परवा लल्लन्टॉप या प्रसिद्ध युट्युब वाहीनीवर एक वादचर्चा प्रसिद्ध करण्यात आली. चर्चेचे शिर्षक Does God Exist ? असे होते. या चर्चेत नास्तिकांच्या बाजुने जावेद अख्तर हे होते आणि आस्तिकांच्या बाजुने मुफ्ती शामाईल नादवी हे होते. या सुमारे २ तास चाललेल्या चर्चेची वैशिष्ट्ये म्हणजे
१- चर्चा फारच सुंदर रीतीने करण्यात आली कुठले प्रश्न घ्यावे काय वेळ देण्यात यावी चर्चा कशी करावी हे सर्व पुर्वनियोजित होते आणि तसे अंमलातही आणले गेले.
२- दोन्ही चर्चक अख्तर आणि नादवी उत्तम वक्ते आणि अभ्यासु होते. (नादवी अख्तरांना अकॅडेमीकली भारी पडत होते पण ते एक असो )
३- एक मॉडरेटर म्हणुन श्री सौरव द्विवेदी यांनी आपली भुमिका फार चोखपणे बजावली आणि चर्चेचे उत्तम संचलन केले त्यामुळे चर्चा एका उंचीला पोहोचली.
४-प्रेक्षकवर्ग व स्थान दोन्ही तालेवार होते प्रेक्षकांमधुन सुद्धा उत्तम प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या.
५-तमाम कचरा टेलीव्हिजीन वाहीनींच्या आक्रस्ताळी, किंचाळी चर्चकांना आणि वाईट्ट अशा निवेदकांच्या गालावर या सुसंस्कृत चर्चेने एक सणसणीत चपराक हाणली.
६-तमाम नेटीझन्स नी या चर्चेला अल्पावधीत विक्रमी व्ह्युज देउन ( ३ दिवसात आतापावेतो ५५ लाख ) आणी अक्षरशः हजारो कॉमेंट्स चा पाऊस पाडुन डोक्यावर घेतले.
अशा अजुन चर्चा घडोत हीच सदीछा. कोणाची कुठलीही बाजु असो प्रेक्षकांना चर्चेतुन छान मुद्दे मिळाले.
आता यामध्ये आस्तिकांच्या बाजुने मांडणी करणारे मुफ्ती यांनी एक प्रश्न विचारला की जगातील वस्तुनिष्ठ नैतिकतेचे अधिष्ठान काय आहे तुम्हा नास्तिकांच्या मते ? हे सांगा आमच्या मते ईश्वर हाच जगातील मानवी वस्तुनिष्ठ नैतिकतेचे अधिष्ठान आहे. ( आपके पास ऑब्जेक्टीव्ह मोरालिटी का कोइ फाऊंडेशन नही है ) पुढे मुफ्ती यांनी प्रश्न विचारला की तुम्हा नास्तिकांच्या जगात वस्तुनिष्ठ नैतिकता कशी ठरवणार ? यावर जावेद अख्तर यांना खरे म्हणजे चांगले प्रत्युत्तर जमलेच नाही. अख्तर म्हणाले की
मेजॉरीटी ठरवणार की काय चांगले आहे काय नाही. त्यावर मुफ्ती म्हणाले की जसे जर्मनीच्या मेजॉरीटी ने ठरवले की ज्युंचे जेनोसाइड हे योग्य आहे तर तुम्ही म्हणाल की ते योग्य आहे ? यावर जावेद म्हणाले की त्यावेळेस सर्व पृथ्वीतलावर ग्रहावर जितके लोक होते त्यांचे मेजॉरीटी मत असे होते का की जेनोसाइड व्हावे या अर्थाने ? त्यावर मुफ्ती म्हणाले की अच्छा सर्व पृथ्वीग्रहाची मेजॉरीटी ठरवणार तर मग संपुर्ण पृत्थ्वीवर धर्म मानणारे जे आहेत ते बहुसंख्य आहेत मग तुम्ही धर्म का मानत नाही ?
