घटका, पळें...यक्षप्रश्न...झिरो पॅडिंग...असंबद्ध

नंदन's picture
नंदन in जनातलं, मनातलं
17 Mar 2008 - 3:30 pm

एक चिवित्र घड्याळ. वेळ, जगाची लोकसंख्या, जन्म, मृत्यू...एवढंच नाही तर पृथ्वीचं वाढतं तपमान, घटणारी जंगले, वापरलं जाणारं खनिज तेल इ. दाखवणारे. दर सेकंदाला एक लग्न, एक गर्भपात आणि एक पंचमांश घटस्फोट होतो, ही माहिती(!) देणारं.

http://www.poodwaddle.com/clocks2.htm

हे लिहायला जेवढं वेळ लागला तेवढ्यात पन्नासेक जन्म, वीस-बावीस मृत्यू, थोडे अपघात, डझनावारी लग्नं, चार-पाच घटस्फोट,एक कॅन्सरग्रस्त, एखाद-दुसरी आत्महत्या इ. झाल्यात ही डिप्रेसिंग बातमी देणारा एक अजून 'नाऊ' लिहिलेला टॅब.

ppp

युधिष्ठिराला 'जगातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती?' ह्या यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक होतं (कठीण प्रश्नाला मराठीत आपण यक्षप्रश्न म्हणतो, ते यामुळेच). "जगात रोज अनेक मृत्यू आजूबाजूला पाहत असतानाही आपण अमर आहोत अशाच आविर्भावात माणसे जगतात", हे त्याचं उत्तर. इतर चार भावांना न आलेलं. कदाचित हे घड्याळ पाहून त्यांना सुचलं असतं, या प्रश्नाचं उत्तर. पण उत्तर माहीत नसल्याने बहुतेक ते अधिक सुखी असावेत. अज्ञानात सुख असतं तसं.

पण, सरसकट त्यांना अज्ञानी म्हणायला जीभ रेटत नाही. जग कितीही मोठं असलं तरी आपलं विश्व बव्हंशी आपल्यापुरतंच असतं. त्या अर्थाने दृष्टी थोडी मर्यादित ठेवावीच लागते. 'चिंता करतो विश्वाची' हे रामदासांनीच म्हणणं ठीक. आपल्या असण्या-नसण्याने, ब्लॉग लिहिण्या-न लिहिण्याने, कामाला दांडी मारण्याने, खून करण्या न करण्याने, इ. इ. ने; सूर्य तळपण्यात, चंद्र झळकण्यात आणि तार्‍यांनी अपुला क्रम आचरण्यात काही फरक पडणार नसला --- तरी आपलं जे छोटंसं 'विश्व' आहे त्यात फरक पडतोच. 'इट्स अ वंडरफुल लाईफ' मध्ये ख्रिसमस इव्हला आत्महत्या करायला निघालेल्या जॉर्ज बेलीला देवदूत येऊन त्याचं आयुष्य अगदीच वाया कसं गेलेलं नाही हे दाखवतो, तसं काहीसं. अर्थात, हे कधीकधी अगदीच फील-गुड होतं, हा भाग वेगळा.

पण भारतीय यक्षाने अर्ध्या रिकामी प्याल्याकडे, मृत्यूकडे/विरक्तीकडे बोट दाखवणे आणि पाश्चात्य देवदुताने आशेकडे, जीवनाकडे हे अगदी टिपीकल झालं. बर्‍याचदा असतं तसं, वास्तव ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असावं. ना पूर्ण आशावादी, ना पूर्ण निराशावादी. अर्धा भरलेल्या प्याल्याचं रुपक काय किंवा 'सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणं म्हणत?' काय - हे ओव्हर-सिम्प्लिफाईड वाटतं. म्हणजे सतत कोणी आशावादी गाणं म्हणणारा वगैरे राहिला, तर बोअर नाही का होणार?

वास्तव ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतं, म्हणजे वास्तव = (पुलं + जीए)/२ असं पण नाही म्हणता येणार. डीएसपी म्हणजे डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमध्ये एक झिरो पॅडिंग म्हणून संकल्पना आहे. दोन विरुद्ध टोकाच्या माहितीत शून्ये भरायची. [१,०,०,-१,०,०,०,०,१....] असं. शून्य = टोकाच्या दृष्टिकोनाचा किंवा एकंदरच अभाव, असं मानलं तर मग ही मालिका -- बराच वेळ काहीच न घडणारी, क्वचित वर-खाली होणारी -- हेच वास्तवाचं 'वास्तव'वादी वर्णन होऊ शकेल का? की हा आयुष्य सूत्रात बसवण्याच्या अट्टाहासाचा साराच एकंदर असंबद्ध मूर्खपणा?

