सोकाजीनानांची चावडी..

सोत्रि's picture
सोत्रि in दिवाळी अंक
12 Nov 2012 - 4:55 pm

नमस्कार मंडळी, मी सोकाजीनाना, चावडीवरचा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मनापासून दिवाळीच्या हार्दिक आणि अनेकोत्तम शुभेच्छा! दिवाळी साजरी करा पण ‘गो ग्रीन’ हा मंत्र विसरू नका.

त्याचे काय झाले आहे की चावडीवरची सर्व मंडळी दिवाळीच्या सुट्टीमुळे इकडे-तिकडे भटकायला गेलेली आहेत. त्यामुळे ह्या दिवाळीला विचारांचे आणि गप्पांचे फटाके काही चावडीवर फुटणार नाहीत. पण त्यामुळे चावडी सुनी सुनी वाटते आहे ना? प्रश्न मोठा गहन आहे, ऐन दिवाळीमध्ये चावडी सुनी सुनी? मलाही ह्या प्रश्नाची उकल होत नव्हती. पण ह्या गहन समस्येवर उपाय शोधला पूजा पवार. ने, हो! हो! तीच ती, सोकाजीनानांच्या चहाची चाहतं असलेली.

ऑ? ह्या सोकाजीनानाला पूजा पवार. कशी काय बुवा माहिती? असा प्रश्न पडला ना तुम्हाला, साहजिकच आहे हो! हा सोकाजीनानाही 'हिरवा' आहे का काय? असाही प्रश्न काहीजणांना पडणे साहजिकच आहे. पण तसे काही नाही. (पण ह्याचा अर्थ असा नाही की 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' हे गाणे मला माहिती नाही) आमच्या चावडीवरच्या गप्पा जश्या तुमच्या सोत्रिने तुमच्यापुढे आणल्या तशा इथे, मिपावर, झडणार्‍या चर्चाही तो आम्हाला कळवतो. त्यात असे कळले की पूजाची अशी इच्छा होती की दिवाळीला काहीतरी धमाल गप्पा चावडीवर याव्यात. पण दिवाळीच्या सुट्टीमुळे ते काही शक्य नव्हते. पण तेवढ्यात अभिजीत_मी_नाही यांनी आम्हा सर्वांना तुमच्या पुढे चक्क दृश्य स्वरूपातच आणण्याचा विडा उचलला. त्यासाठी पूजा आणि अभिजीत_मी_नाही, या दोघांनी खूपच श्रम घेतले, त्या दोघांच्या निखळ प्रयत्नांमुळे ह्या दिवाळीला चावडी सुनी सुनी का? ह्या प्रश्नाची समस्या निकाली निघून व आम्हा सर्वांना चित्रमय अस्तित्व मिळून तुमच्या पुढे येण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल पूजा पवार. आणि अभिजित_मी_नाही यांचे शतशः आभार.

चला तर मग आता तुम्हाला मी सर्वांची ओळख करून देतो.

घारूअण्णा


हे आमचे घारूअण्णा, ह्यांचे बालपण गेले रत्नागिरीच्या मधल्या आळीत, तरुणपण गेले चिपळूणमध्ये आणि आता सध्या उतारवयात पुण्यात स्थायिक झाले आहेत.

रत्नागिरीच्या मधल्या आळीत ह्यांची सगळी हयात न गेल्यामुळे आणि पुण्यातही सदाशिव पेठेत न राहिल्यामुळे, त्यांचे बोलणे जरी तिरकस असले तरीही त्या तिरकस बोलण्याला धार नसते.

ह्यापलीकडे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असल्याने चावडीवर हजेरी लावून उरलेल्या वेळेत वहिनींना मंडईत घेऊन जाणे, संध्यानंद वाचणे, देवळात जाणे यात त्यांचा सारा वेळ जातो. या घारूअण्णांचा देवावर भयंकर विश्वास! अत्यंत धार्मिक आणि सनातनी.

बरेचसे अंधश्रद्धाळूही, भुजबळकाका आणि यांचे खटके उडण्याचे हे ही एक कारण.

