काही फार अनाकलनीय वगैरे नाही. जी.ए. कुलकर्णी व दि. बा. मोकाशी यांना ती अर्पण केली आहे. हे अगदीच सुसंगत आहे. कारण कथनशैली व आशयामध्ये 'विहीर'चे नाते या (आधुनिकोत्तर मानता न येणार्‍या) साहित्यिकांशी लागते.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

पाषाणभेद's picture

3 Apr 2010 - 8:25 pm | पाषाणभेद

विहीर प्रदर्शीत झाल्यानंतर दिग्दर्शक उमेश कुलकर्णी कोठेतरी त्यांच्या अनूभवाबद्दल बोलतील/ बोलले असतील तर जाणकारांना येथे माहिती द्यावी.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

JAGOMOHANPYARE's picture

3 Apr 2010 - 10:06 pm | JAGOMOHANPYARE

मलाही आधी हा चित्रपट कळला नव्हता... 'माबो' वर एकाने मला सांगितले, की धनगर सांगतो..'काळजाच्या डोळ्यानं बघायचं, म्हणजे हरवलेलं दिसतं'.. मलाही हे पटले...
पण चित्रपटात असे प्रत्यक्ष्य वाक्य ऐकल्याचं आठवत नाही.. ( म्या बहुतेक काळजाच्या डोळ्यानं षिनेमा पाहिला नसावा.. :( )

पण चित्रपट अप्रतिम आहे..... कलाकार, संवाद, लोकेशन्स, कथा, शेवटची नावे येताना असणारी बॅक ग्राउन्ड धुन (बिलासखानी आहे का? ) , डायरेक्शन..... सगळेच अप्रतिम... काळजाच्या डोळ्यानं आणखी एकदा पहायला हवा....

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

शशी's picture

6 Apr 2010 - 11:38 am | शशी

एक अतिशय छान चर्चा वाचून मी मिसळपाव चा सभासद असल्याचा अभिमान वाटतो. मला थिएटर मध्ये विहीर पहाण्याची संधी मिळालेली नाही, पण एक निश्चित की पाहीन तर थिएटर मध्येच. चांगले सिनेमा पायरेटेड सिडीवर कृपया पाहू नका.