एकुण जावेद अख्तर यांना मुफ्तीने बर्यापैकी जेरबंद केले.
माझ्या मते जावेद अख्तर हे एक उत्तम शायर, भाषाप्रभु वगैरे आहेत यात वाद नाही मात्र ते उत्तम अभ्यासक असे काही फारसे वाटत नाही. त्यंना मुफ्ती ने मांडलेले मुद्दे समजुन घेण्यातही अडचण येत होती, ते अनेकदा चाचपडत अडखळत होते तर ते एक असो.
माझे ही चर्चा पाहतांना मुफ्ती यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दोन बाजुने केलेले तर्क आठवले. मुफ्ती यांचा महत्वाचा प्रश्न की वस्तुनिष्ठ नैतिकता अशी काहीही अस्तित्वात असु शकत नाही. ईश्वर हाच मानवी नैतिकतेचे अधिष्ठान आहे. म्हणजे ईश्वर आहे त्याचा न्याय आहे त्याची भिती आहे तो आपल्या पापाची शिक्षा देईल आणि सुकर्माची सुफळे देइल हे निश्चीत आहे. आणि म्हणुनच ईश्वर प्रेरीत मानवी नैतिकता जगात अस्तित्वात आहे. वस्तुनिष्ठ ईश्वर अस्तित्वा व्यतिरीक्त स्वतःच्या पायावर उभी असणारी वस्तुनिष्ठ नैतिकता संभवतच नाही अशा अर्थाचे मुफ्ती यांचे आर्ग्युमेंट होते.
याचाच असा अर्थ की ईश्वर नसेल किंवा नसता तर कोणीही नैतिक राहणार नाही नसता. मानवी नैतिकता स्वतंत्र असुच शकत नाही तिचा आधारस्तंभ ईश्वर हाच आहे.
हे आर्ग्युमेंट जुनेच आहे. विवेकानंद सुद्धा हेच आर्ग्युमेंट थोडे वेगळ्या अर्थाने अद्वेत बाजुने करतात. विवेकानंद विचारतात की अद्वैतवाद ज्या शुद्ध-बुद्ध-मुक्त-नित्य ब्रह्म तत्वाचे प्रतिपादन करतो जे की सर्व मानव प्राणि वनस्पती सर्व सर्वांत विराजमान असे तत्व आहे तेच खरे मानवी नैतिकतेचे अधिष्ठान आहे. विवेकानंद विचारतात की माणसाने माणसाला का मारु नये किंवा दुख देऊ नये इ. कारण की सर्वात तेच ब्रह्म तत्व विराजमान आहे म्हणुन इतरांप्रति केलेली हिंसा ही स्व प्रतिच होणार इत्यादी. अशाच लाइन वर त्यांचे आर्ग्युमेंट असे
या वरील मांडणीचा प्रतिवाद करतांना मला दोन संदर्भ महत्वाचे वाटतात
एक तात्विक अंगाने या वरील मांडणीच्या विरोधात उत्तम आर्ग्युमेंट जे केलेले आहे ते इमान्युएल कांट या विख्यात तत्ववेत्याने नैतिकते संदर्भात ईश्वरनिरपेक्ष अशा नैतिकतेची मांडणी केलेली आहे.
दुसरे म्हणजे the god delusion या ग्रंथात Richard dawkins यांनी वैज्ञानिक दृष्टीकोणातुन माणुस उत्क्रांत होत असतांना उत्क्रांतीच्या अंगाने मानवात नैतिक आचरण नैतिक गुण कसे विकसीत होत गेले व ही नैतिकता कशी सर्वस्वी ईश्वर निरपेक्ष अशी आहे यांचे उत्कृष्त असे विवेचन केलेले आहे.
या दोन्हीचा वापर जावेद अख्तर यांना करण्याची संधी होती ती त्यांना करता आली नाही अन्यथा चर्चेत अजुन सखोल उहापोह झाला असता.