भुजबळकाका


हे आमचे भुजबळकाका, यांना त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे चावडीवर बहुजनहृदयसम्राट हे नाव मीच दिले आहे. तसेही यांची पुण्या-मुंबईकडच्या अभिजनांच्या मताशी नेहमीच असहमती असते, पण त्यांचे विचार सर्वसमावेशक असतात.

भुजबळकाका सध्या लष्करातून निवृत्त होऊन आता एका खाजगी कंपनीत चीफ सुरक्षा अधिकारी (CSO) म्हणून काम करत आहेत.

सारी हयात लष्करात गेल्याने शिस्तीचे प्रचंड भोक्ते. कुठलाही उथळपणा यांना चालत नाही अगदी विचारांमधलाही. बालपण अती दुर्गम भागातल्या खेड्यात गेल्यामुळे, परिस्थितीचे बरेच टक्के टोणपे खाल्ल्यामुळे आणि चटके सोसल्यामुळे, विचारांमध्ये एका प्रकारची सर्वसमावेशकता आणि ठामपणा असतो यांच्या.

शामराव बारामतीकर

हे आमचे शामराव बारामतीकर, मूळचे बारामतीचे पण नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्य. दर महिन्याला बारामतीला जाऊन शेतीचे कमीजास्त बघणे आणि गावाकडच्या नातेवाइकांची ख्यालीखुशाली विचारणे हा नेम कधी चुकत नाही.

आता बारामतीचेच असल्याने त्यांची 'साहेबांच्या' प्रती असलेली निष्ठा पदोपदी जाणवते. वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्या कुटुंबावर 'साहेबांचे' बरेच उपकार आहेत असे त्यांनी मला खाजगीत बर्‍याचदा सांगितले आहे.

त्यामुळे राजकारणात साहेबांची बाजू लावून धरणे हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त असते. पण त्यांचा 'टग्या'दादांवर अतिशय राग आहे, त्या 'टग्या'दादांमुळे  'साहेबांची' प्रतिष्ठा कमी होते असे त्यांचे मत आहे. पण सुप्रियाताईंबद्दल त्यांना का कोण जाणे त्यांना खूप जिव्हाळा आहे. 

नारुतात्या


हे आमचे नारुतात्या, कोणाच्याही न अध्यात न मध्यात. यांना सर्वांचेच म्हणणे पटते. थोडक्यात काय तर यांचा नेहमी 'बेंबट्या' होत असतो.

साधे सरळ व्यक्तिमत्त्व. यांची सोकाजीनानांवर अपार श्रद्धा. सोकाजीनाना जे म्हणतील ते करण्यास नेहमी तत्पर.

सरकारी नोकरीची शिल्लक राहिलेली काही वर्षे, प्रमोशनचे स्वप्न बघत घालवत आहेत कशीबशी. पण स्वभावाने अगदीच भिडस्त असल्याने साहेबांचे आणि त्यांचे मतभेद होत नाहीत. 

चिंतोपंत

हे आमचे चिंतोपंत, संघाच्या, ब्राह्मणी हिंदुत्वाच्या, मुशीत सारे बालपण आणि तारुण्य नागपुरात पोसले गेलेले आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन स्थायिक झालेले.

ह्यांचे बरेचसे नातेवाईक आणि मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. पण ह्यांना परदेशात राहणे आवडत नसल्याने सध्या निवृत्त होऊन एका पेन्शनराचे आयुष्य मायदेशातच व्यतीत करत आहेत. 

ह्यांचे मूळ कोंकणातले असल्याने यांचे आणि घारूअण्णांचे सूत व्यवस्थित जमते.

सोत्रि

हे तुमचे-आमचे सोत्रि, यांनीच आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

आता यांच्याबद्दल मी काय सांगणार तुम्हाला? तुम्हाला तर सगळे माहिती आहेच.

अहो थांबा, सोकाजीनाना थांबा जरा! तुम्ही सर्वांची ओळख करून दिलीत, सर्वांबद्दल सर्व काही सांगितलेत खरें, पण तुमच्याबद्दल कोण सांगणार? बरं, मीच सांगतो.

