नंदनवनात सिद्धू भाग २

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
28 Aug 2025 - 1:04 pm

“बाबा, आपण सिद्धूच्या घरी जाउया, त्याच्या बाबांची बदली झाली आहे. उद्या तो निघून जाईल, त्याच्यासाठी गिफ्ट घेऊया. “
मला कुठेही जायची इच्छा नव्हती. पण आरुने हट्ट धरला.
बायकोला बोललो, “जायचे तर काहीतरी घेऊन जायला पाहिजे. मोकळ्या हाताने जाणे चांगले दिसणार नाही. आपल्या खिशाला परवडेल अशी काहीतरी. तुला ह्या गोष्टी बरोबर समजतात, विचार करून सांग.”
शेवटी हजार एक रुपये टाकून ड्राय फ्रुट बॉक्स घेतली.
सिद्धूचा फ्लॅट म्हणजे काहीच्या काही होता, मी असा फ्लॅट आयुष्यात प्रथमच बधत होतो. एकेक गोष्ट नजरेत सामावून नोट करत होतो. विचार केला वेळ आली तर एखाद्या कथेत टाकता येईल. माझ्या धुवाधारला मी असा फ्लॅट देईन. सगळीकडे अॅं टीक पीसेस, अॅाबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स बेसुमार विखुरलेली होती. ब्राँझ आयटेम्स, गालिचे. फुल साईझ टीवी, हॉलमध्ये पाण्याचा हौद, त्यात कमळे, सोनेरी मासे, बंगला फुल एसी, पण... बघतो तर पंचवीस एक फूट उंचीवर असलेल्या छताला सहा लाकडी पाती असलेला एक फॅन!
अलीबाबाच्या गुतेत आल्याचे फीलिंग आले,
सिद्धू जाम खुश झाला आणि आरुला घेऊन दुसऱ्या खोलीत चालला गेला,
सिद्धूचे बाबा मला गरीब बिचारे वाटले. ऑफिसात शेर असणार पण घरी मउ मेणाहुनी. आम्हाला बसवूब बाईसाहेब, बहुतेक सिद्धूची आई असणार, समोर बसली.
“आपण ...?” स्वर थोडा कठोर.
“मी भिडे, अच्युत भिडे. ही पुष्पा माझी पत्नी आणि हा अर्णव. सिद्धूचा मित्र आहे. सिद्धूने आम्हाला सागितले की आपण शहर सोडून जाणार आहात. त्याला भेटायची खूप इच्छा होती, अगदी हट्ट धरला,” मी अपराधीपनणाची अप्रत्यक्ष कबुली माझ्या नकळत दिली. हे बोलायची काही गरज नव्हती पण तिथल्या डामडौलाने मला न्युनगंड आला असावा.
आपल्या कडची गृहीणी बोलली असती, “अहो त्यामुळे आपली ओळख झाली, भेट झाली.”
पण मिसेस शानभाग दुसऱ्या कुठल्यातरी ऑर्बिट मध्ये फिरत होत्या,
“मूलं हट्ट धरतात पण आपण त्याला बळी पडता कामा नये. हे माझे तत्व. मी शोभना शानभाग. डूलिटल, डूलिटल and डूलिटल कंपनीत व्ही पी आहे. सिद्धू ये. तुला भेटायला तुझा फ्रेंड आला आहे.” मग मिस्टर शानभागांकडे वळून ती कोकणी किंवा तुळूमध्ये काहीतरी बोलली. ते मला काही समजले नाही. मिस्टर शानभागांनी नाझ्याकडे बघून देखल्या देवा एक हास्य टाकले आणि पुन्हा लॅपटॉप मध्ये डोके खुपसले. एकंदरीत त्यांना काय चालले होते त्यात काडीमात्र रुची नव्हती.
सगळे गप्प होते. वातावरण जडशीळ वाटत होते.
उठून घरी निघून जावे असे वाटत होते. सय तोडण्यासाठी मीच पुढाकार घेतला.
“सिद्धू खूप हुशार आहे. आणि स्वभावाने पण, हल्ली अशी लाघवी मूल कुठे भेटतात.”
त्याना लाघवी म्हणजे काय समजले नसावे, मिस्टरांनी कोकणीत काही कुजबुज केली.
“ओके ओके,पण असा स्वभाव चांगला नाही,लोक गैर फायदा घेतात,”
“सिद्धू म्हणत होता की त्याच्या नर्सरीत खूप खेळणी आहेत, विशेष म्हणजे तो सांता. मिसेस शानभाग ...”