वरील दोन्ही कांट आणि डॉकीन्स यांच्या मांडणी विषयी पुढील भागात लिहितो तुर्तास कंटाळा
तोपर्यंत मान्यवरांचे या संदर्भातील विचार जाणुन घेण्यास आवडतील.
ही चर्चा अवश्य पाहावी याचा दुवा इथे.
https://www.youtube.com/watch?v=sejkUeZS3dU
प्रतिक्रिया
23 Dec 2025 - 10:53 pm | NiluMP
ना मुफ्ती ने मांडलेले मुद्दे समजुन घेण्यातही अडचण येत होती, ते अनेकदा चाचपडत अडखळत होते तर ते एक असो....
अगदी उलट झाले. तो मुल्ला ४५ मिनिटाला काय बोलायचे तेच विसरला.
I can prove there is no thing such as God.
Goto terrace of any skyscraper take the name of the God you believe in and jump (without parachute) if we found you alive on ground whole world come know that God exist, but i am dam sure you will be dead. (this test is not for author, it is for those who day and night claim they know God and only their God exist)
Now prove me wrong.
24 Dec 2025 - 12:55 am | NiluMP
precisely at 44::06 mins.
24 Dec 2025 - 5:44 am | सोत्रि
चर्चा मजेशीर होती.
हत्ती चाचपडणाऱया चार आंधळ्यांच्या गोष्टीची आठवण झाली चर्चेतील वाद-प्रतिवाद ऐकताना.
वाट पाहतोय पुढच्या भागाची, पुभाप्र…
- (धाम्मिक) सोकाजी
24 Dec 2025 - 6:54 am | मारवा
Why Good people suffer नावाचे एक पुस्तक आहे त्यात आस्तिक बाजूने असा युक्तीवाद येतो की,
तुम्ही समजा दूर उभे राहून एक सर्जरी बघत आहात आणि ( तुम्ही इतके मठ्ठ आहात की तुम्हाला सर्जरी हा प्रकारच माहित नाही असे त्यात नाही म्हटलेले पण मी म्हणतो इतका मठपणा अपेक्षित आहे काल्पनिक उदाहरणात ) तर तुम्हाला वाटेल की डॉक्टर त्या रुग्णाचे हाल करत आहेत त्याला torture करत आहे. तर त्यांचे म्हणणे हे तुमचे अज्ञान आहे. Surgeon त्याच रुग्णाच्या भल्याकरिता त्याचा unwanted part काढत आहे वगैरे. आणि यात जी रुग्णांची तुम्हाला suffering दिसत आहे ती प्रत्यक्षात त्याची suffering नाहीच.
एक mr bean चा विनोदी चित्रपट आहे नाव नेमके आठवत नाही. त्यात एक असाच प्रसंग आहे बिन बाजूच्या बिल्डिंग मधून सर्जरी होताना बघतो त्याचा गैरसमज होतो तो तिथे जाऊन त्याला detective style वाचवण्याचा प्रयत्न वगैरे करतो असा धमाल विनोदी प्रसंग आहे.
तर आस्तिक म्हणतात की तुम्ही mr bean आहात ईश्वराचा grand plan तुम्हास ठाऊकच नाही म्हणून तुम्ही suffering समजत आहात ते प्रत्यक्षात त्यावर केलेलं उपकार आहेत वगैरे वगैरे.
आता यावर काय बोलणार ?
या वरील चर्चेत सुद्धा मुफ्ती ने असाच एक sixer मारला. गाझा मध्ये जी मुले मारली जात आहेत त्यांचे ईश्वर recompense करणार अशा अर्थाने.
24 Dec 2025 - 9:37 am | गवि
मेजॉरिटी हा शब्द नास्तिकाने आपल्या बाजूच्या समर्थनार्थ वापरणे ही सर्वात मोठी घोडचूक. तिथेच सर्व आटोपते. ईश्वर न मानताही नैतिकतेचे अधिष्ठान हवे असेल तर मेजॉरिटी नव्हे.. प्रत्येकाने फक्त आपल्या स्वतःला घाबरायला पाहिजे.