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

17 Mar 2008 - 3:54 pm | मनस्वी

खूपच छान माहितीपूर्ण संकेतस्थळ.

मनस्वी

की हा आयुष्य सूत्रात बसवण्याच्या अट्टाहासाचा साराच एकंदर असंबद्ध मूर्खपणा?

हे पटले. बाकी लेखन छान, आवडले.

विसोबा खेचर's picture

17 Mar 2008 - 5:53 pm | विसोबा खेचर

आपल्या असण्या-नसण्याने, ब्लॉग लिहिण्या-न लिहिण्याने, कामाला दांडी मारण्याने, खून करण्या न करण्याने, इ. इ. ने; सूर्य तळपण्यात, चंद्र झळकण्यात आणि तार्‍यांनी अपुला क्रम आचरण्यात काही फरक पडणार नसला ---

खरं आहे!

तरी आपलं जे छोटंसं 'विश्व' आहे त्यात फरक पडतोच.

हेही खरं आहे!

म्हणजे वास्तव = (पुलं + जीए)/२ असं पण नाही म्हणता येणार.

हा हा हा! हे गणित आवडलं! पुलं आणि जी ए! दोघंही अगदी अवघड प्रकरणं आहेत! :)

नंदन सायबा, तुझं विवेचन बाकी आवडलं आपल्याला! पण काय रे बाबा, हल्ली कुठल्या आचार्याकडे गीतेचे किल्लास वगैरे तर नाही ना लावलेस? भलतंच वैचारिक आणि तात्विक लिहिलं आहेस म्हणून विचारतो! :)

पण आवडलं आपल्याला!

आत्ता जरा गडबडीत आहे, सवडीने तुझी साईट पाहून लिहितो..

तुझा,
तात्या.

चित्रा's picture

18 Mar 2008 - 1:53 am | चित्रा

पण काय रे बाबा, हल्ली कुठल्या आचार्याकडे गीतेचे किल्लास वगैरे तर नाही ना लावलेस? भलतंच वैचारिक आणि तात्विक लिहिलं आहेस म्हणून विचारतो! :)

ही सिच्युएशन अगदी "तुझे आहे" सारखी... :-)

असो. बाकी लेख आवडला. फार गंभीर न करता विचार करायला लावणारा वाटला.
आपापली विश्वे छोटी असली तरी तेवढ्यापुरती पूर्णच असतात. त्यामुळे त्यातील घडामोडींनी आपण घेरलेले असतो, पण त्याहीपलिकडच्या जगात तशाच स्वरूपाच्या घडामोडी चालू असतात. एवढ्याची जाणीव असलेली चांगले असते..

विजुभाऊ's picture

17 Mar 2008 - 6:09 pm | विजुभाऊ

एक गोष्ट सांगतो
एक लांडगा होता..
तो नदीत बुडु लागला
बुडत असतान लांडगा ओरडु लागला "अरे वाचवा वाचवा.जग बुडत आहे जग बुडत आहे "
लोकानी त्या लांडग्याला बाहेर काढले. आणि म्हणु लागले
"वेडा तू बुडत होतास असे म्हण ना.जग बुडत आहे काय म्हणतोस"?
लांडगा त्यावर उत्तरला" मी मेलो म्हणजे माझ्यापुरते तरी जग बुडल्या सारखेच आहे ना?

आपल्या असण्या-नसण्याने, ब्लॉग लिहिण्या-न लिहिण्याने, कामाला दांडी मारण्याने, खून करण्या न करण्याने, इ. इ. ने; सूर्य तळपण्यात, चंद्र झळकण्यात आणि तार्‍यांनी अपुला क्रम आचरण्यात काही फरक पडणार नसला ---

तरी आपलं जे छोटंसं 'विश्व' आहे त्यात आपल्या पुरता तरी फरक पडतोच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2008 - 6:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिलेल्या दुव्यावरील संकेतस्थळ आणि त्यानिमित्त आपण केलेले विवेचन आवडले !!!

व्यंकट's picture

17 Mar 2008 - 7:47 pm | व्यंकट

डेथ टोल कडे बघतांना, रेस्टॉरेंट्स मधे माश्या मारयचं यंत्र असतं ते डोळ्यासमोर आलं. फक्त माश्यांऐवजी आत माणसं होती.

व्यंकट

चतुरंग's picture

17 Mar 2008 - 8:20 pm | चतुरंग

जिने हे क्लॉक निर्मिले. नंदन एक छान, वेगळाच विषय चर्चेला दिल्याबद्द्ल धन्यवाद.