सोकाजीनाना


तर मंडळी, हे सोकाजीनाना, कमावत्या वयात, कमावलेला पैसा व्यवस्थित डोके लावून गुंतवला असल्याने आता व्ही. आर. एस. घेऊन स्वच्छंद आयुष्य जगत आहेत. कामानिमित्ताने संपूर्ण जग पालथे घातले असल्याने जाणीवा प्रगल्भ होऊन अनुभवाचे विश्व व्यापक झालेले चावडीवरचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. ह्यांचा शब्द अंतिम आणि प्रमाण मानला जातो चावडीवर.

अनुभवसिद्ध असल्याने कुठल्याही विषयावर बोलण्याची हातोटी आहे यांची. एखाद्या विषयाबद्दल माहिती नसेल तर त्या विषयाचा अभ्यास करून त्या विषयातली शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्याचा ह्यांचा ध्यास विलक्षण आहे. त्यामुळे माहिती नसली तर गप्पा राहून चिंतन करणे आणि अभ्यास करून माहिती मिळाल्यावर, आपल्या विचाराची बैठक भक्कम करूनच मग हे त्यांची मते चावडीवर मांडतात. त्यामुळे त्यांना चावडीवर फार मान आहे.

“मंडळी आता ओळख तर झाली आहेच, तीही चक्क सचित्र. मग आता येत रहा चावडीवर नेहमी आठवणीने. काय आहे गप्पा मारायला आम्हाला आवडतेच पण आपल्या गप्पा कोणीतरी ऐकते, ऐकून त्यावर चर्चा होते हे खूपच सुखावह असते हो! चला आता मी आपली रजा घेतो. काय आहे, चहाची वेळ झाली आमच्या आणि आज ऑर्डर द्यायला कोणीही नाही त्यामुळे चहा प्यायला घरीच जावे लागेल. एक छानसा गजरा घेतो सौ.साठी, तेवढाच जरा मसाला चहा मिळेल हो, काय?”,” सोकाजीनाना मंद हसत.

चावडी

A

प्रतिक्रिया

गवि's picture

12 Nov 2012 - 5:14 pm | गवि

:-)

सोत्रि's picture

12 Nov 2012 - 5:17 pm | सोत्रि

गवि, धन्यवाद!

श्रावण मोडक's picture

12 Nov 2012 - 6:11 pm | श्रावण मोडक

बऱ्यापैकी जमली आहे चावडी. छान...

गणपा's picture

12 Nov 2012 - 6:46 pm | गणपा

तोंड ओळख मस्तच.

पैसा's picture

12 Nov 2012 - 9:07 pm | पैसा

बहुतेक व्यक्तिमत्त्वं अपेक्षेप्रमाणे! मस्त जमलीय चावडी!

यशोधरा's picture

12 Nov 2012 - 10:56 pm | यशोधरा

:)

सर्वच चित्रं उच्च दर्जाची आली आहेत..अभिजीत_मी_नाही यांचं खास कौतुक!

आणि ओळखपरेडही आवडली.

तुषार काळभोर's picture

13 Nov 2012 - 10:57 am | तुषार काळभोर

थंब्ज अप टू पू, मी नाही आणि अर्थातच सोत्रि यांना!

५० फक्त's picture

14 Nov 2012 - 7:55 am | ५० फक्त

लय भारी झालंय, आपल्या कल्पनेतल्या पात्राना मुर्त रुप मिळालेलं बघणं हा एक खुप आनंदाचा क्षण असतो.

या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनाच खुप खुप धन्यवाद.

बॅटमॅन's picture

14 Nov 2012 - 1:56 pm | बॅटमॅन

आयला खत्तर्णाक!!!!!!! एकच नंबर!!!!!

चाफा's picture

16 Nov 2012 - 7:11 pm | चाफा

अचाट कल्पना, अफाट रिझल्ट तिघांचेही अभिनंदन :)

श्रीरंग_जोशी's picture

25 Nov 2012 - 10:52 am | श्रीरंग_जोशी

हे मी इतक्या उशिरा का उघडले हा प्रश्न पडलाय...

# अभिजीत - सर्वच चित्रे भारी आहेत रे.
बाकी लेखन नेहमीप्रमाणेच सर्व(...)समावेशक ;-).