इक शख्ससे मैं डरता हूं
उससे बचके मैं रहेता हूं
वो शख्स मेरा अक्स हैं
जो पस ए आईना दिखता हैं
वो पस ए आईना दिखता हैं
पर अंदर मेरे रहेता हैं
उस शख्स से खुदको छुपाना
आसां नहीं..
आसां नहीं..सबकुछ भुलाना
आसां नहीं कहानी मिटाना
आसां नहीं खुद ही के संग
इक उम्र निभाना
आसां नहीं.. आसां नहीं.
24 Dec 2025 - 11:02 am | Bhakti
इतकी चर्चा इतकी हाईप वाचली की आज सकाळी ही चर्चा ऐकली....वेळ वाया गेला ;)
उलट जावेद नीट बोलले,हो पण मेजॉरिटी हा मुद्दा साफ चुकला.त्याऐवजी जे अधिक लोकांचे हितकारक,समानता देते ती नैतिकता असं म्हटलेलं चाललं असतं का?
ख्रिस्ती व मुस्लिम यांत देव व सैतान असतात त्यामुळे ही चर्चा करताना मुफ्ती अनेकदा सैतानाने रेफरेन्स देत होता.तिथेही स्वातंत्र्य,बंधूभाव गेला बाजार 'अहं ब्रम्ह' ,तत् त्वम् अशा गोष्टी सांगायला पाहिजे होत्या.
इथे बुद्ध किंवा चार्वाक अभ्यासणारे देव नाही हे अधिक उत्तमरीत्या सिद्ध करू शकले असते का?
24 Dec 2025 - 12:41 pm | सोत्रि
नक्कीच!
जावेद अख्तर ४-५ मुद्देच परत परत त्यांच्या बहुतेक चर्चांमधे मांडत असतात त्यामुळे त्या अभ्यासून त्यांची कोंडी करणं त्या मुफ्तीला सहज शक्य झालं.
- (धाम्मिक) सोकाजी
24 Dec 2025 - 1:14 pm | मूकवाचक
देव/ ब्रह्म किंवा ईश्वरी शक्ती हा प्रचितीचा किंवा अनुभूतीचा विषय आहे हे अमान्य करत ती निव्वळ एक संकल्पना आहे हे गृहीत धरले, तर सामाजीक/ राजकीय/ मनोवैज्ञानिक अंगाने तिची अंतहीन चिकीत्सा करता येते/ देव नाकारता येतो. हा वस्तुनिष्ठपणे सिद्ध करण्याचा विषय नसून व्यक्तिनिष्ठ प्रचितीचा प्रांत आहे असे गृहीत धरल्यास आपल्या दृष्टीकोनात खूप मोठा फरक पडतो. त्या पुढचा प्रवास देखील वेगळ्या वाटेने जातो. त्या दृष्टीने संदर्भ देखील व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे घेतले जातात. असो.
25 Dec 2025 - 10:43 am | Bhakti
+१
प्रतिसाद खुप किचकट वाटतं आहे.अजून सोप्या भाषेत सांगाल का?
24 Dec 2025 - 2:58 pm | सोत्रि
@भक्ती
ऐसीवर एका प्रतिसादात उपस्थित केलेल्या प्रश्नावर एका वेगळ्या अॅन्गलने तुमचा मुद्द्याला धरून प्रतिसाद दिला आहे.
- (अभ्यासू) सोकाजी
25 Dec 2025 - 10:45 am | Bhakti
+१ बुद्ध दि ग्रेट...
25 Dec 2025 - 12:15 am | कॉमी
नास्तिक नैतिकतेला वस्तुनिष्ठ असण्याचे अधिष्ठान देऊ शकत नाहीत कारण नैतिकता वस्तुनिष्ठ नाहीये. सिंपल. हे उत्तर जावेद साहेबांनी द्यायला हवे होते.
