मला मोठं व्हायचय...

अभिजा's picture
अभिजा in कलादालन
1 Oct 2009 - 2:38 pm

आपल्याजवळ जे नाही ते प्राप्त करण्याचा माणसाला कोण हव्यास!
आपल्याला लहान असताना मोठं होण्याचे वेध लागलेले असतात (आणि मोठं झाल्यावर, लहान!). मोठं होणं किती मज्जेचं असतं. आपण खूप शक्तिमान होतो. आपल्याला जे हवं ते मिळवता येतं. मोठ्या माणसांजवळ खूप पैसे असतात. मग काय? भरपूर गोळ्या-बिस्किटं घ्यायची. परत, मोठ्या माणसांना, कोणी लहान मुलांना ओरडतात तसं ओरडतं का? छे! कधी एकदाचा मोठा होतोय मी! असं म्हणून मी अनेकदा कणसाच्या तु-यांच्या मिश्या नाकाखाली लावून, मोठा झाल्यावर मी कसा दिसेन हे आरश्यात बघून आजमावले आहे. कधी मुद्दाम घरातील मोठ्या लोकांच्या चपला घालून चालून पाहावे. कधी त्यांचा मोठा ढगळ शर्ट घालून मिरवावे. मोठं होण्याची रंगीत तालीम जणू! :-)

हा चित्रात दिसतोय तो मोठा माणूस :-) पालघर स्टेशनवर भेटला. आमचा दीड दिवसांचा गणपती आटोपून मी मुंबईला परतीच्या मार्गावर होतो. दुपारची ट्रेन होती. उत्सवाची नेहमीची गर्दी होती गाडीला, म्हणून दरवाजातच उभं राहून प्रवास करायचा असे ठरवले. तेवढ्यात हे महाशय प्लॅटफॉर्मवर खेळत समोर आले. बहुतेक कुठेतरी फॅन्सीड्रेस कॉम्पिटीशन असावी, म्हणून नाखवा रूप धारण केलं होतं. ट्रेनच्या दरवाज्यातनंच विचारलं त्याला फोटो काढू का म्हणून! त्याने पण लगेच अगदी कसलेल्या मॉडेलसारखं मान तिरकी करून ठेवणीतलं हसू दिलं. त्याचा आनंद ओसंडून चालला होता. अगदी साध्या, कोडॅकच्या ४ एमपी कॅमे-यावर, अजिबात वेळ न दवडता, ऑटो मोडवर टिपलेला फोटो आहे हा. फोटो टेकनिकली चुकीचा आहे, पण मला खूप आनंद देऊन गेला. नंतर एक मिनिटातच ट्रेन सुटली. ’मोठा माणूस’ प्लॅटफॉर्म संपेपर्यंत टाटा करीत पळत येत होता.

निरागस, चिमणं जीवन असतं लहान मुलांचं. पाब्लो पिकासोचं फार सुंदर वाक्य आहे. तो म्हणतो, "Every child is an artist. The problem is how to remain an artist once we grow up." प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक माजिद माजिदीचे चित्रपट तुम्ही पाहिले आहेत काय? लहान मुलांचं भावविश्व फार तरलतेने चित्रित करतो, माजिद माजिदी!

दुसरा असाच एक ’मोठा माणूस’, आई-बाबा पोहायला जायला परवानगी देत नाहीत म्हणून रुसून बसला होता. तो इथे पाहा!
आनंद काय किंवा दु:ख काय! कधी बहर, कधी शिशिर... परंतु...

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

1 Oct 2009 - 4:07 pm | प्रमोद देव

वा! अभिजितबाबू, मस्तच आहेत चेहर्‍यावरचे भाव.

अवांतर:
अशाच एका मुलाची माझ्या मुलीने तिच्या भटक्यावर टिपलेली छायाचित्रं

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

सहज's picture

1 Oct 2009 - 4:08 pm | सहज

लहान मुले इथुन तिथुन सारखीच, रम्य अल्पाईन प्रदेशात फिरत असताना अशीच गोरी गोमटी, थोडी मळकी मुले दिसली, दोघ जण सायकल चालवत होते, दोघ जण ट्रँपोलिन. माझ्या हातातला कॅमेरा पाहून लगेच पोज देउ लागली.. व्हिडिओ कॅमेराने शुटिंग करुन त्यांना दाखवल्यावर त्यांचे ते खिदळणे एकदम प्राइसलेस!

असो प्रामाणीक मत, हा धागा, फोटो मला इतका काही आवडला नाही. पुढचा धागा बघण्यास उत्सुक.

:-)

अभिजा's picture

1 Oct 2009 - 4:34 pm | अभिजा

देवकाका, फोटो छान आहेत. :-)
सहज, प्रामाणिक मताबद्दल धन्यवाद! :-)

श्रावण मोडक's picture

1 Oct 2009 - 4:42 pm | श्रावण मोडक

अभिजा, तुम्हाला मिळालेला आनंद अधिक महत्त्वाचा. हे प्रचि म्हणजे सचिनच्या वन-डेमधील तीस-चाळीस चेंडूतील तेवढ्याच रन्स!