'वास्तव काय'? हा प्रश्न फारच आदिम आहे. 'ब्रम्ह सत्यं, जगन मिथ्या' असं शंकराचार्य म्हणून गेले.
सभोवतालच्या ह्या मिथ्यातूनच वाट काढत आपण सत्यापर्यंत पोचायचं असं जर असेल तर आपणही त्याच मिथ्याचाच एक भाग असताना हे कसे साध्य व्हावे?
का हे मिथ्य सत्याचा अंश घेऊनच येत असते त्यातला मिथ्याचा अंश गळाला की मागे उरते ते सत्य? पण मग मिथ्यातच सत्याचा अंश असला तर त्याला मिथ्य तरी का म्हणावे?
तद् माताय! डोक्याची मंडई झाली!! सध्या तरी 'मिसळपाव' हेच सत्य आणि बाकी सगळे मिथ्या असं मानून तर्री चापायला हरकत नाही!!

चतुरंग

प्राजु's picture

17 Mar 2008 - 8:34 pm | प्राजु

अजब प्रकरण आहे हे घड्याळ..

पण भारतीय यक्षाने अर्ध्या रिकामी प्याल्याकडे, मृत्यूकडे/विरक्तीकडे बोट दाखवणे आणि पाश्चात्य देवदुताने आशेकडे, जीवनाकडे हे अगदी टिपीकल झालं. बर्‍याचदा असतं तसं, वास्तव ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असावं. ना पूर्ण आशावादी, ना पूर्ण निराशावादी.

अगदी पटलं.. तुमचं विवेचनही आवडलं..

- (सर्वव्यापी)प्राजु

गोट्या's picture

17 Mar 2008 - 8:45 pm | गोट्या (not verified)

ह्या चर्चेचा महत्वाचा गाभा मला वाटत हा आहे की मानव जीवन एकदम क्षणभुंगर आहे , मी ज्या काही क्षणामध्ये श्वास घेतो त्याच काही क्षणामध्ये काही जीव जन्म घेत आहेत व मरत आहे अथवा ना प्रकारच्या व्याधीने त्रस्त होत आहे तेव्हा पार्थ,
फुकटची व्यर्थ काळजी करु नकोस, जसा तु जन्म घेतला आहेस तसाच अनेक घेत आहेत, जसा तु मरणाला समोर जाणार आहेस तसेच सर्व मानव जाती जाणार आहे पण पार्थ हे सगळे होताना मात्र जो तुझा गोतावळा आहे त्याला विसरू नकोस काही क्षण त्याच्या साठी देखील काढून ठेव, आपले सगे सोयरे हेच तुझे ही व माझे ही जग, ह्या पुढे पाहण्याची लायकी ना तुम्ही आहे ना माझी.

पार्थ, जेव्हा वर दीलेली प्रणाली मी प्रथम पाहीली तेव्हा मी देखील तुझ्या प्रमाणेच अस्थीर झालो काही क्षण, पण हे पार्थ, जगणे व मरणे हाच जगाचा नियम आहे तेव्हा ती प्रणाली काही क्षण तुझ्यामध्ये भिती निर्माण करेल पण काही क्षणामध्ये तु पुर्वत आपल्या स्वतःच्या जगामध्ये परत येशील. तेव्हा काळजी नको, उद्या कोणीतरी तु मरणार कधी ह्या संकेतस्थळाची देखील माहीती येथे देऊ शकते पण पार्थ हे गरजेचे नाही की तु त्या संकेतस्थळाने सांगितल्या प्रमाणे त्याच काळामध्ये मरशील. तेव्हा व्यर्थ ची काळजी सोड.

| |ईती राज गीता समाप्त.| |

||||||| बोला जगदगुरु..... राजे राजे की जय ||||||

राजे

नंदन's picture

20 Mar 2008 - 8:18 am | नंदन

मंडळी. आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.

तात्या, गीतेचा क्लास वगैरे नाही रे. रविवारी रात्री क्वचित असे टेम्पररी वैराग्य येते, तेव्हा हे खरडलं :)
विजुभाऊ, तुम्ही दिलेली कथा आणि राजभाईंची गीता आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

20 Mar 2008 - 9:14 am | धनंजय

समजायला आणि संदर्भ लागायला कठिण संकल्पना वाटली.

थोडा अभ्यास करूनही अर्थ लागत नाही :-( त्यापेक्षा स्पार्स व्हेक्टर, किंवा स्पार्स सिग्नल असे म्हटले असते तर मला तरी अधिक संदर्भ लागला असता...

पण जोर्ज बेलीचा देवदूत आणि युधिष्ठिराचा यक्ष यांचे सामांतर्य/विरोध द्खवला हे भन्नाटच मस्त.