मागे पाहिले असता काळानुसार नैतिक काय आणि अनैतिक काय ह्याच्या कल्पना बदलल्या आहेत. आज एकाच काळात सुद्धा दोन वेगवेगळ्या कल्पना असणारे लोक दिसतात. उदा, प्राण्यांना खाणे योग्य की अयोग्य. जे नैतिकता "वस्तुनिष्ठ" असती तर ह्या ढोबळ प्रश्नावर दुमत नसते.
ह्यावर नार्नियाचे लेखक लुईस ह्यांचा प्रतिवाद असा आहे की काळानुसार आणि समाजगटानुसार नैतिकतेची परिभाषा बदलत नाही तर त्यांचे परिस्थिती बद्दलचे ज्ञान बदलते. उदा, चेटकीणी खरच असत्या तर त्यांना जाळून मारणे नैतिक आहे. पण आता आपल्याला माहितीये की चेटकीण वैगेरे थोतांड आहे आज चेटकीणींना मारणे म्हणजे निरपराध स्त्रियांना मारणे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे चेटकीण मारणे हे आज अनैतिक नाहीये, ते आजही नैतिकच आहे पण आज चेटकीणीच नाहीत हे माहितीये. म्हणजे मूळ नैतिक काय आणि अनैतिक काय हे ठरवण्याच्या तत्वाचा गाभा तोच होता आजही तोच आहे, fact of the matter काय ह्याचे ज्ञान अद्यतन झाले.
मला नाही पटले लुईसचे म्हणणे. गुलामगिरी पूर्वी नैतिक मानली जाई. खुद्द जुना करार म्हणतो की नॉन ज्यूंना गुलाम म्हणून ठेवा. आज गुलामगिरी चुक मानली जाते. आता ह्यात कसले ज्ञान अद्यतन झाले ? इथे तर नैतिक काय ह्याची कल्पनाच अद्यतन झालिये.
कदाचित लुईसच्या तत्वात एक जोड करून आणखी सेन्सिबल बनवता येईल. परिस्थितीचे ज्ञान आणि पूर्ण नैतिक होण्याची सक्षमता, ह्यानुसार काय नैतिक काय अनैतिक ठरते. उदा - बालमजुरी अनैतिक ही नेहमीच खरे होते. पण बालमजुरी बंद करण्यासाठी सुबत्ता येईपर्यंत तीस नैतिक म्हणून खपवून घेणे भाग होते. बालमजुरी बंद करण्याइतपत सुबत्ता आल्यावरच सर्वमत बदलले.
25 Dec 2025 - 10:50 am | Bhakti
हो पूर्वी आचारसंहितेनुसार आचार करून नैतिकता सिद्ध होई.पण जिथे प्रत्येक व्यक्तीचे हित जपले जाईल ती नैतिकता ठरेल ,पण समाजात अशी नैतिकता येणे खूप जिकिरीचे आहे.यातुन पुढचा विचार करणार वेगळा ठरतो आणि मग तो स्वतःच्या स्वातंत्र्यानुसार नैतिकता अवलंबवितो.पूर्वी हे एकदम अशक्य होते पण आता अशी अनेक माणसं तयार होत आहेत.
25 Dec 2025 - 12:53 am | कॉमी
आणिक,
जनरल ख्रिस्ती लोकांचे देव व सैतान ह्यांच्याबद्दलचे विचार पोरकट असले तरी गंभीर ख्रिस्ती लेखकांचे विचार ह्याबाबत अत्यंत रोचक आहेत. मिल्टन नावाच्या कवीने त्याच्या महाकाव्यात सैतानाचे पात्र उभे केले आहे ते खूपच रोचक आहे. त्यातला सैतान अगदी रिलेटेबल आहे. सी एस लुईस ह्यांचे लिखाण सुद्धा ह्याबाबत वाचण्यासारखे आहे.
24 Dec 2025 - 1:51 pm | सोत्रि
सहमत!