अभिजा's picture

1 Oct 2009 - 5:12 pm | अभिजा

श्रामो, धन्यवाद! :-)

सूर्य's picture

1 Oct 2009 - 5:01 pm | सूर्य

फोटो छान आहे पण "फोटो टेकनिकली चुकीचा आहे" याबद्दल थोडे अधिक सांगता का

- सूर्य.

अभिजा's picture

1 Oct 2009 - 5:25 pm | अभिजा

सूर्य, धन्यवाद!
चुका खालील प्रमाणे आहेतः-

पोर्ट्रेटमध्ये जिवंतपणा डोळ्यातील की-लाईटमुळे येतो. तो की-लाईट इथे डोळ्यात (ठळकपणे) दिसत नाहीयेय.

कमी रेझॉल्यूशन कॅममुळे मूळ फोटोमध्ये डिजिटल नॉईज खूप होता. तो एडिटरमध्ये साफ करताना स्किन टेक्स्चर अनइव्हन झालय.

चेहरा अर्धप्रकाशित राहिलाय. पूर्ण चेह-यावर प्रकाश सारख्या प्रमाणात असता तर डिटेल्स चांगले दिसले असते.

फोटो भर दुपारी काढल्यामुळे आपसूकच कॉन्ट्रास्ट जास्त झालाय.

श्रावण मोडक's picture

1 Oct 2009 - 5:31 pm | श्रावण मोडक

चेहरा अर्धप्रकाशित राहिलाय. पूर्ण चेह-यावर प्रकाश सारख्या प्रमाणात असता तर डिटेल्स चांगले दिसले असते.
हे माझ्या लक्षात आले. पण हा प्रकाश म्हणजे बाहेरचा की कॅमेऱ्याचा फ्लॅश वगैरे? बाहेरचा असेल तर तो आपण थोडाच आणू शकतो तुम्ही दिलेल्या परिस्थितीमध्ये! तो तसाच राहणार. त्यातून छायाचित्र उजळवणे हीच छायाचित्रकाराची किमया. ती बाकी तांत्रीक कसरीमुळे (कमी रिझोल्युशन कॅम वगैरे) साध्य झाली नसेल. म्हणूनच म्हटलं, सचिनची थर्टी!

अभिजा's picture

1 Oct 2009 - 5:46 pm | अभिजा

श्रावण,
डे लाईट एवढा स्ट्राँग होता की फ्लॅश वापरण्याची गरज नव्हती. हार्ड काँट्रास्टमुळे अर्धा चेहरा सावलीने झाकोळून गेला. फ्लॅश वापरला असता तर प्रकाशित भाग अधिक प्रकाशित (ओव्हर एक्सपोज) झाला असता.

श्रावण मोडक's picture

1 Oct 2009 - 6:00 pm | श्रावण मोडक

सहमत.

सूर्य's picture

1 Oct 2009 - 11:07 pm | सूर्य

धन्यवाद अभिजा.

- सूर्य.

संदीप चित्रे's picture

1 Oct 2009 - 6:42 pm | संदीप चित्रे

अभिजा,
तुझा तिसरा डोळा खूपच मस्त आहे रे... कीप इट अप :)
btw, तू पालघरचा आहेस का?

अभिजा's picture

1 Oct 2009 - 10:05 pm | अभिजा

धन्यवाद, संदीप! होय, मी पालघरचा! :-)

प्राजु's picture

1 Oct 2009 - 7:39 pm | प्राजु

मस्तच!!
खूपच छान आहे. केवळ फोटोग्राफीच नव्हे तर लेखनही चांगलं केलं आहे. कीप इट अप!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु's picture

1 Oct 2009 - 7:39 pm | प्राजु

मस्तच!!
खूपच छान आहे. केवळ फोटोग्राफीच नव्हे तर लेखनही चांगलं केलं आहे. कीप इट अप!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

1 Oct 2009 - 8:03 pm | धनंजय

हासरे चित्र आणि लेख.

(दुव्यावरचा कृष्णधवल फोटो विशेष स्मरणीय .)

चतुरंग's picture

1 Oct 2009 - 8:38 pm | चतुरंग

मुलांचे विभ्रम म्हणजे वेड लागतं! निरागसतेने ती बघता बघता तुम्हाला आपलंसं करुन घेतात. त्या मुलाच्या चेहेर्‍यावर काय तजेलदार भाव आहेत! वा. मजा आली.
आणि हो, ललितही सुंदरच आहे.
(दुव्यावरचा फोटू देखील लाजवाब!)

(आनंदी)चतुरंग

अभिजा's picture

1 Oct 2009 - 10:06 pm | अभिजा

प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद! :-)