“एक्ष्क्युज़ मी, तो असे म्हणत होता. पण आमच्या कडे तर नर्सरी खेळणी वगैरे काही नाहीत, आणि सांता कोण तो पण नाही. मुलांनी खेळण्यात व्यर्थ वेळ खर्च करू नये, हीमॅन काय, स्केलेटर काय नि बार्बी काय. ह्या वर्च्युअल जगात रममाण... तो माझ्याकडे सुपरमॅन ची कॉमिक्स मागत होता. मी त्याला मोनॉपॉली आणून दिला आहे. आत्तापासून आवड निर्माण झालीतर ... माझ्या मनात त्याला फंड मॅनेजर करायचे आहे. करोडो मध्ये खेळतात ते... दॅट इज लाईफ.”
”छान.” मी एव्हढेच कसे बसे बोलू शकलो.
सिद्धूला काय करायचे होते ते त्याला कोण विचारणार? त्यांना माझे मनातल्या मनातले बोलणे ऐकू गेले असणार.
“ह्या वयात मुलांना काय समजणार? आपणच त्यांच्या करिअरला वळण द्यायचे.तो म्हणेल मला सिनेमात जायचे आहे, क्रिकेट खेळायचे आहे, लेखक व्हायचे आहे, सायंटिस्ट व्हायचे... अशी दळभद्री लक्षणं...”
मिसेस शानभाग वाघ पाठी लागल्यासारख्या बोलत होत्या, एक वाक्य संपायच्या आधी दुसरे बोलत होत्या. बोलता बोलता त्यांना माझी आठवण झाली असावी.
“ओ सॉरी, मी विचारायचे विसरले. तुम्ही काय करता ? मिसेस भिडे काय करतात?”
मी काय सांगणार की मी झटाक रहस्यकथा लिहितो म्हणून?
“मी डायरेक्टरेट ऑफ शुगरच्या ऑफिसात काम करतो.”
“असं असं, छान.”
“आता तुम्ही कुठे जाणार?”
“मिस्टरांची बदली जर्मनीला झाली आहे. आत्ता थोडंसोशल लाईफ मिळेल आम्हाला. नाहीतर इथे म्हणजे नाव घेण्याजोगी इंग्रजी मिडीयमची स्कूल नाहीत, हॉटेल नाहीत, थिएटर नाहीत, क्लब नाहीत. कस बस एक वर्ष काढलं.”
मी बायकोला म्हटलं चल जाउया. ती काय तयारच होती.
“बरं. आम्ही येतो,”
चहा नाही, कॉफी नाही, सरबत नाही , पुन्हा या नाही. आमचा ड्रायव्हर ड्रॉप करेल असे नाही.
आरुने सिद्धूचा निरोप घेतला. एकमेकाना कॉल करायचे मेल लिहायच्या इत्यादि प्रॉमिस केले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
खर सांगू मी पण थोडा सेंटी झालो.
खाली येऊन चालायला लागलो. थंड हवेची झुळूक आल्यावर थोडे बर वाटलं.
चार पावलं चालल्यावर पुष्पा एकदम म्हणाली, “अच्यु, अरे गिफ्ट माझ्याकडेच राहिली.”
आम्ही दोघं हसायला लागलो. मज्जाच झाली.
“आरु, तुम्ही काय केले?”
“आम्ही खूप खूप मजा केली. सिद्धूने त्याची सगळी खेळणी दाखवली. शेवटी सांताने आमच्यासाठी “ time to say goodbye“ वाजवले.”
सांगता सांगता आरुने आवंढा गिळला.
बाबा मी मोठा झालो की...
बेरीज वजाबाकी होत नव्हती. टोटल लागत नव्हती.
उत्तर टॅली होत नव्हते.
जर तुम्हाला समजले असेल तर कृपा करून मला सांगा.
समाप्त

kathaa

प्रतिक्रिया

भागो's picture

28 Aug 2025 - 1:09 pm | भागो

“ time to say goodbye“ ओरिजिनल इथे आहे
https://www.youtube.com/watch?v=TdWEhMOrRpQ&list=RDTdWEhMOrRpQ&start_rad...
Time to say goodbye sax
https://www.youtube.com/watch?v=aSzEPAhpneo&list=RDaSzEPAhpneo&start_rad...
मुद्दाम वेळ काढून ऐकावे असे काही.
ऐकले तर एक गोष्ट नोट करा
तो गायक Andrea Bocelli आंधळा आहे.