- (व्यक्तिनिष्ठ) सोकाजी
24 Dec 2025 - 1:57 pm | मारवा
पूर्वी मी सर्व आस्तिकाना एकाच वर्गात धरत.असे. नंतर आयुष्याचा आणि माणसांचा जसजसा अनुभव येऊ लागला तसा मी दोन विभागात माझ्यापुरते वाटून घेतो. अर्थात हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे पद्धत आहे. कारण मी बघितले काही लोक आस्तिक असल्याने कुणाचंच नुकसान त्यांच्या सकट होत तर नाहीच पण खुपदा त्यांचा एकूण positive approach हा इतका गोड आणि लोभसवाणा असतो मुळात ती लोकच त्या सुंदर स्वभावाची असतात. त्यांनी त्या त्या धर्माला आपल्या पद्धतीने edit करून modify करून घेतलेले असते. कधी कधी ते धर्मातील वाईट चालीरीतीना सुद्धा चतुराईने सकारात्मकतेने adapt करून आनंदाने शांतपणे जगत असतात. तसे लोक इतके positive असतात की कुठल्या धर्माच पुस्तक आणि कर्मकांड त्यांच्या वाट्याला आले आहे त्याने त्यांना फरक पडत नाही. अशा गोड आज्या आजोबा लोक मी पाहिलेले आहेत. मला या निरुपद्रवी positive कमालीच्या समंजस आस्तिक लोकांचा अजिबात राग येत नाही उलट त्यांच्या या क्षमतेचा हेवा वाटतो.
आणि अर्थात vice versa
25 Dec 2025 - 9:18 am | अनामिक सदस्य
"कधी कधी ते धर्मातील वाईट चालीरीतीना सुद्धा चतुराईने सकारात्मकतेने adapt करून आनंदाने शांतपणे जगत असतात"
याबाबत उत्सुकता आहे. याचे एखादे तुम्ही बघितलेले उदाहरण देता येईल का?
25 Dec 2025 - 1:08 pm | मारवा
या चर्चेत एका प्रेक्षकाने जावेद अख्तर यांना प्रश्न विचारला की मी तुमच्या दुकानात तुमच्या बाजुला यायला तयार आहे मात्र मला धर्मात जे सणवार उत्सव सोहळे यांचा आनंद लुटता येतो तो नास्तिक झाल्यावर सर्वच मजा जाईल. त्यावर जावेद यांनी एक उदाहरण दिले कि कसे पूर्वीचे pagan चे जे सण होते ते ख्रिश्चनानी कसे ते पळविले वगैरे.
वर कोणी म्हणाले नास्तिकांचे मेळावे ते आवश्यक आहेत.
एकत्र जमणे मौज मजा करणे ही माणूस हा social animal असल्याने त्याची मूलभूत गरज आहेच. नास्तिकानी आपले सोहळे बनवावेत बर्ट्रांड रसेल जयंती किंवा भगतसिंग जयंती. किंवा विद्रोही दिवाळी किंवा विद्रोही नाताळ म्हातारा नव्हे तरुण सांता पुरुष नव्हे महिला सांता. कार्यक्रम रचावेत ,गाणी रचावीत. खावे प्यावे चढावे
तर महाराष्ट्रात एक शिवधर्म जो पुरुषोत्तम खेडकर यांनी स्थापन केला. त्याची बौद्धिक मांडणी करणारे आ ह साळुंखे यांना या धर्माच्या एन्टरटेन्मेंट value ची उत्तम समज आहे. त्यांच्या पुस्तकांत त्यांनी याचे महत्व मांडलेले आहे. हा शिवधर्म मूलतः हिंदू ब्राम्हणी धर्मविरोधी प्रेरणेने निर्माण करण्यात आलेला आहे. त्यामुळे हिंदू सण जे मिस करतात त्यासाठी पर्यायी सण गाणी प्रार्थना आदी बनविणे निर्माण करणे आणि प्रचलित करणे यासाठी साळुंखे आवर्जून प्रयत्न व्हावे असे मानतात आणि स्वतः ही विविध पर्याय सुचवितात.
फुले यांनी सुद्धा मला वाटते सत्यशोधक लग्न कसे व्हावे रिती वगैरे घालून दिलेल्या आहेत.
तर नास्तिक असो की आस्तिक माणूस मुळात social animal असल्याने त्याच्या एन्टरटेन्मेंट ची काळजी नास्तिकानी ज्यांना आपला गट वाढावा वाटते त्यांनी अवश्य घ्यावी.
नास्तिकांच्या सर्वात मोठ्या संघटनांनी याची या गरजेची दखल घेणे आवश्यक आहे. एक नास्तिकांची मोठी संघटना मला आठवते त्याप्रमाणे लंडन च्या बसेस वर नास्तिकते संदर्भात slogans चिपकविते त्याप्रमाणे काम करण्यास हरकत नसावी.
25 Dec 2025 - 1:10 pm | मारवा
समजा एक हिंदू आस्तिक घेऊ उदाहरणार्थ (कुठलाही घेता येऊ शकतो ) त्याच्याकडे किती मोठा भजनाचा डाटा आहे. किती सणावारांचा time pass आहे. पुन्हा त्यात किती मटेरियल आहे अमुक खाद्यपदार्थ तमुक रीती भाती. निर्थकतेचा साप आस्तिकाला सुद्धा कधी न कधी दंश करतोच (उसने किसे छोडा है ?) पण त्याच्याकडे उपलब्ध मलमांचा पेन किलर्स चा साठा मोठा आहे. शिवाय कर्मकांडे बघा अमुक प्रोब्लेम आहे हे करा तमुक आहे ते करा. बोलेतो हमारी जो फिल्म है इसमे सबकूच है रोमान्स है ऍक्शन है sadness है हिरो है विलन है स्टोरी है. म्हणजे explanation चे readymade साचे उपलब्ध आहेत. कारणमीमांसा सोपी सुटसुटीत सुडौल उपलब्ध आहे. जीवनात कितीही वाईट झाले अनुभव आले तरीं उत्तरे तयार आहेत धर्माकडे.
तर कुठलाही धार्मिक व्यक्ती असा well equipped असतो. शिवाय समव्यसनी समूह पाठीशी भक्कमपणे उभा आहे.
मेरे पास भजन है कीर्तन है तोडगे है कर्मकांड है painkillers हैं emotional support है
तुम्हारे पास क्या है ?
यावर नास्तिक म्हणतो
मेरे पास सच्चाई है.
पण असे म्हणून चालत नाही you need to live a life
जगातल्या नास्तिकानो एक व्हा.
तुमच्याकडे गमावण्यासारखे आहे तरी काय ?
31 Dec 2025 - 7:23 am | अर्धवटराव
चर्चेतले दोन्ही पक्ष, आणि मॉडरेटर, सगळ्यांनीच उत्तम रित्या सहभाग घेतला. कुठेही आक्रास्ताळेपणा येऊ दिला नाहि.
जावेद साहेबांना चर्चा सहज आपल्या बाजुने फिरवता आलि असती. पण ते साहित्यीक/कवी आहेत, राजकारणी/व्यवस्थापक नाहित. त्यामुळे मुद्देसूदपणे आपल्या बाजुने त्यांना चर्चा वळवता आलि नाहि.
लॉजीकच्या अंगाने, स्थळ-काळा आधी ईश्वर होता हा मुफ्ती साहेबांचा मुख्य मुद्दा होता. पण आपली बुद्धी/विचार हे स्थळ-काळाचंच अपत्य आहे. त्यामुळे स्थळ-काळापलिकडे काय असतं हे लॉजीकली आपण ठरवुच शकत नाहि, इतका साधा प्रतिवाद होता त्यावर. पण अख्तर साहेब ईश्वराच्या अप्लिकेशनवर अडकले. ते सब्जेक्टीव्ह मॅटर आहे, आणि त्यावर कंक्लुजन निघु शकत नाहि. तिथेच चर्चा फसली.
पण एक इव्हेण्ट म्हणुन चर्चा छानच झाली. इतक्या चर्वीतचर्वणानंतर आता आपण मुफ्तीसाहेबांसोबत जेवण घेणार आहोत अशा मिश्कील टिपण्णीने केलेला शेवट तर खासच होता :)